गुरुवार, २ जून, २०१६

आपलं आपलं दु:ख

गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग 'ज्यांचा एकच कान काळा आहे असे आठशे पांढरेशुभ्र घोडे' गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा तोडगा त्यावर काढला. रुपगुणाची खाण अशी ख्याती असलेली आपली कन्या 'माधवी' त्याने गालवाला दिली नि तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील असा सल्ला त्याला दिला.' पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की तिच्या पोटी जन्मलेल्या पुत्रावर नातू म्हणून, वंशाचा दिवा म्हणून माझाच हक्क असावा.

अरुणा ढेरेंनी त्यांच्या 'काळोख आणि पाणी' या पुस्तकात माधवीच्या कथेवर लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात, "विश्वामित्राने विचित्र गुरुदक्षिणा मागितल्यावर खचून गेलेल्या गालवाचा शोक (महाभारताच्या त्या कथेत) विस्ताराने वर्णन केला आहे, पण माधवीचे दु:ख किंवा सुख सांगणारी एकही ओळ नाही, एकही शब्द नाही." ही सारी गोष्ट 'गालवाची गोष्ट' म्हणून येते, दुराग्रहाचा परिणाम काय होतो हे सांगणारी बोधकथा म्हणून येते, यात माधवीला एक साधन या पलिकडे काडीचेही महत्त्व नाही.

हर्यश्व, दिवोदास, उशीनर या तीन राजांशी दोन-दोनशे घोड्यांच्या बदल्यात राहिल्यावर नि तीन पुत्र जन्मल्यावर या संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्याला हवे तसे सहाशेच घोडे आहेत हे गालवाला समजले. मग तिला घेऊन गालव विश्वामित्राकडे गेला. उरलेल्या दोनशे घोड्यांऐवजी त्याने तिलाच ठेवून घेतली आणि तिच्या ठायी अष्टक नावाचा पुत्र जन्माला घातला. तिला घेऊन आलेल्या गालवाला तो म्हणतो 'अरे एवढी वणवण करण्याऐवजी हिला प्रथमच माझ्याकडे घेऊन आला असतास तर मीच हिच्या ठायी चार पुत्र जन्माला येईतो हिला ठेवून घेतले असते.' थोडक्यात त्याने त्या स्त्रीची किंमत ही आठशे घोड्यांइतकी किंवा चार पुत्रांइतकी ठरवली. नंतर ती कुठेही जाण्यास, कुणाशीही संसार करण्यास स्वतंत्र होती (पुत्रोत्पत्तीनंतरही तिला पुन्हा अक्षत कुमारी होण्याचा वर होता, म्हणे. अर्थात, हा अर्वाचीन जगात योनिशुचितेचा किंवा एकुणच लैंगिक दांभिकतेचा बडिवार माजवणे सुरु झाल्यावर घुसडलेला भाग असणार.)

अरुणा ढेरे आपल्या लेखात म्हणतात, "ज्या ज्या राजांनी तिला वापरले, त्यांतील एकाही महाभागाचे मन तिच्यात गुंतले नाही आणि तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केल्यावाचून एकही जण राहीला नाही, अगदी विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षीही ह्या गोष्टीला अपवाद नाही." मग पुढे म्हणे ययातीने तिच्या लग्नाचा घाट घातला, पण तिने 'वन' हाच पती निवडला, म्हणे. आणि ती तपसाधनेसाठी वनात निघून गेली.'

चारही पुरुषांच्या दृष्टीने माधवी कितीही रुपगुणांची खाण असली तरी केवळ एक स्त्री होती, गुणवान पुत्रोत्पत्तीसाठी योग्य अशी भूमीच होती. राजे असल्याने कदाचित, पण त्या पलिकडे कुठलीही भावनिक गुंतवणूक त्यांच्याकडून संभवत नव्हती. परंतु माधवीच्या दृष्टीने एकेका पुरुषामधे गुंतत जात असतानाच तिथून बाहेर पडून पुन्हा नव्या पुरुषाबरोबर नात्याची गुंफण घालू पाहणे हे किती वेदनादायक झाले असेल हे समजण्यासारखे आहे. अशा वेळी त्या समाजमान्य लग्न नावाच्या संस्थेत शिरून पुन्हा एकवार एका पुरुषाबरोबर तोच डाव मांडण्याचा तिला वीट आला असेल किंवा जुन्या वेदनेचा आठवही नको म्हणून तिने ते नाकारले असेल अशीच शक्यता आहे. तिची कथा सांगणार्‍याने तिच्या या निर्णयाला 'तिने वन हाच पती निवडला' वगैरे चमत्कृतीपूर्ण आवरण घालून दडवण्याचा प्रयत्न केला असेल.

माधवी (किंवा एकुणच स्त्री) ही एका बाजूने दानवस्तू, पुत्रोत्पतीसाठी जमीन तर तिसर्‍या अर्थी विनिमयाचे 'चलन'ही ठरते, जिची किंमत तीन राजांनी प्रत्येकी दोनशे घोड्यांइतकी, तर विश्वामित्राने आठशे घोड्यांइतकी लावलेली आहे. जीएंच्या एका कथेतले दुय्यम पात्र म्हणते म्हणते 'एक स्त्री आणि घोडा यांत निवड करायला सांगितली तर मी नि:संशय घोड्याचीच निवड करेन.' जगात अनेक संस्कृती, धर्म फोफावले, त्यांनी स्वश्रेष्ठत्वाची द्वाही फिरवली, त्यांच्या अनुयायांनी ते श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हजारो पुरुषांची हत्याही केली, त्यांच्या स्त्रिया पळवून पुन्हा भूमी म्हणूनच आपल्या बीजाचे आरोपण करण्यासाठी वापरल्या. सर्वच व्यवस्थांनी स्त्री ही केवळ पुरुषाचे बीज धारण करणारी भूमी म्हणूनच तिच्याकडे पाहिले आहे. ते पाहता खर्‍या अर्थाने 'सुसंस्कृत' म्हणवणारी संस्कृती अजून उभी राहायची आहे असेच म्हणावे लागेल.

बर्‍याच स्वघोषित महान संस्कृतींमधे कुटुंबव्यवस्थेची भलामण केली जाते, भ्रातृभावाचे गुणगान केले जाते, परस्पर सहकार्याच्या तत्त्वाला अनुसरण्यासाठी समाजाच्या एकजुटीला मोठे महत्त्व दिले आहे. पण अशा तथाकथित महान संस्कृतींमधेही माधवीची वेदना तिने सांगावी आणि कुणी ऐकावी असे कुणी नसावेच, गालवाचा उरबडवा शोक ऐकून माफक हेलावणार्‍या बधीर मनाच्या समाजात इतका संवेदनशील कान तिला मिळाला नसावा.

हीच वेदना 'चेखव'च्या 'मिझरी' या कथेमधल्या घोडागाडीवाल्या 'पोत्पोव'चीही. दोघांच्या दु:खाचे मूळ वेगवेगळे असले तरी जातकुळी एकच. परंतु दोन्ही लेखकांमधे मात्र फरक आहे. व्यासांच्या - किंवा ज्याने कुणी ही 'गालवाची' कथा महाभारतात घुसडली त्याच्या - संवेदनशीलतेला माधवीच्या वेदनेचा स्पर्शही झाला नाही. चेखवच्या पोत्पोवचे दु:ख एका 'माणसाचे' तेव्हा ते तर दखलपात्र आहेच, पण त्याच्या गाडीला जोडलेल्या घोडीबाबतही चेखव किती जागरुकतेने विचार करतो आहे हे नोंदवले तर व्यासांची माधवीप्रती असलेली संवेदनाहीन वृत्ती अधिकच अधोरेखित होते. चेखव कथेच्या सुरुवातीलाच लिहितो, "ती घोडी विचारात हरवल्यासारखी दिसत होती. आपल्या परिचित काळ्या करड्या परिसरातून, जन्मजात वागवलेल्या त्या नांगरापासून दूर करून असल्या चिखल राडाने भरलेल्या, भगभगीत दिव्यांनी भेसूर दिसणार्‍या, सदैव घाईत असलेल्या माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहणार्‍या नि त्यांच्या निरंतर कोलाहलाने वीट आणणार्‍या परिसरात येऊन पडलेला कुणीही विचारात पडणारच."

वृद्धापकाळीचा आधार असलेला आणि घरातील एकमेव सोबत असलेला एकुलता एक कमावता मुलगा गमावल्याचे पोत्पोवचे दु:ख जगातील चिरंतन आणि तरीही प्रत्येकाचे वैयक्तिक असलेले. चेखव म्हणतो "त्याचे हृदय फुटून जर त्याची वेदना वाहती झाली असती तर त्याच्या प्रलयात सारे जग बुडून गेले असते इतकी ती तीव्र होती." सांगून आपले दु:ख हलके करावे अशी एकही व्यक्ती त्या जगात त्याला सापडत नव्हती. त्याच्या गाडीतून प्रवास करणार्‍यांपैकी लष्करी अधिकारी, दारु पिऊन तर्र झालेले तीन उद्धट तरुण, तसंच एक पोस्टमन, खानावळीत भेटलेला तरुण यांना तो ते सांगू पाहतो. त्यासाठी तो त्यांच्या संवादात माफक भाग घेऊन त्यासाठी त्यांच्याशी तात्पुरते नातेही जोडू पाहतो. पण तरीही त्याचे ऐकून घेण्याइतकी फुरसत वा इच्छा त्याच्या जगात कुणालाही नाही.

दु:ख सांगून हलके होते असे म्हणतात. म्हणूनच आनंदाच्या प्रसंगापेक्षाही दु:खाच्या प्रसंगी आस्थेने विचारपूस करायला येणारे सुहृद, आप्तस्वकीय जितके अधिक तितका समाजाचे बंध अधिक बळकट मानता येतात. परंतु पोत्पोवला असे जवळचे कुणीही नाही. त्याचा एकमेव सुहृद गमावल्यानंतर ते दु:ख बोलून हलके करावे अशी एकही व्यक्ती त्याच्या आसपास नव्हती. हे तत्कालिन रशियन समाजावरचे भाष्यच आहे, जसे माधवीची कथा ही त्याकाळच्या -आणि बहुधा आजच्याही- भारतीय समाजातील सामाजिक नीतिनियमांचा आरसा मानता येते.

माधवीसाठी सहानुभूतीचा कान जसा तत्कालीन भारतीय समाजात नव्हता, तसाच पोत्पोवसाठी तो त्याच्या रशियन समाजातही अस्तित्वात नव्हता. तो सांगेल ते निमूटपणे ऐकणारी घोडी तरी पोत्पोवकडे होती, जिच्याशी आपण बोलतो, तिला आपले म्हणणे समजते, हे गृहित धरणार्‍या पोत्पोवला तितके समाधान तरी आहे. माधवीसमोर असा कुठला एकतर्फी पर्यायही उपलब्ध नाही. बंद कानांच्या मनुष्यांच्या समाजापेक्षा तिने अरण्य जवळ करावे हे त्या समाजाची लायकी दाखवून देणारे सणसणीत स्टेटमेंट आहे असे मी मानतो. नवपरिणित पत्नीसोबत पहिली रात्र व्यतीत करुन आलेल्या पुरुषाला 'माल खरा की खोटा' हा बेशरम प्रश्न विचारणार्‍या जातपंचायती आजही या देशात सक्रीय असल्याने माधवीने अजूनही अरण्यातच राहावे अशी परिस्थिती आहे असे म्हणावे लागेल.

पण जशी अरुणा ढेरेंना माधवीची गोष्ट तुम्हा-आम्हाला सांगावीशी वाटली तसेच 'चन्द्रप्रकाश देवल' यांना तिची वेदना शब्दबद्ध करावीशी वाटली. त्यांनी लिहिलेल्या 'बोलो माधवी' या दीर्घकाव्याच्या माध्यमातून त्यांनी ती मांडली आहे. त्यातच एका सर्गात त्यांनी चेखवची कथा आणि माधवीची कथा यांची सांगड घातली आहे. प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे या यांनी देवलांची ही दीर्घकविता मराठीमध्ये आणली आहे. त्यातील एका सर्गामध्ये त्यांनी चेखवचा पोत्पोवचे आणि माधवीचे दु:ख यांना परस्परांसमोर ठेवले आहे. या अनुवादाला ’साहित्य अकादमी पुरस्कार’ही मिळालेला आहे. त्यातील हा एक भाग.

बोल माधवी
काव्य: बोल माधवी
कवी: चन्द्रप्रकाश देवल (हिंदी)
अनुवाद: आसावरी काकडे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००७)
पृ. ४८-४९.
			-: आपलं आपलं दु:ख :-
                    
आज चेकॉव्हची 'ग्रीफ' कथा वाचताना
राहून राहून वाटतं आहे
पोत्पोवनं शेवटी
आपल्या मुलाचं दु:ख
सांगितलं आपल्या टांग्याच्या घोड्याच्या कानात
तशी तू ही खरोखरच सांगितली असशील
आपल्या मनातील व्यथा
एखाद्या श्यामकर्ण घोड्याच्या कानात...
तुला तर सांगायच्या होत्या
तीन-तीन मुलांच्या जन्म-वेदना...
पण ऐकणारं कोण आहे
या बधीर वस्तीत?
संवेदना एक शिवी आहे इथे!

घोडाच होऊ शकतो
दु:ख जाणणारा मित्र...
या गजबजलेल्या
स्थितप्रज्ञ आणि विरक्त जगात!
जिथे माणसाला काही सांगणंच
यातनामय असतं...
याचना करण्यासारखं आहे
या बहिर्‍या समाजाला आवाज देणं...

आणि घोडे...
तुझ्या बदल्यात मिळवलेले असूनही
तुझी संपत्ती नसलेले...
सांग कुठे शोधू त्यांना?
कुणाच्या तरी राजसूय यज्ञात
स्वाहा होऊन गेलेत सगळे!

माधवी!
त्या काळातलं काहीच उरलं नाही आता...
राजप्रासादांच्या भिंती तर असतात नेहमी
मुक्या आणि बहिर्‍याच...
झरोक्यांना बोलतानाही
ऐकलं नाही कधी कुणी...

समया केव्हाच विझून गेल्यायत
पलंग वाळवीनं खाऊन टाकलेत
देणं घेणं उरकून
मागे राहिला आहे
एकमेव साक्षी... अंधार!
त्याला काहीच दिसत नाही
आणि सूर्यानं काही पाहिलं नाही...!

तुला न समजू शकण्याची यातना
तुझ्या दु:खापेक्षा भयंकर होत चालली आहे!
थोडं जरी असतं समाधान
तरी जतन केलं असतं हृदयात...
पण या सलणार्‍या विषादाचं काय करू?
आणि माधवी होऊन समजून घेणं
तर उपमर्दच आहे एक प्रकारचा...!

- oOo -

टीपा.
१. हा अनुवाद ’विजय पाडळकर’ यांच्या ’कवडसे पकडणारा कलावंत’मधून साभार.
२. इथे तपशीलात थोडा गोंधळ होऊ शकतो. 'चेखव'च्या दोन कथा आहेत. पैकी पहिली कथा जी आहे ती एका वृद्ध घोडागाडीवाल्याची कथा आहे, जिचा अनुवाद बहुधा 'मिझरी' या शीर्षकाने पाहण्यात येतो,. ज्यात आपल्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख कुणाला सांगून हलके करावे इतके जवळचे कुणी नसलेला, इतर 'माणसांना' त्याच्या दु:खाशी घेणेदेणे नसल्याने अखेरीस तो आपल्या गाडीला जोडलेल्या घोडीलाच सांगून आपले दु:ख हलके करतो. दुसरी कथा - जी 'ग्रीफ' या शीर्षकाने अनुवादित केलेली पहायला मिळाली - त्यातही एक वृद्ध आपल्या आजारी पत्नीला घोडागाडीतूनच हॉस्पिटलमधे घेऊन चालला आहे. शीर्षक आणि कथेची पार्श्वभूमी बरीच जवळपास असल्याने गोंधळ होऊ शकतो. इथे अपेक्षित असलेली कथा ही पहिली - 'मिझरी' - आहे.


हे वाचले का?