बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

व्हेअर इज वॉली

मार्टिन हँडफर्ड नावाच्या एका ब्रिटिश रेखाचित्रकाराने ’व्हेअर इज वॉली’ किंवा ’चित्रात लपलेला वॉली शोधा’ असा एक खेळ त्याच्या ग्राफिक्सच्या सहाय्याने सुरू केला. त्याच्या पुस्तकाच्या पानावर अनेक पात्रे नि चित्रे असत. त्यात कुठेतरी लाल-पांढर्‍या पट्ट्यांचा टी-शर्ट, गोंड्याची गोल नि लाल टोपी आणि गोल फ्रेमचा चष्मा असलेली ही ’वॉली’ नावाची व्यक्ती लपलेली असे. तुमची दिशाभूल करण्यासाठी यातील एक-दोन वैशिष्ट्यांसह दुसरे एखादे पात्र चित्रांतील पात्रांच्या भाऊगर्दीत मिसळून देणे वगैरे क्लृप्त्या चित्रकाराने वापरलेल्या असत. वरवर पाहता जरी हा लहान मुलांचा खेळ असला तरी मोठेही तो आनंदाने खेळत असत.

हाच खेळ अमेरिकेत ’व्हेअर इज वाल्डो’ या नावाने प्रसिद्ध झाला. (’द बिग बँग थिअरी’ या टेलिविजन सीरिजच्या चाहत्यांना एका एपिसोडमध्ये सस्पेन्ड झालेला शेल्डन वाल्डो शोधत बसलेला पाहिल्याचे आठवत असेल कदाचित.) वॉली ऐवजी अमेरिकन स्थानिक वाटावे* म्हणून त्याचा वाल्डो झाला. पुढे अमेरिकन मंडळींच्या डिजिटल आसक्तीचा परिणाम म्हणून तो डिजिटलही झाला.

WaldoFindsYou

आमच्याकडेही आम्ही हा खेळ खेळतो. अमेरिकन प्रत्येक गोष्ट वर्चुअल वा डिजिटल माध्यमांत नेतात तर आम्ही उलट दिशेने त्याचे कमी खर्चाचे व्हर्शन बनवत असतो. सपाटही नसलेली लाकडाची एक फांदी आणि कागदाच्या बोळ्याला वाहनाच्या ट्यूबमधून कापून काढलेली रबर लावून क्रिकेट खेळण्याचा शोध आमचाच. आमचे सर्व काही होम एडिशनचे असते. प्रोफेशनल आणि बिजनेस एडिशन आम्ही पाश्चात्यांसाठी सोडून दिल्या आहेत. (नमनाला घडाभर तेल म्हणतात ते हे.)

तर सांगत काय होतो, आम्हीही आमच्याकडे हा खेळ आणला. पण ब्रिटिशांमध्ये पुस्तके छापावी लागतात वा अमेरिकन मंडळींकडे गेम विकत घ्यावा लागतो तसे आम्ही काही करत नाही. आम्ही हा सारा ’माईंड गेम’ म्हणून खेळतो. आणि केवळ उदार भूमिकेतून इतरांनाही हा वाल्डो सापडावा म्हणून फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅप सारख्या फुकट माध्यमांतून आम्ही तो कुठे आहे ते सार्‍यांना सांगतो. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे इतरांचा खेळ बिघडवणार तुम्ही. पण तसे नाही. हा इतर कुणी शोधलेला वाल्डो जो आहे तो आपणही स्वीकारला की आपल्यालाही पॉईंट्स मिळतात. आणि यातला वाल्डो हा स्वत:देखील हा खेळ खेळू शकतो, आहे की नाही गंमत? आता त्याने दुसरा वाल्डो शोधला नि स्वीकारला की त्याचे पॉईंट्स वाढतात आणि इतर कुणी त्याला वाल्डो म्हणून ’धप्पा दिला’ की कमी होतात.

पण आपण भारतीय असे आहोत की आपले अंतर्गत असे अनेक गट आहेत. आणि प्रत्येकाचा वाल्डो वेगळा. त्यामुळे मग या खेळाची व्हर्शन्स करावी लागतात. ल्युडो किंवा सापशिडी, व्यापार (ई: कित्ती घाटी शब्द आहेत हे, स्नेक्स अ‍ॅंड लॅडर्स किंवा मोनोपॉली म्हणा की.) मध्ये कसे प्रत्येकाची सोंगटी वेगळी असते. इथे प्रत्येकाला आपला गेमच निवडता येतो.

आता असं पहा स्वयंघोषित राष्ट्रवादी खेळाडूंसाठी हा ’व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ नावाने खेळला जातो तर स्वयंघोषित पुरोगाम्यांमध्ये ’व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी**’ या नावाने. याच दुसर्‍या खेळाचे ’व्हेअर इज (छुपा) मनुवादी’ नावाचे आणखी एक उप-व्हर्शन आहे. (छुपा) दक्षलवादी शोधून कंटाळले की स्वयंघोषित पुरोगामी कधी कधी हा खेळ खेळतात.

पण या दोन व्हर्शन्समध्ये थोडासा फरक आहे. स्वयंघोषित राष्ट्रवादी हा खेळ फक्त पुरोगामी पुस्तके नि माणसे घेऊन खेळतात तर स्वयंघोषित पुरोगामी हा खेळ आपसातच खेळत असतात. (जसे ते आपले विचार वैचारिक विरोधकांच्या व्यासपीठावर न जाता आपल्या-आपल्यात एकमेकांना शिकवतात अगदी तसेच.)

थोडे विषयांतर करुन एक जुना विनोद सांगतो. अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय पोलिसांना एकदा एक लपवलेला बोकड शोधून आणण्याचे आव्हान देण्यात आले. जो कमीत कमी वेळात शोधेल ते पोलिस खाते - म्हणे, जगातले सर्वात कार्यक्षम खाते असे जाहीर करण्यात येणार होते. ’गेट-सेट-गो’ झाल्यावर पाचच मिनिटात भारतीय पोलीस एक वासरू घेऊन हजर झाले. ब्रिटिश आणि अमेरिकन पोलीस काही वेळानंतर बकरा पकडून घेऊन आले. त्याच्या मागे पळापळ केल्याने ते घामाघूम झाले होते. अमेरिकन पोलीसाच्या आधी ब्रिटिश पोलीस हजर झाल्याने ब्रिटिश पोलीस खाते श्रेष्ठ आहे असे जाहीर करावे असा निर्णय न्यायाधीशांनी दिला. याला भारतीय पोलीसांनी ताबडतोब आक्षेप घेतला नि आपण या दोघांच्याही आधी पोचल्याचे निदर्शनास आणून दिले. पण तुम्ही बकरा नव्हे तर वासरू आणले आहे, न्यायाधीश वैतागाने म्हणाले. ’दोन मिनिटे इंटरोगेशन करू द्या. हे वासरू आपण बकरा असल्याचे मान्य करते की नाही पहा.’ भारतीय पोलीस उत्तरला. निष्कर्ष... सांगायलाच हवा का?

गाडी परत आपल्या खेळाकडे आणू. तर मुद्दा असा की हे ’व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ किंवा ’व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी’ खेळणारे लोक हे या विनोदातल्या त्या भारतीय पोलीसासारखे असतात. उगाच धावाधाव करण्यापेक्षा आपल्याला न आवडणारे एखादे वासरू पकडून आणतात नि हाच बकरा आहे असे घोषित करतात. शिवाय भारतीयांनी हा खेळ वैयक्तिक न ठेवता ग्रुपने खेळण्याचा केल्याने त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे पाच-पन्नास लोक ते सहज पकडून आणतात. इथे बहुमत - आवाजी असो की संख्यात्मक- हे काहीही (अगदी गुरुत्वाकर्षणामुळे वस्तु जमीनीपासून उलट दिशेने आकाशाकडे झेपावतात हा दावा देखील) सिद्ध करण्यास पुरेसे असते. आता असे मानणार्‍यांचे पुन्हा बहुमत असल्याने, मी पकडला तो (शहरी) नक्षलवादी किंवा (छुपा) दक्षलवादीच आहे हे सिद्ध झाल्याचे स्वत:च जाहीर करतात. एकुण मोठा मौजेचा खेळ असतो हा.

बाय द वे, तुमचा स्कोर किती झालाय आतापर्यंत? मी अजून ’ॠणा’तच आहे. नाही म्हणजे तुम्ही लोक डांबिस, पहिला प्रश्न हाच विचाराल म्हणून आधीच उत्तर देऊन टाकलं.

- oOo -

*आणि एकुणच अमेरिकन मंडळी हट्टाने इंग्लिश गोष्टी नाकारतात हे दुसरे कारण. अगदी नव्याने तिथे स्थलांतर केलेलेही याला अपवाद नाहीत. एका माजी- पाकिस्तानी आणि अमेरिकन सिटिझन होऊन जेमतेम पाच वर्षे झालेल्या बॉस्टनमधील आमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनचे उदाहरण घ्या. एकदा बोलता बोलता मी कुठलासा शब्द वापरला तर त्याने मला दुसरा एक शब्द वापरावा असे सुचवले. मी म्हणालो, ’अरे पण मला जे म्हणायचे आहे त्यानुसार तो बरोबरच आहे की. शिवाय दोन्हींचा अर्थ एकच आहे.’ ’नो, बट दॅट इज सो ब्रिटिश.’ तो ताडकन म्हणाला.

** संघविचारांच्या विशेषत: मोदीसमर्थक व्यक्तींसाठी 'दक्षलवादी' हा शब्द मी फेसबुकवर कुठेतरी वाचला. श्रेय ज्याचे असेल त्याला.


हे वाचले का?

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

कन्हैया कुमार, कम्युनिस्ट आणि मी

मी कम्युनिस्ट विचारसरणीचा सहानुभूतीदार नक्की आहे. त्यांच्यातील - सर्वच इझम आणि राजकीय पक्षांत असतात त्यानुसारच असलेल्या - त्रुटींसह मी त्यांना सत्ताधारी म्हणून स्वीकारायला तयार आहे; नव्हे तसं घडावं अशी माझी इच्छा आहे. कारणांबद्दल आता विस्ताराने बोलत नाही. पण हे घडण्याची शक्यता निदान माझा आयुष्यात धूसरच दिसते. याचे मुख्य कारण तत्त्वज्ञानावरची अतिरेकी निष्ठाच त्यांना सत्तेपासून दूर ठेवते आहे.

सत्ताकारणातला व्यवहारवाद नाकारल्याने त्यांना सत्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. ज्योतिबाबूंना मिळू शकणारे पंतप्रधानपद नाकारून त्यांनी घोडचूक केली असे माझे प्रामाणिक मत आहे. एकदा सत्ता हाती आली की सर्वत्र 'आपले' लोक रुजवून यंत्रणा/व्यवस्था कब्जात घेता येते हे ते विसरले आहेत.

लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या रशियन आणि चीनी बांधवांनी त्या सामान्यांतील अनेकांचा बळी घेणारी रक्तरंजित क्रांती घडवून आणली, सत्ता हाती घेण्यासाठी विसंगतीचे ते तात्कालिक पाप शिरी घेतले. पण इथले आमचे बांधव ती लवचिकता संसदीय राजकारणातही स्वीकारायला तयार नाहीत. 'आम्ही किती छान विश्लेषण करू शकतो, बुद्धिमान आहोत आम्ही. बाकीचे सग्गळे कसे शेवटी संघवाल्यांनाच मदत करतात.' यावर यांचे विचारवंत लेखामागून लेख लिहीत आहेत. संघ-भाजप विरोधाचा एकाधिकार, ते सोवळे फक्त आमच्याच कनवटीला आहे हा अहंकार त्यांना पुरेसा आहे. मग त्यासाठी अनेक वर्षे हाच भाजप-संघाचा भस्मासुर सत्तेत राहिला तरी त्यांना चालेल.

किंबहुना मीच-खरा-विरोधक या त्यांच्या भूमिकेला जिवंत ठेवण्यास ते पूरकच ठरेल. या अहंगंडात केरळ या एकमेव राज्याची सत्ता कशीबशी राखून आहेत. चोवीस वर्षे सत्ता राबवलेल्या बंगाल मध्ये ते पुढच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकले जातील अशी चिन्हे आहेत.

KanhaiyaKumar

हे बदलण्यासाठी, मुख्य म्हणजे संघटन-विस्तार करण्यासाठी ठोस काही करताहेत असे दिसत नाही. अजूनही मोर्चे आणि व्याख्याने ही अनुक्रमे केवळ श्रमजीवी आणि पांढरपेशा वर्गाला अपील होणारी जुनाट हत्यारे कवटाळून बसण्यापालीकडे नव्याने ते काहीच करत नाहीत.

'विचार बदला, देश बदलेल' हा विचार केव्हाच कालबाह्य झाला. इथे लोकांना विचार करायलाच वेळ नाही, तिथे जुना की बदललेला हा मुद्दाच उरलेला नाही. थेट कृती काय करणार असा प्रश्न आता नवी पिढी विचारते. त्यांना हे काय ऑफर करू शकतात हा प्रश्न आहे. नव्या प्रगतीशील (affluent) समाजाच्या आकांक्षांची पूर्ती कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे आधारे कशी करणार याची मांडणी करायला हवी. ती अद्याप होताना दिसत नाही. भाजप जसा साडेचार वर्षांच्या सत्तेनंतरही अजून विरोधकांच्या मानसिकतेतून बाहेर आलेला दिसत नाही, तसेच कम्युनिस्ट अद्याप कार्यकर्त्यांच्या, अभ्यासकाच्या भूमिकेतून बाहेर यायला तयार नाहीत.

सत्तेसाठी नेते लागतात, ते घडवावे लागतात, त्यांची नाळ सामान्यांशी जुळावी लागते, केवळ वरुन खाली नव्हे तर खालून-वर अशीही फीडबॅक सिस्टम असावी लागते. वरच्या तत्त्वाशी विसंगत पण सामान्यांच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असणार्‍या अनेक गोष्टींना, तत्त्वाला मुरड घालून, अंगीकृत करावे लागते. तरच सत्ता मिळू शकते.

सतत शहाणपणाचे डोस देणारा अगदी आपण मठ्ठ आहोत हे मान्य असलेल्यालाही नकोसा होतो. कधीतरी आपल्याकडूनही त्याने काही घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. संघाची मंडळी त्यांच्या सत्तेला बाधा येणार नाही इतपत गोष्टी लोकमानसातून स्वीकारतात, त्यांच्या राजकारणाचा धार्मिक आधार त्याला सहाय्यभूत होतो.

सत्ताकारणात - भाजप/संघाइतके गटे'च्या फाउस्ट प्रमाणे आत्मा विकून नाही नाही तरी - तत्त्वे पातळ होण्याचा धोका पत्करून हे स्वीकारावे लागते. काँग्रेस, समाजवादी, आप, ममता... अल्फा बीटा गामा सारे पक्ष संघ-धार्जिणे आहेत हे घोकत राहिल्याने आपणच सर्वांत अप्रिय होत असतो, आपले सारे मित्र दूर जात असतात आणि घसरत्या सत्ताबळाच्या, पडत्या काळात तर हे नक्कीच परवडणारे नसते हे समजून घ्यायला हवे.

या आणि अशा कारणांनी कम्युनिस्ट या देशात कधीच सत्ताधारी होऊ शकणार नाहीत. नव्हे संघाला समाजकारण, राजकारण आणि सत्ताकारणात कधीच पर्यायही होऊ शकणार नाहीत, हे कटू वास्तव माझ्यापुरते मी स्वीकारले आहे. तेव्हा निदान या तीन पैकी दोन क्षेत्रात संघ-मोदी यांच्या जाळ्याला हद्दपार करायचे असेल तर प्रथम त्यांचे सत्तेतील स्थान हिरावून घ्यावे लागेल. आणि ते करण्याची कम्युनिस्टांची कुवत आज नाही, कदाचित आणखी पन्नास वर्षे नसेल. त्यामुळे मी त्यांना मतदान करण्याचा प्रश्न आजतरी उद्भवत नाही.

निवडून येण्याची नगण्य शक्यता असल्याने, कम्युनिस्ट उमेदवाराला मतदान करणे हे देशातील बहुसंख्य मतदारसंघात एक पुरोगामी, भाजप-संघ विरोध मत वाया घालवणे आणि पर्यायाने पुन्हा संघ भाजपला बळकट करणारेच ठरणार आहे हे मला पटले आहे. हे जमिनीवरचे वास्तव 'आम्हीच तेवढे संघ-विरोधक'ची स्मरणी घेऊन बसलेल्या त्यांच्या वैचारिक नेत्यांनी समजून घ्यायची गरज आहे.

तेव्हा त्या विचारांबद्दल सहानुभूती असून, त्यांनी सत्तेवर यावे अशी इच्छा असून मी त्यांना मतदान करणार नाही, कारण निवडून येण्याची पुरेशी क्षमता विकसित व्हावी असे संघटन, अशी दृष्टी आज त्यांच्याकडे नाही.

हे झाले कम्युनिस्टांबद्दल. कन्हैयाबाबत माझे मत याहून फारसे आशावादी नाहीच. आजही फार बदलले आहे असे म्हणणार नाही. त्याची भाषणे ऐकून हा लोकांचे लक्ष वेधून घेणारा चांगला वक्ता आहे, पण पाणी फार खोल नाही असे माझे प्रामाणिक मत होते. 'एका बोलबच्चनला पर्याय म्हणून दुसर्‍या बाजूने तसाच उभा केलाय का?' असा प्रश्न मला पडला होता.

जनसंवाद म्हणजे समोरच्याला प्रभावित करणे किंवा घोषणाबाजीतून वैचारिक बधीरता निर्माण करणे या त्याच्या अडीच वर्षांतील मानसिकतेतून कालच्या मुलाखतीमध्ये मात्र तो बाहेर आलेला दिसला. एका परिपक्व आणि विचारी नेत्याची लक्षणे त्याच्यात दिसून आली.

असे नव्या दमाचे तरुण जर कम्युनिस्ट पक्षांची धुरा खांद्यावर घेतील, तर त्यांना नक्की उर्जितावस्था येईल. माझे पन्नास वर्षांचे भाकीत यांनी खोटे ठरवले तर आनंदच होईल. पण तरीही... दिल्ली बहोत दूर है. कारण एकटा कन्हैया पुरेसा नसतो, त्याच्या सोबत भक्कम संघटनही हवे. त्याबाबत काय करणार हे कन्हैया सांगेल तेव्हाच पुढची दिशा अधिक स्पष्ट होईल. कन्हैया आणि त्याच्या सहकारी कॉम्रेडस् ना हार्दिक शुभेच्छा.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

खुला कोष आणि माहितीची ऐशीतैशी

विकिपीडीया हा खुला माहितीकोश आणि भारत देशाची संकल्पना यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

Widipedia

मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरतीच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टल वर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे "मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आहे असे वाटते." म्हणून ती आपला आकार बदलून त्रिकोणी होत नसते.

तरीही माहिती-संकलन म्हणून विकीपीडियाचे स्थान नाकारता येणार नाही.

असे असले तरी भारताशी संबंधित सर्व पाने मी सर्वस्वी अविश्वासार्ह मानतो मी!

याचे कारण आपल्या वृत्तीत आहे. पहिले म्हणजे सर्व उत्तम शोधांची/पर्यायांची आपण स्वार्थासाठी वाट लावतो.  दुसरे, कुठल्या मसण्या जुन्या ग्रंथाचे नाव सांगून 'त्यात हे आम्ही आधीच शोधले होते' म्हणून त्यावर 'मेड इन इंडिया' चे लेबल लावून 'जितं मया'चा शड्डू ठोकतो.

त्या पलीकडे तिसरा पर्याय असतो, तो म्हणजे त्या जुन्या ग्रंथाचा आधार घेऊन पुढचा एखादा महत्वाचा शोध, पाश्चात्त्यांपूर्वी आपणच लावण्याचा. पण निर्मिती बुद्धीचे नि कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आयते आपले लेबल लावणे सोपे असते. तद्वतच विकीची सर्व मिळून माहिती नि ज्ञान संकलनाची संकल्पना कितीही उत्तम असली तरी त्याचा वापर ज्ञानाच्या देवाणघेवाणी ऐवजी अज्ञानाला ज्ञानाच्या पंगतीत बसवून ज्ञानाची महतीच कमी करतो आपण. इतर कुणी उंच असेल तर आपली उंची कशी वाढेल हा आपल्यासमोरचा प्रश्न नसतो, त्या उंच माणसाची कशी कमी करता येईल हा प्रश्न आपण सोडवणुकीसाठी घेतो. राजकारणापासून, साहित्यकारणापर्यंत सर्वत्र एकाच माळेचे मणी.

याशिवाय आपण या सार्‍यांमध्ये प्रगतीचा विचार करण्याऐवजी, पुढच्या आवृत्तीत अधिक काय देता येईल, द्यावे अशी मागणी करावी या विचाराऐवजी आहे त्यात काय वाचवता येईल असा 'दात कोरून पोट भरण्याचा' प्रयत्न करतो. इतरांचे उत्पादन, नेता इत्यादींना आमचेच म्हणण्यामागेही नेमका हाच आळस असतो. आपल्याकडे मोबाईलचा शोध लागला नाही, पण मिस्ड कॉलचा शोध लागला हे या संदर्भातील बोलके उदाहरण.

वीकिपीडियाचा असाच गैरवापर विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी भरपूर केला आहे. जगातले सगळे किंवा प्राचीन ग्रेट ते आमचेच असल्या 'माहिती'ने पानेच्या पाने भरली आहेत. 'आपण वापरतो त्या ग्रेगोरियन कॅलेंडर मधील सर्व महिने ही मुळात संस्कृत नावे आहेत' अशी मखलाशी नेहमीप्रमाणे शाब्दिक खेळ करून सिद्ध करणारे पेज अस्तित्वात आहे. असल्या खोटारडेपणाने असंख्य पाने भरलेली आहेत. नेहरू कुटुंबियांच्या पेजेसवर हे पुंड वर्षानुवर्षे धुमाकूळ घालत आहेत. त्यांचे पूर्वज मुस्लिम होते ही माहिती काढून टाकल्यावर पुन्हा पुन्हा भरली जाते.

आज प्रथमच या पुंडाना समोरून तसेच प्रत्युत्तर दिले गेले आहे. आता यात समाधान मानायचे, की आता 'माझे असत्य विरुद्ध तुमचे असत्य' असाच सामना या देशात पाहायला मिळणार आणि वस्तुनिष्ठ अथवा पडताळून पाहता येण्याजोगे खरे किंवा सत्य असे काही शिल्लकच राहणार नाही याची खंत बाळगावी हे समजेनासे झाले आहे. सारे काही 'मतांनी' ठरवायचे, वस्तुनिष्ठतेला हद्दपार केलेला समाज काय लायकीचा असेल याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. या समाजात नि स्त्रीला आपले निष्कलंक चारित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्याची सिद्धता मागणार्‍या समाजात काही फरक असेल का? 'तुम्ही या बाजूचे का त्या बाजूचे ते सांगा. याकूबला फाशी देणे योग्य की अयोग्य या प्रश्नाचे उत्तर द्या मुकाट, मुळात फाशीच हवी का नको अशा फालतू तात्विक चर्चा नको.' म्हणणार्‍या स्वयंघोषित वैचारिक गुंडांची संख्या आणखी वाढत जाणार याची भीती वाटू लागली आहे.

रस्त्यावरची झुंड एकाच माणसाला घेरून मारते, हे स्वयंघोषित वैचारिक पुंड पिढीच्या पिढीला... कदाचित आणखी पुढच्या काही पिढ्यांना ठार मारत असतात.

(News: Is Tripura CM Bangla Deshi? - a question asked based on Wiki page information.)

- oOo -

हा लेख ’अक्षरनामा’ या पोर्टलवर ’विकीपीडियाची संकल्पना उत्तम असली तरी त्याचा वापर ‘अज्ञाना’ला ‘ज्ञाना’च्या पंगतीत बसवण्यासाठीच करतो आपण!’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे.


हे वाचले का?

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

बँकांचा सावकारी पाश

(News: In 2017-18 depositors lost 5,000 crores in minimum balance penalties.)

या बातमीच्या अनुषंगाने मागे एकदा झालेली चर्चा आणि त्या दरम्यान एका मित्राने (बहुधा Anand More) उपस्थित केलेल्या मार्मिक प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले. प्रश्न असा आहे की बँक आणि माझ्यासारखे त्यांचे ग्राहक यांचा परस्पर-संबंध समान व्यापाराचे तत्व पाळतो का?

आता हेच पहा. मी बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेल्या पैशावर मला ६ ते ९ टक्के या रेंजमध्ये मला व्याज दिले जाते. उलट मी बँकेकडून कर्ज घेतो, तेव्हा त्याची रेंज ८ ते १४ टक्के इतकी असते. (पर्सनल लोन्स तर १६ ते २४ टक्क्यांपर्यंत जातात. पण ते अन्सिक्युअर लोन सध्याच्या मुद्द्याला सुसंगत नाही, तेव्हा ते सोडून देऊ.)

मी जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा व्याजाव्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मला मिळत नसतो. सिक्युरिटीचा विचार कराल, तर जेमतेम १ लाखांपर्यंत (ते ही इन्शुरन्स कंपनीकडून, बँक काखा वर करणार.) ठेव इन्शुअर्ड. पुढचे भगवान भरोसे. उलट मी कर्ज घेतो तेव्हा कैक पट अधिक व्याज, तारण, इत्यादींचा भडिमार असतो.

BanksStealFromMe
Andy Rash यांनी The Wall Street Journal साठी काढलेले रेखाचित्र

मी जेव्हा एका सहकारी बँकेकडून (आधीचा 'एचडीएफसी'चा अनुभव उत्तम असताना हे का असे विचारू नका.) गृहकर्ज घेतले तेव्हा १०.५ टक्के व्याज, घर तारण (त्या रेजिस्ट्रेशनचा खर्चही तुमचाच), त्यासाठी दरवर्षी इन्शुरन्स (ज्यात बँकेचे नाव बेनिफिशरी म्हणून घालायचे), सहकारी बँक असल्याने काही शेअर्स आणि काही एक रकमेची एफडी को-लॅटरल म्हणून... इतके सारे बँकेने घेतले. हे कमी होते म्हणून वर 'साईट व्हिजिट'ही माझ्याच खर्चाने करावी या हेतूने, 'तुम्ही पुढच्या वेळी जाल तेव्हा आमचा माणूस सोबत येईल' अशी 'ऑफर'ही दिली होती. तेवढे मात्र मी ठाम नाकारले. (झक मारली लोन घेतले असे म्हणावे लागले.)

इतके करूनही माल्ल्या, चोक्सी, नीरव मोदी सारखे लोक यांचे लोन घेऊन याना चुना लावून फरार होतात (असे मोठे मोठे लोन घेणारे स्वत:हून आपल्या दारी चालून येतात या माजामध्ये छोट्या अर्जदारांना `एसबीआय'सारख्या बँका क्षुद्र ढेकूण असल्यासारखी वागणूक देतात.) नि या बँका बाराच्या भावात जातात. तसे झाले की आमच्या सार्‍या ठेवी बुडीत खाती.

बरं हे कमी नाही म्हणून हे सतराशे साठ प्रकारचे दंड करण्याचा अधिकार बँक आपल्याकडे ठेवते. ग्राहकाला उलट दिशेने बँकेला दंड करण्याचा अधिकार आहे का, असल्यास कोण-कोणत्या परिस्थितीत? कधीच नाही!

असा सर्वस्वी विषम व्यवहार अर्थातच दोन्ही बाजूंना समान संधी नि हक्क देणारा नाही. केवळ 'घरात ठेवण्याऐवजी थोडे अधिक सुरक्षित राहतात' या एकाच कारणासाठी माणसे पैसे बँकेत ठेवत असतात.

अशा वेळी ज्यांच्याकडे तुटपुंजे पैसे आहेत, बँकेत ठेवल्याने वा तिच्याशी व्यवहार केल्याने फायदा तर नाहीच, वर वरील कारणांनी नुकसानच आहेत असे लोक बँकेत पैसे का ठेवतील? (नोटाबंदीच्या काळात आमचा नेहमीचा चाट-वाल्याने बँकेत पैसे भरण्याची सक्ती केल्याने आमच्या धंद्यावर कसा परिणाम होतो, आर्थिक नुकसान- टॅक्स चोरी हा वेगळा मुद्दा, कायदेशीर नुकसान - होते हे समजावून सांगितले होते, त्याची आठवण होते.) मग तुम्ही जनधन म्हणा की 'पराया धन' म्हणा, त्या खात्यांमधून सामान्यांचे पैसे दिसणार नसतातच.

हे कमी होते म्हणून की काय, एफआरडीआय विधेयक आणून माल्ल्या-धार्जिण्या आणि सामान्याचा कर्दनकाळ असलेल्या बँकांना वाचवून सामान्यांच्या ठेवी त्यांना आंदण देण्याचा घाट दिवट्या सरकारने घातला होता. सुदैवाने व्यापक विरोधाने तो हाणून पाडला गेला.

भांडवलशाही नि:पक्ष स्पर्धा, चोख व्यापाराचे नियम वगैरे आणते असा मोठ्ठा गैरसमज तिच्या समर्थकांत आहे. 'असे असंतुलित व्यापार असतील तर स्पर्धेच्या नियमांनुसार अधिक आकर्षक, गुणवत्तापूर्ण उत्पादन सादर करणारा अधिक ग्राहक आकर्षित करेल नि हळूहळू इतरांनाही तेच करावे लागेल' हे गृहितक बँकांबाबत साफ चूक असल्याचे दिसून येते. टेलीकॉम क्षेत्रात अलीकडे काही वर्षांत अशी स्पर्धा झाल्याने ग्राहकांचा आर्थिक फायदा झाला होता. (पण माझ्या दुसर्‍या दाव्याला अनुसरून गुणवत्तेची काशी झाली हा मुद्दा सोबतच यायला हवा.) बँका मात्र - कदाचित कोटेरी करून, एकमेकांच्या सोबत राहतात नि ग्राहकांना कोणतेही अधिक फायदे देत नाही. फरक राहिलाच तर व्याजदरातील ०.०१ ते ०.०५ टक्क्याचा. जिला चोराच्या हाताची लंगोटीच काय, लंगोटीचा एका धागाही म्हणता येणार नाही.

माझ्या मते बँका आणि शेतकर्‍यांना नाडणारा सावकार यांच्यात असलाच तर डिग्रीचा फरक आहे. बँका या थोड्या कमी नाडणारे सावकारच आहेत. यातून जो प्रचंड फायदा त्या निर्माण करतात तो त्यांच्या सीईओसह भक्कम पगारवाल्या एग्जिक्युटिव्ज ना. एवढे करूनही, अनेक फ्रॉड पचवून अपवाद वगळता त्या कायम प्रचंड फायद्यात. त्या फायद्याचा हिस्सा शेअर्समार्फत त्यात गुंतवणूक करणार्‍या धनदांडग्यांच्या खिशात (म्हणून सामान्यांनी शेअर्स नाहीत निदान म्युचुअल फंडात गुंतवणूक करून आपला हिस्सा वसूल करायला हवा. पण एफडी नि इन्शुरन्स यात 'सेफ' गुंतवणूक करणारे दिवटे हे ध्यानात घेतील तर ना.). तुमच्या हाती सहा टक्क्यांचा तंबूरा. (ते ही टॅक्सेबल, आणि इन्फ्लेशनचा विचार करता हा कदाचित ऋण परतावा!) थोडक्यात हे 'ट्रिकल डाऊन' ऐवजी 'सक-इट-अप' झाले आणि बँका हे पैसे खेचून वर नेणारे पंप. (कम्युनिस्ट मंडळींनी हा मुद्दा उचलून धरला तर लोक डोक्यावर घेतील त्यांना. काय म्हणता कॉम्रेड?)

ज्या पक्षाचे सरकार बँकांना धार्जिणे धोरण बदलून ग्राहकांनाही समान हक्क देणारे धोरण आणेल, त्या पक्षाला पुढची हजार वर्षे मतदान करायची खुली ऑफर देतो आहे.

'बँक हा धंदा नसून सर्विस म्हणून तिच्याकडे पाहिले, तर या व्यवसायाचे स्वरूप आमूलाग्र बदलून ते ग्राहकांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त होईल का?' हा एक प्रश्न मला अर्थशास्त्राची समज असणार्‍याना विचारावासा वाटतो.

- oOo -

तळटीप-१:
माझा मुद्दा समानतेच्या, व्यापाराच्या, स्पर्धेच्या तत्वाचा आहे. 'देवाणघेवाण समान व्याजदरावर झाली तर बँक धंदा कसा करणार?' हा प्रश्न विचारू नये. त्यासह व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न पडलेल्याने 'करू नये' हेच त्याचे उत्तर. इस्लामिक बँकिंग नावाचा एक प्रकार असतो, त्याचा अभ्यास करावा.

तळटीप-२:
इस्लामिक या शब्दाने पित्ताचा त्रास झाला तर जुन्या एखाद्या ग्रंथाचा हवाला देऊन 'हे आमच्याकडे आधीच होते'च्या प्रमाणपत्रांच्या पत्रावळी छापणार्‍या विद्वानांकडे जाऊन त्यांचे प्रमाणपत्र आणून त्याला 'हिंदू-बँकिंग' म्हणायला सुरुवात करावी... पाकिस्तानात हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक ऐवजी पाकिस्तानी क्लासिकल म्युझिक म्हणतात तसे.


हे वाचले का?