मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

विनोद दोशी नाट्य महोत्सव - १: शब्देविण संवादु...

नाटक किंवा एकुणच सादरीकरणाची कला ही शब्दाधारितच असते असा आपला बहुतेकांचा समज असतो, तो बव्हंशी खराही आहे. अगदी अलिकडे वास्तववादी शैलीशी फटकून राहात लीनिअर नॅरेटिव नाकारून फॉर्मचे अनेक प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य घेत असतानाही शब्दांचे महत्त्व तसेच राहते. पाश्चात्त्यांच्या ऑपेरा सारख्या प्रकारात असेल की आपल्याकडे ज्यांना 'खेळे' म्हणून ओळखतात तशा दशावतारी किंवा त्या त्या प्रदेशातील पारंपारिक नाट्यप्रकारातही शब्दांचे वर्चस्व वादातीत असते.

शब्दांचे महत्त्व नाकारून केवळ विभ्रम आणि शारीर हालचालीतून कथा जिवंत करण्याचे काम आजवर कथकली सारख्या नृत्यप्रकाराने केले आहे. तरीही यात एक्स्प्रेशन बरोबरच मानवी शरीराचा वापर पुरेपूर केला आहे. प्रश्न असा आहे की आता तो ही किमान पातळीवर आणून सादरीकरण शक्य आहे का?

असला तात्त्विक प्रश्न कधी सामोरा येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. किंबहुना माझ्यासारख्या अति-वाचाळ माणसाला अशी 'शब्देविण संवादु' कल्पना कधी सुचणेच शक्य नव्हते. पण आज या प्रश्नाला सामोरा गेलो खरा. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नाही, असले तरी आमच्या गणितातल्या 'एक आणि एकच' रेषेसारखेही नसते. खर्‍या खोट्याची घुसळण तर असतेच, पण उत्तराचे नेमके रूपही दिसतेच असे नाही. कदाचित त्याचा एखादा प्रतिध्वनीच फक्त मनात उमटतो आणि ग्रहणाच्या पातळीवर तेवढेच पदरी पडते असे म्हणावे लागते.

Ganapati

या प्रश्नाला सामोरे जाण्याचे निमित्त होते ते दिवंगत वीणापाणि चावला यांच्या 'आदिशक्ती' या थिएटर ग्रुपने सादर केलेले 'गणपती' हे नाटक. नाटक म्हटले की डोळ्यासमोर जे अपेक्षित असते त्याला संपूर्ण छेद देणारे हे सादरीकरण होते. किमान देहबोली, त्याहून कमी शब्दांचा - जवळजवळ नगण्य - वापर आणि संपूर्ण नॅरेटिव उलगडते ते 'नादा'मधून.

खरंतर नॅरेटिव असे म्हणणेही चूकच. कारण यातून एक निश्चित धारणा, कल्पना पोचवण्याचा हेतूच नाही, कथा तर नाहीच नाही. वेगवेगळ्या पातळीवरच नादाचा वापर करून गणपतीच्या कथेचे विविध पैलू, छटा, पाठभेद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूल्यमापन यांना प्रेक्षकांपुढे ठेवणे हे अग्निदिव्यच. ते यशस्वी झाले की अयशस्वी हा मुद्दा एकतर गौणच आहे. दुसरे माझ्यासारख्या नाट्य आणि संगीत या दोनही सादरीकरण कलांचा यथास्थित अभ्यास न केलेल्याच्या कुवतीबाहेरचेही.

पण एक विचार, एक दृष्टीकोन, त्याचे पैलू, त्यातून निर्माण होणार्‍या कल्पना आणि हे सारे व्यक्त करायचे ते फक्त नादातून. पारंपारिक वाद्य (नाव विसरलो), घटम, ढोल, ड्रम इतकेच नव्हे तर डिजेरिडू सारखे ऑस्ट्रेलियन अबोरिजिनल इन्स्ट्रूमेंट यांच्या माध्यमातून विविध नादांचे तुकडे, लयीशी खेळत एक विषयाचा आभास उभा करणे ही कल्पनाच माझ्या दृष्टीने अभिनव होती.

पण हा माझ्या अज्ञानाचा भाग होता हे लगेचच लक्षात आले. कारण 'गणपती'चे आजचे सादरीकरण हे पंधरा वर्षांहून अधिक काळ उत्क्रांत (Evolve) होत आले आहे. पंधरा वर्षांपूर्वी पुण्यातच आयुकामधे झालेला प्रयोग याहून सर्वस्वी वेगळा होता असे सांगण्यात आले.

काळाबरोबर नाटकही उत्क्रांत होत जाते ही कल्पनाच रोमांचक आहे. कारण काळ पुढे सरकतो तशी माणसे परिपक्व होतात, नवे विचार, नवे पुरावे, नव्या कल्पना समोर येत राहतात, नव्या परिप्र्येक्षातून पाहिले असता मूळ सादरीकरणाचे काही वेगळे पैलू दिसतात, ते आत्मसात करत नाटकालाही आपल्याबरोबर घेऊन जाण्याची कल्पना दाद देण्याजोगीच. अर्थात ही माझ्यासाठी नवीन असली तरी कदाचित याला दक्षिण भारतात मोठी परंपरा असण्याचा संभव आहे. कुण्या तज्ज्ञाला विचारायला हवे.

जेव्हा माणसाला भाषेचा शोधही लागला नव्हता तेव्हापासून माणसाचे आणि नादाचे अतूट नाते आहे. आदिमानवाने आपल्या किमान संवादासाठी अंगविक्षेपाबरोबरच ध्वनिचा वापरही केला असणारच. नंतर भाषेचा शोध लागला, माणूस बोलू लागला आणि बोलतच राहिला. 'मोबाईलने माणसांचे बोलणे खूप वाढले पण संवाद कमी झाला' हे वाक्य आता वापरून गुळगुळीत झाले असले तरी ते अजूनही दखलपात्र आहेच. शब्द इकडून तिकडे जातात; बोलले जातात, ऐकले जातात. त्यातून संवाद होतोच असे नाही. सोशल मीडियातून बोलले गेलेले बहुसंख्य हे अविश्वासार्ह आहे असे तिथे असणारेही समजतात. शब्दावर विश्वास ठेवावा की ठेवू नये यात अर्थापेक्षा पूर्वग्रहांनाच अधिक महत्त्व येते.

'आदिशक्ती'चे विनय कुमार म्हणाले, "शब्दांच्या भाषेची प्रगती आता पूर्ण झाली आहे. इथून आता तिची अधोगतीच होईल. याचे कारण शब्द खूप असले तरी त्यातून आवश्यक त्या भावनेने प्रक्षेपण मात्र होत नाही." त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही आता शब्दाऐवजी नादातून व्यक्त होऊ पाहतो आहोत, आम्हाला सांगायचे ते त्यातून सांगणार आहोत.'

यातून आणखी एक महत्त्वाचा हेतू साध्य होतो तो म्हणजे सापेक्षतेला वाव राहतो. आजच्या जगात जिथे 'एकच विचार बरोबर' इतर सारे चूक असे काळे-पांढरे जगण्याचा हट्ट माणसे धरू लागली आहेत, वैविध्याचे, शक्यतांचे जग लोक नाकारू लागले आहेत. अशा वेळी अशा pluralityला, शक्यतांच्या जगाला जिवंत ठेवणे ही एक मोठी जबाबदारी मानली पाहिजे.

त्याचबरोबर अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या आयुष्यात नृत्य आणि त्याला आधार असलेल्या नादाचे स्थान अतूट आहे. नादाची लय दीर्घकाळ सांभाळता आली, तर येणारी तल्लीनता तर आध्यात्मिकांनीही ईश्वराशी तद्रूपता साधण्याचा मार्ग म्हणून वापरली. अर्वाचीन काळातही अशी तद्रूपता अगदीच दुर्मिळ म्हणावी अशी. आजच्या सादरीकरणात निम्मी राफेल यांच्याबाबत ही तद्रूपता अक्षरशः हेवा करावी अशी. मंचावर असतानाचा वावर, अधेमध्ये असणार्‍या शारीरिक हालचाली, आणि मंचीय वावर याचे भान ठेवत असतानाच नादाशी तद्रूपता राखणे हे यांना कसे जमत असेल याचे मला कुतूहल आहे. पण या प्रश्नाचा धांडोळा घेतला तर त्याचे उत्तर त्यांना स्वतःलादेखील समाधानकारक सापडेल याची खात्री देता येणार नाही.

गंमत पहा. शब्देविण संवादु म्हणता म्हणता इतके बोललो. पण शेवटी जेणो काम तेणो थाय. आमच्यासारख्या शब्दबंबाळ माणसाला फक्त बोलताच येतं, त्याने बोलून व्यक्त व्हावं. एरवी नादब्रह्माचा नि आमचा काडीचा संबंध नाही. ठेक्याच्या, तालाच्या मात्रांचे हिशोब आणि विशिष्ट भावनेची निर्मिती याबाबत आज विनयकुमार यांच्याकडून ऐकल्यावर स्वर, सुर आणि तालाच्या अभ्यासाबाबत गांभीर्याने विचार आणि कृती न केल्याचा पश्चात्ताप - पुन्हा एकदा- झाला. पण जे पदरी पडले तेही पुरेसे समजून 'आदिशक्ती'च्या कलाकारांचा ऋणाईत होऊन राहतो.

- oOo -


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा