बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

अन्योक्ती १ - एका 'जॉन स्नो'चा मृत्यू

'Game of Thrones' नावाच्या एका बहुचर्चित दूरचित्रवाणी मालिकेतला पाचवा सीजन नुकताच संपला. कोण्या काल्पनिक जगातले सात राजे, काही भटक्या टोळ्या नि त्यांचे राजे यांच्यात सतत चालू असलेले सत्तासंघर्ष, त्यासाठी वापरली जाणारी देहापासून पारलौकिकापर्यंत सारी साधने, परस्परद्रोह, हत्या, हिंसाचार, लैंगिकता यांचा विस्तीर्ण पट असलेली ही मालिका जगभरातल्या प्रेक्षकांना बांधून ठेवणारी ठरली आहे. तिचे पुढचे भाग चॅनेलवर येण्याआधीच पहायला मिळावेत यासाठी ते खटपट करू लागले आहेत इतकी उत्सुकता त्याबद्दल निर्माण झालेली आहे. अनेक प्रेक्षक त्यात इतके गुंतले आहेत की नुकत्याच सादर झालेल्या शेवटच्या भागात झालेल्या 'जॉन स्नो'च्या हत्येने प्रेक्षकांमधे संतापाची लाट उसळली. अनेकांनी ती मालिका दाखवणार्‍या चॅनेलकडे निषेध नोंदवला. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियांतून तिखट प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.

स्वयंघोषित सुसंस्कृत जग आणि त्यांनी असंस्कृत ठरवलेल्या जमाती (ज्यांना wildlings असं संबोधले जाते आहे, पण जे स्वतःला 'free folks' किंवा 'स्वतंत्र लोक' म्हणवून घेतात) यांच्या जगाला विभागणारी एक विशाल बर्फभिंत सुसंस्कृत समाजाचे प्रातिनिधित्व करणार्‍या सात राजांनी मिळून बांधली आहे. या दोन समाजात सातत्याने युद्धे होतात; समोरासमोर होतात, गनिमी काव्यानेही होतात. त्या युद्धांच्या खुणा मिरवणारे, त्यात गमावल्या व्यक्तींचा अभाव सोसणारे दोन्ही बाजूला आहेत. त्यातही भिंतीचे रक्षण करण्यास नेमलेली सेना म्हणजे त्या तथाकथित सुसंस्कृत जगातले सारे असंस्कृत लोक; गुन्हेगार, पराभूत वृत्तीने जगण्यापासून दूर जाऊ पाहणारे, ज्यांना त्या सुसंस्कृत म्हणवणार्‍या जगात आपले म्हणतील असे कुणी नसणारे कदाचित. जॉन स्नो हा एका राजाचा अनौरस पुत्र आणि या 'मोले घातले लढाया' सेनेतील युद्धाचा पूर्वानुभव आहे अशी एकमेव व्यक्ती, त्याच आधारे त्यांचा नेता बनलेला.

पण भिंतीच्या उत्तरेकडून आता एक भयानक संकट चालून येते आहे. मृतांना पुनर्जात करून उभी केलेली 'White Walkers' ची सेना खोलवर  जंगलात कुठेतरी उभी राहते आहे. प्रचंड संख्येने चालून येणार्‍या या सेनेला जॉनचे अक्षरशः मूठभर असलेले लोक थोपवू शकणार नाहीत. दुसरीकडे भिंतीपलिकडे उत्तरेलाच असणारे ते असंस्कृत म्हटले जाणारे लोक तर त्यांचे पहिले बळी ठरणार आहेत, इतकेच नव्हे तर बळी गेलेले पुनर्जात होऊन आपल्याच लोकांचे बळी घेण्यासाठी चालून येणार आहेत. अशा परिस्थितीत जुन्या वैराला विसरून दोन्ही बाजूंनी एक होऊन येणार्‍या संकटाचा सामना केला तर कदाचित त्या अफाट आणि अजेय सेनेला काही प्रमाणात विरोध करू शकू असा प्रस्ताव जॉन स्नो देतो. दोन्ही बाजूचे बरेच लोक या नव्या युती बाबत नाखूशच नव्हे तर कट्टर विरोधात आहेत. परस्परांशी झालेल्या युद्धात ज्यांनी जिवाभावाचे कुणी गमावलेले आहे अशा लोकांच्या भावना याबाबत अर्थातच अधिक तीव्र आहेत.

भिंतीपलिकडे जाऊन 'असंस्कृत' म्हणवल्या जाणार्‍या त्या लोकांचे मन वळवण्यात आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन येण्यात - त्यांच्यावर ते संकट आधीच येऊन कोसळल्यामुळे कदाचित - जॉन यशस्वी होतो. परंतु परतून आलेल्या जॉनला 'सुसंस्कृत' जगातील लोक 'द्रोही' ठरवून दग्याने ठार मारतात. यात मागून येऊन 'कमांडर' झालेल्या जॉनचा मागे राहिलेला प्रतिस्पर्धी असतो तसाच भिंतीपलिकडच्या लोकांनी ज्याचे आईवडील ठार मारले होते असा दहा वर्षांचा जॉनचा मदतनीस 'ऑली'ही. तो ही जॉनवर प्रत्यक्ष वार करून आपला सूड उगवतो. आता भिंतीपलिकडच्या आणि अलिकडच्या माणसांतील हा दुवा तोडून टाकल्यावर येणार्‍या त्या महाकाय संकटाचा सामना नक्की कसा करायचा याची कोणतीही पर्यायी योजना जॉनच्या खुन्यांकडे नाही. कदाचित जॉनच्या योजनेनुसार भविष्यातील काही मृत्यू टाळता आले असते, पण भूतकाळातला सूड उगवण्यासाठी भविष्यात आता इतर अनेकांना मृत्यूच्या खाईत लोटण्यात आले आहे.

दीर्घकाळ चाललेल्या वैराबाबत नेहेमीच अनुभवास  येणारे हे वास्तव आहे. माणसे भविष्यापेक्षा भूतकाळातच अधिक रमलेली दिसतात. अस्मितेच्या आणि वैराच्या चुडी भूतकाळातल्या जाळावरच चेतवल्या जात असतात. असे एखादे वैर दोन्ही बाजूंनी परस्परांचे केलेले नुकसान विसरून, बाजूला ठेवून दोन्ही बाजूंना सामोरे जावे लागणार्‍या कैक पट मोठ्या संकटाला एकत्रित सामोर गेल्यास भविष्यातील मोठे नुकसान कदाचित टाळता येऊ शकते हे शहाणपण स्वतःला प्रगत म्हणवणार्‍या माणसांत अजून फारसे रुजलेले आढळत नाही. एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर त्याला त्याची विश्वासार्हता, नेतृत्व आणि क्वचित प्राणही गमवावा लागतो. वैयक्तिक सूडासाठी, स्वार्थासाठी सार्‍या समाजाला आपण संहाराच्या खाईत लोटत आहोत याचे भान नसणारे संख्येने अधिक असतात, कमी असलेच तरी त्यांचा आवाज मोठा असतो. ते 'ऑली'सारखे असतात. आपल्या आईबापाच्या खुन्यांच्या जमातीशी समझोता करणारा म्हणून जॉन आपला शत्रू आहे असा त्याचा समज होतो (किंवा तसे ठरवणे त्याच्या सूडाच्या पूर्तीसाठी सोयीचे असते)  आणि आईवडिलांच्या खुन्यांना शासन करण्याइतके बळ आणि परिस्थिती त्याला निर्माण करता आले नाही तरी जॉनची हत्या करण्याइतके बळ तो जमवू शकतो, जमवतो. यातून आईबापांच्या मृत्यूचा सूड आपण उगवतो आहोत असे खोटे समाधान तो स्वत:साठी मिळवू पाहतो, पण त्याचवेळी तो स्वतःला आणि त्याच्याबरोबरच्या त्या मूठभर सैनिकांना मृत्यूच्या खाईकडे घेऊन जातो.

'ऑली'चे आईवडील तर गेलेच पण कदाचित जॉनची योजना राबवली तर आपला जीव वाचू शकतो हे त्याला आणि त्याच्यासारख्याच मूलबुद्धी सहकार्‍याना समजत नाही, किंवा समजले तरी विचाराऐवजी उन्मादाला अधिक महत्त्व देत असल्याने त्याची त्यांना फिकीर नाही. ती भिंत केवळ त्या सैनिकांचीच नव्हे तर त्या भिंतीपाठी सुरक्षित असणार्‍या सात राज्यांतील सर्वसामान्यांची रक्षणकर्ती असल्याने आपल्याबरोबरच आपण त्या सार्‍यांचे आयुष्य धोक्यात घालतो आहोत याची त्या उन्मादी तथाकथित सैनिकांना जाणीव नसते. जसे त्या मुलाचे आईवडील आणि भिंतीच्या रक्षणकर्त्या सैनिकांपैकी काही लोक भिंतीपलिकडच्या लोकांनी ठार मारले तसेच इकडच्या लोकांनीही ठार मारलेल्यांचे सुहृदही त्या बाजूला आहेत याचे भान ते विसरतात, केवळ सूडाला प्राधान्य देतात आणि सतत नवनव्या सूडभावना जन्माला घालणारी कृत्ये करत राहतात. युद्धात वित्तहानी होते त्यापेक्षाही अधिक मोलाच्या अशा जीविताची हानी होत असते.

युद्ध हा खेळ नव्हे, ती अपरिहार्यता असते हे कधीही विसरता कामा नये. सूडाचा प्रवास अशा युद्धांचे सातत्य निर्माण करतो आणि युद्धभूमीपासून दूर असणार्‍यांना खोट्या अभिमानाचे आणि अस्मितांचे खेळ देऊन टाकतो. गमावणारे वेगळे आणि खेळणारे वेगळे अशा विषम सामन्यात खेळणार्‍यांचा कैफ समजण्यासारखा असतो. पण ज्याने एकदा गमावले आहे त्याला गमावण्याची वेदना ठाऊक असते, त्याची जाणीव ठेवून तो खेळ पुन्हा त्याच परिणतीपर्यंत पोचू नये यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्याऐवजी त्यानेच सूडाचे अग्निकुंड पेटते रहावे म्हणून नव्या समिधांची सोय करावी हे अधिक असंस्कृतपणाचे लक्षण मानायला हवे.

असे जॉन स्नो तुमच्या आमच्या आयुष्यातही असतात. दूरदृष्टीचा अभाव असलेले, भूतकाळात जगू पाहणार्‍यांचे जमाव त्यांची हत्या करतात. त्यानंतर तेच द्रोही असल्याचे मागे राहिलेल्यांच्या गळी उतरवतात. त्यापूर्वी भिंतीवरच्या आणि भिंतीआड सुरक्षित माणसांसाठी त्याने लढलेल्या लढाया, गाजवलेला पराक्रम जणू 'अगा जे घडलेचि नाही' असा आव आणतात. पण अशा जॉन स्नो कडे असलेली दूरदृष्टी, त्याचे शहाणपण त्यांच्याकडे नसते. त्याअर्थी जॉन स्नोचा मृत्यू हा एका शहाणपणाचा मृत्यू ठरतो. भूतकाळाकडे बघत अशा सूड आणि अस्मितांचे खेळ खेळणारे अखेर स्वतः सर्वनाशाकडे जातातच, पण त्याहून वाईट हे की ते इतरांनाही आपल्याबरोबर घेऊन जातात. ज्याप्रमाणे जॉन अनेकांना जगण्याची संधी देऊ शकत होता तसे हे त्याचे मारेकरी देऊ शकत नाहीत, हत्येने सुरु झालेला त्यांचा प्रवास त्यांच्या इतरांबरोबरच विनाशापाशीच संपणार असतो. कधीकाळी जॉनवर उगारलेले खंजीर उगारून पुढे ते एकमेकावरच वार करु लागतात, कारण समस्या सोडवण्याचा तेवढाच एक उपाय त्यांना ठाऊक असतो.

'गेम ऑफ थ्रोन्स' एक काल्पनिक कथा असेल, पण तुमचा आमच्या वास्तवाशी त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे. त्यात आपल्या जगण्याचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले आहे. अशा बर्फभिंती तुमच्या-आमच्या आयुष्यातही उभारलेल्या असतील. त्या भिंतीच्या अलिकडचे आपण सारे सुसंस्कृत आणि पलिकडचे रानटी, जंगली अशा गृहितकांवर आपण जगत असू कदाचित. त्या भिंतीच्या दोन बाजूंमधे समेट घडवू पाहणार्‍याची हत्या होत असेल आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्याची द्रोही म्हणून होणारी विटंबना सुसंस्कृतांमधले असंस्कृत लोक कदाचित करत असतील. वार करणारा खंजीर ज्यांच्या हाती आहे त्यांना हे समजणे तर दुरापास्तच आहे, पण आपल्या लाडक्या 'जॉन स्नो'ची हत्या झाली म्हणून निषेध नोंदवायला जाणार्‍यांना तरी हे उमगले असेल का?

-oOo-

(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना ऑगस्ट २०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा