अन्नं वै प्राणिनां प्राणा<< मागील भाग
---
कळपातील सुरक्षितताहरण काळवीटासारखे शाकाहारी प्राणी कळपाच्या स्वरूपात राहतात. असे असूनही त्यांच्यामध्ये परस्पर-सहकार्य असे फारसे नसते. कळपातील प्रत्येक प्राणी आपापले अन्न स्वतंत्रपणे मिळवत असतो. यांचे कळप करून राहाणे हे प्रामुख्याने कळपातील सुरक्षिततता (safety in numbers) मिळवण्याच्या हेतूनेच असते.
एकाच ठिकाणी अनेक भक्ष्यांचे पर्याय उपलब्ध झाल्याने शिकारी प्राण्याकडून त्यातील एका विशिष्ट प्राण्याची शिकार करण्याची संभाव्यता (probability) घटते. त्याचबरोबर काहीवेळा कळपातील प्राणी नेट धरून एकत्रितरित्या शिकार्याचा मुकाबला करु शकतात. कमी श्रमांत शिकार मिळवण्याच्या दृष्टिने शिकार्याचा रोख सामान्यत: कळपातील दुबळ्या भक्ष्याकडे अधिक जातो. त्यामुळे त्यातील सक्षम प्राणी निसटून जाऊ शकतात. यातून नैसर्गिक निवडीच्या तंत्राने भक्ष्य प्राण्यांमध्येही पुढे अधिकाधिक सक्षम पिढ्या उदयाला येऊ लागतात.
शिकारीचे नियोजन
या शाकाहारी, भक्ष्य अथवा संग्राहक प्राण्यांना फारतर शिकार्यापासून अथवा मोठ्या प्राण्यापासून सावध राहणे इतपतच नियोजन करावे लागते. पण शिकारी प्राण्यांचे भक्ष्य हे पळ काढू शकणारे, प्रतिकार करु शकणारे, क्वचित माघार घेण्यास भाग पाडू शकेल इतपत बलवानही असू शकते. म्हणून टोळीने शिकार करणार्या प्राण्यांमध्ये कोळसुंदे अथवा लांडगे सुनियोजितपणे शिकार करताना दिसतात. यात टोळीतील प्राणी भक्ष्याचा पाठलाग करण्याची जबाबदारी टप्प्याटप्प्याने घेत स्वत:चा दमसास वापरून भक्ष्याचा शक्तिपात घडवून आणतात. अशा थकलेल्या प्राण्याला कोंडीत पकडता येईल अशा स्थानी हाकलत नेऊन त्याची शिकार साधली जाते.
माणसाने शिकार करण्यास सुरुवात केल्यावर तिचे नियोजन अशाच धर्तीवर केले जाऊ लागले. त्यातून वाघसिंहादी प्राण्यांनाही जमणार नाही अशा मोठ्या प्राण्यांची शिकारही साध्य करता येऊ लागली. मॅमथ या नावाच्या अजस्र हत्तीची शिकारही मानवी टोळ्यांनी केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. श्रमविभागणी आणि कामाचे नियोजन ही संकल्पना अशी शिकारीतून प्रथम निर्माण झालेली आहे. शिकारी प्राण्यांकडून उचललेली नियोजनाची ही संकल्पना माणसाने पुढे आपल्या सर्वच कामांतून वापरण्यास सुरुवात केली.
कळप, टोळी ते समाज
पण कोळसुंदे असोत की लांडगे, एकदा शिकार पुरी झाली की ’Everyone for itself’ या उक्तीप्रमाणे टोळीतील प्रत्येक प्राणी त्या शिकारीतील आपला वाटा मिळवण्यासाठी तुटून पडतो. अन्न-वाटपाचे निश्चित असे सूत्र त्यांच्यात नसते. शिकार गरजेपेक्षा अधिक मिळाली तर शिल्लक अन्न नंतर खाता यावे म्हणून लांडगे ते पुरून ठेवतात. चित्ता, वाघ यांसारखे प्राणीही खाऊन झाल्यावर उरलेली शिकार पाचोळ्याखाली दडवून ठेवतात. अस्वल हिवाळी झोपेपूर्वी भरपूर खाऊन घेते नि अन्नाला चरबी स्वरूपात अंगावरच साठवून घेते. खारीसारखे छोटे प्राणी, मुंग्यांसारखे कीटक आणि अर्थातच मधमाश्या अन्न-संग्रह करताना दिसतात.
मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, शिकार जसजशी सुलभ होत गेली तसतसे अन्नाची उपलब्धता वाढल्याने शिलकीचा प्रश्न निर्माण झाला. मग माणसानेही याचप्रकारे अन्न साठवणुकीचा मार्ग अनुसरला असला पाहिजे. दुसरीकडे अन्नासाठीची वणवण कमी झाल्याने माणसाला मेंदूचा नि उर्जेचा वापर अन्य कामांसाठी करण्यास उसंत मिळाली. त्यातून मग अन्न-संग्रह करण्याचे अधिकाधिक चांगले मार्ग त्याने शोधले.
यातून संपूर्ण टोळीमध्ये विविध कामांची विभागणी होऊ लागली. शिकार करणारे, वाटप करणारे, संग्रहासाठी भाजणे अथवा मिठासारख्या पदार्थामध्ये मुरवणे वगैरे प्रक्रिया करणारे... अशी कामे वाटून दिली जाऊ लागली. टोळीमध्ये सलोखा राहायचा असेल तर शिकारबाह्य कामे करणार्यांसह सर्वांना शिकारीचा वाटा मिळणे आणि प्रत्येकाने आपले नेमून दिलेले काम नीटपणे पार पाडणे आवश्यक ठरले. अशा तर्हेने कळपातील व्यक्तींना जोडणारे बंध निर्माण झाले आणि त्याची टोळीकडे– एका व्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली.
उपव्यवस्था आणि समाज
टोळीअंतर्गत संघर्षाचे अन्नाखेरीज आणखी एका संभाव्य कारण होते आणि ते म्हणजे माद्यांशी जुगण्याचा हक्क मिळवणे. सिंहासारख्या शिकारी प्राण्यांपासून त्याचे भक्ष्य असणार्या आणि कळपाने राहणार्या शाकाहारी प्राण्यांपर्यंत सर्वांमध्ये या हक्कासाठी नरांमध्ये संघर्ष होत असतो. परंतु टोळीअंतर्गत असा संघर्ष टोळीमध्ये विसंवाद नि फूट पडण्यास कारणीभूत ठरू नये म्हणून मानवी टोळ्यांमध्ये एकास-एक नर-मादी अशा जोड्यांची व्यवस्था हळूहळू उदयाला आली.
त्यापूर्वी संपूर्ण टोळीचा भाग असणारी मुले आता त्या जोडीची म्हणून ओळखली जाऊ लागली. टोळीतील इतर सदस्यांपेक्षा या गटाचे– कुटुंबाचे– आपसांतील बंध अधिक दृढ होऊ लागले. यातून व्यवस्थेअंतर्गत उपव्यवस्था आकाराला येऊ लागली. पुढे कार्यविभागणीतून वाट्याला आलेले काम कुटुंब बव्हंशी वंशपरंपरागत करु लागले. त्या आधारानेही अन्य उप-व्यवस्था निर्माण होऊन टोळीचे हळूहळू व्यापक समाजामध्ये रूपांतर झाले.
टोळीचा नेता
टोळीने शिकार करणार्या लांडगे, कोळसुंदे वगैरे प्राण्यांमध्ये प्रत्येक टोळीचा एक नेता असतो(१). सामान्यपणे टोळीतील सर्वात बलवान प्राणी त्या टोळीचा नेता म्हणून वावरत असतो. या नेत्याकडे इतरांपेक्षा अधिक हक्क आणि कर्तव्ये असतात. त्याचे स्थान अन्य नराला हस्तगत करायचे असेल, तर त्याला आव्हान देऊन पराभूत- क्वचित टोळीतून हाकलून देऊन वा ठार मारूनच ते साध्य करावे लागते.
पण टोळीचा नेता हा नेहमीच असा बाहुबलाने निवडला जातो असे नव्हे. त्या टोळीला जगण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य अधिक असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असतो. प्रत्येक टोळीच्या आयुष्याचा आराखडा जसा असेल, तसे नेत्याला आवश्यक असणार्या गुणांची सूची बदलत जाते. रूढार्थाने शिकारी नसलेल्या आणि मानवजातीशी सर्वात जवळचे नाते असलेल्या चिंपांझींच्या टोळीमध्ये शिकार कौशल्यापेक्षा माफक मल्लयुद्ध आणि बव्हंशी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य(२) पुरेसे असते. वयातही न आलेल्या एका चिंपांझीने एका रिकाम्या पत्र्याच्या डब्याच्या साहाय्याने ‘गर्जना’ करत टोळीच्या नेत्यालाही पळवून लावत औटघटकेचे नेतेपद मिळवल्याचे एक गंमतीशीर उदाहरण जेन गुडाल(३) यांनी नोंदवले आहे.
शिकारी टोळी म्हणून वावरणार्या माणसामध्ये शिकारीचे नियोजन करू शकणारा, बाहुबलात नि शिकारी कौशल्यात निष्णात असलेला नेता म्हणून स्वीकारला जात असे. पुढे माणसाने अन्नासाठी केवळ शिकारीवर अवलंबून न राहता शेती आणि पशुपालन या दोन तंत्रांचा वापर सुरू केला. त्यातून आवश्यक कामांची जंत्री अनेकपट वाढली आणि टोळीची व्यवस्था अधिक व्यापक होत गेली. त्यामुळे कार्यविभागणी आणि त्यांची सांगड यांचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरत गेले.
माणसाच्या या व्यामिश्र समाजव्यवस्थेमध्ये निव्वळ शारीरबलापलिकडे संपत्ती, बुद्धी, तंत्रज्ञान, गवगवा (propaganda) यांसारख्या अन्य बलांचे महत्त्वही वाढत गेले. यातूनच पुढे राजकीय व्यवस्थेमध्ये राजा, अध्यक्ष वा पंतप्रधान; आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि धार्मिक व्यवस्थेमध्ये आचार्य, मौलवी, पोप यांसारखे धर्मोपदेशक हे कोणतेही प्रत्यक्ष श्रम न करणारे नेते उदयाला येत गेले.
अन्न, संघर्ष आणि अधिकारक्षेत्र
अन्नासाठी शिकारी प्राण्यांना शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत अधिक संघर्ष करावा लागतो. पहिला संघर्ष होतो तो भक्ष्य प्राण्याशी त्याच्या टोळीतील काही जागरुक सहकार्यांशीही. त्यामुळे शिकार ही नेहमीच यशस्वी होत नाही. त्यासाठी लागणारी ऊर्जाही तुलनेने अधिक असते. त्यातच संभाव्य भक्ष्यामध्ये वाटेकरी निर्माण झाले, तर अन्नाची उपलब्धता आणखी कमी नि दुष्कर होत जाते. ते टाळण्याच्या दृष्टिने अन्य शिकारी प्राण्यांना आपल्या प्रदेशापासून दूर ठेवणे आवश्यक होऊन बसते. हा त्यांचा दुसरा संघर्ष. एकटा-दुकटा सिंह असो, वाघ असो वा लांडग्यांची टोळी, अन्नातले वाटेकरी कमी असावेत, शिकार पुरेशी मिळावी म्हणून सजातीय प्राण्यांशीही संघर्ष करुन त्यांना शक्य तितके दूर पिटाळण्याचा प्रयत्न करतात.
या सजातीयांशी होणार्या संघर्षातून त्या शिकारी प्राण्यांमध्ये हद्दीची संकल्पना उदयाला आली. एखादा वाघ, लांडगा मूत्र-पिचकारीने आपली हद्द आरेखित करतात. त्या मूत्राचा तीव्र गंध अन्य सजातीय प्राण्यांना ’प्रवेश बंद’ची सूचना देत असतो. अन्य वाघाला, सिंहाला अथवा लांडग्यांच्या टोळीला या अधिकारक्षेत्राच्या आत शिकार करायची असेल, त्यातील भक्ष्यांवर आपला हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर त्यांना या ’जमीनमालकांशी’ संघर्ष करुन त्यांना हाकलून लावत त्यांचे अधिकारक्षेत्र - संपूर्णपणे अथवा अंशत: - बळकावावे लागते.
माणसांच्या टोळ्यांमध्ये शिकारीचे तंत्र जसजसे प्रगत झाले, मुबलक अन्नामुळे आणि कार्यविभागणीमुळे टोळ्यांमध्ये व्यवस्था उदयाला येऊ लागली तसतसे टोळ्यांमधील मानवप्राण्यांची संख्याही वाढू लागली. यातून अन्नाची गरज वाढली आणि माणसांनाही अन्य शिकारी प्राण्यांप्रमाणे आपली हद्द निश्चित करण्याची आवश्यकता भासू लागली. मग त्यांनी आपल्या पद्धतीने आपले शिकारक्षेत्र निश्चित करुन इतर टोळ्यांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी संघर्ष करण्यास सुरुवात केली.
पुढे मानव शेती नि पशुपालनाकडे वळल्यानंतर, जंगलाचा अधिवास सोडून नागर झाल्यावर ही अधिकारक्षेत्राची संकल्पना राज्य आणि देश या संकल्पनांमध्ये रूपांतरित झाली.
नैसर्गिक सामुग्रीवर एकाधिकार
पण अधिकारक्षेत्राची निर्मिती केवळ शिकार अथवा अन्नासाठीच झाली असे नव्हे. जगातील कोणत्याही सजीवाला अत्यावश्यक असलेल्या पाण्यावरील अधिकारासाठीही ते राखावे लागते. या मालिकेतील पहिल्या भागात उल्लेख केलेल्या ‘ओडिसी’मधील प्रसंगातील संघर्षाचे कारणच मुळी पाणवठ्यावरील हक्क प्रस्थापित करणे हे आहे. अलिकडे येऊन गेलेल्या ‘बुक ऑफ इलाय’ या चित्रपटातही विध्वंसोत्तर जगामध्ये पाण्याच्या स्रोतावर एकाधिकार राखून एक टोळीप्रमुख उरल्यासुरल्या मानवांवर अधिकार गाजवताना दिसतो.
‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात एक संस्मरणीय असा प्रसंग आहे. लॉरेन्स एका स्थानिक टोळीवाल्याला वाटाड्या म्हणून सोबत घेऊन वाळवंटातून प्रवास करत असताना, वाटेत दिसलेल्या एका पाणवठ्यावर ते पाणी भरून घेतात. वायुवेगाने आलेला शरीफ अली त्या स्थानिकाला थेट गोळी घालतो. ‘हे माझ्या टोळीचे पाणी आहे हे तुला ठाऊक नसले, तरी त्याला ठाऊक होते. त्याचा गुन्हा माफीपात्र नव्हता.’ असे तो लॉरेन्सला सांगतो. सुखवस्तू, इंग्लिश लॉरेन्सला या अपरिचित व्यवस्थेचे आकलन होण्याची ती सुरूवात असते.
अन्न, आणि पाणी या दोन गोष्टी नैसर्गिकरित्या पुनर्भरण होणार्या आहेत. पण अधिकारक्षेत्राची संकल्पना रुजल्यानंतर अधिकाराची जाणीव झालेल्या माणसाने आता व्याजाबरोबर मुदलावरही हक्क सांगायला सुरुवात केली आहे. वृक्षांपासून लाकूड मिळवण्यापासून सुरु झालेला माणसचा प्रवास तेल आणि अन्य खनिजांचा उपसा करण्यापर्यंत पोहोचला आहे.
पुरा तयांचा वंश खणावा (४)
सिंहासारख्या शिकारी प्राण्यांमध्ये जुन्या नेत्याची सद्दी खालसा केल्यावर सिंहिणींना अजूनही बिलगून जगणारी पिल्ले नवा नेता निष्ठुरपणे ठार मारतो. पिलांचे अस्तित्व माद्यांना माजावर येण्यापासून रोखत असते आणि त्यातून त्याला जुगण्याचा आपला हक्क बजावण्याची संधी मिळणार नसते. आईपासून सुटी झालेली पिले तो ठार मारत नाही. त्यातील फक्त नरांवर हल्ले करून त्यांना पिटाळून लावतो. कारण हे नर मोठे होऊन त्याच्या प्रभुत्वाला आव्हान देतील असा समज त्याच्या नेणिवेत रुजलेला असे.
शिकारी प्राण्यांचा वारसा सांगणार्या माणसाचा दृष्टिकोनही याहून वेगळा नव्हता. आपल्या टोळीतील व्यक्ती वगळता इतर सर्वच प्राणी हे संभाव्य शत्रू मानले जात. एका टोळीला दुसर्या टोळीबद्दल भीतीची, अविश्वासाचीच भावना सर्वात प्रबळ असणारा तो काळ होता. स्वत:ला सुरक्षित राहायचे असेल तर इतरांना निखंदून काढले पाहिजे इतपतच बुद्धीचा विकास झालेला तो काळ होता. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे, त्यातही पुरुष नि बालके यांची सरसकट हत्या करावी. अन्यथा ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला धोकादायक ठरतील असा सोपा समज होता.
नागर जीवनाकडे
मानवी संस्कृतीच्या उदयकाळात माणूस हा एकाच कळपाचा अथवा टोळीचा भाग होता. ती टोळी हीच त्याच्यासाठी राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि अर्थातच सामाजिक व्यवस्थाही होती. त्यामुळे त्या टोळीतील एक व्यक्ती अथवा एकक हीच त्याची एकमेव ओळख होती.
आज तशी स्थिती उरलेली नाही. या तीन व्यवस्था स्वतंत्र वाटेने पुढे जात आहेत. त्यामुळे माणसाला या प्रत्येक व्यवस्थेअंतर्गत वेगवेगळी ओळख मिळू लागली आहे. जेव्हा या व्यवस्थांचे हितसंबंध परस्परांना छेदून जातात, तेव्हा त्याच्या कर्तव्यांमध्ये अंतर्विरोध निर्माण होतो आहे. या नागर आयुष्याने माणसाला स्वत:शीच संघर्ष करण्यास भाग पाडले आहे.
आज व्यक्तीची गटनिरपेक्ष अशी स्वतंत्र ओळखही असू शकते किंवा जन्मदत्त गटांहून वेगळ्या अशा गटाचा सदस्य म्हणूनही. एखाद्या आध्यात्मिक, वैचारिक, वैज्ञानिक, कला अथवा व्यावसायिक परंपरेचा वारसा स्वीकारून ती व्यक्ती आपली ओळख स्वत: निर्माण करू शकते. परंतु तरीही माणसांतील बहुसंख्या ती कोणत्या गावाची, घराण्याची, जातीची, धर्माची आहे या प्रश्नांच्या उत्तरांतूनच तिची ओळख करुन घेण्याचा प्रयत्न करत असते. कारण परस्पर-संवाद अथवा आचार-विचार हा आपापल्या गटाच्या भूमिकेला अनुसरूनच करायचा असतो असा तिचा समज आजही आहे.
टोळीजीवनाच्या काळात टोळीविना माणूस ही संकल्पनाच अतर्क्य होती. जंगलवासी माणूस हा दुबळा प्राणी सहकार्यांच्या मदतीशिवाय जिवंत राहणे जवळजवळ अशक्यच होते. त्यामुळेच टोळीतील आपली नेमून दिलेली कर्तव्ये पार न पाडणार्या अथवा तिच्या हिताविरोधात कृती करणार्या व्यक्तीला टोळीतून बहिष्कृत केले जात असे. पुढे नागर समाजातही या बहिष्काराचे प्रस्थ कायम राहिले. आज असा सामाजिक बहिष्कार किंवा ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते.
पण केवळ धार्मिक अथवा जातीय व्यवस्थांसारख्या जुनाट व्यवस्था अथवा त्यांचे पाईक तिचा वापर करतात असे नव्हे. ज्यांना अतिनागर म्हणता येईल असे नागरिकही समाजमाध्यमांमधून अमुक धर्मीयांकडून काही खरेदी करू नका, तमुक देशातील उत्पादनांवर बहिष्कार घाला, अमक्या कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमक्या अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता फारशी बदललेली नाही.
टोळ्या होत्या तेव्हा विरोधी टोळीच्या स्त्रियांवर थेट बलात्कार होत, आता रंडी/रांड वगैरे शब्दातून होतात इतकाच फरक झाला आहे. तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची दृष्टी अजूनही बदललेली नाही. प्रतिस्पर्धी टोळीतील “इतक्या लहान मुलाला का मारायचे?” असा प्रश्न जेत्या टोळीच्या ‘सैनिका’ला फारसा पडत नसे. ते वयाने वाढले की सुज्ञ होऊ शकेल यावर त्यांचा विश्वास नसे. मोठे होऊन ते ही हिंसाच करणार असा त्यांना ठाम विश्वास असे. त्यांच्या बुद्धीची कुवतच तेवढी असे, बहुसंख्येची आजही तितकीच आहे.
समूळ नाशाची ही प्रेरणा आपल्या मनाच्या तळाशी सतत खदखदत असते. या ना त्या प्रकारे ती उसळी मारुन वर येत असते. जमावाने ठार मारलेली व्यक्ती, एखादी बलात्कार झालेली अभागी स्त्री, अन्याय होऊनही न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळालेली दुर्दैवी व्यक्ती आपल्या गटाची नसेल तर बहुतेक वेळा आनंद, समाधान, निदान उदासीनता याच भावना दिसून येतात.
वारंवार बलात्कार करुन ठार मारलेल्या आठ वर्षांच्या मुलीबद्दल ‘साली बडी हो के क्या करती, आतंकवादी बनती.’ असा विचार करणारे टोळीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नसतातच. त्यातूनच एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोराचे नाव तैमूर आहे, हा धागा पकडून ऐतिहासिक तैमूरच्या कृत्यांवरुन एखादी त्याच्या जमातीचा जहरी विद्वेष करणारी, त्याच्याच वयाच्या मुलाची आई त्या बालकाचे मूल्यमापन करणारी किळसवाणी विधाने करताना दिसते.
फ्रेंच नियतकालिक ‘शार्लि हेब्दो’वर इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ला करुन त्यातील अनेकांना कंठस्नान घातले याचा जगभर गवगवा झाला. परंतु पुढे याच शार्लि हेब्दोने दहशतवादापासून परागंदा झालेल्या आणि समुद्रावरच करुण अंत होऊन समुद्रकिनारी निष्प्राण सापडलेल्या अलान कुर्दी या छोट्याबद्दल अशीच अश्लाघ्य टिपण्णी करणारी एकाहुन अधिक भाष्यचित्रे प्रकाशित केली होती. हे नियतकालिक ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ ही त्रिमूल्यांची देणगी जगाला देणार्या फ्रान्समधील आहे हा दुर्विलास म्हणावा लागेल.
लढाई ते युद्ध
अधिकारक्षेत्रासाठी होणार्या लढायांना आज सर्वंकष अशा युद्धांचे स्वरूप आले आहे. टोळ्यांऐवजी अधिकारक्षेत्र म्हणून बस्तान बसलेले दोन देश परस्परांशी जमिनीच्या तुकड्यासाठी भाले, धनुष्यांहून कैकपट आधुनिक शस्त्रांनी युद्धे खेळत आहेत. त्यासाठी ग्लॅडिएटर्स पोसावेत तशी सैनिकांची फौज निर्माण करत आहेत. लढताना त्यांना त्वेष यावा यासाठी ‘प्रतिस्पर्धी टोळीचा कुणीही आपला शत्रूच असतो नि त्याचा ‘पुरा वंश खणावा’ हाच आपल्या प्रगतीचा रस्ता आहे’ हे आदिम तत्त्व (?) त्यांच्या मनावर बिंबवत आहेत. प्रत्यक्ष न लढणार्या वाचिवीरांच्या फौजांमध्ये त्यांचे ते कृत्य उदात्त वगैरे आहे ही भावना निर्माण करण्यासाठी अस्मितेचे, द्वेषाचे पीक रुजवत आहेत.
नागर समाजामध्ये टोळ्यांमध्ये नसलेली संघर्षाची अनेक नवनवीन कारणे निर्माण केली आहेत. स्वगटाबद्दलची अस्मिता हा सुस्थिर, नागर जगाने निर्माण केलेला मोठा विषडोह आहे. विशेष म्हणजे या अस्मितांचे स्रोत बव्हंशी प्राचीन असतात, ज्याची पडताळणी जवळजवळ अशक्यच असते. ‘जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातील असो की भारतासारख्या देशातील,बहुसंख्या ही ‘एखाद्या गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते. नऊ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. अध्यक्ष बुश यांनी ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ची भुमका उठवून इराकचा- एका मुस्लिम राष्ट्राचा विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान मिळवून दिले... आणि अध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाल पदरात पाडून घेतला.
वेदनेचा वारसा
हे सर्व घडवून आणणारे टोळीप्रमुख आज विविध देशांचे सुलतान, अध्यक्ष, पंतप्रधान, शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांचे मालक, माध्यमांचे मालक-संचालक बनून अधिकारक्षेत्राशिवायही भरपूर मलिदा पदरी पाडून घेत आहेत. टोळीयुद्धाप्रमाणेच या सर्वंकष युद्धांमधून पुढच्या पिढ्यांना वेदनेचा वारसा मिळतो आहे.
छोट्या अॅन फ्रँकने तिच्या दैनंदिनीमार्फत(५) या पुढच्या पिढीची वेदना ग्रथित केली आहे. ‘एनिमी अॅट द गेट्स’(२००१) मध्ये दोन महासत्तांच्या टकरीमध्ये बळी गेलेला साशाही तुम्हा-आम्हाला हेच सांगतो आहे. ‘टर्टल्स कॅन फ्लाय’(२००४) मध्ये सुरुंग स्फोटात दोन्ही हात गमावलेला पंधरा सोळा वर्षांचा मुलगा युद्धातील अत्याचाराचे फळ वागवणार्या तेरा-चौदा वर्षांच्या पोरक्या बहिणीचा पोशिंदा होतो आहे... आणि तरीही घरबसल्या महासत्ता होण्याचा कैफ मिरवणार्यांमध्ये तारतम्य नावाचा गुण रुजताना दिसत नाही.
याचे एक कारण म्हणजे या वेदनेला प्रतिस्पर्धी टोळीच सर्वस्वी जबाबदार असल्याचे पटवून देत या पुढच्या पिढीलाही हत्यार म्हणून पुढच्या युद्धात वापरण्याचे नियोजन त्यांच्या टोळीचे मुखंड करत आहेत. त्यामुळे मनुष्य नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच म्हणता येते आहे!
नात्यांचा प्रवास
प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेकोर होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या प्रवास होत गेला आहे.
याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी आहे. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतो आहे. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभावामुळे त्याच्याकडून असलेल्या अनेक-पदरी आणि म्हणून अवास्तव अपेक्षा, आणि त्या अपेक्षाभंगातून येणारे टोकाचे वैफल्य... कळप-टोळी-समाज-कुटुंब या मार्गे सर्वस्वी वैय्यक्तिक जगण्यापर्यंत माणसाचा प्रवास चालला आहे!
- oOo -
टीपा:
(१). तसे हरणे, काळवीट यांसारख्या तृणाहारींमध्ये मध्येही कळपाचा नेता असतो. पण तो प्रामुख्याने माद्यांवर हक्क प्रस्थापित करण्यापुरता असतो.
(२). बाहुबलाऐवजी आवाजी दहशत निर्माण करण्याचे कौशल्य या दोन नेतृत्वगुणांच्या आधारे नेता झालेल्यांध्ये साधारणत: राजा आणि गावगुंड यांच्यात असतो तितका फरक मानायला हवा. राजा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारीही घेतो, तर गावगुंड केवळ खंडणी गोळा करत असतो.
(३). चिंपांझी या वानरकुलातील प्राण्यांवर सुमारे साठ वर्ष अभ्यास केलेली विदुषी.
(४).
सत्तेस्तव नेत्यांस वधावे
असा जगाचा नवा शिरस्ता
पुरा तयांचा वंश खणावा
हा पुढचा प्रगतीचा रस्ता
(बा. भ. बोरकर यांच्या ’शैशविंचा व्रण तसाच वाहे’ या कवितेमधून)
(५).‘डायरी ऑफ अ यंग गर्ल’ - नाझींपासून घराच्या पोटमाळ्यावर लपून राहिलेल्या अॅन फ्रँक या डच मुलीने त्या दोन वर्षांच्या काळात लिहिलेली दैनंदिनी. जगभरातील ७० भाषांमध्ये तिचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
---
पुढील भाग >> > कुटुंबव्यवस्था आणि वारसा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा