बुधवार, २९ मार्च, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - २ : हा बिम्म आहे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

पहिले पाऊल << मागील भाग

---

HaBimmaAahe
हा बिम्म आहे(https://riseandshine.childrensnational.org/ येथून साभार.)

‘बखर बिम्मची’ हाती घेतल्या घेतल्या ‘बिम्म’ हे कथानायकाचे नाव ऐकूनच वाचक प्रथम बुचकळ्यात पडतो. वाटतं ‘अरे, हे काय नावं आहे?’ पण तुम्हा-आम्हालाच का, बिम्मलाही हाच प्रश्न पडायचा ना, ‘आपले नाव बिम्म का आहे?’ असा. त्यावरचे उत्तर भलतेच मासलेवाईक आहे. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार ‘बब्बीने – त्याच्या बहिणीने – प्रथम आपल्या या भावाला पाहिले तेव्हा ती म्हणाली, ‘हा बिम्म आहे!’ म्हणून त्याचे नाव बिम्म.’

हे पुस्तक वाचायला घेतले आणि या तिसर्‍याच वाक्याने मला खिशात टाकले होते. लहान मुलांचे जग किती सोपे असते. बब्बीला वाटले याचे नाव बिम्म, बस्स ठरले, हा बिम्म! पुढे बब्बीच्या पावलावर पाऊल ठेवत बिम्मने देखील कुत्र्याच्या पिलाला, घोड्याला, पिवळ्या पक्ष्याला अशीच नावे दिली आहेत, नव्हे ‘त्यांची तीच नावे आहेत नि हे मला आधीपासून माहीत आहे’ असा दावा केलेला आहे.

माझी भाची पाच-सहा वर्षांची असताना अशीच इतर बच्चे कंपनीला ‘नावे ठेवण्यात’ आघाडीवर असे. तिच्या नवजात आतेबहिणीला पाहताक्षणीच हिचे नाव ‘रिया’ असे तिने जाहीर करून टाकले होते. आईच्या एका मैत्रिणीच्या मुलीला पाहिल्यावरही हिचे नाव ‘आकांक्षा’ आहे असे तिने आपल्या आईला सांगितले. तिच्यामुळे बब्बी ही अगदी आपल्या घरातलीच आहे असे वाटून गेले.

आणि बब्बीचंच काय ते कौतुक करायचे, पूर्वीच्या काळी नाव ठेवण्याबाबत अति चोखंदळपणा तसाही नव्हता. चार दोन देवांच्या नावातले एक बरेसे निवडले की झाले. ‘पूर्वी आई-वडील मुलांच्या नावाबाबत खल करण्यात वेळ दवडत नसत, ताबडतोब पुढच्या बारशाच्या तयारीला लागत असत.’ असं एके ठिकाणी पुलंनी गमतीने म्हटलंय.

पण खरंच एखाद्याचे नावं ‘बिम्म’ असलं म्हणून काय झालं? नाहीतरी समाज, इतिहास, संस्कृती नि भाषांचे संदर्भ माहीत नसणार्‍या एखाद्याला तुमचे आमचे नाव 'बिम्म' इतकेच निरर्थक वाटेल ना? अनेक नावे आज आपण सर्रास देतो त्यांना केवळ ऐतिहासिक संदर्भ असतात म्हणून ती आपल्याला ‘बिम्म’ या नावाइतकी वैचित्र्यपूर्ण वाटत नाहीत. विचार करून पाहा, भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये ज्याचे नाव प्रथम राम असे ठेवले गेले, तेव्हा ते नाव त्या समाजात ‘बिम्म’ इतकेच वैचित्र्यपूर्ण मानले गेले असेल. अब्राहम हे नावही टेन-कमांडमेंट्सच्या अवतरणापूर्वी असेच अनाकलनीय वाटले असेल.

आता आई-वडील एखादा वैश्विक प्रश्न असल्याप्रमाणे त्यावर खल करतात. बाजारातून ‘१००१ नावे’ वगैरे सारखे पुस्तक आणतात नि त्यातून एखादे अपरिचित असे नाव शोधतात. इथेच न थांबता इंटरनेटवर असल्या नावांच्या याद्या देणार्‍या वेबसाईट्स धुंडाळतात. हे कमी म्हणून काय फेसबुकवर, मराठी संस्थळावर अथवा व्हॉट्स अ‍ॅपवर “ब अक्षराने सुरू होणारी नावे हवी आहेत” असा असे आवाहन करतात. सुदैवाने अजून या पाच नावातून निवडा, यावर वोट करा असा सर्वे चॅनेल्सवरून, अथवा एसेमेमधून अथवा फोनवरून आपले मत नोंदवा असा कौल टाकत नाही एवढे नशीब.

अलिकडच्या एक-दोन दशकांत वारशाने आलेली, प्राचीन संदर्भ असणारी नावे न ठेवता इतर कुण्णाकुण्णाचे नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण नावे देण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. त्यासाठी बहुधा एखादे अनाकलनीय असे संस्कृतोद्भव नावे ठेवण्याचा प्रघात रूढ होतो आहे. एवढ्या सगळ्या आट्यापिट्यातून एखादे नावीन्यपूर्ण नाव शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण अनेकदा हे सगळं मुसळ केरात जातं नि बर्‍याच गमतीजमती घडतात.

‘विखार’ हे नाव ठेवायचे घाटत असलेले ऐकून मी निपचित पडलो होतो. हे त्या पोराचे सुदैव की मला त्याचा अर्थ सांगायची संधी बारशाआधीच मिळाल्याने त्याचा संभाव्य विखार शमला. याउलट ‘शृगाल’ या नावाने मिरवणार्‍या एका पोराची मला कायम कीव वाटत आली आहे. त्याचे दुर्दैव हे की शाळेत नाव घालेपर्यंत कोणीही त्याच्या नावाचा अर्थ त्याच्या दिवट्या आई-बापांना सांगितला नाही. आता जन्मभर ते पोरगे आई-बापांचे नावीन्यपूर्ण नाव ठेवण्याचे खूळ आपल्या माथी मिरवणार आहे. तेच दुर्दैव ‘श्लेष्मा’ नावाच्या एका मुलीच्या वाट्याला आले आहे.

थोडक्यात काय, आमची बब्बी बिचारी शहाणी. तिने आपल्या भावाला पाहिल्या क्षणीच जे वाटले ते नाव ठेवून दिले. शेवटी नावाने माणूस ओळखला जाण्यापेक्षा माणसाने स्वकर्तृत्वाने ते नाव मोठे करणे अधिक महत्त्वाचे. पण हे जे बब्बीसारख्या शाळकरी पोरीला समजते, ते केवळ वयानेच वाढून बसलेल्या नि स्वतःला मोठे समजणार्‍यांना समजत नाही हेच तर खरे दुर्दैव.

कोऽहं

नावाचा घोळ निस्तरला, की बिम्म ‘आपण कोण?’ या प्रश्नाकडे वळतो. लहान मूल रांगू-बसू लागल्याच्या वयाचे झाले, की त्याला आई-बापांचे बोलणेही बरेचसे समजू लागते, त्या बोलण्याला ते प्रतिसादही देऊ लागते. मग ‘बबड्याचे कान कुठेत?’, ‘बबड्याचे डोके कुठे आहे?’ वगैरे प्रश्न विचारुन त्याची शिकवणी सुरु होते. यात आद्य प्रश्न असतो तो ‘बबड्या कुठे?’ हा. मग ते पोर छातीवर हात लावून उत्तर देते. त्याबद्दल त्याची वाखाणणी सुरु झाली, की त्या शब्दाचं– खरंतर ध्वनिचं म्हणू या, कारण भाषिक समज अजून बरीच दूर असते – नि आपलं काहीतरी नातं आहे इतके त्याला उमगू लागते.

आणखी थोडे मोठे झाल्यावर जेव्हा ते मूल – बिम्मसारखे – परिसराशी ओळख करुन घेऊ पाहते, त्यातील प्रत्येक गोष्टीला समजून घेऊ पाहते, तेव्हाच ते स्वत:लाही शोधू पाहते. आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ यांना ते कुठल्या ना कुठल्या भूमिकेत पाहात असते. त्यामुळे विचारांनी नाही तरी उपजत जिज्ञासेने, अजाणता का होईना ते स्वत:चाही शोध घेऊ लागते.

आपण आपल्या आई-वडिलांसारखे किंवा भावा-बहिणींसारखे दिसतो हे त्याला जाणवत असावे. पण असे का बरे ? या बिम्मला ‘मी रस्त्यावरच्या खडीच्या एंजिनासारखा का नाही?’, ‘आंब्याच्या झाडासारखा का नाही?’, किंवा ‘छत्रीसारखा का नाही?’ असे प्रश्न पडत असतात. सजीव आणि निर्जीव वस्तूंमधला भेद समजून घेण्याची ही सुरुवात असेल. या प्रत्येक वस्तूला तिचा असा एक गुणधर्म आहे ज्याचा आपल्याला उपयोग होईल असे त्याला वाटत असते.

BimmaAndBabbi
बिम्म आणि बब्बी (https://www.wyethnutrition.com.my/ येथून साभार.)

म्हणजे एंजिन असतो तर मी रस्त्यावर धावू शकतो, (एरवी या ‘एंजिना’ला रस्त्यावर एकट्याने जायला आईने मनाई केली आहे.) आंब्याचे झाड असतो तर एका जागी राहूनही कुणीही– अगदी बब्बीसुद्धा – मला तिथून ऊठ म्हणू शकणार नाही असा त्याचा होरा असतो. छत्रीला पावसात जाण्याची परवानगी असते, म्हणजे मी छत्रीसारखा असतो तर आई मला पावसात जाऊ देईल अशी त्याला आशा असते.

पण लवकरच याची दुसरी अडचणीची बाजूही त्याला दिसू लागते. ‘एंजिन कुठे दूध पिते?’ किंवा ‘आंब्याचे झाड कुठे बिस्किट खाते?’ असा खडा सवाल करुन बब्बी त्याचे खाणे बळकावण्याचा प्रयत्न करते. शिवाय एंजिन नि छत्री होऊनही रस्त्यावर किंवा पावसात न जाण्याचा नियम शिथिल करण्याचे आई नाकारते. तेव्हा मग त्याला आपले बिम्म असणेच बरे आहे असे वाटू लागते. माणसाचे कल्पनास्वातंत्र्य वास्तविक बंधनांनी जखडले जाण्याची ही सुरुवात म्हणावी लागेल.

वास्तव-कल्पनेच्या विश्वात नुकतेच पाऊल पडलेला बिम्म आपल्या आसपासच्या जगाशी आपले नाते हुडकण्याचा, जोडण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करतो. आसपासच्या ज्या गोष्टींबाबत त्याला अधिक कुतूहल निर्माण होते, त्याबाबत तो आपल्या इवल्याशा मेंदूद्वारे जमेल तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यातही अधिक आकर्षक वा जवळच्या वाटणार्‍या गोष्टींबाबत समजून घेताना तो कल्पनेचा आधार घेतो. त्याद्वारे गोष्टींबाबत अनेक गाळल्या जागा भरून काढण्याचा, तो अनुभव वास्तवात घेण्याचा प्रयत्न करत राहतो.

(क्रमश:) पुढील भाग >> प्रतिबिंबांचा प्रश्न     

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा