गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ७: अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

रंगांचे कोडे << मागील भाग
---

बिम्मच्या पतंगावरून आतापावेतो झालेल्या प्रवासामध्ये त्याने प्रतिबिंब, सावली, पक्षी, रंग, फळे यांच्या संदर्भात निरीक्षण-शक्तीचा उपयोग केला आहे. त्याद्वारे भवतालाचे आकलन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या सर्व टप्प्यांमध्ये तो केवळ निरीक्षक आहे, जिज्ञासू आहे. त्याची भूमिका अकर्मक आहे. भवतालावर परिणाम घडवणारी कोणतीही कृती त्याने अद्याप केलेली नाही. निरीक्षणांकडून अनुकरणाकडे जाण्याची, अकर्मकता झाडून सकर्मक होण्याची, कृतीप्रवण होण्याची वेळ आता आलेली असते.

आयुष्याचा प्रवास बिम्म जेव्हा सुरु करतो तेव्हा स्वत:हून केलेली पहिली कृती असते ती पहुडल्या ठिकाणी पालथे पडणे. ही पहिली कृती घरच्या मोठ्यांकडून नावाजली गेली आणि त्यातून भवतालाकडे पाहण्याचा - शब्दश: - वेगळा दृष्टिकोन मिळतो हे उमगले की त्याला स्वावलंबी आयुष्याची चाहूल लागते. त्यातून स्वप्रेरणेने आणखी काही कृती करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात. मग यथावकाश उठून बसणे, रांगणे, पलंग वा खुर्चीसारख्या एखाद्या भक्कम वस्तूला धरून उभे राहणे, त्यानंतर तो आधार न सोडता पाऊल पुढे टाकणे नि अखेर केवळ स्वत:च्या पायांचा भरवसा धरून तो आधारही सोडून चालू लागणे, ही माणसाच्या पिलाने स्वावलंबी आयुष्याकडे टाकलेली पहिली काही पावले.

पण निव्वळ स्वप्रेरणेपलिकडे बाह्य प्रेरणेनेही ते काही कृती साधू लागते. आपले बोट, खुळखुळा वा pacifier यांसारख्या गोष्टी आई-वडील त्याच्या हाती देत असतात. मग त्या प्रेरणेने पालथे पडलेले असताना समोरचे खेळणे वा अन्य काही पकडण्याचा प्रयत्न करते. ते मूल बसते झाल्यावर आई-वडीलही फळांच्या फोडी वा तत्सम हाती पकडता येतील असे खाद्यपदार्थ त्याच्यासमोर ठेवून ते स्वहस्ते खाण्यास उद्युक्त करतात. मग ते मूल हाती सापडेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करू लागते. भुकेचा निरास हे एकमेव सुख तोवर त्याच्या जाणीवेच्या कक्षेमध्ये आलेले असते आणि हे सुख तोंड या अवयवामार्फत साध्य होत असते. त्यामुळे जे आवडते त्याचा आस्वाद तोंडाने घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होतो. सुख मिळवण्यासाठी ती एकच कृती त्याला ठाऊक असते. जे आवडेल ते सारे त्या कृतीच्या कक्षेत आणून आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात असतो.

समोर येईल ती गोष्ट तोंडात घालण्यास सुरुवात झाली, की तिची जिभेला जाणवलेली चव किंवा आई-वडिलांनी त्याला दिलेले प्रोत्साहन वा केलेला प्रतिरोध यातून काय तोंडात घालावे नि काय नाही याची समज विकसित होत जाते. पुढे बरेच मोठे नि कमावते झाल्यावर आवडलेल्या वस्तूचे स्वामित्व मिळवण्याची- ती विकत घेण्याची वा इतर कुणाकडून हिरावून घेण्याची प्रवृत्ती ही मूलपणातील काहीही आवडले की उचलून तोंडात घालण्याचा प्रयत्न करण्याची आवृत्ती म्हणावी लागेल. कारण तोवर स्वामित्व मिळवणे ही कृती सर्वाधिक सुखाचा स्रोत म्हणून मनुष्यप्राण्याने निश्चित केलेली असते.

हे बसते-रांगते मूल बिम्मच्या वयात येते- म्हणजे चालू-बोलू लागते, घराचे कुंपण ओलांडून बाह्य जगाची ओळख करून घेऊ लागते, तेव्हा त्याच्या ज्ञानकक्षा रुंदावतात. आता निव्वळ प्रेरणेपलीकडे जाऊन जाणीवपूर्वक काही कृती ते करू लागते. पहिली कृती ही स्वतंत्र विचारातून न येता अनुकरणातून येत असते आणि अनुकरणाआधी निरीक्षण आवश्यक असते. निरीक्षण हे प्रामुख्याने आपल्यासारख्या दोन हात नि दोन पाय असलेल्या जीवांचे - प्रामुख्याने कुटुंबातील व्यक्तींचे - केले जात असते, तसेच आसपासच्या जीवमात्रांचे, निर्जीव वस्तूंचे, घटनांचेही. त्यातून माहिती, साधर्म्यसंगतीचे भान आणि अखेरीस आकलन या मार्गाने प्रवास होत जातो.

डोळे, नाक, कान, जिंव्हा आणि स्पर्श या पाच ज्ञानेंद्रियांच्या आधारे आकलनाचा प्रवास बिम्मपणात पाऊल ठेवण्याच्या बराच आधी सुरू झालेला असतो. मूल पालथेही पडत नसते तेव्हा त्याचे डोळे नि कान भवतालाशी नाते जोडत असते. माणसाच्या संवादी भाषेतील ज्यांना शब्द म्हणून मान्यता आहे असा ध्वनिसमूह त्याच्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच त्याची अभिव्यक्ती कार्यरत झालेली असते. त्याच्या आई-वडिलांना, घरच्या इतर व्यक्तींना अगम्य वाटणार्‍या अशा ध्वनिसमुच्चयातून ती प्रसारित होत असते.

पण त्यातून संवाद प्रस्थापित होत नाही हे ध्यानात आल्यावर इतरांच्या तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु होतो. त्यासाठी आधी इतरांच्या तोंडून ऐकू येणार्‍या या ध्वनिसंकेतांचा अर्थ लावणे सुरू होते. त्यासाठी या मुलांचा मेंदू कार्यरत होतो. मग आई-वडिलांची भाषा नि त्या मुलाची भाषा यांचा द्वैभाषिक संवाद सुरू होतो.

माझी भाची साधारण सहा महिने-वर्षभराच्या वयाची असताना भूक लागली की मँ, अँ अशी स्वरावली तिच्या तोंडून निघत असे. तिकडे लक्ष दिले नाही की आरडाओरडा सुरू होई. ती दंगा करु लागली की आम्ही खाण्याचा आविर्भाव करत विचारायचो, ’मँ का?’ त्यावर ’हो’ या अर्थाचा एक ’अँ’ वा ’हँ’च्या दरम्यानचा उच्चार येई. याचा अर्थ आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे आकलन तिच्या मेंदूद्वारे होत असे आणि आमच्याच भाषेत नाही तरी तिच्या गळ्याला साध्य झालेल्या ध्वनिसंकेतांतून उत्तरही दिले जात असे.

काही वेळा मी मुद्दाम पेडगांवला जाऊन एखादे खेळणे दाखवून ’हे का?’ असे विचारले की हाच उच्चार जरा जोरकस नि पुनरावृत्त होत जाई, साधारणपणे ’अँ हँ हँ हँ...’ असा. त्याचा अर्थ ’नाही’ असा होता. काही वेळा जरा अधिक ताणून धरण्यासाठी आणखी एक-दोनदा हा प्रकार केला असता आवाजाबरोबरच त्याचवेळी हातपाय वेगाने हालचाल करत. याचा अर्थ ’अजिबात नाही’ किंवा ’एकदा सांगितलं ना नाही म्हणून’ असा होता. मग पुन्हा ’मँ का?’ या प्रश्नाला अँ वा हँ ने उत्तर देतानाच त्या सोबत पोट उचलून दुजोरा दिला जाई. म्हणजे ध्वनिद्वारे दिलेल्या उत्तराला शारीर हालचालींनी अधिक ठळक करण्यात येत असे.

या प्रकारे बहुपर्यायी प्रश्नोत्तरे होऊन मुलाला काय हवे ते मोठ्यांना समजू लागते. परंतु मोठी माणसे वापरतात तेच ध्वनिसंकेत भाषा या संज्ञेला पात्र असतात असा आपला समज असतो. हे दुभाष्याखेरीज होणारे दोन भाषांमधले संभाषण आहे हे आपल्याला ध्यानात येत नाही. कारण आई-वडिलांची भाषा अद्याप आत्मसात न केलेल्या मुलाची स्वत:ची अशी भाषा विकसित होऊ लागलेली आहे याची जाणीव आपल्याला होत नसते.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की आजवर कधीही, कुठल्याही प्रकारे परस्परांशी संपर्क न आलेल्या दोन भाषिक समूहातील व्यक्तींमध्ये होणारे संभाषण साधारण असेच सुरू होईल नि हळूहळू संवादाचा पूल बांधला जाईल. संवादाचे हे माध्यम जेव्हा सर्वच सहभागी संवादकर्त्यांच्या आकलनाच्या कक्षेत येते तेव्हाच संवाद सुकर होत असतो. त्यामुळे भाषा ही नेहमीच एका समूहाचे संवाद-माध्यम म्हणून रुजत जाते. त्यामुळे भाषा या संज्ञेला पात्र होण्यासाठी ध्वनिसंकेतांच्या समुच्चय किमान दोन व्यक्तींना आकलनयोग्य असायला हवा. (आयनेस्कोच्या ’र्‍हिनसोरस’मध्ये ’माझी भाषा माझ्याशिवाय कुणालाच समजत नसेल तर तिला भाषा म्हणता येईल का?’ असा प्रश्न बेहॉन्जेला (Berenger) पडलेला आहे.)

मुलाची ही ’भाषा’ त्याला स्वत:ला सोडून इतरांना- अगदी आई-वडिलांनाही उमगत नसल्याने संवादास निरुपयोगी ठरते. ती सोडून त्याला निमूटपणे आपल्या घरातील इतरांची भाषा स्वीकारणे भाग पडते. यथावकाश ते मूल आई-वडिलांना उमगणारा पहिला शब्द उच्चारते. तो बहुधा आई, बाबा, मामा, पापा असा स्वरप्रधान किंवा द्विरुक्तीप्रधान असतो. त्या मुलाने उच्चारलेला तो पहिला कुटुंबमान्य अधिकृत शब्द ठरतो आणि ते मूल ’माणसांत’ आल्याचा जल्लोष होतो. मोठ्यांच्या उच्चारांचे अनुकरण ही त्या मुलाची स्वप्रेरणेने केलेली पहिली ठोस भाषिक कृती म्हणता येईल. त्यानंतर त्या मुलाची प्रगती त्याच मार्गावरून होऊ लागते.

माणसांमध्ये भाषा ही अगदी अमूर्त, अनुपस्थित, वर्तमानापलिकडील गोष्टींबाबतही बोलावे इतपत प्रगत झालेली असली, तरी इतर प्राण्यांतही त्यांच्या आपसांतील संवादास पुरेशी अशी भाषा वा संवाद-माध्यम विकसित झालेले असते. आदिम माणसामध्ये प्राण्यांहून अधिक प्रगत अशी संवाद-भाषा विकसित होत होती तेव्हाच त्याने अभिव्यक्तीला निरपेक्ष पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू केला. अनेक गुंफाचित्रांमधून एक वर्तुळ नि पाच रेषांनी काढलेला मानव, अशाच रेषासमुच्चयाच्या आधारे रेखाटलेले हरीण वगैरे चित्रे सापडलेली आहेत. हा ही अनुकरणाचाच एक मार्ग म्हणता येईल.

इथे ध्वनिसंकेतांऐवजी रेखाटनांचा आधार घेतला आणि हेतू संवादाऐवजी दस्तऐवजीकरणाचा दिसतो. मी हरीण पाहिले, ते मला कसे दिसले त्याला प्रातिनिधिक स्वरूपात मी रेखाटतो नि त्यातून - उदाहरणार्थ - शिकारीचे पाहिलेले दृश्य गुहेच्या भिंतीवर नोंदवून ठेवतो असा त्याचा पहिला माफक हेतू होता. पुढे या रेखाटनांतून निर्माण झालेल्या काही आकृतींची तोंडून निघणार्‍या ध्वनिसंकेतांशी सांगड घालून भाषेला लिपी देण्यात आली. (त्याही पूर्वी काही चित्रांना अंकांचे स्वरूप मिळाले.)

लिपी मिळाली आणि माणसाच्या अभिव्यक्तीची व्याप्ती वाढली. कारण लिखित संवाद साधण्यासाठी दोन्ही - अथवा एकाहुन अधिक - संवादी एकाच ठिकाणी अस्तित्वात असण्याची गरज संपली. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अभिव्यक्तीने माध्यम गुंफा-भिंत, शिळा यांसारखे अचल माध्यम सोडून भूर्जपत्रे, कागद यांसारख्या सुटसुटीत, माणसासोबत सहजपणे स्थलांतर करू शकणार्‍या माध्यमांचा स्वीकार केला. आता अभिव्यक्ती एका वेळी, एका ठिकाणी, तर तिचा ग्राहक, तिचे आकलन व तिचा प्रतिसाद अन्य वेळी, अन्य ठिकाणी अशी किमया साधली गेली. लिपीमुळे नि माध्यमबदलामुळे मनुष्य-संवाद स्थल-कालाच्या बंधनातून मुक्त झाला.

मनुष्यप्राण्याने स्थलकालापलिकडचा पहिला संवाद हा पत्ररूपाने केला होता. असंगत (asynchronous) संवादाचे हे आद्य माध्यम आज वैय्यक्तिक संवादाच्या दृष्टीने बव्हंशी कालबाह्य झालेले असले, तरी व्यावसायिक व प्रशासनिक देवाणघेवाणीसाठी अजूनही वापरात आहे. याचे कारण लिखित दस्तऐवजाला अधिकृततेचा जो दर्जा आहे तो संगणकीय माध्यमांतील दस्तांना अजूनही मिळालेला नाही.

बिम्मचे वडील परगावी राहात. त्याकाळी टेलेफोन हे माध्यमही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. त्यामुळे आई-वडिलांचा संवाद हा प्रामुख्याने पत्रामार्फतच चाले. वडिलांकडून आलेले पत्र नि आईने त्यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र हे बिम्मच्या निरीक्षणाचा भाग होते. आणि अनुकरणाच्या एका टप्प्यावर तो ही वडिलांना पत्र लिहिणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.

TheWokeBaby
स्वत: लिहिलेला घोषणाफलक उंचावणारी सॅम सोरीची मुलगी.

काही काळापूर्वी मला एक हृद्य छायाचित्र पाहायला मिळाले होते. त्यात एक-दीड वर्षांची एक लहान मुलगी पुठ्ठ्यावर ओढलेल्या रंगीबेरंगी रेघोट्यांचा एक फलक घेऊन आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेली होती. हे छायाचित्र एका निषेध मोर्चामध्ये काढलेले होते. त्याच्या मागची कथा अतिशय रोचक होती. सॅम सोरी हा बाप नि त्याच्या पत्नीने आपल्या मुलीच्या हाती तिने स्वत:च रंगवलेला हा फलक दिलेला होता. या दांपत्याने त्या मागची आपली भूमिका पुढे विशद केली. (ती ’जागी झालेली मुले’ या ’वेचित चाललो...’ वरील लेखात वाचता येईल. )

आज संगणकाच्या नि मोबाईलच्या जमान्यात जन्मलेल्या बिम्मना आई-वडील हाताने काही लिहित आहेत, चित्र काढत आहेत हे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे बिम्मच्या आयुष्याचे हे अनुषंग आता जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पण अगदी एक-दीड दशकांपूर्वी मुलांच्या कुतूहलाचा आणखी एक विषय होता तो म्हणजे आईबापाचे अनुकरण करत त्यांचे पेन-पेन्सिल घेऊन कागदावर ‘अब्याश करणे’ किंवा ‘चित्लं काढणे’ या नावाखाली काहीतरी बरबटून ठेवणे. (आता आई-वडिलांचा मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहात बसतात. हे ही अनुकरणच. ) बिम्मही याला अपवाद नव्हता.

परगावी असलेल्या बाबांना आई पत्र लिहिते, तसेच तिकडून बाबांनी लिहिलेले पत्रही येते हे बिम्मने पाहून ठेवले होते. त्यांच्या पत्रातून आईला घरासंदर्भात अनेक गोष्टींबाबत सूचना केलेल्या असत यांची नोंदही त्याने घेतलेली होती. मग एकदा एक कोरा कागद घेऊन त्याने बाबांच्या नावे आईला एक पत्र लिहिले नि लिफाफ्यात टाकून आईच्या हाती ठेवले. तिने ते पत्र उघडले तर त्यात सॅम सोरीच्या त्या छोटीप्रमाणेच आडव्या उभ्या रेघांचे कडबोळे खरडून ठेवलेले असते.

अशा वेळी बहुधा आई बहुधा ‘कामात आहे, नंतर वाचते हां’ वगैरे काहीतरी कारण काढून बोळवण करेल, ते त्यानेच लिहिलेले आहे हे ठाऊक असल्याने उगाचच ‘बाबांचे अक्षर छान आहे’ वगैरे आडवळणी खोटी स्तुती करेल; फारच कामात असेल तर वैतागेल, बिम्मला कामाची खोटी केल्याबद्दल रागे भरेल. पण बिम्मची आई हुशार होती. पत्र कागदावर नाही तर मनात प्रथम उमटते हे तिला ठाऊक होते. कागदावरचे जाऊ द्या, निदान मनातले तरी काढून घ्यावे म्हणून ती आपण कांदे चिरत असल्याने डोळ्यात पाणी आले असल्याने नीट वाचता येणार नाही अशी बतावणी करते आणि म्हणून ‘तूच ते वाचून दाखव बघू.’ असे सुचवते. (सार्‍यांच्या आया इतक्या सुज्ञ झाल्या तर पोरे किती सुखी होतील नाही?)

BabyWritingLetter

त्या पत्रात बाबांनी सारे काही बिम्मबाबतच लिहिलेले असते. ’बिम्मला मागेल त्यावेळी लाडू द्यावा, त्याला त्रास देण्याबद्दल बब्बीला रागवावे, त्याला कुठली कुठली फळे घेऊन द्यावीत, बाहेर जाताना बरोबर न्यावे वगैरे 'ऑर्डर्स' आईला दिलेल्या असतात. वडिलांनी आईला नि आईने वडिलांना पत्र लिहिणे हा त्यांच्या संवादाचा, देवाणघेवाणीचा भाग आहे. पण बिम्मचे पत्र हे केवळ त्याच्या स्वत:च्या संदर्भातच आहे. इतकेच नव्हे तर ते पत्र स्वत: बिम्मने लिहिलेले नाही, बाबांनी लिहिले आहे अशी बतावणी त्याने केली आहे.

थोडा विचार केला तर लक्षात येईल की बाबांनी केलेल्या सूचना आई वाचते, अनेकदा त्यानुसार आई वागते हे एव्हाना त्याच्या लक्षात आले असावे. मग त्यामध्ये बाबांनी बिम्मला हवे ते सारे करण्याची सूचना आईला दिली तर आई त्या पाळेल असा त्याचा अंदाज आहे. आता बाबांच्या नावे आपण आपल्याला हवे ते पदरात पाडून घेऊ शकतो इतपत स्वार्थाची जाणीव त्याला झालेली आहे. आईवडिलांच्या दृष्टीने संवाद-माध्यम असलेल्या पत्राला त्याने स्वार्थ साधण्याचे साधन म्हणून रूपांतरित केले आहे. निरीक्षणातून रुजलेल्या आकलनातून साधनांचा वापर कसा करावा हे बिम्म शिकू लागला आहे.

पेन वा पेन्सिल घेऊन कागदावर काहीतरी खरडणे बिम्मला जमत असले, तरी त्याला आकाराचे ज्ञान अजून झालेले नसते. ते होईल तेव्हाही त्याला कागदावर उतरवणे हे एक वेगळेच कौशल्य असते, जे स्वतंत्रपणे आत्मसात करावे लागते. पण लिपी म्हणजे अनेकांना ओळखता येणार्‍या मोजक्या चित्रांची जंत्री एकापुढे एक मांडून त्यांना अर्थ देणेच असते. त्यामुळे अक्षराआधी ओळख व्हावी लागते ती आकारांची आणि त्यांतून तयार होणार्‍या चित्रांची. आणि आदिमानवाने चित्रे काढण्यासाठी जसे आसपास दिसणारे प्राणी, सजीव व साधने यांची निवड केली तसेच आधुनिक बिम्मच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये ’मॉडेल’ म्हणून घरातील माणसांची वर्णी लागत असते.

एकदा बिम्मने आई आणि बब्बीचे चित्र काढले. माणूस म्हटले की एक डोके नि हातापायांची प्रत्येकी एक जोडी एवढे प्रातिनिधिक रूप तूर्त पुरे असा त्याचा बाणा असतो. पण हे ’चित्रीकरण’ एवढ्यावर थांबत नाही. पूर्वी एकदा खरोखरच्या बेडकीने बब्बीच्या पायावर उडी मारली तेव्हा ती घाबरुन किंचाळली होती हे त्याने ध्यानात ठेवले होते. त्यामुळे ते चित्र अधिक वास्तववादी होण्यासाठी त्याने बब्बीच्या तिच्या पायावर बेडूक काढून ठेवलेला होता. (ते चित्र काय आहे हे आईला नि बब्बीला आधी समजावून सांगावे लागले इतके अप्रतिम होते हा भाग वेगळा.) त्या चित्रातही आपल्या पायावर बेडूक आहे हे समजल्यावर बब्बी पुन्हा एकवार पाय झाडत किंचाळली.

या चित्राची आणखी एक गंमत म्हणजे त्या चित्रात आई बब्बीच्या गुडघ्याइतक्या आकाराची होती. याचे कारण आई आणि बब्बी या दोन स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहतो आहे नि त्यांचे चित्र काढतो आहे. त्या दोघी एकत्रितरित्या एका मोठ्या देखाव्याच्या, वास्तवाच्या भाग आहे याचे आकलन त्याला अद्याप झालेले नाही, आणि झाले असले तरी ते कागदावर उतरवण्याचे कौशल्य त्याला अद्याप आत्मसात झालेले नाही. दोन वस्तू सोबतीने अस्तित्वात असण्यामध्ये असलेले प्रमाणाचे वा गुणोत्तराचे भान त्याच्याकडे अजून नाही. पुढे मोठे झाल्यावर ते झाले तरी ते कागदावर उमटवणे जमेलच असेही नसते. कागदावर वा भिंतीवर मनाला वाटेल तशा रेघा मारण्यापासून सुरू झालेली वाटचाल आकार, प्रमाण, प्रातिनिधिक रूपे, सह-अस्तित्वाची इतर परिमाणे या मार्गाने चालू राहते आणि अखेर अनुकरणाचे अथवा वास्तवाचे बोट सोडून कल्पनेच्या साम्राज्यात प्रवेश करते.

FinalDestination
Credit: Getty Images/Dennis Hallinan

पत्र असो वा चित्र, त्याची वास्तवाशी कुठेतरी सांगड घातलेली असते हे बिम्मला समजते. बाबांच्या नावावर पत्र लिहून स्वार्थ साधण्याचा त्याचा प्रयत्न आईने उधळून लावला होता. पण चित्रात आपल्या पायावर बेडूक बसलेला पाहून बब्बी पुन्हा किंचाळल्याने त्याने चित्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वत:चे चित्र काढून त्याच्या हाती दोन लाडू काढून ठेवले नि ते आईला दाखवले. वास्तवाचे चित्रांत रूपांतर करता येत असेल तर चित्राचेही वास्तवात रूपांतर व्हायला काय हरकत आहे, नाही का? ...आईच्या समंजसपणाने या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळते!

पत्र हे आज्ञार्थक होते, फसवणूक करणारे होते; तर चित्र हे अप्रत्यक्ष विनंती करणारे आणि प्रामाणिक होते. कदाचित म्हणून दोहोंच्या यशापयशाची शक्यताही वेगवेगळी होती हे पुढे मोठे झाल्यावर बिम्मला समजणार असते.


(क्रमश:) पुढील भाग >> पाऊस     

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा