रविवार, ५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०६ - कोरोनाचा क्रूसेडर: ली वेनलियांग

नैतिक तंत्रभेदी : सॅमी कामकार << मागील भाग
---

LiWenLiang

मागील वर्षाच्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातील एका रुग्णालयात फ्लू अथवा सामान्य तापावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या प्रकृतीला बराच काळ उतार पडताना दिसत नव्हता. एरवी एक-दोन आठवड्यात बरा होणारा आजार दीर्घकाळ हटेना, तेव्हा त्याच्या घशातील स्रावाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आरोग्य सेवेच्या संचालिका असलेल्या डॉ. अई फेन यांच्या नजरेस पडला.

या रिपोर्टमध्ये ’सार्स कोरोनाव्हायरस’ ची शक्यता अधोरेखित करण्यात आली होती. २००२ ते २००४ या दोन वर्षांत जगात धुमाकूळ घालून घेलेल्या आणि सुमारे आठशे बळी घेतलेल्या आजाराचे नाव पाहून अई यांनी सार्स (Severe Acute Respratory Syndrome) या शब्दाला अधोरेखित करुन वुहानमधील एका अन्य रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांकडे पाठवला. त्याच्याकरवी तो वुहानमधील वैद्यकीय वर्तुळात फिरला आणि वुहान मध्यवर्ती रुग्णालयातील नेत्रविशारद असलेल्या ’डॉ. ली वेनलियांग’ यांच्यापर्यंत पोचला.

त्यात सार्सचा उल्लेख वाचून त्यांनी त्याकडे बारकाईने लक्ष देण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास त्यांनी आपल्या वैद्यकीय वर्गमित्रांच्या एका चॅट ग्रुपमध्ये ’वुहान सी-फूड मार्केट’मधून सार्सच्या सात जणांना सार्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे लिहिले. सोबत त्या पेशंट्सच्या सीटी-स्कॅन आणि टेस्ट रिपोर्ट्सही पोस्ट केले. तासाभरातच त्यांनी या सर्वाना ’कोरोनाव्हायरस’ गटातील विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु नेमका कोणता विषाणू (नव्यानेच सापडल्याने याला ’novel coronavirus’ असे पुढे म्हटले गेले) हे अद्याप समजलेले नसल्याची माहितीही दिली. त्याचबरोबर आपल्या या चॅटग्रुपमधील सर्वांनी आपली नि आपल्या कुटुंबियांची या विषाणूजन्य आजारापासून काळजी घेण्याचे आवाहनही केले/सुचवले.

चॅटमधील या संवादाच्या आधारे या गटाबाहेरही ही बातमी पसरली. ३ जानेवारीला सायबर सुरक्षा विभागाने याची दखल घेऊन ली यांना ताबडतोब चौकशीसाठी बोलावले. त्यांना चुकीची माहिती पसरवल्याबद्दल सक्त ताकीद देण्यात आली आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही अशी लेखी हमी त्यांच्याकडून घेण्यात आली.

त्यासुमारास ली यांच्यासह सुमारे आठ 'अफवाखोरांना' वुहान पोलिसांनी ताकीद दिली होती. ली यांची पोलिसांनी केलेली चौकशी आणि केलेली कारवाई याबद्दल माहिती CCTV या शासनअंकित चॅनेलवरुन साग्रसंगीत दाखवण्यात आली. थोडक्यात चिनी समाजमाध्यमांनी ली यांची गोष्ट उगाळली ती एक ’अफवाखोर’ म्हणून.

४ फेब्रुवारीला चीनमधील सुप्रीम कोर्टाने या आठ जणांनी प्रसिद्ध केलेली माहिती सर्वस्वी चुकीची नसल्याचे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई चुकीची असल्याचे जाहीर केले. कोर्टाने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या आपल्या अधिकृत पोस्टमध्ये असे म्हटले होते की, ’सर्वांनी या ’अफवां’वर विश्वास ठेवून काळजी घ्यायला सुरुवात केली असती, मास्क वापरले असते, जंतुनाशक द्रावणांचा वापर सुरु केला असता आणि प्राणिजन्य खाद्यपदार्थांपासून दूर राहणे पसंत केले असते तर फार बरे झाले असते.’

पुढे ’कायझिन’ या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ली म्हणाले, ’वैद्यकीय अफवा पसरवल्याबद्दल माझ्या रुग्णालयाकडून माझ्यावर कडक कारवाई होईल अशी मला भीती वाटत होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या पोस्टने मला दिलासा मिळाला आहे. माझ्या मते एखाद्या व्यवस्थेमध्ये एकाहुन अधिक, पर्यायी मते अस्तित्वात असणॆ हे त्या व्यवस्थेच्या निरोगीपणाचे लक्षण आहे. व्यवस्थेला जनतेने दिलेल्या अधिकाराचा अशा तर्‍हेने पर्यायांचे दमन करण्यासाठी केलेला वापर मला अजिबात मान्य नाही.’

८ जानेवारी रोजी एका मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान ली यांना कोविड-१९ विषाणूची लागण झाली. ली यांनी शस्त्रक्रिया केलेला हा रुग्ण वुहानमधील एका सीफूड घाऊक विक्रेत्याकडे स्टोअरकीपर म्हणून काम करत होतो. त्याच्यामार्फत या विषाणूचा ली यांना मिळाला. एरवी ली यांच्यासारख्या तरुणांमध्ये विषाणूची लक्षणे दिसण्यास सुमारे दोन आठवड्याचा कालावधी लागतो. पण दोनच दिवसांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. बारा जानेवारी रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.

या उपचारांदरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांनी आपला पोलिस चौकशीचा अनुभव आणि त्यांच्याकडून लिहून घेतलेल्या हमीपत्राची प्रत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. ही त्यांची पोस्ट प्रचंड प्रमाणात वाचली गेली आणि अनेक इतर माध्यमांतूनही फिरली. अशा तर्‍हेने एखाद्या धोक्याची पूर्वसूचना देणार्‍या वैद्यकीय तज्ज्ञांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रशासनाच्या अशा प्रयत्नांबद्दल अनेकांनी जाहीर रोष व्यक्त केला.

२३ जानेवारी, म्हणजे ली यांनी धोक्याचा इशारा दिल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनी वुहान प्रांतात लॉकडाऊन अर्थात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली. पण तोवर या नव्या कोरोनाव्हायरसने हुबेई प्रांतात पंचवीस जणांचा बळी घेतला होता आणि जवळजवळ आठशे जणांना त्याची बाधा झालेली होती. आज तीस मार्च रोजी जगभरात सुमारे सदतीस हजार लोकांना या विषाणूने आपल्या दाढेखाली चिरडले आहे, अजून सुमारे सात लाख लोक या धोक्याशी दोन हात करत आहेत. ली यांनी दिलेला धोक्याचा इशारा वुहान प्रशासनाने कानाआड केल्याची शिक्षा आज इतके लोक भोगत आहेत, आणखी अनेकांना भोगावी लागणार आहे.

६ फेब्रुवारी रोजी, म्हणजे सुमारे तीन आठवड्यांच्या संघर्षानंतर कोविड-१९ ने घेतलेल्या सहाशेहून अधिक मृतांच्या यादीत त्यांचेही नाव नोंदले गेले.

HomageToLi

ली यांच्या मृत्यूनंतर शासनाने आणि कम्युनिस्ट पार्टीने त्याला दिलेली ताकीद मागे घेऊन त्याच्या कुटुंबियांची माफी मागितली. पण ली यांच्या मृत्यूनंतर चीनमध्ये बराच रोष आणि संताप उसळला. #wewantfreedomofspeech हा या हॅशटॅगसह अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. तब्बल वीस लाख जणांनी आपले मत व्यक्त केले. हजारो जणांनी स्वतंत्रपणॆ पोस्ट लिहून यावर आपले म्हणणे मांडले... पण पाचच तासांत शासकीय नियामक यंत्रणांनी ते सारे पुसून टाकले!

अशा व्यापक साथीच्या शक्यतेबद्दल सावध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अई फेन यांनाही शासकीय आरोग्य यंत्रणेतील त्यांच्या वरिष्ठांकडून ताकीद मिळाल्याचा आरोप त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला. ही मुलाखत चीनच्या समाजमाध्यमांतून अनेक नागरिकांनी पोस्ट करावी आणि शासकीय नियंत्रकांनी ती उडवून टाकावी असा उंदरा-मांजराचा खेळ बरेच दिवस चालू राहिला. शासकीय यंत्रणांच्या संगणकीय नजरेस ती पडू नये म्हणून स्पेलिंग चुकवणे, पोस्ट ऐवजी तिचा फोटो चिकटवणॆ, जुन्या तारायंत्राच्या मोर्स कोडचा वापर करणे, प्रचलित आधुनिक लिपीऐवजी जुन्या लिपीचा वापर करणे, रोमन लिपीमधून लिहिणे अशा अनेक क्लृप्त्या लढवत सोशल माध्यमांतून या मुलाखतीचा दस्त ऐवज समाजमाध्यमांतून हजारो लोकांपर्यंत पोचवण्यात आला. समाजमाध्यमे सत्ताधार्‍यांची प्रॉपगंडा पसरवण्याची माध्यमे होऊ शकतात तशीच ती दडपशाहीविरोधातील हत्यारेही होऊ शकतात हे जागरुक चिनी नागरिकांनी दाखवून दिले... पण लगेचच ली यांच्या नावाने पारंपरिक चहा हा कोरोनाचा यशस्वी मुकाबला करु शकतो ही अफवाही याच माध्यमांतून वेगाने पसरवली गेली.

ली यांच्या मृत्यूनंतर ते काम करत असलेल्या वुहान मध्यवर्ती रुग्णालयासमोर ’I blew a whistle for Wuhan tonight' म्हणत वुहानमधील अनेक नागरिक एकत्र आले. सर्वांनी आपल्या घरातील दिवे पाच मिनिटे बंद ठेवून नंतर सामूहिक शिटीवादनानेच या व्हिसलब्लोअरला आपली श्रद्धांजली अर्पण केली.

-oOo-

ता.क.
चीनच्या ’सुप्रीम कोर्टाने जरी ’अफवेवर विश्वास ठेवायला हवा होता’ असे म्हटले असले तरी तो अफवा हा शब्द अवतरणचिन्हांत आहे. याचा अर्थ ’अफवा म्हटला गेलेला’ असा घ्यायला हवा. दुसरे असे की खुद्द ली हे स्वत: व्यवसायाने डॉक्टर होते. त्याविषयांतले तज्ज्ञ होते. तेव्हा कुणीही पाठवलेल्या माहितीवर विश्वास ठेवायला हवा असे समर्थन याच्या आधारे करता येऊ नये म्हणून हा खुलासा.

---

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक ५ एप्रिल २०२०)

    पुढील भाग >> ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर


संबंधित लेखन

1 टिप्पणी: