शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

-: व्यवस्थांची वर्तुळे :-

आपल्या देशात 'धर्म मोठा की देश? ' हा मिलियन डॉलर नव्हे, बिलियन-ट्रिलियन डॉलर प्रश्न आहे. समाजातील काही गट हा प्रश्न आपल्या विरोधकांना वारंवार विचारत असतात कारण तो त्यांना अडचणीचा असतो, निरुत्तर करणारा असा यांचा समज असतो. पण जे हा प्रश्न विचारतात त्यांना स्वतःलाही अनेकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा अडचणीच्या वेळी ते हमखास 'त्यांनी तसे मान्य केले तर आम्ही मान्य करू' असे म्हणत आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात. पण याचाच एक अर्थ असा की आपल्या नि 'त्यांच्या' कृतीत गुणात्मकदृष्ट्या काहीही फरक नाही याची कबुलीच देत असतात!

दोनही बाजूंनी एकमेकांच्या आड लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काहीवेळा श्रद्धा, काहीवेळा कुटुंब, काहीवेळा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या (देश माझा, देशातील नागरिक माझे, इतर देशाच्या नागरिकांपेक्षा अधिक जवळचे; हाच नियम देशांतर्गत राज्यांच्या बाबत लावला जाऊ शकतो आणि भाषिक गटांबद्दलही!) गटांना प्राधान्य दिले जाते हे वास्तव नाकारता येत नाहीच. आणि यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.

मुळात 'धर्मापेक्षा देशाचा कायदा मोठा' हे नक्की कुणी ठरवले? बहुमताने ठरवले की फतव्याने? बहुमताने ठरवले असेल तर ते माझ्या देशात केव्हा घेतले गेले? की सार्‍याच देशांबाबत हे खरे आहे, थोडक्यात हे वैश्विक सत्य आहे काय? बरं समजा असा काही वस्तुनिष्ठ अभ्यास झालेला नाही पण हा अध्याहृत असा सार्वकालिक, सर्वसमावेशक नियम असेल, तर असे बंधन माझ्यावर घालणार्‍या व्यवस्थेने 'अधिकार-कर्तव्याच्या माध्यमांतून माझ्यावर नियंत्रण ठेवणार्‍या अन्य व्यवस्थांचे अधिकार कमी आहेत' हे त्यांच्या संमतीशिवाय एकतर्फीच कसे काय जाहीर केले? आणि समजा असे एकतर्फी जाहीर करणे अन्य व्यवस्थांनी अमान्य केले आणि त्यांनीही तसेच - उदा. 'देशापेक्षा धर्म श्रेष्ठ' हेच बरोबर आहे - जाहीर केले आणि मी त्यानुसारच वर्तन केले पाहिजे असे बंधन माझ्यावर घातले तर एकाच वेळी दोन्ही व्यवस्थांचा सभासद असणार्‍या मी यापैकी नक्की कुठल्या व्यवस्थेचे म्हणणे मान्य करायचे?

SytemIntersection

मी या भूमीवर जन्माला आलो तेव्हाच मी १. माझे कुटुंब, २. माझी जात/पंथ ३. माझा धर्म, ४. माझा निवास वा अन्य परिसर ५. माझा देश इ. इ. अनेक व्यवस्थांचा भाग म्हणून उभा असतो. इतकेच नव्हे तर जसजसा वयाने वाढत जातो तसतसे आणखी काही व्यवस्थांचा भाग होत जातो. (या पलिकडे 'नैतिकता', 'संस्कृती' यांसारख्या धूसर सीमारेषा असलेल्या काही व्यवस्था माझ्यावर प्रभाव पाडत असतातच.) लोकशाही ही अशी एक व्यवस्था आहे जी कोणत्याही जमिनीच्या तुकड्याशी निगडित नाही, तसाच धर्मही. राजकीय न्यायव्यवस्था ही बहुधा भौगोलिकदृष्ट्य सलगता अथवा देश किंवा राष्ट्र या संकल्पनेशी बांधील व्यवस्था असते.

एका जमिनीच्या तुकड्यावर या व्यवस्था एकाचवेळी नांदत असतात. त्यांच्या वर्तुळाचे परस्परांना छेद जात सामायिक प्रभावक्षेत्रे निर्माण होत असतात. दोन किंवा त्याहुन अधिक व्यवस्थांच्या सामायिक अवकाशात असणार्‍या व्यक्तिंना त्या सर्व वर्तुळांचे नीतिनियम पाळावे लागतात. प्रत्येक व्यवस्था आपापले नीतिनियम घेऊन उभी आहे. त्या त्या व्यवस्थेने मला अधिकार आणि कर्तव्ये नेमून दिली आहेत. आता या विविध व्यवस्थांचे प्रभावक्षेत्र सामायिक असल्याने त्यांच्या अधिकार-प्राधान्यांचा छेद जाणार आहे. आणि म्हणूनच त्या त्या कर्तव्यांना पार पाडत असताना जेव्हा दोन व्यवस्थांना अपेक्षित कृती वा कर्तव्ये परस्परविरोधी असतात तेव्हा मला त्यापैकी एकच निवडताना अन्य व्यवस्थांच्या नीतिनियमांचे उल्लंघन करावे लागतेच.

अमक्या अभिनेत्याने वा उद्योगपतीने बेफाम गाडी चालवून अपघात केलेल्या आपल्या मुलाला वा मुलीला कसे वाचवले याबद्दलचे गॉसिप बरेचदा चर्चिले जाते. त्या प्रसंगी ती व्यक्ती कौटुंबिक हित की सार्वजनिक हित यात कौटुंबिक हिताला - त्या व्यवस्थेला - प्राधान्य देत असते. हाच प्रश्न त्या अभिनेत्याऐवजी 'धर्मापेक्षा देश मोठा'चा उद्घोष करणार्‍या एखाद्या माणसासमोर त्याच्याच मुला/मुलीसंदर्भात उभा ठाकला, तर त्याची कृती काय असेल याचा विचार करुन पहायला हरकत नसावी. जाहीरपणे काहीही म्हणत असला तरी त्याची प्रत्यक्ष कृती मुलाला वाचवण्याचीच असणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग अशावेळी 'देशाचा कायदा सर्वांत श्रेष्ठ' वगैरे सोयीस्करपणे विसरावे लागते.

एकाच वेळी एकाहुन अधिक व्यवस्थांच्या प्रभावक्षेत्रात असलेल्या व्यक्तींबाबत निर्माण होणारी प्राधान्याची समस्या जशी असते तशीच या व्यवस्थांच्या थेट वर्चस्व-संघर्षाचीही. संसदीय लोकशाही ही या देशाने स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि तिला केवळ छेद देणारीच नव्हे तर उलथून टाकू पाहणारी नक्षलवाद्यांची पर्यायी 'व्यवस्था' आपण मान्य करत नाही! भौगोलिक, राजकीय लोकशाहीचे कायदे नाकारणारा आणि हिंसाचाराला सत्ता राबवण्याचे वैध हत्यार मानणारा नक्षलवाद हा त्या कारणासाठी 'राष्ट्रद्रोही' असला तरी त्यांनाही त्यांची अशी 'व्यवस्था' रुजवायची आहे. अनेकदा धार्मिक व्यवस्थादेखील लोकशाहीचे वा राजकीय व्यवस्थेचे नियम नाकारते नि संघर्ष करते. आपल्या धर्मग्रंथात अमुक गुन्ह्याची हत्या करणे वैध आहे असे धार्मिक संघटनांचे ठेकेदार बिनदिक्कत जाहीर करतात नि अप्रत्यक्षपणे देशाचा कायदा दुय्यम असल्याचेच सूचित करत असतात.

'धर्मापेक्षा देश मोठा' या मुद्द्याला जोडूनच एक विधान हटकून वाचायला मिळते, "आपण भारतीय नागरिकत्वाचे फायदे घेत असल्यास 'धर्मापेक्षा देश मोठा'मान्य करायलाच हवे, नाहीतर नागरिकत्व सोडून द्यावे (अर्थः बहुधा देशांतर करावे असा असावा)." याच न्यायाने उद्या धर्मसंस्थेनेही फतवा काढला 'धर्मगटात असल्याचे फायदे घेता ना, मग आता 'देशापेक्षा धर्म मोठा' मानलेच पाहिजे. नाहीतर धर्मांतर करा' किंवा कुटुंबप्रमुख असलेल्या माझ्या वडिलांनी तंबी दिली की 'लहानपणापासून कुटुंबात असल्याचे फायदे उपटलेस ना आता देशापेक्षा बापाला मोठे मानले पाहिजेस. नाहीतर चालता हो माझ्या घरातून' किंवा हिंदी सिनेमात म्हणतात तसे 'तू मला मेलास नि मी तुला मेलो' तर आफतच व्हायची की. माझ्या कुटुंबाचा, समाजाचा, धर्माचा, मित्रपरिवाराचा भाग म्हणूनही काही फायदे, काही अधिकार मिळवत असतोच की.

आपल्या देशाने निवडलेली संसदीय लोकशाही ही केवळ आपली निवड आहे इतकेच. शेवटी व्यवस्था कोणती हवी वा जिथे एकाहुन अधिक व्यवस्था असतात तिथे प्राधान्य कुठल्या व्यवस्थेला द्यावे हा आपला निर्णय असतो. आता 'आपला' म्हणजे कुणाचा; सत्ताधार्‍यांचा, विरोधकांचा, सर्वसामान्य माणसाचा, दंडव्यवस्थेचा अभ्यास करून न्यायव्यवस्थेमधे निवाडा करण्याचे हक्क मिळवणार्‍यांचा की आणखी कुणाचा? पुन्हा ही सारी वेगवेगळी माणसे आहेत, आणि त्यांचा प्रत्येकाचा आपापला निर्णय असतोच. तो एकच असेल याची मुळीच खात्री देता येत नाही. आणि दोन भिन्न व्यक्ती परस्परविरोधी किंवा विसंगत प्राधान्यक्रम ठरवतात तेव्हा त्यांना मतभेदाला, क्वचित संघर्षाला सामोरे जावे लागते. विशिष्ट परिस्थितीत एखाद्याने एका व्यवस्थेला अनुकूल निर्णय घेतला याचा अर्थ त्याने बाकीच्या सार्‍या व्यवस्था नाकारल्या वा दुय्यम ठरवल्या असा होत नसतो. तरीदेखील तसा ग्रह करून घेऊन संघर्ष उभे राहतात, मग तो 'देश की धर्म' असो की 'कुटुंब की देशाचा कायदा' असा असो.

व्यवस्थांची ही वर्तुळे अर्थातच समकेंद्री नसतात किंवा समान त्रिज्येचीही! खरंतर ही वर्तुळेही नसतात. परिघावरचे काही बिंदू हे केंद्रापासून अधिक दूर असू शकतात! किंवा असं म्हणू या की वर्तुळांपेक्षाही ही व्यवस्थांची 'वेटोळी' अधिक आहेत. ती परस्परांत इतकी गुंतली आहेत की त्यांना परस्परांपासून वेगळे काढून तपासणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठतेची निश्चित उतरंड दाखवता येत नाही. आणि त्या त्या प्रसंगी संबंधित व्यक्तीच त्यांच्या प्राधान्याचे निर्णय घेणार असेल तर यात प्रचंड सापेक्षता तर आहेच पण त्यांचे निर्णय कालातीत नसण्याने अधिकच गोंधळाची परिस्थितीही उद्भवू शकते. या पेचप्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून 'धर्मापेक्षा देश श्रेष्ठ' अशा उद्घोषणा करत वास्तवात मात्र परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम बदलत बहुतेक लोक जगताना दिसतात. पण या दांभिकपणातूनही वर उल्लेख केलेले दोन दोष नाहीसे होत नाहीतच.

तेव्हा कदाचित या सर्व व्यवस्थांची उतरंड निश्चित करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा व्यवस्थांच्या हितसंबंधांचा असा छेद जाईल तेव्हा संबंधित व्यक्तींना निर्णय घेण्यास मदत करतील असे वस्तुनिष्ठ निकष आगाऊच ठरवून देणे कदाचित अधिक सयुक्तिक ठरू शकेल. यातून निवड करत गेल्याने ती व्यक्ती त्यातील कोणत्याही एका व्यवस्थेला धार्जिणी असण्याची गरज वा शक्यता उरणार नाही, तसा आरोप तिच्यावर करता येणार नाही. त्याचबरोबर यात नव्या व्यवस्थांना सामावून घेण्याची आणि जुन्या काही वगळण्याची प्रक्रियादेखील - कदाचित - सोपी होऊन जाईल. यातून होणारा दुसरा फायदा असा की खरोखरच त्यातील एखादी व्यवस्था दुसरीपेक्षा बहुतेक वेळा श्रेष्ठ असेलच तर वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तिची निवड वारंवार होत राहील नि अन्य दुय्यम व्यवस्था साहजिकच मागे पडत जाईल, तिच्याविरोधात कोणताही नकारात्मक विद्रोह करण्याची आवश्यकताच उरणार नाही.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः 'पुरोगामी जनगर्जना' डिसेंबर २०१५)

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

आभासी विश्व आणि हिंसा

ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा 'आभासी विश्व' असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. नव्वदीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या 'वर्ल्ड वाईड वेब' या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले. या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले "माध्यम" दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे "विश्व"च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्‍या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे तर हे नवे 'विश्व' माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे.

या नव्या माध्यमाने अनेक नव्या शक्यतांचे एक दालन उघडून दिले आहे. एकाच वेळी दोनही व्यक्तींना दोन टोकाला उपस्थित असण्याचे टेलिफोनचे बंधन मोडीत काढत 'ईमेल'ने asynchronous किंवा भिन्न स्थलकालातील व्यक्तींना संवादाचे माध्यम उपलब्ध करून दिले; लिखित संवादाचे माध्यम असलेल्या पत्रव्यवहारातील माध्यमाने - पत्रानेच - प्रवास बंधन नाहीसे करत 'चॅट'ने संगणकाच्या माध्यमातून संवादाची थेट नि synchronous सोय करून दिली; 'डेटाबेस'च्या संकल्पनेने प्रचंड माहिती साठवून ठेवण्याची आणि त्याच्या सहजपणे प्रती करण्याची झालेली सोय इंटरनेटच्या माध्यमातून जुनी क्षितीजे सहज पार करून गेली; बँकेचे व्यवहार, खरेदी-विक्री, बातम्या व माहिती, ज्ञान, पुस्तके, संगीत, चित्रपट, अन्य दृक्-श्राव्य कला यांना इंटरनेटने आपल्या कवेत घेतले आणि पाहता पाहता आपल्या गरजांपासून करमणुकीपर्यंत सारे काही आता इंटरनेटच्या ताब्यात गेले. ही प्रगती माणसाच्या उत्क्रांतीइतकीच उत्कंठावर्धक पण त्याहून कैकपट वेगाने घडलेली. १९८९ मधे प्रथम इंटरनेटची संकल्पना मांडली गेली आणि आज जेमतेम पंचवीस वर्षातच हे माणसाच्या जगण्याचा अविभाज्य होऊन बसले आहे.

एका बाजूने माध्यम म्हणून असे विकसित होत असतानाच इंटरनेटवर एक नवे 'विश्व' आकाराला येऊ लागले होते. वास्तवातील एखाद्या व्यक्तीची या नव्या जगातील 'ईमेल' ही पहिली ओळख किंवा प्रतिनिधी. आभासी विश्वातले ते अस्तित्वच. त्या जगातला संवाद होणार तो एका ईमेल अड्रेसचा दुसर्‍या ईमेल अड्रेसशी, माणसाचा माणसाशी नव्हे. कारण त्या जगात माणसे नाहीतच. पण स्वतःचे दोन किंवा त्याहून अधिक ईमेल अड्रेस निर्माण करणे किंवा एकच ईमेल अड्रेस एकाहुन अधिक व्यक्तींनी वापरणेही शक्य आहे. त्यामुळे या नव्या जगातील 'व्यक्तीं'चा वास्तव जगातील व्यक्तींशी एकास एक संबंध नाही.

पण हा चेहराविहीन संवाद, देहबोलीच्या अभावामुळे परिणामकारक होईना. शिवाय दोन व्यक्ती - किंवा खरंतर ईमेल अड्रेसेस - आपले म्हणणे, मुद्दे वेगवेगळ्या वेळेला मांडत असल्याने यात कालापव्ययदेखील होतो. त्यामुळे जरी व्यावसायिक पातळीवरच्या देवाणघेवाणीसाठी ते उपयुक्त ठरले तरी भावनिक संवादांसाठी ते पुरेसे ठरेना. मग 'चॅट'चा पर्याय देऊन इंटरनेटच्या जगात एकाच वेळी दोन बाजूने संवाद साधण्याची सोय केली गेली. यथावकाश वीडिओ चॅटचा पर्याय उपलब्ध होऊन देहबोलीसह संवादाची शक्यता वास्तवात आली. हजारो किमी दूरवर असलेल्या दोन व्यक्ती आता जणू समोरासमोर बसून बोलत असल्याइतक्या सहज संवाद साधू लागल्या.

पण असे असले तरी माणूस म्हणजे काही फक्त संवादाचे अस्तित्व नव्हे. अन्य प्राणिमात्रांपासून माणूस वेगळा आहे तो त्याने विकसित केलेल्या निर्मिती कौशल्यामुळे. मग या नव्या जगात माणसांना निर्मितीची आस लागली. विविध गेम्सच्या स्वरूपात संगणकावर तो आपली हौस भागवून घेत होता ती त्याने इंटरनेटच्या माध्यमातही आणली. 'फार्मविल' सारखे खेळ तुम्हाला आभासी जगात शेतीसारखे 'खेळ' देऊ लागले. 'रायजिंग सिटीज्' सारखा खेळ तुम्हाला तुमची शहरे निर्माण करण्याची संधी देऊ लागली. या खेळांची साधने, त्यावर परिणाम करणारे घटक, वास्तव जगासारखाच 'व्यक्तीं'मधे तिथेही होणारा वस्तू आणि चलनाचा विनिमय इ. गोष्टी हळूहळू विकसित होत जणू विश्वामित्राची प्रतिसृष्टीच तिथे निर्माण झाली.  'अवतार' चित्रपटातील पांगळा जेक वेगळ्या सृष्टीत नवे नाव, नवे शरीर, नवे अस्तित्व घेऊन उभा राहतो. तथाकथित वास्तव जगात व्हीलचेअरच्या सहाय्याने खुरडत जगणारा तो 'पँडोरा'च्या विश्वात थेट आकाशभ्रमण करतो. त्याच धर्तीवर फेसबुक, ट्विटर वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपल्याला हवी तशी ओळख निर्माण करणे शक्य झाले आहे.

"अचानक ही दोन विश्वे वेगळी झाली, संगणकांचे जाळे 'स्वतंत्र' झाले आणि त्यांनी माणसांशी संबंध तोडून टाकले तर..." ही विज्ञानकथांमधे मधे येणारी कल्पना जर वास्तवात उतरली तर आपले वास्तव जग चक्क गतिरूद्ध होऊन बसेल इतके आपले तथाकथित वास्तव आता या आभासी जगावर अवलंबून आहे. संगणक माणसाविरुद्ध बंड करतील ही जरी कविकल्पना असली तरी माणसे माणसाविरुद्ध बंड करत आलेली आहेत. त्यासाठी त्यांनी सतत नवनवी हत्यारे, युद्धासाठी नवनवी भूमी शोधली आहे. फसवणूक, चोरी, हल्ला, हत्या, लढाया, युद्ध या वास्तव जगातल्या गुन्ह्यांना आभासी जगाचे नवे परिमाण दिले आहे. अर्थात माणसे थेट इथवर पोचलेली नाहीत. ईमेल पासून सुरू झालेला प्रवास सोशल माध्यमांतून व्यक्तिमत्त्व तयार करण्यापर्यंत वास्तवाची नक्कल करण्यापर्यंत पोचला आहे तसाच आभासी जगातल्या माणसांच्या संघर्षाचा इतिहासही टप्प्याटप्प्यानेच पुढे सरकला आहे. माणसाने अंतराळात झेप घेतली आणि ज्ञानाचे नवे क्षितीज माणसाने पादाक्रांत केले. पण याच प्रगतीच्या ठेकेदारांनाच ताबडतोब त्या ज्ञानाचा विध्वंसासाठी, इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी उपयोग करता येईल याचा शोध लागला आणि 'स्टार वॉर्स' या कल्पनेचा जन्म झाला. (आपल्या सुदैवाने काही काळाने शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि त्यावर होणार्‍या खर्चाच्या अव्यवहार्यतेमुळे ही नृशंस कल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही.) इंटरनेटच्या जगातही हिंसा नवनव्या रूपात सामोरी येताना दिसते.

व्हायरस हा प्रकार संगणकाचे, नेटवर्कचे नुकसान करणारा पहिला धोका. सुरुवातीच्या काळातील असे व्हायरस हे फक्त वैयक्तिक संगणकांत साठवलेली माहिती पुसून टाकणे, त्याचे काम करण्याचे तंत्र बिघडवणे असे केवळ खोडसाळ म्हणता येतील अशी कामे करत. परंतु इंटरनेटच्या शोधानंतर त्या संगणकांवरची माहिती चोरून नेण्याचे तंत्र विकसित केले गेले. इंटरनेटच्या माध्यमातून त्यावरची माहिती आपल्या संगणकाकडे वळवणे शक्य झाले होते. यातून त्या व्यक्तीच्या संगणकाबद्दलची माहिती चोरून नेणे शक्य होऊ लागले.

ते जग आभासी म्हटले तरी त्याची आपल्या वास्तवाशीही सांगड घातली गेली आहे. तेथील पडझड या वास्तव जगातही परिणाम घडवून आणते. ईमेलच्या माध्यमातून दुसरेच कुणी - बँक अथवा गुंतवणूक सल्लागाराचे अधिकृत प्रतिनिधी- असल्याचे भासवून माहिती चोरून त्याआधारे लुटले जाऊ लागले. आता निव्वळ संगणकाबाबत नव्हे तर त्या संगणकाच्या मालकाची वैयक्तिक माहितीदेखील चलाखीने चोरली जाऊ लागली, इतकेच नव्हे तर तिचा वापर करून प्रत्यक्ष आर्थिक नुकसान करणे शक्य झाले. पण अजूनही अशा प्रकारच्या कामात  आपल्या हल्ल्याचा बळी जाणारी व्यक्ती कुठली हे हल्ला करणार्‍याला आधीच ठाऊक नसते. काहीसे मासे पकडणार्‍या जाळ्यासारखे काम ते करत असतात. जाळ्यात सापडेल तो मासा आपला! आणि म्हणूनच या प्रकाराला 'फिशिंग' म्हटले जाऊ लागले. चॅटचे माध्यम लहान मुलांना फसवून आपल्या विकृत लैंगिक खेळात ओढण्यासाठी वापरले जाते. स्त्रियांना, पुरुषांना पोर्नोग्रफीसारख्या व्यवसायात ओढले जाऊ लागले.

व्हायरस तयार करणार्‍याला थेट असा कोणताही फायदा होत नसे पण आता अशा 'फिशिंग'च्या माध्यमातून आर्थिक फायदाही करून घेता येऊ लागला. यात आभासी जगातील, त्या पातळीवर हिंसा असली तरी दुश्मनी, वैयक्तिक हेवेदावे वा वैर नाही किंवा विशिष्ट व्यक्तीला वा समुदायाला लक्ष्य करणारा एखादा पूर्वनियोजित हेतूही नाही. या 'फिशिंग' प्रकारच्या हल्ल्यात हेतू निव्वळ स्वार्थी आहे, तो साधण्यासाठी इतर कुणाचे(ही) नुकसान झाले तरी त्याबद्दल तो हल्लेखोर बेफिकीर असतो इतकेच.

सोशल मीडियाचे अवाढव्य माध्यम तर अनेक शक्यतांचे आगरच. हे जग आभासी असल्याचा फायदा उठवून वास्तवातील कुणी व्यक्ती असल्याची बतावणी करत स्वार्थ साधणे अथवा त्याच्या/तिच्या स्वार्थाला धक्का पोहोचवणे हे तर नित्याचेच. पण केवळ वैयक्तिक लाभालाभापलिकडे विशिष्ट अजेंडा घेऊन तो विविध प्रकारे राबवलाही जातो. आपल्याहून वेगळे मत असलेल्या, किंवा ज्याचे अस्तित्व आपल्याला खुपते अशा व्यक्ती, विचार वा गटावर हल्ले करणे, किंवा सरळ सरळ दोन विरुद्ध राजकीय पक्षांचे समर्थक विविध परस्परांशी भिडणे अशा प्रकारांतून झुंडशाहीदेखील इथे अवतरली आहे.

इंटरनेटच्या 'आदिम काळात' जसे एकच व्यक्ती अनेक ईमेल अड्रेसचा वापर करू शके तसे आता सोशल मीडियातून एकच व्यक्ती अनेक 'प्रोफाईल' उभे करू शकते. यातून आभासी जगातल्या युद्धासाठी मोठे सैन्य अनायासे उभे करता येते. त्यामुळे एखाद दोन व्यक्तीदेखील जनमताच्या पाठिंब्याचा वा विरोधाचा आभास निर्माण करू शकतात, त्यायोगे पाठिंबा वा विरोध या दोन्ही कळपात नसलेल्या कुंपणावरच्या व्यक्तींना या 'तथाकथित बहुमता'कडे झुकवण्यासाठी बुद्धिभेद करू शकतात. नुकतेच डी पी मंडल या पुरोगामी लेखकाचे फेसबुक अकाउंट त्यांची मते न पटणार्‍या व्यक्तींच्या आभासी झुंडीने घातक किंवा आक्षेपार्ह म्हणून रिपोर्ट करून ब्लॉक करण्यास भाग पाडले. तांत्रिकदृष्ट्या हा कायदेशीर मार्ग होता पण अशीच मुस्कटदाबी प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांच्याबाबत करताना सरळसरळ 'हॅकिंग' (संगणकीय घुसखोरी) हा बेकायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. या मार्गाने घुसखोरांनी त्यांना न पटणारी मते मांडणारा रविश यांचा 'कस्बा' हा ब्लॉग बंद पाडला.

वेबसाईट्स, ब्लॉग्स, सर्वर्स यावर हल्ले करून ते बंद पाडणे, संवेदनशील माहिती चोरणे ('पेंटगॉन'च्या सर्वरमधे झालेली घुसखोरी, 'गुगल'ची अकाउंट हॅक होणे, विकीलीक्स), परदेशाच्या वा व्यावसायिक शत्रूच्या वेबसाईट ऐन मोक्याच्या क्षणी बंद पाडणे अशा अनेक मार्गांनी आभासी जगातील हिंसेची वाटचाल होताना दिसते आहे. ८ जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, वॉल स्ट्रीट जर्नल या त्यांच्या भांडवलशाही व्यवस्थेचे आधारस्तंभ मानल्या गेलेल्या व्यवस्थांच्या आणि युनायटेड एअरलाईन्स या जगातील सर्वाधिक ठिकाणी सेवा पुरवणार्‍या विमानसेवेच्या नेटवर्कमधे एकाच वेळी 'बिघाड' निर्माण झाला. या बिघाडामुळे स्टॉक एक्स्चेंज'चे काम तब्बल चार तास थांबवावे लागले होते. अधिकृत पातळीवर जरी हे सारे 'तांत्रिक बिघाड' असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी या तिघांचे अर्थव्यवस्थेतले स्थान पाहता हा नियोजनपूर्वक नि जाणीवपूर्वक केलेला बिघाड होता याबाबत सायबर विश्वातील आणि जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञांना शंकाच नाही.

या पलिकडे जाऊन आता या युद्धांना दोन देशातील युद्धांचे स्वरूपही हळूहळू येऊ लागले आहे. अजून अधिकृतरित्या समोर आलेले नसले तरी युद्धासाठी उभ्या केलेल्या सैन्याप्रमाणेच शत्रूच्या नेटवर्कमधे घुसून संवेदनशील माहिती चोरणे (वास्तवातील हेरगिरीच्या धर्तीवर), त्याचे काम बंद पाडणे वा त्यात बाधा निर्माण करणे यासाठी 'सायबर आर्मीज' काम करत आहेत.  मागच्या वर्षी जून महिन्यात 'सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंट'ने आपल्या 'The Interview' या नव्या चित्रपटाचे ऑफिशल ट्रेलर रिलीज केले. उ. कोरियाच्या अध्यक्षांच्या हत्येवर आधारित चित्रपट असल्याने आणि एकच गदारोळ उसळला. उ. कोरियाचे लष्करी शासन खवळले. केवळ निषेधाने काही होत नाही, चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीला अमेरिकन सरकार भीक घालत नाही म्हटल्यावर अनधिकृत पातळीवर त्यांचे सायबर सैनिक कामाला लागले. चित्रपटाचे निर्माते नि वितरक असलेल्या सोनी एंटरटेनमेंट्च्या सर्वरमधे नि वेबसाईट्सवर घुसून त्यांनी त्यांचे बरेच नुकसान केले आणि धोक्याचे इशारे देणारे संदेश त्यांच्या वेबसाईटवर नोंदवून ठेवले.

वास्तव जगात सावधपणे व्यक्त होणारी व्यक्ती इथे - विशेषतः सोशल मीडियामधून - अतिशय आक्रमकपणे व्यक्त होताना दिसते. समोरासमोर झालेल्या वादांत आपल्या शारीरिक, मानसिक दुबळेपणाने बोटचेपी भूमिका घेणारी व्यक्ती इथे प्रतिकार केवळ शाब्दिकच असल्याने त्याची फारशी फिकीर न करता मनातील सारी हिंसा बिनधोकपणे ओतताना दिसते. या बिनधोकपणाला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे सायबरविश्वातील गुन्ह्याबाबत कायदे कदाचित अजून पुरेसे विकसित झालेले नाहीत, दुसरे म्हणजे असलेच तरी त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेली पुरेशी व्यापक आणि सजग यंत्रणा नाही, जी आहे त्यातील व्यक्तींमधे त्या कायद्यांविषयी पुरेशी जागरुकता नाही किंवा संभ्रम आहेत, तिसरे म्हणजे गुन्हेगार आणि ज्याच्या संदर्भात गुन्हा घडला ते जगभरात कुठेही असू शकत असल्याने कायद्याच्या अधिकारक्षेत्राबाबत असलेला गोंधळ गुन्हेगाराला कायद्याच्या कचाट्यात आणण्याची शक्यता खूपच धूसर करत जातो.

जशी वास्तव जगात महायुद्धे दूर गेली आहेत असे म्हणतात तसेच इथे असे सर्वंकष युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. पण उलट 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' आहे. कारण संवेदनशील, महत्त्वाची माहिती असलेले संगणक अहोरात्र चालू असतात, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य असते.  जगाच्या दुसर्‍या टोकाला बसलेला कुणी हॅकर केव्हाही त्यावर हल्ला करून नुकसान घडवू शकतो. यासाठी त्यांच्या सुरक्षिततेची यंत्रणाही सतत जागरूक आणि अद्ययावत असावी लागते. हे एकप्रकारे निरंतर चालणारे युद्धच आहे. इथे युद्ध असते ते केवळ बुद्धीचे, हानी होते तीही शारीरिक नव्हे तर माहिती स्वरूपात आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक वा सुरक्षिततेच्या प्रश्नांच्या स्वरूपात.

या जगात सानथोर सार्‍यांनाच आपापली युद्धे लढवता येतात, आपले प्रतिस्पर्धी निवडता येतात, आपले युद्धमैदान निश्चित करता येते. यातून माणसाच्या मनातील हिंसेचा निचरा होतो की तिचा सराव होतो हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. माणूस कल्याणासाठी लावलेल्या शोधांतही विध्वंसाची बीजे शोधत असतो, जिज्ञासेतून झालेल्या ज्ञानाचा वापर ज्ञानाच्या दुसर्‍या शाखेला उध्वस्त करण्यासाठी करत असतो. हिंसेची ही प्रेरणा 'प्रगत' म्हणवणार्‍या माणसांत अप्रगत जनावरांपेक्षाही अधिक तीव्र झालेली दिसून येते. कदाचित याचे कारण माणसाकडे अन्न, मादी आणि अधिकारक्षेत्र या संघर्षाच्या तीन मूलभूत मुद्द्यांपलिकडेही गमावण्याजोगे बरेच काही निर्माण झाले आहे. निर्मितीच्या नव्या शक्यतांबरोबरच विध्वंसाच्या शक्यताही जन्म घेत असतात.  किंबहुना निर्मितीचे हत्यारच अनेकदा विध्वंसाचे हत्यारही होऊन बसते; डोंगर फोडून माणसासाठी नवा रस्ता बनवण्यासाठी निर्माण केलेले सुरुंग माणसांच्या निर्मितीला आणि खुद्द माणसांनाही नष्ट करण्यास वापरले जातात तसे.
---
(पूर्वप्रकाशित: 'पुरोगामी जनगर्जना' दिवाळी २०१५)

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

काजळवाट

या पोस्टच्या प्रेरणेने इतर लेखकांच्या लेखनातून घेतलेल्या वेच्यांना वाहिलेला ’वेचित चाललो...’ हा ब्लॉग सुरु केला आहे. ही पोस्ट आता तिथे वाचता येईल. 


- oOo -

गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०१५

अन्योक्ती २: खड्डे खणणारे हात

एक आटपाट मैदान होतं...

त्या मैदानावर सकाळी म्हातारे कोतारे फिरायला येत असत. मैदान असलेलं ते गाव हे खरंतर लहानसं शहरच होतं. महानगरी 'ज्येष्ठ नागरिकां'प्रमाणे ओघळणारे पोट घट्ट दाबून बसवणारे टी शर्ट नि ट्रॅक पँट किंवा बर्मुडा ऊर्फ पाऊण चड्डी घातलेले पुरुष इथे नसले तरी इथले पुरुषही त्यांच्या प्रमाणेच मैदानाला एखादी फेरी मारून घाम पुसत पुसत राजकारणाच्या खेळाच्या आणि खेळातल्या राजकारणाच्या गप्पा मारत असत. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती मागे पडू लागली असल्याने सुनेच्या कागाळ्या हा म्हातार्‍या स्त्रियांचा हक्काचा विषय जवळ जवळ बाद झालेला असल्याने त्या थोड्या मॉडर्न होऊन हिंदी चित्रपटातल्या हिरो हिरोईनच्या न जुळलेल्या वा मोडू घातलेल्या लग्नाची चिंता करत असत. किंवा एखाद्या मालिकेतल्या त्या कुण्या सासुरवाशिणीला त्रास देणार्‍या तिच्या सासूच्या नावे बोटे मोडत आपण तसे नाही हे स्वतःला नि इतरांना पटवून देत. तर कुणी एखाद्या पदार्थाला तिरफळ लावावे की नाही यावर साधकबाधक चर्चा करताना दिसत.

सकाळी अकराच्या सुमारास मुलींच्या शाळा सुटल्या की त्या दप्तरासकट मैदानावर हजर होत. त्यांचे खेळ रंगत ते थेट दुपारी एक वाजेपर्यंत. त्या सुमारास मैदानालगतच दहा बाय दहाच्या खोलीत सात-आठ जणांच्या कुटुंबासह राहणारा म्हातारा दगडू जेवण करून मैदानाच्या कडेने उभ्या असलेल्या एखाद्या झाडाखाली डुलकी काढण्यास येई. तो येताना दिसला की त्या पोरींना वेळेचे भान येई आणि उशीर केल्याबद्दल आपापल्या आयांची बोलणी खाण्याच्या तयारीने लगबगीने घरी पसार होत. मग सकाळच्या सत्रात काम करून थकलेले कुणी मजूर, रिक्षावाले, फळविक्रेते, फिरते विक्रेते वगैरे मंडळी हळूहळू दगडूच्या जोडीला जमा होत. दुपारी दोन ते चारच्या दरम्यान दगडूबरोबरच ते मैदानही शांत लवंडलेले दिसे. चारच्या सुमारास झाडांच्या सावल्या मैदानावर हातभर पसरू लागल्या की घटका दीड घटका आराम करून ताजेतवाने झालेले जीव आळस झाडून आपापल्या कामाला चालते होत. दगडू मैदानाच्या दारात असलेल्या राम्याच्या टपरीवर एक कटिंग चा मारून पुन्हा झाडाच्या सावलीत विसावे.

पाच वाजण्याच्या सुमारास मुलांच्या शाळा सुटल्या की मैदानाला भरते येई आणि तिथे वेगवेगळे खेळ रंगत. कुठल्याशा झाडाच्या तोडून आणलेल्या फांद्यांपासून बनवलेले स्टंप्स, एखाद्या सुताराकडून दादापुता करून अखंड लाकडातून कापून आणलेली बॅट आणि सायकलच्या दुकानातून टाकून दिलेल्या ट्यूब्जमधून बनवलेला चेंडू घेऊन भावी गावसकर, तेंडुलकर, कपिलदेव आवेशाने, भान हरपून परस्परांशी झुंज घेताना दिसत. खेळता खेळात कुण्या टोळक्याच्या चेंडूच्या चिंध्या होऊन जात. विकत आणणे ही संकल्पनाच माहित नसलेली ती पोरे पटापट बुचाच्या झाडावर चढून त्याच्या शेंगा गोळा करून आणत नि त्या कुटून त्यांचा चेंडू बनविण्याचा कामाला लागत. कुणी शूर पोरटी गुलमोहराच्या झाडाच्या शेंगा काढून तलवारीसारख्या वापरत बाजीप्रभू किंवा मुरारबाजी होण्याचे स्वप्न वास्तवात उतरवून बघत. कुणी बाप आपल्या पोराला एका कोपर्‍यात सायकल शिकवताना दिसे. उन्हे कलू लागली की पोरट्यांना परतायचे वेध लागत. पण रिकाम्या हाती घरी जाणे त्यांना ठाऊकच नसे. सीजननुसार आंबा, चिंचा, पेरू, बोरे, आवळे वगैरे फळे उतरवून ती खाताखाता एखाद्या झाडाच्या पायथ्याशी लंब्याचवड्या गप्पांचे फड जमत. आसपास त्यांनी काही महिन्यांपूर्वी फळे खाऊन फेकलेल्या बियांतून चार कोवळे अंकुर डोकावताना दिसत. त्यातलाच एखादा शेजारच्या वठलेल्या झाडाची जागा भरून काढण्यासाठी वेगाने वाढताना दिसे. अंधार पडू लागला की हळू हळू सर्वजण काढता पाय घेत आणि मैदानालाही त्या शांत वातावरणात आजचा आपला दिवस कसा गेला याच्या आठवणी काढण्यास उसंत मिळे.

हे मैदान कुण्या जहागीरदाराच्या वंशजाच्या मालकीचे होते. गाव तसं शांत नि बर्‍यापैकी वस्तीचं असलं तरी मोठ्या शहरातील प्रगतीची पावले अजून त्याच्यापर्यंत पोचलेली नव्हती. माणसांना अंग टाकायला चार हात जागा आणि ताटात कोरभर भाकरी यापलिकडे काही अधिक मिळवायचे असते याची जाण नव्हती. आडनावापुढे न चुकता 'जहागीरदार' लावणारा मालक कुळांकडून येणार्‍या धान्यावर निवांत जगत होता. आणि खणा दोन खणांच्या जागेत राहणार्‍यांवर रुबाब गाजवायला त्याला त्याचे आठ खणांचे घर पुरेसे होते.

'आयुष्यात सतत पुढे जात रहायला हवे' असे घोकत जगणारा एक दाढीवाला माणूस एका संध्याकाळी मैदानापाशी आला. मैदानाचा विस्तीर्ण आकार, जवळच असलेले मार्केट, शाळा, गावापासून सात-आठ किलोमीटर पुढे असलेले अशा दहा गावांची पाण्याची गरज सहज भागवू शकेल इतके विस्तीर्ण तळे, जेमतेम चार किलोमीटर अंतरावरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वगैरे गोष्टींची नोंद त्याच्या प्रगतीशील मनाने पटापट घेतली. त्या मैदानावर किती बिल्डिंग उभारता येतील नि किती पैसा निर्माण करता येईल या विचाराने त्याच्या तोंडाला पाणी सुटले. दाढीवाल्याने ताबडतोब शहरातील आपल्या बिल्डर मित्राकडे धाव घेतली. आणि त्या मैदानावर शहरातील लोकांसाठी हॉलिडे होम्स, रेस्ट हाऊसेस, फार्म हाऊसेस बांधून प्रचंड पैसा मिळवता कसा मिळवता येईल याची एक योजनाच त्याच्या कानावर घातली. बिल्डरला ती योजना पसंत पडली. पण शहरात अडकून पडलेल्या त्याने ही जमीन ताब्यात आणण्याची जबाबदारी दाढीवाल्यावरच सोपवली. त्याबद्दल भरपूर पैसे देण्याची तयारी दाखवली. दाढीवाल्याला नेमके हेच हवे होते. पण त्यातही त्या ठिकाणी बांधल्या जाणार्‍या रस्त्यांना आपल्या वाडवडिलांची नावे देण्याची अट त्याने बिल्डरकडून मान्य करवून घेतली.

आता आपले स्वप्न साकार होणार या आनंदात दाढीवाल्याने ताबडतोब गावांत येऊन मैदानाच्या मालकाची गाठ घेतली. आणि अतिशय उत्साहाने त्याने आपली योजना त्याच्या समोर मांडली. नुकतेच जेवण करून आचवत असलेल्या मालकाने फार रस दाखवला नाही. तो आपला दोन घास अन्न खाऊन सुस्तपणे पहुडला. दाढीवाल्याने आणखी एक दोन वेळा त्याची भेट घेऊन त्याला आपल्या योजनेतील फायदे पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण मालक निवांत होता. दाराशी चालत येणारे धान्य आणि 'जहागीरदारसाहेब' म्हणून मान देणारे गांवकरी या पलिकडे त्याला आणखी काही मिळवण्याची इच्छा नव्हती. 'मग पोट्टे लोक खेळतील कुठे?' असा मोजका प्रश्न विचारून तो दाढीवाल्याला वाटेला लावत असे.

पण दाढीवाल्याने ती जमीन मिळवण्याचा चंग बांधला. तिथे खेळायला येणार्‍या पोरासोरांनाच हाताशी धरून त्याने त्या जमिनीवर खड्डे खणायला सुरुवात केली. हळू हळू सारी जमीन खड्ड्यांनी भरून गेली. त्याच बरोबर दुसरीकडे आसपासचा सारा कचरा तिथे पडू लागला, शेजार्‍यापाजार्‍यांनी तसे करावे म्हणून दाढीवाला त्यांना पैशाची लालूच दाखवू लागला. जहागीरदार साहेबांवर आधीच खार खाऊन असलेल्या शेजार्‍यापाजार्‍यांनी अहमहमिकेने त्या मैदानाचे रूपांतर डंपिंग ग्राउंड मधे केले. आता मुलांना खेळायला तिथे जागा उरली नाही.
एकदा जहागीरदारसाहेब सकाळचे फिरायला गेले असताना एका खड्ड्यात पडून त्यांचा पाय मोडला. अखेर कंटाळून त्यांनी जमीन विकायची तयारी दाखवली. दाढीवाला हुरळून गेला, तो धावत आपल्या बिल्डर मित्राकडे गेला आणि त्याने ती जमीन विक्रीला उपलब्ध असल्याचे शुभवर्तमान त्याच्या कानावर घातले. बिल्डरने तिथल्या तिथे त्याला कमिशन देऊन ही बातमी अन्य बिल्डर्सच्या कानावर न घालण्याची ताकीद दिली. पैसे घेऊन बाहेर पडलेल्या दाढीवाल्याने ताबडतोब जंगी पार्टी केली आणि आपल्या या 'मिशन'मधे सहभागी झालेल्यांना सार्‍यांना खुश करून टाकले.

उरलेले पैसे देऊन व्यवहार पुरा करण्यापूर्वी जमीन पाहून घ्यावी घ्यावी म्हणून बिल्डरने त्या मैदानाकडे फेरी मारली. मैदानावर जागोजागी पडलेले भलेमोठे खड्डे, गांवभरच्या कचर्‍याचे ढीग, त्यावर घोंगावणार्‍या माशा, खचलेला रस्ता हे पाहून तो संतापला. त्याने दाढीवाल्याला जोरदार फैलावर घेतले. जमीन मूळ स्थितीत आणून देण्याचे अन्यथा त्याला कबूल केलेले उरलेले पैसे न देता ते जमिनीच्या सफाईसाठी म्हणून जप्त करण्याची धमकी त्याने दाढीवाल्याला दिली.

मालकांना खड्ड्यात घालावे म्हणून खणलेले खड्डे भरण्याची जबाबदारी आता दाढीवाल्यावर येऊन पडली आहे. बिल्डरकडून मिळालेले पैसे तर संपून गेले आहेत, कचरा टाकणारे उलट दिशेने उचलायला मदत करतील याची शक्यताच नाही. अपरिहार्यपणे ते खड्डे भरण्याचे काम आता दाढीवाला स्वतःच करू लागला आहे. पण आता कचरा टाकण्यास सरावलेले शेजारी तिथे कचरा टाकणे थांबवत नाहीत. कचरा फेकणारे शेकडो हात आणि तो उपसणारे दाढीवाल्याचे दोन असा विषम सामना सुरु झाला आहे. अतिश्रमाने थकलेला दाढीवाला कधीमधी चक्कर येऊन त्याच खड्ड्यात पडतो आहे. ते खड्डे खोदणारी मुले कधीतरी परततील, ते भरण्याला आपल्याला मदत करतील म्हणून आशाळभूतपणे त्या मैदानाच्या गेटसमोर वाट बघत बसलेला तो दिसतो.

पण मुलांनी दुसरे मैदान शोधून काढले आहे. ते आता इकडे फिरकत नाहीत. मैदान हरवल्यामुळे घरी लवकर परतणार्‍या पोरींना आयांनी घरकामाला जुंपले आहे. मैदानावरच्या झाडांवर पूर्वी फुकट मिळणारी फळे आता बाजारातून पैसे मोजून विकत घ्यावी लागत असल्याने मुलांच्या आहारातून फळे हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी पाच दहा रुपयांच्या पाकीटातून मिळणारे वेफर्स किंवा चिप्स यावर ते आपली चैन भागवू लागले आहेत, इतकेच नव्हे तर फळांऐवजी चिप्स खाणे हे पुढारलेपणाचे, प्रगतीचे लक्षण ती मानू लागली आहेत. पूर्वी मैदानावर फिरायला जाणारे म्हातारे घरात बसून त्यांचे सांधे आखडू लागले आहेत. त्या वेदनेमुळे वा 'अतिपरिचयात अवज्ञा' या न्यायाने घरच्या पोराबाळांशी छोट्या छोट्या मुद्द्यांवरून त्यांचे खटके उडू लागले आहेत. घरात बसून सतत किरकिर करणार्‍या म्हातार्‍यांवर सुना, लेकी करवादू लागल्या आहेत.

सद्यस्थितीत बिल्डरकडून येणार्‍या उरलेल्या पैशांवर पाणी सोडून चालते होणे हा पर्याय दाढीवाल्यासमोर आहेच. पण इतक्या नेटाने प्रयत्न करून हातातोंडाशी आलेले पैसे असे सोडून देण्याचा त्याचा धीर होत नाही. आज ना उद्या आपण हे मैदान जसे आहे तसे करू आणि आपले पैसे मिळवू या वेड्या आशेवर तो कचरा साफ करतो आहे, खड्डे भरतो आहे. मैदान आपल्याला हवे असेल तर खड्डे खोदणार्‍यांबरोबरच खड्डे भरणारे हातही बरोबर घ्यायला हवे होते हे मात्र दाढीवाल्याला अजूनही उमगलेले नाही.

'आयुष्यात सतत पुढे जात रहायला हवे' म्हणणारा दाढीवाला प्रगतीच्या वाटेवरचा सफाई कामगार होऊन तिची सोनेरी स्वप्ने पहात एका जागी खिळून राहिला आहे.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः 'प्रभात' दिवाळी २०१५)

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

गो-मॅन-गो (कथा)

'उठी उठी गोऽपाऽलाऽऽऽ आ... आ... अ...' कोणीतरी केकाटू लागला. 'तिच्यायला सकाळी सकाळी हे कोण केकाटून कुमारांच्या सुंदर गाण्याची वाट लावतंय' असं पुटपुटत रामू अंथरुणातून धडपडत उठला नि सवयीने रिमोटकडे हात गेला. रिमोटचे बटण दाबूनही आवाज बंद होईना हे बघून वैतागला. इतक्यात त्याला आठवले की टीवी नव्हे तर मुख्य प्रधानाच्या आदेशाने आपल्या घरात प्रविष्ट झालेला रेडिओ कोकलतो आहे. मध्ययुगातील रेडिओ आता डिजिटल झालेला असल्याने त्याचे बटन पिळून बंद करताना त्याचा कान पिळल्याचे दुष्ट समाधानही मिळत नाही हे ध्यानात येऊन तो अधिकच वैतागला. धडपडत कसातरी टचस्क्रीन रेडिओ अनलॉक करून त्याने आवाज बंद केला. 'च्यामारी या मुख्य प्रधानाच्या, गोबेल्सने रेडिओ वापरला त्याला शंभर वर्षे झाली. तंत्रज्ञान बदलले तरी या बाबालाही रेडिओच हवा म्हणे. आणि हे कसले खूळ तर म्हणे रोज नवा गो-सेवक उठी उठी गोपाला गाणारा.' झोप पुरी न झाल्याने रामू चिडचिडत राहिला.

सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर दररोज सकाळी सहा वाजता 'उठी उठी गोपाला' हे नाट्यगीत (हे खरे तर प्राचीन ग्रंथात आधीपासून होते, नाटककाराने ते चोरून आपल्या नाटकात वापरले असा खरा इतिहास नुकताच उघडकीस आला होता) गायले जाई. रोज एका नव्या गोसेवकाला ते गाण्याचा बहुमान मिळे. गाणार्‍याची निवड करण्यासाठी महा-गुरु नेमले होतेच. (प्राचीन भाषेमधे 'गो' शब्दाचा एक अर्थ गुरु असाही असल्याने यांचा उल्लेख हल्ली 'महा-गो' असाही केला जाऊ लागला होता.). यांना गोरसाची लाच दिल्यास आपला नंबर आधी लागतो अशी कुजबूज अधूनमधून ऐकू येई. 'काय एकेक महाभाग रोज उगवतात राव. काल तो सर्दी झालेल्या बेडकाच्या आवाजात गात होता. साला सारा दिवस खराब जातो असा कुणी असला की.' टूथब्रशवर पेस्ट घेता घेता रामू स्वतःशीच पुटपुटला.
प्रातर्विधी उरकून आत येत त्याने स्वयंपाकघरातील कलत्राला चहाची ऑर्डर सोडली. बाहेरच्या खोलीत येऊन शिरस्त्याप्रमाणे १२८ श्री श्री वामदेव बाबांचे चॅनेल लावण्यासाठी टीवी चालू केला. रोज सकाळी प्रथम वामदेव बाबांचे प्रवचन, मग महंत गोविंदराम यांच्यासोबत योग (आता याला योगा म्हणण्यावर बंदी आली होती, इंग्रजीतही Yog असेच स्पेलिंग करण्याचा वटहुकून निघालेला होता) असा रामूचा सकाळचा क्रम ठरलेला होता. प्रवचन चालू होते इतक्यात शेजारच्या नाडगौडा काकू डोकावल्या. त्यांचे मालक आज लवकर बाहेर पडणार होते पण त्यांच्याकडील दूध संपलेले नि दूधवाला उशीरा येत असल्याने त्यांना थोडे दूध हवे होते. काकूंची चाळ सुटली पण शेजारीपाजारी सतत उसनवारी करण्याची सवय सुटली नव्हती.

दूध घेऊन बाहेर पडत असताना रामूने त्यांची, त्यांच्या मुलाबाळांची जुजबी चौकशी केली. 'गोपाल-१ चे पत्र आले होते काल. आता त्याला ईशान्येत पोस्टिंग मिळाले आहे.' 'असे का. आणि गोपाल-२ कुठे असतो सध्या?' त्याने चौकशी केली. 'त्याला सध्या दिल्लीत रेसिडेंट पोस्टिंग आहे. छानच जागा मिळाली आहे हो. या दोन पोरांची काळजी तर मिटली. आता गोपाल-३ नि गोपाल-४ मार्गाला लागले की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी झाले.' असे म्हणत काकू अंतर्धान पावल्या. काकू अतिशय श्रद्धाळू होत्या. गो-काक बाबांवर त्यांची अतीव श्रद्धा होती. त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी आपल्या शासनपुरस्कृत साध्वींच्या नि साधूंच्या हुकूमावरून जन्माला घातलेल्या चारही पोरांची नावे त्यांनी 'गोपाल' अशीच ठेवली होती. 'चारही वेळा 'ग' हेच अक्षर आलं बघा, किती भाग्यवान की नै?' असं त्या अतीव कौतुकाने सार्‍यांना सांगत असत. मग त्यांना गोपाल-१ ते गोपाल-४ अशाच नावाने हाक मारली जाई. पण खुद्द काकू वगळता अन्य कुणी - खुद्द काकादेखील - पूर्ण नाव न उच्चारता फक्त एक-नंबर, दोन-नंबर अशीच हाक मारत. (यावर 'एक नंबर' अतिशय खूष होता तर 'दोन नंबर' सार्‍या जगावर खार खाऊन होता.)

आंघोळ उरकून प्रवचन नि योग संपवून तो आंघोळीच्या तयारीला लागला. सरकारी अनुदानाच्या सहाय्याने नगण्य किंमतीत घेतलेल्या गो-इंधनाच्या सहाय्याने पाणी गरम करणार्‍या बंबातून येणार्‍या पाण्याच्या धारेस बोट लावून ते पुरेसे गरम झाले आहे ना याची त्याने खात्री करून घेतली. पत्नीने त्याचा पंचा, गो-उत्सर्जितांपासून बनवलेला साबण नि उटणे, गोरस नि गोमूत्रापासून बनवलेला शांपू आधीच न्हाणीघरात आणून ठेवलेला होता. आंघोळ करत असताना तो मनातल्या मनात आज करावयाच्या कामाची उजळणी करू लागला.

'बायकोच्या सततच्या डोकेदुखीसाठी लागणारे गोमयापासून बनवलेले 'सर्वपीडाहारी' मलम आणि छोटीच्या खोकल्यासाठी गोमूत्रापासून बनवलेले 'सर्वव्याधीनिवारक' सिरप ऑफिसमधे जातानाच घेऊन जाऊ. गोमूत्रापासून बनवलेले फिनाईल संपले आहे ते ऑफिसमधून येता येता घेऊन या असे पत्नी म्हणत होती. पण येताना सुरेंद्राच्या 'पंचगव्य कोल्ड्रिंक हाऊस'च्या नव्या आउटलेटच्या उद्घाटनाला जायचे आहे, तेव्हा ते तिलाच आणायला सांगू. हा सुरेंद्र लेकाचा एकदम डोकेबाज. रुग्णालयात कॅन्सरसह सार्‍या आधिव्याधी गोमय नि गोमूत्राच्या चाटणांच्या आधारे बर्‍या होऊ लागल्याने याचा सर्जिकल इन्स्ट्रूमेंट्सचा धंदा बुडित निघाला. पण औषधे बनवण्याच्या पर्यायाऐवजी चक्क पंचगव्य वापरून शीतपेय बनवण्याचा उद्योग सुरू केलाय. गोरस, गोमूत्र नि गोमय यांच्यापासून बनवलेले त्याचे 'त्रिवेणी' शीतपेय वर्ष दोन वर्षातच राज्यभर पसरले. आपल्या गावातलेच हे त्याचे चौथे आउटलेट. त्याची ही कल्पना देशी शीतपेयांचे मार्केट वाढवून परदेशी कंपन्यांकडे जाणारा पैसा रोखणारी असल्याने शासन दरबारीही चांगले वजन आहे पठ्ठ्याचे.' "आवरा आता. पावणेआठ झाले. ब्रेकफास्ट तयार आहे." या सौं.च्या घोषणेने त्याच्या विचारात खंड पडला. आंघो़ळ उरकून तो बाहेर आला.

हे असं सगळं गो-गो काय चाललंय असा तुम्हा वाचकांना प्रश्न पडला असेल ना? झालं काय की काही काळा पूर्वी राज्यात निवडणुका झाल्या. त्यातून सत्तारूढ झालेल्या पक्षाने हजारो वर्षे गोमातेने त्यांच्या केलेल्या पालनपोषणाबद्दल 'गो-रक्षण' हे सरकारचे... चुकलो शासनाचे आधुनिक धोरण ठरवून टाकले होते. 'आधी रक्षण गोमातेचे, मग पाहू शेतकर्‍याचे' असा मूलमंत्रच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्याला अनुसरून प्रथम 'गोवंश हत्या बंदी' वटहुकूम जारी करण्यात आला. त्या पाठोपाठ सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी गोपालन केंद्रांची स्थापना केली. आपल्या कमाईतली पै न पै खर्च गोपालनावर खर्च करत ते त्या पवित्र कार्यात मग्न होऊन गेले. मातेच्या अलौकिक अशा मल मूत्राचे विविध गुणधर्म तपासणारे, तसे सिद्ध करणारे संशोधक हिरिरीने पुढे आले. ते ही शासकीय अनुदान न घेता पदरमोड करून नव नवे शोध लावू लागले. वर उल्लेख आलेले बहुतेक शोध हे या अथक परिश्रमाचे फलित होते.

ब्रेकफास्ट आणि सकाळचा दुसरा चहा घेता घेता रामूने वृत्तपत्र चाळायला सुरुवात केली. 'प्रगतीशील भारत'च्या पहिल्या पानावर पूर्ण पान व्यापेल असे डोक्यावर कुठल्याशा राज्यातील पगडी घातलेले मुख्य प्रधानाचे चित्र होते. हे रोजचेच असल्याने आता त्याखाली काय लिहिले आहे ते न वाचताच रामूने ते पान उलटले. राज्यात वेगाने होणार्‍या प्रगतीचे प्रतिबिंबच त्या वृत्तपत्रांतून उमटलेले दिसत होते. पान-अर्धा पान व्यापणार्‍या गृहप्रकल्पाच्या जाहिराती, अतिशय स्वस्त नि सर्व सोयींनी युक्त अशा मोटारी ऊर्फ कार्सच्या जाहिरातींची वृत्तपत्रात नेहेमीप्रमाणे रेलचेल होती. गेल्या काही वर्षांत गोमूत्र नि गोमयाच्या विशिष्ट मिश्रणावर चालणार्‍या गाड्या बाजारात आल्या होत्या. पुढील पाच वर्षांत खनिज उत्पादनांवर चालणार्‍या गाड्या टप्प्याटप्प्याने वापरातून काढून टाकण्याच्या स्पष्ट सूचना गाडीमालकांना देण्यात आल्या होत्या. अर्थात गोउत्सर्जनावर आधारित इंधन स्वस्त असल्याने ते ही त्यासाठी एका पायावर तयार होतेच. जागोजागी पेट्रोल-पंपाच्या जागी 'गो-इंधन उत्पादन केंद्रे' उभी रहात होती. आपापल्या गाड्या तिथे उभ्या करून कारपासून ट्रकपर्यंत सारे चालक/मालक अस्वस्थपणे 'इंधन' मिळण्याची वाट पहात उभे असत. इंधन उत्पादनासाठी तिथे अनेक गोमातांना अत्यंत आदराने उभे केले गेले होते. त्यांची इच्छा असल्यास स्वस्थ पडून राहण्यासाठी गवताची, क्वचित फोमची गादीही देण्यात येई. त्यांच्या आहारासाठी पाचक नि रुचकार अशा गवताची नि अस्सल देशी बनावटीच्या पशुखाद्याची सोय करण्यात आली होती. सारा देशच गो-मय झाल्यामुळे अशा पशुखाद्यांच्या खरेदीत कोणतेही घोटाळे होत नव्हते.

देशातील बॅंका अशा गो-उत्सर्जनांवर आधारित मोटारींसाठी शून्य व्याजदराने कर्ज देऊ लागल्या होत्या. केवळ मोटारीच नव्हे तर ऊर्जेची अन्य बाबतीत असलेली गरजही गोबर-गॅसच्या माध्यमातून भागवली जात होती. प्रत्येक रुग्णालय नि पंचतारांकित होटेल्स यांनी स्वतःचे असे गोबर गॅस प्लँट्स उभारले होते. त्यातून ते स्वतःची गरज तर भागवतच पण वर उरलेली ऊर्जा ते देशहितासाठी आसपासच्या नागरिकांना फुकट वाटत असत. एवढेच नव्हे तर गोमय हे किरणोत्सारापासून संपूर्ण बचाव करत असल्याने सीमेवर आणि देशातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणांभोवती गोमयाच्या भिंती उभारण्याचे काम गो-विंद इंटरनॅशनल मार्फत वेगाने चालू होते.
तिसर्‍या पानावर माजी न्यायमूर्ती गोमतेय बज्जू यांच्या अध्यक्षतेखाली एक नवी सत्यशोधन समिती नेमल्याची बातमी रामूला दिसली. हे न्यायमूर्ती अत्यंत विद्वान, प्रकांड पंडित, राजकारणाची सूक्ष्म ज्ञान असलेले आणि स्पष्टवक्ते असे होते. जगातील जवळजवळ सर्वच न उकललेल्या समस्यांची वा गूढांची उत्तरे यांच्याकडे आहेत असे मानले जाई. सरकार दरबारीच नव्हे तर सोशल मीडियावरही हे चांगलाच दबदबा राखून होते. तेव्हा त्यांचे नाव पाहून रामूने कुतूहलाने ती बातमी वाचून काढली. काही महिन्यांपूर्वी 'जन-धन योजने'च्या धर्तीवर शासनाने 'गो-धन' योजना जाहीर केली होती. या अंतर्गत देशातील नागरिकांना ते सांभाळ करत असलेल्या प्रत्येक गोमातेमागे पंधरा लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर सदर परिपत्रकात मुद्रणदोष असल्याचे नि ही रक्कम पंधरा रुपये इतकी असल्याचा खुलासा कृषी मंत्रालयाने केला, परंतु सदर खुलासा करणे हे कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही असा दावा करत अर्थ मंत्रालयाने त्याला स्थगिती दिली. यानंतर ही स्थगिती मूळ आदेशालाही लागू होते का याबाबतची संदिग्धता दूर करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तिचा अहवाल सहा महिन्यात सादर केला जावा असा आदेश त्यांना देण्यात आला होता.

अशा तर्‍हेने गोसर्गापासून (म्हणजे प्रातःकालापासून) ते गोरजकालापर्यंत सदैव गो-सेवेत व्यतीत करणार्‍या नागरिकांचे अवघे आयुष्यच 'गो-मय' (प्रेममय, रसमय या चालीवर) होऊन गेलेले दिसे. लग्नाचे वेळी लग्नाळू युगुलाकडून 'आपण गो-डीगुलाबीने संसार करू' असे अभिवचन गोमातेला स्पर्श करून घेण्यात येत असे. (पूर्वी हीच पद्धत होती. याचाच भ्रष्ट अवतार म्हणजे किरिस्तांवांचे 'आय डू' असे अभिवचन घेणे किंवा मुस्लिमांचे 'कुबूल है' म्हणणे होय हे काही काळापूर्वी ज्येष्ठ नि श्रेष्ठ इतिहाससंशोधक गोपद्मविभूषण पन्नालाल कालरा यांनी साधार दाखवून दिले होते.) मुलाच्या बारशाचे वेळी 'पंचगव्य चाटण' समारंभ केला जाई. 'सुवर्ण चाटण' समारंभ हा म्लेन्छांकडून आला असल्याचा शोध लागल्याने त्याची जागा आता पंचगव्याने घेतली होती. मातेच्या दुधानंतर गोमातेचे दूध नि त्यानंतर गोमूत्र नि गोमय या क्रमाने आहारात बदल करत गेल्याने मूल सुदृढ नि सशक्त होते असे आरोग्यमंत्री वैद्यवाचस्पती विस्मृतीभूषण छंदोपाध्याय यांच्या गोसंशोधन केंद्रात संशोधन करणार्‍या टीमने पुन्हा एकवार सिद्ध केले होते. सर्व घरांच्या बाहेरील भिंतींवर" तुका म्हणे इष्ट, गोमयाचे जिणे | जळो परपुष्ट, कलंक अवघे|" रंगवलेला दिसे. गोप्रतिपालक, गोभूषण, गोभक्तिपरायण (गो.गो.गो.) सत्यगोपालजी महाराज यांनी सदर श्लोक हा तुकोबाच्या अभंगगाथेच्या अप्रकाशित पोथीचा भाग असल्याचे शोधून काढले होते. हाच श्लोक रामूच्या दारावरही कोरलेला होता. साडेआठच्या सुमारास सारे आवरून रामू बाहेर पडला तेव्हा दारासमोरील गोपद्मांना हात लावून त्याने नमस्कार केलात्याचवेळी या श्लोकावरील प्रत्येक अक्षराला स्पर्श करून त्याने त्याचे पुन्हा पुन्हा स्मरण केले.

फाटक उघडून रामू बाहेर पडला तर समोरच टपाल नेणारी गोमाता दिसली. गो-वंश हत्याबंदीमुळे आणि गो-सेवेच्या प्रवृत्तीचा बहुसंख्यांच्या मनात प्रादुर्भाव* (*हा एका मुख्यमंत्र्यांनी बहाल केलेला शब्द) झाल्याने प्रचंड संख्येने गोधन उपलब्ध होते. अशा गोधनाचा वापर करून घेणे तर आवश्यक होतेच परंतु जिला माता म्हटले तिला आदरपूर्वक वागवावे लागे. टपाल पोचवण्यासाठी वा निरोप पोचवण्यासाठी गोमातांची नेमणूक करण्यात आली होती. गर्भरेशमी झूल पांघरलेल्या या माता गल्लीतल्या एकेका घरासमोर, सोसायटीसमोर जाऊन उभ्या राहात नि विशिष्ट आवाजात हंबरत. त्या हंबरण्याच्या कंपन वारंवारते मुळे (मराठीत ज्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात) ज्याच्या नावचे टपाल आहे त्याला ते अचूक समजत असे. तत्परतेने तो गोमातेजवळ येऊन आपले टपाल घेत असे. त्यानंतर तो मातेला स्पर्श करून आशीर्वाद घेई. छोट्या निरोपांसाठी (एसएमएस सदृश) ताज्या दमाचे खोंड मदत करत असत. पूर्वी काही देशांत निरोप पाठवण्यासाठी कावळ्याचा ऊर्फ 'कागा'चा वापर करून घेतला जाई तर काही लोक कबूतराला यासाठी ट्रेनिंग देत. याच धर्तीवर चालणारी ही "गो-बाईल" सर्विस उपलब्ध झाल्यापासून मोबाईल कंपन्याही तोट्यात जाऊ लागल्या होत्या. ते असो. पण या गोमातेची ड्यूटी सुरु व्हायची असल्याने तशी निवांत होती. तिला स्पर्श करून दिवस चांगला जावा म्हणून आशीर्वाद मागितला. तिनेही शेपूट वर करून त्याला आशीर्वाद दिला.

रामू खुश झाला. वाटेत दिसणार्‍या सर्व मातांना नमस्कार करत तो बसस्टॉपवर पोचला. बसस्टॉपच्या मागच्याच बाजूला स्थानिक बस-सेवेतर्फे बांधलेल्या 'इंधनपुरवठा केंद्रा'त उभ्या असलेल्या गोमातांनाही स्पर्श करून तो बसस्टॉपपाशी आला. गोमयापासून बनवलेल्या कृत्रिम धातूपासून बनवलेल्या भक्कम अशा बसस्टॉपमधे रांगेत उभा राहून तो बसची वाट पाहू लागला. गो-इंधन स्वस्त असल्याने आणि मायलेजही भरपूर देत असल्याने त्यावर चालणार्‍या आता बसकंपन्यांची प्रति-फेरी ऑपरेटिंग कॉस्ट नगण्य झाल्याने गाड्यांच्या फेर्‍यांची संख्या भरपूर वाढली होती. तेव्हा पाचच मिनिटात मिळालेली बस पकडून रामू ऑफिसला पोहोचला.

ऑफिसमधे पोहोचताच प्रथम त्याने आपल्या टेबलवर ठेवलेल्या गोमातेच्या फोटोला हात लावून नमस्कार केला. मग टेबलवरचे फडके घेऊन तो स्वच्छ पुसून काढला. रोजच्याप्रमाणे त्याने दोन उदबत्त्या लावून ठेवल्या नि एक मिनिटभर मातेचे स्मरण केले. हे होईतो ऑफिसच्या शिपायाने गोमूत्रयुक्त गवती चहाचा कप आणून देता देताच त्याचा मदतनीस गोरक्षकर आज येणार नसल्यावी बातमी त्याच्या कानावर घातली. गोरक्षकरच्या मुलाला गो-वर आला असल्याने आज त्याच्या घरी मोठा उत्सव होणार होता, त्यामुळे आज त्याला ऑफिसला येणे शक्यच नव्हते. गो-वर हा आजार नसून तो गोमातेचा अनुग्रह आहे असे आता सर्वमान्य झाले होते. तेव्हा त्या रोगासाठी होणारे लसीकरण थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. उलट गो-वर आलेल्या व्यक्तीच्या पायावर आपल्या मुलांना घालण्यासाठी बायाबापड्यांची रीघ लागत असे. यातून गोमातेच्या आपल्या मुलांवरही अनुग्रह होईल अशी त्यांची श्रद्धा होती. इतकेच नव्हे तर या अवस्थेला इंग्रजीत chicken-pox असे संबोधून गोमातेऐवजी कोंबड्यांशी याचा संबंध जोडण्याचा मेकाल्यन कावा हाणून पाडण्यासाठी याचे नाव बदलून go-pox करावे आणि तसा आग्रह शासनाने ऑक्सफर्ड प्रेससह सर्व इंग्रजी शब्दकोशनिर्मात्यांकडे धरावा असा प्रस्ताव नुकताच संसदेसमोर मांडण्यात आला होता. परंतु इंग्रजी go च्या अर्थाने पाहिले तर याला अपेक्षित अर्थ मिळणार नाही असा दावा करत हे cow-pox करावे अशी उपसूचना विरोधकांकडून मांडण्यात आली. सदर उपसूचनेवर प्रचंड गदारोळ होऊन अखेर हा प्रस्ताव पुनर्मांडणीसाठी संसदेच्या गोभक्तिप्रोत्साहन समितीकडे पाठवण्यात आला होता.
गोमातेच्या कृपेने त्याने सकाळचे आपले काम संपवले आणि जेवणाच्या सुटीच्या वेळी इतर सहकार्‍यांबरोबर ऑफिसच्या कँटिनमधे गेला. गोरसयुक्त पौष्टिक भोजनाचे सेवन करत असतानाच सर्वसामान्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे त्यांच्या राजकारण, शासन आणि क्रिकेट या विषयावर गप्पा सुरू होत्या. गोष्टीवेल्हाळ नरेश बेलतंगडी नेहेमीप्रमाणे आपली मौलिक मते इतर सर्वांना पटवून देत होता. त्यात नुकतेच त्याला दहा गोपद्मे मिळाली असल्याने सध्या तो अधिक जोशात होता. विशेष कामगिरी बजावणार्‍यांना हे गोपद्म पुरस्कार दिले जात. जसजशी अधिक गोपद्मे मिळतील तसतशी त्याआधारे त्याला कामाच्या ठिकाणी बढती मिळे. पंचवीस गोपद्मे मिळवणारा गोसेवक हा ग्रामसेवक पदाला पात्र समजला जाई, पन्नास गोपद्मे मिळवली की तो तहसीलदार होई आणि शंभर मिळवली की कलेक्टर. राजकारणात मात्र गोपद्मांची अट नव्हती. देशसेवेत असलेल्यांना गोसेवेसाठी वेळ मिळत नसल्याने त्यांच्यापुरता अपवाद केला होता. देशपातळीवर गोपद्मश्री, गोपद्मभूषण आणि गोपद्मविभूषण असे नवे पुरस्कार चालू करण्यात आले होते. ("जुन्या पद्मश्री वगैरेंची नावे बदललीत फक्त”, असा आरोप विरोधकांनी केला होता पण मुख्य प्रधानाने इतर कुणाचेच म्हणणे मनावर घ्यायचे नसते या आपल्या 'नीती'नुसार त्याच्याकडे दुर्लक्ष केले.)

अशा तर्‍हेने उत्तम कामगिरी करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी गो-पुरस्कार देत असतानाच दुसरीकडे आता गुन्हेगारांना गो-सेवेची शिक्षा देण्यात येऊ लागली. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार कालावधी कमी जास्त होई इतकेच. तसा प्रस्ताव मांडला गेला तेव्हा 'पवित्र माते'च्या सेवेला तुम्ही शिक्षा कसे काय म्हणू शकता, असे म्हणणारे देशद्रोही आहेत असा दावा करत विरोधकांनी गोंधळ घातला नि संसद तहकूब करावी लागली होती. परंतु नंतर सत्ताधारी नि विरोधकांच्या नेत्यांची बैठक होऊन त्यात याला शीख धर्मीयांच्या (यातही धर्मीयांच्या की पंथीयांच्या यावर गदारोळ झाला पण तो दोन्हीचा उल्लेख टाळून केवळ 'शिखांच्या' असा करून मिटवण्यात आला) 'कारसेवे'च्या धर्तीवर 'गो-सेवा' असाच शब्द वापरावा असे उभयपक्षी मान्य करण्यात आले. एकदा अशी सेवा-शिक्षा भोगलेला गुन्हेगार पुन्हा गुन्हा करताना आढळत नाही असे दिसून येई. यावरून अशा गो-सेवेने तो सुधारतो असा दावा सरकारने केला होता. काही देशद्रोही मात्र शेणाच्या संगतीत राहण्याचा वीट आल्यामुळे हे घडल्याचे कुजबुजत. पण अशी टीका करणार्‍या लोकांना परदेशांतून पैसा मिळतो हे वारंवार सिद्ध झाले होते. त्यामु़ळे बहुसंख्य लोक अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करायला शिकले होते.जेवण आटपून नि बेलतंगडीचे भाषण ऐकून रामू परत आपल्या जागेवर परतला तेव्हा बरोब्बर दोन वाजले होते. जेवणाची सुटी एक मिनिटसुद्धा अधिक न घेण्याचा रामूचा शिरस्ता होता. वेळ पाळण्याबाबत बहुसंख्य गो-सेवकांप्रमाणेच तो अतिशय काटेकोर होता.

जसे रामूसारखे निष्ठावान गो-सेवक आपले तन मन धन अर्पून गो-सेवा करत होते तसेच शासनही आपल्या परीने गोरक्षणाचे आपले व्रत निष्ठेने पार पाडत होते. गोवंशावरील अत्याचारविरोधी मोहिमेचा पुढचा भाग म्हणून शेतीसाठी गोवंशाच्या खांद्यावर जू ठेवण्यास बंदी करणारा वटहुकूम नुकताच शासनाने काढला होता. त्यावर मग शेती करायची कशी असा प्रश्न करत शेतकरी कपाळाला हात लावून बसले होते. पण 'हा वटहुकूम तुमच्या हिताचाच आहे. मला तुमच्या हिताची काळजी आहे' असे सांगणारी मुख्य प्रधानाची भाषणे सर्व चॅनेल्सवरून दाखवली जात होती. शेतकर्‍यांना आणखी दिलासा देण्यासाठी वृत्तपत्रातून मुख्य प्रधानांच्या पान पान भर जाहिराती प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यात काय लिहिले आहे ते वाचू न शकणार्‍या अडाणी शेतकर्‍यांना ते रोजच्या रोज वाचून दाखवण्याचे फर्मान अंगणवाडी शिक्षकांना सोडण्यात आले होते. शेतीमंत्री 'विरोधकांची हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर चर्चा करावी' असे आव्हान देत होते' ते आव्हान स्वीकारलेल्या विरोधकांना 'गोपद्मभूषण' संपादकाच्या च्यानेलवर चर्चा करण्याची हिंमत दाखवावी असे पुढचे आव्हान देत होते. 
'अ-गोचर' सारखे शब्द व्यवहारात वापरण्यास बंदी करणारा वटहुकूम सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी जारी केला होता. असे शब्द भाषेतूनच हद्दपार करावेत म्हणून असे शब्द असलेली सारी पुस्तके ते शब्द वगळून सरकारी खर्चाने पुनर्मुद्रित करण्यासाठी आणि जुनी नष्ट करण्यासाठी सरकार निधी उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 'पो-गो' या लहान मुलांसाठी कार्टून प्रसारित करणार्‍या चॅनेलचे नाव आक्षेपार्ह असल्याने त्यावर प्रथम बंदी घालण्यात आली. परंतु गो.गो.गो. सत्यगोपालजी महाराज यांच्या सूचनेवरून त्यांनी ते 'गो-पो' असे बदलून घेतल्यानंतर त्यांना कार्यक्रमप्रक्षेपणाची परवानगी देण्यात आली. ते बंदी घालणारे पत्र आणि त्यानंतर प्रसारणास परवानगी देणारे दुसरे पत्र अशी दोन्ही पत्रे परवानगी देणारे पत्र रामूनेच टाईप करून तो ज्यांच्या ऑफिसमधे काम करत होता त्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे सहीसाठी पाठवली होती.

संध्याकाळी काम संपवून सहाच्या ठोक्याला रामू बाहेर पडला. सकाळी योजून ठेवलेली सारी खरेदी त्याने पूर्ण केली. आज दिवसभर झालेल्या कामाने बराच शीण आला होता. गेले काही महिने सांस्कृतिक कार्य मंत्रायलाकडे सतत कुठल्या ना कुठल्या पुस्तकावर, कार्यक्रमावर, सोशल माध्यमातील काही चर्चा वा फोटोंवर कारवाई करण्याची वा आधी केलेली कारवाई मागे घेण्याची धांदल खूपच वाढल्याने कामाचा ताण खूपच वाढलेला होता. त्यामुळे रामू शीण घालवण्यासाठी कधी कधी संध्याकाळी घराशेजारच्या बिल्डिंगमधे राहणार्‍या गोंद्या पाटलाला घेऊन थोडा 'घसा ओला करण्यासाठी' घराजवळच असलेल्या 'आशीर्वाद बार'ला भेट देत असे. अलिकडे त्यांच्या भेटी नियमित झाल्यामुळे गल्ल्यावरचा मॅनेजर रघ्याशी त्यांची चांगली दोस्ती झालेली होती. त्यांच्यासाठी खास ठेवणीतला माल देणे किंवा कुठला ब्रँड इथे डुप्लिकेट आहे, घेऊ नका अशी वॉर्निंग तो मित्रत्वाच्या नात्याने देत असे. सुरेंद्रच्या 'कोल्ड्रिंक हाऊसच्या उद्घाटनाला जाण्याऐवजी नुसत्याच ड्रिंक्स हाऊस ला भेट देणे अधिक चांगले' असला पीजे स्वत:शीच मारून तो आशीर्वादच्या दिशेने वळला. चालताचालताच त्याने गोंद्याला तो येणार का हे विचारण्यासाठी फोन लावला. रिंग अजून वाजतच होती तोवर तो आशीर्वादच्या दाराशी पोचलाही. गोंद्या येतोय तोवर नेहेमीची ऑर्डर देऊ अशा विचाराने तो आत शिरला. गल्ल्यावर आज रघ्या नव्हता. नव्या मॅनेजरने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. अखेर नेहेमीचे टेबल पकडून तो बसला. वेटरने पाणी आणि मेन्यू कार्ड समोर आणून ठेवले. हसून रामूने कार्ड बाजूला सरकवले आणि 'नेहेमीचे' अशी ऑर्डर दिली. त्यावर त्याच्याकडे तुच्छतेने पहात वेटरने ते मेन्यूकार्ड त्याच्यासमोर आपटले नि तो चालता झाला. बुचकळ्यात पडलेल्या रामूने ते कार्ड उघडले आणि त्यावरील नावे वाचून स्वतःच्याही नकळत त्याने जोरदार किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध पडला.
---

उपोद्घातः
कुठलीशी किंकाळी ऐकून रामू दचकून जागा झाला. आपण उशीरापर्यंत झोपलो होतो हे त्याच्या ध्यानात आले. म्हणजे आता पाहिले ते सारे स्वप्नच होते असे ध्यानात येऊन त्याला हायसे वाटले. सकाळचे नऊ वाजले होते. आज रविवार असल्याने ऑफिसची कटकट नव्हती. हे सारे स्वप्न सांगायला राजाकडे जाऊ म्हणून तो उठला नि हाती येईल तो शर्ट अंगात चढवून घाईघाईने घराबाहेर पडला. सोसायटीच्या दारातून बाहेर पडला नाही तोच त्याचे पाय जमिनीवर खिळले. हतबुद्ध होऊन तो समोर पहात राहिला. 'आशीर्वाद बार'च्या जागी 'सत्यवान गोमूत्र-गोरस सेवन केंद्र' ही पाटी त्याला वाकुल्या दाखवत दिमाखाने चकाकत होती. गल्ल्यावर कपाळाला उभे गंध लावलेला आणि 'तुळशीमाळ गळा' असलेला रघ्या... नव्हे रघुनंदन बसला होता. बाजूच्या गोठ्यात चार गोमाता विलक्षण तन्मयतेने रवंथ करताना दिसत होत्या. त्यापैकी रस्त्याच्या बाजूच्या गोमातेने रामूकडे थंड डोळ्यांनी एकदा पाहिले नि ती खच्चून हंबरली. शेपूट उंचावून गोमयाचा नवा गोळा तिने उत्सर्जित केला. जमिनीवर पडलेल्या त्या गोळ्याखाली रामूची रविवार सकाळ दबून केविलवाणी दिसू लागली.
-oOo-

रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

विचारहीन झुंडीचे माध्यमशास्त्र

'विचारवंतांवर, लेखकांवर कोणतीही बंधनं आली, की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते.' - दुर्गा भागवत.
PuraskarWapasi

गेल्या काही दिवसांत साहित्यिकांची पुरस्कार परत करण्याची 'अहमहमिका' अनेकांना टोचली आहे. माध्यमांच्या विस्फोटामुळे आणि ते लोकांना सतत व्यक्त होण्यास भाग पाडत असल्याने आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे कितीही निर्बुद्ध विधानांना कुठे ना कुठे प्रसिद्धी मिळत असल्याने निरर्गल व्यक्त होण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. तर्क, मूल्यमापनाची शून्य समज असलेलेही दिग्गजांवर बेमुर्वत शेरेबाजी करताना दिसतात. अख्लाकला घेरून मारणार्‍या जमावाचीच एक आवृत्ती सोशल मीडियांतून बस्तान बसवू लागलेली आहे. अनेक सुज्ञांना आपण अशा एका झुंडीचा भाग आहोत हे जाणवतही नाही इतका धुरळा बुद्धिभेद करणार्‍यांनी उडवून दिलेला दिसतो आहे.

'पुरस्कारांबरोबर पैसे पण परत देणार का?' हा कुत्सित प्रश्न खरंतर विचारणार्‍याचा खुजेपणाच दाखवत असतो. बहुतेक साहित्यिकांनी पुरस्काराची रक्कम परत करून यांचे तोंड बंद केले आहेच, पण 'संजय भास्कर जोशी' यांनी तर आपल्या पुरस्काराच्या रकमेच्या चौपट रक्कम त्यात घालून ती शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी खर्च करावी अशी विनंती सरकारला केली आहे.

आधी घडलेल्या काही प्रसंगांचा दाखला देत विचारलेला 'तेव्हा का नाही?' हा प्रश्न अतिशय सबगोलंकार आहे. याला 'आता का नाही?' असा प्रतिप्रश्न विचारून सहज खोडून टाकता येईल. पण प्रज्ञा दया पवार यांनी या आक्षेपाचं स्पष्ट उत्तर त्यांच्या पत्रात दिलेलं आहे. "काय खावं, प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेष परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं इथपासून भयाचं एक अनामिक सावट घेऊन जगणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत. लेखक-कलावंतांच्या मूलभूत अधिकाराचा मुद्दा अधोरेखित करीत असताना सर्वसामान्य माणसांच्या जगण्याच्या अधिकारावरच विद्यमान शासनव्यवस्थेकडून घाला घातला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध म्हणून..." असं नेमकं कारण त्यांनी दिलेलं आहे.

'एकाने (पक्ष, संस्था) दिलेला पुरस्कार दुसर्‍याला परत करून निषेध कसा होणार?' हा तर्क देणारे 'व्यवस्था' नावाचे काही असते याबाबत अनभिज्ञ असावेत. भाजपा किंवा काँग्रेस हे दोनही पक्ष 'सरकार' नावाच्या एका व्यवस्थेचा भाग आहेत हे ध्यानात ठेवायला हवे. तिचे चालक बदलत असतात, पण व्यवस्था स्थायी असते. पुरस्कार देणारे आणि न देणारे हे दोघेही त्या व्यवस्थेचे प्रातिनिधित्व करतात. 'मागच्या सरकारने काढलेली कर्जे आम्ही फेडणार नाही' असे नवे सरकार म्हणू शकत नाही ते याचमुळे. निषेध असतो तो व्यवस्थेच्या ढासळत्या नियंत्रणाचा किंवा तिने आपली जबाबदारी पार न पाडल्याचा. हे समजून घ्यायला हवे.

'पुरस्कार परत करून काय (परिणाम) होणार?' या आक्षेपाला जोडून "रस्त्यावर मोर्चा काढून काय होणार आहे", "निवेदने देऊन काय होणार आहे?", किंवा नवी चूष असलेली 'ऑनलाईन पिटिशन' करुन काय होणार आहे?" असेही प्रश्न विचारता येतात. अपेक्षित परिणाम झाला नाही, तर या कृतीही तितक्याच निरर्थक असतात जितके पुरस्कार परत करणे आहे.

पण काही परिणाम दूरगामी आणि मूलगामी असतात, बहुसंख्य लोक अपेक्षित ठेवतात तसे ’पैसे दिले नि वस्तू उचलली', असे थेट, भौतिक स्वरूपाचे नसतात. त्यातून एक मनोभूमिका तयार होत असते, जाणीव निर्माण होत असते, चार समविचारी व्यक्तींची बांधिलकी व्यक्त होत असते.

’चरखा चालवून कुठे स्वातंत्र्य मिळते का?' असा कुत्सित प्रश्न करणार्‍या यांच्या पूर्वसुरींना त्यांचे उत्तर मिळाले आहे (भले त्यांचे वंशज आज ते खोडून टाकण्याचा प्रयत्न करत असतील) या वरकरणी निरर्थक क्रियेने गांधींनी सार्‍या देशाला एका कृतीने एकत्र बांधून घातले होते. विखुरलेल्या विरोधाला तो एक धागा मिळाला, ज्याच्या आधारे गांधींनी बहुसंख्येला आपल्या मागे उभे केले होते.

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली तेव्हा ती पुन्हा छापता येते हे त्यांना ठाऊक नव्हते असे नाही. गांधींनी मूठभर मीठ उचलले, ते तेवढ्याने ब्रिटिश सरकार लगेच घाबरून जाऊन मिठावरचा कर कमी करेल म्हणून नव्हे. तो एक वैचारिक प्रहार असतो, एक निश्चित नि ठाम भूमिका घेणे असते. आजच्या प्रवाहपतितांना त्याचे महत्त्व समजणे अवघड आहे.

सारे प्रश्न केवळ सत्तेच्या वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांतूनच किंवा थेट शस्त्रबळानेच सोडवता येतात असे समजण्याच्या काळात या चिकाटीने लढण्याच्या लढाईचे महत्त्व फारसे समजणार नाही. ही दीर्घकालीन लढाई असते, पुरस्कार परत करणे ही त्याची केवळ सुरुवात असते. एक व्यापक उद्दिष्ट ठेवून त्याच्याकडे वाटचाल करायची असते. त्या उद्दिष्टाच्या जवळपास पोचता आले तरी ते यशच असते.

आजच्या जगण्याच्या धारणेत मनोभूमिकेला, विचारसरणीला तशी काही किंमत उरलेली नाही. साहित्यिकांच्या या कृतीचा परिणाम म्हणजे जनजागृती असं म्हटलं तर धावून येणार्‍या झुंडीतल्या प्रत्येक चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसेल याची खात्री आहे. कारण संघटनेऐवजी कळप, आंधळा अनुनय आणि विचारांचा अभाव सार्वत्रिक झालेले दिसते. जनजागृती आणि प्रचार - खरंतर प्रॉपगंडा - यातला फरकच बहुसंख्येला समजेनासा झाला आहे.

एका निरपराध माणसाला जमावाने घेरून मारले. एप्रिलमधे नागालँडमधेही असेच घडले होते. एका लेखकाची हत्या झाली याचा निषेधही करायचा नाही? कसा करावा हे ज्याचे त्याला ठरवू द्या की. 'आपल्या नेत्याची सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली आहे. ते मान्य करा कारण न्यायव्यवस्था सार्वभौम आणि सर्वोच्च आहे.' अशा गमजा करणारे जमावाने कायदा हाती घेण्याचा विरोध करण्याची तसदी स्वतः घेत नाहीतच, पण ज्यांना यातला व्यवस्थेला असलेला धोका दिसतो, त्यांनाच उलट खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. या दोन भूमिकांतला अंतर्विरोध न दिसण्याइतकी त्यांची समज खुजी आहे असे दिसते.

साहित्यिकांच्या पुरस्कार परत करण्याला कुचकामी म्हणणारे खरंच तसं समजतात का? साहित्यिकांनी त्यांचा स्वत:चा पुरस्कार परत केल्याने इतर कोणाच्याच मूलभूत हक्कांवर गदा येत नसते. इतरांनी काय खावं, काय ल्यावं हे सांगणारे मोकाट सुटलेल्या काळातच नव्हे तर एरवीही ही कृती अगदीच निरुपद्रवी म्हणायला हवी. ते थोडीच तुमच्या घरात घुसून मारायला येत आहेत? मग 'साहित्यिक बिनमहत्त्वाचे आहेत,' 'त्यांचे हेतू शंकास्पद आहेत' याबद्दल वारंवार त्याबद्दल बोलत, झुंडीने आक्रमण करत हे पटवण्याचा आटापिटा कशाला? बिनमहत्त्वाचे आहेत ना, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे.

पण इतकी बुद्धी नि ताकद त्यावर खर्च करताहात म्हणजे एकतर त्यांच्या कृतीची तुम्हाला भीती वाटते (ती कशाची ते टीका करणार्‍यांनी सांगायला हवे) किंवा ते बरोबर आहेत नि याचा परिणाम काय होईल हे तुम्हाला पक्के ठाऊक आहे, फक्त तो तुमच्या दृष्टीने गैरसोयीचा आहे म्हणून हा सारा आटापिटा असावा. तसे असेल तर ही कृती निरर्थक आहे हा त्यांचा दावा चक्क खोटारडेपणाचा ठरतो.

अनेकांनी एकाच वेळी गिल्ला करून, गोंधळ घालून विरोधकांचा आवाज बंद करत जिंकल्याचा आरोळ्या ठोकणे या प्रकाराला प्राचीन धर्मपरिषदांपासून चालत आलेला वारसा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या झुंडींना नवे हत्यार दिले आहे. सतत 'ब्रेकिंग न्यूज' च्या शोधात असलेली आणि कोणताही विधिनिषेध न ठेवता ती प्रसिद्ध करणारी चॅनेल्स, आपापली राजकीय बांधिलकी जपणारी छापील माध्यमे, बोलता येतं म्हणून बोललंच पाहिजे या विचाराने मोकाट सुटलेली सोशल मीडियातील विचारहीनांची झुंड आणि आपला अजेंडा राबवण्यासाठी या माध्यमांतून राजकारण्यांनी पोसलेली 'ऑर्वेलच्या नेपोलियनची बटालियन' हे आजच्या परिस्थितीला आणखीनच अस्थिर करण्यात आपला हातभार लावताना दिसतात. प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना अनेकदा 'बघून घेण्याच्या' धमक्या फोनवरून वा इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून येत असतात. आता या दोघांच्या रांगेत इतर अनेकांचे नंबर लागताना दिसत आहेत.

साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे हे प्रतीकात्मक आहे, बदलत्या, असहिष्णु परिस्थितीत सैरभैर झालेल्या सर्वसामान्यांना 'आम्ही तुमच्याबरोबर आहोत' हा दिलासा देणे आहे. सरकारने दिलेला पद्मश्री नाकारत आणीबाणी विरोधात उभ्या ठाकलेल्या त्यासाठी तुरुंगवास भोगणार्‍या दुर्गाबाईंसह, पु.ल. देशपांडे, तेंडुलकर यासारख्या साहित्यिकांनी राजकीय दडपशाही विरोधात आवाज उठवला होता. आजच्या काळात सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणारे अनेक जण त्यावेळच्या या साहित्यिकांच्या कार्याबद्दल आजवर गौरवाने बोलत आले आहेत.

मौन साधून बसलेल्या अडवाणींच्या पिढीकडून, किंवा त्यांच्या पुढच्या पिढीकडूनही यावर 'बाईट' घ्यावा असे इतक्या बोलभांड चॅनेल्सपैकी एकालाही वाटलेले नाही. हे न वाटणेसुद्धा मोकाट सुटलेल्या झुंडीच्या माध्यमशास्त्राला बळ पुरवणारे ठरले आहे.

- oOo -

(पूर्वप्रकाशित: दिव्य मराठी रसिक, १८ ऑक्टोबर २०१५)

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

गण्या आणि मी - २

आमचा सातवी पास असलेला गण्या हुशार आहे. माझ्या तर्कातल्या चुका तो अचूक काढतो आणि मला जमिनीवर आणत असतो. आता हेच पहा ना, परवा कॉ. पानसरेंच्या हत्येच्या संदर्भात म्हणे 'सनातन'च्या कुण्या कार्यकर्त्याला अटक झाली. आपला होरा बरोबर ठरला म्हणून पुरोगामी म्हणवणारे माझ्यासारखे खुश झाले. 'बघ आम्ही म्हणालो तेच बरोबर ठरले की नाही.' गण्याकडून आमची नेहेमीची, बदनामीपुरती खाण्याची पानपट्टी घेता घेता मी त्याला ऐकवले. फडक्याला हात पुसता पुसता गण्या क्षणभर थबकला, मग माझ्याकडे ढुंकूनही न पाहता समोर ठेवलेले पान उचलून त्याला चुना फासू लागला.

चुना, कात वगैरे लावून झाल्यावर आवश्यक ती पंचद्रव्ये त्यात टाकून त्याने ते पान 'शीलबंद' केले आणि आधीच लावून ठेवलेल्या सुमारे तीसेक पानांच्या ओळीत जोडून दिले. पुन्हा एकदा फडक्याला हात पुसता पुसता तो म्हणाला

'तुम्ही पुरोगामी लोक बावळट आहात असं मी म्हणतो ते अजिबात चूक नाही.'

गण्या  जेमतेम सातवी पास असला आणि माझ्याहून दहा वर्षांनी लहान असला तरी तो मला... मलाच का त्याच्या दुप्पट वयाच्या अनेकांनाही बावळट म्हणण्याचा हक्क राखून आहे.

'म्हणून म्हणत असतो, साल्याहो आधी राजकारण शिका.'

मी राजकारणात नसल्याने हा टोला मला नसल्याने मी सुटल्याचा निश्वास टाकला.

'हे राजकारणी तुम्हाला बोल बोल म्हणता घुमवतात. अरे तो समीर गायकवाड हा रेड हेरिंग आहे.'

गण्या हा आमच्यासारखाच जन्मजात पुणेकर असल्याने 'हे तुला कसे ठाऊक' हे विचारण्याचा गाढवपणा मी मुळीच करणार नव्हतो. आणि हे 'रेड हेरिंग' वगैरे तुला काय ठाऊक विचारणे म्हणजे पुढच्या माहितीपूर्ण संवादाला मुकणे नक्की असल्याने मी मुकाट त्याचे पुढचे प्रवचन ऐकू लागलो.

'अरे हे राजकारणी बेटे बेरकी...' गण्या हाती सापडलेल्या बकर्‍याला आता एकदम ठार न करता हलाल करण्याच्या उत्साहाने माहिती सांगू लागला. "तुम्ही लेको बोंबलत होतात ना सनातन च्या नावे; आणि 'वर्ष झाले, दोन वर्षे झाली, अजून कसे खुनी सापडत नाहीत?' म्हणून, मग घ्या तुम्ही म्हणत होतात तस्सा सनातन वाला पकडला पहा. आता गप पडा.  तपास होईल, खटला उभा राहिल, यथावकाश पुराव्याअभावी तो निर्दोष सुटेल. दरम्यान 'प्रकरण न्यायप्रविष्ट आहे' म्हणत सरकार हात झटकून टाकेल. तो निर्दोष सुटेल तेव्हा सनातनवाले आणि तुम्ही ज्यांना 'भक्त' म्हणता ते कासोटा सुटेपर्यंत नाचतील, तुम्ही कसे हिंदूद्वेष्टे आहात हा त्या घटनेशी संबंध नसलेला आपला निष्कर्ष पुन्हा एकवार बोंबलून सांगतील.

आणि तुम्ही...

त्या दरम्यानच्या काळात घडलेल्या अशाच एखाद्या घटनांचा निषेध करण्यात आपली आधीच क्षीण झालेली शक्ती खर्चण्यात व्यग्र असाल. प्रत्येक पुरोगामी पार्टीचा, विद्यार्थी संघटनेचा तेव्हाही आपापला वेगळा मोर्चा असेल. कदाचित तोवर आणखी चार दोन नवे पक्ष वा संघटना उभ्या राहिलेल्या असतील. प्रत्येक मोर्चात दहा ते पंधरा माणसे असतील, प्रत्येक मोर्चा कुठूनतरी सुरू होऊन एस. एम. जोशी फाउंडेशनपाशी किंवा साने गुरुजी स्मारकापाशी विसर्जित होईल. एखाद्या पत्रकाराच्या हातापाया पडून त्याची बातमी कुठल्याशा पेपरमधे छापून आणून तुमचे नेते कृतकृत्य होत 'त्या पार्टी'च्या मोर्चात पंधराच लोक होते, आमच्याकडे दोन जास्त आले याबद्दल आपली पाठ थोपटून घेतील. आणि गल्लीबोळातले, तुमच्या त्या फेसबुकवरचे तुझ्यासारखे तज्ज्ञ कधीकाळी कुठल्याशा पुरोगामी वर्तुळात उठबस होती एवढ्या बळावर सगळ्या जगाला अक्कल शिकवणार्‍या नोट्स लिहीत बसतील. साल्याहो जोवर तुमची संघटना भक्कम नाही, फॉलोअप घेण्याइतकी चिकाटी आणि नेटवर्क उत्तम नाही तोवर तुम्ही प्रत्येक घटनेनंतर टेंबलायचे कर्मकांड पार पाडण्यापलिकडे काही दिवे लावू शकत नाही.

आम्ही पानपट्ट्या विकतो पण आमचीही शहरात एकच संघटना आहे. आम्ही सुमारे पंचवीस ते तीस हजार लोक आहोत, मराठी माणसांपासून यूपीच्या भैयापर्यंत सगळीकडून लोक आले आहेत आमच्याकडे. आमच्यांत मतभेद नसतील का? पण अजूनही आमची एकच संघटना आहे. तुम्ही लेको श्राद्धाच्या पिंडासारखे पक्ष नि संघटना काढून आपापल्या विझत्या चुली फुंकत बसलेले आहात...."

गण्या पोटतिडकीने बोलत होता, म्हणूनच मला त्यांला थांबवावेसे वाटले नाही. आणि तो बोलत होत्या त्या तसंही आक्षेप घ्यावा असं काही नव्हतंच. आश्चर्य हे की पानाच्या ठेल्यावर बसून गण्या हे जे सहज पाहू शकतो हे अनेक वर्षे पुरोगामित्वाची दुकानं चालवणार्‍यांना कसं ध्यानात येत नाही, की येतं पण शहाणपणापेक्षा अहंकार अधिक मोठा वाटतो? "आपल्या विहित कार्याची सीमा ओलांडून जाऊन भलत्या ठिकाणी तोंड उघडण्याचा किंवा न झेपणारी लढाई लढण्याचा अगोचरपणा ते का करतात? जोवर या प्रश्नांची उत्तरे ते शोधून काढत नाहीत तोवर एखादा समीर गायकवाड समोर करून त्यांचे तोंड गप्प करण्याचा सोपा उपाय सत्ताधारी वापरत राहतीलच; आणि 'संघटनेवर बंदी घाला' हा जुनाट, कालबाह्य आणि सर्वस्वी अपरिणामकारक उपाय करावा अशी जुनाट मागणी, जुनाट नेत्यांनी करण्यापलिकडे काही घडेल असे वाटत नाही. अशा संघटनांच्या चिकाटीने होणार्‍या प्रसाराला जशास तसे उत्तर देण्याची कुवत तुम्ही विकसित करत नाही तोवर तुमच्या चार शिव्यांनी किंवा हातभर लेखांनी त्यांना काही फरक पडणार नाही. अर्थात 'आपण काहीतरी करतो' इतके समाधान स्वतःला देण्यापुरते नि तो 'स्टँप' आपल्या चिकटवहीत लावण्याइतकेच श्रेय तुम्हाला पुरेसे आहे असे असेल तर जे चालू आहे ते उत्तमच आहे. पण मग लेको 'बदल घडत नाही, हे सारे तुमच्यासारख्यांनी चुकीचे नेते निवडल्यामुळे म्हणून.' असे त्याचे खापर फोडायला माझ्याकडे येऊ नकोस."

एक पानपट्टी खाताखाता इतके शहाणपण आले हा बोनसच म्हणायचा. त्या तंद्रीत सुटे पैसे परत घ्यायचे विसरून मी घरी परतलो. माझी खात्री आहे, माझ्या पाठीमागे गण्या गालातल्या गालात हसत असणार.

-oOo-

रविवार, २० सप्टेंबर, २०१५

'हार्दिक'चा राजकीय तिढा

PatidarAgitation

हार्दिक पटेल या बावीस वर्षांच्या युवकाने भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिकदृष्ट्या पुढारलेल्या पटेल-पाटीदार समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेले काही दिवस आंदोलन चालवले आहे. या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी यांच्या सर्वशक्तिमान होऊ पाहणार्‍या नेतृत्वाला त्यांच्या राज्यातूनच आव्हान मिळाल्याने त्यांच्या आणि पर्यायाने भाजप सरकारच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होतील, याबद्दलही बोलले जात आहे. आंदोलनाचा मुद्दा 'जात' या घटकाशी निगडित आहे आणि म्हणून त्याच्या यशापयशाचा परिणाम गुजरातमधे आणि एकुणच देशाच्या सामाजिक परिस्थितीवर कसा घडेल याचा अभ्यास अनेक समाजशास्त्रज्ञ करतीलच. पण देशाच्या राजकारणावरील दीर्घकालीन परिणामांचा विचार होताना मात्र दिसत नाही.

भारतीय राजकारणावरच्या दूरगामी परिणामाचा विचार करताना दोन महत्त्वाचे मुद्दे ध्यानात घ्यायला हवेत. पहिला म्हणजे अशा आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यांबाबत असलेले राज्यकर्त्यांचे नाकर्तेपण, असलेली बोटचेपी भूमिका. दुसरा अधिक महत्त्वाचा म्हणजे गुजरात हे आणखी एक राज्य स्थानिक राजकारण्यांच्या ताब्यात जाण्याची बळावलेली शक्यता. हा दुसरा अधिक धोकादायक आहे, पण सर्वसामान्यांना हा धोका जाणवत नाही आणि म्हणूनच राजकारणाच्या अभ्यासकांना याची दखल घ्यावी लागणार आहे.

अशा प्रकरणात ठाम भूमिका घेऊन एका जमातीची - गुजरातमधे तर पटेल लॉबीची - नाराजी ओढवून घेण्याचे धाडस कोणताही राजकीय पक्ष करणार नाही हे उघड आहे. तोंडाने ते कितीही शाहू-फुले-आंबेडकरांचे घेत असले, किंवा छप्पन्न इंची राष्ट्रप्रेमाचा ढोल पिटत असले, तरी वास्तवात सामाजिक हितापेक्षा, राष्ट्रहितापेक्षा वैयक्तिक आणि राजकीय हितालाच प्राधान्य देणारे शासक आपल्याला वर्षानुवर्षे लाभले आहेत, आपणच ते निवडले आहेत हे कटू सत्य आहे. 

अन्य राज्यात अशाच स्वरूपाच्या झालेल्या आंदोलनांचे फलित पाहता यातून राजकीय बदल फारसे घडणार नाहीत असा तर्क बहुतेक सारे - प्रामुख्याने शासक - करतील अशी शक्यता दिसते. गुज्जरांचे आंदोलन असो, जाटांचे असो की महाराष्ट्रात मराठ्यांचे असो त्या त्या राज्यांनी अशा आंदोलनकर्त्यांना हवे त्यापैकी बरेचसे देऊ करून अप्रत्यक्षपणे चेंडू न्यायव्यवस्थेकडे टोलवून हात झटकले होते. हा अंगचोरपणा अशा समस्यांना चिघळत ठेवणार आहे आणि त्यातून स्थानिक राजकारणाला बळ मिळणार आहे.

या अंगचोरपणाचे प्रत्यक्ष फलित 'आरक्षणाच्या पातळीवर जैसे थे पण राजकीय पातळीवर लाभ' अशा स्वरूपाचे असेल याची शक्यता मराठे, जाट, गुज्जर यांच्या आंदोलनाचे फलित पाहता दिसते. पण हार्दिक हा त्याआधारे स्वतःचे राजकीय स्थान निर्माण करेल हे आता नक्की झाले आहे. त्याचे बोलविते धनी कोणीही असले, तरी इतका गवगवा झाल्यावर त्या धन्यांच्या तंत्राने तो वागेल याची शक्यता कमी दिसते. सोयीची वेळ येताच त्यांना झुगारून तो स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करेल याची शक्यता बरीच आहे. या शंकेला बळकट करणारे दोन संकेत मिळाले आहेत.

पटेल समाज वर्षानुवर्षे आर्थिक नि राजकीय सत्ता हाती राखून आहे. मोदींच्या उदयानंतर या समाजाला आपले वर्चस्व कमी होत असल्याची भावना निर्माण झाली. किंवा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 'आपला अपमान म्हणजे आपल्या समाजाचा अपमान' या वारंवार वापरल्या जाणार्‍या तंत्राचा वापर करत केशुभाईंसारख्या अडगळीत पडलेल्या बुजुर्गांनी ती रुजवली, असंही असेल. आजवर 'आपल्या मर्जीतले शासन' पुरेसे वाटणार्‍या पटेलांना अधिक असुरक्षितता भासू लागल्याने त्यांची मागणी 'आपले शासन' पर्यंत वाढली असण्याची शक्यता दिसते. याचे संकेत खुद्द हार्दिकनेच दिले आहेत. आपण बाळासाहेब ठाकरेंना आपले आदर्श मानतो, आपण सत्ता राबवण्यापेक्षा रिमोट कंट्रोल हाती ठेवण्याची महत्त्वाकांक्षा राखून आहोत हे त्याने स्पष्ट सांगितले.

इतकेच नव्हे तर हार्दिक हा केवळ गुजरातपुरते राजकीय बस्तान बसवून शांत बसेल असे दिसत नाही. त्याची महत्त्वाकांक्षा देशपातळीवरील राजकारणात आपले वजन निर्माण करण्याची आहे. त्यामुळे तो गुजरातेत पटेल, हरयानामधे जाट, राजस्थानात गुज्जर, महाराष्ट्रात मराठे अशा जातीय समीकरणाच्या माध्यमातून एक नवीच मोट बांधू पाहतो आहे ती बरीचशी तिसर्‍या आघाडीच्या धर्तीवर चालेल अशी शक्यता दिसते. पण ही केवळ जातीय समीकरणाच्या आधारे उभी रहात असल्याने अधिक धोकादायक ठरणार आहे. प्रत्येक जातीने आपापल्या स्थानिक पक्षाच्या माध्यमातून आपल्या राज्यात सत्ताधारी व्हावे आणि देशपातळीवर एकत्र येऊन एक शक्ती म्हणून काम करावे असा काहीसा रोख असेल असे दिसते. 

स्वातंत्र्यानंतर गेली कित्येक वर्षे मागास जाती-धर्मांची एकजूट हे सत्ताकारणाचे समीकरण काँग्रेससह, समाजवादी प्रभावाच्या पक्षांनी राबवले. मायावतींनी केलेल्या तथाकथित 'सोशल-एंजिनियरिंग'चा अपवाद वगळता एक वोट बँक म्हणून उच्चवर्णीयांकडे पाहण्याचे धाडस त्या उच्चवर्णीयांच्या लाडक्या भाजपनेही इतक्या उघडपणे कधी केलेले नाही. आज त्याच उच्च जातींना 'आर्थिक मागासलेपणाचा' टिळा लावून हार्दिक नवेच समीकरण जन्माला घालतो आहे. राजकारणात एक प्रकारच्या फेडरल पक्षाची स्थापना करण्याकडे त्याची वाटचाल चालू आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाने जसे स्थानिक प्रभावाच्या नेत्यांची मोट बांधून एक पक्ष जन्माला घातला तसे काहीसे होईल असे वाटते आहे.

हा सारा खटाटोप करत असताना ही अराजकीय युती असेल, मला राजकीय महत्त्वाकांक्षा नाही असे तो ठासून सांगतो आहे. महाराष्ट्रात 'शिवसेना' स्थापन करताना बाळासाहेबांनी आणि तमिळनाडूत पेरियार यांनी 'जस्टिस पार्टी' ची स्थापना करताना हीच भूमिका घेतली होती. पण योग्य वेळ येताच त्यांनी आपापल्या संघटनांचे राजकीय पक्षात रूपांतर केले हे विसरून चालणार नाही. तमिळनाडूत आज फक्त स्थानिक द्रविड पक्षांचेच अस्तित्व शिल्लक राहिले आहे, महाराष्ट्रातही काँग्रेसला मागे सारून शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे हे ध्यानात घेतले तर हार्दिकच्या आजच्या वाटचालीची दिशा लक्षात येईल. 

या तर्काला पुष्टी देणारा मुद्दा म्हणजे आपली मागणी मान्य न झाल्यास २०१७ मधे राज्यात कमळ फुलू देणार नाही अशी धमकीच त्याने दिली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी तो राज्यातील एकमेव पर्याय असलेल्या आणि आधीच क्षीण झालेल्या काँग्रेसला पाठिंबा देईल ही शक्यता धूसरच दिसते. आणि त्याने दिला तरी त्याच्या पाठिंब्यावर उभे राहणे पारंपारिक मागास मतदारांवर उभ्या असलेल्या काँग्रेसला परवडणारे नाही. "आरक्षण व्यवस्थेमुळे आपला देश ६० वर्षे मागे गेला असून त्यामुळे त्याच्या महाशक्ती बनण्याच्या शक्यतेमध्ये अडथळे येत आहेत" असे म्हणणारा हा नेता आरक्षण या व्यवस्थेलाच सुरुंग लावायला निघालेला आहे हे अगदी उघडच आहे. असा निखारा कोणत्याही राजकीय पक्षाला आपल्या पदरी बांधून घेणे तसेही अवघड आहे. तेव्हा त्याची स्वतंत्र राजकीय वाटचाल हा अपरिहार्य परिणाम आहे.

गुजरात हार्दिक पटेलच्या नव्या पक्षाच्या पारड्यात काही प्रमाणात वजन टाकेल आणि तो भाजपाला पर्याय म्हणून उभा राहील आणि अन्य राज्यांत झाले तसे काँग्रेस या राज्यांत अस्तंगत होईल असे दिसते आहे. आज फक्त मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात ही तीनच राज्ये (जेडीएसचा अपवाद वगळला तर कर्नाटक) प्रभावशाली स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून मुक्त आहेत. देशाच्या सर्व बाजूंच्या सीमावर्ती भागात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहेच. तमिळनाडू, तेलंगण, प. बंगाल या राज्यांत भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा मागमूस उरलेला नाही. अन्य राज्यांत स्थानिक पक्ष एकतर सत्ताधारी आहेत किंवा विरोधक तरी. या रांगेत सामील होणारे गुजरात हे मध्यभारतातील पहिले राज्य ठरू शकते.

पण मुळात स्थानिक पक्ष असण्यात काय वाईट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो खासकरून टोकदार अस्मितांच्या काळात जगताना अधिकच प्रकर्षाने! . याला अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे स्थानिक हितांना प्राधान्य, त्यामुळे देशहिताचा दिला जाणारा बळी. आज आपण स्वीकारलेल्या भांडवलशाहीत जसे 'व्यक्तीने आपापले हित जोपासले की देशाचे हित आपोआप होते' असा तद्दत खोटा प्रचार तिचे लाभार्थी करतात तसेच राज्यांची प्रगती झाली की देशाचीही होतेच की असा दावा केला जाऊ शकतो. 

पण असा दावा करणारे एक विसरतात की जेव्हा सर्वांना पुरेसे उपलब्ध असते तेव्हा हे कदाचित खरे असेलही, पण जेव्हा एकुण गरजेपेक्षा उपलब्धता कमी असते - आणि बहुधा असतेच - तेव्हा एकुण राष्ट्रीय हिताहितापेक्षा स्वत:चे संस्थान बळकट करण्याकरतात राज्यांच्या स्थानिक क्षत्रपांची रस्सीखेच सुरू होते त्यातून देशाचे हित मुळीच साधले जात नाही. साधनसंपत्तीचे गरजेच्या सर्वस्वी विपरीत प्रमाणात वाटप होण्याची शक्यता बळावते. कारण आता ज्याची बार्गेनिंग पॉवर जास्त त्याला वाटा अधिक मिळतो, गरजवंताची तशी ताकद नसेल तर त्याला करवंटीदेखील हाती लागत नाही. कारण देशपातळीवर व्यापक दृष्टीकोन घेणे शक्य होत नाही. सारी ताकद स्थानिक खेचाखेचींशी झगडण्यात खर्च होते.

केंद्रात आज विरोधी पक्ष विस्कळित स्थितीत आहेत. काँग्रेसची जोरदार पीछेहाट झाल्यामुळे ज्यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे, असे स्थानिक पक्ष आपापली किंमत अधिकच ताठ्याने वसूल करू लागले आहेत आणि भविष्यातही करत राहतील. 

संसदेतील गदारोळावर तोडगा म्हणून सपाने भाजपाशी संधान बांधून काय काय पदरात पाडून घेतले ते आपल्याला कळणार नाही. यातून विरोधकांची आघाडी मात्र कमकुवत झाली. पूर्वी काँग्रेस सत्ताधारी असलेल्या काळातही असेच प्रकार सपाने केले आहेत. (त्यांना 'समाजवादी पार्टी' ऐवजी 'साटेलोटे पार्टी'च म्हणायला हवे खरे तर.) अशा छिन्नविच्छिन्न विरोधी पक्षामुळे सत्ताधार्‍यांचे फावते, पण तोपर्यंतच जोवर ते स्वतः पुरेसे बळ राखून आहेत! 

एकच विरोधी पक्ष असण्यापेक्षा स्थानिक पातळीवरचे बरेच पक्ष असले, की त्यांचे एकत्रित बळ कमी होते नि फोडाफोडीचे राजकारण करून आपले आसन भक्कम करता येते असा भ्रम काँग्रेसने जोपासला होता. पण त्याचा परिणाम असा झाला की त्या पक्षांनी अनेक राज्यांतून काँग्रेसलाच हद्दपार केले आहे. याचे कारण म्हणजे हे बहुतेक सारे पक्ष मध्यममार्गी वा समाजवादाकडे झुकणारे होते, त्यामुळे ते काँग्रेसच्याच मतपेढीवर पोसले गेले होते. 'तिसरी आघाडी' नामक खिचडी शिजवण्यात काँग्रेसने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेतलेला सहभाग त्यांच्याच मुळावर आला आणि त्यातील लहान लहान तुकडे अखेर त्यांचीच भूमी बळकावून बसले आहेत.

हार्दिक एकीकडे पटेलांना आरक्षण द्या किंवा आरक्षणच रद्द करा अशी मागणी करत एक प्रकारे उच्चवर्णीयांची एकजूट करू पाहतो आहे तर दुसरीकडे गुजरातचा 'बाळासाहेब ठाकरे' होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत गुजरातच्या अस्मितेला फुंकर घालून चेतवतो आहे तर तिसर्‍या टप्प्यात 'हे राज्य हिंदूंचे आहे, मुस्लिमांनी इथे सौहार्दाने रहावे.' असे म्हणत हिंदुत्ववादी मतांना चुचकारतो आहे. या तीन मुद्द्यांचा विचार करता हार्दिकचा स्थानिक पक्ष हा भाजपाच्या मतपेढीवर पोसला जाईल याचे संकेत मिळत आहेत. 

पण यातून मोदी किंवा भाजप विरोधकांनी आनंदी होणे आत्मघातकीच ठरेल. ज्या कारणासाठी एकसंध पाकिस्तानचा डोलारा अस्तित्वात असणे भारताला आवश्यक आहे, त्याच कारणासाठी मोदीविरोधकांना गुजरातमधे भाजपाला पर्याय म्हणून आणखी एक स्थानिक पक्ष उभा राहू देणे परवडणार नाही. आधीच क्षीण झालेले त्यांचे बळ आता एकाऐवजी दोन पक्षांशी लढण्यात अधिकच क्षीण होणार आहे, काँग्रेसमधील सत्तातुरांना आता भाजपऐवजी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला तर उंदरांनी बुडते जहाज सोडण्याचा वेग वाढणार आहे.

हार्दिकचे राजकीय यश हे तीन दिशांनी धोक्याची घंटा ठरू शकते. पहिले म्हणजे जातीय ध्रुवीकरण, आजवर पुरोगामी सामाजिक राजकीय संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेल्यांना विरोध करण्यासाठी तथाकथित उच्चवर्णीयांची आघाडी उभी राहिल्याने समाजात उभी फूट पडू शकते. दुसरे, आजवर स्थानिक पक्षांच्या प्रादुर्भावापासून बराचसा दूर असलेला मध्यभारतही त्या 'काँग्रेस-गवता'च्या कवेत येतो. आणि तिसरे सर्वात धोकादायक म्हणजे काँग्रेससारख्या मध्यममार्गी पक्षाचे अस्तित्व आणखी क्षीण होत संकुचित स्थानिक वा जातीय पक्ष की धर्माधिष्ठित राजकारण करणारा पक्ष असे दोनच पर्याय आपल्यासमोर राहतात.

म्हणून भाजप आणि काँग्रेस या दोघांनी परस्परसहकार्याने ही नवी डोकेदुखी वाढू नये याची काळजी घ्यायला हवी. हा गुंता मोदींना सोयीच्या प्रकारे सुटावा अशी प्रार्थना मोदीविरोधकांनीही करणे गरजेचे झाले आहे असा गंमतीशीर राजकीय तिढा हार्दिकच्या या आंदोलनाने निर्माण केला आहे.

- oOo -

शनिवार, १२ सप्टेंबर, २०१५

नासा म्हणे आता

या महिन्यात एक अश्मखंड पृथ्वीवर आदळून पृथ्वीवरील बरीच मानवसृष्टी नष्ट होणार आहे असं 'नासा'च्या सूत्रांनी जाहीर केले आहे. त्यातून जे वाचतील त्यांना नोवेंबरमधे पंधरा दिवसांची रात्र अनुभवायला मिळणार आहे! नासाने मर्मेड्स अथवा मत्स्यस्त्रीच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले आहे. चेर्नोबिलनंतरच्या किरणोत्साराचा मागोवा घेताना शेणाने सारवलेल्या एका झोपडीत शून्य किरणोत्सार असल्याचे पाहून नासाच्या आण्विक संशोधकांनी  गायीच्या अलौकिकत्वाबद्दल गौरवोद्गार काढले होते. नासाच्या उपग्रह अभ्यास केंद्राने भारत नि श्रीलंकेला जोडणारा रामसेतू आहे हे सिद्ध केले आहे. नासानेच भारतीय शिक्षणपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून ती जगात सर्वात श्रेष्ठ असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. संगणक आणि भाषा याबाबत संशोधन करणार्‍या नासा'च्या शास्त्रज्ञांना संस्कृत ही संगणकासाठी आदर्श भाषा आहे असे वाटते...

संस्कृत ही संगणकाला योग्य भाषा आहे म्हणणार्‍या प्रत्येकाला मी विचारत आलो आहे की नक्की कशी ती सांग बाबा मला. बहुतेकांकडे यावर उत्तर नसते. मग सोपा उपाय म्हणून कुठल्या तरी देशी लेखकाचा दाखला दिला जातो ज्याने नासाचा दाखला दिलेला असतो. म्हणजे 'मी त्याच्याकडून ऐकले, पुरावे काय ते त्याच्याकडून घ्या' म्हणून झटकून टाकले जाते. असले अठ्ठावीस इंची छाती फुगून छप्पन इंची झाल्याचा आभास निर्माण करणारे, सनसनाटी दावे वॉट्सअ‍ॅप, ईमेल किंवा सोशल मीडियावर शेअर करणारा त्याच मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून त्याची सत्यासत्यता तपासून बघण्याच्या फंदात पडत नाही. कारण हा दावा 'खरा असावा' अशी त्याची इच्छा असते. भाषा, व्याकरण, अंतर्गत वाहतूक, आहारशास्त्र, अंतराळविज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इ. पासून थेट जीवनशैली पर्यंत वाटेल त्या क्षेत्रातील दावे 'नासा'च्या हवाल्याने केला जातो. हे 'नासा' नावाचं प्रकरण नक्की कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करतं असा प्रश्न त्या दाव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांना कधी पडत नाही.

अशा दाव्यांना ताबडतोब आणि वेगाने प्रसिद्धी मिळण्याची बरीच कारणे असतात. एक म्हणजे असे दावे सुप्त स्वार्थी हेतूने, प्रॉपगंडा म्हणून हेतुत: प्रसारित केले जातात. त्यामुळे त्याच्या मागे एक मशीनरी काम करत असते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अशा सोयीच्या बातम्या वारंवार नि विविध प्रकारे प्रसारित करून गोबेल्सने हिटलरच्या नृशंस नि पाशवी महत्त्वाकांक्षांना राष्ट्रप्रेमाची देखणी आणि अभिमानास्पद भासावी अशी झालर प्रदान केली होती. त्याच्या आत्मघाती आणि जनताद्रोही पावलांना नव्या क्षितिजाकडे नेणारी द्रष्टी पावले समजली जावीत इतका बुद्धिभेद सहजपणे साध्य केला होता.

अनेकदा अशा दाव्यांमधे अर्धा भाग खरा असतो आणि अजेंड्याचा भाग हळूच चिकटवून खर्‍याबरोबर खोटे खपवण्याची चलाखी असते. भारत नि श्रीलंका यांना जोडणार्‍या खडकाच्या रांगा समुद्रातळी दिसतात हे उपग्रह छायाचित्रांच्या सहाय्याने नासाने शोधून काढले हे खरे. पण तो रामसेतू आहे हे नासाने सांगण्याचे कारणच नाही. पण सांगताना या दोन गोष्टी जोडून रामसेतूचा शोध नासाने लावल्याचा ग्रह करून दिला जातो, ज्यातून त्या निराधार दाव्याला उगाचच एक शास्त्रीय आधार असल्याचा आभास निर्माण करता येतो.

आणखी एक कारण म्हणजे माणसाला उपजत असलेली सनसनाटीपणाची चूष, जिभेवर सर्पदंश करून घेण्याचे व्यसन असावे तसे सतत हवाहवासा वाटणारा प्रलयघंटानाद किंवा विनाशाची हूल. असा प्रलयघंटानाद रुढीप्रधान देशात अधिक फायदेशीर ठरतो कारण कोणत्याही भीतीच्या आधारे प्रतिगामी लोक आपला निसटू पाहणारा आधार बळकट करत नेत असतात.

तिसरे कारण नव्या जगाचा सतत प्रवाही राहण्याचा अट्टाहास आणि धंदेवाईक गणिते! संगणकावरील वायरस नष्ट करण्यासाठी अँटि-वायरस प्रणाली विकसित करण्यात आल्या आणि मग त्यांनी जिवंत रहावे म्हणून अशा वायरसेसचा पुरवठा चालू ठेवणे अनिवार्य होऊन बसले. तसेच संगणक माध्यमांना ईमेल, सोशल मीडिया, वॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना रहदारीचा वेग राखावा लागतो, तरच त्यातून जाहिरातींचे भरपूर पीक काढता येते. अशी रहदारी राखण्यासाठी चटपटीत, चटकन देवाणघेवाण कराव्याशा वाटाव्यात अशा बातम्या सतत प्रसारित केल्या जात असतात. व्यवसाय नि फायदा म्हटले तर खर्‍याखोट्याची, नीतीकल्पनांची चाड बाळगायची नसते हे तर आता सर्वमान्यच झाले आहे.

भूतकाळाबाबत करण्याचे सोयीचे, चलाखीचे दावे करण्यासाठी जुन्या ग्रंथांचा, तथाकथित अभ्यासकांचा आधार घेणे हे नियमित वापरले जाणारे हत्यार आहे. 'अमुक ग्रंथात' सांगितले आहे असे म्हटले की ऐकणारा निश्चिंत होतो नि आणखी शंभर जणांपर्यंत हे पोचवून देतो. ही साखळी दूरवर पसरते नि पाहता पाहता खोट्याला खरे मानले जाऊ लागते. गंमत म्हणजे या सार्‍या साखळीतली एकही व्यक्ती तो अमुक ग्रंथ उघडून पाहण्याची, त्या दाव्याची खातरजमा करून पाहण्याची तसदी घेत नसतो. त्या ग्रंथाचे नावच लोकांना आश्वस्त करण्यास पुरेसे असते. ग्रंथ उघडून पाहण्याचे सोडा मुळात त्या नावाचा ग्रंथ अस्तित्वात आहे की नाही इतकी खातरजमा करण्याची तसदीदेखील घेतली जात नाही.

ग्रीसच्या आर्थिक संकटाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या एका मित्राने कुठल्याशा 'प्रक्षिप्तपुराणा'ने आपल्याकडे या संकटाचे भाकित केल्याचा दावा केला. अतिशय आक्रमक भाषेत आपल्याकडचे इतके ज्ञान तुम्ही नाकारूच कसे शकता असे प्रतिपादन करणारी पोस्ट लिहिली. त्यासाठी त्याने एका संस्कृत पंडित मित्राकडून संस्कृत श्लोक लिहून घेतला, ज्यातून जर्मनीची राणी मेर्केल ही ऐतिहासिक देशाला संकटात लोटील असा अर्थ ध्वनित होत होता. कायम राष्ट्रप्रेमाच्या ज्वरात जगत असलेल्या अनेकांनी तो दावा सोशल मीडियांतून, वॉट्सअ‍ॅपवरून दणादण शेअर केला होता. 'प्रक्षिप्त' नावाचे पुराण अस्तित्वात आहे का याची खात्री करून घेण्याची तसदीही त्यांनी घेतली नव्हती. किंबहुना त्या नावावरूनच हा दावा खोटा असल्याशी शंका खरंतर संस्कृतच्या नावे भंडारा उधळणार्‍यांना यायला हवी होती. यांचे राष्ट्रप्रेम वगैरे किती अडाणीपणाचे असते हे सहज उघड झाले.

नव्या पिढीला अधिक विश्वासार्ह वाटावे म्हणून आता 'नासा'ला वेठीला धरण्यात आले आहे.  जसे पुराणग्रंथांची, धार्मिक वा राजकीय नेत्याची साक्ष काढावी तसे 'नासा'ची साक्ष काढली जाते. उद्देश हा की याला तुम्ही आव्हान देऊ नये, ते प्रमाण मानावे. माणसे अधिक खोटारडी झाली आहेत की केवळ माध्यमविस्फोटांमुळे त्यांचे ते खोटारडेपण आपल्यापर्यंत पोचू लागले आहे कोण जाणे. किंवा मुळातच अशा अस्मितेच्या आणि गूढ धोक्यांच्या कथांची, रूढ जगाच्या नियमाबाहेरच्या घटनांची चूष एखाद्या व्यसनाची चटक लागावी आणि त्याची वारंवारता वाढत जावी तसे होते आहे.

ऑस्कर वाईल्ड म्हणाला होता 'एखादा दावा विश्वासार्ह आहे की नाही हे ठरवताना ब्रिटिश माणूस तो दावा करणारा कितपत विश्वासार्ह आहे हे पाहतो.' सांगणार्‍यावर आपला विश्वास असेल तर तो सांगेल तर सत्य मानून चालतो. मग तो सांगणारा आपण स्वीकारलेल्या वा अनायासे मिळालेल्या जात, धर्म, वंश वा देश यांचा स्वयंघोषित ठेकेदार असो,  आपल्या राजकीय पक्षाचा अथवा सांस्कृतिक, सामाजिक संघटनेचा नेता असो. त्याने सांगितले की ते खरे आहे असे समजून माणसे मरण्या-मारण्यास सिद्ध होतात. आपण कमअस्सल आहोत, योग्य काय अयोग्य काय हे आपले आपण जाणून घेण्याची कुवत आपल्यात नाही हे त्यांच्या मनात पुरेसे ठसवले गेलेले असते. म्हणूनच एखादे पुस्तक उघडून पाहणे, इंटरनेटसारख्या माध्यमातून शोध घेणे अगदी सहज शक्य असूनही ते करण्याची तसदी माणसे घेत नाहीत.

काही काळापूर्वी एक बोलके छायाचित्र पाहिले होते. एका मोकळ्या जागेत घोडा उभा आहे आणि त्याची साखळी एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधलेली आहे. वास्तविक तो घोडा त्याच्याहून कैकपट हलक्या असलेल्या त्या खुर्चीसकट तिथून निघून जाऊ शकतो, पण जात नाही. कारण गुलामी ही साखळीत नसते तर ती मनात असते. गुलामगिरीविरोधी कार्यकर्ती हॅरिएट टबमन म्हणाली होती 'मी हजारो लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले आहे... आणखी हजारोंना करू शकले असते, पण ते गुलाम आहेत हे त्यांना ठाऊकच नव्हते.'

-oOo-

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०१५

'शेष'प्रश्न

(हे एकटाकी लिहिलेले आहे आणि मोरेंचे लेखन वाचून बराच काळ लोटला आहे तेव्हा तपशीलात चुका असणे अगदीच शक्य आहे. तेव्हा ते आधीच मान्य करून टाकतो. पण त्याने मूळ मुद्द्याला बाध येईल असे मात्र नाही.)

सध्या शेषराव मोरे यांनी अंदमान येथे केलेल्या विधानांवरून गदारोळ उसळला आहे. त्यात 'पुरोगामी दहशतवाद' असा शब्द वापरून त्यांनी एक प्रकारे शासन-पुरस्कृत पुंडांच्या हाती कोलित दिले आहे. यामुळे पुरोगामी आणि 'स्वतःला पुरोगामी म्हणवणारी' मंडळी मोरेंवर चांगलीच नाराज झालेली आहेत. मी स्वतःदेखील या कारणासाठी मोरेंच्या भूमिकेवर तिरकसपणे टीका केलेली आहे.

परंतु असे असले तरी माझा मोरेंबद्दल आक्षेप आहे तो केवळ त्यांचा सरसकटीकरण करणार्‍या विधानाबद्दल आहे आणि गुंडांच्या हिंसाचाराला अप्रत्यक्ष अधिष्ठान देण्याबाबत आहे. एरवी यांच्या विद्वत्तेबद्दल मला आदर आहेच. आजच्या काळात इतक्या साक्षेपी नि काटेकोरपणे अभ्यास करणारे फारच थोडे लोक उरलेले दिसतात. तेव्हा त्यांच्या विधानाबद्दल गल्लीबोळात आवाज उठवताना याचे भान राखायला हवे (अर्थात केंद्रात बसलेल्यांच्या भक्तांप्रमाणे 'त्यांना सांगा की' म्हणायचे असेल तर सोडून देऊ.)

मी ९१-९२च्या आसपास प्रथम सावरकरांवरची त्यांची दोन पुस्तके वाचली होती. त्यातील चिकाटी, तर्काचा काटेकोरपणा, विस्तृत विवेचन यामुळे मी प्रभावित झालो होतो. याच पुस्तकांमुळे तथाकथित पुरोगामी मंडळींनी त्यांना सावरकरवादी ठरवून टाकले होते. सावरकर हे हिंदुत्ववादी आणि म्हणून सावरकरवादीही हिंदुत्ववादी या न्यायाने त्यांना अडगळीत टाकले होते.

त्यानंतर त्यांनी आंबेडकरांवर लिहिलेल्या पुस्तकावरून तर यावर शिक्कामोर्तबच झाले. यावरून तर शाहू-फुले-आंबेडकर यांना 'प्रातःस्मरणीय' करून ठेवलेल्या पुरोगाम्यांनी मोरेंचे नावच टाकले. नंतर त्यांनी 'शासनपुरस्कृत मनुवादी: पांडुरंगशास्त्री आठवले' हे आठवलेंचे मूर्तीभंजन करणारे पहिले पुस्तक लिहिल्यानंतरही त्यांना माफ करण्यात आले नाही,

'चार आदर्श खलिफा' (याचे सबटायटल बहुधा 'इस्लामचा सुवर्णकाळ' असे होते) हे एका अर्थी हिंदुत्ववाद्यांना डिवचणारे पुस्तक लिहिले तरीही पुरोगामी त्यांच्यावर रुसलेलेच राहिले. 'अखंड भारत का नाकारला' मधील त्यांची मांडणीही हिंदुत्ववादी गटांना अडचणीची वाटावी अशीच आहे. १८५७च्या उठाव हा 'जिहाद' होता अशी मांडणी केली, तेव्हा कदाचित ती हिंदुत्ववाद्यांच्या थोडी सोयीची झाली असावी. (बहुधा रावसाहेब कसबेंनी किंवा सदानंद मोरेंनी याचा प्रतिवाद करणारा लेख लिहिला होता, सध्या मला याचा संदर्भ आठवत नाही.) त्यांचे विचारकलह, अप्रिय पण (हे अगदीच स्तंभलेखनाच्या पातळीवरचे होते, बहुधा 'सामना'मधे लिहिलेले लेख) हे दोन वाचलेले नाहीत.

जितके आकलन मला झाले त्यानुसार हा लेखक उजव्या मंडळींत मुळीच न शोभणारा आहे. एकदा त्यांची सुरुवात सावरकरांपासून झाली आणि आंबेडकरांवरील तशाच स्वरूपाच्या लेखनात त्यांनी बहुधा आंबेडकरांच्या काही मर्यादांचा उल्लेख केल्यामुळे पुरोगाम्यांनी त्यांना पलिकडे ढकलून दिले.

मुळात सावरकर असोत,मोरे यांच्यासारखे लेखक असोत की तुमच्या आमच्यासारखे सध्याचे नागरिक पुरोगाम्यांची पंचाईत ही आहे की त्यांना एखादा माणूस 'आपला' तेव्हाच वाटतो तेव्हा तो १००% आपला असतो. हिंदुत्ववादी असून 'काही' पुरोगामी विचार मांडणारे सावरकर किंवा सावरकरवादी असूनही मुस्लिमांच्या खलिफांवर लिहिणार्‍या मोरेंची आपल्या सोयीची बाजू तेवढी घेऊन न पटणारी सोडून देण्याचा नीरक्षीरविवेक पुरोगामी 'म्हणवणार्‍यांत' उरलेला नाही. हे काहीसे हिंदूंच्या समुद्रपर्यटनबंदीसारखे किंवा ब्रेड खाल्याने किरिस्तांव झालास म्हणून आपणच आपल्या माणसाला दूर लोटण्यासारखे आहे.

वास्तविक सावरकरांची 'हिंदुपतपातशाही', 'सहा सोनेरी पाने' ही पुस्तके मला मुळीच न पटणारी आहेत पण 'गाय माता असेल तर बैलाची' म्हणणारी त्यांची विज्ञाननिष्ठता, त्यांचे जात्युच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, भाषाशास्त्रीय निबंध इ. गोष्टी पुरोगामी लेखकालाही अवाक् करणार्‍या आहेत. पण एका हिंदुत्ववादाने सारं नाकारलं गेलं. 

इथे सावरकरांवरचा हिंदुत्ववादी असल्याचा आरोप मी मुळीच नाकारत नाही, त्यांनी माफीनामा देऊन सुटका करून घेतली किंवा गांधीहत्येत त्यांचा सहभाग होता हा दावाही मी क्षणभर खरा मानायला तयार आहे (एरवी तो खरा की खोटा हे मला ठाऊक नाही.) त्यांनी मुस्लिम विरोधासाठी कोणत्याही हत्याराचे केलेले समर्थन घृणास्पद म्हणावे असेच आहे. पण त्या कारणासाठी सावरकरांमधला विज्ञानवादी, साहित्यिक, अभ्यासक नाकारायची माझी तयारी नाही. एखादा खुनीदेखील उत्तम गात असेल तर त्याचा तो गुण नाकारायचे कारण नाही, त्यामुळे तो त्याच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केला जातो आहे असा कांगावा करायची गरज नाही.

याच चालीवर मोरेंकडेही पुरोगामी वस्तुनिष्ठपणे पाहत नाही हा माझा आक्षेप आहे. जे त्यांचे तुमच्या मते दोष आहेत ते आहेतच, पण पुरोगामी पोरासोरांनी त्यांची लायकी काढत गांधीची लायकी काढणार्‍या अर्ध्या चड्डीवाल्यांच्या रांगेत येऊन बसावे हे चूक आहे. हा सूड आहे किंवा आपणही आपल्या विरोधकांचेच उलटे प्रतिबिंब आहोत याची जाणीव नसणे आहे. हे संघासारख्या मिलिटरी ऑर्गनायजेशनच्या नावे शपथा खाणार्‍यांकडून अपेक्षितच आहे. त्यांच्याकडून वस्तुनिष्ठतेची अपेक्षाच नाही, पुरोगामी म्हणवणार्‍यांकडून ती आहे!

मागे एका पुरोगामी म्हणवणार्‍या तरुण मित्राशी बोलताना कुरुंदकरांच्या विचारव्यूहाचा उल्लेख केला होता. 'हॅ: त्यांनी हिंदुत्ववांद्यांना सोयीची इस्लामविरोधी मांडणी केली होती. पळशीकरांनी कसला धुतला होता त्यांना.' असे तटकन उत्तर आले. त्यावेळी आमच्या बोलण्याचा मुद्दा इस्लामशी मुळीच संबंधित नव्हता. तरीही कुरुंदकरांचे मत लक्षात घेण्याची त्याची तयारी नव्हती.

ही जी 'संपूर्ण नकारा'ची पद्धत पुरोगामी म्हणवणार्‍यांनी स्वीकारली आहे ती सर्वस्वी अ-पुरोगामी आहे आहे माझे मत आहे. एखाद्याने एखादे गैरसोयीचे, न पटणारे मत मांडले की त्याला मुळापासून छाटून टाकण्याची ही अघोरी पद्धतच पुरोगाम्यांचा प्रभाव कमी करत नेण्यास कारणीभूत ठरली आहे. जसजसे एखादे विसंवादी मत येते, तसतसे पुरोगाम्यांची 'श्रद्धास्थाने' कमी कमी होत जातात. अखेर विचारांचे अधिष्ठान असलेले पुरोगामित्व संपून जाते नि जातीय, धार्मिक अस्मितांचे झेंडे घेऊन उभे असलेल्यांप्रमाणेच पुरोगामी म्हणवणारे देखील केवळ झेलकरी होऊन राहतात.

पुरोगामी मंडळींनी उलट सावरकर, मोरे यांचे हिंदुत्ववाद्यांना गैरसोयीचे ठरणारे लेखन वारंवार उद्धृत करत त्यांना खिंडीत गाठायला हवे, तिथे हे त्या लेखनाकडे पाठ फिरवून बसले आहेत. इतके रामबाण हत्यार आपण स्वतःहून हिंदुत्ववाद्यांच्या भात्यात टाकून निष्प्रभ केले आहे याची समज आपल्याला यायला हवी. एक रावसाहेब कसबे वगळले तर अभ्यासपूर्ण प्रतिवादही आज फारसे कुणी करताना दिसत नाही. त्या कसबेंनाही एकाच गैरसोयीच्या मुद्द्यावर आम्ही शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

याउलट अशा लोकांना पुरोगाम्यांनी दूर ढकलणे संघाच्या पथ्यावरच पडते आहे, ते आनंदाने अशा लोकांना मांडीवर घेऊन साखर भरवत आहेत. आजच्या काळात आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे फारच अवघड झाले आहे. 'ते सगळं सोडा, आधी तुम्ही कुठल्या बाजूचे ते सांगा.' असा दम दिला जातो. थोडक्यात सावरकरप्रेम आणि आंबेडकरांवरील तथाकथित टीका या कारणासाठी पुरोगाम्यांनी दूर ढकललेले मोरे हिंदुत्ववाद्यांच्या बाजूला झुकणे ही पुरोगाम्यांनीच निर्माण केलेली अपरिहार्यता आहे. आणि मोरे हे पहिले नाहीत की शेवटचे, नाकारण्याची प्रक्रिया अखंड चालू असते आणि पुरोगाम्यांचा प्रभाव कमी होण्याचीही.

याच्या नेमके उलट मी संघावर टीका करतो हे ठाऊक असूनही अनेक जाहीर नि छुपे संघवादी माझ्याशी वरचेवर चर्चा करू बघतात. पडते घेऊन बोलत माझा ईगो कुरवाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कधीतरी मला 'उपरती' होईल नि मी त्या बाजूला येईन असा त्यांना दृढविश्वास असतो. उलट पाहिले तर पुरोगाम्यांचे आणि पुरोगामी म्हणवणार्‍यांचे गट 'माझे पुरोगामित्व तुझ्यापेक्षा अधिक अस्सल आहे.' या मुद्द्यांवर भांडणे करताना दिसतात, तुकडे पाडून परस्परांचा द्वेष करतात.

माझ्याशी मैत्री झालेल्या एका गटाचे किमान चार तुकडे मला आज दिसताहेत. हा तर केवळ छोटा आठ दहा माणसांचा गट आहे, पुरोगाम्यांचा राजकीय चेहरा असलेले समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आज कुठल्या परिस्थितीत आहेत हे जगजाहीर आहे.

टीका सहन करतही वैयक्तिक मानापमानापेक्षा 'संघटन' महत्त्वाचे मानणारा संघ आणि 'मीच मोठा पुरोगामी' म्हणत माझे महत्त्व राहील इतका आपला गट लहान करत नेणारे पुरोगामी या दोन दृष्टीकोनातला फरक पाहिला तर संघाचा प्रभाव का वाढता राहतो नि पुरोगामी कायम निर्बळ का राहतात हे लक्षात येईल. आणि याचमुळे आज दोन्ही बाजूंकडे पाहणारे सर्वसामान्य लोक संघाचा प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाकडे नाईलाजाने का झुकले हे ही समजून येईल.

इतकं होऊनही आक्रमकतेने शिवीगाळ वा टिंगलटवाळी करण्यापुरते आपले पुरोगामित्व टिकून राहणार असेल तर राहो बापडे. पण विचारहीनता वाढली की हुकूमशहांना सोयीची भूमी तयार होते, माद्यांसाठी लढताना 'बाहेरील' धोक्यांकडे दुर्लक्ष झालेल्या काळवीटांच्या नरांची शिकार अधिक सोपी होत असते हे ध्यानात ठेवायला हवे.

- oOo -

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

'खिडक्यां...'तून डोकावलेली माणसं

('खिडक्या, अर्ध्या उघड्या' या गणेश मतकरी यांच्या कादंबरीच्या निमित्ताने)

दोन चार ओळींच्या वॉट्स अ‍ॅप टेक्स्ट मेसेजमधे किंवा फेसबुक पोस्टमधे जीवनाचे सार अनुभवू पाहणार्‍या पिढीला कादंबरीसारखा व्यापक पट असलेले साहित्य वाचण्यात कितपत रुची उरणार आहे हा प्रश्न आताच चर्चिला जाऊ लागलेला आहे. अभिरुचीमधला बदल, विखंडित अथवा 'फ्रँगमेंटेड' जीवनशैली; इंग्रजी भाषेच्या माध्यमातून खुले झालेले नव्या साहित्याचे भांडार; बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, आणि बहुआयामी महानगरी जीवनाकडे वाटचाल करत असताना जगण्याचे बदललेले संदर्भ यामुळे तरुणांची अभिरुची बदलते आहे. तर मध्यमवयात जगण्याचा वेग अचानक वाढल्याने होणारी दमछाक साहित्यासारख्या आवडींबाबत दिला जाणारा वेळ घटवत नेते आहे.

दिवसाचे चोवीस तास वाढवून अठ्ठेचाळीस करण्याचा शोध माणसाला अजून लागलेला नसल्याने आहे तोच वेळ या अनेक पैलूंना नाईलाजाने वाटून द्यावा लागतो आहे. या अतिरिक्त विभागणीमुळे प्रत्येक गोष्टींसाठी मिळणारा वेळ कमी कमी होत जातो आहे. अशा वेळी कादंबरी वाचनास आवश्यक असलेला सलग वेळ (नि सलग काळही) मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत जाते आहे.  त्यामुळे कमीत कमी शब्दात आपला आशय पोचवण्याचे आव्हान लेखकांसमोर उभे राहते आहे. या परिस्थितीमधे कथेचे अल्पाक्षरी सामर्थ्य नि कादंबरीचा मोठा पट या दोन्हीचा एकत्रित वापर करुन उभी राहिलेली 'खिडक्या...' ही नव्या घाटांच्या शोधांचे एक दार उघडून देणारी ठरावी.

अनेक वाचकांच्या - बर्‍याच समीक्षकांच्याही - पूर्वग्रहांच्या परिणामामुळे अनेकदा लेखनाची पार्श्वभूमी हीच थेट त्या लेखनाला श्रेष्ठ वा कमअस्सल ठरवण्यास पुरेशी असल्याचा समज दिसून येतो. पुलंचे लेखन हे केवळ मध्यमवर्गीय जाणीवांचे म्हणून संकुचित असे म्हणण्याची फॅशन 'पुरोगामी' म्हणवू पाहणार्‍या लेखकांमधे आहे. सामाजिक जाणीवेचे लेखनच काय ते अस्सल, त्यातून त्याला अनाकलनीयतेचे किंवा प्रक्षोभाचे अस्तर असले तर ते व्याख्येनुसारच श्रेष्ठ ठरते. या सार्‍या गदारोळात पैसा वा करियर प्रधान आयुष्य हे मूल्य स्वीकारून त्याआधारे जगणार्‍यांना तर आपण 'चंगळवादी' म्हणून केव्हाच झाडून टाकलेले असते.

नव्वदीच्या दशकात आपल्या देशाने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यातून रोजगाराची नवी क्षेत्रे खुली झाली. 'गरजा भागवण्यासाठी रोजगार' ही माफक कल्पना धुडकावून देत अनेकांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना नवी क्षितीजे प्रदान केली. पण त्या औद्योगिक व्यावसायिक व्यवस्थेचे बोट धरून तथाकथित विकसित जगाची जीवनशैलीदेखील इथे अवतरली.  यातून पाश्चात्त्य जीवनशैली आणि व्यवस्था यांना रोल मॉडेल समजून आपली प्रगती साधू इच्छिणार्‍यांचा एक नवाच वर्ग उदयाला आला. भरपूर उत्पादन, भरपूर वापर या मूलमंत्राच्या आधारे पैसा निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट...  नव्हे संपूर्ण समाजाच्या हिताचा एकमेव मार्ग समजला जाऊ लागला. भारतात यापूर्वी रुजलेल्या अंत्योदयाच्या नेमक्या उलट असा  हा  'टॉप डाऊन अप्रोच'  यशाचा मार्ग मानला जाऊ लागला.

