![]() |
सामुराईच्या आत्म्याला आवाहन केले जात आहे |

![]() |
माझाशी लग्न कर- ताजोमारू स्त्रीला विनवतोय |

आता खुद्द सामुराईच हताश होऊन रडताना दिसतो. आपल्यासारख्या सामुराईचा य:कश्चित डाकूने केलेला पाडाव, आपल्या देखत आपल्या पत्नीची लुटली गेलेली अब्रू हे सगळे पुरेसे नाही म्हणून की काय आपली हत्या न करता जिवंत ठेवून अखेर जातानाही उपकार करून आणखी लज्जित करून गेलेला तो डाकू. ही सारी मानखंडना असह्य होऊन तो मुसमुसू लागतो. त्या दु:खावेगाच्या स्थितीतच खांदे पाडून तो चालू लागतो. एवढ्यात जमिनीत रुतलेला तो खंजीर त्याला दिसतो.


मृतात्म्याची साक्ष त्या स्त्रीप्रमाणेच त्याच्या स्वत:च्या नि त्याच्या स्त्रीशी ताजोमारूने केलेल्या संगाची घटना टाळून थेट त्यानंतरच्या घटना सांगते आहे. ’ते वृक्षातळी निवांत बसून बोलत होते’ तसेच ’ती यापूर्वी एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती’ या वाक्यातून आपली स्त्री ही ताजोमारूला वश झाल्याचे ठसवतो आहे. थोडक्यात अशा स्त्रीचे संरक्षण करण्यात अपयश आले तर त्याचा दोष एका पतिव्रता स्त्रीचे संरक्षण करण्यात आलेल्या अपयशापेक्षा गुणात्मकदृष्ट्या कमी लांच्छनास्पद आहे अशी पळवाट काढण्याचा त्याचा प्रयत्न असू शकतो. तसेच ताजोमारू आपली हत्या करण्याच्या मन:स्थितीत नसता तिनेच त्याला चिथावले असे सांगून तिच्या चारित्र्याबद्दल तो न्यायासनाचे मत अधिकच कलुषित करण्याचा प्रयत्न करतोय ही देखील या शक्यतेला दुजोरा देणारी गोष्ट म्हणता येईल. गंमत म्हणजे याचवेळी ताजोमारूचे चित्र मात्र त्याने जरासे धूसर रंगवले आहे नि त्याच्यावर कोणताच दोषारोप केलेला नाही. एकतर त्याला ताजोमारूने कसे बांधून घातले याबाबत त्याने साक्षीमधे काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे त्याचे बंदिवान होणे हे कपटाने झाले की शस्त्रबळात, बाहुबळात कमी पडल्याने याबाबत त्याने मौन पाळले आहे. शिवाय त्याने आपली दोरी सोडून आपल्याला मोकळे केले, ठार केले नाही असे सांगताना ताजोमारूला तो ही खुनाच्या आरोपातून एकप्रकारे मुक्तच करतो आहे. त्याचबरोबर आत्मगौरव धुळीस मिळाल्याने एका सामुराईच्या ब्रीदाला जागून आपण हाराकिरी केल्याचे सांगून - थोडा फार का होईना - स्वत:चा आत्मगौरव राखण्याचा प्रयत्न केला आहे.

हा मोठा गंमतीशीर भाग आहे. बहुधा कोणीही व्यक्ती गुन्ह्याचे पातक आपल्या शिरी येऊ नये म्हणून आटापिटा करेल. इथे उलट परिस्थिती दिसते आहे. हत्या तर एकच झाली आहे नि तिघेही आपणच ती केल्याचा दावा करत आहेत. प्रत्यक्षात सामुराईच मृत्यू कसा झाला हे त्या जंगलात त्या क्षणी असलेले हे तिघेच सांगू शकतात, परंतु तिघांचे दावे इतके परस्परविरोधी आहेत की एकाच वेळी ते खरे असणे शक्यच नाही. सामुराई आणि स्त्री ही हत्या खंजिराने झाल्याचे सांगत आहेत (फक्त कोणाच्या वाराने या बाबत त्यांचे मतभेद आहेत) पण घटनास्थळी असा खंजीर कुठेच आढळून येत नाही. सामुराईचे प्रेत सर्वप्रथम पाहणारा लाकूडतोड्याही असा खंजीर तिथे पाहिल्याचे साफ नाकारतो आहे. याउलट ताजोमारू मात्र ही हत्या तलवारीने झाल्याचा नि आपणच ती केल्याचा दावा करतो आहे. ताजोमारू नि सामुराईने हे पातक शिरावर घेणे आपण समजू शकतो. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून का होईना पण दोघांच्याही दृष्टिने ती आत्मगौरवाची बाब आहे. पण एरवी पूर्णपणे पराधीन नि अबला असणार्या त्या स्त्रीने - अप्रत्यक्षपणे का होईना - आपल्या पतीच्याच हत्येचे पातक आपल्या शिरी का घ्यावे हे थोडे अनाकलनीय आहे. जर खरोखरच तिच्या हातून आपल्या पतीची हत्या झालेली असेल तर कदाचित निश्चित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नि त्यानुसार कृती करण्याची मोकळीक तिच्या आयुष्यात तिला मिळाली नि तिचा तिने पुरेपूर वापर करून घेतला असे म्हणता येईल. आयुष्यभर वागवलेल्या परावलंबित्वापासून दूर होत एक स्वातंत्र्याचा क्षण आपण अनुभवला याचे समाधान कदाचित तिच्या मनात असेल नि त्यामुळेच तिने आपल्या साक्षीत त्या घटनेचा उल्लेख टाळला नसेल (दोषाची तीव्रता कमी करण्यासाठी हे अनवधानाने झाले ही मखलाशीही केली असेल.) पण हे झाले तिने खरोखरच ती हत्या केली असेल तर. जर मुळातच ही हत्या तिने केलेली नसेल तर? कुरोसावाने तिच्या साक्षीत बदल करून निर्णायकपणे 'माझ्या हातून झाली' हा मूळ कथेतला उल्लेख टाळून 'कदाचित माझ्या हातून झाली' असा तपशीलात केलेला बदल अतिशय समर्पक ठरतो तो या संदर्भात. जर तिच्या हातून सामुराई मेला नसेल नि खरोखरच त्याच्या बेशुद्धीत त्याचा मृत्यू झाला असेल तर तो मृत्यू ताजोमारूच्या हातून झालेला नाही (कारण तो आधीच निघून गेला हे ती सांगते) हे ती ठसवते आहे. एकतर तिच्या हातून अनवधानाने हा मृत्यू घडला, तिच्या असावध अवस्थेत सामुराईने हाराकिरी केली किंवा तिसर्याच कोणी बाजूला पडलेल्या खंजिराने त्याची हत्या केली या तीनच शक्यता ती न्यायासनासमोर ठेवते आहे. (हे सांगून झाल्यावर ती सांगते की आपण सावध झालो तेव्हा तो खंजीर माझ्या पतीच्या छातीत खुपसलेला होता. परंतु लाकूडतोड्याला अथवा नंतर पोचलेल्या पोलिसांना तो तिथे सापडत नाही.) ताजोमारूच्या हातून आपल्या पतीची हत्या झाल्याचे वास्तव स्वीकारले तर आपल्या पतीची समाजात होणारी मानखंडना टाळण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
कथा या पलिकडे जात नाही, इथेच थांबते. निवाडा करणे हे कथेचे काम नाहीच, सत्याची सापेक्षता नि व्यक्तिविशेषांची गुंफण हेच त्या कथेचे बलस्थान आहे. पण कथेबाबत हे ठीक आहे. १९५१ पर्यंत कथालेखन अथवा एकुणच साहित्य हा पुरेसा स्थिरस्थावर झालेला वाङ्मयप्रकार होता. त्यामुळे त्याचे वाचकही या अनवट रूपाला सरावले नसले तरी पूर्णत: नाकारण्याची शक्यता कमी होती. परंतु चित्रपट हे माध्यम तुलनेने नवे होते नि नावीन्याच्या अपेक्षांमधून पूर्णपणे बाहेर आलेले नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांसमोर असे संदिग्ध आणि निरास न झालेले कथानक मांडणे तुलनेने फारच अवघड होते. (आज ज्या स्वरूपात राशोमोन आपल्या समोर आहे त्या स्वरूपात देखील त्याला अनेक अडथळ्यांचा सामना करत उभे रहावे लागले आहे. ज्या स्टुडिओचा भाग म्हणून कुरोसावाने हा चित्रपट निर्माण केला त्यांनीही याबाबत फारसे उत्साही धोरण ठेवलेले नव्हते.) त्यामुळे चित्रपटकथेमधे थोडे सुलभीकरण गरजेचे होते, जेणेकरून हे सुटे धागे जोडून चित्रपटाला ’शेवट’ नाही तरी एक निश्चित ’अंत’ अथवा निरास देता यावा. इथे कुरोसावाने ’इन द ग्रोव्ह’ मधे अकुतागावाने शेवटच्या परिच्छेदात सोडून दिलेला एक सुटा धागा अचूक पकडला नि त्याचा सांधा त्या राशोमोन द्वारावरील पात्रांशी जोडून घेतला नि वरवर समांतर अवकाशात वावरणारे हे लोक मुख्य कथावस्तूमधे प्रवेश करतात.
ताजोमारू, सामुराई नि त्याची स्त्री यांच्या साक्षींनंतर असे वाटू शकते की जर हे तिघेच त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नि भागीदार असतील तर मग राशोमोन द्वारावर त्याबाबत चर्चा करणारे ते तिघे या चित्रपटात काय करताहेत. कारण मूळ घटनाक्रमामध्ये त्यांना काही स्थान नाहीच. जर राशोमोन द्वारावरील त्या तिघांचे प्रसंग पूर्णपणे वगळले तरीही ’इन द ग्रोव्ह’ स्वतंत्रपणे उभी राहतेच. मग या तिघांना चित्रपटा उभे करण्याचे प्रयोजन काय? इथे चित्रपटाचा नि वास्तव जीवनाचा सांधा कुठेतरी जोडून घेण्याचा प्रयत्न कुरोसावा करतो आहे. ’राशोमोन’ प्रकाशित झाला १९५१ मध्ये. त्याची निर्मिती त्या आधी काही काळ सुरू झाली असणार. हा सारा काळ जपान युद्धपश्चात होरपळ अनुभवत होता. माणसाच्या इतिहासातील सर्वात भीषण तांडव नि नृशंस नरसंहार जपानने नुकताच अनुभवला होता. त्यातून प्रचंड मनुष्यहाही, वित्तहानी तर झाली होतीच, पण मुख्य पडझड झाली होती ती माणसाच्या मनात खोलवर. जगण्यावरील त्यांचास विश्वास पूर्णपणे कोसळला होता. अनेक वर्षे कष्टाने फुलवत नेलेले जड नि जीवन एक माणूस विमानातून एक बॉम्ब टाकून क्षणार्धात नाहीसे करू शकतो ही जाणीव प्रत्येक जपानी माणसाला मुळापासून हादरवून टाकणारी होती, त्याच्या जगण्याच्या प्रेरणाच हिरावून घेणारी होती. असे घडू शकत असेल तर काही नवे निर्माण करावेच कशाला असा वैफल्यग्रस्त दृष्टिकोन समाजात मूळ धरू लागला होता. अशा बाह्य संकटांचा परिणाम म्हणून माणूस मानसिकदृष्ट्याही कमकुवत झालेला होता. अशा परिस्थितीत समाजाच्या उत्थानाला प्रेरक असे एकमेव बलस्थान उरले होते ते म्हणजे माणसाचा परस्परविश्वास. अशा सार्या विपदांच्या परिस्थितीत माणसे जेव्हा परस्पर-अविश्वास दाखवतात तेव्हा समाजाच्या हिताची चिंता करणारा नि पुस्तकी गृहितकांना घट्ट चिकटून जगणारा भिक्षूही त्याच्या गृहितकांबाबत शंका घेऊ लागतो.

द्वारावर त्याने बसवलेल्या तीन व्यक्ती तीन वेगवेगळे दृष्टिकोन घेऊन जगताहेत. (लेखमालेच्या दुसर्या भागात त्यांची ओळख करून देताना त्याबाबत थोडे लिहिले गेले आहेच.) भिक्षू हा तटस्थ, अक्रियाशील निरीक्षक आहे. असे असूनही तो समाजाच्या भले व्हावे अशी मनीषा असलेला आहे. माणूस मूलत: चांगलाच असतो निदान पूर्ण अविश्वास दाखवावा इतका वाईट नसतो असे गृहितक घेऊन जगणारा नि या गृहितकाला छेद देणारे काही सामोरे आले की अस्वस्थ होणारा असा आहे. लाकूडतोड्या हा भिक्षूची थोडी व्यवहारी आवृत्ती आहे. चांगुलपणावरचा त्याचा विश्वास, त्याबाबतचा आग्रह अजूनही टिकून आहे. परंतु असे असूनही तो पूर्णत: अक्रियाशील नाही. तो जाणीवपूर्वक कृती करतो पण त्याचबरोबर अपरिहार्यपणे येणार्या ’ती कृती योग्य की अयोग्य?’ या विचाराचे दडपण घेऊन जगतो आहे. इतरांचे प्रत्यक्ष नुकसान होत नसेल अथवा पकडले जाणार नसू तर लहान लहान स्वार्थ साधण्यासाठी एखादी एरवी अयोग्य वाटणारी कृतीही तो करतो आहे. पण पुरेसा निर्ढावलेला नसल्याने त्याचा अपराधगंड देखील शिरी वागवतो आहे. तिसरा माणूस हा पूर्णपणे तुच्छतावादी (हिरोशिमा-पश्चात जपानी माणसाची वाटचाल ज्या दिशेने होऊ शकली असती अथवा ज्याची चिन्हे कदाचित कुरोसावाला दिसू लागली होती). न्याय-अन्याय, पाप-पुण्य या संकल्पनांना त्याने पूर्ण तिलांजली दिलेली आहे. उगवला दिवस भागवण्यासाठी जे शक्य असेल ते करावे अशी त्याची धारणा आहे. जगातील स्वत:सोडून उरलेल्या स्थिरचराशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. अशा तर्हेने हे तिघे प्रवृत्तीच्या तीन वेग-वेगळ्या पातळ्यांवर जगत आहेत. अशीच काहीशी ट्रिनिटी ताजोमारू, सामुराई नि ती स्त्री यांच्याबाबत दिसून येते. राशोमोनद्वारावरच्या तिघांना तीन प्रवृत्तींची उदाहरणे म्हणून कुरोसावा उभा करत असेल तर हे तिघे त्यांच्या सामाजिक स्थानाच्या वेग-वेगळ्या पातळीवर उभे असलेले दिसून येतात.
(क्रमश:)
<< मागील भाग पुढील भाग >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा