रमापद चौधुरीची कथा वाचत होतो...
रेल्वे लाईनवरचं कुणी एक गाव, गावाजवळ लहानसं स्टेशन. स्टेशनचं नि गावाचं नाव महत्त्वाचं नाही कारण तो रेल्वेचा स्टॉप 'अंडा हॉल्ट' म्हणूनच प्रसिद्ध. गाव तसं चार गावांसारखं, मुख्य रोजगार शेतीच. पण गावात सार्यांकडेच कोंबड्या. युद्ध सुरू झाल्यापासून युद्धकैद्यांची वाहतूक करणार्या गाड्या ये-जा करू लागल्या नि गावाला नवा रोजगार मिळाला, युद्धकैद्यांसाठी ब्रेड-अंड्यांचा ब्रेकफास्ट तयार करण्याचा! गाडी येण्याच्या आदल्या दिवशी रात्री गावची सारी अंडी जमा करून उकडून तयार ठेवायची नि गाडी येतात सार्या युद्धकैद्यांना तो ब्रेकफास्ट द्यायचा हे काम.
एके दिवशी त्या युद्धकैद्यांवर पहारा करणार्या सैनिकाने खुश होऊन एक अधेली भिरकावली युद्धकैद्यांना कुतूहलाने पहायला आलेल्या गावकर्यांकडे, बक्षीसी म्हणून. गाव दचकलं. हे काय आक्रीत म्हणे? पण एक चलाख पोरगं सरळ रेल्वे कुंपण ओलांडून गेलं नि ती अधेली खिशात घालून आनंदाने निघून गेलं. दुसर्या वेळी त्याच्या जोडीला आणखी एक दोस्त होता. लोक हसून त्यांची गंमत करत नि सोडून देत. पण हळूह़ळू लोकांची संख्या वाढली. शिपायांनी फेकलेली चार नाणी हस्तगत करण्यासाठी ते झोंबी घेऊलागले. त्यांच्याकडे पहात शिपाईही खिदळू लागले. थोड्या पैशात त्यांनाही मनोरंजनाचा खेळ मिळून गेला.
पण गावचा म्हातारा पाटील खवळला. काळी माय पोटभर देत असता असे हात पसरणे त्याला अपमानास्पद वाटत होते. प्रथम त्याने त्या पोरांना सुनावले. पण त्यांनी म्हातार्याकडे दुर्लक्ष केले. त्या पोरांबरोबर आणखी लोक तिथे उभे राहू लागले नि म्हातारा वैतागला नि स्टेशनवर येईनासा झाला. गाडीकडे डोळे लावून बसणार्या लोकांची संख्या आणखी वाढली. स्टेशनकडे लोक रेंगाळू लागले, मास्तरकडे लोक पुढची गाडी कधी येणार याची चौकशी करू लागले. गाडी येताच हात पसरून 'साब, बक्षीस, बक्षीस' म्हणून ओरडू लागले. बहुधा गावात पाटील एकटाच शेतावर राबत राहिला.
आणखी काही दिवस गेले. आता सारा गाव 'बक्षीशीवर' जगू लागला. शेती ओसाड झाली. निव्वळ हात पसरून पोट भरता येते हे समजलेले गावकरी आता कष्ट करीनासे झाले. अशाच एका दिवशी म्हातारा पाटीलही 'साब, बक्षीस, बक्षीस' म्हणून ओरडणार्या गर्दीत दिसू लागला. त्याचे सारे कष्टकरी बांधव बक्षीसीच्या गर्दीत हरवल्याने त्याला एकट्याला शेती करणे अव्यवहार्य होऊन तो नाईलाजाने तिथे सामील झाला असावा असा तर्क मी केला.
काही दिवस गेले. युद्ध संपले, जगले वाचले युद्धकैदी आपापल्या देशी निघून गेले. आता अंडा हॉल्टवर थांबणारी गाडी येईनाशी झाली. अचानक सारे गांव 'बेरोजगार' झाले. सारे लोक 'भिकारी' झाले !
कथा विलक्षण मार्मिक. चौधुरींनी कधी लिहिली ठाऊक नाही. पण सद्यस्थितीला इतकी समर्पक कथा, इतकी सुंदर अॅनालजी दुसरी सापडणार नाही. मलाही दिसतात अनेक लोक, कुठल्याशा अनामिक गाडीची वाट पाहणारे. कुणी तिला विकासाची गाडी म्हणतात, कुणी फॉरिन इन्वेस्टमेंट म्हणतात इतकेच. कष्ट करण्याची कुवत असलेल्या हातांना ते टाकून परदेशी पैशावर जगायची सवय लावणारी ही गाडी. ती यावी म्हणून स्टेशनमास्तरांना पुन्हा पुन्हा विचारात राहणारी ती गर्दी. बक्षीसी मिळावी म्हणून अजाणता का होईना युद्धकैदी ही जमात अस्तित्त्वात असावी अशी मनातल्या मनात इच्छा धरून असणारी. मी ही वाट पाहतोय... मलाही त्या भाउगर्दीत सामील होण्याची वेळ कधी येते आहे याची. कुणास ठाऊक अधेमधे येते की त्या म्हातार्या पाटलासारखी अखेरीस.
चौधुरींनी कथेचे शीर्षकही तितकेच मार्मिक दिले आहे...'भारतवर्ष'!
- oOo -
(’ऑल हेल किंग ज्युलियन’ नावाच्या एका मालिकेत लहरी राजाने 'चलन' नावाचा कागद निर्माण केल्यानंतर निसर्गातून हवे ते अन्न खाऊन जगणारे लेमर्स हळूहळू भुकेकंगाल कसे होत गेले यावर एक सुरेख भाग पाहण्यात आला होता.)
व्वा! अत्यंत मार्मिक नि कालसुसंगत!
उत्तर द्याहटवा