-
भाग - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी << मागील भाग
---मागील भागात ज्यांचा उल्लेख केला तो कालिदास असो वा आरती देवी, त्यांच्या सामाजिक आयुष्यातील साध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या जोडीदारांना विरह-वेदनेला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. हवे ते साध्य करण्यासाठी मूळ स्थानापासून दूर जाताना, जिवाभावाच्या व्यक्तीपासूनही दूर जाणे अपरिहार्य नव्हते. कालिदासाला मल्लिकेशी विवाह करून तिलाही सोबत नेणे शक्य होते. विलोमने– त्यांच्या सामायिक मित्राने– त्याला त्यावर पुन्हा पुन्हा डिवचलेही आहे.
परंतु जोडीदाराला अर्ध्या वाटेत सोडणे हा सर्वस्वी स्वार्थी निर्णय म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयप्रक्रियेत त्या दोघांचीही बाजू येतेच. त्यामुळे कुठल्याही कौटुंबिक निर्णयात तो त्यांना अनुकूल घेतला जाण्याची एक शक्यता असतेच. परंतु परतुनि जाण्याच्या असोशीने, इतर कुणाचा बळी घेऊन वा त्यांच्याच खांद्यावर त्या प्रवासाचे जू ठेवून जाऊ पाहणार्यांची उदाहरणेही साहित्यात कमी नाहीत.
ययाती आणि फेडोरा:
महाभारतातील (?) ययाती राजाची कथा सर्वश्रुत आहे. शुक्राचार्यांच्या शापाने वृद्ध झालेल्या या सम्राटाची सुखोपभोगाची लालसा त्याच्या जर्जर शरीराच्या विपरीत अशी तरुण राहिलेली असते. त्या भोगांच्या पूर्तीसाठी त्याला तारुण्य हवे असते. जो कुणी आपले तारुण्य देऊ करेल, त्याला आपले राज्य देण्याचा प्रस्ताव तो आपल्या पाचही पुत्रांसमोर ठेवतो. त्यांपैकी पुरू तो प्रस्ताव नि राजाचे वार्धक्य स्वीकारून, राजाला त्याची भोगलालसा पुरे करु शकेल असे तारुण्य देऊ करतो.
अन्य एका कथेमध्ये विश्वामित्र-शिष्य गालव त्याच्या गुरुदक्षिणेसाठी आवश्यक असणारे ‘एकच कान काळा असणारे शुभ्र रंगाचे घोडे कसे मिळवावेत?’ ही विवंचना घेऊन ययातीकडे येतो. परंतु अशा प्रकारचे घोडे सम्राटाकडे नसतात. मग ययाती त्याला आपली मुलगी माधवी देऊ करतो. अशा प्रकारचे घोडे ज्यांच्याकडे आहेत अशा तीन राजांशी, आणि अखेरीस विश्वामित्राशी रत होऊन ती गुरुदक्षिणा फेडण्याचे काम माधवी पुरे करते. यातून सम्राटाच्या शिरी येऊ शकणारे ‘दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्याचे पातक’ निवारले जाते. अशा तर्हेने या महान(?) सम्राटाने आपल्या आयुष्यातील उपभोगाचा, तसंच सन्मानाचा अशा दोनही बाजूंचा भार आपल्या मुलांच्या शिरी दिलेला आहे.
अमेरिकन चित्रपट ‘फेडोरा’ची कथा काहीशी ययातीच्या कथेशी मिळतीजुळती आहे. फेडोरा नावाची प्रसिद्ध अभिनेत्री वय नि सौंदर्य उतरणीला लागल्याची चाहूल लागून अचानक निवृत्त होते. अमेरिका सोडून इटलीजवळील एका लहानशा बेटावर अज्ञातवासात जगू लागते. चाहत्यांच्या मनातील आपली तरुण, सौंदर्यवती अशीच प्रतिमा कायम राहावी, म्हणून जुन्या जगाशी संपर्क जवळजवळ तोडते.