समाजातील एका समूह/गटाचे वर्तमान हे अन्य समूहांचे भविष्य असू शकते. अधिकाधिक प्रगतीची आस (किंवा हाव) असलेल्या भारतीय समाजाचे भविष्य हे कदाचित अमेरिकन समाजव्यवस्थेमधे पाहता येईल तर भारतातील समाजात ब्राह्मण वा तत्सम तथाकथित उच्च जातींच्या पावलावर पाऊल टाकत उरलेला समाज प्रगती साधू इच्छितो. थोडक्यात समाजातील एक गट दुसर्‍या गटाचे 'रोल मॉडेल' म्हणून काम करत असते. आता जर एका गटाचे वर्तमान हे अन्य गटाचे भविष्य ठरू पहात असेल, तर पहिल्या गटाच्या जगण्याचा वेध घेण्यातून दुसर्‍या गटाच्या भविष्यात डोकावण्याची संधी आपण घेत असतो. त्यातून या दुसर्‍या गटाला भविष्यातील संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना जशी मिळू शकते तशीच निवडलेल्या साध्याकडे पोचण्याचे पर्यायी मार्ग आगाऊच तपासणे शक्य होते.

'खिडक्या...' कथा-कादंबरीच्या सीमेवरील पुस्तकाची पार्श्वभूमी आहे ती अशा नागरी... नव्हे महानगरी, ज्याला upwardly mobile किंवा ऊर्ध्वगामी म्हणता येईल अशा समाजाची.  हा मूळचा भारतीय संस्कृतीच्या मुशीतला असला तरी याच्या प्रगतीच्या वाटा पाश्चात्त्य घाटाच्या आहेत. भौतिक प्रगतीच्या वाटेवर जे मिळवता येते ते मिळवलेच पाहिजे या अट्टाहासाने सतत 'आगे बढो' चा मंत्र जपत जगत असतानाच मागे सुटत जाणार्‍या गोष्टींबाबत त्याची खंत अजून जिवंत आहे. जगण्याच्या नव्या चौकटी स्वीकारत असताना जुन्या चौकटीचे फायदेही त्यांना अजून खुणावताहेत. त्याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या मार्गावर सामील होणार्‍या वाटा म्हणून अपरिहार्यपणे किंवा त्या प्रगतीच्या पहिल्या फळीच्या यशाचे इंगित ही त्यांच्या या जीवनशैलीतच असेल असे गृहित धरून त्यांची जीवनशैली स्वीकारताना त्यातील संभाव्य धोके त्यांना संभ्रमित करताहेत. हा समाज निव्वळ मित्रांना जमवून चकाट्या पिटण्यापासून, बिजनेस मीटिंगपर्यंत बर्‍याच कारणासाठी 'सीसीडी'चा आधार घेणारा, एक सिगरेट आणि कटिंग चहाच्या बळावर गप्पांच्या मैफली जमवणार्‍या समाजापासून पासून दूर चाललेला.  त्यांचे जगणे बाहेरच्यांना वाटते तसे खरंच चैनीचे, सुखाचे असते का? या नव्या जगातली आव्हाने कोणती, त्यात उपलब्ध असलेल्या यशाच्या संधी कोणत्या नव्या तडजोडींना अपरिहार्य ठरवत असतात?  याचा प्रश्नांचा वेध घेणे आवश्यक ठरते आहे.  

'खिडक्या...'मधे निवेदनशैलीचा वापर केल्याने आपल्यासमोर त्यांचे जगणे उलगडते ते त्या त्या व्यक्तीच्या निवेदनातून, त्याअर्थी आपल्या दृष्टीने त्या समाजाकडे त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाच्या खिडक्यांतूनच पाहतो आहोत. पण यामुळे कदाचित घटनांपेक्षा पात्रे मोठी होताना दिसतात. या कारणासाठी कथा म्हणून वा कादंबरी म्हणून या लेखनाकडे पाहण्याऐवजी मला यातील पात्रे सुटी करून पहायला अधिक आवडतील.

व्यावसायिक जगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली आणि कदाचित काही पुरुषांच्या दृष्टीनेही यशाचे रोल मॉडेल म्हणून पाहिली जाणारी सानिका त्या व्यावसायिक जगात प्रगती व्हायची असेल तर 'धंदेवाईक' व्हावे लागते या व्यवस्थेच्या मूलमंत्राला सामोरे जाताना आपल्या मनातील आदर्शवादी वारशाचे काय करायचे अशा पेचात सापडलेली. निर्णयाचे पुरेसे स्वातंत्र्य मिळाल्याचा पुरेपूर वापर करुन घेत यशाचे नवनवे सोपान सर करत असतानाच नकळत त्या कैफात कदाचित नात्याचे भान हरवून एकतर्फी निर्णय घेण्याचे एक पाऊल टाकणारीही.

लिव-इन म्हणजे 'लग्नाशिवाय लैंगिक संबंधांची सूट' हे आपल्या मनात इतके घट्ट रुजून बसले आहे ( 'लग्न म्हणजे लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची सामाजिक अनुमती' या गृहितकाचीच ही दुसरी आवृत्ती!) की लिव-इन सारख्या नात्यामधील सैलसर बंधाचे संभाव्य धोके जेव्हा व्यक्त केले जातात तेव्हा ते बहुधा लैंगिक वा नात्याच्या संबंधांबाबतच व्यक्त केले जातात.  'दोघांमधे नात्यापेक्षा वैयक्तिक यशापयश, हित/अहित अधिक प्राधान्य घेऊन जाऊ शकते का?' असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहत नाही. सानिका जेव्हा 'एक संधी, एक ऑपर्चुनिटी' म्हणून परदेशात जाण्याचा निर्णय एकतर्फी, सुश्रुतशी विचारविनिमय न करता घेते तेव्हा त्यांचे नाते या संधीपुढे दुय्यम मानते आहे असे आहे का? की तितके स्वातंत्र्य त्या नव्या व्यवस्थेत अभिप्रेतच आहे? याउलट बाजूने 'जर त्यांचे कायदेशीर लग्न झाले असते तर कदाचित तिने असाच विचार केला असता का? लग्नाऐवजी लिव-इन असा बदल झाला 'म्हणून'(!) व्यावसायिक नि कौटुंबिक बाबतीत तिचे प्राधान्यक्रम उलट झाले असे म्हणता येते का? '  प्रत्येकाच्या पूर्वग्रहांनुसार या प्रश्नाचे उत्तर वेगळे येऊ शकेल. पुरुषांच्या बाबतीत 'व्यावसायिक बांधिलकीपुढे कुटुंबहित दुय्यम मानणे' हे बव्हंशी भूषणास्पद, त्याच्या कामावरील निष्ठेचे निदर्शक मानले जात असताना, या नव्या व्यवस्थेत तरी सानिकासारख्या स्त्रीच्याबाबत तोच न्याय आपण लावणार आहोत का असा प्रश्नही विचारता येऊ शकतो.

अमेरिकेला जाण्याचा निर्णय सानिकाने 'परस्पर घेतल्याबद्दल तिला फैलावर घ्यायला हवे होते का? असा प्रश्न सुश्रुत  स्वतःला विचारतो, तेव्हा त्यातील 'फैलावर घेणे' हा शब्दप्रयोग सूक्ष्म उच्चाधिकाराची जाणीव दाखवतो. 'नोकरी केली नाही तर काय स्वैपाकपाणी करायचं? या प्रश्नामागेही जुन्या जाणीवेचे काही पीळ निदान नेणीवेच्या पातळीवर अजूनही मूळ धरून असल्याचेच दिसून येते. 'संबंध संपवण्याची धमकी द्यायला हवी होती का?' अशी शक्यता तो क्षणभर पडताळून पाहतो तेव्हा तो स्वतःही या नव्या व्यवस्थेला 'तुलनेने सहज बाहेर पडण्याची सोय असलेली' म्हणून पाहतो आहे का असा प्रश्न पडतो. गाडी रिफ्लेक्सेसवर चालवायची असते म्हणणारा सुश्रुत आयुष्यात अनपेक्षित वळण आल्यावर मात्र नियंत्रण हरवल्याची भावना निर्माण होऊन अस्वस्थ होतो. असे सुश्रुत तुमच्या आमच्या आसपास अनेक दिसतात. याउलट वारशाने मिळालेल्या समाजव्यवस्थेच्या नीतीनियमांमुळे आपल्या आसपासच्या सानिका मात्र त्यांच्या त्यांच्या सुश्रुतलाच नेमक्या दिसू शकतात... कदाचित त्यांनाही दिसत नसाव्यात.

एका बाजूला आपली सदसद्विवेकबुद्धी आणि व्यावसायिक अपरिहार्यता यांच्या रस्सीखेचीत जिथे काही हस्तक्षेप करायला हवा नेमकी त्याच क्षणी किंकर्तव्यमूढ झालेली सानिका, तर दुसर्‍या बाजूला आपला वापर करून घेतला जात आहे हे ठाऊक असूनही कर्तव्याला, आपल्या त्या क्षेत्रात असण्याच्या मूळ हेतूला सुसंगत असा निर्णय लख्ख मनाने घेणारी स्वरूपा.  धडाडी नि निर्णयक्षमता इ. बाबत ती जवळजवळ सानिकाचे प्रतिरूप आहे. पण सानिकाला जसे दोन सहकार्‍यांचे, सुश्रुतचे पाठबळ आहे तसे स्वरूपाला नाही. ती स्वयंपूर्ण आहे, कोणत्याही आधाराशिवाय उभी आहे. वैयक्तिक आयुष्यात नि व्यावसायिकही!  तिच्या निर्णयांचे जे काही परिणाम होतील ते तिचे तिलाच भोगावे वा निस्तरावे लागतात. निर्णयस्वातंत्र्याची ती किंमत तिला चुकवावीच लागते.

पण अनेकदा अशी झटपट निर्णय घेण्याची वृत्ती अंगाशी येऊ शकते तशी स्वरुपाबाबत तिच्या लग्नाच्या निर्णयाबाबत, प्रेमेंद्रबाबत आणि सानिकाबाबत आलीही. पण बॅकफायर झालेला निर्णय धकवून नेण्याची धमकही स्वरूपामधे आहे. याउलट तिच्यासारखीच सेल्फ-मेड वुमन असलेली सानिका जरी पार्टनरशी सल्लामसलत न करता सहा महिने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेऊन टाकण्याइतकी स्वातंत्र्य घेत असली तरी त्या नात्यातून मिळणार्‍या आधाराची तिला गरज आहे असे दिसते. सतत फोनवरून अपडेट्स देत/घेत सुश्रुतशी 'कनेक्टेड' राहण्याची तिची धडपड दिसून येते. अनंत कुटुंब आणि करियर यांच्या ओढाताणीत फरफटत जाणारा, जणू सर्वसामान्यांचा प्रतिनिधी. आगाशेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख कुठे येत नाही. कदाचित इथे नेत्रदीपक व्यावसायिक यश मिळवणार्‍यांचे कौटुंबिक आयुष्य अनुल्लेखनीय, बिनमहत्त्वाचे असावे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो.

स्वरूपा ही कर्तव्यापुढे नव्यानेच उजाळा मिळालेली जुनी मैत्री हरवण्याचा धोका पत्करते तर आगाशेही धंदेवाईकतेला कर्तव्य मानून तिथे अडथळा ठरू शकणार्‍या सानिकाला - तात्पुरते का होईना - दूर करण्याचा निर्णय घेतो. भिन्न कारणासाठी का होईना हे दोघे एकाच निर्णयाप्रत पोहोचतात. वरवर पाहता स्वरूपाचा निर्णय स्वार्थप्रेरित नसल्याने अधिक स्पृहणीय भासू शकतो. पण आपल्या संस्थेबद्दल, कामाबाबत बोलताना स्वरूपाच्या व्यक्तिमत्त्वात दंभ अथवा अहंकारही दिसतो. तर प्रेमेंद्र वा अनिरुद्धच्या संदर्भात ती काहीशी 'प्लेईंग द विक्टिम' स्वरूपाचे बचावाचे भाषण करते आहे असा भास होतो. पण असे असूनही ती कधीकाळी घडलेल्या घटनेतून मनात ठेवलेली अढी, पोसलेला द्वेष 'यात काही अर्थ नसावा, कदाचित आपले मूल्यमापन चुकले असावे का? आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपयशातून आलेल्या कडवटपणाचा हा अस्थानी झालेला परिणाम होता का?' असा विचार शांतपणे करू शकते, त्यानुसार निर्णय घेऊ शकते.

सानिकाने काही निर्णयस्वातंत्र्य मिळवले तरी सदसद्विवेकबुद्धीचा वारसा तिच्या मानगुटीवर अजून बसलेला आहे. आगाशेप्रमाणे प्रसंगी तिला झुगारून देऊन व्यावसायिक यश मिळवावे इतके निर्ढावलेपण तिच्यात नसले तरी कदाचित दोष न येता लाभाचा वाटा मिळत असेल तर काही तडजोडींकडे दुर्लक्ष करण्याची बोटचेपी मानसिकता मात्र तिच्यात विकसित झालेली आहे.

एनजीओ'चा 'धंदा' करणारा प्रेमेंद्र हा धूर्त राजकारणी. एस.एन.ए. ला एक्स्पोज करणारे सारे पुरावे हाती असूनही तो स्वतः ते जाहीर करत नाही. ते स्वरूपाकरवी घडवून आणतो. स्वरूपा नि सानिका यांच्यात पूर्वी असलेल्या शीतयुद्धाच्या सहाय्याने माध्यमे याची चांगली मसालेदार ब्रेकिंग न्यूज बनवतील नि हा विषय चांगला गाजवत राहतील हा एक उद्देश आणि स्वतःच्या राजकारणी वर्तुळामधील स्थानाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये या हेतूने स्वतः नामानिराळा राहून सारी सूत्रे हलवतो. 'ग्रेटर कॉमन गुड' या निकषावर एस्.एन्.ए. ला एक्स्पोज करण्याच्या निर्णय घेताना आपण एका नव्या स्पर्धेत खेचले जात आहोत याची पूर्ण जाणीव स्वरूपाला असते. इथे जिंकणंही हरण्याइतकंच नामुष्कीचं आहे हे ठाऊक असूनही स्वच्छ मनाने तो निर्णय ती घेते, या पार्श्वभूमीवर प्रेमेंद्रचा बोटचेपेपणा नि दुसर्‍याला वापरून घेण्याची स्वार्थी वृत्ती अधिकच ठळक होत जाते.
हातपाय पसरू पाहणार्‍या नव्या जगाला जागा करून देताना काढता पाय घेणार्‍या जुन्या व्यवस्थेचा अवशेष म्हणून जोशीकाकू डोकावतात. परदेशस्थ मुलाची आई, तिकडेच जन्मलेल्या आणि आता पौगंडावस्थेत असलेल्या नातवंडांची इथे बसून काळजी करत राहणार्‍या. बँजोच्या आधाराने आपल्या जुन्या जगाला चिकटून बसण्याचा अट्टाहास जोपासू पाहणार्‍या. घरात असलेले हे मांजर आई नि मुलगा दोघांसाठीही सोयीचे कारण बनलेले. पण त्याचा मृत्यू हा आपल्या जगाचा मृत्यू आहे हे नाईलाजाने मान्य करून नव्या व्यवस्थेसमोर मान तुकवणार्‍या.

एका गरजेच्या क्षणी आपले म्हणावे असे कुणी आसपास नसताना विसंवादातून संवाद निर्माण होत त्यांना सुश्रुतचीच मदत घ्यावीशी वाटते, तर त्याचा परिणाम म्हणून सुश्रुतलाही कोणत्याही नात्याबाहेरचे असे संवाद करण्याजोगे एक माणूस सापडते. अतिरेकी व्यक्तिवाद अंगवळणी पडला असल्याने आईवडिलांशी असलेल्या संवादाचा झरा आटलेला असताना, जोडीदाराबद्दलच्या नात्याबद्दल साशंकता असताना अचानक असे तिसरे माणूस मन मोकळे करण्यास सापडणे म्हणजे जुन्या खिडक्या आपणहून बंद केल्या असता एखादी नवीच खिडकी किलकिली व्हावी तसे काहीसे.

या सार्‍या पात्रांच्या मांदियाळीमधे ठसठशीत उभे असलेले आणि खर्‍या अर्थाने या उच्च मध्यमवर्गीय, ऊर्ध्वगामी समाजाचा प्रतिनिधी म्हणता येईल असे पात्र म्हणजे निरंजन आगाशे. बालपणी ऐकलेली एखादी हळवी नर्सरी र्‍हाईम मनात कुठेतरी जपून ठेवणारा आणि तरीही व्यवहाराची गरज म्हणून चाणाक्ष, धूर्त होऊ शकणारा. एकीकडे इन्स्टॉलेशन सारख्या अर्वाचीन कलाप्रकारात रस घेणारा तर दुसरीकडे धंदेवाईक निर्ढावलेपण रुजलेला. सगळं काही ५% माहित करून घेऊन तज्ज्ञाची ऐट मिरवणारा, कामात झोकून देण्याऐवजी 'गेटिंग थिंग्स डन' (आणि कदाचित त्यामुळे 'ऑनर द कमिटमेंट अँड  शूट द क्वालिटी' प्रकारचा) वर विश्वास असलेला, प्रत्यक्ष उत्पादक कामाऐवजी ओवरसियर च्या भूमिकेत अधिक रमणारा , एक टिपिकल 'मॅनेजर' मटिरियल! मनातल्या भारद्वाजाला  खोल गाडून त्यावर गगनचुंबी इमारत उभी करण्याची महत्त्वाकांक्षा असलेला. पण कामाच्या ठिकाणी सापडलेल्या त्या राजबिंड्या भारद्वाजाच्या मृत्यूमधेच गुदमरणार्‍या शहराचा मृत्यू पाहणारा, त्याची कारणे ठाऊक असलेला आणि तरीही त्यापैकी काही कारणांचे पितृत्व मिरवणारा. सीसीडी मधे भेटलेल्या तरुणाचे अनकरप्ट असणे, जीवनसंमुख असणे जाणून त्याचा हेवा करणारा पण तरीही मेलेला भारद्वाजही आपल्याला लकीच ठरला पाहिजे याची पुरेपूर खबरदारी घेणारा. अधेमधे नॉस्टॅल्जिया, सदसद्विवेकबुद्धी जागृत होत असली तरी तिला धिक्कारून आपल्या 'आणखी उंच जाण्याच्या' आपल्या जीवितहेतूची स्वतःला वारंवार आठवण करून देणारा. 'त्यांना कुणीतरी स्केपगोट लागेल, तो त्यांना मिळेल अशी व्यवस्था होईल' (आणि आपल्यावर कोणताही गुन्हा सिद्ध होणार नाही) असे निर्ढावलेपणे किंवा व्यावसायिक  जगात म्हणतात तसे 'प्रोफेशनली'  सांगणारा आणि तसे घडवून आणणारा आगाशे.  खिशात पैसे आहेत म्हणून ज्यांना वेळ देऊ शकणार नाही अशा महागड्या ब्लू रे डिस्क्स सहज टाईमपास म्हणून वा शोकेसची सजावट म्हणून विकत घेणारा,  ज्यातून केवळ स्वामित्त्वाचीच भावना कुरवाळता येते त्या कृतीसाठी आवश्यक असणारे पैसे मिळवण्यासाठी पुन्हा वेळ गहाण टाकून भविष्यात खरेदी केलेल्या डिस्कचाही वेळ आजच हिरावून घेणारा, गटेच्या फाउस्टसारखा.
उलट अनंत. आपण व्यावसायिक क्षेत्रात आहोत म्हणजे आपण प्रोफेशनल आहोत, तसे दिसलो पाहिजे, इतरांना भासले पाहिजे म्हणून आपल्याभोवती एका कृत्रिम प्रोफेशनल, प्रॅक्टिकल माणसाचा डोलारा उभा करणारा पण गोष्टी हाताबाहेर जात आहेत असे दिसताच त्याचा धीरोदात्त पणाचा बुरखा हटकून गळून पडणारा. आपल्या मुलाच्या काळजीने नव्हे तर सानिकाला दूर पाठवायचे या हेतूने आगाशेने आपल्याऐवजी सानिका हा बदल सुचवल्याचे समजल्यावर फसवणूक झाल्याची भावना बाळगणारा. इतर दोघांपेक्षा तो मागच्या जगात अधिक अडकलेला आहे तर आगाशेने नवी व्यवस्था पुरेपूर आत्मसात केलेली, सानिका मात्र एक पाऊल दारात नि एक दाराबाहेर अशा त्रिशंकू अवस्थेत अडकलेली दिसते.

'खिडक्या...'मधे एक गोष्ट मात्र निसटली असे वाटते. निवेदनात्मक शैलीमधे परस्परांबद्दल बोलताना पर्स्पेक्टिव निर्माण करण्याचा फायदा घेतलेला दिसत नाही. अर्थात शक्य आहे म्हणून तसे करायलाच हवे असे मात्र नाही हे मान्यच करायला हवे. कादंबरी म्हणून पाहता राम्या नि रोहनच्या 'सबमिशन' या प्रकरणासारखेच अखेरचे 'फ्लाईट' हे प्रकरण नसते तरी चालले असते. 'सबमिशन' हे काहीसे उपरे वाटते तर 'फ्लाईट' सुसंगत असले तरी अनावश्यक. 'प्रलय' पाशी थांबले असते तरी चालले असते.
-----oOo-