शनिवार, १६ मार्च, २०१९

अकर्मक पुरोगामी आणि राजकीय पर्याय

स्वत:ला पुरोगामी विचारवंत म्हणवणारे ’हे ही वैट्टं, ते ही वैट्टं, ते तर वैट्टंच वैट्टं’ करत बसले आहेत. राजकारणात - रोजच्या जगण्यातसुद्धा - सर्वगुणसंपन्न पर्याय मिळत नसतो. ६०-७०-८० टक्के गुणवान मिळाला तरी हत्तीवरुन साखर वाटावी अशी स्थिती असते. (रोज आरशात पाहतो ना आपण!) तुम्ही राजकारणात उतरुन तुमच्या पवित्र मार्गाने यशस्वी होऊन दाखवू शकत नसाल, तर तो मार्ग कितीही पवित्र असला तरी वाहतुकीस बिनकामाचा म्हटला पाहिजे. पुस्तकातले तत्त्वज्ञान माणसांपर्यंत पोचत नसेल तर त्या बुद्ध्यामैथुनापलिकडे महत्त्व देता येणार नाही.

AllSignalsGreen
संकल्पचित्र https://www.deccanherald.com/ येथून साभार

या अकर्मक पुरोगाम्यांचे बहुधा असे असावे की ’शहरातले सगळे ट्रॅफिक सिग्नल हिरवे झाल्याखेरीज मी गाडी गॅरेजबाहेर काढणार नाही.’ परिणामी यांची गाडी कायम गॅरेजमध्ये पडून गंजून जाते. उलट दहा वेळा पंक्चर होणारी, अनेकदा ब्रेक-डाउन होणारी, चार-दोन अपघात करणारी गाडी आपल्या आठ-दहा वर्षांच्या आयुष्यात अनेक महत्वाची, उपयुक्त कामे उरकून देते.

राजकारणी तर काय 'गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास' या मानसिकतेचेच असतात. ते त्यांच्या मार्गाने व्यावहारिक मार्ग काढतच असतात. त्यांच्या त्या स्वार्थलोलुप, भ्रष्ट वगैरे वर्तणुकीतूनही सामान्य जनतेपर्यंत काही पोचत असते. पाच मैल काँक्रीटच्या रस्त्याला लागेल इतका खर्च करुन एक मैल रस्ता बनवला जातो हे खरे, पण तो एक मैल का होईना जनतेच्या कामी येत असतो. तेव्हा चार मैलाचे पैसे खाल्ले हे सिद्ध करणे जितके आवश्यक, तितकेच त्या एक मैलाची उपयुक्तता मान्य करणेही. ती मान्य करुन पुढच्या वेळी एकाचे दोन, दोनाचे तीन, तिनाचे चार मैल करण्यासाठी सक्रीय होता आले पाहिजे.

त्यांच्या वाटचालीतील स्वार्थाचा, व्यावहारिकतेचा भाग कमी करुन तत्त्वनिष्ठेचा वाढवायचा असेल तर तत्त्वनिष्ठ म्हणवणार्‍यांनी ठामपणे एक बाजू निवडून वर त्या बाजूच्या मंडळींच्या गैरकृत्यांचे समर्थन न करता ’मी तुझ्या बाजूचा आहे, पण या मुद्द्यावर तुला धारेवर धरणार आहे.’ असे ठामपणे सांगत राहायला हवे. ते करण्यासाठी व्यवस्थेत शिरुन व्यवस्थेच्या मर्यादा जाणून घेतल्या पाहिजेत, त्यावर तोड काढून दाखवली पाहिजे. केवळ ’पैसे खाऊ नका, भ्रष्टाचार करु नका’ असे सांगून उपयोग नाही. बाहेर बसून गमजा करणारे सरकारात आल्यावर मागच्यांच्या मार्गाने चालू लागले यावर टीका करा, पण त्याची कारणमीमांसाही करा, व्यवस्थेला बदलून टाकण्याची गर्जना करणारा व्यवस्थेत जाताच त्यातील बंधने समजून आपली तलवार म्यान करतो हे समजायला हवे.

वांझोट्या भाषणांनी कामे होत नाहीत हे राजकारण्यांना जसे लागू आहे तसेच विचारवंतानाही. सगळेच मूर्ख आहेत, आम्ही शाहाणे आहोत. म्हणून आम्ही त्यांच्यात सामील होणार नाही म्हणणारे मुळात त्याच समाजात असल्याने त्यांच्यात सामील असतातच, फक्त असल्या विश्वामित्री पवित्र्याने निर्णयप्रक्रियेतले आपले कणभर स्थानही मूर्खांना बहाल करुन टाकतात.

’सगळे सारखेच’ म्हणत आपल्या नैतिकतेच्या नि तत्त्वज्ञानाच्या दुलईत गाई गाई करणारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने कुचकामी असतात. व्याख्याने, पुस्तके नि परिषदा यातून मूठभरच बदलतात, दरम्यान त्यांच्या कैकपट अज्ञ जनता जन्म घेत असते. ही लढाई कायमच विषम असते. तेव्हा अधिकाराला बाणेदारपणे नाकारणारे प्रत्यक्षात पळपुटे असतात.

कुणी आधी प्रश्न मागवून आपलेच भाट लोक समोर बसवून प्रश्नोत्तराचे स्क्रिप्टेड नाटक पार पाडते, तर कुणी आपल्यासारख्याच मंडळींसमोर व्याख्याने ठोकून काहीतरी बदल घडवत आहोत या भ्रमात राहतात, इतकाच काय तो फरक राहतो.

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ३ मार्च, २०१९

अग्गोभाई आणि भकोभाई

बाबा : मी आदि शंकराचार्यांचा खापरपणतू आहे.

भक्त कोरस (भ.को.) : बोला अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.

एक उपस्थित (ए.उ.) : पण शंकराचार्य तर...

MEMEMeme
सदर meme आंतरजालावरुन कायप्पामार्गे (WhatsApp) प्राप्त झाले आहे.

बाबा: (त्याचे बोलणे तोडून) मी आईन्स्टाईनचा तिसरा अवतार आहे.

भ.को.: बोला तिसरे आईन्स्टाईन अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.

ए.उ.: पण आईन्स्टाईन तर मागच्या श...

बाबा: (त्याचे बोलणे तोडून) माझ्या तिसर्‍या अवतारात मी आर्यभटाकडून आर्यभटीय लिहून घेतले.

(भक्त बावचळून आर्यभट कोण हा प्रश्न चेहर्‍यावर आणून एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात.)

बाबा: (जोरात खाकरतात.)

भ.को.: (भानावर येऊन) बोला आर्यभट-गुरु अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.

ए.उ.: अहो पण गणित चु...

बाबा: (त्याचे बोलणे तोडून) मी कलिंगविजयी सम्राट अशोकाचा पणतू आहे.
भ.को.: (जोरात) बोला कलिंगसम्राट अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.
ए.उ.: अहो पण अशोकाने तर...

बाबा: (रागाने त्याच्याकडे पाहात, त्याचे बोलणे तोडून जोराने) मी सहाव्या अवतारात चरकसंहिता लिहिली.

भ.को.: (जोरात) बोला चरकसंहितालेखक अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री श्री अग्गोबाबा की जय.

ए.उ.: अहो पण चरक तर...

बाबा: (संतापाने रागाने त्याच्याकडे पाहात, त्याच्याकडे बोट दाखवून दम देत) प्रश्न विचारुन तू शंकराचार्य, आईन्स्टाईन, आर्यभट, सम्राट अशोक, चरक यांचा अपमान करु पाहात आहेस.

भ.को.: होय, होय. तू शंकराचार्य, आईन्स्टाईन, आर्यभट, सम्राट अशोक, चरक यांचा अपमान करतो आहेस.

(ए.उ. ’लेकिन कनेक्सन क्या है भाई?’ विचारु पाहात असतो, भकोभाई 'अग्गोबाबा की जय’च्या गजरात तो प्रश्न दाबून टाकतात नि नंतर त्याला उचलून बाहेर फेकून देतात.)

- oOo -

(’पुरावे मागू नका’ या आगामी नाटकातून)


हे वाचले का?

शनिवार, २ मार्च, २०१९

छोटा शेल्डन आणि छद्मराष्ट्रवाद

SheldonAndPastor

विषयसंगतीमुळे हा लेख काही संस्करणासह ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे. हा लेख इथे वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?