परंतु ज्या जगाने तिला कीर्ती, संपत्ती दिली तो तिच्या आयुष्याचा कणाच असतो. त्यामुळे ते सारे पुन्हा हस्तगत करण्याची तिची आस कायम असते. त्या दृष्टीने कुण्या सौंदर्यतज्ज्ञ म्हणवणार्या डॉक्टरकडून ती उपचार घेत असते. त्यातील एक उपाय उलटतो नि तिचा चेहरा कायमचा विरूप होऊन जातो. तिची परतुनि येण्याची आस धुळीला मिळते. त्या हव्याशा वाटणार्या भूतकाळाकडे परतण्याचा तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी होतो. खानदानी युरपिय स्त्रिया घेतात त्या झिरझिरीत अवगुंठणाआड आपला विरूप चेहरा दडवून ती काउंटेस सॉब्रिन्स्की या नावाने तिथे वावरू लागते.
अँटोनिया: ‘फेडोरा’च्या कारकीर्दीच्या दुसर्या अध्यायाची सुरुवातअशात तिच्या चित्रपटीय कामगिरीचा गौरव करणारा एक पुरस्कार तिला जाहीर होतो. आता पुरस्कार स्वीकारायचा तर जाहीर कार्यक्रमात जाणे आले. पण कॅमेर्यांच्या नजरेखाली असलेल्या चित्रपटांच्या झगमगीत जगात चेहरा झाकून जाणे शक्य नसते. त्यावर तोडगा म्हणून, तिच्या तरुणपणीची प्रतिकृतीच म्हणावी अशी तिची मुलगी अँटोनिया– हिलाच फेडोरा म्हणून पाठवण्याचा निर्णय फेडोरा घेते. या कार्यक्रमात अँटोनिया ही फेडोरा म्हणून इतकी सहज खपून जाते, की तिला नव्याने चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागतात.‘फेडोरा’चा पुनर्जन्म होतो, तिच्या चंदेरी आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू होतो.
सुरुवातीला आईच्या नावावर मिळालेल्या यशाने हुरळून गेली असली, तरी अँटोनिया तरुण असते, नि त्या आयुष्याच्याही काही मागण्या असतात. मायकेल नावाचा एक तरुण तिच्या आयुष्यात येतो. या स्त्रीबद्दल त्याला आकर्षण असूनही, वयाने एवढ्या मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याचा संकोच त्याला भेडसावत असतो. वास्तव काय ते सांगून त्याची ती शंका दूर करण्याचे अँटोनिया ठरवते. पण यातून आपल्या नव्या कारकीर्दीचा शेवट होईल, हे ध्यानात आलेली फेडोरा त्यांच्या नात्याला विरोध करते. इतकेच नव्हे तर, ती नि तिचे जवळचे सुहृद मिळून अँटोनियाची वंचना करणारा डाव खेळतात. या दुहेरी आयुष्याचा आणि आपले मूळ व्यक्तित्व कायमस्वरूपी आपल्या आईच्या व्यक्तित्वाचे गुलाम होऊन राहिल्याचा ताण असह्य होऊन अँटोनिया अखेर आत्महत्या करते(१).
फेडोराचा दिग्दर्शक-पटकथालेखक असलेल्या बिली वाइल्डरच्याच ‘सनसेट बुलेवार्ड’मधील(२) नॉर्मा ही मूकपटाच्या जमान्यातील लोकप्रिय अभिनेत्री. बोलपटांच्या आगमनानंतर मूकपटांची नि त्या जगातील अभिनेत्यांची सद्दी वेगाने उतरणीला लागते, ते विस्मृतीमध्ये जातात. नॉर्माही त्यातलीच एक. पण ती पुनरागमन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे. त्यासाठी तिला एका उत्तम पटकथेची आवश्यकता आहे. त्यासाठी तिने ज्यू राजा हेरॉड याची मुलगी, नि छोट्या आर्मेनियाची राणी ‘सलोमी’ची कथा निवडलेली आहे. त्यावर ती काम करते आहे. केवळ अपघातानेच तिच्या घरी पोहोचलेल्या ‘जो मिलर’ या पटकथालेखकाला वेठीस धरते. तो तिच्या घरचा बंदिवान होऊन राहातो. त्याचवेळी ती त्याला भावनिक पाशातही अडकवून ठेवते.
एकदा ही पटकथा पुरी झाली की, प्रसिद्ध दिग्दर्शक सीसल बी डि’मिल यांच्या दिग्दर्शनाखाली ती पडद्यावर येईल, मग आपले हे पुनरागमन प्रेक्षक कसे साजरे करतील, वगैरे मनचे मांडे खाण्यात नॉर्मा रमते. परंतु जो आणि तिचा माजी पती मॅक्स यांना वास्तवाचे भान आहे. नॉर्माशी औपचारिक बोलत असलेल्या डि’मिल यांच्या चेहर्यावरचा स्पष्ट नकार त्यांची वाचलेला आहे. एक भावनिक उद्रेकाच्या क्षणी जो याची जाणीव नॉर्माला करून देतो आणि चित्रपटाबरोबर नॉर्माची वाटचालही शेवटाकडे होऊ लागते. या कथेचा अंतही जोच्या मृत्यूनेच होतो.
परतुनि जाण्याचा नॉर्मा नि फेडोराचा अट्टाहास अनुक्रमे अँटोनिया आणि जो मिलर यांचा बळी घेऊन विफल ठरतो. या दोघींप्रमाणेच विस्मृतकाळातील अभिनेत्री असलेली, भारत सासणे यांच्या ‘रेस्ट इज सायलन्स’(३) या कथेमधील कम्मो मात्र वेगळी वाट निवडते. ती परतुनि जाण्याचा अट्टाहास करतच नाही. उलट स्वत:साठी नि तिच्याप्रमाणेच निवृत्त केल्या गेलेल्या सहप्रवाशांसाठी या नव्या जगाच्या एका कोपर्यात त्यांच्या जगाचा एक तुकडा राखून ठेवते. तिथे त्यांचे जगणे, तो काळ एक प्रकारे गोठवून ठेवते. ‘वर्तमानाचे भान’ नावाच्या खिडकीतून बाहेरचे स्पष्ट दिसू नये म्हणून, त्यावर एक पडदा सरकवून दोन जगांची फारकत घडवून आणते.
भूतकाळातील तथाकथित वा वास्तविक वैभवाचा, सुखाचा, प्रसिद्धीचा वा यशाचा पाठलाग करणार्या कालिदास, आरती देवी, फेडोरा, नॉर्मा या सार्यांचा तो प्रयत्न अयशस्वी होऊन हे सारेच वैफल्याचे धनी झाले आहेत. कांदिदची अवस्था ‘यशाचे कलेवरच हाती आले’ अशी आहे. या सार्यांची अतृप्ती, साध्य हस्तगत केल्यानंतरही राहिलेले अपुरेपण, हे You cannot go back home' या उक्तीला सार्थ करणारे.
मी वर ‘परिपूर्तीनंतर परतुनि’ येण्याचा निर्णय घेण्याचा उल्लेख केला आहे. मागील भागात उल्लेख केलेल्या आँधी या चित्रपटामधील आरती देवींचे उदाहरण अशा स्वरूपाच्या निर्णयाचे म्हणता येईल. परंतु तो निर्णय खरेच घेतला होता, की एक राजकारणी डावपेच होता, हे सांगणे कठीण आहे. तो राजकारणी डावपेच होता म्हटले तरीही तो स्वार्थी आहे आणि खरोखरच परतून येणे झाले असते तरीही ते स्वार्थप्रेरितच– कौटुंबिक आयुष्य हवे म्हणून– ठरले असते. परतुनि येणार्या आरती देवींच्या मनात साफल्याची नव्हे, तर आणखी काही हवे असण्याची आसच राहिली असती. परिपूर्ती हा शब्द तेव्हाच वापरता येईल, जेव्हा हे परतणे निरपेक्ष असेल. सुदैवाने असे सुरेख उदाहरण मला गोनीदांच्या बुधामध्ये(४) सापडले.
बुधा:
पुण्याजवळील राजमाची किल्ल्याचा वंशपरंपरागत वतनदार असलेला बुधा चर्हाटे पोटाच्या पाठीमागे मुंबईसारख्या महानगरामध्ये स्थलांतरित होतो. चाकरमानी होऊन आयुष्य काढतो. आता त्याचा मुलगा भिवा कर्ता झाला आहे, जोडीला सूनही आली आहे. नातवाची पावले ऐकू येऊ लागली आहेत. त्याच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात असतात ती जगण्याची बहुतेक कर्तव्ये बुधाने पार पाडली आहेत. महानगरात राहण्याची गरज आता संपली आहे.
‘अमेरिकन ड्रीम’च्या मागे लागलेल्या, किंवा एक साध्य हाती आले की हपापलेपणे नव्या साध्याच्या मागे लागणार्या, नागरी मानसिकतेचा स्पर्शही त्याला झालेला नाही. महानगराकडे येण्यापूर्वी आपले नि आपल्या मागील पिढ्यांचे पोषण करणार्या मातीला पोरके करून आपण आलो आहोत, याचे भान त्याच्या मनात जिवंत आहे. त्या मातीचे देणे देण्यासाठी परतुनि जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
वरील सार्यांच्या ‘परतुनि ये घरा’ निर्णयामध्ये नि बुधाच्या निर्णयामध्ये हा एक मोठा फरक आहे. इतर सार्यांचा तो निर्णय स्वत:साठी, स्वार्थी दृष्टिकोनातून घेतला गेलेला आहे. पूर्वी जे मिळाले ते त्यांना पुन्हा हवेसे वाटते आहे. याउलट माचीकडे परतणार्या बुधाच्या मनात अपुरेपणाची नव्हे, तर साफल्याची भावना आहे. आपल्या जिण्याची परिपूर्ती झाल्याची भावना घेऊन तो परततो आहे. माचीकडून काही घेण्यासाठी नव्हे, तर तिचे देणे देण्यासाठी तो जातो आहे. माचीला, तेथील निसर्गाला तो आपल्या सोयीने वळवू इच्छित नाही. उलट त्या मातीचे, दारीच्या ‘आवळीबाय’चे, खारीचे, कुत्र्याचे सार्यांचे देणे देत जातो. स्वत:ला निसर्गाच्या स्वाधीन करतो, त्याच्यामध्ये विलीन होतो.
ऑर्फियसला, कांदिदला जगण्याच्या चक्रवातामध्ये हरवलेलं, तर ऑर्फियसला त्याच्याही सीमा ओलांडून गेलेलं त्याचं प्रेम परत हवं होतं. कालिदासाला त्याची हरवलेली प्रेरणा परत हवी होती, तर आरती देवींना नात्याचे बळ नि ऊब. फेडोरा आणि नॉर्मा यांचा गमावलेली कीर्ती पुन्हा हवी होती, तर ययातीला झडलेले तारुण्य. नचिकेता मात्र कोणतेही मागणे घेऊन मृत्युला सामोरा जात नव्हता, उलट तो स्वत:च अस्तित्वाचे दान घेऊन मृत्यूसमोर हजर झाला होता. पण त्याच्या जाण्यालाही वचनपूर्तीच्या हेतूची प्रेरणा होती, बुधाचा प्रवास मात्र ‘इदं न मम’ या सर्वस्वी निरामय हेतूने झालेला आहे.
मला वाटतं बुधाची कथा ही सार्या मानवजातीचीच कथा ठरायला हवी. पोटभर अन्न, निरोगी अथवा आरोग्यपूर्ण जीवन, कुटुंबासोबत असलेले भावनिक बंध हे जगण्याचे मूलभूत आधार हे आजच्या नागरी नि महानगरी आयुष्यात माणसांनी दुय्यम ठरवून टाकले आहेत. श्रीमंती, आणखी पैसे, आणखी- आणखी पैसे, ‘मागचा मोबाईल वीस हजाराचा होता आता लाखभराचा हवा, भले त्यांच्या कामांत फार फरक नसेना’, ‘घड्याळ वेळ तीच दाखवत असले तरी सोन्याची साखळी असणारे वा हिरे जडवलेले मिळवले की माझे यश वाढले’... या मार्गाने माणसाची वाटचाल चालू आहे.
गेल्या दोन पिढ्यांनी पुढील कित्येक पिढ्यांच्या वाट्याची निसर्गसंपत्ती स्वाहा केली याची फिकीर भांडवलशाही जगात राहणार्या माणसाला नाही. ‘अजून हवे, अजून हवे’ हा मंत्र घोकणार्या, त्यासाठी आपण निसर्गाची किती नि कशी धूळदाण करतो आहोत याबद्दल अनभिज्ञ असणार्या, नि हेतुत: तसे राहू इच्छिणार्यांच्या पिढ्या उदयाला येत आहेत. बुधाप्रमाणे त्या मातीचे, निसर्गाचे देणे देण्याची बातच सोडा, त्याबद्दल सजग राहण्याचेही माणसे नाकारत आहे.
कीर्ति, संपत्ती नि सत्तेप्रमाणेच ‘मालकी हक्काची भावना’ ही माणसाच्या मनात रुजलेली सर्वात घातक भावना आहे. तिची खाय खाय संपत नाही. तिला पोसण्यासाठी माणूस बेफाम वेगाने धावतो आहे, उरस्फोड करतो आहे. त्यासाठी वेळच्या वेळी अन्नसेवन, आरोग्यदायी अन्नसेवन सोडून खाण्यातही फॅशन किंवा अस्मितेचे झेंडे लावतो आहे. हे साध्य करण्यासाठी कमावण्याचे, कामाचे तास वाढवून, विश्रांतीचे नि कौटुंबिक सहवासाचे घटवत नेतो आहे. यातून शारीरिक नि मानसिक अनारोग्याकडे अनायासे चालत जातो आहे. हे विषारी वर्तुळ आहे हे त्याच्या ध्यानातच येत नाही.
मालक म्हणून आपले नाव मिरवणार्या स्थावर, जंगम मिळकतीचा विस्तार त्याला सुखावतो आहे. त्यातील किती आपण नक्की भोगू शकतो वा भोगतो? असा प्रश्न त्याला पडत नाही. ‘मालकी असणे म्हणजेच भोगणे नव्हे’ याचे भान त्याला येत नाही. आणि या सार्या प्रवासामध्ये तो निसर्गाच्या पुनर्भरणाच्या कुवतीच्या कैकपट अधिक विध्वंस करत जंगलांना वाळवंटांत आणि मैदानी प्रदेशांना चिखल-राडेच्या प्रदेशात (swamp) रूपांतरित करतो आहे. आणि हे बदल समोर दिसत असूनही डोळे मिटून वा भांडवलशाहीच्या भाट माध्यमांतून येणारा ‘ऑल इज वेल’चे तथाकथित संशोधन मांडणारे पडदे डोळ्यावर ओढून घेत आहेत.
विकास, प्रगती या शब्दांवर उड्या मारणारे संभावित ‘याची किंमत किती मोजायची आहे, कुणी मोजायची आहे?’ या प्रश्नाला सामोरे जाण्याचे धाडस करत नाहीत. एक प्रकारे आपल्या आयुष्यात शक्य ते सारे भोगून घेण्याची लालसा बाळगून ते जगत आहेत. त्यासाठी जी काय किंमत मोजायची, ती पुढच्या पिढ्या मोजतील, त्याची आपण फिकीर करण्याचे कारण नाही, अशा आविर्भावात त्यांचे जगणे आहे. एकविसाव्या शतकाच्या उदयानंतर जगभरातील ही विकासाची, प्रगतीची खायखाय प्रचंड वाढली नि पर्यावरणाच्या र्हासाबाबत आवाज उठवणार्यांचा आवाज क्षीण झाला. ज्यांनी त्यांना बळ द्यायचे, ते संभावितच त्यांना प्रगतीविरोधक, विकासविरोधक म्हणून हिणवू लागले, संपत्तीसाधकांच्या रांगेत आपला कटोरा घेऊन उभे राहिले आहेत.
वाईट एवढेच की, या वा भविष्यातील पिढ्यांना आता परतुनि जावेसे वाटले तरीही जाणे शक्य होणार नाही. पृथ्वीवरील स्वर्ग मानल्या गेलेल्या कॅलिफोर्नियामध्ये पाचेक वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाने या भयानक भविष्याची चाहूल दिलेली आहे. पण तिथेही आज डोनाल्ड ट्रम्पसारखा माथेफिरु ‘विकास... विकास... अजून पैसा... अजून पैसा!’ म्हणणार्या अमेरिकनांनी निवडून दिला आहे. त्याने सत्तेवर येताक्षणीच निसर्गरक्षणापासून आरोग्यव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रांना दुय्यम करणारी पावले टाकली आहे. विध्वंसाचा गेल्या पंचवीस वर्षांत वाढलेला वेग, ट्रम्प आणि जगभर उदयाला आलेल्या त्याच्यासारख्या अन्य माथेफिरु सत्ताधीशांच्या काळात आणखी तीव्र होणार आहे.
अशा समाजात ‘हे एवढे माझे साध्य. तेवढे पदरी पडले की मी अधिक काही मागणार नाही.’ असा निर्णय घेऊन त्याला अनुसरून वागणारे, आवश्यक तेवढे मिळाले की निसर्गाचे देणे देऊन, आपली मातीही त्यात मिसळून देणारे बुधा सापडणे अवघड आहे. आणि म्हणून भूतकाळ कितीही समृद्ध असला, तरी परतून जाण्याची इच्छा असलेल्या पिढ्या आता अस्तंगत झाल्या आहेत. मानवजातीचा परतुनि जाण्याचा मार्गही त्यांसोबतच बंद झालेला आहे.
I Wish I could go back.
Image Credit: stockcake.com- oOo -
टीपा:
(१). तिच्या आत्महत्येचा प्रसंग टॉलस्टॉयच्या अना कारेनिनाच्या मृत्युची आठवण करून देतो.
(२). या दोनही जुन्या चित्रपटांची ओळख मला शांताबाई शेळकेंनी लिहिलेल्या ‘चित्रकथा’या पुस्तकामार्फत झाली. शांताबाईंनी काही काळ चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले होते. त्या काळात त्यांना हे चित्रपट पाहण्याची संधी मिळाली असावी. यात शांताबाईंनी फेडोराला चित्रपटतारका न म्हणता ‘चित्रपटचंद्रिका’ असे सुरेख विशेषण वापरले आहे.
(३). पुस्तक: ऐसा दुस्तर संसाऽर - ले. भारत सासणे. प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस.
(४). पुस्तक: माचीवरला बुधा - ले. गो. नी. दाण्डेकर. प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन.
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
परतुनि ये घरा... - ३ (अंतिम) : ययाती, बुधा आणि... माणूस
संबंधित लेखन
कथा
चित्रपट
तत्त्वविचार
मिथ्यकथा
साहित्य-कला

गो-मॅन-गो (कथा)
‘उठी उठी गोऽपाऽलाऽऽऽ आ... आ... अ...’ कोणीतरी केकाटू लागला. ‘तिच्यायला सकाळी सकाळी हे कोण केकाटून कुमारांच्या सुंदर गाण्याची वाट लावतंय’ असं पुटपुटत ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा