’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

सत्तेचे भोई

आठ ऑगस्ट रोजी बंगालमधील काँग्रेस छात्र परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या कृष्णप्रसाद जेना या विद्यार्थ्याची प्रतिस्पर्धी 'तृणमूल छात्र परिषद' या तृणमूल काँग्रेसशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचे कारण काय होते तर तृणमूल काँग्रेसचे मंत्री सौमेन महापात्र यांच्या स्वागतासाठी आला नाही! आणि हे महापात्र महाशय त्यावेळी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी म्हणून आले होते. तरीही त्यांना आदरसत्काराची हौस होती की नेत्यावर छाप पाडण्यासाठी कार्यकर्तेच अति आक्रमक होते हे सांगता येत नाही. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून एका विद्यार्थ्याची हत्या करण्याइतके बेभान होण्यात शासन धार्जिणे असण्याचा आधार नक्कीच कामी येत असणार.

यावर शासन आणि विद्यापीठ संलग्न व्यक्तींच्या प्रतिक्रिया अतिशय संवेदनशून्य होत्या. एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे हे बिनमहत्त्वाचे ठरवण्यासाठी शिक्षण मंत्री तो 'बाहेरचा' विद्यार्थी असल्याचे ठसवत आहेत, दोनदा नापासही झाल्याचे आवर्जून सांगत आहेत. ज्यांच्या अधिकारक्षेत्रात ही हत्या झाली ते प. मिदनापूरचे एसपी देखील तो 'बाहेरचा' विद्यार्थी असल्याचे तुणतुणे लावत आहेत. म्हणजे महाविद्यालयाबाहेरचा आहे म्हणून त्याची हत्या कमी महत्त्वाची वा क्षम्य ठरते? अर्थात ज्या देशात हत्या झालेल्या नन्सच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांच्या हत्त्येचे महत्त्व कमी करत अप्रत्यक्षपणे त्या गुन्ह्याला त्याच जबाबदार आहेत असे सुचवले जाते, दहा दहा वर्षांच्या मुलांना जिवंत जाळणार्‍या नराधमाचे समर्थन करताना त्याचा बाप धर्मांतर करत होता हे बेशरमपणे सांगितले जाते, बलात्काराच्या गुन्हयाला स्त्रीच जबाबदार असते असे म्हणणारे नेते आणि अध्यात्मिक गुरु असतात अशा माथेफिरुंच्या देशात हे तर्कही वाजवीच मानले जातील.

तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यापासून त्यांच्या नेत्यांचा उद्दामपणा, गुंडांचा नंगानाच बंगालमधे चालू आहे. बंगालमधे कम्युनिस्ट जाऊन तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा 'आगीतून फुफाट्यात' अशी काही जणांची प्रतिक्रिया होती. तेव्हा त्यांची 'कम्युनिस्टांचे पक्षपाती' अशी संभावना केली गेली. पण सत्तेचे फासे उलटतात ते सत्तेच्या चाव्या हाती असलेले धनको आणि गुंड आपल्या जागा बदलतात म्हणून, एकदा ते झाले की त्याला अनुसरून जनमत निमूटपणे बदलतेच. अनेक वर्षे कम्युनिस्टांसाठी गुंडगिरी करणारे तृणमूलसाठी तेच काम करू लागले तेव्हा सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती गेल्या हे सर्वसामान्यांना दिसू शकले नव्हते. ज्यांना दिसू शकले त्यांनी 'लोहा लोहेको काटता है' अशा शब्दात या गुंडगिरीचे समर्थनही केले होते. 'आपल्याला वाईट, गैरसोयीच्या अथवा घातक वाटणार्‍या परिस्थितीतला कुठलाही बदल योग्य दिशेनेच असतो असे समजायचे कारण नाही.त्या बदलाचेही मूल्यमापन व्हायला हवे. '  असा सावधगिरीचा इशारा काही तटस्थ निरीक्षकांनी दिला होता. सतत काहीतरी बदल होत रहावेत, तीच प्रगती अथवा विकास असे समजणारे किंवा मुळातच कम्युनिस्टांचे वैचारिक विरोधक असलेल्यांनी प्रथमच कम्युनिस्ट सत्तेबाहेर गेल्याच्या उन्मादी आनंदात तो कानाआड केला. झेंड्याचा रंग बदलला असला तरी तो झेंडा धरणारे हात तेच आहेत याचे भान हरवले होते. कम्युनिस्ट शासन गेल्यामुळे बंगालच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. फरक पडला असला तर तो इतकाच की पूर्वी गुंडगिरीचे समर्थन करणारे आणि त्याबद्दल आक्रोश करणारे आता आपापल्या भूमिका उलट करून उभे आहेत इतकेच.

बंगालमधे जे घडले तेच कमी अधिक फरकाने गेल्या वर्ष, दीड वर्षात देशपातळीवर घडते आहे. लोकसभेच्या नि महाराष्ट्र विधानसभेच्या  निवडणुकीच्या वेळीही राजकारण्यांचे प्रत्यक्ष पक्षांतर आणि धनदांडग्यांचे नि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे छुपे पक्षांतर यातूनच सत्तांतर घडून आले आहे हे सहज पाहता येते. वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारे नेमका आकडा सांगायचा तर तब्बल ११४ नेत्यांनी (पडताळा करून घेता न आलेले नेते जमेस धरता हा आकडा २००ची संख्या सहज ओलांडून जातो आहे.) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या सत्ताधारी पक्षांतून सध्या सत्तेवर असणार्‍या पक्षांत प्रवेश केला. यातील बहुसंख्य निवडूनही आले आहेत. या राजकीय नेत्यांचे आश्रित किंवा बाहुबल असणार्‍या 'कार्यकर्ते' म्हणवल्या जाणार्‍या अनेक गुंडांनीही आपल्या मालकासोबत नवा घरोबा स्वीकारला आहे. जुनी पालखी जमिनीवर ठेवून नव्या राजाची पालखी घेऊन हे भोई चालू लागले आहेत. त्यामुळे जे बंगालचे झाले तेच बहुधा देशातही घडणार आहे.

एखाद्या राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या अथवा विशिष्ट वैचारिक पार्श्वभूमी असलेल्या शासकांच्या हातात दीर्घकाळ सत्ता असली आणि सुरुवातीच्या काळातला आशावादाचा भर ओसरला की हळूहळू त्या व्यवस्थेतील उणीवा दिसू लागतात. मग त्यांचे परिणाम तपासले जाऊ लागतात, हळूहळू त्यावर ध्यान  इतके केंद्रित होते की हे आता बदलले पाहिजे या निष्कर्षापर्यंत लोक येऊन पोचतात. याला दीर्घकाळ सत्तेबाहेर राहिलेले विरोधक सक्रीय पाठिंबा देत असतात. पण हे विरोधक जेव्हा जुन्या सडलेल्या व्यवस्थेचा पर्याय म्हणून पुढे येतात तेव्हा ते नवे पर्याय खरंच जुन्या व्यवस्थेहून काही वेगळे असतात का असा प्रश्न आपण विचारून पाहत नाही.

'आज' काहीतरी चुकते आहे, काहीतरी बिघडलेले आहे आणि एखादी छानपैकी क्रांती करून ते बदलून काहीतरी करून सगळे व्यवस्थित करून टाकायचे आहे असे बर्‍याच जणांना वाटत असते. फक्त ते 'काहीतरी' करायचे म्हणजे काय याचे उत्तर मात्र बहुधा असा बदल, अशी क्रांती करू इच्छिणार्‍यांकडे नसते. मग समोर येईल त्यालाच उत्तर मानण्याची, ते पुरेसे ठरले नाही तर मग 'निदान जुने तर गेले' असे समर्थन करण्याची प्रवृत्ती दिसून येते. केवळ सत्ताधारी बदलले की 'पुरेशी' क्रांती झाली असा समज करून घेतला जातो. अनेकदा रोगापेक्षा उपाय भयंकर आहे हे लक्षात येते, पण ती चूक प्रांजळपणे मान्य न करता तर्कांच्या कोलांटउड्या, वैयक्तिक शेरेबाजी, मागच्यांच्या तुलनेत नवे 'कमी वाईट' अशा मखलाशा सुरू होतात. हा स्वप्नाळूपणा भारतात आहे तसाच इजिप्तमधेही, महाराष्ट्रात आहे तसा बंगालमधेही. अवघड नि गुंतागुंतीच्या प्रश्नांना नवा धर्म, नवा इजम, नवा नेता, नवा त्राता अशी साधीसोपी उत्तर शोधण्याची माणसाची सवय हा जगाच्या कानाकोपर्‍यात वसलेल्या माणसांत एक समान धागा आहे.

स्वातंत्र्यानंतर दोन-अडीच वर्षांचा अपवाद वगळता केंद्रात काँग्रेस सत्ताधारी होता, तसेच १९७७ पासून बंगाल हा डाव्यांचा बालेकिल्ला होऊन बसला होता. भारतात सत्तेचे राजकारण निर्णायकरित्या बदलवणारे तीन प्रसंग दाखवता येतात. पहिले १९७७ केंद्रात झालेल्या काँग्रेस पाडावाची उपपत्ती म्हणून बंगालमधे काँग्रेसला बाजूला सारून कम्युनिस्टांचे सत्ता हस्तगत करणे, दुसरे या सरकारने तब्बल साडेतीन दशके निरंकुश सत्ता भोगल्यानंतर २०११मधे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने डावी सत्ता उलथून टाकत सत्ता बंगालमधे सरकार स्थापणे आणि तिसरे सर्वात अलिकडचे म्हणजे २०१४ मधे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप या उजव्या, कडव्या धार्मिकतेला धार्जिण्या पक्षाचे केंद्रात सरकार स्थापन होणे. जरी आणिबाणीचा परिणाम म्हणून विरोधक एकत्र येऊन त्यांनी केंद्रात काँग्रेसचा पाडाव केला असला तरी त्या कालखंडाने देशाच्या राजकारणाची दिशा - वर उल्लेख केलेला बंगालचा अपवाद वगळता -  फारशी बदलली असे म्हणता येत नाही. ती दोन अडीच वर्षे संपताच गाडी पुन्हा मूळपदावर आली. परंतु बंगालमधे मात्र सत्ता हाती येताच डाव्यांनी ती दीर्घकाळ हातून निसटू दिली नाही. क्रांतीला मूर्त रूप देत असताना किंवा एखादे नकोसे सत्ताकेंद्र उखडून फेकत असताना त्याला पर्याय म्हणून आपण काय उभे करतो आहोत याचेही भान त्या बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना असायला हवे. वर उल्लेख केलेल्या तीनही प्रसंगी ते लोकांमधे होते असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

काही काळापूर्वी इजिप्तमधे प्रसिद्ध 'जस्मिन क्रांती' झाली. क्रांतीच्या रम्य नि गुलाबी कल्पना घेऊन जगणारे आपल्याकडचे क्रांतिकारक लगेचच भारावून गेले. त्यांना भारतातही अशी क्रांतीबिंती व्हायला हवी अशी स्वप्ने पडू लागली. पुढे अण्णांच्या तथाकथित क्रांतीच्या काळात ते स्वप्न प्रत्यक्षात उतरेल अशी आशा त्यांना वाटू लागली. समाजाच्या आर्थिक उतरंडीत वरच्या स्थानावर असलेल्या आयटीतील एंजिनियर्सनी गांधी टोप्या घालून हिंजवडी फेज-१ टू फेज-२ मोर्चा काढून तात्कालिक स्वातंत्र्यसैनिक वगैरे होण्याची संधी साधली. पण अपेक्षेप्रमाणे इजिप्तमधे मुबारक बरे होते असे म्हणता येईल अशा कट्टर मुस्लिम ब्रदरहुडच्या हाती सत्ता गेली आणि अण्णांच्या आंदोलनाने डोंगर पोखरून उंदीर काढावा तसे आणखी एका स्थानिक प्रभाव असलेल्या राजकीय पक्षाला जन्म देऊन जंतरमंतरवरच डोळे मिटले.

सामान्यपणे जगात अशी क्रांती होते ती शस्त्राच्या बळावर, मतपेटीच्या लोकशाही मार्गाने किंवा जनतेच्या उठावाच्या मार्गाने. बुद्धिभेदाचे किंवा प्रबोधनाचे (त्या क्रांतीचे तुम्ही समर्थक आहात की विरोधक यानुसार) हत्यार देखील वापरले जाऊ शकते, वापरले जाते. परंतु स्वतंत्रपणे काम करताना याची परिणामकारकता कमी होते आणि प्रगतीचा वेगही संथ असतो. पण याच्या जोडीला वरील तीनपैकी एखादे हत्यार असेल तर बदल वेगाने घडवून आणता येतो. जगातील धार्मिक आणि कम्युनिस्ट अशा वैचारिकदृष्ट्या दोन ध्रुवांवर असलेल्यांनी बुद्धिभेद/प्रबोधनाच्या जोडीला हत्यार उचलून बर्‍याच देशात सत्ताबदल घडवून आणले आहेत.

'काहीतरी बदल हवा' म्हणणारे बदल झाला की झाली क्रांती किंवा झाला विकास म्हणून झोपी जातात. पण त्याची किंमत अनेकांना चुकवावी लागते. अफगाणिस्तानमधे बमियानमधे उभ्या असलेल्या शांतिदूताच्या पुतळ्याला आपल्या विध्वंसाने, इराकमधल्या स्त्रियांना आपल्या शीलाने, श्रीलंकेतील तमिळांना आपल्या सर्वस्वाने, ईजिप्तमधल्या लोकांना स्वातंत्र्याने आणि जगातील जवळजवळ प्रत्येक तथाकथित क्रांतीमध्ये अनेक जीवांना आपल्या मृत्यूने! एकीकडे हजार वर्षांपूर्वीच्या तथाकथित मूल्यांना घट्ट कवटाळून बसलेले जडबुद्धी आणि दुसरीकडे सतत नाविन्याला आणि बदलांना हपापलेले लोक दोन्हीही सारखेच विचारहीन. पहिला गट म्हणतो 'बघा तुमच्या प्रगतीने कसं वाटोळं केलं, आपली महान संस्कृती सोडल्याचा परिणाम', दुसरा म्हणतो 'इतक्या वर्षांत किती मागे राहिलो, आता बदल हवाच.' पहिल्याला बदलाने आपले आयुष्य किती सुखकर केले याचे 'सोयर' नाही, आणि दुसर्‍याला तथाकथित बदलाने घडवलेल्या विध्वंसाचे 'सुतक' नाही. तारतम्याची वाट मात्र या धुमश्चक्रीत हरवून गेली नि ते दिग्मूढ होऊन बसलेले दिसते.  

बंगालमधे काय किंवा देशात काय, झेंड्याचा रंग बदलला की बरेच काही बदलेल हा असलेला आशावाद किती भाबडा नि कुचकामी आहे हे दोन्ही ठिकाणी दिसून आलेच आहे. देशाच्या आर्थिक, सामाजिक स्थितीत बदल घडवायचा असेल तर केवळ सत्ता बदलून भागत नाही तर सर्वसामान्यांचे विचार नि कृती यात बदल घडावा लागतो, सत्तेत जाण्याचा धन आणि ताकद या व्यतिरिक्त तिसरा मार्ग निर्माण करावा लागतो. आणि हा बदल या दोन्हीचा वापर करूनच सत्ता राबवणारे मुळीच करणार नाहीत, तो सामान्यांनाच करावा लागेल याची समज येत नाही तोवर 'अच्छे दिन' हे जुमलेच राहतील किंवा बदल झाल्याचे आभास निर्माण करणारी भांगेची गोळी.

पालखीतला राजा वेगळा असेल पण पालखीचे भोई तेच असतील तर वाटचाल बदलण्याची शक्यताच नसते.त्यामुळे बदलाची सुरुवात राजापासून नव्हे तर त्याला खांद्यावर घेणार्‍या भोयांपासून करावी लागते.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः पुरोगामी जनगर्जना सप्टेंबर २०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा