गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना

मागील भाग << माझी ब्लॉगयात्रा - २ : माझी वाटचाल
---

(हा भाग सामान्य तयारीचा आहे. ज्यांना ब्लॉग सुरु करायचा आहे पण त्याबाबत अजिबात माहिती नाही अशांना अधिक उपयुक्त. मी स्वत: ब्लॉगर वापरत असल्याने इथे स्क्रीनशॉट्स त्याचे दिले आहेत.)

Create Blog

सर्वात प्रथम तुम्हाला स्वत:चा असा ब्लॉग पत्ता तयार करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ब्लॉगचे नाव निश्चित करुन त्यानुसार पत्ता तयार करता येईल. उदा. रमताराम या टोपणनावाने मी संस्थळावर लेखन करत असल्याने ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’ हे माझ्या ब्लॉगचे नाव निवडले आणि म्हणून ramataram हा माझा ब्लॉग पत्ता निश्चित केला.

आता हा ब्लॉग तयार करण्यासाठी मी प्रथम ब्लॉगर.कॉम (किंवा तुमचा ब्लॉगसेवादाता जो असेल तो) वर लॉगिन केले. (गुगलचा फायदा - आणि कदाचित तोटाही - हा की एकदा गुगल लॉगिन केले की ब्लॉगरवरही तुम्ही लॉगिन होता.) आता मी draft.blogger.com वर पोचलो. इथे मी माझा ब्लॉग तयार करणार आहे.

स्क्रीनशॉट पाहिला तर माझे सध्या तीन ब्लॉग दिसतात नि खाली New Blog... पर्याय आहे. त्यावर क्लिक करुन तुम्ही नवा ब्लॉग तयार करता येईल. (तुम्ही सुरुवात कराल तेव्हा वरची यादी अर्थातच कोरी असेल.) त्यात तुम्हाला शीर्षक (माझे: ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’ ) आणि पत्ता (माझा: ramataram.blogspot.com) द्यावे लागतील. आता तुमचा ब्लॉग तयार (create) झाला.

पूर्वतयारी

Theme

ब्लॉग तयार केल्यानंतर पहिला टप्पा असतो येतो ’ब्लॉगर’, वर्डप्रेस वा तुम्ही निवडलेल्या अन्य ब्लॉगमंचाच्या अखत्यारित येणारे पर्याय निवडण्याचा. ब्लॉगची थीम अर्थात एकुण जडणघडण ही ब्लॉग सुरू करताना केलेली पहिली निवड असते.

ब्लॉगर असो वा अन्य सेवादाते ते काही फ्री थीम्स अथवा बांधणीची प्रारूपे तुम्हाला देऊ करतात. (उजवीकडे 'Customize' बटणाच्या खाली पाहा.) या सोप्या बांधणीपैकी एखादी कमी गुंतागुंतीची थीम निवडून सुरुवात करता येईल. यासाठी ’Theme’ वर क्लिक केल्यावर उजवीकडे काही थीम्स दिसतात त्यापैकी एक निवडून तुमच्या ब्लॉगला लागू (apply) करावी. या निवडीला मदत व्हावी यासाठी तिथे Previewची सोय आहे.

एकदा हवी ती थीम निवडली की Customize बटन दाबून थीमसाठी विविध पर्याय मिळतीलया थीममध्ये विविध मगदुराच्या मजकुरासाठी फॉन्ट्सची निवड, रंगांची निवड हा पहिला टप्पा. ब्लॉगच्या शीर्षकासाठी, पोस्टच्या शीर्षकासाठी, पोस्टच्या तारखेसाठी, मुख्य मजकुरासाठी... फॉन्ट निवडण्याचे पर्याय तुम्हाला मिळतात. तुमच्या नजरेला ते पुरेसे आकर्षक वा समाधाकारक दिसतील अशी निवड तुम्ही करु शकता. त्याचबरोबर शीर्षक पार्श्वभूमी, पोस्टची पार्श्वभूमी, ज्यांना विजेट किंवा अ‍ॅड-ऑन्स म्हणतात, अशा सुट्या पण पूरक चौकटींची पार्श्वभूमी, त्यांची सार्‍यांची शीर्षके आदि विविध जागी वापरल्या जाणार्‍या रंगांची निवड करता येते. हा सारा मजकुराच्या बांधणीचा अर्थात थीम (Theme) भाग झाला.

Color and Fonts

यातील Adjust Widths या पर्यायामध्ये तुम्हाला ब्लॉगची एकुण रुंदी, समासांची रुंदी निश्चित करता येईल, तर Advanced पर्यायामध्ये रंग, फॉन्ट वगैरे निश्चित करता येईल. तुम्हाला हवी ती रंगसंगती आणि फॉन्ट निवडला की उजवीकडे ताबडतोब दिसेल. तो समाधानकारक दिसला की आपली निवड करुन पुढे जाता येईल.

महत्त्वाचे: इथे दिसणारे पर्याय तुमच्या सुरुवातीच्या थीमच्या निवडीनुसार वेगळे असू शकतात. परंतु ब्लॉगची रुंदी, रंग नि फॉन्ट हे मात्र सर्वच थीम्समध्ये निवडता येतात. काही थीम्स तुमच्या विजेट्स अथवा गॅजेट्ससाठी देखील काही बदलांची मुभा इथे देऊ शकतात.)

Layout

तुमच्या ब्लॉगवर तुम्ही लिहिता त्या पोस्ट्सखेरीज अन्य काही गोष्टी समाविष्ट करणे वाचकाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. या अत्यावश्यक नसल्या तरी उपयुक्त असतात. त्यात ब्लॉगमध्ये समाविष्ट असलेल्या पोस्टची सूची, विषयवार वर्गवारी, तुमचा ब्लॉग इतरांना सबस्क्राईब करण्याचा पर्याय, लेखकाबद्दल थोडी माहिती अशा काही वरकड गोष्टींचा समावेश होतो. तुमच्या ब्लॉगमधीन लेखनाची जातकुळी ध्यानात घेऊन आणखी काही उपयुक्त गोष्टी इथे देता येतात. हे सारे सामान्यपणे ज्यांना विजेट (widget) किंवा गॅजेट (Gadget) म्हटले जाते त्यांच्या स्वरूपात दिले केले जाते. आणि हे प्रामुख्याने स्तंभ अथवा कॉलममध्ये समाविष्ट होते.

त्यामुळे आता मांडणीचा(Layout) विचार करावा लागतो. यात ब्लॉगमधील पोस्ट्स एकाशेजारी एक दिसणार्‍या टाईल्ससारख्या दिसाव्यात की एकाखाली एक, समास एक असावा की दोन, एक असला तर डावीकडे असावा की उजवीकडे, ब्लॉगरील पोस्टची यादी कशा स्वरूपात दाखवावी, वर्गीकरण (categories/ tags) कशा दाखवावे वगैरेंची निवड येते. वरील तीन पर्यायांपैकी दोन आपण आधीच वापरले आहेत. आता मधला, म्हणजे Layout हा पर्याय वापरला जाईल.

या पर्यायांपैकी काही पर्याय हे तुम्ही सुरुवातीला निवडलेल्या थीमवर अवलंबून राहतील. उदाहरणार्थ तुम्ही जर समोर एकाखाली एक अशा सर्व पोस्ट दाखवणार्‍या थीमऐवजी एकाशेजारी एक चौकटींच्या () स्वरूपात पोस्टस दाखवणारी थीम निवडली असेल तर इथे समासांचे काही पर्याय उपलब्ध असणार नाहीत. यासाठी थीमची निवड प्रथम आणि मांडणी त्यानंतरच करावी लागेल. मांडणीची निवड केल्यानंतरही पाहून ब्लॉग आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसतो का याची खातरजमा करुन घेणे गरजेचे असते.

Edit Theme

वर आपण थीमशी संबंधित रंग, फॉन्ट वगैरेंच्या निवडीसाठी Customize बटण दाबून पुढे गेलो होतो. पण तिथे दिलेल्या पर्यायांपलिकडे तुम्हाला बदल करता येत नाहीत. त्या पलिकडे अनेक गोष्टी थीमचा भाग असतात. त्या बदलण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग अथवा कोडिंगचा आधार घ्यावा लागतो. या पर्याय फक्त प्रोग्रामिंगबाबत पुरेशी माहिती असणार्‍यांनीच वापरावा. कारण थीम आणि मांडणी हे तुमच्या पोस्टच्या मजकुरासह अखेरीस एकत्र होऊन ब्राउजरमध्ये येत असल्याने, एका भागात झालेली चूक पुढे इतरा विभागातही अनपेक्षित परिणाम घडवू शकते. तुम्ही प्रोग्रामिंगचा वापर करु इच्छित असाल तर Customize बटणालगत असलेले त्रिकोणी बटण दाबले तर Edit HTML हा पर्याय मिळत. त्याचबरोबर थीमचा बॅक-अप आणि मोबाईलसाठी असलेल्या वेगळ्या थीममध्ये बदल करण्यास काही मोजके पर्यायही उपलब्ध होतात. प्रोग्राम अथवा कोडमध्ये बदल करु इच्छिणार्‍यांनी Edit HTML या पर्यायाचा वापर करावा.

पुढच्या टप्प्यात ब्लॉग-सेटिंग्स निवडायची आहेत. या ब्लॉगचे शीर्षक (माझे ’रमतारामाचे विश्रांतीस्थळ’), भाषा निवडता येते. मी मराठी निवडली असल्याने दिनांक, वार, अनेक विजेट्सची शीर्षके (उदा. category ऐवजी वर्गवारी) तळाशी Author ऐवजी लेखक...वगैरे थीमशी संबंधिक बहुतेक मजकूर हा मराठीमध्ये दिसू लागतो.

Settings

याशिवाय तुम्हाला ब्लॉगचे संपादक आणि लेखक कोण याची निवड करता येते. एका ब्लॉगवर एकाहुन अधिक व्यक्ती लेखन करु शकतात. हे सर्व लेखक म्हणून समाविष्ट होतात. तर ब्लॉगचा संचालक हा संपादक म्हणून राहतो. याशिवाय लेखनामध्ये काही भाग केवळ सज्ञान व्यक्तींसाठी असेल तर असे लेखन त्यानुसार वर्गीकृत करता येते आणि सेटिंगमध्ये असे लेखन वाचण्यासाठी वयाचे निर्बंध घालता येतात.

तुमचे स्वत:चे असे संस्थळ नाव (उदा. www.ramataram.com) खरेदी केले असेल ते नाव तुमच्या ब्लॉगला पर्यायी नाव म्हणून जोडता येते. जेणेकरुन कुणी त्या संस्थळाला भेट देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची वाट वळवून तुमच्या या ब्लॉगवर आणून पोहोचवली जाते. म्हणजे स्वतंत्रपणे विकसित न करता, त्यासाठी जागा (storage) विकत न घेता, तुमचे संस्थळ चालू होते. या खेरीज तुमच्या पोस्टस कुणाला दिसाव्यात, त्यावर कुणाला टिपण्णी (comment) करता यावी (किंवा कुणाला करता येऊ नये) काही मंडळी प्रोग्रामद्वारे तुमच्या ब्लॉगवर ढवळाढवळ करु नयेत म्हणून कॅप्चा (Captcha) नामे संरक्षक टप्पा असावा की नसावा, ईमेलद्वारे लेखकांना लेखन थेट पोस्ट करता यावे की नाही, वाचकांनाही ईमेलद्वारे कमेंट पाठवता याव्यात की नाही... असे अन्य पर्यायही निवडता येतात.

यात एक महत्वाचे सेटिंग आहे ते फीडचे (Site Feed). याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. पण तुमच्या मजकुराची सुरक्षिततेला तुम्ही महत्त्व देणार असाल, तर हे सेटिंग तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तुम्ही सबस्क्राईब पर्याय देणार असाल, तर इथे काळजी घेणे गरजेचे आहे. नव्या पोस्टच्या सूचनेबरोबर त्यातील मोजकाच मजकूर ईमेलद्वारे पाठवला जाईल याची काळजी इथे घेता येते.

या पलिकडे ब्लॉगवर किती पाने (Pages) असावीत याची निवडही करता येते. सुरुवात करताना कुठल्याही मांडणी(Theme) मध्ये ’मुख्यपृष्ठ’(Main Page) या नावाचे एक पान तयार असते. या पलिकडे आवश्यक वाटल्यास आणखी पाने तयार करता येतात. मला स्वत:ला या पर्यायाची उपयुक्तता फारशी समजली नाही. त्याऐवजी मी ’लेबल’ अथवा वर्गवारीचा वापर करुन, त्यातील मोजकी लेबल ही मांडणीत वरच्या बाजूला पृष्ठांप्रमाणे जोडली आहेत..

लेखन आणि लेखनसाहाय्य

ब्लॉगचा मुख्य भाग म्हणजे पोस्ट जी प्रामुख्याने लेखन स्वरूपात असते. त्यातही माफक फॉरमॅटिंग करण्यास ब्लॉगरने (आणि इतर ब्लॉगमंचांनी) वाव ठेवला आहे. त्यापलिकडे तुम्हाला HTML टॅग वापरण्याची माहिती असेल, तर बरेच अधिक स्वातंत्र्य घेता येते. पण ते पुढे तांत्रिक मुद्द्यांसंदर्भात येतेच आहे. साधारणपणे फॉंट्चा प्रकार, आकार, वजन (बोल्ड, तिरपा ठसा, अधोरेखा वगैरे) वगैरे सोबतच शीर्षक, उपशीर्षकांसाठी वेगळ्या फॉरमॅटिंगची सोय आहे. शब्दांचा रंग आणि मजकुराच्या पार्श्वभूमीचा रंगही मोजक्या पर्यायांतून निवडता येतो. एखाद्या शब्दाला वा शब्दसमूहाला अधिका महितीसाठी संदर्भ म्हणून हायपरलिंकही (hyperlink) जोडता येते. माझ्या मते सर्वसाधारण ब्लॉगलेखकांसाठी इतके पुरेसे होते.

मायक्रोसॉफ्ट वर्ड वा तत्सम बाह्य एडिटरमध्ये तुम्ही मजकूर तयार करुन पोस्टच्या एडिटरमध्ये पोस्ट केला तर दोन एडिटर्समधील सेटिंगमधील फरकामुळ पोस्टची मांडणी बिघडू शकते. ब्लॉगरमध्ये हे टाळण्यासाठी बाहेरून पेस्ट केलेला मजकूर सिलेक्ट करुन ’रिमूव्ह फॉरमॅटिंग’ पर्यायाचा वापर करावा. पोस्ट संपादकाच्या (Editor) मेन्यूच्या शेवटी ’...’ दिसतात. ते क्लिक केल्यावर काही जास्तीचे पर्याय दिसू लागतात. या इंग्रजी T हे अक्षर आणि त्याला खोडणारी तिरपी रेष दिसते. हे बटण दाबून निवडलेल्या मजकुराचे फॉरमॅटिंग काढून टाकता येते.

त्या पलिकडे तुम्हाला पोस्ट बनवण्यासाठी स्वत:ची अशी templates वा आराखडे तयार करुन समाविष्ट करता येतात. उदा. कवितेची पोस्ट करण्यास एक आराखडा तर गद्य पोस्टसाठी दुसरा वापरता येऊ शकतो. असे एकाहुन अधिक आराखडे तुम्ही थीममध्ये साठवून ठेवले असतील, तर नवी पोस्ट तयार करताना त्यातील एक निवडता येतो. मी स्वत: कवितेसाठी एक आराखडा तयार करुन ठेवला आहे तर पुस्तकातील वेच्यांसाठी, त्या अनुषंगाने केलेल्या लेखनासाठी दुसरा आहे. अर्थात यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंगची प्राथमिक माहिती हवी. नसेल तर इथे पास द्यावा.

आपण वृत्तपत्रे वाचतो, तेव्हा पुरवणीमधील अनेक लेखांसोबत तसंच मुख्य प्रतीमधील अनेक बातम्यांसोबत फोटो, रेखाचित्रे असतात. यात काही थेट मजकुराशी संबंधित असतात (उदा. बातम्यांसोबत असणारे एखाद्या कार्यक्रमाचे फोटो) तर काही प्रातिनिधिक, मुद्दा अधोरेखित करण्यासाठी जोडलेले असतात. अनेकदा सलग लेखन हे कितीही उत्तम असले, तरी त्यात एकप्रकारचे एकारलेपण (monotony), कंटाळवाणेपण येत जाते. त्यामुळे सोबत जोडलेले फोटो वा रेखाचित्रे कंटाळवाण्या प्रवासात रस्त्यावर दिसणार्‍या रंगीबेरंगी जाहिरातफलकांसारखे काम करतात. डोळ्यांना जागे ठेवतात.

लेखन पुरे झाल्यावर त्याला सुसंगत अशी चित्रे, फोटो, रेखाचित्रे, भाष्यचित्रे शोधणे हा पहिला टप्पा असतो. अनेकदा असे होते, की अशा इमेजेस सापडतात, पण त्यावर वॉटरमार्क टाकून व्यावसायिक वापरासाठीच राखून ठेवलेल्या दिसतात. हौशी लेखनासाठी वापरता येतील अशा मर्यादित उपलब्ध इमेजेसमधून हव्या तशा इमेजेस मिळाल्या, की पुढची समस्या असते ती त्यांचा आकार, रेझोल्युशन म्हणजे रंग-पोत यांची खोली आणि पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राउंड.

सुदैवाने इमेजेसचा मूळ आकार ब्लॉगपोस्टमध्ये बदलणे बर्‍यापैकी सोपे असते. अशा इमेजेस पोस्टमध्ये अडकवताना किंवा नंतरही स्मॉल, मीडियम, लार्ज आणि एक्स्ट्रा लार्ज अशा चार प्रकारात ती रिसाईझ करता येते. तुम्ही HTML कोडमध्ये शिरण्याचे धाडस कराल, तर तुम्हाला अगदी नेमक्या आकारातही ती बसवता येते. निव्वळ मूळ इमेजच्या आकाराच्या प्रमाणातच कमी-जास्त न करता तुमच्या ब्लॉगच्या मांडणी(layout) आणि फॉन्ट यांना सुसंगत असा आकार तुम्हाला ठेवता येतो.

अनेकदा असे होते की चित्राची/रेखाचित्राची पार्श्वभूमी पांढरी असते, किंवा अशा रंगाची असते जो तुमच्या ब्लॉगच्या पार्श्वभूमी म्हणून तुम्ही निवडलेल्या रंगाशी अथवा इमेजशी विसंवादी दिसतो. याने लेखाच्या एकसंधतेला बाधा येते. अशा वेळी, शक्य असेल तर, अशा चित्रांची पार्श्वभूमी 'पारदर्शक' करण्याचा निर्णय मी घेतो. अर्थात मूळ चित्र किती गुंतागुंतीचे आहे यावर हे साध्य होईल की नाही ते अवलंबून असते. असे करण्याचा आणखी एक फायदा असा की भविष्यात तुम्ही आपल्या ब्लॉगची रंगसंगती बदललीत, तर मागे जाऊन या जुन्या पोस्टस्‌मधील इमेजेसची पार्श्वभूमी त्या नव्या रंगाला अनुकूल करत बसण्याची किचकट प्रक्रिया टळते. ही चित्रे, रेखाचित्रे, भाष्यचित्रे नव्या रंगसंगतीशी आपोआप जुळवून घेतात.

काही वेळा फोटोऐवजी एखादा व्हिडिओ तुमच्या लेखनाला चांगला उठाव देऊ शकतो. किंवा लेखनच त्या व्हिडिओबाबत वा फोटोसंदर्भात असू शकते. (’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर असे बरेच लेखन सापडेल.) मजकूर, फोटो, इमेजेस (ज्यात ग्राफ, रेखाचित्रे वगैरे सारे समाविष्ट होते), ऑडिओ वा व्हिडिओ आणि संदर्भासाठी लिंक्स यांच्या मदतीने तुमचे लेखन अधिक परिपूर्ण करता येते.

(गुगलच्या) ब्लॉगरचा फायदा असा की त्या ब्लॉगवर वापरलेल्या इमेजेस, फोटो हे थेट तुमच्या नावे असलेल्या गुगलच्या फोल्डरमध्ये साठवले जातात. तो फोल्डर तुम्हाला स्वतंत्रपणेही एडिट करता येतो. शिवाय बॅकअप घेताना ब्लॉगर तुमच्या पोस्टसोबत त्या इमेजेसही घेऊन येतो. समजा काही पोस्टस तुम्ही काढून टाकल्या तरी या इमेजेस इथे राहतात. तुम्हाला आवश्यक वाटल्यास त्या थेट गुगलच्या 'ब्लॉगर कंटेंट फोल्डर'मध्ये जाऊन डिलीट करता येतात. उलट दिशेने बर्‍याच इमेज एकदम अपलोड करुन ठेवून भविष्यातील ब्लॉगपोस्ट्समध्ये वापरण्याची सोय करुन ठेवता येते.

दुर्दैवाने व्हिडिओंचे तसे नाही. यू-ट्यूब हे गुगलचेच अपत्य असले तरी व्हिडिओंना जागा अधिक लागते. त्यामुळे जेमतेम १५ जीबी फुकट डेटामध्ये तुमच्या ईमेल, फोटो, डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स (एक्सेल), प्रेजेंटेशन्स या सार्‍यांसोबत व्हिडिओनी व्यापलेली जागाही मोजली जात असल्याने जागेची चणचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओंचा वापर जपूनच करावा लागतो. एक पर्याय म्हणजे अन्य कुणी यू-ट्यूबवर अपलोड केलेला मिळताजुळता व्हिडिओ वापरता येतो. त्याची साठवणुकीची जागा मूळ मालकाच्या कोट्यातून वापरली जात असल्याने आपली बचत होते. पण...

उद्या त्या मालकाने, यू-ट्यूबने वा अन्य कुणी तो डिलीट केला तर लिंक तुटते. यावर उपाय म्हणून असे व्हिडिओ मी माझ्या संगणकावर उतरवून ठेवतो. समजा मूळ ठिकाणाहून तो नाहीसा झाला तर माझ्या कोट्यातून तो नव्याने अपलोड करुन लिंक दुरुस्त करता येते.

आता लेखन पुरे झाल्यानंतरचा पुढचा टप्पा. एका ब्लॉगवर अनेक पोस्ट्स झाल्यानंतर हवी ती शोधणे सुलभ व्हावे, तसेच विषयांनुसार त्यांचे वर्गीकरण करता यावे, त्यांना एकत्र करता यावे, म्हणून प्रत्येक पोस्टला टॅग(tag) किंवा कॅटेगरीज(categories) चिकटवता येतात. उदा. कविता, राजकीय, चित्रपट, संस्कृती वगैरे. त्याचबरोबर पोस्ट ज्या HTML फाईलमध्ये स्टोअर केली जाते, त्याला संदर्भ स्पष्ट करणारे नावही निवडता येते.

साधारणपणे बहुसंख्य ब्लॉगर इथे थांबतात.

(क्रमश:)

पुढील भाग >>माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा