सोमवार, २५ मे, २०२०

जग जागल्यांचे ०८ - वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस

’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर << मागील भाग
---

बराच काळ मानेवर खडा ठेवून रोजगाराचे काम केल्यानंतर तुम्ही छानशा सुटीचा बेत आखता. परदेशातील एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन सुटीचा निवांत आस्वाद घेऊन ताजेतवाने होत परतीच्या वाटेवर विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहता. केव्हा एकदा बाहेर पडतो नि घर गाठतो असे तुम्हाला झालेले असते. पण...

तुम्हाला तपासणीसाठी दीर्घकाळ अडकवून ठेवले जाते. कधी शरीराची बाह्य चाचपणी, कधी संपूर्ण विवस्त्र करुन तपासणी, कधी इंद्रियतपासणीदेखील! कधी तशा विवस्त्र स्थितीत तपासणी-खोलीत बसवून ठेवले जाते. काही वेळा शरीराअंतर्गत तपासणीसाठी एक्स-रे किंवा एन्डोस्कोपीतून जावे लागते. क्वचित सुलभ शौचाचे औषध देऊन कस्टम कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली उत्सर्जितांची पाहणी केली जाते. कधी हातकड्या घालून अन्य तपासण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये नेऊन चार-चार दिवस डांबून ठेवले जाते... "तुम्ही जर आफ्रिकन-अमेरिकन, त्यातही स्त्री असाल तर तुम्हाला या चरकातून जाण्याचा अनुभव मिळण्याची शक्यता अनेकपट अधिक असते." अमेरिकेच्या कस्टम्स सर्व्हिसमधील माजी अधिकारी कॅथी हॅरिस सांगत असते.

CathyHarris

कॅथी म्हणते, ’हा सारा प्रकार मी दीर्घकाळ पाहात होते. अस्वस्थ होत होते. अनेकदा यातील काही स्त्रिया असाहाय्य नजरेने माझ्याकडे पाहात. जणू त्या मला विचारत, ’तू ही एक आफ्रिकन-अमेरिकन आहेस, स्त्री आहेस, आणि इथली कर्मचारी. तू यावर काहीच करु शकत नाहीस का?’ कॅथीची ही अस्वस्थता हळहळू वाढत गेली आणि तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

पण ज्यांची चाकरी करत आहोत त्यांच्याच विरोधात उभे राहण्याच्या संभाव्य परिणामांचा अंदाज तिला होता. त्यामुळे घाई न करता, एक वर्ष आधीपासून त्याची तयारी केली. त्यावेळी ती जॉर्जियामधील अ‍ॅटलांटा शहरात हार्टफील्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत होती. आपल्या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला सुमारे सहा महिन्यांचा तिथला डेटा तिने संकलित केला. त्याला फ्लोरिडातील मायामी आणि टेक्ससमधील ’एल पासो’ येथील पूर्वीच्या अनुभवांची जोड दिली. मग तिने एका अ‍ॅटर्नीमार्फत तिने फॉक्स-५ या स्थानिक चॅनेलशी संपर्क साधला...

तिच्या कार्याचा शोध घेत असता असे लक्षात आले की एरवी अगदी एफबीआय, सीआयए यांसारख्या अतिमहत्वाच्या संस्थांविरोधात आवाज उठवणार्‍यांनाही आवर्जून स्थान देणार्‍या ’स्वतंत्र बाण्याच्या’ अमेरिकन माध्यमांनी कॅथीला मात्र ते स्थान नाकारले आहे. तिची माहिती विविध विद्यापीठांत विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या संवादातून आणि ब्लॉग-टॉक सारख्या इंटरनेट माध्यमांतूनच मिळवावी लागते. कॅथी ज्या वंशभेदाबद्दल आवाज उठवते आहे, त्याचा हा आणखी एक दाहक प्रत्यय म्हणावा का?

पण एक रोचक बाब अशी की जॉर्जिया हे वंशभेदासाठी कुप्रसिद्ध असलेले दक्षिणेतील राज्य, आणि फॉक्स ग्रुप हा सनातनी उजव्या विचारांच्या प्रभावाखाली असलेला. असे असूनही कॅथीच्या या क्रूसेडमध्ये त्यांनी तिला साथ दिली हे विशेष. कॅथीने पुरवलेल्या माहितीच्या आधारे, मार्च १९९९ मध्ये फॉक्स-५ ने कस्टम्स अधिकार्‍यांकडून केल्या जाणार्‍या या वांशिक-लैंगिक भेदभावाबद्दल सहा आठवडे सीरिज चालवली. तिने केवळ जॉर्जियातच नव्हे तर पुर्‍या अमेरिकेत खळबळ माजली.

ही सारी माहिती जरी मध्यस्थामार्फत चॅनेलपर्यंत पोचत असली, तरी ती पुरवणारी व्यक्ती कोण हे ओळखणे अ‍ॅटलांटातील कस्टम्स अधिकार्‍यांना कठीण गेले नाही. मग विविध प्रकारे तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. किरकोळ कारणावरुन तिला समज देणे, कामात कुचराई केल्याबद्दलची हाकाटी सुरु झाली. बहुतेक सहकारी तिच्यापासून चार हात दूर राहू लागले. अखेर ’अतिरिक्त ताणामुळे कामात कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून तिला पंधरा महिने सक्तीच्या, बिनपगारी ’आरोग्य रजे’वर पाठवण्यात आले. या दरम्यान तिची शिल्लक संपली, घराचे हप्ते थकले आणि तिला ते गमावावे लागले. पुढे तिने न्यायव्यस्थेकडे दाद मागितली आणि तिला पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे आदेश देण्यात आले.

वैय्यक्तिक पातळीवर तिला हा संघर्ष करावा लागत असताना, व्यवस्थेच्या पातळीवर मात्र काही सकारात्मक पडसाद उमटत होते. Government Accountability Office (GAO) ने मार्च २००० मध्ये "Better Targeting of Airline Passengers for Personal Searches Could Produce Better Results" या लांबलचक नावाखाली नवी सुधारित नियमावली प्रसारित केली.

केवळ राज्य पातळीवर नव्हे तर केंद्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली. संविधानाच्या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवणार्‍या कस्टम्ससारख्या संस्थांना चाप बसवण्यासाठी “Civil Rights for International Traveler’s Act” आणि “Reasonable Search Standards Act” हे दोन कायदे पास करण्यात आले. यात कस्टम्समार्फत केल्या जाणार्‍या वैय्यक्तिक तपासणीसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली. यात वरच्या श्रेणीतील अधिकार्‍यांना याबाबत अधिक अधिकार आणि जबाबदारी देण्यात आली. एखाद्या व्यक्तीची तपासणी दोन तासांहून अधिक काळ चालत असेल तर त्या व्यक्तीने सुचवलेल्या एखाद्या व्यक्तीला संपर्क करुन ती प्रवासी व्यक्ती कस्टम्सच्या तपासणीसाठी थांबली आहे हे कळवणे सक्तीचे करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा तपासणीच्या अहवालामध्ये त्या व्यक्तीचा ’वंश’ लिहिणे सक्तीचे करण्यात आले. आपल्याला दिलेल्या अन्यायकारण वागणुकीबद्दल तक्रार करणे प्रवाशांना सुलभ व्हावे म्हणून सर्व अधिकार्‍यांना आपल्या नावाचा बिल्ला वापरणे बंधनकारक करण्यात आले.

२००५ मध्ये कस्टमसेवेतून निवृत्त झालेली कॅथी आता बहुआयामी लेखिका, वक्ता म्हणून काम करते. आपल्यासारख्या जागरुक नागरिकांसाठी प्रशिक्षण, व्याख्यान, कार्यशाळा व्याख्याने ती आयोजित करत असते. २००२ मध्ये ’अमेरिकन व्हिसब्लोअर टूर’ मार्फत तिच्यासारख्याच जागल्यांसोबत तिने देशभर जनजागृती करणारी व्याख्याने दिली आहेत.

मार्च २००३ मध्ये अमेरिकेच्या Department of Homeland Security ने तिच्या कस्टम विभागासह सुमारे २२ विभागांचे एकत्रीकरण केले. या नव्या विभागाला आता अधिक कडक गुप्ततेच्या नियमांखाली काम करावे लागते आहे. आणि गुप्ततेची गरज जितकी अधिक तितकी गैरप्रकारांची शक्यताही. बाह्य निरीक्षकांच्या अनुपस्थितीत हे लोक आपल्या जुन्या अन्यायकारक प्रथांकडे पुन्हा वळणारच आहेत.

त्यामुळे सध्या ती अशा ’नागरिक दक्षता समिती’ सारख्या कल्पना मांडून त्याबाबत जनजागृती करते आहे. बाह्य तज्ज्ञांमार्फत कस्ट्म्स वा तत्सम विभागांतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण सक्तीचे करावे असे तिचे मत आहे. यात समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञांचा सहभाग अनिवार्य केला जावा असे तिचे म्हणणे आहे.

जगातील कोणताही देश अथवा समाज असो, त्या समाजातील शोषणाचा सर्वात मोठा हिस्सा स्त्रीच्या वाट्याला येत असतो. त्यातही तिच्या कातडीचा रंग काळा असेल, तर ती जगातील सर्वाधिक शोषित वर्गाची प्रतिनिधी असते. कॅथीसारखीचा लढा त्या वर्गाच्या पायातील साखळदंडातील एखादी कडीच उकलत असतो.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी २४ मे २०२०)

    पुढील भाग >> मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा