रविवार, २ मे, २०२१

(पुन्हा) काय रेऽ देवा...

आता पुन्हा निवडणूक येणार
मग मोदींना कंठ फुटणार
मग मध्येच राऊत बोलणार
मग पुन्हा वैताग येणार...

काय रेऽ देवा...

मग तो वैताग कुणाला दाखवता नाही येणार...
मग मी तो लपवणार...
मग लपवूनही तो कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील तर ओरडणार...
भक्त असतील तर चिडणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि या सगळ्याशी ठाकरेंना काहीच
घेणं-देणं नसणार...

काय रेऽ देवा...


मग त्याच वेळी दूर टीव्ही चालू असणार...
मग त्यावर अर्णब ओरडत असणार...
मग त्याला अंजनाची साथ असणार...
मग सुधीरनेही गळा साफ केला असणार...
मग तिथे उपाध्येही आलेले असणार...
मग तू ही नेमकं आत्ता एन्डीटीव्हीच
पाहात असशील का असा प्रश्न पडणार
मग उगाच डोक्यात थोडेफार गरगरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे झेंडे नाचणार...

काय रेऽ देवा...


मग जल्लोषाचे ढोल थंडगार होऊन जाणार...
मग त्याला हरण्याची आसवं लगडणार...
मग विजयासाठी आणलेले फटाके
कपाटात पडल्या पडल्या सादळणार
मग सारा संसार असार वाटणार
मग केदारनाथला निघून जावंसं वाटणार
विजयाची भविष्यवाणी करणार्‍या अर्णबला
पोत्यात घालून हाणावंसं वाटणार...
मग सारंच कसं वैफल्याने
फिकट फिकट होत जाणार
पण तरीही जिंकण्याची उमेद
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण विरघळून नाही जाणार !...

काय रेऽ देवा...


निवडणूक होणार
मग बंगाल हिरवा होणार...
मग पानापानांत हिरवा दाटणार...
मग आपल्या मनाचं पिवळं पान
देठ मोडून दिल्लीत परतून येणार ...
पण त्याला ते नाही रुचणार...
मग त्याला एकदम काहीतरी आठवणार...
मग ते हुशारणार ...
मग पुन्हा जिवात जीव येणार...
तातडीने ईसीला पुढची तारीख द्यायला सांगणार
पुढच्या राज्यातील विरोधी पक्षनेत्यांसाठी गळ टाकणार
ऑपरेशन कमळही तोपर्यंत संपलेलं असणार
आणखी एका राज्यात सत्ता आलेली असणार...
मग माझ्या जागी मी असणार... गण्याच्या जागी गण्या असणार...
महिनाभराचे ईव्हीएममधले वादळ
पेट्यांमध्ये निपचित पडलेलं असणार.....

निवडणुका ऑक्टोबरात झाल्या...
निवडणुका एप्रिलमध्ये होताहेत
निवडणुका जूनमध्येही होणार...

काय रेऽ देवा...

- बोलिन खरे

- oOo -

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

आजच्या बातम्या

दिनांक अमुक महिना ढमुक वर्ष वगैरे

फडणवीसांनी सरकारवर कठोर टीका केली
राऊतांचा भाजपवर घणाघात
तीनपैकी कुठले तरी राणॆ फुसफुसले
प्रवीण दरेकर फसफसले
चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटले
राहुल गांधींना राफेल भेटले
रविशंकर प्रसाद धुसफुसले
ममतादीदी कडाडल्या
अमित शाह बरसले
विप्लब देव बरळले
थोरले पवार हसले
धाकले पवार गरजले
भातखळकर तडमडले
उपाध्ये कडमडले

आयपीएलमध्ये कोलकाता हरले
मुंबई जिंकली
माशी शिंकली
चेन्नईला डसली
दिल्लीसमोर फसली...

... सदर वृत्तपत्र ’जाहिरात-पैसा पब्लिशिंग कंपनी’साठी ओसाडवाडी मुक्कामी संपादक/मालक यांनी छापून प्रसिद्ध केले. 
यातील मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. जाहिरातीच्या पैशांशी मालक सहमत असले तरी त्यातील
दाव्यांशी सहमत असतीलच असे नाही.

---

’या १०३ टक्के पावसातला आपल्या वावरात किती पडंल रं?’
एस्टीच्या स्टॅंडवर बोचक्यावर बसलेल्या
गण्याने पेपरची घडी करता करता शेजारच्या गणपाला विचारले.

- oOo -

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

लॉकडाऊनची धुळवड

 गेल्या वर्षी पहिला लॉकडाऊनमधील बंधने टप्प्या-टप्प्याने सैल करत दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत होते.  एक-दोन महिन्यात पुन्हा संसर्गाने उचल खाल्ली असता पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. अशात पुण्यातील व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणाले, ’लॉकडाऊनमुळे काहीही फायदा झालेला नाही, कोरोना वाढतोच आहे.’ इतके ठाम विधान ऐकून मला हसू आले होते. अर्थात उलट दिशेने ’वा: लॉकडाऊनचा खूप फायदा झाला बघा’ म्हणून कुणी प्रत्युत्तर दिले असते तरी मला त्या ठामपणाचेही हसू आलेच असते. याचे कारण म्हणजे फायदा झाला नाही म्हणणारे ’नाही रे’ लोक किंवा झाला म्हणणारे ’आहे रे’ लोक हे दोघेही त्यांच्या पूर्वग्रह आणि मुख्य म्हणजे स्वार्थाच्या आधारे ’ठोकून देतो ऐसा जी’ करत असतात. त्या विधानांमागे माहिती, डेटा, विश्लेषण वा मूल्यमापनाचा भाग नसतो. 

व्यापारी संघाच्या अध्यक्षांचे विधान तर ’इतकी औषधे तयार करुन काय उपयोग झाला, माणसे अजूनही मरतातच.’ या विधानासारखे आहे. यशाचे मूल्यमापन हे शक्यतेच्या भाषेतच करता येते. नव्या औषधांनी पूर्वी उपचार नसल्यामुळे बरे न होणारे, मृत्यू टाळता न येणारे आजार बरे होऊ शकतात. याचा अर्थ मृत्यू पूर्ण टाळला असे नसून मृत्यूच्या शक्यतेमध्ये घट झाली इतकाच असतो. नव्या उपचारांनी टळलेले मृत्यू हे निरीक्षणाचा भाग नसतात. नोंद फक्त मृत्यूंची होते. आणि त्यातील वाढ वा घट ही निव्वळ नवे उपचार नव्हे, तर इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे ’मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मृत्यू अधिक झाले म्हणून यावर्षी विकसित झालेली नवी उपचारपद्धती पराभूत झाली’ असा सरधोपट निष्कर्ष काढता येत नसतो. तिचा प्रत्यक्ष वापर, तिची सर्व रुग्णांना उपलब्धता, ज्या आजारासाठी ती आहे त्या आजाराची व्याप्ती, आरोग्यतज्ज्ञांची तिला चटकन आत्मसात करण्याची कुवत आदि अनेक बाबी त्या निरीक्षणावर परिणाम घडवणार्‍या असतात. त्यामुळे तिच्या यशापयशाचे मूल्यमापन या सर्व घटकांना बाजूला करुन, केवळ तिचाच परिणाम मोजण्याच्या दृष्टीने विकसित केलेल्या संख्याशास्त्रीय प्रयोगाच्या आधारेच करता येते. वस्तुनिष्ठ निरीक्षणे हाच अशा शास्त्रीय प्रयोगाचा पाया असतो. 

पहिल्या लॉकडाऊनच्या उद्दिष्टाकडे नीट पाहायला हवे. जेव्हा संसर्ग वेगाने पसरु लागला तेव्हा त्या वाढीचा वेग पाहता, सद्यस्थितीत उपलब्ध असलेली आरोग्यव्यवस्था लवकरच कोलमडून पडेल हे स्पष्ट झाले होते. या निष्कर्षाला इटलीत हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती. तिथे आरोग्य कर्मचारी नि साधनसामुग्रीचा प्रचंड तुडवडा पडू लागला, तेव्हा अलिखित नियमानुसार ज्येष्ठ नागरिक, आधीच गंभीर व्याधीग्रस्त असलेले लोक यांना डावलून धडधाकट प्रकृतीच्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी प्राधान्य देण्यात येऊ लागले. हा अमानवी निर्णय परिस्थितीमुळे, नाईलाजाने घ्यावा लागला होता. इथे तशी परिस्थिती उद्भवू नये आणि नजीकच्या भविष्यकाळात होणार्‍या संसर्गाच्या स्फोटाला तोंड देण्यास सक्षम अशी आरोग्यव्यवस्था, साधनसामुग्री आणि मुख्य म्हणजे आपण बहुतेक वेळा ज्यात अपयशी होत असतो ते नियोजन, यांच्या पूर्वतयारीसाठी उसंत मिळावी हा मुख्य उद्देश होता. लॉकडाऊनच्या यशापयशाचे मूल्यमापन करताना त्या काळात नव्याने उभी केलेली ही व्यवस्था कितपत कार्यक्षम ठरली याचे मूल्यमापन करता यायला हवे. ’अजून कोरोना पेशंट वाढत आहेत म्हणजे ती अपयशी ठरली’ हे विधान केवळ स्वार्थग्रहदूषितच नव्हे तर अज्ञानमूलक आहे. जर लॉकडाऊन नसता, तर ती व्यवस्था उभारत असताना रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम राहून ती व्यवस्था पळत्याचा पाठलाग करणार्‍यासारखी धावत नि धापत राहिली असती हीच शक्यता अधिक आहे. अमेरिकेसारख्या अद्ययावत आरोग्यवस्था असलेल्या पण लॉकडाऊन नसलेल्या देशाची कोरोनासंदर्भात जगात सर्वात केविलवाणी अवस्था पाहिली तर लॉकडाऊनची उपयुक्तता तर्कसंगत म्हणता येते.  उलट दिशेने तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडसारख्या देशात संसर्ग चांगलाच आटोक्यात राहिला, नव्हे काही महिन्यांसाठी देश संसर्गमुक्त राहिला हे निरीक्षणही लॉकडाऊनच्या निर्णयाला बळ देणारे आहे. 

याचा अर्थ तो लॉकडाऊन यशस्वी झाला आहे असे मी म्हणतो आहे का? याचे उत्तर ’नाही’ असेच आहे. अयशस्वी झाला म्हणणार्‍यांवर टीका म्हणजे यशस्वी झाल्याच्या ’बाजूचे’ या उथळ निष्कर्षपद्धतीचे लोकच असे म्हणू शकतील. माझा मुद्दा इतकाच आहे की तो यशस्वी झाला की झाला नाही याला काटेकोर प्रयोग, नियोजन, निरीक्षण, माहिती, डेटा, विश्लेषण आणि निष्कर्ष या मार्गानेच जावे लागेल. रोज उठून पत्रकार परिषद घेऊन कलकलाट करणार्‍यांचे हे काम नक्कीच नाही. त्यात चिकाटी नि विषयाला भिडण्याची गरज असते. कारण त्यातून शिकण्यासाठी, यशाचे मूल्यमापन नि त्रुटींचे विश्लेषण हा उद्देश असायला हवा. जो लॉकडाऊनच्या संदर्भात बेदरकार विधाने करणार्‍यांचा अजिबात नसतो. 

एखाद्या तत्वज्ञानाचा उद्घोष करत राजकारण करणार्‍या पक्षाचे यश वा अपयश हे त्या तत्वज्ञानाचे यश वा अपयश नसते. कारण तत्वज्ञान, विचार, राजकीय विचार, व्यक्तिविचार आणि अंमलबजावणी या क्रमाने ते तत्वज्ञान प्रवास करत असते. प्रत्येक टप्प्यावर त्याच हीण मिसळते, त्यात बदल होतात, व्यावहारिक अडचणींमुळे वा निरर्गल स्वार्थामुळे तडजोडी होतात... यातून मूळ तत्वाचे विपरीत वा केवळ अंशमात्र रूप प्रत्यक्षात अंमलात येत असते. त्याच धर्तीवर पहिला लॉकडाऊन यशस्वी झाला वा अयशस्वी झाला म्हणजे ते त्या संकल्पनेचेच अपयश आहे हा दावाही चुकीचा असतो. लॉकडाऊन यशस्वी झाला वा अयशस्वी झाला यात त्या संकल्पनेतील मूलभूत त्रुटींचा वाटा किती नि अंमलबजावणीतले अपयश किती, आणि कदाचित ज्यांच्या संदर्भात ती केली त्या जनतेचे त्यात सहभागी होतानाचे गांभीर्य वा बेजबाबदारपणा किती, याची कारणमीमांसाही त्यांना सुटे करुन केली पाहिजे. मागचा लॉकडाऊन अयशस्वी झाला म्हणजे येऊ घातलेलाही होईल हा दावाही एकांगी असतो. उलट मागील वेळच्या चुका सुधारून या वेळी तो यशस्वी वा अधिक यशस्वी होईल ही शक्यताही आहे. उलट दिशेने तेव्हा तो आवश्यक होता म्हणजे आताही तो आहे हा दावाही स्वयंसिद्ध आहे असे मानता येत नाही. बदलत्या परिस्थितीतही त्याची अपरिहार्यता मांडून दाखवता यायला हवी.

लॉकडाऊनचा विचार करताना व्यक्ती नि आरोग्यव्यवस्था यांच्याबरोबर अर्थकारणाचा विचारही करावा लागतो. कारण लॉकडाऊनचा अर्थ बहुतेक रोजगार ठप्प होणे असाच आहे. त्यामुळे जसे गुंतवणुकीच्या संदर्भात परताव्याबरोबरच संभाव्य धोक्याचाही विचार करत सामान्यपणे त्यांचे गुणोत्तर हे ढोबळमानाने त्या त्या गुंतवणूक-पर्यायाचे निदर्शक मानले जाते तसेच इथेही करावे लागणार आहे. रुग्णसंख्या खूप वाढते आहे म्हणून लॉकडाऊन अत्यावश्यक हे म्हणणे जसे केवळ एकाच बाजूचा विचार करणे असते तसेच ’रोजगार बुडतात म्हणून तो नको’ म्हणणेही. रोजगार बुडणे ही लॉकडाऊनची अपरिहार्यता आहे हे खरे, पण तो तसा होऊ नये म्हणून ज्यांचे रोजगार बुडतात हे कितपत गांभीर्याने निर्बंध पाळतात याचा विचारही त्या अनुषंगाने आवश्यक आहे.

आज  ’आमचे रोजगार बुडतील हो’ म्हणून गळा काढणारे जे लोक आहेत त्यांनीच कोरोनाच्या संदर्भात घालून दिलेले निर्बंध किती गांभीर्याने पाळले असा प्रश्न विचारला असता अगदी वैय्यक्तिक निरीक्षणांच्या आधारे  याचे उत्तर त्यांच्या बाजूने फारसे उपयुक्त ठरत नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास ग्राहकांना आठवण करुन देणे, दुकानात प्रवेश करणार्‍यांच्या संख्येवर बंधने घालणे वगैरे कुणीही पाळताना दिसले नाही. ग्राहकांना आत येऊ नका म्हटले तर तो दुसर्‍याकडे जाईल’ अशी तक्रार काही दुकानदार करताना दिसत होते.  थोडक्यात आपत्कालिन स्थितीतही स्वत:च्या आरोग्यासाठीही चार ग्राहक गमावायची त्यांची तयारी नव्हती. अनेक दुकाने- विशेषत: किराणा विकणारी- अशी असतात की दुकाना अक्षरश: ठासून माल भरलेला नि ग्राहकाला उभे राहण्यास जेमतेम जागा शिल्लक असते. अशा ठिकाणीही एकाहून अधिक ग्राहक त्या जागेत दाटीवाटीने उभे राहून खरेदी करताना दिसत होते.  ग्राहकांना बाहेर ठेवण्यास सांगणे जड जात असेल तर त्या नियमांसंबंधीचे एक साधे पत्रक दर्शनी चिकटवणे वा तसा ठळक बोर्ड लावणेही शक्य आहे. ते ही क्वचितच दिसत होते. अतिसंसर्ग झाल्याने लॉकडाऊन झाला तर अनेक पट नुकसान होईल याचा विचार करुन चार ग्राहक गमावणे हितावह आहे याचा विचार विक्रेत्यांनी केला असता तर कदाचित लॉकडाऊनची आज दिसू लागलेली अपरिहार्यता टळली असती. 

’लॉकडाऊन हा उपाय नाही’ हे एक शेंडाबुडखा नसलेले वाक्य अनेकदा - विशेषत: विरोधी राजकारण्यांकडून ऐकायला मिळते. यातून दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला म्हणजे ’हा उपाय नाही’ हा दावा कशाच्या आधारे केला आणि  (दावा करणारे त्यांच्या केंद्रीय नेत्याबद्दल ’हा नाही तर दुसरा कोण?’ असा प्रश्न विचारत असतात त्याच धर्तीवर) दुसरा अधिक चांगला पर्याय कोणता? या दोन्हीचे उत्तर देण्याची जबाबदारी ते घेत नाहीत. बेफाट आरोप हा राजकारण्यांचा स्थायीभाव कोरोनासारख्या भयावह आपत्कालिन स्थितीत किंचितही उणावलेला दिसत नाही. अर्थात बाजू उलट असती तर आजचे सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेत याच पद्धतीने वागले असते याबाबत माझ्या मनात शंका नाही. राजकीय बेमुर्वतपणा हा सर्वपक्षव्यापी आहे. आज लोकल सुरु करा म्हणून कालवा करणारा विरोधी पक्षनेता, त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास भाग कसे पाडणार या प्रश्नाला उत्तर देत नसतो. ती जबाबदारी तो सरकारवरच ढकलून देतो. पुढे ते न पाळल्यामुळे संसर्ग वेगाने वाढू लागल्यावर पुन्हा त्याबद्दलही सरकारवर खडे फोडू लागतो. 

अंमलबजावणीचे उत्तरदायित्व नसेल तर काहीही दावे नि आरोप करता येतात आणि भांडवलशाही माध्यमांच्या जगात कोणत्याही सुसंगत मांडणीखेरीज खपवताही येतात. निरर्गल आरोपबाजी हा राजकारणातील विरोधी पक्षांचा कार्यक्रम आहे, सामान्यांचा तो नसायला हवा. पण सोशल मीडियांतून पार्ट्या पाडून तिथे बारा महिने राजकारण्यांची पालखी मिरवणारी उथळ जनता त्यांच्या त्या लटक्या लढायाही त्वेषाने लढवतही बसते. या सार्‍या धुळवडीमध्ये कोरोना माणसांसोबत तारतम्याचाही बळी घेऊन जातो आहे.

- oOo -

( पूर्वप्रकाशित: द वायर-मराठी दि. ५ एप्रिल २०२१ )


रविवार, २१ मार्च, २०२१

बालक - पालक

मागील आठवड्यात तीन दशकांपूर्वी बॉलिवूडमध्ये कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या स्मृती विश्वास यांच्या वृद्धापकाळातील दारूण स्थितीबाबत बातमी वाचली. काही काळापूर्वी अशाच स्वरुपाची बातमी गीता कपूर या तुलनेने दुय्यम अभिनेत्रीबाबत वाचण्यास मिळाली होती. कारकीर्दीच्या भरात असताना मिळवलेला पैसा हा पुढची पिढी, नातेवाईक किंवा स्नेह्यांमुळे बळकावल्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक विपन्नतेचा सामना करावा लागल्याची ही उदाहरणे.

गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमधे सोडून नाहीसे होण्याबद्दल एका चॅनेलने - नेहमीप्रमाणे सनसनाटी - बातमी केली होती. त्यावर लगेच नेहेमीप्रमाणे 'हल्लीची पिढी...' या शब्दाने सुरू होणारी रडगाणी ऐकायला मिळाली. आपली मानसिकताच 'एकाची चूक ही त्याच्या गटाची चूक किंवा खरंतर त्याची एकुण प्रवृत्तीच' अशी कोटीच्या कोटी उड्डाणे गाठण्याची आहे. 'अमुक एक असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशीच आहे म्हणून तो असा आहे किंवा तो असा आहे म्हणजे त्याची अख्खी जात अशी आहे' हे अर्थनिर्णयन सर्रास वापरले जाणारे (जात काढून धर्म, शहर/गांव, देश, भाषा, एकाच गावातील उपनगरे/वस्ती हे टाकले तरी हे विधान तितकेच खरे ठरते.) त्यातलाच हा एक नमुना. आईबाप नेहेमी बिचारे वगैरे असतात, मुलं वैट्टं वैट्टं असतात. गंमत म्हणजे हे असले लिहिले की 'आईबापांना सांभाळणे ही आपली संस्कृती आहे, 'त्यांच्या'सारखे नाही हो आम्ही’च्या बाता मारणारे, लग्न होताच 'मग आम्हाला प्रायव्हसी नको का?' असं म्हणत आईबापांवेगळे राहणारे, सोशल मीडियाच्या पारावर नि बारमधे भरपूर टाईमपास करुनही 'आईवडिलांसाठी वेळच मिळत नाही हो' म्हणून फेसबुकवर मातृ-पितृदिन 'साजरे' करणारे बरेच जण धावून येतात. यात संस्कृतीचे ठेकेदार म्हणून मिरवणारे अधिक दिसतात हे ओघाने आलेच.

अशी फीचर्स करणार्‍या चॅनेल्सना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ’एखाद्या दारुड्या बापाच्या किंवा सोन्याचांदीच्या, साड्यांच्या अतिरेकी आहारी गेलेल्या आत्ममग्न आईच्या, एका जिद्दीने आपल्या पायावर उभे राहिलेल्या मुलीचे/मुलाचे असे फीचर केले होते का हो?’ नाही म्हणजे जिद्दीने उभे राहिलेल्यांवर फीचर होते हे खरे. पण त्यात 'बाप दारुच्या व्यसनात बुडालेला असून निर्व्यसनी राहून स्वकष्टावर यश मिळवलेली/ला' अशी हेडलाईन पाहिली आहे का कधी? केवळ आपले तथाकथित पौरुष सिद्ध करण्यासाठी पोर जन्माला घालून आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकून न पाहणारे आईबाप - बाप अधिक - माझा आसपास असंख्य दिसतात. त्यांची स्वकष्टाने, चुकतमाकत, धडपडत, पुन्हा उठून उभे राहात बराच पल्ला गाठलेली अनेक मुले माझ्या पाहण्यात आहेत. त्यांच्या यशाच्या संदर्भात 'आईबापांच्या पाठिंब्याशिवाय' हा शब्दप्रयोग आवर्जून वापरतो का हो आपण? मग हे सतत आईबापांना बिच्चारे नि मुलांना व्हिलन बनवणारे फीचर्स का करतो आपण? किती काळ असल्या पूर्वग्रहांच्या आधारे जगणार आहोत आपण? जात, धर्म, गाव, भाषा यांच्याबाबत होते तशी एकांगी शिक्केबाजी का बरं?

पुढे कपूर यांच्या मुलाची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली होती, हॉस्पिटलचे भले-मोठे बिल भरण्याइतकी त्याची कुवतच नव्हती हे उघड झाले. पैसे नाहीत म्हणून उपचार न करता घरी ठेवून आईला मृत्यूच्या दारात नेऊन ठेवण्याऐवजी, निदान उपचार होतील म्हणून हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. तो प्राप्त परिस्थितीत स्वार्थी, तरीही योग्यच म्हणावा लागेल. पण एक सनसनाटी बातमी वाजवून झाल्यावर ही बाजू मांडण्याची तसदी त्या चॅनेलने अर्थातच घेतली नाही.

आणखी एक ठळक उदाहरण आठवते ते प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे. अभिजात संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणारा आणि ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातूनही भरपूर उत्पन्न मिळवणार्‍या या कलाकाराला भल्यामोठ्या कुटुंबाचा पोशिंदा या भूमिकेत वावरल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता. त्यांच्या विपन्नावस्थेची बातमी आल्यानंतर त्यांना आर्थिक मदत करावी म्हणून काही कलाकार नि रसिक मंडळी प्रयत्न करत होती. त्यांच्या खाँसाहेबांबद्दलच्या प्रेमाबद्दल किंवा खुद्द खाँसाहेबांच्या सनईवादनातील गुणवत्तेबद्दल शंका नाहीच, पण 'शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कदाचित सर्वाधिक बिदागी घेणारा कलाकार' अशी ख्याती असलेल्या खाँसाहेबांवर ही वेळ आली यात त्यांचा मोठा दोष नव्हे का?' असा प्रश्न अन्य एका दिग्गज कलाकाराने विचारला होता आणि मला तो पूर्ण पटलेला होता. इतका पैसा मिळवला त्याचे नियोजन नको? (दणादण इन्शुरन्स पॉलिसीज घेणारे नाहीतर प्लॅट घेणारे कदाचित सर्वोत्तम गुंतवणूक करत नसतील, पण ती करावी लागते हे त्यांना उमगलेले असते इतपत श्रेय त्यांना द्यायलाच हवे.) त्या दिग्गज गायकांना 'माजले आहेत', 'एका कलाकाराने दुसर्‍याबद्दल असे बोलावे का?' वगैरे शेरेबाजी झाली पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या फंदात कुणी पडले नाही... आपण कधीच त्या फंदात पडत नाही. सोपा उपाय म्हणून प्रश्न विचारणार्‍यावर शेरेबाजी, त्याची लायकी काढणे, तिसर्‍याच कुणाला मध्ये आणून 'यापेक्षा तर बरे ना' असा फाटा फोडणे आदी मार्गांनी आपण आपल्यापुरता प्रश्न नाहीसा करुन टाकतो.

अशा तर्‍हेची बातमी पाहिली की माझ्या डोक्यात हटकून विचार येतो तो एखाद्या 'कामातून गेलेल्या' मजुराचा (मी वृद्ध म्हणत नाही कारण वृद्धावस्थेच्या सरकारी अथवा रूढ कल्पना त्यांच्या संदर्भात लागूच पडत नाहीत असे मला वाटते.). त्याला खायला घालणे परवडणार नाही म्हणून मुलगा अचानक सोडून गेल्यामुळे निराधार अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या मजुरावर कधी चॅनेल्सनी फीचर्स केले आहेत? त्या निमित्ताने सर्वांना निवारा नि अन्न याबाबत काही करता येणे शक्य आहे का याबाबत चर्चा घडवून (आज कोणता राजकारणी काय बरळला यावरच्या सनसनाटी चर्चा सोडून) काही हाती लागते का याचा निदान प्रयत्न केला आहे? मुळातच जे समाजाच्या वरच्या, निदान मधल्या प्रवर्गात मोडतात आणि स्वतःच्या दुरवस्थेला बर्‍याच अंशी जबाबदार असतात, त्यांची दु:खे मांडून सहानुभूती नि मदत द्या वगैरे आवाहने करून समाजातल्या या ’आहे रे’ वर्गाच्या समस्या सोडवण्यातच हातभार का लावतात?

गीता कपूर यांनी शंभरेक चित्रपटांतून काम केले. भूमिका हीरोईनच्या नसतील. तेव्हा खूप नाही पण एखाद्या मजुरापेक्षा, दुकानात काम करणार्‍या/रीपेक्षा, रस्त्यावर झाडू मारणार्‍या/रीपेक्षा नक्कीच चांगले पैसे मिळवले असतील. मग त्यांनी वृद्धावस्थेसाठी आर्थिक नियोजन केले नव्हते का? (करूनही ते फसणे सहज शक्य आहे, पण तो मुद्दा वेगळा आहे.) की मुलाने सगळे पाहावे असा परावलंबी विचार होता? तसे असेल तर 'माझ्या मते' ही चूक मानायला हवी. पेन्शनर नावाची खास जमात वगळता जगातील प्रत्येकालाच आपल्या कार्यक्षम, उत्पादनक्षम काळात वृद्धावस्थेसाठी तरतूद करून ठेवायची असते. म्हातारपणी मुले सांभाळतील हे गृहित धरणे म्हणजे मुलांना पोस्ट-डेटेड चेक समजण्यासारखे आहे. आपली मिळकत मुलाच्या नावे करून त्याने म्हातारपणची आर्थिक बाजू सांभाळावी ही विचारसरणी निदान बर्‍यापैकी सुस्थिर आयुष्य जगलेल्यांच्या संदर्भात चूकच म्हणायला हवी.

पालकांची पहिली जबाबदारी मूल हे काही अंशी मला मान्यच आहे, कारण पालकांच्या निर्णयानेच ते या जगात आले आहे. परंतु मुलाला सर्व काही मिळावे म्हणून उरस्फोड करत हिंडणारे पालक पाहिले की मला त्यांची दया येते, कधी रागही येतो. नात्यात देवाणघेवाणीचा विचार नसतो हे ही मान्य, पण हे असे धावाधाव करून आपल्या सार्‍या इच्छा-आकांक्षा मारून ज्या मुलाला उभे केले ते पोरगं खरंच आईबापाबद्दल तेवढीच आस्था बाळगून राहील याची किती शक्यता राहील? मध्यंतरी दूरदर्शनवर एका चर्चा कार्यक्रमात एक भाजीवाला आपण कसे मुलाला बेष्टं इंग्लिश शाळेत घातले आहे वगैरे सांगत होता. उच्चशिक्षण वगैरे घेऊन बालिष्टर झालेलं त्याचं पोरगं किती अभिमानाने वा आत्मीयतेने बापाबरोबर राहणार आहे? लग्नानंतर प्रायव्हसीच्या नावाखाली किंवा तोही वाईटपणा नको म्हणून परगावी वा परदेशी रोजगारास जाऊन तो झटकून टाकण्याची शक्यता किती?

इथे मी त्या मुलाला सर्वस्वी दोष देत नाही. पालक-मुलाच्या राहणीमानात फरक पडला की विचारात पडतो आणि सहजीवन अवघड होत जाते. हे सर्वस्वी गैर आहे असे एकतर्फी विचार करण्याचे काहीच कारण नाही. तसा फरक पडू नये म्हणून मुलाने पालकांच्याच पातळीवर रहावे असा आग्रह धरणे तर चूक आहेच. त्यामुळे आपल्यापुरती आपली जीवनशैली, आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत आपण आधीच आखून घ्यावी हे केव्हाही श्रेयस्कर असते. त्याशिवाय 'तुम्ही अमुक केले असतेत तर माझं असं नुकसान झालं नसतं' असं किरकिरणार्‍या मुला/मुलीला 'माझी जेवढी कुवत होती तेवढं मी केलं, कदाचित तुझी कुवत कमी पडली म्हणून तेवढ्यात तुला हवं ते मिळवू शकला नाहीस' असं ठणकावून सांगण्याचा कणखरपणा पालकांमधे असायला हवाच असं मला वाटतं. पण इथे मुख्यतः धाडस कमी पडतं. त्याचबरोबर 'चार लोक काय म्हणतील' या अदृश्य भीतीला बळी पडणं नि शेजारपाजार्‍यांशी वा एकुण आपल्या वर्तुळात असणार्‍यांशी - त्यांच्या पोरांशी आपल्या पोराची - स्पर्धा करण्याच्या नादात सारासार विवेक केव्हाच खुंटीला टांगला जातो.

पण इथे मला पुन्हा आई-वडिलांच्या दृष्टीकोनातून पाहायचे आहे. अलीकडे फार प्रसिद्ध झालेला ’आपण गेल्या सत्तर वर्षांत काय झालं?’ हा कुत्सित प्रश्न विचारतो, तेव्हा आपण नकळत ज्या अमेरिकेशी तुलना करत असतो, त्या अमेरिकेतील समाज आणि भारतीय (कदाचित एकुणच आशियाई) समाज यांच्या अर्थकारणात फरक आहे. अमेरिकेमध्ये अस्तित्वात असलेल्या ’सोशल सिक्युरिटी’ नावाच्या व्यवस्थेचा भारतात संपूर्ण अभाव आहे. त्यामुळे ज्येष्ठांना म्हातारपणी आर्थिक आणि वैय्यक्तिक अशा दोनही बाबींसाठी मुलांवर अवलंबून राहणे अधिक सोयीचे वाटते. आणि त्याने/तिने ती आपली जबाबदारी स्वीकारावी यासाठी त्यापूर्वी त्याला/तिला जास्तीत-जास्त देऊ करत त्या ओझ्याखाली ठेवण्याचा प्रयत्न करणे, हा तिसरा मुद्दाही प्रबळ ठरतो. इथे मुलाच्या भविष्यातील गुंतवणूक ही आपल्याही भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून पाहिली जाते.

मुळात एकुणातच गुंतवणूक-भान ही आपल्या समाजात दुर्मिळ असलेली बाब आहे. गुंतवणूक ही केवळ अपेक्षित परताव्याकडे पाहून करता येत नसते, तो परतावा मिळण्याची संभाव्यताही(probability) ध्यानात घ्यावी लागते. इतर गुंतवणुकीप्रमाणेच इथे निव्वळ परतावा नव्हे, तर त्याचे त्या संभाव्यतेशी गुणोत्तर पाहावे लागते. या दृष्टीने पाहिले तर स्वत:च स्वत:च्या भविष्याची तरतूद करणे हे किमान-धोका (Low-risk) आणि कमी-परतावा(Low-returns) प्रकारची गुंतवणूक असेल, तर मुलांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक-धोका (high-risk) आणि अधिक-परतावा(high-return) प्रकारची गुंतवणूक म्हणावी लागेल. कारण मुला/मुलीने पालकांना आर्थिकदृष्ट्या वार्‍यावर सोडले तर त्यांच्यावरची गुंतवणूक वाया गेली म्हणावे लागेल. आणि ती शक्यता जशी मूल अमेरिकेला जाऊन सेटल होण्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकते, तशीच कदाचित मूल मुळातच सामान्य कुवतीचे असल्याने आई-वडिलांच्या त्या गुंतवणुकीतून फारसे काही साध्य करुन न शकल्यामुळेही. स्वत:च स्वत:ची तरतूद करण्यामध्ये अशी गुंतवणूक संपूर्णपणे वाया जाण्याची शक्यता तुलनेने कमी राहते. परंतु दुसर्‍या बाजूने मूल मागच्या पिढीच्या तुलनेत अधिक कर्तबगार निघाले, तर उतारवयातले ते परावलंबी आयुष्य कदाचित स्वावलंबी आयुष्याहून अधिक सुखकर असू शकते... पण तसेच होईल हे गृहित धरणे म्हणजे शक्यतांना मोडीत काढून स्वार्थाला निश्चित भविष्याचे रूप देण्यासारखे आहे.

जसे मूल ही आपली जबाबदारी आहे, तसे आपले आयुष्य चांगले असावे याची जबाबदारीही मुख्यतः आपली स्वतःचीच असते ना? स्वतःसाठी थोडे स्वत:चे असे आयुष्य, थोडे धन राखून ठेवले, तर त्याला स्वार्थीपणा का म्हणावे? पुढे जाऊन मूलही स्वार्थीपणाने वागणार नाही याची काय खात्री? तेव्हा पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच थोडे स्वतःसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला तर काय चूक? त्यामुळे कमावते झाल्यापासूनच निवृत्तीसाठीचे पैसे, मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे, रोजच्या गरजांचे पैसे... वगैरे विभागणी प्रथमपासूनच करुन एका गोष्टीसाठी राखून ठेवलेले पैसे अन्य कारणासाठी न वापरण्याची, त्या-त्या कामासाठी जे पैसे राखून ठेवले आहेत तेवढ्यामध्येच त्या कामाची व्याप्ती वाढवण्याची शिस्त प्रथमपासून लावून घ्यायला हवी. त्यातून पोरगं पुढे आई-बापांबद्दल कृतज्ञ राहणार नाही कदाचित, पण उतारवयात आई-बापाला दोन वेळच्या अन्नाची नि आवश्यक उपचारांची वानवा पडणार नाही याची शक्यता बरीच वाढते.

शिवाय इतके सारे पुढे पुढे करून, बाह्य कुबड्यांचा आधार देत पोराला उभे करायचा प्रयत्न केला, तर ते पोरगं अधिकच परावलंबी वृत्तीचे होईल ही एक शक्यता राहतेच. मुळात इतके सुरक्षित आयुष्य त्याच्या भोवती उभे केले, तर पहिल्या संघर्षाच्या प्रसंगी ते मोडून पडण्याची शक्यता अधिक. कारण 'दोन द्यावे दोन घ्यावे' च्या खुल्या जगात त्याला पाय रोवून उभे रहावेच लागणार आहे, पडत, उठत त्यातून शिकत पुढे जावे लागणार आहे. तिथे आई-बापाने देऊ केलेल्या तयार चौकटीचे आयुष्य जगणार्‍या मुलांमध्ये आवश्यक ती कौशल्ये विकसित झालेली असणार आहेत का? की ती कौशल्येही आधीच ठरवून त्या चौकटीत बसवून देणार आहेत, आणि असल्यास कशी? कारण ते मूल जगण्याचा स्वत:चा संघर्ष सुरु करेल तेव्हाची परिस्थिती आणि त्याच स्थितीत त्याचे आई-वडिल असतानाची परिस्थिती यात कालमानानुसार दोन ते तीन दशकांचा फरक असणार आहे. कदाचित त्याच्या जगण्यातले संघर्ष आई-वडिलांच्या काळात त्यांच्यासमोर असलेल्या संघर्षांपेक्षा सर्वस्वी वेगळे असतील अशी शक्यता बरीच आहे. तेव्हा मुलामध्ये गुंतवणूक म्हणून पाहणॆ जसे घातक तसेच स्वार्थत्यागाच्या कैफात त्याला नव्या आव्हानांसमोर पंगू करुन ठेवणेही.

आणि हा स्वार्थत्याग वगैरे मुख्यतः घरच्या बाईच्या प्रगतीच्या मुळावर येत असतो. दुर्दैवाने 'मुलाचं सुख ते आपलं सुख' वगैरे बाष्कळ कल्पनांच्या ब्रेन-वॉशिंगमुळे अनेकींना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही, हे अलाहिदा. अर्थात विचारपूर्वक, सारा साधकबाधक विचार करून जर त्यांनी मुलासाठी आपले वैयक्तिक आशा-आकांक्षा बाजूला ठेवल्या तर त्या निस्वार्थ भावनेचं कौतुक आहेच. फक्त तो निर्णय जाणतेपणे घेतलेला असेल तरच, केवळ परंपरेच्या वा सामाजिक दडपणाखाली - आणि अर्थातच घरातील दडपणाखाली - घेतलेले असेल तर नव्हे. परंतु दुर्दैवाने हा समूह-दडपणाचा (peer pressure) भाग मातेवर अधिक परिणाम करतो असा अनुभव आहे. माझं पोरगं 'सग्गळ्या मुलांत नि सग्गळ्या विषयात' हुश्शार वगैरे करण्याचा आटापिटा - मुख्यतः उच्चशिक्षित स्त्रियांमधे - अनुभवाला येतो. एकाच वेळी महागडं शिक्षण - जे चांगलं असतं असं गृहितक आहे - जास्तीचे क्लासेस, वर पोरगं चतुरस्र वगैरे असावं म्हणून गाण्यापासून क्रिकेटपर्यंत आणि मुलगी असेल तर नाचापासून कराटे-तायक्वोंदोपर्यंत (सेल्फ डिफेन्स नको का शिकायला?) सग्गळं त्या पोराला नाचायला लावायचं नि स्वतःही नाचायचं... खरंतर धावत रहायचं! सगळं एकदम करण्यापेक्षा एकामागून एक करणं शक्य नाही का? पण तसं नाही. ऑलराउंडर पाहिजे पोरगं. म्हणून मग आपल्या याच वृत्तीप्रमाणॆ सगळं थोडं थोडं पण कुठलंच खोलात न शिकवणारे एमबीएचे अभ्यासक्रम हे आमचे ध्येय असते, कारण अजून तरी त्यात आर्थिक स्थैर्याची शक्यताही बरीच अधिक आहे.

या सार्‍या विवेचनात सर्वत्र शक्यतांच्या भाषेत बोलणं याचा अर्थ ठाम विधान करण्याचे टाळणे आहे, असा अर्थ काढला जाण्याची ’शक्यता’ बरीच आहे. आणि माझा मूळ मुद्दा तोच आहे. निर्णय हे नेहमी शक्यता (possibility) आणि त्यांची संभाव्यता(probability) यांच्या आधारे घेणे अधिक शहाणपणाचे असते. अमुक एकच घडेल असे गृहित धरुन निर्णय घेणे, आणि तसे न घडल्याने निर्णय चुकला की ’नशीब’ वा 'दैव' यांवर खापर फोडून कपाळाला हात लावून बसणे, हे वैचारिक आळशीपणाचे लक्षण आहे. निर्णयापूर्वी सर्वच शक्यतांना ध्यानात घेणे अत्यंत गरजेचे असते.

पण ज्यांना ठोस विधानेच समजतात त्यांच्यासाठी एका वाक्यात सांगायचे तर, ’जसं आई-बापाने मुलाला सारं सारं देण्यासाठी उरस्फोड करणं विकृत, तसंच आईचं त्याने सग्गळं सग्गळं शिकावं नि इतर पोरांपेक्षा लै भारी असावं म्हणून त्याला सतत धावतं ठेवत त्याचं बालपण हिरावून घेणंही... आणि अर्थातच आई-बापाने स्वत:चे भावी आयुष्य धोक्यात घालून आपल्याला आर्थिक मदत करावी ही त्या मुलाची अपेक्षाही!’

काही वर्षांपूर्वी ’दूरदर्शन'वर 'कथासागर' नावाची एक मालिका दाखवली जात असे. देशोदेशीचे उत्तमोत्तम कथाकार निवडून त्यांच्या कथांवर आधारित एपिसोड दाखवले जात. गावाकडून येताना केवळ आपले शरीर आणि शेतीवरचे कर्ज एवढ्या दोन गोष्टी सोबत आणलेला एक बाप. आपल्या मुलाने शिकावे आणि कुटुंबाचा भार थोडा आपल्याही खांद्यावर घ्यावा अशी अपेक्षा असलेला. बापाच्या डोक्यावरचे कर्ज वाढवून डॉक्टर झालेला मुलगा श्रीमंत वर्गमैत्रिणीशी लग्न करुन सासर्‍याच्या मदतीने उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय बापाला सांगतो. एवढ्या कर्जाचा बोजा आणखी काही वर्षे वागवावा लागणार हे जाणवून खचलेला बाप मुलाला त्याची आठवण करुन देतो. 'पण मी इथे आलो तेव्हाही तुमच्या डोक्यावर कर्ज होतंच की!' हे मुलाचे शेवटचे वाक्य आणि आता आपला दोघांचा मार्ग वेगळा झाला आहे हे जाणून, विमानतळाकडे जाणार्‍या मुलाच्या टॅक्सीतून उतरुन हताश चेहर्‍याने पाय ओढत जाणारा तो बाप, हे दोनही माझ्या डोक्यात बराच काळ रुतून बसले होते. ’मुलाची स्वप्ने कितीही मोठी असली तरीही ती आपली नसतात, फक्त त्याचीच असतात’ हे आई-बापाने विसरता कामा नये, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

- oOo -

* 'वृद्धाश्रमात फक्त श्रीमंतांचे आईबाप असतात, गरीबांचे नाहीत' असा दावा करत गरीब हे याबाबतीत सधनांपेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असतात असा एक दावा केला जातो. परंतु वृद्धाश्रमात ठेवणॆ याचा अर्थ खर्चाचे एक जास्तीचे खाते खुले करणे असाच असतो, आणि गरीबाला ते परवडणारे नसते हे ध्यानात घ्यायला हवे.


बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

मी पुन्हा येईन...

( सिद्धांत बेलवलकर या स्टॅंड-अप कमेडियनने त्याच्या एका सादरीकरणामध्ये खड्डेही ’मी पुन्हा येईन’ म्हणतात असा पंच घेतला. त्यावरुन स्फुरलेले हे विडंबन.)

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ॥धृ॥

पाऊस पडला, खड्डे झाले,
खड्ड्यांमध्ये तलाव झाले.
लोक चिडले, नेत्याला भिडले,
नेत्याचे आदेश निघाले

कामगार कामाला लागले,
डांबराची पिंपे घेऊन आले.
डांबर खडीचे मिश्रण ओतले,
तर खड्ड्यांतून आवाज आले... ॥१॥


घरात झुरळे फार झाली
ताटावर त्यांनी चढाई केली
जेवण्याचीही चोरी झाली
घरची मंडळी त्रस्त झाली

औषधे घेऊन माणसे आली
सांदीकोपर्‍यात चढाई केली
अखेरच्या झुरळाने माघार घेतली
खिडकीतून जाताना गर्जना केली...  ॥२॥


पाऊसपाणी ब्येस झालं
शिवारात पीक उभारलं
एका पाखराचं ध्यान गेलं
पर ते बुजगावण्याला भ्येलं

गावचं सांड पिकात घुसलं
शेतकर्‍याचं टकुरं फिरलं
हिरव्या फोकानं मजबूत हाणलं
पळता पळता ते डुरकलं... ॥३॥

कष्टानं पैसा मिळवला
नीट गुंतवून सांभाळला
मग गणपा रिटायर झाला
’श्रमसाफल्य’ बंगला बांधला

एके रात्री चोर आला
पाईपवरुन घरात शिरला
गणपाने पकडून ठेवला
ठाण्यावर नेताना म्हणाला... ॥४॥

पहिलीपासून गणिताला भ्यालो
तिसरीत पाच वर्षे अडकलो
क्लास लावले, रात्री जागलो
सार्‍या देवांच्या पाया पडलो

यावर्षी घनघोर लढलो, आणि
परीक्षेला लवकर पोचलो
पेपर लिहून बाहेर पडलो
जाताजाता सवयीने म्हटलो... ॥५॥

विनोद ऐकून विडंबन केले
कविला आकाश ठेंगणे झाले
फेसबुकवर टाकले, फॉरवर्ड केले
चार-दोन लाईकांचे भारे मिरवले

अहंकाराचे शिंग उगवले
काव्यसंमेलनात कवि शिरले
आयोजकांनी हाकलून लावले
बाहेर पडताना कवि पुटपुटले... ॥६॥

- oOo -


सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश

फार पूर्वी लहानपणी पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या एका व्यक्तिचित्रात (पुस्तकाचे नाव बहुधा ’मणिदीप’ होते. चु. भू. द्या घ्या) काश्मीरचा राजा मातृगुप्त याच्या न्यायबुद्धीची एक लहानशी गोष्ट वाचनात आली होती. कुण्या एका व्यापार्‍याची शंभर सुवर्णमुद्रा असलेली पिशवी विहीरीत पडते. त्याचा शोक ऐकून एक साहसिक ’ती बाहेर काढून दिली तर मला काय द्याल?’ अशी विचारणा करतो. त्यावर व्यापारी म्हणतो, ’आता तसेही माझ्याहातून ते धन गेल्यात जमा आहे. बाहेर काढल्यावर तुम्हाला आवडेल ते मला द्या.’ म्हणतो. तो साहसिक ती पिशवी बाहेर काढून त्यातील एक सुवर्णमुद्रा व्यापार्‍याच्या हाती टेकवतो. व्यापारी अर्थातच संतापतो, राजाकडे दाद मागतो.’

वरकरणी परिस्थितीचे प्रेक्षक आणि अर्थातच खुद्द साहसिकाला ’व्यापार्‍याने म्हटल्यानुसारच आपण वागलो, त्यात गैर काय’ असे वाटत असते. परंतु राजा मात्र नव्याण्णव नाणी व्यापार्‍याला देण्याचा आदेश देतो. कारण राजाचा निवाडा हा त्या दोघांमध्ये झालेल्या मौखिक करारावर अवलंबून होता. शंभर नाण्यांचे साहसिकाने नव्याण्णव आणि एक मुद्रा असे दोन भाग केले. नव्याण्णव मुद्रांचा भाग त्याला अर्थातच ’आवडला’ असल्याने तुम्हाला आवडेल ते ’मला’ द्या या नियमानुसार तो भाग व्यापार्‍याला देणे अपेक्षित होते. राजानेही तोच निवाडा दिला साहसिकासह सर्वांना तो पटलाही.

आता ’हा उलट दिशेने साहसिकावर अन्याय नाही का?’ असा प्रश्न पडू शकतो आणि तो वाजवी आहे. माझ्या मते व्यापार्‍याच्या म्हणण्याचा ध्वन्यर्थ लक्षात घेतला तर तो तसा आहेही. तसे पाहता सर्वस्व गमावलेल्या व्यापार्‍याने एक सुवर्णमुद्राही ’beggar cannot be chooser'  या न्यायाने स्वीकारावी असे वाटणे साहजिक आहे. साहसिकाला ’तुम्हाला आवडेल ते मला द्या’ म्हणतो तेव्हा तो खरेतर ’तुमची मर्जी होईल तितके मला द्या’ असे सांगत निर्णय साहसिकाच्या संपूर्ण स्वाधीन केल्याची कबुलीच देत असतो. अर्थात यात साहसिक अगदीच स्वार्थी विचार करणार नाही अशी अध्याहृत अपेक्षा असणारच. एकच सुवर्णमुद्रा मिळण्याने ही त्याची अपेक्षा पुरी झालेली नाही. साहसिकाने आपल्याला फसवल्याची त्याची भावना झाली. त्याच्या बोलण्याचा ध्वन्यर्थ ध्यानात घेतला तर साहसिकाने अगदी काहीही दिले नसते तरी त्याची मनाची तयारी असायला हवी होती. परंतु त्याची ती शरणागत मनोऽवस्था ती पिशवी विहिरीत असताना, बव्हंशी अप्राप्य असताना होती. साहसिकाने ती पिशवी बाहेर काढल्यावर ती तेवढी शरणागत राहिली नाही. कारण आता अप्राप्य ते प्राप्त झाले आहे. 

साहसिकाच्या बाजूने विचार केला तर तांत्रिकदृष्ट्या त्याला व्यापार्‍याला किती मुद्रा द्याव्यात याचा अधिकार व्यापार्‍याने दिला असल्याने त्याने कमीतकमी वाटा दिला तरी ते अयोग्य नाही. पण दुसर्‍या बाजूने पाहिले तर शब्दाचा फायदा घेत त्या धनाचा मूळ मालक असलेल्या व्यापार्‍याचे जवळजवळ सर्वच धन हिरावून घेणे हे एक माणूस म्हणून त्याच्याबाबत प्रतिकूल मत निर्माण करणारे आहे. 

पण हे दोनही केवळ ’दृष्टिकोन’ आहेत, सापेक्ष आहेत. निवाडा करण्यास बसलेल्याने निवाडा हा केवळ वस्तुनिष्ठ घटकांच्या नि घटनांच्या आधारेच करायचा असतो. आणि इथे पिशवी विहिरीत पडणे, ती साहसिकाने काढून देणे या दोन घटना आणि त्या दरम्यानचा त्यांचा मौखिक करार या तीनच घटकांचा विचार करावा लागतो. आणि राजाने तसाच तो केला.

न्यायव्यवस्था ही निवाडा करत असते. तो न्यायाच्या अधिकाधिक जवळ राहावा यासाठी न्यायासनासमोर त्या न्यायाला बळ देणारे जास्तीतजास्त तपशील तिच्यासमोर सादर करणे आवश्यक असते. समोर येते त्याहून अधिक काही गृहित धरणे न्यायासनाकडून अपेक्षित नाही. तिथे अर्थार्जनासाठी देहविक्रय करणार्‍या स्त्रीवर बलात्कार झाला तर तो ही बलात्कारच मानला जायला हवा. ’त्यात काय, ती इतक्या लोकांसोबत शय्यासोबत करते. त्यात आणखी एकाने तिचा भोग घेतला तर कांगावा कशाला एवढा?’ असा विचार न्यायासनाने करायचा नसतो. कारण गुन्हा अतिक्रमाचा असतो, जबरदस्तीचा असतो हे ध्यानात ठेवावे लागतो. थोडक्यात न्यायासनासमोर आलेली घटना ही देहभोगाची नव्हे तर मर्यादाअतिक्रमाची आहे हे ध्यानात घेऊन तिचा निवाडा करायचा असतो.

सध्या केवळ माध्यमांच्या हाकाटीला खरी मानत एखाद्या व्यक्तीला आरोपी तर सोडाच, थेट गुन्हेगार मानून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारे, किंवा त्यांना गोळ्या घातल्या की पोलिसांवर शाब्दिक पुष्पवृष्टी करणारे ’घरबसले न्यायाधीश’ पाहिले, की या मंडळींना न्यायाची तर सोडाच, निवाड्याचीही समज नाही हा ’माझा समज’ दृढ होत जातो.

- oOo -

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

'लंगोटाची उपासना' ऊर्फ 'भूतकालभोग्यांची आस, आभास आणि अट्टाहास'

तुम्ही जन्माला येता, त्यानंतर सुरुवातीची एक दोन वर्षे तुमचे जन्मदाते/पालक तुम्हाला तुम्हाला लंगोटात लपेटून टाकतात. तुमचे नियंत्रण नसलेल्या उत्सर्जितांनी तो लंगोट खराब झाला, की बदलण्याचे कामही तेच करत असतात. सोबत तुम्हाला आहार देणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादि जबाबदार्‍याही त्या पालकांनीच स्वीकारलेल्या असतात. थोडक्यात तुम्ही तुमचे पालक आणि तो लंगोट यांच्यावर संपूर्णपणे अवलंबून असता. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने तुमची ’त्या आई-बापाचे मूल’ याहून कोणतीही वेगळी ओळख नसते. कारण अजून तुम्ही खूप लहान असता. स्वत:च्या पायावर उभे राहणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे याला आवश्यक असणारे शारीर बळ, कुवत आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अजून काही काळ जावा लागतो. थोडक्यात तुमच्या आयुष्यातील सर्वस्वी परावलंबी काळाचा आधार म्हणून त्या लंगोटाचे स्थान असते.

भूतकाळात कधीतरी तो तुम्हाला साहाय्यभूत झाला होता, त्याने तुमचे लज्जारक्षण केले होते हे खरे. पण वाढल्या वयाने, शरीराने त्याच्याशिवाय अनेक पर्याय दिलेले असतात. आमचा सनातन लंगोट आहे म्हणून अट्टाहासाने केवळ लंगोटावर बाहेर हिंडू लागलात तर... क्षणभर हास्यास्पद वाटेल खरे. पण विचार करुन पाहा की आसपासचे सारेच लंगोटधारी(!) असतील तर...?

...तर बहुसंख्येच्या न्यायाने लंगोट हा माणसाचा अधिकृत पेहराव ठरेल. पुढे जाऊन कदाचित लंगोटाचे कापड, त्यावरील नक्षी अथवा पॅटर्न आणि अर्थातच त्याचा रंग यावरुन लोकांचे गट बनतील. ’अरे ते हिरवा लंगोटवाले सगळ्या लंगोट उत्पादक कंपन्या ताब्यात घेऊन, आपले लाल रंगाच्या लंगोटांचे उत्पादन बंद वा कमी करुन आपल्याला नागवे करण्याचा कट करत आहेत.’ असे व्हॉट्स अ‍ॅप मेसेज फिरवले जातील. ’लाल लंगोटवाले क्षमस्व’ असे बोर्ड सोसायट्यांमध्ये लागतील किंवा वधू-वर सूचक मंडळांमधे अपेक्षांच्या यादीत दिसू लागतील. बिल्डर मंडळी ’या बिल्डिंगमधे आम्ही एकही हिरवा लंगोटवाला येऊ दिलेला नाही.’ हा सेलिंग पॉईंट न चुकता संभाव्य ग्राहकाला सांगतील. इतकेच काय तर लंगोट स्वच्छ करण्याच्या पद्धतीनुसार जातीही तयार होतील. केवळ नदीत धुणारे एका जातीचे, दगड-धुपाटणे वापरणारे दुसर्‍या जातीचे तर नळ-बादली संयोगाने हे कार्य पार पाडणारे मध्यमवर्गीय, वॉशिंग मशीनवाले भांडवलशाही लंगोटधारी आणखी चौथ्या जातीचे. शिवाय हिरव्या लंगोटांमध्ये फुला-फुलाची नक्षीवाले एका जातीचे, निव्वळ एकरंगी लंगोटधारी दुसर्‍या जातीचे, पोल्का डॉट्स अथवा ठिपक्यांची नक्षीवाले त्यातल्या त्यात मॉडर्न अशी विभागणी होईल. थोडक्यात लंगोटाभोवती अशी समाजव्यवस्था आकाराला येईल...

सर्वच क्षेत्रातील आपले वजन कमी होताना पाहून ज्येष्ठ लंगोटधारी प्राचीनत्वाच्या आधारे आपले स्थान राखण्याचा अट्टाहास करतील. आपल्या लंगोटाचे, त्याच्या रंगाच्या अस्मितेचा खुंटा हलवून बळकट करण्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी, ’आपण लंगोटातच जन्मलो होतो, नागवेपणाचे अश्लील वर्तन आपण जन्मवेळीही केले नव्हते’ असे प्रतिपादन करु लागतील. आता ही मंडळी ज्येष्ठ गटात मोडत असल्याने बहुधा त्यांना लंगोटाशिवाय पाहिलेली त्यांची मागील पिढी अस्तित्वात असण्याचा संभव नसेल. तेव्हा ’चश्मदीद गवाह’ नसल्याने पुढच्या पिढीच्या मंडळींना तो दावा नाकारणे अवघड असेल.

एखादा शहाणा तर्काचा किंवा वारंवारतेच्या नियमाचा आधार घेऊन म्हणू लागला की, ’आज जन्मणारे सारेच लंगोटाशिवायच जन्माला येतात. सबब तुम्ही स-लंगोट जन्माला येणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे.’ तर त्याला आपला-लंगोट-गट-द्रोही म्हणून झाडून टाकण्याची सोय असेल. किंवा हे ज्येष्ठ लंगोटधारी "आपण चारचौघांसारखे अथवा सामान्य व्यक्ती नाही, प्रेषित आहोत. म्हणून ’त्याने’ खास आपल्याला स-लंगोटच या भूतलावर पाठवले." असा दावा करुन पुढच्या पिढीतील विचार-आळशी गटात आपले स्थान दैवी आधाराने बळकट करण्याची खटपट करतील... किंवा अन्य-लंगोट-गटातील आपल्यासारखाच एखादा असे अवास्तव दावे करत असेल तर त्याच्याकडे बोट दाखवून, "त्याला चॅलेंज करत नाही तुम्ही. तिथे तुम्ही शेपूट घालता." म्हणत आपली शेपूट सोडवून घेतील. आता विविध गटांचे लंगोटांचे रंग, पॅटर्न, नक्षी आणि कापड वेगवेगळे असले, तरी अकलेचे पोत सारखेच असल्याने प्रत्येक गटात असे लोक सापडत राहणारच. त्यामुळे असल्यामुळे हा प्रतिवाद हुकमी वापराचे हत्यार म्हणून ज्येष्ठांनी आपल्या भात्यात कायम ठेवलेला असेल...

हा सगळा कल्पनाविस्तार हास्यास्पद, कदाचित बीभत्सही वाटतो ना? खरंतर तो तसा मुळीच नाही. असे प्रकार विविध संदर्भात आपण आपल्या आयुष्यात कायमच करत आलेलो आहोत. कधीकाळी एखादी गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग होती, आपल्यासाठी उपयुक्त होती, आपला आधार होती म्हणून तिची गरज संपल्यावर, ती कालबाह्य झाल्यावरही तिच्याभोवतीच जगणे विणत बसणे हा आपल्या अनुभवाचा भाग नाही? इतके पुरेसे नाही म्हणून या ना त्या निकषावर त्यात विभागणी करत टोळ्या जमवून एकमेकाच्या जिवावर उठणे, द्वेषाची शेती पिकवणे हे आपण नेहमीच पाहात नाही? आपल्या गावचा, जातीचा, धर्माचा माणूस वृत्तीने आपल्याहून सर्वस्वी वेगळा असला, तरीदेखील ’समानशील’ असलेल्या अन्य धर्मीयापेक्षा अधिक जवळचा वाटतो की नाही? तिथे आपले तसे वाटणे, हे एकाच रंगाचे लंगोट वापरण्याचा धागा जोडण्याइतकेच हास्यास्पद नाही का?

कधीकाळी धर्म, जात वगैरे संकल्पना कदाचित समाजाची व्याप्ती निश्चित करत असतील, विशिष्ट गटाची व्यक्ती म्हटले की तिचे राहणीमानान व आचार-विचार याबाबत आपल्याला किमान तर्क करता येत असतीलही. आज संवाद, प्रवास वगैरे सर्वच क्षेत्रातील सीमा ओलांडून दोन व्यक्ती सहजपणे परस्पर-संवाद अथवा भेट घेऊ शकतात. माहिती-वहनातील क्रांतीमुळे एखाद्या भौगोलिकदृष्ट्या दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दलची माहिती आपल्याला सहज मिळवता येत असते. समाजमाध्यमांच्या आणि डेटाच्या आधारे केल्या जाणार्‍या विश्लेषणातून तर एखाद्या व्यक्तीचे पुरे व्यक्तिमत्व आता घरबसल्या तयार करता येते. अशा वेळी लंगोटाच्या रंगासारख्या, त्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्याचे कोणत्याही अर्थी निदर्शक नसलेल्या जात-धर्मादि निकषाच्या आधारे आपण आपले व्यवहार करत असू, तर आपण मूर्ख नाही?

पुलंच्या ’बटाट्याची चाळ’मध्ये जिन्याची कुंडली मांडून त्याच्या दुरवस्थेची कारणमीमांसा करणार्‍या अण्णा पावशेंसारखे, समोरच्या बादलीतले पाणी गरम आहे की नाही हे त्या बादलीची कुंडली मांडून ठरवतो, की त्याला स्पर्श करुन पाहण्याचा, अनुभवाचा मार्ग निवडतो? आणि एखादा खरोखरच कुंडली मांडून पाहात असेल, तर तो फक्त आणि बादलीचीच का बरे, ती बादली भरणार्‍या नळाच्या तोटीची, चौकात नगरपालिकेने बसवलेल्या चावीची, ती फिरवून पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍याची वगैरे इतर घटकांची का मांडत नाही? या प्रत्येकाचा प्रभाव त्यावर आहे नि त्यांचा ’हात’ त्या पाण्याला लागलेला आहेच ना... असा प्रश्न कधी पडला होता का?

जगात ज्येष्ठ असतात, मध्यमवयीन असतात, तरुण असतात, किशोरवयीन असतात, बालके असतात तशीच अर्भकेही. लंगोट हे त्यातील अर्भकाचे वस्त्रप्रावरण आहे. बालक-वर्गात पोचल्यावर ते मूल अर्धी चड्डी, शर्ट, बुशकोट, टी-शर्ट वगैरे वस्त्रे वापरु लागते. मुलगी असेल तर तिला याहून अनेक प्रकारची परिधाने उपलब्ध होतात. (विभागणीची सुरुवात इथपासूनच होते!) जरी कौतुक म्हणून, फॅशन म्हणून क्वचित मोठ्यांसारखी पॅंट ते वापरत असले तरी त्याचा मूळ पेहराव हा अर्धी चड्डी हाच असतो. यथावकाश शाळेची चार वर्षे गेली, त्याने किशोरवयान पदार्पण केले की शाळेच्या गणवेषापासून ते मूल अधिकृतपणे संपूर्ण लांबीची पॅंट वापरु लागते. पुढे तारुण्यात पदार्पण केले की बालपणाच्या उलट दिशेने मूळ पेहराव पॅंट, पण अपवाद म्हणून, फॅशन म्हणून वा भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात सोयीस्कर म्हणून, अधून मधून अर्धी चड्डीदेखील वापरते. हे सारे पेहराव मूळ लंगोटाप्रमाणेच कापड या एकाच वस्तूचे विविध आविष्कार असतात. त्या अर्थी पेहराव, संरक्षण अथवा लज्जारक्षण हा मूळ हेतूचे भान न सोडताही त्या कपड्याची भूमिती आपण खळखळ न करता बदलतो. काही मूठभर प्राचीन मनाचे लोक वगळता, "तुम्ही अमुक पेहरावच का केलात, आमच्या गटातील तुमच्यासारख्याने असाच पेहराव केला पाहिजे" असा आक्षेप कुणी तुमच्यावर घेत नाही.

थोडक्यात पेहरावामध्ये वयानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, पर्यावरणानुसार बदल करण्याने कुठलीही बाभळ बुडते असे आपल्याला वाटत नाही. पण हीच बाब आचार-विचारांबाबत मात्र भयंकर गुन्हा का वाटते? कुण्या जाहिरातीमध्ये ’माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट’ म्हणणार्‍या त्या छोट्या मुलीसारखे लहानपणी आपले वडील जगातले सग्गळ्यात शक्तिशाली पुरुष आहेत असे समजणारी मुले वाढत्या वयानुसार ती कल्पना हास्यास्पद म्हणून सोडून देतातच ना? मग तीच बाब आचार-विचारांच्या बाबत इतकी भयंकर का वाटते? विज्ञान-तंत्रज्ञानादि बाबी नगण्य अवस्थेत असताना जगलेल्या पिढीला आजच्या स्थितीला सुसंगत समाजव्यवस्था वा आचार-विचारांची चौकट मांडता आली आहे असा अट्टाहास आपण का करतो? हा आक्षेप अडचणीचा वाटू लागला की आपल्या चौकटींची कालबाह्यता मान्य करण्याऐवजी उलट आजच्यापेक्षा तेव्हा या गोष्टी अधिक प्रगत होत्या असा स्वत:लाही न पटणारा उफराटा दावा कोणत्याही शेंडा-बुडख्याशिवाय अट्टाहासाने का लादू बघतो? ’लेट इट गो’ असं म्हणणं इतकं अस्वस्थ का करतं आपल्याला? जोडीदार निवडल्यावर आई-बापांचं घर सोडून सहजपणे वेगळा संसार थाटणार्‍या शिक्षित, नागरी समाजातील व्यक्तींची त्याहून कैक शतके जुन्या गोष्टींना सोडण्याची तयारी का नसते? आपली ओळख निर्माण करण्याऐवजी ती भूतकाळातून उसनी घेण्याचा अगोचरपणा का करावासा वाटतो?

तुमच्या आयुष्यातील प्राचीनत्वाची आस ही त्या लंगोटासारखी असते. मग मानवी सहजीवनाच्या आदिकाळात, म्हणजे मानवी संस्कृतीच्या अर्भकावस्थेत असताना माणसाने स्वसंरक्षणार्थ काही उपाय केले, समाजधारणेसाठी, त्याच्या नियमनासाठी काही चौकटी आखून दिल्या. आज भौगोलिक, सामाजिक, आर्थिक रचनेत आमूलाग्र बदल होऊनही, वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा वेग कल्पनातीत वाढल्यानंतरही त्याच वापरत राहणार या अट्टाहासाला काय अर्थ आहे?

काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात माणसाची बुद्धी विकसित होत होती, जाणीवेला जनावरांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ आयाम मिळू लागले होते. जनावरांपेक्षा विकसित झालेल्या बुद्धीमुळे त्या भयाचे आकलनही अधिक तीव्र झाले होते. परंतु मर्यादित बौद्धिक, शारीरिक व तांत्रिक वकुबामुळे त्यांची जाणीव जागी झाली असली तरी अजूनही अनेक प्रकारचे धोके, अनामिक, अनाकलनीय धोक्यांपासून सुटकेची अथवा निराकरणाची पुरेशी माहिती वा साधने उपलब्ध नव्हते. अशा वेळी माणसाने काल्पनिक आधारांची निर्मिती केली. ज्याच्यापर्यंत पोचता येत नाही अशा कुण्या अनाम नियंत्रकासमोर माणूस लीन झाला. त्याने आपले धोके, आपली भीती, आपले क्लेष दूर करावे म्हणून त्याला साकडे घालू लागला. ही कृती म्हणजे आपल्या शिरावरील भीती, ताण-तणाव दुसर्‍या कुणाच्या शिरी देऊन आपण तणावमुक्त होण्याचीच होती.

असे असूनही हे कृत्रिम आहे, काल्पनिक आहे याचे भान, ती जाणीव मनाच्या तळाशी कुठेतरी जिवंत असतेच. मग तिला आणखी खाली चिणून टाकण्यासाठी बहुमताचे गाठोडे तिच्या डोक्यावर दाबले जाते. शिरीष कणेकर त्यांच्या ’फिल्लमबाजी’च्या शेवटी म्हणतात तसे ’आमच्या जगण्यातला अंधार त्या थिएटरच्या अंधारात आम्ही मिसळून टाकला.’ अंधार व्यापक झाला की तो सार्‍यांनाच भोगायचा आहे या एका सह-अनुभूतीच्या भावनेने माणसे काहीशी तणावमुक्त होत असावीत. त्यासाठी बहुमताचा आधार उपयोगी पडत असावा. आणि ते बहुमत निर्माण करताना गाडं घसरत जातं. कारण आता कायम आपल्या बाजूच्या गटाची संख्या राखणे, वाढवणे गरजेचे होऊन बसते. आदिम काळात शिकार, आहार, आणि त्यासाठी भूमी, त्याचबरोबर पुनरुत्पादनासाठी पुन्हा स्त्री ही भूमीच, यांच्यासाठी टोळ्या लढत असत. संघर्षाचे हे आयाम जगण्याच्या मूलभूत गरजांशी जोडलेले होते. आज बहुसंख्येची आस नि अट्टाहास असणारे बिनगरजेच्या गोष्टींवरही संघर्ष उभे करतात, माणसांचे जिणे हराम करतात, त्यांचे जीवही घेतात. हे सारे फक्त ’भला तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ पातळीवरच्या उथळ असूयेनेच. बहुसंख्येची आस, त्यासाठी लटकी प्रतीके आणि त्यातून उभे राहणारे द्वेष, संघर्ष, हिंसेचे थैमान यातून प्रचंड भौतिक प्रगती केलेला आधुनिक मानव, समाजव्यवस्थेच्या आदिम काळी टोळ्यांत राहणार्‍यांपेक्षा खुजाच दिसू लागतो.

सुमारे साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध राष्ट्रवादी विचारवंत पु. ग. सहस्रबुद्धे यांनी ’नरोटीची उपासना’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. नरोटीची, म्हणजे करवंटीची उपयुक्तता आतील पौष्टीक असे खोबरे आणि चविष्ट पाण्याचे धारण करणारे आवरण अथवा भांडे म्हणूनच असते. जेव्हा श्रीफलाची पूजा करताना त्याला हळद-गंध वाहताना त्यांचा स्पर्श जरी नरोटीला होत असला तरी ती स्वत: पूजावस्तू नसते. तिच्या आतील जीवनरसाची ती पूजा असते. हे विसरुन केवळ ’नरोटीची पूजा करायची असते’ एवढे कर्मकांडच ध्यानात ठेवल्याने भारताचा अध:पात होतो आहे असे त्यांचे म्हणणे होते. याचप्रमाणे ती आयुष्याच्या केवळ उगमापाशी, तात्कालिक उपयोगाची वस्तू आहे हे ध्यानात न घेता, कालबाह्य झाल्यावरही ’लंगोटाची उपासना’ करणारे केवळ वयाने, शरीराने वाढूनही जाणीवेने अर्भकाच्याच पातळीवर राहतात असे म्हणायला हवे.

-oOo-

पूर्वप्रसिद्धी: ’अक्षरनामा’ २५ जानेवारी २०२१ 

रविवार, २४ जानेवारी, २०२१

शंख

तो...
महानगरातील मागासवस्तीत
दहा-बाय-दहाच्या खोलीत
आई-वडिलांसोबत राहणारा
एक तरुण.

आई-वडील...
सार्‍या आयुष्यात
वस्तीबाहेर न पडलेले
जगण्याचे वर्तुळ वस्तीतच
पुरे होणारे.

तो...
म्हणे, एक शंखवंशीय...
त्याच्या रिक्षावर त्याने
अभिमानाने लिहिलेले
’होय शंखच’...! 

तो...
त्यांच्या देशव्यापी संघटनेच्या
पायातील एक दगड
त्यावर उभे शंखनेत्यांचे
राजकीय इमले.

एकदा...
शाखाप्रमुखाचे प्रेरणादायी,
अंगारलिप्त विचार ऐकून
तो शिंपलावंशीयद्वेषाने
अती प्रदीप्त.

समोर...
चुकून शुद्धीत असलेला बाप!
हा शिंपलावंशीय निखंदून
काढण्याचे आपले स्वप्न
त्याच्यासमोर ओततो.

बाप हादरतो...
मग बोलता होतो. 'शेजारच्या-
शिंपलावंशीय जोडप्याचा
हा मुलगा.'

दंगलीत...
सजातीय जमावापासून 
त्या जोडप्याने या जोडप्याचे 
घर वाचवले.

पण पुढे...
हे दोघे वाचवू शकले नाहीत 
त्या जोडप्याला
सूडप्रेरित सजातीय 
झुंडीपासून

पण...
झोपडीत झोपलेल्या याला
कसाबसा वाचवून बाहेर काढला
नव्या जागी, नव्या नावाने
वाढवला.

डोळ्यासमोरील...
जीवनदात्यांच्या रक्ताचे सडे
विस्मृतीत ढकलण्यासाठी
बाप सदोदित बाटलीला
शरण.

याच्या डोक्यात...
आता विचाराचा भुंगा.
फळ बीजाचे की पोसणार्‍या
भूमीचे?

दुसर्‍याच दिवशी...
वस्तीतील नाल्याच्या कडेला
आई-वडिलांची कलेवरे
...याचा आवाजी(!) शोक.


मग...
आईवडिलांची हत्या
करणार्‍या शिंपलावंशीयांचा
सूड घेण्याचा त्याने केलेला
पण.

आता...
रिक्षावरील ’होय शंखच’
या शब्दांच्या फॉंट्चा
आकार दोनने(!)
वाढवलेला...

- रमताराम

- oOo -

रविवार, १७ जानेवारी, २०२१

चर्चा अजून संपलेली नाही...

चार वर्षांपूर्वी अमेरिकन सत्तांतराच्या वेळी लिहिलेली फेसबुकवर लिहिलेली पोस्ट. या आठवड्यात ट्रम्प पाय उतार होऊन बायडेन सत्तारुढ होत असताना पुन्हा एकवार वाचू.
--------------------

पोस्टः

या महिनाअखेर डेमोक्रॅटिक पार्टीचे ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन रिपब्लिकन ट्रम्प अधिकारारूढ होणार आहेत. या निमित्ताने गेल्या आठ वर्षातील ओबामांच्या कार्याचा लेखाजोखा आणि ट्रम्प यांच्याकडून अपेक्षा याबाबत भारतीय तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. त्याबाबत आपणही आपली मते तपासून पाहू.
---

प्रतिसाद १: मि. ओबामा आणि मि. ट्रम्प असे न लिहिता तुम्ही नुसतीच नावे लिहून आपला असंस्कृतपणा दाखवला आहे. ते दोघे काय तुमचे लंगोटीयार आहेत का?

प्रतिसाद २: दोघांच्या पक्षांची नावे लिहून तुम्ही नक्की काय सुचवत आहात.

प्रतिसाद ३: आपल्या देशातील घडामोडींबाबत काडीचा अभ्यास नाही आणि चालले अमेरिकेचा अभ्यास करायला.

प्रतिसाद ४. कुठलीही पोस्ट न चुकता मोदींकडे वळवून त्यांच्यावर टीका करायची तुम्हाला सवयच आहे.

प्रतिसाद ५/६/७: (एकाच व्यक्तीने हे तीन प्रतिसाद देऊन त्यात तीन वेगवेगळ्या इमोजी ऊर्फ भावचित्रे  चिकटवली आहेत.  कुठली तो तपशील फारसा महत्त्वाचा नाही.)

प्रतिसाद ८: हे सारं आजच का आठवलं?

प्रतिसाद ९: अमेरिकेला ट्रम्पसारखाच अध्यक्ष मिळायला हवा. तीच त्यांची लायकी आहे.

प्रतिसाद १०: आपल्या कारकीर्दीत त्या ओबामाने २ मिलियन का कितीतरी बॉम्ब टाकले म्हणे, त्याच्या जाण्याची कसली खंत करता.

उपप्रतिसादः २ बिलियन हो. (सोबत लिंक.)

प्रतिसाद ११: ट्रम्पच हवा अमेरिकेला तो पुतीनला बरोबर वठणीवर आणेल. वरवर मैत्री दाखवत असला तरी तो मनातून कट्टर रशिया आणि चीन विरोधी आहे.

उपप्रतिसादः तुमच्या कानात सांगितलं वाटतं येऊन. (भावचित्र)

प्रतिसाद १२: स्वतंत्र विदर्भ ही काळाची गरज आहे.

उपप्रतिसादः खरंतर मा.गो. म्हणाले तशी चार राज्यं करायला हवीत.

प्रतिसाद १३: तिकडे झारखंडमधे खाण खचून कित्येक लोक मेले ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही.

प्रतिसाद १४: बरोबर आहे, तो ओबामा काळा ना; तुम्ही आता खराखोटा डेटा जमवून त्याची कारकीर्द कशी सामान्य होती हे सिद्ध करणार असाल.

प्रतिसाद १५: अमेरिकेचा अध्यक्ष कोण होतो हे महत्त्वाचे नाही, पुढचे दशक भारताचे असेल.

प्रतिसाद १६: ट्रम्प हा नासाने ट्रायल घेण्यासाठी अध्यक्ष बनवलेला रोबो(ट) आहे. एक रोबोदेखील अमेरिकेचा अध्यक्ष बनू शकतो (इतके आमचे प्रशासन काटेकोरपणे बांधले आहे) अशी पैज सीआयएवाल्यांनी पुतीन यांच्याशी लावली होती. त्यानुसारच हे चालू आहे.

उपप्रतिसादः आपल्या देशात प्राचीन काळातच रोबोंचा शोध लागला होता.

उपप्रतिसाद २: आमच्याकडे एक रोबो आधीच पंतप्रधान आहे. खी: खी: खी:

उपप्रतिसाद ३: पप्पू अजून पंतप्रधान झालेला नाही, कधी होणारही नाही. स्वप्न बघू नका. हॅ हॅ हॅ.

प्रतिसाद १७: अमेरिकेची भलामण करताना तिथे अजूनही एखादा (रेड) इंडियन अध्यक्ष झालेला नाही हे विसरू नका.

उपप्रतिसाद : तिथे साधा इंडियनही अध्यक्ष झालेला नाही मि. एनाराय.

उपप्रतिसादः त्याचा इथे काय संबंध?

उपप्रतिसाद २: (भावचित्रे  ).

प्रतिसाद १८: गुड मॉर्निंग सर. (भावचित्रे  )

प्रतिसाद १९: भलत्या ठिकाणी गुड मॉर्निंग करणारा हा येडाय का?

...
---

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

समीक्षक

अमुकचे नवीन विनोदी पुस्तक आले...
तो म्हणाला...
’ह्यॅ: सगळा मध्यमवर्गीय कचरा.
यात सामाजिक खोली नाही.’

तमुकची सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली.
तो म्हणाला...
’ह्यॅ: संकुचित परिघात फिरते.
तिला वैश्विक परिमाण नाही.’

ढमुकचा नवा कथासंग्रह आला.
तो म्हणाला...
’ह्यॅ: उगाच आव आणणारे लेखन.
घाटाचा नीट अभ्यास नाही.’

मामलुकचा नवा कवितासंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: पोज घेऊन केलेले लेखन.
त्याला अनुभवसंपृक्ततेची जोड नाही.

चापलूसचा नवा चारोळीसंग्रह आला
तो म्हणाला...
’ह्यॅ: नुसत्या अनुभवाच्या रांगोळ्या.
त्याला वैचारिक बैठक नाही.’

पामुकची नवी कादंबरी आली.
पानेही न फाडता तो म्हणाला...
’ह्यॅ: आपल्याकडे कुणाला जमणार नाही.
कथानक असे खोल उतरले पाहिजे.’


आणि...

बटाट्याच्या चाळीतला म्हाळसाकांत पोंबुर्पेकर
आता ज्येष्ठ समीक्षक होऊन सरकारी
बिगरसरकारी पुरस्कार कमिट्यांतून
पुरस्कारासाठी लेखन निवडू लागला.

-oOo-

ता.क. :
सदर लेखनाची वर्गवारी 'खविटा’ हा रमताराम यांनी जगप्रसिद्ध केलेला लेखनप्रकार* आहे.  चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले, जोगकंस हा जोडराग नसून त्याला स्वतंत्र प्रकृती आहे म्हणत कुमारांनी जसे त्याला कौशी म्हटले तद्वत रमतारामांनी खवट कवितांना खविटा म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली... नासाने देखील त्यांची दखल घेतली आहे. युनेस्को पुढच्या वर्षीपासून जागतिक खविटा-स्पर्धा सुरू करणार आहे.

(*ह्यॅ: याला कविता म्हणता येणार नाही. याला मीटर, सेंटीमीटर काहीच नाही.’ असे प्रसिद्ध समीक्षक म्हाळसाकांत पोंबुर्पेकर म्हटल्यामुळे त्यांनी फक्त लेखनप्रकार म्हटले आहे, काव्यप्रकार नव्हे.)