मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ०३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - २ : आताच हे मूल्यमापन का? << मागील भाग
---

आपल्या विचारसरणीला सुसंगत असेल असा राजकीय पर्याय निवडण्यात गैर काहीच नाही. परंतु हा निर्णय घेताना, नव्या क्षेत्रात पाऊल टाकताना त्या क्षेत्राचे, त्या खेळाचे नैतिक, अनैतिक, ननैतिक नियम, त्यांची व्याप्ती, त्या क्षेत्रात उतरताना आवश्यक असलेली किमान माहिती, आपल्या कुवतीचे रास्त मूल्यमापन, त्याच्याआधारे नव्या क्षेत्रात जास्तीतजास्त काय साध्य करता येईल याचे भान, आपल्या विरोधकांची बलस्थाने नि कमकुवत बाजूंचा अभ्यास नि त्याचा यथाशक्ती सामना करण्यास आवश्यक असलेली धोरणे नि स्ट्रॅटेजी किंवा आराखडा हे सारे सारे आवश्यक असते याचे भान असायला हवे.

'जनताच आमचा निवाडा करेल' ही घोषणा आकर्षक वगैरे असली तरी राजकीय पटलावर त्याचा काडीचा उपयोग नसतो याचेही भान असणे गरजेचे. अशा घोषणा करत आपण जनतेच्या पाठिंब्यावर वगैरे निवडून आलो असा दावा करणारे प्रत्यक्ष विजयासाठी वेगळीच हत्यारे, आयुधे, धोरणे वापरत असतात हे उघड गुपित आहे. तेव्हा हा नवा मार्ग निवडताना आपण तिथे आलो म्हणून तिथले सारे नियम, मानदंड ताबडतोब बदलून आपल्या सोयीचे होतील अशी भ्रामक अपेक्षा न बाळगता त्यातील खाचाखोचा, त्या खेळाचे नियम, नियमबाह्य शक्यता नि त्यांपासून संरक्षणाचे मार्ग या सार्‍याचा अभ्यास नाही तरी किमान माहिती करून घेणे आवश्यक नि अपेक्षित असतेच.

याशिवाय एकदा का आपली संघटना वा आपले वैयक्तिक सामाजिक स्थान आपला गट अशा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला की त्याच्या गुणावगुणाची, पापपुण्याची जबाबदारी आपल्यावर येते, ती टाळता येत नाही. त्यामुळे असा पर्याय निवडताना ज्याची निवड आपण करतो आहोत त्याची एक दखलपात्र राजकीय फोर्स म्हणून उभे राहण्याची कुवत वगैरे सारी अनुषंगे तपासून ही निवड होणे अपेक्षित होते. अन्यथा मग निर्णय चुकला तरी त्याचे समर्थन करण्याचे, त्याच्याबरोबर फरफटत जाण्याचे दुर्भाग्य भाळी येते.

राजकारणातील काही अपरिहार्यता, काही व्यावहारिक धोरणे कदाचित सैद्धांतिक पातळीवर अस्वीकारार्ह वाटली तरी काही वेळा तात्पुरती तडजोड म्हणून स्वीकारावी लागतात याचे भान असायला हवे. तत्त्वाला प्रसंगी मुरड घालून व्यवहार्य पर्याय स्वीकारणे अनेकदा अपरिहार्य ठरते. अर्थात हे आजच्या राजकारण्यांना सांगायची गरज उरलेली नाही. हे तत्त्व तर बहुतेक लोकांनी पुरेपूर आत्मसात केले आहेच. परंतु याचबरोबर हे जोखड केव्हा उतरून टाकायचे, त्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार व्हावी यासाठी काय पावले टाकावी लागतील याचा विचार, आराखडाही तेव्हाच तयार करायला हवा.

हिंदुत्ववादी अजेंडा राबवणार्‍या भाजपने प्रसंगी जनता दल, समता पक्ष, जनता दल (संयुक्त), मायावतींचा बसपा, बिजू जनता दल वगैरे सैद्धांतिक दृष्ट्या दुसर्‍या टोकावर असणार्‍यांना जवळ केले, परंतु हे करत असताना आपल्या मूळ अजेंड्याला, मूळ गाभ्याला धक्का लागू न देण्याचे भान राखले, आपल्या पक्षाचा विस्तार अशा युत्यांमुळे खुंटणार नाही याची सतत काळजी घेतली. कदाचित हे सारे संघाचा अंकुश असल्यानेही घडले असेल. कारण काहीही असो, अशा सहकार्यातून भाजप वाढला नि अनेक सहकारी पक्ष क्षीण होत गेले ही वस्तुस्थिती आहे.

समाजवादी नेमक्या उलट बाजूला असल्याने आणि एकदा व्यवहार्य भूमिकेच्या घसरगुंडीवर बसल्यानंतर लावायला ब्रेकच न उरल्याने केवळ सत्तालोलुप तडजोडी करत सत्तांध लोकांचे आश्रित होऊन राहिल्याचे पाहणे आपल्या नशीबी आले. गोव्यात 'मगोप' नामशेष झाला, मध्यभारतातून जनता दल अस्तंगत होऊन तिथे शत-प्रतिशत भाजप पाय रोवून उभा राहिला. बिजू जनता दलाने नि ममतादीदींच्या तृणमूलने वेळीच साथ सोडून 'एकला चालो रे' धोरण स्वीकारल्याने ते बचावले. जनता दल (सं.) मात्र याबाबत दुर्दैवी ठरला.

(क्रमशः)

पुढील भाग >>  समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ४ : 'आप' च्या मर्यादा


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा