यापूर्वीच्या निवडणुका आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुका यांत एक महत्त्वाचा फरक आहे; तो म्हणजे यांत झालेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये एका बाजूने वृत्तवाहिन्या येतात, तसेच इंटरनेटच्या माध्यमांतील संकेतस्थळे, फेसबुक आणि ट्विटरसारखी समाजमाध्यमे, मोबाइल व त्यावरील व्हॉट्सअॅपसारखी संवादी माध्यमे या साऱ्यांचा समावेश होतो. या सर्व माध्यमांतून मोदींच्या खऱ्या-खोटय़ा यशोगाथांचा, काँग्रेसच्या खऱ्या-खोटय़ा पापांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एक सूत्रबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली होती. जी कमालीची यशस्वी ठरली. यात अधिकृत माध्यमांमधील प्रतिनिधी होते, तसेच समाजमाध्यमांमध्ये मोदींचा किल्ला लढवणारे स्वयंसेवकही. ही यंत्रणा उभी करण्यामागचे मेंदू व हात आणि त्या यंत्राचे इतर भाग यांचा आढावा रोहित चोप्रा यांनी ‘द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र’ या पुस्तकात घेतला आहे.
स्वत: चोप्रा हे भारतातील इंटरनेटच्या उगमकाळीच रेडिफसारख्या अग्रगण्य माहिती-तंत्रज्ञान कंपनीमध्ये काम करत होते. त्यातून त्या इंडस्ट्रीच्या विकासाचे विविध टप्पे त्यांना अनुभवता आले. आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या आधारे त्यांनी ‘तंत्रज्ञान आणि भारतीय राष्ट्रवाद’ या विषयावर एमरी विद्यापीठाला प्रबंध सादर केला. त्या प्रबंधातील महत्त्वाचे मुद्दे घेऊन, अभ्यासकाचा दृष्टिकोन राखून- पण भाषा वगळून, काही भर घालून हे पुस्तक सिद्ध झाले आहे.
स्वप्नाळू गृहीतके...
मोदींच्या पूर्वी अथवा समकालीन वापरात ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’सारखे भांडवलशाहीविरोधी आंदोलन, टय़ुनिशियामधून सुरू झालेला आणि इतर अरब राष्ट्रांत पसरलेला ‘अरब स्प्रिंग’ हा उठाव, २०१७ मध्ये वॉशिंग्टनमध्ये निघालेला महिला मोर्चा आदी चळवळींचा उगम हा इंटरनेटच्या माध्यमातून झालेला दिसतो. निव्वळ राजकीय प्रचारासाठी मोदींसह रशियाचे पुतिन आणि अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इंटरनेटचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.
पण यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना या नव्या माध्यमांत मानवी धारणांवर प्रभाव पाडण्याची काहीएक जादूई शक्ती आहे असा गैरसमज झालेला दिसतो; पण ते तंतोतंत खरे मानण्याचे कारण नाही, असे चोप्रा बजावतात. याला ते ‘लिबर्टेरिअन टेक्नो-युटोपिया’ असे म्हणतात. याशिवाय हा समज इंटरनेटच्या मूळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वाशी विसंगत आहे, असे निदर्शनास आणून देतात. किंबहुना अशा स्वप्नाळू गृहीतकांमधून बाहेर येण्यासाठीच तंत्रज्ञानाच्या सामाजिक-राजकीय परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा, असे प्रतिपादन ते करतात. त्यांच्या प्रबंधातून आणि या पुस्तकातूनही मांडलेला अभ्यास मोदींची, भाजपची धोरणे, वाटचाल नापसंत असलेल्याने केलेला आहे हे उघडच आहे. पण तो वैयक्तिक भाग बाजूला करूनही पुस्तकाने अभ्यासकाची शिस्त बऱ्यापैकी पाळलेली दिसते.
या अभ्यासाला दोन महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला म्हणजे, एकूणच हिंदुराष्ट्रवादाचा इतिहास, त्याची लक्षणे नि अनुषंगे. दुसरा इंटरनेटच्या उदयानंतर त्या माध्यमांतील हिंदुराष्ट्रवादी व्यक्ती नि संघटनांची वाटचाल. चोप्रा यांनी इंटरनेट माध्यमातील आणि त्यापूर्वीचे हिंदुराष्ट्रवादी- जे या व्यापक ‘हिंदू प्रोजेक्ट’चा भाग आहेत त्यांना ‘हिंदू-उजवे’ (हिंदू राइट) अशी संज्ञा वापरली आहे. मराठीमध्ये यांस हिंदू-अस्मितावादी म्हणता येईल. यात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशी तीनही अनुषंगे अंतर्भूत होतात.
‘हिंदू’ ओळख पुनर्स्थापित करताना...
‘हिंदू’ ही ओळख पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न देश नि परदेशातील अनेक हिंदूंनी, संघटनांनी सुरू केला. त्यात एका बाजूने ज्ञानाची मक्तेदारी पाश्चात्त्यांकडून हिसकावून घेण्यासाठी अर्वाचीन पाश्चात्त्य ज्ञान हे मूळ भारतीयच होते हे ठसवून सांगत असतानाच, दुसरीकडे उलट दिशेने ‘नासा’सारख्या पाश्चात्त्य ज्ञानाच्या प्रतीकाकरवी त्याला पाठिंबा मिळाल्याचे दावे, असे दुहेरी आणि परस्परविरोधी भासणारे प्रयत्न केले जातात. त्याचसोबत ताजमहाल, कुतुबमिनार यांसारखी मुस्लीम सत्तेची प्रतीकेही मूळची हिंदू असल्याचे ‘शोध’ प्रसृत करणे हा त्याचाच भाग. याशिवाय हिंदूंचा देदीप्यमान इतिहास, श्रेष्ठ हिंदू संस्कृतीचे डिंडिम, कॅन्सरमुक्तीपासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रांत असलेले श्रेष्ठत्व, पाश्चात्त्यांबद्दलचा राग, त्यांनी आमचे ज्ञान पळवून आपले म्हणून खपवल्याचे दावे, भारत हा सांस्कृतिकदृष्टय़ा हिंदू असल्याचे आग्रही प्रतिपादन.. ही त्याची अन्य लक्षणे आहेत.
दुसऱ्या बाजूने दलित-मुस्लीम-पुरोगामी-बुद्धिजीवींना सातत्याने हिणवणे, देशद्रोही, देशाशी अप्रामाणिक असल्याचा, देशविरोधी कटकारस्थाने केल्याचे आरोप करून धुरळा उडवून देणे हा आक्रमक भागही येतो. ‘लिबटार्ड’, ‘सिक्युलर’ वगैरे शेरेबाजी; विरोधी नेत्यांना त्यांचे पूर्वज अन्य धर्मीय असल्याचे हिणवणे हा चारित्र्यहननाचा भागही. हा दुसरा शत्रुलक्ष्यी भाग इंटरनेटच्या माध्यमातून अधिक वेगाने प्रसारित झालेला दिसतो.
हिंदुराष्ट्रवादाच्या इंटरनेट अवताराची तुलना चोप्रा यांनी ब्रिटनमधील गोऱ्या-कॉकेशन राष्ट्रवादाशी, अमेरिकी राष्ट्रवादाशी आणि अगदी भारताशी निगडित असलेल्या, आज प्रभावहीन झालेल्या काश्मिरी आणि शीख राष्ट्रवादाच्या इतिहासाशी करत आपल्या अभ्यासाला तुलनात्मक विचारासाठी पार्श्वभूमीही उपलब्ध करून दिली आहे.
प्रचार-माध्यमे
पुस्तकाच्या शीर्षकात असलेला ‘व्हर्च्युअल’ हा शब्द प्रामुख्याने इंटरनेटच्या जगासंदर्भातच वापरला जात असला, तरी चोप्रा यांनी एकुणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विचार केला आहे. त्यामुळे त्यांनी यात वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेचा, प्रभावाचा अभ्यासही समाविष्ट केला आहे. इंटरनेट असो वा वृत्तवाहिन्या, ही एका बाजूने स्वतंत्र माध्यमे आहेत, तर दुसरीकडे रेडिओ, मुद्रित साहित्यासारख्या जुन्या माध्यमांना मिळालेले नवे आयाम. या दोन्ही भूमिकांना तपासण्याचा चोप्रा यांचा प्रयत्न आहे.
हस्तलेखनाला मुद्रणाच्या साहाय्याने प्रतींमध्ये रूपांतरित केले गेले ते खऱ्या अर्थाने पहिले माध्यम. शब्द हा त्याचा गाभा. त्यातून पुढे पुस्तके, वर्तमानपत्रे आदी तज्ज्ञांच्या आधिपत्यांखालील माध्यमे अवतरली. पुढे ऑडिओ कॅसेट हे पहिले माध्यम असे आले की, ज्यात सर्वसामान्य व्यक्ती वैयक्तिक पातळीवर एका लहानशा, सहज वाहून नेता येण्याजोग्या यंत्राच्या साहाय्याने आपले म्हणणे मांडू शकत होती, इतरांपर्यंत पोहोचवू शकत होती. त्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची वा अवजड यंत्रसामग्रीची गरज नव्हती. रामजन्मभूमी आंदोलनाच्या उदयकाळात आणि आधीही वर उल्लेख केलेल्या मुद्दय़ांच्या आक्रमक प्रचाराच्या कॅसेट तयार करून भाजप आणि संघ परिवाराने परिणामकारकरीत्या त्यांचा प्रचार-माध्यम म्हणून वापर करून घेतला होता.
ज्याप्रमाणे ऑडिओ कॅसेटचा वापर भाषण आणि प्रचारसाहित्याच्या प्रसारासाठी केला गेला, त्याचप्रमाणे मनोरंजन माध्यमांचा वापरही केला गेला. सध्या टाळेबंदीच्या काळात पुनप्र्रसारित झालेल्या ‘रामायण’ या मालिकेने दूरदर्शनवर तोवर असलेला अधार्मिक कार्यक्रमांचा संकेत मोडून नवा पायंडा पाडला. मग प्रामुख्याने खासगी वाहिन्यांच्या उदयानंतर नफा हे एकमेव उद्दिष्ट असलेल्या वाहिन्यांनी धार्मिक, पौराणिक, पारंपरिक मालिकांचा धडाका लावला. यातही हिंदुराष्ट्रवाद्यांच्या ‘हिंदू’ ही ओळख ठळक करत नेण्याच्या प्रयत्नांचा अप्रत्यक्ष सहभाग होताच.
वेब १.० आणि वेब २.०
यानंतर आलेल्या इंटरनेटच्या इतिहासाचे वेब १.० आणि वेब २.० असे दोन भाग चोप्रा यांनी कल्पिलेले आहेत. यात पहिल्या प्रकारात संकेतस्थळे आणि दोन व्यक्तींमधील थेट संवाद प्रस्थापित करणारी ईमेल, मेसेंजर आदी माध्यमे येतात, तर दुसऱ्या प्रकारात समाजमाध्यमांचा समावेश होतो. पहिला भाग हा केवळ माहितीशी निगडित आहे. इथे व्यक्तींना या माहितीच्या स्रोताकडे यावे लागते. तर दुसरा भाग आहे तो इंटरनेट ऑनलाइन संवाद आणि माहितीनिर्मितीचा. या दुसऱ्या प्रकारात तज्ज्ञांची सद्दी मोडीत निघून सर्वसामान्य व्यक्तीही मजकूर, ज्ञान, माहिती यांची निर्मिती करते आणि तिची व्याप्ती कित्येक पट अधिक होते. शिवाय ही माध्यमे मोबाइलसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तीपर्यंत पोहोचतात.
व्हॉट्सअॅपसारख्या अनियंत्रित माध्यमांतून सिद्ध करता न येणारे दावे सुरक्षित संवादाच्या माध्यमातून पसरवता येतात. हे माध्यम ‘जाळ्यांचे जाळे’ आहे, असे चोप्रा म्हणतात. यातील प्रसारणावर चित्रपट वा नाटक यांसारख्या माध्यमांवर असलेली कोणतीही बंधने वा नियंत्रणे नसतात. त्यामुळे हे माध्यम प्रचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. भाजप आणि हिंदू-उजवे या माध्यमांचा वापर पुरेपूर करून घेतात. हे माध्यम साधारणपणे जुन्या काळातील ऑडिओ कॅसेटसारखे आहे.
संवादातून हिंसेकडे...
इंटरनेटवरील संवाद अथवा देवाणघेवाणीतून विसंवाद नि सामाजिक तणाव अधिक निर्माण होतो का? व्यक्ती आणि गटांना बांधिलकी निर्माण करण्यास कितपत साहाय्यभूत ठरतो? यातून विशिष्ट विचारसरणी आणि विशेषत: राजकीय विचारसरणीचे प्रक्षेपण करणे शक्य होते का? आणि होत असेल तर असा कृत्रिमरीत्या निर्माण केलेला प्रभाव दीर्घकाळ राहतो की तात्कालिक? अशा अभ्यासादरम्यान नव्या चौकटी, नवे दृष्टिकोन, भाषा निर्माण होतात का? आणि या इंटरनेट विश्वाला समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून काढलेले निष्कर्ष बाहेरील वास्तविक जगाला लागू करता येतील का?.. या प्रश्नांना समोर ठेवून चोप्रा यांनी अभ्यासाची मांडणी केली आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण हे अशा प्रश्नांच्या गटाला समोर ठेवूनच गुंफले आहे.
भारतातील राजकीय संघर्ष हा एका बाजूने सेक्युलॅरिझमचे समर्थक, काँग्रेस अथवा ‘आप’चे समर्थक, पुरोगामी यांची भारतीय समाज व राज्य यांच्याबद्दलची कल्पना आणि हिंदुराष्ट्रवादी व मोदी-समर्थक यांची कल्पना यांच्यातील आहे, असे चोप्रा यांचे म्हणणे आहे. या आणि अशा विविध मुद्दय़ांचा ऊहापोह करताना ते अमेरिका वा पाश्चात्त्य जगातील अशाच समांतर मुद्दय़ांचा उल्लेख करतात. अमेरिका, ब्रिटन आणि भारत या तीनही ठिकाणी नेता, नेता-समर्थक आणि इंटरनेट सैनिक यांचा शाब्दिक आक्रमकपणा वास्तविक जगात हिंसेला उत्तेजन देतो. भारतात तर धर्म, वर्ग, जात, सामाजिक पत यांच्या विषमतेतून हिंसा झिरपते आणि त्यातून घडणाऱ्या मन बधिर करणाऱ्या घटनांनी वृत्तपत्रांची पाने भरलेली दिसतात. अख्लाकची हत्या, दलितांना जाहीरपणे फटके देणे, गोमांस असल्याच्या, गाईंना खाटकाकडे नेत असल्याच्या संशयावरून मारहाण/ हत्या आदी घटनांमध्ये बळी पडणारे प्रामुख्याने मुस्लीम, दलित वा निम्नवर्गीयच दिसतात. पण हे मुद्दे मांडत असतानाच, या प्रचाराला भारतीय नागरिक, हिंदू अनुकूल होत गेले यामागची कारणे तपासताना चोप्रा यांनी त्यापूर्वीच्या काँग्रेस शासनाच्या धोरणांचा, चुकांचा आढावाही घेतला आहे.
भाजपला माध्यमांचे महत्त्व विरोधकांच्या आधी ओळखल्याचा फायदा मिळाला हे खरेच आहे. पण केवळ प्रथम-प्रवेशाचा फायदा पुरेसा होतो का? आज मोदी-भाजप राजकारणात आणि हिंदुराष्ट्रवादी इंटरनेटवरील राजकारण आणि समाजकारणात आपापल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा कैक योजने पुढे दिसतात, ते कसे? हा प्रश्न कळीचा आहे, आणि चोप्रा यांनी त्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने पुढील विवेचन उलगडत नेले आहे. इंटरनेट उदयानंतर खासगी, सार्वजनिक आणि राजकीय संवादात झालेले लक्षणीय बदल आणि भारतीय राजकारण आणि समाज यांच्यात झालेली उलथापालथ यांचा वेध घेतला आहे. मोदींच्या सामाजिक, राजकीय विजयामागे कोणती यंत्रणा होती? तीत सहभागी प्रमुख व्यक्ती कोण नि त्यांच्या भूमिका कोणत्या होत्या, याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले आहे.
मिस्ड कॉल अभियान
या साऱ्या यंत्रणेच्या उभारणीमध्ये राजेश जैन या उद्योगपतीची प्रमुख भूमिका होती. जैन हे वैचारिकदृष्टय़ा उजवे म्हणता येणार नाहीत. पण तत्कालीन काँग्रेस सरकारची लोककल्याणकारी धोरणे ही देशाच्या आर्थिक प्रगतीला मारक आहेत, असे त्यांचे मत होते. मोदी यांचे तथाकथित ‘गुजरात मॉडेल’ पाहता त्यांनी आपले वजन मोदींच्या पारडय़ात टाकले. त्यांनी प्रथम ‘डिजिसेंट्रल’ नावाची कंपनी स्थापन करून तिच्या अंतर्गत काही संकेतस्थळे चालू केली. जैन यांनी आरिआना हफिंग्टन यांचे माध्यम प्रारूप राबवले. एक तर इंटरनेट हे माध्यम नवा उद्योग उभा करण्याच्या दृष्टीने कमी खर्चीक, त्यात तज्ज्ञ माध्यमकर्मीना बाजूला सारून हौशी लेखकांना जागा दिली की छापील नावासाठी ते फुकट लिहिण्यासही तयार होतात. यातून ही संकेतस्थळे किमान खर्चात चालवता येतात. ‘हिंदू-प्रोजेक्ट’चे स्वयंसेवक अशा – खरे तर त्यांच्याचसाठी निर्माण केलेल्या – व्यासपीठाचा फायदा न उठवतील तरच नवल!
पण जैन यांचे याहून मोठे योगदान म्हणजे ‘मिस्ड कॉल अभियान’. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या मार्फत अण्णा हजारे यांनी केलेल्या भ्रष्टाचारविरोधी उपोषणाची इंटरनेटवरील संपूर्ण बाजू जैन यांनी सांभाळली होती. पैसे खर्च न करता आम्हाला पाठिंबा द्या, एक मिस्ड कॉल द्या, असा प्रचार त्यांनी केला. यातून त्या फोन क्रमांकाच्या आधारे त्याच्या मालकाचा पाठिंबा आंदोलनाला आहे, असा दावा तर करता येतच होता; वर हजारो नागरिकांचा आयता डेटाबेसही – टेलीकॉम कंपनीला एक पैसा न देता – तयार होत होता. पुढे हेच तंत्र त्यांनी मोदींच्या प्रचाराच्या वेळी, भाजपच्या सदस्यत्व अभियानाच्या वेळी वापरले. त्यांच्या इंटरनेट स्वयंसेवकांनी विविध दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह या मिस्ड कॉलचे जोगवे मागत ते यशस्वीही केले. इतकेच नव्हे तर अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी तयार झालेला डेटाबेसही त्यांनी मोदींच्या प्रचाराला वापरला, असा आरोप अनेकांनी केला. तो अर्थातच सिद्ध करता येण्याजोगा नाही. पण यानिमित्ताने अण्णांच्या आंदोलनामागचे सूत्रधारही ‘हिंदू-प्रोजेक्ट’शी या ना त्या प्रकारे संबंधित होते, याकडे चोप्रा यांनी लक्ष वेधले आहे.
त्यांच्या भाषेत ‘हिंदू-उजवे’ अथवा हिंदुराष्ट्रवाद्यांच्या या ऑनलाइन प्रोजेक्टचा असा सांगोपांग आढावा घेत असतानाच काही त्रुटीही राहून गेलेल्या दिसतात. मोदीपूर्व, इंटरनेटपूर्व हिंदुराष्ट्रवाद्यांच्या इतिहासामध्ये हिंदू महासभेचा उल्लेख नाही. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या पुस्तिकेच्या आधारे हिंदुत्वाची ओळख निर्माण केली गेली, असा ओझरता उल्लेख केला असला तरी त्याची कारणमीमांसा केलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वास्तव जगात निर्माण केलेल्या संघटनात्मक जाळ्याचा वेध घेणे सोडाच, पण उल्लेखही चोप्रा यांनी केलेला दिसत नाही.
-oOo-
'द व्हर्च्युअल हिंदू राष्ट्र’ लेखक : रोहित चोप्रा प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
(हा पुस्तक परिचय दै. लोकसत्ता’च्या २३ मे २०२० च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. संपादन-साहाय्याबद्दल 'लोकसत्ता'चे प्रसाद हावळे यांचे आभार.)