Vechit Marquee_Both

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

व्हेअर इज वॉली

  • ‘मार्टिन हँडफर्ड’ नावाच्या एका ब्रिटिश रेखाचित्रकाराने ‘व्हेअर इज वॉली’ किंवा ‘चित्रात लपलेला वॉली शोधा’ असा एक खेळ त्याच्या ग्राफिक्सच्या सहाय्याने सुरू केला. त्याच्या पुस्तकाच्या पानावर अनेक पात्रे नि चित्रे असत. त्यात कुठेतरी लाल-पांढर्‍या पट्ट्यांचा टी-शर्ट, गोंड्याची गोल नि लाल टोपी आणि गोल फ्रेमचा चष्मा असलेली ही ‘वॉली’ नावाची व्यक्ती लपलेली असे. तुमची दिशाभूल करण्यासाठी, यातील एक-दोन वैशिष्ट्यांसह दुसरे एखादे पात्र चित्रांतील पात्रांच्या भाऊगर्दीत मिसळून देणे, वगैरे क्लृप्त्या चित्रकाराने वापरलेल्या असत. वरवर पाहता जरी हा लहान मुलांचा खेळ असला तरी, मोठेही तो आनंदाने खेळत असत.

    हाच खेळ अमेरिकेत ‘व्हेअर इज वाल्डो’ या नावाने प्रसिद्ध झाला. (‘द बिग बँग थिअरी’ या टेलिविजन सीरिजच्या चाहत्यांना एका एपिसोडमध्ये सस्पेन्ड झालेला शेल्डन वाल्डो शोधत बसलेला पाहिल्याचे आठवत असेल कदाचित.) ‘वॉली’ऐवजी अमेरिकन स्थानिक वाटावे (आणि काहीही ‘ब्रिटिश’ म्हटले की त्याला नाक मुरडणार्‍या* अमेरिकनांचे नाक सरळ राहावे) म्हणून त्याचा वाल्डो झाला. पुढे अमेरिकन मंडळींच्या डिजिटल आसक्तीचा परिणाम म्हणून तो डिजिटलही झाला.

    WaldoFindsYou

    आमच्याकडेही आम्ही हा खेळ खेळतो. अमेरिकन प्रत्येक गोष्ट वर्चुअल वा डिजिटल माध्यमांत नेतात, तर आम्ही उलट दिशेने त्याचे कमी खर्चाचे व्हर्शन बनवत असतो. सपाटही नसलेली लाकडाची एक फांदी आणि कागदाच्या बोळ्याला वाहनाच्या चाकातील ट्यूबमधून कापून काढलेली रबर लावून क्रिकेट खेळण्याचा शोध आमचाच. आमचे सर्व काही ‘होम एडिशन’चे असते. प्रोफेशनल आणि बिजनेस एडिशन आम्ही पाश्चात्यांसाठी सोडून दिल्या आहेत. (नमनाला घडाभर तेल म्हणतात ते हे.)

    तर सांगत काय होतो, आम्हीही आमच्याकडे हा खेळ आणला. पण ब्रिटिशांमध्ये पुस्तके छापावी लागतात, वा अमेरिकन मंडळींकडे गेम विकत घ्यावा लागतो, तसे आम्ही काही करत नाही. आम्ही हा सारा ‘माईंड गेम’ म्हणून खेळतो. आणि केवळ उदार भूमिकेतून इतरांनाही हा वाल्डो सापडावा म्हणून, फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅप सारख्या फुकट माध्यमांतून आम्ही तो कुठे आहे ते सार्‍यांना सांगतो.

    आता तुम्ही म्हणाल, म्हणजे इतरांचा खेळ बिघडवणार तुम्ही. पण तसे नाही. हा इतर कुणी शोधलेला वाल्डो जो आहे, तो आपणही स्वीकारला की आपल्यालाही पॉईंट्स मिळतात. आणि यातला वाल्डो हा स्वत:देखील हा खेळ खेळू शकतो, आहे की नाही गंमत? आता त्याने दुसरा वाल्डो शोधला नि स्वीकारला की, त्याचे पॉईंट्स वाढतात आणि इतर कुणी त्याला वाल्डो म्हणून ‘धप्पा दिला’ की कमी होतात.

    पण आपण भारतीय असे आहोत की, आपले अंतर्गत असे अनेक गट आहेत. आणि प्रत्येकाचा वाल्डो वेगळा. त्यामुळे मग या खेळाची व्हर्शन्स करावी लागतात. ल्युडो किंवा सापशिडी, व्यापार (ई: कित्ती घाटी शब्द आहेत हे, ‘स्नेक्स अँड लॅडर्स’ किंवा ‘मोनोपॉली’ म्हणा की.) मध्ये कसे प्रत्येकाची सोंगटी वेगळी असते. इथे प्रत्येकाला आपला गेमच निवडता येतो.

    आता असं पाहा, स्वयंघोषित राष्ट्रवादी खेळाडूंसाठी हा ‘व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ नावाने खेळला जातो तर स्वयंघोषित पुरोगाम्यांमध्ये ‘व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी**’ या नावाने. याच दुसर्‍या खेळाचे ‘व्हेअर इज (छुपा) मनुवादी’ नावाचे आणखी एक उप-व्हर्शन आहे. (छुपा) दक्षलवादी शोधून कंटाळले की, स्वयंघोषित पुरोगामी कधी कधी हा खेळ खेळतात.

    पण या दोन व्हर्शन्समध्ये थोडासा फरक आहे. स्वयंघोषित राष्ट्रवादी हा खेळ फक्त पुरोगामी पुस्तके नि माणसे घेऊन खेळतात, तर स्वयंघोषित पुरोगामी हा खेळ आपसातच खेळत असतात. (जसे ते आपले विचार वैचारिक विरोधकांच्या व्यासपीठावर न जाता, आपल्या-आपल्यात एकमेकांना शिकवतात अगदी तसेच.)

    थोडे विषयांतर करुन एक जुना विनोद सांगतो. अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय पोलिसांना एकदा एक लपवलेला बोकड शोधून आणण्याचे आव्हान देण्यात आले. जो कमीत कमी वेळात शोधेल ते पोलिस खाते – म्हणे, जगातले सर्वात कार्यक्षम खाते असे जाहीर करण्यात येणार होते. ‘गेट-सेट-गो’ झाल्यावर पाचच मिनिटात भारतीय पोलीस एक वासरू घेऊन हजर झाले. ब्रिटिश आणि अमेरिकन पोलीस काही वेळानंतर बकरा पकडून घेऊन आले. त्याच्या मागे पळापळ केल्याने ते घामाघूम झाले होते. अमेरिकन पोलीसाच्या आधी ब्रिटिश पोलीस हजर झाल्याने, ‘ब्रिटिश पोलीस खाते श्रेष्ठ आहे’ असे जाहीर करावे असा निर्णय न्यायाधीशांनी दिला.

    याला भारतीय पोलीसांनी ताबडतोब आक्षेप घेतला, नि आपण या दोघांच्याही आधी पोचल्याचे निदर्शनास आणून दिले. “पण तुम्ही बकरा नव्हे तर वासरू आणले आहे”, न्यायाधीश वैतागाने म्हणाले. “दोन मिनिटे इंटरोगेशन करू द्या. हे वासरू आपण बकरा असल्याचे मान्य करते की नाही पहा.” भारतीय पोलीस उत्तरला. निष्कर्ष... सांगायलाच हवा का?

    गाडी परत आपल्या खेळाकडे आणू. तर मुद्दा असा की हे ‘व्हेअर इज (शहरी) नक्षलवादी’ किंवा ‘व्हेअर इज (छुपा) दक्षलवादी’ खेळणारे लोक हे या विनोदातल्या त्या भारतीय पोलीसासारखे असतात. उगाच धावाधाव करण्यापेक्षा, आपल्याला न आवडणारे एखादे वासरू पकडून आणतात, नि हाच बकरा आहे असे घोषित करतात. शिवाय भारतीयांनी हा खेळ वैयक्तिक न ठेवता ग्रुपने खेळण्याचा केल्याने, त्यांच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे पाच-पन्नास लोक ते सहज पकडून आणतात. इथे बहुमत – आवाजी असो की संख्यात्मक– हे काहीही (अगदी गुरुत्वाकर्षणामुळे वस्तु जमीनीपासून उलट दिशेने आकाशाकडे झेपावतात हा दावा देखील) सिद्ध करण्यास पुरेसे असते. आता असे मानणार्‍यांचे पुन्हा बहुमत असल्याने, ‘मी पकडला तो (शहरी) नक्षलवादी किंवा (छुपा) दक्षलवादीच आहे’ हे सिद्ध झाल्याचे स्वत:च जाहीर करतात. एकुण मोठा मौजेचा खेळ असतो हा.

    बाय द वे, तुमचा स्कोर किती झालाय आतापर्यंत? मी अजून ‘ॠणा’तच आहे. नाही म्हणजे तुम्ही लोक डांबिस, पहिला प्रश्न हाच विचाराल, म्हणून आधीच उत्तर देऊन टाकलं.

    - oOo -

    *अगदी नव्याने तिथे स्थलांतर केलेलेही याला अपवाद नाहीत. एका माजी- पाकिस्तानी आणि अमेरिकन सिटिझन होऊन जेमतेम पाच वर्षे झालेल्या बॉस्टनमधील आमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनचे उदाहरण घ्या. एकदा बोलता बोलता मी कुठलासा शब्द वापरला तर त्याने मला दुसरा एक शब्द वापरावा असे सुचवले. मी म्हणालो,‘अरे पण मला जे म्हणायचे आहे त्यानुसार तो बरोबरच आहे की. शिवाय दोन्हींचा अर्थ एकच आहे.’ ‘नो, बट दॅट इज सो ब्रिटिश.’ तो ताडकन म्हणाला.

    ** संघविचारांच्या विशेषत: मोदीसमर्थक व्यक्तींसाठी ‘दक्षलवादी’ हा शब्द मी फेसबुकवर कुठेतरी वाचला. श्रेय ज्याचे असेल त्याला.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा