शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

ऐलपैल - २ : क्यूबा: जागतिक आरोग्यसेवेचे रोल मॉडेल

'आईकडून गर्भाकडे होणारे एचआयव्ही आणि सिफिलिस संक्रमण यशस्वीपणे रोखणारा क्यूबा हा जगातील पहिला देश' ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या वर्षी (२०१५) जाहीर केले आणि कॅरेबियन समुद्रातील हे लहानसे बेट अचानक प्रकाशझोतात आले. इतर काही देश जरी हे उद्दिष्ट गाठलेले वा गाठण्याचा स्थितीत असले, तरी अमेरिकेच्या परसात असलेला आणि सातत्याने अमेरिकेची वक्रदृष्टी सहन करत आलेला, कम्युनिस्ट एकाधिकारशाही असलेला देश हे साधतो, हा अनेकांच्या दृष्टिने मोठा धक्का होता. सनसनाटी बातम्यांच्या शोधात असणार्‍या इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दृष्टी जरी या निमित्ताने प्रथमच या देशाकडे वळली असली तरी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात क्यूबाचे नाव त्यापूर्वी एक दोन दशकांपासूनच ऐकू येऊ लागले होते.

कॅरॅबियन समुद्रात बहामा, हैती, होंडुरास, कोस्टा रिका अशा छोट्या छोट्या देशांचा शेजार घेऊन अमेरिकेच्या परसात वसलेला देश म्हणजे क्यूबा. फ्लोरिडामधील मायामी या दक्षिण टोकावरील शहरापासून जेमतेम चारशे किलोमीटर अंतरावर असलेला, आणि तरीही अमेरिकेपासून कोसो योजने दूर राहिलेला - किंवा ठेवलेला - क्यूबा. 'फोर्ब्स मॅगजीन'च्या जूडी स्टोन म्हणतात 'आमच्या अमेरिकेतील माध्यमांनी क्यूबा हा देश अतिशय दरिद्री असल्याचे, तेथील नागरिक हे पाशवी सत्तेखाली भरडले जात असल्याचे चित्र निर्माण केले होते. कदाचित आमच्या देशात क्यूबन संशोधकांनी, लेखकांनी लिहिलेले लेख प्रसिद्ध करण्यासही बंदी घातली असल्याने आम्ही असे गाफील राहिलो असू. पण क्यूबाची खर्‍या अर्थाने ओळख ही आम्हाला त्यांच्या आरोग्यसेवकांनी प.आफ्रिकेतील 'इबोला'च्या थैमानाच्या वेळी केलेल्या कामगिरीमुळे होऊ लागली आहे.'

WhiteCoatArmy
Harvard International Review च्या संस्थळावरून साभार.

१९५९ साली अमेरिकेचे बाहुले असलेल्या बॅटिस्टा या हुकूमशहाची पंचवीस वर्षांची राजवट उलथून टाकून फिडेल कास्त्रोच्या नेतृत्वाखाली क्यूबा मधे समाजवादी विचारसरणीचे राज्य स्थापन केले गेले.

कास्त्रोचा विश्वासू सहकारी आणि जगभरातील क्रांतिकारकांचा मुकुटमणी मानला गेलेला आणि स्वत: डॉक्टर असलेल्या 'चे गव्हेरा'याने नव्या शासनाच्या आरोग्यविषयक धोरणांचा आराखडा सादर करण्यासाठी 'आरोग्य, उपचार क्रांती' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. 

त्यात तो म्हणतो 'देशातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आरोग्यसुविधा पोचवणे, रोगप्रतिबंधक उपाययोजना निश्चित करणे, त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे आणि सर्व नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास उद्युक्त करणे यांना आमच्या आरोग्य खात्याचे आणि अन्य संबंधित संस्थांचे प्राधान्य दिले पाहिजे.'

भांडवलशाही देशांत उपचारपद्धतीतून नफा हे प्रधान उद्दिष्ट मानणार्‍या धंदेवाईक व्यवस्था निर्माण होतात आणि त्यासाठी अनारोग्य अस्तित्वात असणे ही त्यांची गरज असते. याच्या नेमके उलट 'चे' हा उपचारपद्धतीपेक्षाही प्रतिबंधक उपाययोजनेला अधिक महत्त्व देतो आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.

पण त्याने हा आराखडा सादर केल्याकेल्याच त्याच्या या उद्दिष्टांना धक्का बसणारी घटना घडली. देशातील सुमारे तीन हजार डॉक्टर्सनी क्रांतिपश्चात क्यूबात राहण्याऐवजी अमेरिकेत स्थलांतर करण्याचा पर्याय निवडला. १९९१ च्या सोविएत युनिअनच्या पतनानंतर आणि त्यापूर्वीच अमेरिकेने क्यूबावर आर्थिक-व्यापारी निर्बंध घातल्यानंतर वैद्यकीय साधनसामुग्री, जीवनावश्यक औषधे इ. च्या तुटवड्याचा सामना करावा लागला. त्यातच नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला पडलेल्या दुष्काळाने जनतेचे कंबरडे मोडले. एकाधिकारशाही असलेल्या क्यूबन कम्युनिस्ट पक्षाने अमेरिकेने त्यांच्या अटींवर देऊ केलेली अन्न, औषधे किंवा आर्थिक अशा कोणत्याही स्वरूपाची मदत घेणे नाकारले. त्यातून कुपोषणाने डोके वर काढले.

अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे क्यूबाला कमीत कमी साधनांत अधिकाधिक यश मिळवणे भाग होते. त्यासाठी अभिनव, निर्मितीक्षम दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी उपचाराऐवजी प्रतिरोधाला प्राधान्य देणार्‍या 'इम्युनॉलजी' या शाखेवर अधिक भर दिला. ्यातून ४० वर्षांत त्यांनी जगातील सर्वात उत्तम असा रोगप्रतिकारक शक्ती असलेला समाज निर्माण केला. तिथे भ्रूणहत्येचा दर प्रतिहजारी ४.२ इतका आहे; जो अमेरिका खंडात सर्वात कमी, तर जगभरात तिसर्‍या क्रमांकाचा आहे. युनोच्या माहितीनुसार क्यूबन व्यक्तीचे सरासरी आयुर्मान सुमारे ७८ वर्षे इतके अधिक आहे, जे अमेरिका खंडात तिसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने क्यूबाच्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आहेत.

ऐंशीच्या दशकात जेव्हा 'एड्स' या आजाराबाबत फारशी माहिती उपलब्ध नव्हती, त्या काळात देशात सक्तीची एचआयव्ही चाचणी अभियान राबवले गेले. त्यातून एचआयव्ही बाधित व्यक्तींना समाजापासून सक्तीने वेगळे केले गेले. 'क्वारंटाईन' करण्याचा हा उपाय आज जरी अमानवी वाटला, तरी या आजारावरील उपचारपद्धती पुरेशी विकसित न झालेल्या काळात तो उपयुक्त ठरलेला दिसतो. क्यूबा हा अमेरिका खंडातील सर्वात कमी एचआयव्ही बाधित रुग्णसंख्या असलेला देश ठरला आहे.

एवढ्यावरच न थांबता त्या देशाने स्वतःची आरोग्य संशोधन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी 'फार्माक्यूबा' नावाचा गट स्थापन करण्यात आला, ज्याच्या माध्यमातून आरोग्य विषयक संशोधन, व्यापार, देशांतर्गत आरोग्य व्यवस्थांचे नियंत्रण केले जाऊ लागले. 

यातूनच फुप्फुसाच्या कर्करोगावर 'सिमावॅक्स' नावाची प्रतिबंधक लस तयार केली गेली. कर्करोगावर हमखास यशस्वी होणारे उपचारही अजून पुरेशा संख्येने आणि सहजतेने उपलब्ध नाहीत., अशा काळात त्यासाठी प्रतिरोधक तयार करणे ही वैद्यकीय दृष्ट्या खूप मोठी झेप मानावी लागेल.

या प्रतिरोधकाकडून कर्करोगबाधित पेशींऐवजी त्यांच्या उगमाला आणि प्रसाराला सहाय्यभूत ठरणार्‍या 'एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर' ला लक्ष्य केले जात असल्याने पुढे जाऊन याचा उपयोग कदाचित अन्य स्वरुपाच्या कॅन्सरसाठी होऊ शकेल ही शक्यताही बरीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही लस सर्व क्यूबन नागरिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहे.

ऐंशीच्या दशकातच जीवाणूजन्य मेंदूज्वरासाठी लस तयार करून त्या आजाराचे देशातून उच्चाटन केले गेले. त्यानंतर ही लस दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांनाही उपलब्ध करून देण्यात आली. १९९९च्या सुमारास जेव्हा या आजाराने अमेरिकेत उचल खाल्ली, तेव्हा अमेरिकेने स्मिथक्लाईन-बीचॅम या कंपनीच्या देशातील उपकंपनीला या लसीचे उत्पादन वितरण करण्याची आणि त्यासाठी क्यूबातील संशोधकांबरोबर आवश्यक ते सहकार्य करण्याची विशेष परवानगी दिली. २००७ मधे पोलिओवरील पर्यायी लस विकसित करून ती अन्य देशांना सहजपणे उपलब्ध करून देण्याचा मानही या देशातील शास्त्रज्ञांनी मिळवला.

जेव्हा उपचारासाठी औषधांसाठी आवश्यक त्या रसायनांचा तुटवडा पडू लागला तेव्हा शासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून पारंपारिक आणि पर्यायी उपचारपद्धतींना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यात अगदी 'अ‍ॅक्युपंक्चर'सारख्या पद्धतीचा वापर भूल देण्यासाठी करणे; पुष्पौषधीचे स्थानिक ज्ञान, पारंपारिक चिनी उपचारपद्धती इतकेच नव्हे तर योगाचाही वापर करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर देशांतर्गत उपचारपद्धतीच्या आराखड्यात त्यांना हळूहळू सामावूनही घेतले.

सोविएत रशियाच्या पतनानंतर आणि अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातल्यावर काही काळ त्यांना वैद्यकीय साधनसामग्रीचा जरी तुटवडा भासला असला, तरी वैद्यकीय तज्ज्ञ मात्र इथे नेहमीच भरपूर संख्येने उपलब्ध असतात. इ.स. २००५ च्या डेटानुसार क्यूबामधे प्रतिलक्ष लोकसंख्येसाठी सुमारे ६२७ डॉक्टर्स उपलब्ध होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांमधे हेच प्रमाण २२५ इतके कमी आहे.

केवळ देशांतर्गतच नव्हे तर अन्य देशांची गरज भागवण्यासाठी हे प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सेस, संशोधक नेहमीच पुढाकार घेत आले आहेत. 'क्यूबा हा इतर देशांना उत्कृष्ट डॉक्टर्स आणि नर्सेस यांचा पुरवठा करणारा देश म्हणून जगभरात ओळखला जातो. सध्या असे सुमारे पन्नास हजार प्रशिक्षित डॉक्टर्स सहासष्ट देशांमधे आरोग्य सेवा रुजू करत आहेत ' असे 'जागतिक आरोग्य संघटने'च्या २०१४ च्या एका अहवालात नमूद केले गेले आहे.

अमेरिकेसारख्या देशांनी निर्बंध घातल्यावर क्यूबाने 'जागतिक आरोग्य संघटना', 'युनिसेफ', 'युनो विकास निधी' इत्यादी युनोच्या विविध सहयोगी संस्थांशी आरोग्यसेवा पुरवण्यासंबंधी करार करून त्यांच्या माध्यमातून आपले तज्ज्ञ मनुष्यबळ बाहेरील देशांत पाठवायला सुरुवात केली. क्यूबाच्या डॉक्टर्सनी परदेशी काम करणे अथवा अशा तज्ज्ञ डॉक्टर्सचा पुरवठा अन्य देशांना करणे यात देशांतर्गत आर्थिक व्यवहार हा एक मोठा घटक परिणाम करतो आहे. जरी आरोग्य सेवा संपूर्णपणे देशाच्या अखत्यारित असली, तरी आरोग्य तज्ज्ञांचे, डॉक्टर्सचे उत्पन्न आंतरराष्ट्रीय पातळीवरील सरासरी उत्पन्नापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे असे तज्ज्ञ बाहेरील देशांत त्याहून अधिक पण त्या त्या देशातील तज्ज्ञांहून कितीतरी कमी मानधनावर/उत्पन्नावर काम करण्यास आनंदाने तयार होतात.

याचा व्यापारी स्वरूपाचा फायदाही क्यूबाने उठवला आहे. व्हेनेझुएलासारख्या तेल उत्पादक देशाकडून आरोग्य सेवा पुरवण्याच्या बदल्यात स्वस्त दरात तेल आयातीचा करार त्यांनी पदरात पाडून घेतला आहे. एका अर्थी आरोग्यसेवा हे जणू क्यूबाचे दुसरे चलनच बनले आहे. दुसरीकडे स्वस्त आणि दर्जेदार आरोग्यसेवेबद्दल प्रख्यात असल्याने क्यूबामधे 'आरोग्य पर्यटन' हा देखील एक व्यवसाय म्हणून पुढे आला आहे.

आपल्या 'व्हाईट कोट आर्मी'च्या माध्यमातून क्यूबाने जगाला देशांच्या 'सहकार्यातून सहअस्तित्वाचा' एक आदर्शच घालून दिला आहे. अन्य देशांत एका हाताने पैसे नि दुसर्‍या हाताने बाँब टाकणार्‍या त्यांच्या बिगब्रदर शेजार्‍यालाही अखेर इबोला दारावर धडका देऊ लागल्यावर क्यूबाचे ऋणाईत व्हावे लागले आहे. हैती मधील भूकंप आणि त्यानंतर धुमाकूळ घालणारा कॉलरा या सारख्या आपत्तींत 'व्हाईट कोट आर्मी'ने अतुलनीय कार्य केले आहे. युनोचे सचिव बान की मून यांनी म्हटलं होतं '(आपत्तीच्या स्थितीत) ...ही आर्मी सर्वात प्रथम तिथे पोहोचते आणि सर्वात शेवटी तिथून बाहेर पडते.'

प. आफ्रिकेतील इबोलाचा उद्रेकानंतर अमेरिकेने तिथे आपले सुमारे १७० आरोग्यतज्ज्ञ पाठवले होते तर क्यूबाने तत्परतेने ३०० जणांची तुकडी रवाना केली. त्या क्षणी अमेरिकेतील अशा तज्ज्ञांची संख्या सुमारे तीन लाख होती तर क्यूबातील केवळ अकरा हजार! आकडेवारीनुसार पाहिले तर दोन देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता अमेरिका क्यूबाच्या सुमारे पंधरा पटीहून अधिक रक्कम खर्च करते.

आज क्यूबामधे 'युनिव्हर्सल हेल्थ केअर' व्यवस्था आहे. याचा अर्थ देशातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. इथे कोणतेही खासगी दवाखाने अथवा हॉस्पिटल्स नाहीत.

ज्यूडी स्टोन 'फोर्ब्स'मधील आपल्या लेखात म्हणतात "आपण दिवसेंदिवस विखुरलेल्या औषधोपचार पद्धतीकडे वाटचाल करत आहोत. पेशंट, त्यांचे फॅमिली डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि त्या क्षेत्रातील संशोधक यांच्यात संपूर्ण विसंवाद निर्माण झाला आहे." पण याला छेद देणारी क्यूबन आरोग्यसेवेने राबवलेली सर्वात अभिनव पद्धत म्हणजे 'शेजारी डॉक्टर'! एक डॉक्टर आणि नर्स यांची टीम आपल्या परिसरातील, आपल्या समाजातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे आजाराच्या प्रसंगी ते स्वतः अथवा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ त्यांच्यावर करण्यासाठी अधिक नेमक्या उपचारांची निवड करू शकतात. हे 'लोकलाईज्ड' मॉडेल एक प्रकारे विकेंद्रीकरण साधते आणि त्यातून अतिरिक्त केंद्रीकरणातून तपशीलाकडे होणारे दुर्लक्ष टाळता येते.

२००७ मधे क्यूबाने आपल्या देशातील रक्तपेढ्या, प्राथमिक उपचारकेंद्रे, रुग्णालये, वैद्यकीय संशोधन केंद्रे इ.चे देशपातळीवरील नेटवर्क उभे करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. असा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवणारा क्यूबा हा जगातील दुसराच देश ठरला. या माध्यमांतून रुग्ण आणि तज्ज्ञ यांच्यात, तसेच तज्ज्ञांमधे आपसांत अधिक सहजपणे संवाद व्हावा अशी अपेक्षा आहे.

याशिवाय देशभरातील आरोग्यविषयक डेटा एकत्रित स्वरूपात उपलब्ध झाल्याने शासनाला आपल्या धोरणांच्या परिणामांचे प्रत्यक्ष मूल्यमापन सहज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे देशाच्या आरोग्याचे चित्र कुठे कुठे बदलताना दिसते याचा अंदाज घेऊन त्याच्या कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे यासाठी लागणारा वेळ प्रचंड प्रमाणात कमी होतो.

१९९९ मधे पश्चिम हवाना मधील 'सँटा फे' जिल्ह्यात उभे केले गेलेले 'लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसीन' (ELAM) हे जगातील सर्वात मोठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र मानले जाते. अमेरिकेसह जगभरातील अनेक डॉक्टर्स, आरोग्यसेवक, संशोधक इथे प्रशिक्षणासाठी येत असतात.

क्यूबाच्या आपल्या शेजार्‍यांशी असलेल्या बांधिलकीचे आणखी एक उदाहरण म्हणजे व्हेनेझुएलाच्या सहकार्यातून साकारलेला 'ऑपरेशन मिरॅकल' हा प्रकल्प. द. अमेरिकेतील देशात 'बोलिवेरिअन अलायन्स फॉर पीपल्स ऑफ अवर अमेरिका' (ALBA) या संघटनेच्या अधिपत्याखाली डोळ्यांच्या आरोग्यासंबंधी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. याच्या अंतर्गत सुमारे पस्तीस लाख लोकांच्या डोळ्याच्या आजारांवर उपचार करण्यात आले.

सुरुवातीला केवळ व्हेनेझुएलापुरता सुरू केलेला हा प्रकल्प विस्तार करून संपूर्ण द. अमेरिका खंडात सुमारे साठ लाख लोकांपर्यंत पोचवण्यात आला. फक्त द. अमेरिकेपुरते आपले सहकार्य मर्यादित न ठेवता क्यूबाने आपल्या आरोग्यसेवेचा विस्तार आफ्रिकेपर्यंत वाढवला. आफ्रिकेत दर दिवशी सरासरी हजार मुलांचा बळी घेणार्‍या मलेरियासाठी क्यूबाच्या 'लॅबिओफाम' या संशोधन संस्थेने २०१४ मधे १५ देशांत लसीकरण मोहिम राबवली.

२००१ मधे ब्रिटनच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'च्या आरोग्यविषयक समितीने क्यूबाला भेट देऊन त्यांच्या 'रोगप्रतिबंधक उपाययोजना' आणि सामाजिक आरोग्याप्रती असलेल्या बांधिलकीचा आपल्या अहवालात विशेष उल्लेख केला होता. या अहवालाच्या आधारे पुढे ब्रिटनमधील आरोग्यसेवेचा आढावा घेण्यात आला. क्यूबाच्या आरोग्यसेवेच्या आधारे डॉ. डॉन फिट्झ यांनी जगभरातील आर्थिकदृष्ट्या कमजोर देशांसाठी आरोग्यसेवेसाठी मॉडेल म्हणून दहा सूत्रे निश्चित केली आहेत. त्या अर्थी क्यूबा हा आरोग्यसेवेचे एक रोल मॉडेल ठरला आहे.

जुलै २०१४ मधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या डायरेक्टर-जनरल 'मार्गरेट चॅन' क्यूबा भेटीनंतर म्हणाल्या होत्या की 'हा एकच देश असा आहे जिथे आरोग्य-सेवा ही संशोधन आणि विकासाशी थेट जोडली गेलेली आहे. जगभरातील लोकांना लवकरच अशा प्रकारची दर्जेदार सेवा आपण उपलब्ध करून देऊ शकू अशी मला आशा आहे.'

- oOo -

(पूर्वप्रसिद्धी: 'पुरोगामी जनगर्जना' फेब्रुवारी २०१६)


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: