रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

आपली भिकारचोट महान परंपरा

आज सकाळी दूध घेऊन येत असताना तळमजल्यावरील घरात गणपती बसवलेला पाहिला. सोबत आजच्या गौरी आगमनाची तयारीही पाहिली. त्या घरातील आजींचे तीनेक महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे परंपरेनुसार वर्षभर सणवारांना फाटा देणे अपेक्षित असल्याने याचे जरा आश्चर्य वाटले. घरी पोचल्यावर आईला सांगितले तर ती सहजपणे ’हो ती काही आपल्या घराण्यातली नसल्यामुळे तिचे वर्षभर सुतक नसते.’ मला परंपरेचा संताप तर आलाच, पण त्याहून आईने जितक्या सहजपणे हे सांगितले त्याबद्दल आला.

मी स्वत: कोणतीही पूजाअर्चा, कर्मकांड करीत नाही. तेव्हा हा माझ्या दृष्टिकोनाचा मुद्दाच नाही. मुद्दा श्रद्धेच्या परिघातच असलेल्या अन्यायाचा आहे.

ती स्त्री आपले घर सोडून नव्या घरी येणार. नव्या घरच्या सार्‍या तथाकथित परंपरांचे जोखड तिच्याच शिरावर. तिच्याच बळावर हे तथाकथित घराणे आपली कर्मकांडॆ चालवणार. कितीही नालायक, बेअक्कल, छळवादी असले तरी त्या घरच्या ज्येष्ठांना बाय डिफॉल्ट आदराने वागवायला हवे. त्यांचा अनमान करता कामा नये. वर सार्‍या खस्ता काढत या नव्या घराची अवलाद तिने जन्माला घालायची पोसायची. ती कार्टी नाव लावणार बापाचे. एवढे करुन बाई निजधामाला गेल्यावर एकच विशेष विधी, तो ही सधवेसाठी; म्हणजे पुन्हा नवरा नामक बैलाचाच मान करणारा. तो आधी खपला तर बाईचे सार्वजनिक आयुष्य संपले. तिने घरात कोंडून घ्यायचे, खस्ता काढत बसायच्या, पोरेबाळे सांभाळायची.

असल्या भिकारड्या परंपरा स्त्रियाच अधिक सांभाळून ठेवतात. स्वत:च्या शोषणाची ही रेघ स्वत:च कुरवाळत वाढवत नेतात. म्हणून मला संस्कृतीने त्यांना दिलेल्या दुय्यम भूमिकेपेक्षाही त्यांनी ती सहज स्वीकारली याचाच संताप अधिक येतो. वर बेशरम लाचारपणे ’आपली परंपरा’ पाळल्याचा निर्बुद्ध अभिमानही बाळगायचा.

बरं परंपरा काही असेल ती असू दे. आपण आपल्यापुरते सक्तीचे नसलेल्या गोष्टी टाळू शकत नाही? आजींच्या सुनेला हे का खटकले नसावे? ’दोन वर्षांपूर्वी सासरे गेले तेव्हा वर्षभराचे सुतक पाळले, मग एक स्त्री म्हणून सासूचेही पाळू’ असे का म्हटली नाही ती? 'सख्ख्या मुलालाही आईबाबत हा भेदभाव  का खटकला नाही?' हा प्रश्न तर - तो पुरुष असल्याने - विचारतच नाही. शेवटी परंपरा नि संस्कृती मानवनिर्मितच असतात. जेमतेम शंभर वर्षांपूर्वीच्या चालीरिती पाहिल्या तर त्यातील अनेक आज अस्तंगत झालेल्या आहेत. तेव्हा नोकरदार स्त्रिया जसे श्रावणी शुक्रवारची सवाष्ण सोय म्हणून रविवारी जेवायला घालतात, इतपत मुरड घालतात, तर एक वर्ष गणेशोत्सव वा गौरी आवाहन केले नाही तर बाभळ बुडेल असे तिला का वाटते?

यांचा जास्तीतजास्त विद्रोह म्हणजे घराबाहेरच्या पुरुषांना ’तुम्ही पुरुष मेले असलेच’ म्हणून आगपाखड करायची. अग बाई तुझ्या घरातल्या त्या सांडाला सांग, मी हे पाळणार नाही म्हणून. उगा फेसबुकावर ’स्त्रिया कित्ती कित्ती सहन करतात’चे रडगाणे गाऊन काय बदल होणार आहे. तुझ्या भल्यासाठी तुझ्या घरातले बैल सुधारायला हवेत. शेजारच्या गोठ्यातला बैलांना प्रवचन देऊन काय उपयोग? बरे शेजारचे बैल तुमच्या मदतीसाठी आले, की तेव्हा घरच्या बैलाची बाजू घेऊन ’इतक्या वर्षांची परंपरा का सोडायची’, ’त्यांना सांगा की’ ’आमच्या घरच्या भानगडीत तुम्ही नाक खुपसू नका’ म्हणून शेपूट घालायची. मग या वांझोट्या फेसबुकी फुसकुल्या कशाला बायांनो?  अंधारातली अधेली उजेडात शोधून उपयोग होत नाही. त्यासाठी जिथे ती हरवली तिथेच दिवा लावावा लागतो. आणि त्यासाठी सुरुवात आपणच करावी लागते. बाहेरचे माझ्या घरात दिवे लावत नाहीत म्हणून त्यांच्या नावे बोटे मोडून उपयोग नसतो.

हॅरिएट टबमन म्हणाली होती, ’मी कित्येक गुलामांना गुलामीतून मुक्त केले. त्याहून कित्येक पट गुलामांना मुक्त करु शकले असते. पण आपण गुलाम आहोत याची त्यांना जाणीवच नव्हती.’ माझ्या नवर्‍याने मला हिरे जडवलेल्या सोन्याच्या बेड्या आणल्या हे फुशारकीने शेजारणीला सांगणार्‍यांनी टबमनचे ऐकायला हवे.

मुळात देवळातच जाऊ नये, कर्मकांड हीच गुलामी, परंपरा पाळूच नयेत वगैरे टाईपच्या सनातनी-पुरोगाम्यांसाठी हे विचार नाहीत. माझे अश्रद्ध असणे,कर्मकांडविरहित जगणे ही जशी माझी, निवड, माझे स्वातंत्र्य, तसेच सश्रद्ध असणार्‍याचेही. त्याच्या परिघात त्याने दोषरहित असण्याचा प्रयत्न करावा. माझ्या परिघात मी करेन. स्त्रियांना कर्मकांड, परंपरा पाळण्याची सक्ती जितकी शोषक तितकी नास्तिकाने आपल्या पत्नीला ती न पाळण्याची केलेली सक्तीही. पुरोगामित्व हे कोणतेही मत लादण्यावर अवलंबून नसावे. एखाद्या स्त्रीने 'मी माझे शोषण करणारे, मला दुय्यम राखणारे संस्कृतीचे जोखड स्वत:हून स्वीकारले' असे म्हटले तर तिच्या निर्णयाचाही मी आदरच करेन. फक्त मग तिला ’स्त्री कित्ती शोषित, तुम्ही पुरुष मेले...’ या तर्काचा हक्क देणार नाही. ’मी तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारली स्वत:च्या निर्णयाने. माझी हाडे मोडली याला तूच जबाबदारतू मला रोखले नाहीस हा तुझा गुन्हा’ असला उफराटा तर्क अजिबात ऐकून घेणार नाही इतकेच. 

आणि हो ’आपल्या संस्कृतीत स्त्रीला आदराने वागवले जाते’ हा मूर्ख तर्क देणार्‍याच्या तर कानफटातच वाजवेन. ’निदान आम्ही बुरखे तरी घालायला लावत नाही’ म्हणणार्‍याच्या दोन कानफटात लावेन. जगातील समस्त संघटित-धर्म-प्रधान संस्कृती या स्त्री-शोषकच आहेत. नागर संस्कृती माणसाने स्वीकारली, तेव्हा संघटित, काल्पनिक आणि पारलौकिकावर आधारित छद्म-धर्म उदयाला आले आणि सर्वांनी एकमुखाने स्त्रीला दास्यात ढकलले. याला कोणताही, अगदी कोणताही धर्म अपवाद नाही. तेव्हा गाढवाने डुकराकडे बोट दाखवून आपल्या गाढवपणाचे समर्थन करु नये. तुम्ही दोघेही मनुष्य नाही हे ध्यानात घ्या, काही अक्कल सुधारली तर सुधारेल इतकेच. 

- oOo -

अस्मितेची मूळव्याध झालेल्यांसाठी ताजा कलम : 

शीर्षकातच मी ’आपली’ असे एकवचन वापरले आहेत. त्यामुळे सर्व परंपरा, संपूर्ण संस्कृतीबद्दलचे ते भाष्य नाही हे समजून मुळव्याधीवर मलम लावून घेणे. सरसकटीकरण करणे. त्याच्या आजाने माझे पाणी उष्टावले ’असेल’ म्हणत नवजात कोकराला ठार मारणे ही धर्म०संस्कृती-जात-परंपरा यांच्या अस्मितेची मुळव्याध झालेल्यांची ’परंपरा’ आहे, माझी नाही.


सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

श्रद्धेची प्रतवारी

एका प्रसिद्ध देवस्थानाने श्रद्धाळूंची स्पर्धा घेतली.
त्यात एकच प्रश्न होता, 
’देवस्थानातील देवाचे दर्शन कसे घेतले 
की अधिक पुण्य लाभते?’

एक म्हणाला, 
’मनोभावे हात जोडून घरुन केलेला नमस्कारही 
देवाला पोचतो.’; देवस्थानच्या ’कार्यकर्त्यांनी’ 
त्याला घरीच गाठला, यथास्थित पूजा करून 
इस्पितळात पोचवला.

दुसरा म्हणाला 
’घरच्या प्रतिरूप मूर्तीचे दर्शन घेतले तरी 
देवस्थानात जाऊन दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते.’
देवस्थानने स्वामित्वहक्क कायद्याखाली त्याच्या
देव्हार्‍यातील मूर्ती जप्त करून नेली. 

तिसरा म्हणाला,
’रस्त्यावरुन गाडीवरुन जाताजाता एका हाताने
केलेला नमस्कारही पुरेसे पुण्य देऊ शकतो.’
देवस्थानने दारासमोर भिंत बांधून बाहेरुन
फुकट दर्शन घेणार्‍यांचा बंदोबस्त केला.

चवथा म्हणाला,
’आत पाऊल न टाकता दारात उभे राहून घातलेले
गार्‍हाणेही आतला देव सहज ऐकू शकतो.’
देवस्थानने गाभार्‍यासमोर असलेले दार चिणून
उजव्या बाजूने प्रवेश देणे सुरू केले.

पाचवा म्हणाला,
’देवस्थानात दर आठवड्याला षोडशोपचारे पूजा
केल्यानेच त्यातील देवाचा खरा अनुग्रह होतो.
देवस्थानने त्याला आठ पूजांच्या देणगीमध्ये
दहा पूजांचे पॅकेज देऊ केले.

सहावा म्हणाला,
’देवाच्या नावे दरमहा देवस्थानला देणगी 
दिल्यानेच देव अधिक प्रसन्न होतो.’
देवस्थानने भिंतीवरील देणगीदारांच्या यादीत
त्याचे नाव जाड टाईपात रंगवले.

सातवा म्हणाला,
’देवस्थानला सर्वस्व दान करून देवासमोर
नतमस्तक झाल्यानेच माणूस पुण्यवान होतो.’
देवस्थानने त्याच्या नावे काळ्या पाषाणाची
एक पायरी देवाच्या पायाशी बसवली.

आठवा म्हणाला,
’देवस्थानाला भरपूर देणग्या मिळवून देत
संपूर्ण कळस सोन्याने मढवला की देव
प्रसन्न होतो नि मरणोत्तर स्वर्गलाभ होतो.’
देवस्थानने त्याला ताबडतोब संचालकांमध्ये
सामावून करून घेतला.

नववा म्हणाला,
’श्रीमंतांच्या उत्पन्नाच्या सहा टक्के
देवस्थान कर सरकारने घ्यावा.’
त्याच्या निवडणूक खर्चाचा भार 
देवस्थान समितीने उचलला.

दहावा म्हणाला...
... 
तो काय म्हणाला, 
त्याला देव प्रसन्न झाला का,
ठाऊक नाही;
...
पण सध्या सारे संचालक मंडळ
त्याच्या दाराशी हात जोडून उभे असते.


- oOo -

कवितेसोबत जोडलेले छायाचित्र https://www.123rf.com/photo_27699327_locked-temple-door.html येथून साभार.

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

कुंपण

आम्हा दोघांच्या घरांमध्ये 
एक प्राचीन कुंपण ;
कधी घातले, कुणी घातले
आणि मुख्य म्हणजे का घातले...
ठाऊक नाही !
पण त्याचे घर तिकडचे
आणि माझे इकडचे,
इतके मात्र पक्के ठाऊक.

त्याला त्याचे आवार सुंदर हवे,
आणि मला माझे.
कुंपणाच्या माझ्या बाजूने
एक एक काटा उपसून
त्याच्या आवारात भिरकावला,
आणि फक्त फुले शिल्लक ठेवली.
त्यानेही तिकडच्या बाजूने 
नेमके तसेच केले असावे.
आता माझ्या आवारात 
विविधरंगी फुलांचा सडा !
कुंपणावरुन डोकावून पाहिले
तर मी फेकलेले काटे
तो कुरवाळतो आहे.
त्याने माझ्या हातातील 
फुलांकडे पाहिले,
आणि हसून म्हटले,
’वेड्या, फुले सोडून काटे
का कुरवाळतो आहेस.’

आता आम्ही दोघेही दिग्मूढ.
ऐतिहासिक कुंपण कुरवाळताना
हे काट्या-फुलांचे गणित
दोन्ही आवारात कसे चुकते आहे ?


- oOo -

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

फूटपट्टी

कुणी म्हणतं,
’हे जग माझ्या हिरव्या फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून अधिक लांबीचे आहे, 
सबब पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या भगव्या फूटपट्टीने मोजले तर.
हवे त्याहून कमी लांबीचे आहे, 
सबब पापी आहे.’ 

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या लाल फूटपट्टीने मोजले तर,
हवे त्याहून जास्त रुंदीचे आहे, 
रुंद पंजाच्या माणसांना धार्जिणे आहे.’

कुणी म्हणतं, 
’हे जग माझ्या निळ्या फूटपट्टीने मोजले तर, 
हवे त्याहून कमी रुंदीचे आहे, 
सामान्यांची मुस्कटदाबी करणारे आहे.कुणी म्हणालं, ’
फूटपट्टी मला सोयीची मोजमापे देत नाही. 
सबब ती बदलली पाहिजे.’ 

कुणी म्हणालं,
’मोजणी केल्याने डावं-उजवं करण्यास प्रोत्साहन मिळते.
सबब फूटपट्टी शोषकांची हस्तक आहे.’

कुणी म्हणालं,
’लाकडीऐवजी प्लास्टिकची फूटपट्टी वापरुन 
मोजल्याने माझी उंची कमी मोजली गेली.’

कुणी म्हणालं, 
’बुटक्या लोकांनी तयार केलेली फूटपट्टी,
आम्ही उंच लोकांनी का वापरावी?’

कुणी म्हणालं, 
’फूटपट्टीची लांबी एक फूटच असली पाहिजे,
हा आमच्या विरोधकांचा कावा आहे.’ 

कुणी म्हणालं,
’तिच्यावरील मिलिमीटरच्या खुणा हा तिने
मेट्रिक व्यवस्थेशी केलेल्या व्यभिचाराचा पुरावा आहे.’ 

...

फूटपट्टीला कान नसतात ; तरी ती ऐकत असते,
सार्‍यांना समजावून सांगू पाहते. पण...
तोंडच नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार
सहन करीत निमूटपणे मोजणी करत राहते.


- oOo -

कवितेसोबत जोडलेले चित्र https://www.wonkeedonkeetools.co.uk/ येथून साभार.

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

थोरांची ओळख

शाळेत असताना एका वर्षी इतिहासातील महनीय व्यक्तींची चरित्रे अभ्यासाला होती. अभ्यासक्रमाच्या या पुस्तकाचे शीर्षक होते ’थोरांची ओळख’. पण अलिकडे असे ध्यानात आले की आसपास इतके थोर लोक आहेत की त्या सार्‍यांची ओळख करुन द्यायची तर किमान शतखंडी ग्रंथच लिहावा लागेल. हे फारच खर्चिक नि वेळखाऊ काम आहे. एरवी टोमणेबाजी करणारी मीम्स बनवू म्हटले तर नको नको म्हटले तरी लोक मदतीला येतील. पण अशा उदात्त कामात सहकारी मिळणेही अवघड... अचानक मला आई म्हणायची तो एक श्लोक आठवला.
आदौ राम तपोवनादि गमनम् हत्वा मृगं कांचनम् |
वैदेही हरणम् जटायू मरणम् सुग्रीव संभाषणम् ||
वाली निर्दालनम् समुद्र तरणम् लंकापुरी दाहनम् |
पश्चात्‌ रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम् ||
चार ओळीत संपूर्ण रामायण साररूपात सांगणारा हा श्लोक आठवला नि मी एकदम ’युरेका, युरेका’ म्हणत धावत सुटलो. सुदैवाने मी न्हाणीघरात नसल्याने अंगावर कपडे होते. भर चौकात आपल्या चारचाकी गाडीची काच खाली करुन गजरेवाल्याशी भावाची घासाघीस करणारा थोर इसम दिसला नि भानावर आलो.

घरी परतलो. छान शुचिर्भूत होऊन संगणकासमोर बसलो. बाजूला उदबत्ती लावली. समोर लेखन-गुरू केशवकुमारांचा फोटो ठेवून त्याला गुलालाच टिळा लावला नि ही थोरांची ओळख लिहायला सुरुवात केली.


बटाटेवडा खाणार्‍यांपेक्षा, तो न खाणारे
नैतिकदृष्ट्या खूपच श्रेष्ठ असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या इमारतीसाठी वापरलेल्या विटा 
शेजारच्या इमारतीहून भक्कम आहेत, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

आपल्या कुंडीतील झाडे, शेजार्‍याच्या 
झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन सोडतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’व्हीआयपी’ कंपनीचे बनियन वापरणारे
’रूपा’वाल्यांपेक्षा मनमिळावू असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पहिल्या मजल्यावर राहणारे लोक
तळमजल्यावरच्यांपेक्षा क्रूर असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

दाढीमध्ये विषम संख्येने केस असणारे
सम संख्या असणार्‍यांपेक्षा शूर असतात 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

’अ’ आद्याक्षरवाल्यांपेक्षा ’म’वाल्यांना
साहित्यिक पुरस्कार अधिक मिळतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

टोपी घालणार्‍यांपेक्षा टोप्या
शिवणारे अधिक बुद्धिमान असतात
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार मुलांना जन्म देणार्‍या बापापेक्षा
दशपुत्र-उत्पादक बाप महान असतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

पांढर्‍या कागदावर लिहिलेल्या कवितेला
’खाकी’वरील कवितेपेक्षा अधिक खोली असते
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

संत्र्याचा फोटो चिकटवलेल्या फोनला
टरबूजवाल्या फोनपेक्षा जास्त रेंज मिळते,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

माणसाच्या बाह्य कपड्यांवरुन
अंतर्वस्त्राचा रंग ओळखता येतो,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

रस्त्याच्या पूर्व बाजूला राहणारे
पश्चिमवाल्यांपेक्षा श्रीमंत असतात,
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

कॉसमॉस बॅंकेत काम करणारा माणूस
जनता बॅंकवाल्यापेक्षा अधिक चांगला गातो, 
असे ज्यांना वाटते...
... ते सर्व थोर असतात

चार चाकी गाडीत बसल्याबसल्या
प्रत्येकी दहा रुपये किंमतीचे तीन गजरे
विक्रेत्याकडून वीस रू. ला मागतात...
... ते सर्व थोर असतात

हे सगळं कळलं, कळलं तरी 
वळलं नाही, वळलं तर उमगलं नाही,
असे ज्यांच्या बाबत होते...
... ते सर्व थोर असतात

सगळं काही कळलं, वळलं नि उमगलंही
आणि तरीही ’आम्ही नाही बुवा यातले’
असे ज्यांना वाटते...
... ते सर्वही थोरच असतात

- रमताराम

 ( खंड १, सर्ग १ ला, प्रकरण पहिले, भाग पहिला समाप्त )


- oOo -

कवितेसोबत जोडलेले भाष्यचित्र https://www.timetoast.com/timelines/animal-farm--74 येथून साभार.