टोळी ते समाज आणि माणूस<< मागील भाग
---
खाण तशी माती, झाड तशी कैरी
जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’
तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच्या पातळीवर ती नोंद घेतली जात होती.
माणूस प्राणिजीवनातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा नर-मादी संबंध हे देहभोगाच्या पातळीवरच होते. त्याचा मूल होण्याशी असलेला संबंधही अद्याप माणसाला उलगडला नव्हता. पुढे व्यवस्था म्हणून एकास-एक असे नर-मादी संबंध प्रस्थापित झाले आणि तोवर पुर्या टोळीची असलेली मुले ही केवळ त्या दांपत्याची होऊ लागली, त्या मुलांची टोळीतील इतरांपेक्षा या जोडप्याशी अधिक जवळीक होत गेली.
जोडीदारांची निवड
कोणताही जीव वयात येतो तेव्हा त्याच्यामध्ये देहभोगाची जाणीव विकसित होते नि त्यासाठी त्याला जोडीदाराची गरज भासू लागते. जोडीदार मिळवण्याच्या पद्धती प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळ्या दिसतात. बहुसंख्य प्राण्यामध्ये मादीसाठी नरांमध्ये बाहुबलाचा संघर्ष होतो. पक्ष्यांमध्ये नर हा अनुनयाला अधिक महत्त्व देणारा असतो. तो घरटे बांधून, गाऊन, नृत्य करून मादीला समागमास राजी करतो. प्रत्यक्ष शरीरसंबंध न येणार्या माशांसारख्या प्रजातींमध्येही अनुनयालाच अधिक महत्त्व असते. प्राण्यांमध्ये नराचा सद्दी असते तर पक्ष्यांमध्ये मादीची. नराने बांधलेले घरटे तिला आवडले नाही, तर ते उखडून टाकून ती चालती होत असते. प्राण्यांमध्ये मादीला बहुतेक वेळा बलवान नराशी समागम करावाच लागतो.
माणूस हा प्राणिकुलातला, त्यातही शिकारी असल्याने त्याच्या टोळीमध्ये बलवंताची सद्दी होती. परंतु माद्यांसाठी झुंजणारे काळवीट शक्तिपात करून घेऊन भक्षकांची आयती शिकार होतात हे पाहिले असल्याने, आणि मादीवरून झालेली भांडणॆ टोळी फुटण्यास कारणीभूत ठरताना दिसत असल्यानेही, ती टाळणे शहाणपणाचे आहे माणसाच्या लक्षात आले. त्यातून एकास-एक अशी नर-मादी व्यवस्था उदयाला आली.
पण एकास-एक हे ठरले तरी ’कोणाचा जोडीदार कोण असावा?’ हा नवा प्रश्न निर्माण झाला. काळाच्या ओघात याच्या सोडवणुकीसाठी विविध पर्याय निर्माण झाले. परंतु सुरुवातीच्या काळात हे काम टोळीतील ज्येष्ठांचे किंवा अनुभवी व्यक्तींचे असे. ही व्यवस्था स्थिर झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मतही महत्त्वाचे ठरू लागले.
दुसरीकडे पक्ष्यांच्या नि प्राण्यांच्या पद्धतीचा काहीसा संकर करुन स्त्री ही वीर्यशुल्का ठरू लागली. अमुक प्राण्याची एकट्याने शिकार करुन आणल्यास मुलगा मादी मिळवण्यास पात्र ठरू लागला. भारतीय पौराणिक वाङ्मयात क्षत्रिय राजकन्या अशा वीर्यशुल्का असत. जोडीदार निवडण्यासाठी विशिष्ट कार्य करुन दाखवण्याचे आव्हान त्या पुरुषांना देत असत. परस्पर-संमतीने जोडीदार निवडणे अजून बरेच दूर होते.
लैंगिक संबंध
एकास-एक नर-मादी संबंध ही व्यवस्था प्रस्थापित झाल्यानंतर त्या एका जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवणॆ बंधनकारक ठरले. माणसाने स्वत:ची ’गुहा’ स्वत: निर्माण करुन तिला आपले वसतीस्थान केले. टोळीअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र गुहा- म्हणजे झोपडीसदृश निवारा तयार होऊ लागला. माणसांतील नर-माद्यांमधील देहभोग हा याच जागेमध्ये म्हणजे टोळीतील सदस्यांच्या नजरेआड होऊ लागला. पण त्यामुळे शरीरसंबंध ही एकांतात करण्याची कृती आहे हा परस्परसंबंध रूढ झाला नि भावनेच्या विस्ताराबरोबरच त्या क्रियेशी निगडित इंद्रिय्प्रदर्शनाबाबत शरमेची भावना रूढ होऊ लागली.
एकांतात शरीरसंबंध प्रस्थापित करणारा माणूस हा पहिला प्राणी ठरला. एरवी निसर्गामध्ये एकांत ही संकल्पनाच निसर्गात अस्तित्वात नाही. इतर प्राण्यांच्या दृष्टिने एकांत म्हणजे सुरक्षित ठिकाण इतकाच असतो. त्यातही जोडीदाराची अथवा कळपाच्या सदस्यांची साथ असते. माणसाची बुद्धी आणखी विकसित होत गेली तसतसे पुढे त्याने एकांताचा वापर चिंतन नि वैचारिक विकासासाठीही करून घेतला. त्यातून निर्माण झालेले बुद्धिजन्य ज्ञान ही माणसाला प्राणिविश्वापासून वेगळे करणारी सीमारेषा ठरली.
नग्नतेची जाणीव
नागर समाजात प्राधान्याने रुजलेली नग्नतेची जाणीव ही जननेंद्रियांच्या सार्वजनिक दर्शनासंदर्भात असते. अन्न आणि संरक्षण/निवारा या माणसाच्या आदिम काळातील गरजा. जंगलनिवासी असताना आसपास सारी जनावरेच असल्याने नग्नतेची जाणीव माणसाला नसणार. बायबलमध्ये कुणा तिसर्याने- सर्पाने, आदम-ईव्हला त्यांच्या नग्नतेची जाणीव करुन दिल्याची कथा आहे.
जननेंद्रिये हा शरीराचा सर्वात नाजूक भाग असतो. चार पायांवर चालणार्या जनावरांमध्ये त्यांना दोन पायांचे संरक्षण मिळत होते. माणसांचे इतर जनावरांहून वेगळे-- मागील दोन पायांवर चालणे, सुरू झाल्याने माणसाची जननेंद्रिये समोरच्या बाजूने उघडी पडली. जंगलातून माणूस दोन पायांवर चालत असताना पुढे चालणार्याच्या हातून निसटलेल्या एखाद्या लहानशा फांदीचा आघातही अतिशय वेदनादायक होत असणार.
हे टाळण्यासाठी माणसाने शिकारीतून मिळालेल्या जाड कातड्याने जननेंद्रिय झाकण्यास सुरुवात केली. वन्यजीवी मानवाची जाणीव लज्जा नव्हती आणि लज्जारक्षण ही गरज नव्हती, जाणीव वेदनेची होती तर संरक्षण ही गरज होती. म्हणून त्याची प्रावरणे ही जाड कातडी होती, अॅडम-ईव्हच्या कथेत दाखवतात तशी अंजिराची दुबळी पाने नव्हती.
माणूस नागर झाल्यावर आणि सामाजिक चालीरीतींमध्ये बरेच बदल घडल्यावर, नागर आयुष्यात जननेंद्रियांवरील आघाताची शक्यता/संभाव्यता नगण्य झाल्यावर, वेदना-संरक्षण जोडीला मागे ढकलून नग्नतेची जाणीव पुढे सरकली असावी.
अपत्य संगोपन
पुनरुत्पादनानंतर अपत्य-संगोपन हा पुढचा टप्पा येतो. विविध सजीवांमध्ये तो विविध प्रकारे हाताळला जातो. प्राण्यांमध्ये ही जबाबदारी बव्हंशी मादीची असते. नर क्वचितच त्यात सहभागी असतो. बर्याच पक्ष्यांमध्ये मात्र एकास-एक अशी नर-मादी जोडी असते नि अपत्य-संगोपनामध्ये दोघांचाही सहभाग असतो. माशांमध्ये अथवा कीटकांमध्ये मात्र अपत्य संगोपनामध्ये नर अथवा मादी दोहोंचाही सहभाग नाही.
माणसांमध्ये पक्ष्यांप्रमाणे एकास-एक जोडी प्रस्थापित झाल्यानंतर अपत्यसंगोपनात नरही आपली जबाबदारी उचलू लागला. इतर प्राण्या-पक्ष्यांपेक्षा माणसाचे पिलू बरेच अधिक काळ परावलंबी राहात असल्याने मादीला या मदतीची आवश्यकताही होती. सुरुवातीच्या काळात ही जबाबदारी म्हणजे प्रामुख्याने अन्नाची सोय एवढीच होती. पुढे अनुवांशिकतेची जाणीव जसजशी दृढ होत गेली तसतसे या अपत्य-संगोपनाला नातेसंबंधाच्या भावनेचे अस्तर मिळून गेले आणि त्याचे रूपांतर जबाबदारीतून कर्तव्यामध्ये होत गेले.
मम, आत्मन:
शिकारीतून अथवा संकलनातून मिळालेले अन्न हे पुर्या टोळीसाठी असे. मुलेही टोळीचा भाग असल्याने त्यांचाही वाटा त्यात असे. त्यामुळे परावलंबी मुलांना अन्न पुरवण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न नव्हता. ती पुर्या टोळीची जबाबदारी होती. टोळीअंतर्गत कुटुंबे तयार झाली आणि ती जबाबदारी त्या-त्या कुटुंबप्रमुखाची ठरली. त्यातून अन्न-संकलन हे टोळीचे सामूहिक काम हळूहळू कौटुंबिक पातळीवर सरकले.
त्याचबरोबर कुटुंबाने कमावलेले अन्न हे प्राधान्याने त्या कुटुंबाचे ठरू लागले. प्रत्येक जोडप्याने कमावलेल्या अन्नातील वाटा टोळीतील इतरांकडे जाण्यापूर्वी त्यांच्या मुलांकडे जाऊ लागला. यातून खासगी मालकीच्या संकल्पनेकडे माणसाची वाटचाल सुरू झाली. अशा तर्हेने अनुवांशिकतेची जाण निर्माण होण्याआधीच माणसामध्ये वारशाची जाणीव निर्माण झाली होती.
कुटुंब संकल्पनेचा विस्तार
मागील भागात म्हटल्याप्रमाणे माणसाचे शिकारीसह शेतीचे तंत्र आत्मसात केले नि जगण्यामध्ये आवश्यक तसंच उपयुक्त कौशल्यांची जंत्री वेगाने वाढली. शिकारीपासून कातडे कमावणे, तिला आवश्यक ती हत्यारे तयार करणे, भक्ष्याचा माग काढणे अशी विविध कौशल्ये शिकारीसाठी तर शेतीमध्ये शेतीयोग्य जमीन तयार करणे, तिची स्वच्छता, रुजवण्यास बीजे शोधणे व त्यांचा साठा करणे, जनावरांच्या धाडीपासून त्यांचे रक्षण करणे अशी अनेक पर्यायी कौशल्ये माणसाच्या जमातीमध्ये विकसित होऊ लागली.
ते विशिष्ट कार्य करणारा कुटुंबप्रमुख शिकार्यांप्रमाणेच आपण जमा केलेले त्यासंबंधीचे ज्ञान आपल्याच पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून सोपवू लागला. यातून त्या-त्या कौशल्याआधारे कुटुंबे विस्तारली आणि विशिष्ट कामे करणार्या जमातींचा उदय झाला. यातून भारतातील वर्णव्यवस्था नि जातिव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. टोळी विस्तारत विविध कुटुंबांच्या उतरंडींचा समाज निर्माण झाला.
एकविसाव्या शतकातील लग्नसंस्था
टोळीजीवनाच्या काळात प्रस्थापित झालेली एकास-एक नर-मादीची जोडी हे लग्नसंस्थेचे प्रारूप बव्हंशी स्थिर झालेले आहे. काळाच्या ओघात तिच्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. खासगी मालमत्तेचेही कौशल्याप्रमाणेच वारशामध्ये रूपांतर झाल्यामुळे या लग्नसंस्था स्थिर होत गेली. त्याचबरोबर लग्नसंस्था ही धार्मिक व्यवस्थेने आणि राज्यव्यवस्थेनेही आपल्या व्यवस्था-उतरंडीमध्ये सामावून घेतल्याने ती अधिक बळकट होत गेलेली आहे. धार्मिकतेने तिच्याभोवती पावित्र्याची झूल पांघरली, तर राज्यव्यवस्थांनी तिच्या-आधारे खासगी मत्तेसंदर्भामध्ये वारसाहक्काचे नीतिनियम बांधत नेले आहेत.
बहुपत्नित्व ही पर्यायी व्यवस्था अस्तित्वात असली, तरी त्यांची संख्या एकुण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्यच राहते. ही व्यवस्था प्रामुख्याने युयुत्सु समाजांतच उदयाला आली. माणसांनी शिकार म्हणून प्राण्यांशी केलेला संघर्ष बराच मागे पडून जल, जंगल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी माणसांच्या टोळ्या आपसात लढू लागल्या. त्यात बळी पडत असल्याने समाजातील पुरुषांची संख्या घटू लागली. त्यातून नर गमावलेल्या स्त्रीलाही नवा जोडीदार देणे आवश्यक ठरले. यामागे तिच्या उदरनिर्वाहाची सोय नि तिचे उत्पादक भूमी म्हणून असलेले स्थान अशी दोनही कारणे होती. आणि स्त्री-पुरूष संख्येतील असमतोलामुळे एक नर नि एकाहुन अधिक माद्या अशी व्यवस्था स्वीकारणे भाग पडले.
टोळीयुद्धांची वारंवारता कमी झाली, जगभरात लोकशाही राज्ये उदयाला आली आणि स्त्री-पुरुष गुणोत्तर पुन्हा एकास-एकच्या आसपास आल्यामुळे बहुपत्नित्व ही आता कालबाह्य झालेली व्यवस्था आहे. तरीही काही प्रमाणात ती टिकून आहे. त्यात याचे एक कारण बलवंताचा आश्रय घेऊन आपल्या मुलांचे भविष्य अधिक सुरक्षित करण्याच्या स्त्रीच्या उपजत उत्क्रांतीवादी प्रेरणेत आहे. दुसरीकडे राजकीय आर्थिक नि सामाजिकदृष्ट्या बलवान असलेले राजे, सुलतान सरदार जसे एकाहुन अधिक स्त्रियांशी सहवास करत असत. त्याचा परिणाम म्हणून एकाहुन अधिक स्त्रिया भोगणे याला एकप्रकारे पौरुषाचे परिमाण मिळाले आहे. जे जाणीव-नेणिवेच्या पातळीवर सर्वसामान्यांतही रुजून बसले आहे.
स्वातंत्र्य, समता नि बंधुता या त्रिसूत्रींच्या आधारे उभ्या राहिलेल्या लोकशाहीने एकाधिकार स्वरूपाची शासनपद्धती मोडीत काढली. प्रजेची जनता झाली नि तिला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार मिळू लागला, त्याचप्रमाणे ज्येष्ठांचे अथवा मागील पिढीचे जोडीदार निवडण्याचे एकाधिकार संपुष्टात येऊन प्रत्येकाला ते स्वातंत्र्यही मिळू लागले.
चाचणी आणि विच्छेद
टोळीजीवनाच्या काळात विवाहविच्छेद होत असत का, असल्यास त्यांचे प्रमाण किती आणि त्यातून सुटे झालेले जोडीदार पुन्हा नव्या जोडीदारांचा शोध कसा घेत असत याबाबत मला फारशी माहिती मिळाली नाही. परंतु अर्वाचीन काळात पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये असो की मुस्लिम कायद्यामध्ये असो, विवाहविच्छेद नि पुनर्विवाह फारसे दोषास्पद मानले जात नाहीत. भारतीय समाजामध्ये मात्र अद्यापही योनिशुचिता आणि त्या अनुषंगाने लग्नसंस्थेला नेसवलेले पावित्र्याचे प्रेतवस्त्र यामुळे विवाहविच्छेद हा सामाजिक कलंक मानला जातो.
सुदैवाने नागरी नि महानगरी समाजात हे बंधन बरेचसे सैल होऊ लागले आहे. लग्न हा कायदेशीर करारही असल्याने त्याच्या संभाव्य विच्छेद हीदेखील कायदेशीर प्रक्रिया असते. त्याची संभाव्यता कमी करण्यासाठी ’विवाहपूर्व सहजीवन’ अर्थात लिव्ह-इन ही अनौपचारिक व्यवस्थाही हळूहळू रूढ होऊ लागली आहे. त्याहीपूर्वीची स्थिती म्हणजे परस्परांना अधिकृतपणे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड अशी जोडी जाहीर करुन बांधिलकीची औपचारिक घोषणाही केली जाऊ लागली आहे. काळाच्या ओघात लग्नसंस्थेची बंधने वा प्रारूप फारसे बदलले नसले तरी तिला अशी अनुषंगे मिळू लागली आहेत.
पर्यायी लैंगिकता
मानवी इतिहासामध्ये प्रामुख्याने नर-मादी अशीच जोडी दिसत असे. या दोन्ही गटात न बसणारे सरसकट ’तृतीयपंथी’ समजले जात. त्यांना समाजात स्थान नसे. काही समाजांनी आपल्यातील एक मोठा भाग ’अस्पृश्य’ म्हणून गावकुसाबाहेर ठेवला होता. हे तृतीयपंथी त्यांच्याहूनही उपेक्षित मानले जात.
परंतु हा सरसकट एक वर्ग वा गट नाही हे आता पाश्चात्त्य समाजव्यवस्थांमध्ये मान्य होऊ लागलेले आहे. स्त्रीला स्त्री किंवा पुरुषाला पुरुष जोडीदारच हवासा वाटणे हे संख्येने कमी असले तरी अनैसर्गिक नाही हेही आता पुरेसे स्पष्ट होऊ लागले आहे. यातून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यतेची मागणी लावून धरली जात आहे. अमेरिकेसारख्या देशातील काही राज्यांत ती मान्यही झालेली आहे.
टोळीजीवनात माणसाच्या जगण्याला फारसे पैलू नव्हते. नर-मादी संबंध हा केवळ देहभोगापुरता नि पुढे अपत्यसंगोपनापुरताच येत असे. आज मानवी बुद्धीच्या अफाट प्रगतीनंतर जगण्याला कला, विचार, अजैविक निर्मिती, समाजधारणा असे असंख्य पैलू निर्माण झाले आहेत. एखाद्या चतुरस्र व्यक्तीला यातील प्रत्येक पैलूमध्ये त्याचा/तिचा जोडीदार साथ देऊ शकेलच असे नाही. अशा वेळी त्या व्यक्तीचे एकाहुन अधिक जोडीदार का असू नयेत असा एक विचार मांडला जाऊ लागला आहे. सैद्धांतिक पातळीवर का होईना, पण एकास-एक या व्यवस्थेला आव्हान देणारी मांडणी होऊ लागलेली आहे.
कृत्रिम गर्भधारणा
अपत्याची आस माणसाला प्राणिजगतापासून वेगळे करणारी भावना आहे. पण सर्वच नर-मादी जोडप्यांना यात यश मिळेलच असे नाही. जर त्यांच्यामध्ये अपत्यसंभवासाठी आवश्यक असणार्या पुंबीज वा स्त्रीबीजाची कमतरता नाही, तरीही त्यांना मूल होत नाही अशी स्थिती असेल, तर कृत्रिम गर्भधारणा हा विज्ञानाने अशा जोडप्यांना दिलेला पर्याय आहे. त्या दोघांच्या बीजांचे बाह्य फलन घडवून आणून नंतर तो गर्भ थेट स्त्रीच्या गर्भाशयाकडे पुढील वाढीसाठी सोपवला जातो. यातून गर्भधारणा प्रक्रियेतील अडचणीला वळसा घालून पुढे जात आपल्याच बीजांचे मूल त्यांना मिळत असते.
या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष देहभोगाखेरीजही गर्भधारणा शक्य होते आहे. यामुळे समलैंगिक जोडप्यांना अपत्यसंभवासाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो आहे. यात दोघांकडेही स्त्री अथवा पुरुष यापैकी एकाच प्रकारचे बीज उपलब्ध असते. त्याचे फलन करणारे दुसर्या प्रकारचे बीज हे तिसर्या अन्य-लिंगी व्यक्तीकडून घेऊन अपत्यजन्म शक्य होऊ लागला आहे. या कृत्रिम गर्भधारणा प्रक्रियेमुळे त्या तिसर्या व्यक्तीशी थेट शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची आवश्यकता राहात नाही.
एक बीज उसने आणून गर्भधारणा शक्य होऊ लागल्याने जोडीदार नसणार्यांनाही अपत्य जन्माला घालण्याचा पर्याय उपलब्ध झाला. अर्वाचीन समाजातील ’मला मूल हवे, मातृत्वाची आस आहे. पण त्यासाठी कुण्या पुरुषाचे दास्यत्व पत्करण्याची माझी इच्छा नाही.’ असे म्हणणार्या स्वतंत्र विचारांच्या स्त्रियांना एखाद्या दात्याकडून पुंबीज घेऊन स्वत:च्या बीजाचे मूल जन्माला घालणे शक्य झाले आहे. अपत्यप्राप्तीसाठी आजवर अपरिहार्य मानल्या गेलेल्या लग्नसंस्थेला यातून आव्हान मिळू लागले आहे.
अन्य बीजापोटी
समलैंगिक जोडीदारांना किंवा एकल मातांना एका प्रकारचे बीज एखाद्या बाह्य दात्याकडून घेणे अपरिहार्य ठरते. परंतु अनेकदा नर-मादी जोडप्यामध्ये दोघांपैकी एक-जण अपत्यजन्मातील आपली भूमिका पार पाडू शकत नसेल, आणि तरीही त्यांचे परस्पर नाते दृढ असेल अपत्यसंभवासाठी त्यांच्याकडे दोन पर्याय शिल्लक राहातात.
दोघांपैकी निदान एकाच्या बीजाचे मूल जन्माला घालण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. यातून समलैंगिक जोडप्याप्रमाणे जोडीदारांपैकी एकाचे बीज आणि त्रयस्थ विरुद्धलिंगी दात्याचे बीज यांचे फलन घडवून कृत्रिम गर्भधारणा घडवली जाते.
दुसरा पर्याय असतो दत्तक घेण्याचा. आधीच जन्मलेले वा गर्भात असलेले मूल अपत्याची आस असलेले हे भिन्न-लिंगी वा समलिंगी जोडपे दत्तक घेते. यात जोडीदारांपैकी एकाचेही बीज त्या गर्भाशी जोडले गेलेले नसते. दत्तक मूल हे सर्वस्वी वेगळ्या बीजांचे असते. ते जोडपे परस्परांना बांधिल असलेले, पण अपत्य-संगोपनाची कुवत नसलेले असू शकते, किंवा बांधिल नर-मादी नसून त्यांच्या केवळ प्रासंगिक देहभोगातून जन्मल्यामुळे ते मूल त्यांना नकोसे झालेले असू शकते. या ना त्या प्रकारे अपत्याचे मूळ आई व वडील त्या मुलाचे पालकत्व सोडून देत असतात.
दत्तक घेण्याचा पर्याय हा मानवाच्या कुटुंबसंस्थेतील सर्वात प्रागतिक पर्याय आहे असे म्हटले पाहिजे. कारण यात ’शुद्ध बीजापोटीच फळे रसाळ गोमटी’ हा दुराग्रही दावा नाकारला जातो. बीजासोबतच संगोपन आणि संस्कार यांचा त्या अपत्याच्या प्रगतीमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो हे यातून अनेकदा सिद्ध होत असते. अपत्याची आस असणारी जगभरातील जोडपी आपल्या वंश, देशाची नसलेली अपत्येही दत्तक घेऊन वाढवताना दिसतात. यातून हे भेदाभेद फारसे दुबळे झाले नसले तरी निदान आपल्यापुरत्या या भिंती पाडल्या जाऊ शकतात हे मात्र अधोरेखित होते आहे.
वर म्हटल्याप्रमाणे स्त्री जसे एकल-माता होण्याचा निर्णय घेऊ शकते तसेच एखादा पुरुषही लग्नसंस्थेशिवाय, स्त्रीसंगाशिवाय आपल्या पुंबीजाचे अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतो. फरक इतकाच की गर्भ धारण करण्याची क्षमता स्त्रीमध्ये असल्याने ती स्वत: ते मूल वाढवू शकते. पण एकल पुरुषाला मात्र जशी स्त्रीबीजदात्री आवश्यक असते तसेच त्यातून तयार होणारा गर्भ वाढवण्यासाठी एक दत्तक माताही.
दत्तक मातृत्व
जोडप्याने मूल दत्तक घेण्याप्रमाणेच मुलासाठी माता दत्तक घेणे हा ही एक पर्याय मानवी संस्कृतीमध्ये विकसित झालेला दिसतो. हे दत्तक मातृत्व हे दोन प्रकारचे दिसते.
लोकशाहीपूर्व काळात राजे, सरदार वगैरेंच्या पत्नी या आपल्या ’मालकांना’ मूल म्हणजे ’वारस’ देण्यास कटिबद्ध तर होत्या. परंतु हे ’नर’ समाजातील उच्चभ्रू, अन्य स्त्रियांसाठी - आजच्या भाषेत - ’डिझायरेबल’ नरही असल्याने ते अन्य स्त्रियांकडे आकर्षित होण्याचा धोकाही होता. त्यांनी आपण सोडून अन्य माद्यांकडे जाऊ नये यासाठी त्यांच्या अनुरंजनासाठी सतत सिद्ध राहणे या पत्नींना आवश्यक असे.
अपत्यसंगोपनाचा काळ हा त्या दृष्टीने गाफील काळ असे. त्यासाठी तो कमीत-कमी राखण्याकडे त्या स्त्रियांचा कल असे. त्यामुळे या मुलांसाठी दाई अथवा आया नेमून संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात असे. पाश्चात्य जगतातील नॅनीज् हे यांचेच एक रूप. या दाई अनेकदा दूध-माताही असत. आपल्या मुलांबरोबर या दत्तक मुलाला आपले दूध पाजत असत. या श्रेष्टींच्या मुलांचे नि त्यांच्या दाईंचे आईखालोखाल विशेष असे नाते निर्माण होत असे.
दुसरे दत्तक मातृत्व हे सर्वस्वी शारीर पातळीवरचे. ज्याला ’सरोगसी’ असे म्हटले जाते. मूल आधी जन्माला घालून ते दाईकडे सोपवण्याऐवजी तिच्याच पोटी ते वाढवले तर...? अशी कल्पना अर्वाचीन विज्ञानाने केली. यातून गर्भधारणेच्या काळात येणारे परावलंबित्व, त्यातून होणारे शारीर बदल हे ही टाळता येतात. कृत्रिम गर्भधारणेचा पर्याय उपलब्ध होताच. आता फक्त तयार झालेला गर्भ मूळ मातेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित न करता एखाद्या अन्य स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ठेवला नि वाढवला तरी चालते.
हे मूल, तो गर्भ मूळ माता-पित्यांच्या बीजातून जन्मलेला असल्याने तेच त्याचे जैविक माता-पिता असतात. गर्भाशय भाड्याने देणारी स्त्री मुलाच्या जन्मानंतर आपला मोबदला घेऊन निघून जाते. अमेरिकेमध्येच नव्हे तर भारतामधील करियरप्रधान समाजातील अनेक जोडपी अथवा एकटे स्त्री वा पुरूष या पर्यायाची निवड करताना दिसतात.
परित्यक्त, अनाथ मुले
एकास-एक असो वा बहुपत्नीत्व, जोडीदार निश्चित झाल्यावर त्याच्याखेरीज अन्य व्यक्तीसोबत देहभोग निषिद्ध मानला जाऊ लागला. भिन्न कारणांनी एकाहुन अधिक जोडीदार पसंत असतील तरीही त्यातील एकच निवडण्याचे बंधन निर्माण झाले. आधीच निवडलेल्या जोडीदाराहून अन्य जोडीदार हवासा वाटला तर विवाहविच्छेद तुलनेने सोपा झाला हे खरे, परंतु भारतीय समाजामध्ये पुनर्विवाह फारसा स्वीकारार्ह नसल्यामुळे त्यातून परित्यक्तांचा प्रश्न गंभीर झाला.
टोळीजीवनात एकास-एक नर-मादी अशी व्यवस्था नव्हती तेव्हा मुले ही सार्या टोळीची असत. माकडांच्या टोळीमध्ये लेकुरवाळ्या माकडिणीचे पिलू उचलून होऊ घातलेल्या आया वा वयात येऊ लागलेल्या माकडिणी अपत्य-संगोपनाचा सराव करत असतात. एकुणात टोळीमध्ये कोणतेही मूल हे अनाथ राहात नसते. एखाद्याची जैविक आई काही दगावली, तरी त्याच्या ’मावशा’ त्याचे संगोपन करताना दिसतात. एकास-एक जोडप्याचे कुटुंब आकाराला आले नि अनाथ मुलांचा प्रश्न निर्माण झाला, आणि अनौरस मुलांचाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणॆ सुदैवाने अपत्य दत्तक घेण्याचे प्रमाण बरेच वाढल्यामुळे या मुलांना पालकांचे छत्र मिळण्याची शक्यताही वाढते आहे. जनावरांप्रमाणे मावशा नसल्या तरी अनाथांचे संगोपन ही लोकशाही व्यवस्थेने आपली जबाबदारी मानलेली आहे. त्यातून अनाथालयांसारख्या संस्था उभ्या राहात आहेत.
लेखाच्या सुरुवातीला बिम्मने आंब्याच्या झाडाला विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्याला झाडाने दिलेल्या उत्तराचा उल्लेख केला आहे. वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळी बीजे असतात. पण त्या सार्यांचे संगोपन करणारे झाड एकच असू शकते ही कल्पना फक्त माणूसच करू शकला आहे.
- oOo -
पुढील भाग >> > अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा