प्रचलित निकष << मागील भाग.
---
अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का?’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते
ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य अथवा निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले व्हिडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात किंवा चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक वा अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर मग ते सत्य अनुत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.
प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या ‘राशोमोन’ चित्रपटात या मुद्द्याची सुरेख मांडणी केली आहे. एका रानातून चाललेल्या सामुराई नि त्याची पत्नी यांच्याबाबत अघटित घडले आहे. त्यात सामुराईच्या पत्नीचा त्या रानातील कुप्रसिद्ध डाकू ताजोमारु याने भोग घेतला आहे. आणि सामुराईचा मृत्यू झाला आहे. या दोन घटनांबाबत ताजोमारू, सामुराईची पत्नी, सामुराईचा आत्मा, इतकेच काय त्या घटना घडून गेल्यानंतर तिथे आलेला एक लाकूडतोड्या या चारही संबंधितांच्या साक्षी वेगवेगळ्या आहेत(१).
ताजोमारू-सामुराईची पत्नी यांचा आलेला शरीरसंबंध (सहमतीने की बलात्काराने?), त्यानंतर सामाजिकदृष्ट्या त्या स्त्रीचे स्थान काय असावे (स्त्रीने पतीसोबत जावे की ताजोमारूसोबत याचा निर्णय कुणी वा कसा करावा?) आणि सामुराईचा मृत्यू (आत्महत्या, हत्या, हाराकिरी की द्वंद्वात आलेले मरण?) याबाबत प्रत्येकाची साक्ष वेगवेगळा कार्यकारणभाव वा वास्तवाची संगती मांडतो आहे. कुरोसावाने या सार्या साक्षी कॅमेर्याकडे- म्हणजेच प्रेक्षकांकडे तोंड करुन द्यायला लावल्या आहेत. एक प्रकारे प्रेक्षकालाच न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवून ’कर निवाडा याचा’ असे आव्हान दिले आहे.
एकाच घटनेमध्ये सहभागी वा साक्षी असलेल्या व्यक्तींचे कथन वेगवेगळे असते. परंतु त्यात सामायिक असा काही भाग असतो, जिथे प्रत्येकाच्या कथनाचा वास्तवाशी वा सत्याशी सांधा जुळलेला असतो. त्यामुळे ते सर्वस्वी खरे नसते तसेच सर्वस्वी खोटेही. त्यातून सत्याचा अंश वेगळा करुन एकत्र पाहावा लागतो, त्यानंतरच निवाडा शक्य होतो. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेला साक्ष असलेली व्यक्ती त्याबद्दल सांगते तेव्हा तिचे निवेदन यथातथ्य असू शकते किंवा जाणीवपूर्वक सांगितलेले असत्यही. पण या दोन्ही शक्यतांच्याही अधेमध्ये भासमय सत्य (Perceived), खंडश: सत्य (Fragmented) तसेच अंशात्मक सत्य (Fractional) अशा अन्य शक्यताही असतात.
प्रत्यक्ष निवेदन हे आपण प्रत्यक्षात जे पाहिलं त्या पेक्षा आपण जे पाहिलं ’असं आपल्याला वाटतं’ त्याबद्दल सांगू शकतं. हे ’भासमय’ सत्य! यात दृष्टी ते आकलन या प्रवासामध्ये झालेल्या बदलांचा, चकव्याचा प्रभाव पडतो. त्याखेरीज मेंदूने केलेले आकलन आणि भाषेमार्फत केलेले त्याचे सादरीकरण या माध्यमांतराचा परिणामही त्यावर होतो.यात कदाचित न पाहिलेल्या, पण आपल्या बुद्धीने भर घातलेल्या काही तपशीलांचा समावेश असू शकतो.
मानसशास्त्रात एका गंमतीशीर प्रयोग करतात. ज्यात तुम्हाला पलंग, रात्र, दिवा, अंधार, चंद्र असे अनेक शब्द लिहिलेला एक कागद दिला जातो. नंतर तो काढून घेतात नि लगेचच केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर ते शब्द पुन्हा लिहून काढायला असे सांगतात. यात काही शब्द विसरले जातात (हे स्वाभाविकच आहे) पण त्या मूळ यादीत नसलेला 'झोप' हा शब्दही बरेचजण लिहून जातात. हे भासमय सत्याचे उदाहरण आहे. इतर शब्दांच्या संगतीचा आधार घेऊन आपला मेंदू काही रिकाम्या जागा भरून काढतो नि ही दुरूस्ती आपल्या दृष्टीने सत्याचा भाग होऊन जाते. ही व्यक्तीच्या आकलनशक्तीची मर्यादा आहे.
ज्याचा-त्याचा रंग वेगळा
लेखात सुरुवातीलाच दिलेले उदाहरण पाहिले, तर भुत्या अंध असल्याने त्याला रंग दिसण्याची मर्यादा आहे. त्याचप्रमाणे तर रंगांधळेपण अथवा मर्यादित रंगांचीच ओळख असणार्या एखाद्याला त्याच्या क्षमतेबाहेरचे रंग न ओळखता येण्याची मर्यादा असतेच. उदाहरणार्थ, कुत्र्याला रंग वेगळे दिसत नाहीत. केवळ काळ्या-पांढ्र्या रंगांच्या छटाच तेवढ्या दिसतात असे प्राणिशास्त्र सांगते.
आपल्या आकलनाला आपल्या माहितीच्या, बुद्धीच्या, विचारव्यूहाच्या मर्यादा असतात. एकच छायाचित्र (photograph, image) वेगवेगळ्या संगणकांवर, मोबाईल फोन्सवर, टेलिव्हिजनवर पाहा. त्या प्रत्येक उपकरणाच्या रंग दाखवण्याच्या कुवतीमध्ये आणि पद्धतीमध्ये फरक असतो. त्यामुळे त्या चित्रातील विविध रंगांच्या छटांमध्ये फरक दिसेल. त्यातील एखाद्या रंगाला काय नाव द्यावे याबद्दल मतांतरे निर्माण होतील. वास्तव, जड जगात आपणही आपल्या डोळ्यातील भिंगाच्या आधारे पाहात असतो. त्याच्या कुवतीनुसार आपल्या रंगांचे आकलनही वेगवेगळे असते. इतकेच नव्हे तर रंगांबरोबर पोत (texture) मुळे देखील त्याच्या दृश्य आकलनामध्ये फरक पडतो.
आपण एखाद्या वस्तूकडे पाहताना तिच्यावर पडलेल्या प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाच्या त्या रेषेने पाहणार्याच्या दृष्टीबरोबर साधलेला कोन, त्या वस्तूच्या आसपास असणार्या अन्य वस्तूंचे अस्तित्व आणि तिच्याकडे पाहणार्याच्या दृष्टीने त्या वस्तूशी केलेला कोन, त्याच्या/तिच्या मनात त्याक्षणी ठळक असणारी अन्य प्रभावशाली वस्तू वा तिचे आकलन या सार्या घटकांच्या आधारेच त्या वस्तूचे आकलन होते हे विसरता कामा नये.
माध्यमांच्या मर्यादा
अशाच मर्यादा (प्रसार-)माध्यमांनाही असू शकतात. आपली माध्यमे वेगवेगळ्या प्रकारची शीर्षके देऊन एकाच बातमीबाबत वा घटनेबाबत वाचकांच्या मनात वेगवेगळी भावना वा आकलन निर्माण करु शकतात. बातमीच्या आतील निवेदनामध्ये विशेषणांच्या यथायोग्य वापराने एकच बातमी विविध माध्यमांतून आपापल्या सोयीच्या रंगांत रंगवलेली पाहायला मिळते. हे माध्यमकर्त्यांचे प्रदूषण(contamination) म्हणता येईल.
अलीकडे व्यावसायिक ठिकाणी तर सोडाच, अगदी रहिवासी इमारतींमध्येही 'सीसीटीव्ही' ही अत्यावश्यक व अपरिहार्य झालेली गोष्ट आहे. महानगरांमध्ये अशा ’रहिवासी इमारतींमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची नोंद तिथे सीसीटीव्ही नसेल तर केली जाणार नाही ’ असे पोलिस यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागले आहे. असा सीसीटीव्ही कॅमेरा हा एका जागी स्थिर असतो. त्यामुळे तो गुन्हेगाराच्या उजवीकडून किंवा डावीकडून आणि त्याच्या डोक्याच्याही वरून, जो मिळेल त्या कोनातून ते छायाचित्र वा व्हिडिओ काढतो. पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधे ज्याप्रमाणे गुन्हेगाराचे समोरून स्थिर स्थितीतील छायाचित्र असते, अगदी तसेच त्याच कोनातून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळेल हे अशक्यच असते. ही या माध्यमाची मर्यादा आहे.
आता ते छायाचित्र नि रेकॉर्डमधील चित्र असलेली व्यक्ती एकच हे सिद्ध करण्याचे तंत्र विकसित करावे लागते. तंत्रज्ञानाच्या ’इमेज प्रोसेसिंग’ नामक शाखेमध्ये यासाठी वेगवेगळ्या तर्कपद्धती(algorithm) व साधने तयार केली जात आहेत.
आंधळे आणि हत्ती
काही वेळा विलेपित, अवगुंठित नसलेला पण मूळ सत्याचा एखादा अंशच (अविकृत स्वरूपात) आपल्यासमोर येऊ शकतो. असं असेल तर मग सत्याच्या केवळ एका खंडाला, एका अंशालाच सत्य मानून पुढे जाण्याचा धोका राहतो. भारतीय अभिजात संगीतातील रागांच्या स्वरूपाबाबत कुमार गंधर्व असं म्हणायचे की रागाला एकाहुन अधिक ’प्रोफाईल’ असतात. त्यातल्या एका रूपालाच अनेक गायक पूर्ण राग समजून गातात नि आवृत्त गाणे गात राहतात. थोडक्यात दृश्यमान भागाच्या पलिकडे असलेल्या सत्याच्या अदृश्य भागाचा अथवा खंडाचा शोध घेऊनच त्याचे पुरे आकलन होऊ शकते.
जीएंचा विदूषक(२) म्हणतो "सत्य हे अंशाअंशानं प्रकट होत असतं, याची विस्मृती होता कामा नये. संपूर्ण सत्य पाहण्याचं भाग्य मानवाच्या दोन नेत्रांना कधीही लाभणार नाही, परंतु त्याला विविध अंश एकत्र करता येतील, विविध खंड बुद्धीच्या सहाय्यानं सांधता येतील; आणि एका खंडापेक्षा दोन साधित खंड अधिक सत्य असतात."
खंडश: सत्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असलेली ’आंधळे आणि हत्ती’(३) ही गोष्ट. प्रत्येक आंधळ्याच्या जाणिवेच्या कक्षेत असलेला आकार दोरी, पंखा, खांब इ. आकार सत्यच आहे, परंतु तो मूळ हत्तीचा एक भाग आहे, पूर्ण हत्ती नव्हे. इथे पाचही आंधळ्यांच्या जाणिवेच्या समष्टीतूनच संपूर्ण सत्याचे - त्या हत्तीचे - चित्र साकार होऊ शकते.
कळीचा मुद्दा हा असतो की 'आपण सत्याचा एक भागच पाहतो आहे' याची जाणीव त्या आंधळ्यांना व्हायला हवी, अन्यथा प्रत्येकजण अट्टाहासाने आपल्या जाणिवेच्या मर्यादेतील चित्राला पूर्ण सत्याचे रूप मानून चालतो. हत्तीचे एकवेळ सोडा - ते केवळ जिज्ञासापूर्तीपुरते आहे - पण ते पाच भागधारक आहेत अशा एखाद्या सामूहिक हिताच्या निर्णयाबाबत काय घडेल हे तर्क करण्याजोगे आहे.
असत्याचे प्रदूषण
'अंशात्मक सत्य' हे मूळ सत्याचा काही भागच सांगते. यात उरलेला भाग अजाणता वा जाणीवपूर्वक दडपला जातो किंवा त्याचा अपलाप केला जातो. तरीही एकुणात ते सत्य वा असत्य मानता येणार नाही. इथे सत्य नि असत्याची सरमिसळ झालेली असते. त्या अर्थी खंडश: सत्यापेक्षा अंशात्मक सत्य वेगळे आहे. खंडश: सत्य हे तुकड्या-तुकड्यातून येते, पण त्यांची समष्टी केवळ सत्यच पूर्ण करते. अंशात्मक सत्यात प्रत्येक तुकड्यातून सत्याचा अंश वेगळा करून जमा करत न्यावा लागतो. ’राशोमोन’मधील साक्षींच्या आधारे प्रेक्षकाने निवाडा करताना या पद्धतीने जावे लागते.
लेखाच्या सुरुवातीलाच दिलेले भुत्याचे रंगाचे उदाहरण थोडे वेगळ्या प्रकारे मांडून पाहू. हिरवा रंग हा पिवळा नि निळ्या रंगाचे संयुग मानले जाते. पिवळा हे सत्य नि निळा हे असत्य मानले, तर हिरव्याच्या सर्व छटा या निळ्या रंगाच्याही छटा असतात नि पिवळ्याच्याही. एखाद्याला हिरव्या रंगाची छटा दाखवली नि ही छटा पिवळ्या रंगाची की निळ्या रंगाची असा प्रश्न केला बघणार्याच्या दृष्टिकोनातील फरकानुसार तो त्यांना पिवळ्या वा निळ्या रंगाची छटा मानून चालेल. पण हाच प्रश्न एकाहुन अधिक लोकांना केला तर त्यांचे एकमत होण्याची शक्यता नाही. थोडक्यात सत्य शोधू पाहणार्याला प्रत्येक हिरव्या छटेतील निळ्या रंगाचे अस्तित्व वेगळे काढून पाहता यायला हवे. त्या छटेतील तेवढा भागच सत्यान्वेषणासाठी घेऊन पुढे जाता आले पाहिजे.
सत्य-चित्र रेखाटताना
पूर्वी ज्याला मेकॅनो म्हटले जाई नि आता लेगो म्हटले जाते, त्या खेळाचे उदाहरण घेऊ. यात विविध आकाराचे तुकडे दिलेले असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने जोडून त्यातून तुम्ही बस तयार करु शकता, इमारत बनवू शकता वा एखादी गाडीही. तुम्ही कुठले तुकडे निवडता, कुठले सोडून देता आणि जुळणी कुठल्या क्रमाने करता यावरुन कोणती वस्तू तयार होणार हे ठरत असते.
त्याचप्रमाणे अंशात्मक व खंडश: सत्यांचे तुकडे घेऊन सत्याचे अथवा वास्तवाचे तुकडे घेऊन त्यातून पुर्या सत्याचे चित्र निर्माण करताना त्या जुळणीची पद्धतही त्या चित्रावर परिणाम घडवत असते. सत्याचे सारेच खंड उपलब्ध नसतील, तर जुळणी करताना गाळलेल्या जागा कशा भरल्या जातात यातून चित्राचे स्वरूप वेगवेगळे दिसू शकते. याचे एक उत्तम उदाहरण अलिकडे 'ब्रॉडचर्च' या मालिकेमध्ये पाहायला मिळाले.
एका छोट्या गावात एका लहान मुलाची हत्या झाली आहे. शहरी जीवनाच्या तुलनेत अशा लहान वस्तीमध्ये असतात बहुतेक नागरिकांचे परस्परांशी निदान औपचारिक पातळीवरचे का होईना संबंध येतात. अशा गर्हणीय कृत्याने समाजाचा तो तुकडा ढवळून निघतो. तपास जसजसा वेगवेगळी वळणे घेत जातो, तसतसे त्यात परस्पर-अविश्वास, संशय यांचे भोवरे तयार होतात. अखेरीस तपास-अधिकारी असणारी एली मिलर तिच्या पतीला– 'जो मिलर'लाच या हत्येबद्दल आरोपी म्हणून अटक करते.
आता प्रेक्षकांनी घटनाक्रम संपूर्णपणे पाहिला आहे. शिवाय खुद्द एलीनेच तपास केलेला असल्याने तो खरा आहे याची तिला आणि तिचा तपासातील सहकारी अलेक हार्डी यांना माहित आहे. पण... न्यायालयासमोर मात्र तो पुराव्यांच्या आधारे मांडलेली घटनाक्रमाची एक ’शक्यता’च असते. न्यायालयामध्ये जो मिलरची बाजू लढवणारी शेरॉन बिशप ही त्याच पुराव्यांच्या आधारे एक पर्यायी घटनाक्रमाची शक्यता मांडून दाखवते.
त्यामुळे आता न्यायाधीश आणि ज्युरी यांच्यासमोर त्याच पुराव्यांच्या आधारे उभ्या केलेल्या दोन प्रतिस्पर्धी शक्यता आहेत. आणि त्यांना त्यातील एकीची ’अधिक संभाव्य’ म्हणून निवड करायची आहे. वास्तव काय हे त्या घटनाक्रमातील सहभागी व्यक्तींखेरीज कुणालाच नेमके समजलेले, खरेतर दिसलेले नसते. आकलनाची, स्वार्थाची, पूर्वग्रहाची छाया घेऊनच ते त्यांच्याही मनात रुजते. वास्तवाचे दूषित होणे तिथूनच सुरू होते. त्यामुळे न्यायाधीश, ज्युरी, तिथे उपस्थित अन्य व्यक्तीच नव्हे, तर आपण प्रेक्षकही पाहतो ते कुणीतरी त्यांचे, त्यांना आकलन झालेल्या वास्तवाचे आपल्यासमोर मांडलेले कवडसेच फक्त असतात.
शेरॉन आपल्या वकीली कौशल्याचा वापर करुन आपला घटनाक्रम, आपले मूल्यमापन अधिक विश्वासार्ह असल्याचे ज्युरींना पटवून देते. आणि ज्याच्या पत्नीनेच त्याला अटक केली, जो गुन्हेगार आहे हे तिला नक्की ठाऊक आहे, अशा जो मिलरला आरोपमुक्त केले जाते.
थोडक्यात काही वेळा सत्याचे आकलन पुरेसे नसते, त्याची सिद्धताही तितकीच महत्त्वाची असते. सत्याचे ते आकलन आवश्यक तिथे इतरांना पटवून देता यावे लागते. त्याचे कौशल्य आणखी वेगळे असते. त्या कौशल्याच्या सहाय्याने जगाच्या कल्याणाचा मार्ग सापडलेला एखादा प्रेषित आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो...
...आणि त्याच कौशल्याचा आधाराने एखादा द्वेषसंपृक्त राजकारणी जनमानसात प्रक्षोभक संदेश रुजवून लोककल्याणाऐवजी सामाजिक विध्वंसाची आखणी करु शकतो!
या सार्या अवगुंठनाच्या, विलेपित सत्याच्या, भासमय, खंडश: वा अंशात्मक सत्याच्या, माध्यमांच्या मर्यांदांच्याही पलिकडे शिल्लक राहतो तो स्वार्थप्रेरित अथवा हेतुत: केलेला संपूर्ण अपलाप. मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये याबद्दल इतके लिहिले आहे की आता यावर कुणी फार नवा प्रकाश टाकू शकेल ही शक्यता नगण्यच आहे. आणि असे असूनही त्याच्या आकलनाबाबत मानवी समाज बव्हंशी उदासीन राहून दोषारोप नि हेत्वारोप यांच्या आधारे स्वत:ची जबाबदारी झटकून टाकण्यातच धन्यता मानताना दिसतो.
सत्यशोधाच्या या जंगलवाटा, शहरी रस्त्यांप्रमाणे थेटपर्यंत नजर जाईल अशा नसतात. वाटेत येणारी झाडे-झुडपे दूर करीत, प्रसंगी कठोरपणे छाटून काढीत पुढे जावे लागते. हे करीत असताना गगनाला भिडणार्या वृक्षांच्या फांद्यातून येणारे कवडशांचे भान ठेवावे लागते. कारण त्यांच्या अनुषंगानेच मूळ सहस्ररश्मीचा वेध आपल्याला घेता येतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही पण कवडशांच्या अस्तित्वाने त्याचे अस्तित्व - सिद्ध नाही तरी - अनुमानित करता येते.
(समाप्त)
- oOo -
टीपा:
१. ’जंगलवाटांवरचे कवडसे’ ही ’राशोमोन’वरील मालिका याच ब्लॉगवर वाचता येईल.
२. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
३. खरे तर ही कथा ’डोळे बांधलेल्या व्यक्ती आणि हत्ती’ अशी असायला हवी. मुळातून आंधळे असलेल्या व्यक्तींना सर्प, झाड, पंखा आदी वस्तूही दिसत नसल्याने त्यांची नि हत्तीची तुलना करणे शक्य नाही. अर्थात या व्यक्ती जन्मांध नसून आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अंध झालेल्या असल्या तर गोष्ट वेगळी. त्या परिस्थितीत असे आयुष्यातील डोळस असतानाचा कालखंडात त्यांनी हत्ती पाहिलेला नाही, परंतु इतर गोष्टी पाहिल्या असणे शक्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा