माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर << मागील भाग
---
वास्तव आयुष्यात मृत्यू टाळता येत नाही, औषधांनी त्याची संभाव्यता कमी करता येते.
आभासी जगात लेखन-चौर्य टाळता येत नाही, पण त्याची संभाव्यता कमी करता येते.
- स्वामी जिज्ञासानंद
काही वर्षांपूर्वी मी मराठी संस्थळांवर सक्रीय होतो तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याचे आणि माझे लेखन आवडल्याचे एका संस्थळमित्राने 'व्यक्तिगत निरोपाने’ (हा संस्थळावरचा खासमखास शब्द) कळवले. मी बुचकळ्यात पडलो. माझा ब्लॉगच नव्हता आणि मी तसा नुकताच लिहू लागलो होतो. दोन-चार बरे लेख या पलिकडे फारसे लिहिलेही नव्हते. त्या लेखनाला आज मी लेखन म्हणू धजणार नाही. फेसबुक पोस्टच्या दर्जाचे ते लेखन म्हणता येईल.
कुतूहल म्हणून मी शोधले, तर माझा एक लेख असलेला ब्लॉग मला सापडला. गंमत म्हणजे त्या ब्लॉगवर माझ्या परिचयाच्या इतर अनेक मंडळींचे लेख सापडले. (ते माझ्या लेखासोबत असल्याने सारे मीच लिहिले आहेत असा संस्थळमित्राचा गैरसमज झाला होता.) थोडी चौकशी करता हा ब्लॉगमालक भलताच शहाजोग नि उद्धट असल्याचे माझ्या कानावर आले. हे महाशय संस्थळांवरुन, ब्लॉग्सवरुन इतरांचे लेख सरळ उचलून आपल्या ब्लॉगवर चिकटवत असत. लेखकाचे नाव, मूळ लिंक देणे सोयीस्कररित्या टाळून! एखाद्या लेखकाने विचारणा केलीच तर ’मी कुठे म्हणतोय माझा लेख आहे म्हणून. मला आवडलेले लेखन मी फक्त संकलित करतो आहे.’ असा दावा करत. आणि त्याचवेळी हे महाशय पोस्टच्या खाली वाचकांनी केलेल्या कौतुकाचा निर्लज्ज स्वीकारही करत होते. लेखकाच्या निषेधाला उत्तर म्हणून ’उलट मी तुम्हाला जास्तीची प्रसिद्धीच देतो आहे की.’ हा आगाऊपणा आणखी वर ठेवून देई. ’नॅशनल जिओग्राफिक’ने नावाजलेल्या एका फोटोग्राफर मित्राला एका नवथर, चॅनेलपुरस्कृत मासिकाने मानधनाऐवजी ’तुम्हाला प्रसिद्धी देऊ की’ असे निर्लज्ज उत्तर दिले होते. ही तर अगदी अलिकडची, चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट.
दुसरा अनुभव माझा स्वत:चाच. सामाजिक-राजकीय विश्लेषण करणारी एक पोस्ट मी फेसबुकवर टाकली होती. ती अनेकांनी शेअर व फॉरवर्ड केली. लेखन करताना परिच्छेदांचे गणित मी व्यवस्थित सांभाळत असतो. एका महाभागाने शेअर करताना ते विस्कळित झालेले मला दिसले. कुतूहल म्हणून वाचू लागलो तर महाशयांनी त्यात मला अजिबातच अभिप्रेत नसलेली, लेखाची दिशा बदलून टाकणारी, आपल्या मनाची चार वाक्ये घुसडून दिली होती. खाली माझे नाव तसेच ! मी त्यांना याबाबत विचारणा केली असता ’तुमचा मुद्दा स्पष्ट करतो आहे.’ असा दावा त्यांनी केला. म्हटलं, ’बाळा, तुला एकतर मुद्दा कळलेला नाही किंवा माझ्या लेखाच्या पोटात तुझा प्रॉपगंडा घुसडतो आहेस.’
इथे एक मुद्दा मला स्पष्ट करावा लागेल. त्याने माझे लेखन शेअर करुन, त्याला प्रस्तावना म्हणून काही मुद्दे समाविष्ट केले असते आणि ते माझ्या लेखनाशी विसंगत असते, तरीही मी ते समजू शकतो. त्याने ते स्वत:चे आकलन म्हणून लिहिले असते. इथे खाली माझे नाव असल्याने ते मीच लिहिले असा समज होणार होता. त्याला तेच अभिप्रेत होते का मला ठाऊक नाही.
या घटनेनंतर मी ’लेखन/पोस्ट शेअर करायचे तर माझ्या वॉलवरुन लिंकच शेअर करा, कॉपी-पेस्ट नको, भले पोहोच कमी राहिली तरी चालेल’ असा आग्रह धरु लागलो. पण या पलिकडे मला करण्यासारखे फार काही नाही. लेखन मुळातच कॉपी करता येऊ नये अशी तरतूद करणे हाच एकमेव उपाय. पण फेसबुक वा मराठी संस्थळांवर, वृत्तपत्रांच्या वा केवळ ऑनलाईन अस्तित्व असणार्या पोर्टल्सवर माझा काडीचाही कंट्रोल नसतो. त्यांनी स्वत:च पुढाकार घेऊन तसे केले असेल तरच मला त्याचा फायदा होऊ शकतो. (टाईम्स गटातील पोर्टल्स काही प्रमाणात हे करतात असे दिसते. कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास निवडलेल्या भागापैकी थोडाच भाग कॉपी होतो नि उरलेल्या मजकुराऐवजी साईटचा पत्ता येतो.) त्यामुळे सोपा उपाय म्हणून दीर्घ लेखन करायचे असेल तर मी ते प्रथम ब्लॉगवर लिहून त्याची लिंक फेसबुकवर शेअर करणे सुरू केले.
फेसबुकवर काही मंडळी पोस्ट करताना खाली (c) चिन्ह टाकून आपले नाव लिहितात. यातून कोणताही कॉपिराईट सिद्ध होतो असे मला वाटत नाही. शेअर वा लिंक देण्यापेक्षा पुरी पोस्ट कॉपी-पेस्ट केल्याने अधिक लोकांपर्यंत पोहोचते असा गैरसमज फेसबुकवर पसरलेला आहे. त्यामुळे बरीच मंडळी आवडलेली पोस्ट कॉपी करुन आपल्या वॉलवर पेस्ट करताना दिसतात. या प्रक्रियेत लेखकाचे नाव आपोआप लेखनाबरोबर जाते हा या पद्धतीचा मर्यादित फायदा. त्यामुळे एखाद्या कॉपिबहाद्दराने ते काढून टाकले नि आपलेच लेखन असल्याचा आभास निर्माण केला तर मूळ लेखकाने जाब विचारल्यावर ’तुमचे नाव लिहायचे विसरलो’ अशी मखलाशी करता येत नाही.
ब्लॉगवर आपल्या मजकुराचे रक्षण दोन प्रकाराने करता येते. पहिले म्हणजे कॉपीराईटचा आधार घेणे, आणि दुसरा म्हणजे मुळात तो कॉपीच करता येणारे नाही याची सोय करून ठेवणे.
कॉपीराईट प्रोटेक्शन
भारतात अत्यंत दुबळा असलेला सायबर-लॉ अजून द्वेषमूलक गुन्ह्यांविरोधात पुरेसा परिणामकारक ठरत नाही, तिथे एखाद्या पोस्टच्या मजकुराच्या कॉपिराईट उल्लंघनासाठी तो मदतीला येईल ही शक्यताच नाही. फारतर जिथे आपल्या मजकुराची कॉपी श्रेय न देता कॉपी केलेली दिसेल तिथे जाऊन त्याचा उल्लेख करणे, आपले श्रेय देण्याचा आग्रह धरणे, इतकेच करता येते. पण अडचणीचा मुद्दा असा, की अमुक एका ठिकाणी आपले लेखन कॉपी करुन टाकले आहे, हे कळणार कसे? हे तुम्हा-आम्हाला वैय्यक्तिकरित्या करणे, त्यासाठी सारे वर्ल्ड वाईड वेब शोधत बसणे अशक्यच आहे. त्यासाठी एखाद्या संगणकीकृत सेवेची/सर्व्हिसची मदत मिळाली तरच हे शक्य आहे.
यावर दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे ’गुगल अलर्ट’चा(Google Alert) वापर करणे. यात तुमच्या लेखनातील ठराविक, वैशिष्ट्यपूर्ण मजकुराचा भाग हा गुगल अलर्टला देऊन तो कुठेही आढळला की आपल्याला सूचना द्यावी असे सांगून ठेवता येते. (गुगलचे सरपट्टू ऊर्फ Crawlers हे सतत इंटरनेटवर सरपटत माहिती जमा करत राहतात. यात तुमच्या ब्लॉगचीही माहिती आली!) पण हे थोडे जिकीरीचे आहे. कारण तुमच्या लेखनातील अगदी व्यवच्छेदक म्हणावे असे तुकडे तुम्हाला शोधावे लागतात. अन्यथा ते इतर अनेक ठिकाणी वेगळ्या संदर्भात वारंवार येत असतील तर गुगल तुम्हाला सतत सूचना देत राहील आणि त्यातले बहुतेक सगळे फसवे ठरतील. दुसरा पर्याय आहे तो कॉपीसेन्ट्री (Copysentry) सारखी सर्व्हिस वापरण्याचा. ही सर्व्हिस तुमचा ब्लॉग तपासून त्यांच्या पद्धतीने ती माहिती सांभाळून ठेवते. (कुणी हॅशकोड Hashcode किंवा चेकसम checksum हे शब्द ऐकले असतील तर तुम्हाला समजेल) त्यानंतर गुगलप्रमाणेच (बहुधा गुगलच्याच Crawler/ Scrapers वर स्वार होऊन) ते ही इंटरनेटवर ही माहिती शोधत राहतात, नि सापडली की आपल्याला तशी इमेल पाठवतात. या दोनही पद्धतींच्या यशाची संभाव्यता अगदी कमी आहे.
यांच्या वापरात आणखी एक धोका असा, की यासाठी मुळात तुम्हाला तुमच्या ब्लॉगची संपूर्ण फीड या दोन सर्व्हिसेसना खुली करुन द्यावी लागते. आणि एकदा ती खुली केली की स्क्रेपिंगचे (एखाद्या विशिष्ट पानावरचे लेखन खरवडून जमा करत जाणे) थोडे तंत्र अवगत असलेला कुणालाही ती सहज उपलब्ध होते. त्यामुळे एकुणातच हा प्रकार फारसा उपयुक्त नाही असे माझे मत झाले आहे. त्यामुळे आता मजकूर शक्यतो कॉपी करताच येऊ नये याची काळजी घेणे, इतकेच ब्लॉगरला शक्य आहे.
इथे मी मजकुराच्या सुरक्षिततेबाबत बोलतो आहे. तुमचे स्वत:चे असे फोटो वा व्हिडिओ जर तुमच्या ब्लॉगचा भाग असतील, तर त्यांत वॉटरमार्कसारखे काही उपाय वापरून, कॉपीपासून संरक्षण नाही तरी निदान तुमचा ठसा त्यावर राहील याची खातरजमा करुन घेता येते.
कॉपी प्रोटेक्शन
ब्लॉग असो वा कोणतेही संस्थळ/वेबसाईट, त्यावरचा मजकूर कॉपी करण्यासाठी दोन-तीन पर्याय असतात. त्यापैकी पहिला म्हणजे हवा तो मजकूर कम्प्युटरच्या माऊसचा वा की-बोर्डचा वापर करून सिलेक्ट करणे आणि नंतर राईट-क्लिक करुन ’कॉपी’ पर्याय निवडणे किंवा Ctrl+C पर्याय निवडणे. हा पर्याय बंद करणे शक्य आहे. मी वापरलेल्या उपायांना बर्यापैकी यश मिळाले आहे.
ब्लॉग ही माझ्या संपूर्ण नियंत्रणातील वेबसाईट वा संस्थळ असते. मला त्यावर स्वत:चे असे कॉपी-प्रोटेक्शन टाकता येते. मी प्रथम एक तयार Javascript कोड विजेट म्हणून टाकला होता. कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यास तो एक उठवळ (pop-up) मेसेज देऊन तसे न करण्याबद्दल बजावत असे. मोबाईल थीमवर समास/विजेट नसल्याने हा उपाय अर्थातच चालत नसे. हा तसा इतर अनेकांनी वापरलेला कोड होता. पण बहुतेक सर्व ब्राउजर हे आता Pop-up blocker सह येत असल्याने अनेकांना मेसेज दिसत नसे, शिवाय Javascript देखील 'हॅकर्सना सोयीचे' असा निर्णय देऊन अनेक ब्राउजर बंद करुन ठेवत असतात. गुगल क्रोममध्ये Right Click and Copy करण्यासाठी Extensions तयार करुन दिली आहेत. Javascript वापरुन बंद केलेले राईट-क्लिक पर्याय यांच्याद्वारे पुन्हा खुले करून घेता येतात.
त्यानंतर मी HTML+CSS असा एक कोड वापरला, आणि तो विजेटवर वेगळा न ठेवता थेट मूळ थीमच्या कोडमध्येच घुसवून दिला. अर्थात कोणताच उपाय १००% बिनचूक नसतो. प्रोग्रामिंगची जाण असलेला त्यातूनही सहज मार्ग काढेल. पण इतके कष्ट करण्याइतके ते लेखन त्याला महत्वाचे वाटत असेल, तर त्याने ते कॉपी करुन जरुर न्यावे असेच मी म्हणेन.
फीड-कंट्रोल
तुमचे लेखन संपूर्णपणे इतरांच्या हातात पडण्याचा अन्य मार्ग म्हणजे ब्लॉगफीड. ब्लॉगरवर ईमेल सबस्क्राईब पर्याय जर तुम्ही वाचकांना दिला असेल, तर तुम्ही नवी पोस्ट लिहिलीत की ती आपोआप ईमेलद्वारे ब्लॉग सबस्क्राईब केलेल्यांपर्यंत पोचते. यातून तुमच्या ब्लॉगवर न येता त्यांना ती वाचण्याची सोय होते. त्याचबरोबर संपूर्ण कंटेंट, कोणत्याही सिलेक्ट+कॉपी पर्याय न वापरता त्यांच्या पदरी पडतो.
एकतर ब्लॉगवर येण्याची तसदी न घेता संपूर्ण लेखन वाचू इच्छिणार्यांची सोय पाहावी असे मला वाटत नाही. ’फेसबुक वा व्हॉट्स-अॅपवर पुरे लेखन टाका तरच आम्ही वाचू’ असा अगोचर आग्रह धरणार्यालाही मी वाटाण्याच्या अक्षता लावत असतो. लेखक हा उत्पादक आहे आणि त्याने आपल्या दारी येऊन उत्पादन विकण्याचा आटापिटा करावा ही अपेक्षा मला मान्य नाही. उलट माझे लेखन त्यांना काहीही न गुंतवता, एक पैसा न देता वाचावयास मिळत असेल, तर किमान त्यांनी माझ्या ब्लॉगवर येऊन ते वाचावे, त्यायोगे माझ्या ब्लॉगवरील वावर वाढवावा ही माझी अपेक्षा गैर आहे असे मला वाटत नाही.
यासाठी मला ब्लॉगफीडमध्ये काय द्यावे हे कंट्रोल करण्याचा पर्याय ब्लॉगर देतो. सबस्क्राईब करणार्याला संपूर्ण लेख नव्हे, तर केवळ लेखाचा केवळ एक भागच ईमेलद्वारे पाठवण्याचा पर्याय मी निवडतो. यातून नवे लेखन आल्याची सूचना मिळते आणि त्यात काय असावे याचा अदमास घेण्याइतपत मजकूरही. माझ्या मते इतके पुरेसे असते.
तुम्ही ब्लॉग-संग्राहक(blog aggregator) वापरत असाल, तर तुमची नवीन पोस्ट त्यांच्या सूचीत समाविष्ट करताना त्या मजकुरातील एक छोटा भाग ते ही त्यांच्या वाचकांसाठी जोडत असतात. हा तुकडा निवडण्यासाठी त्यांचाही स्वत:चा असा अल्गोरिदम असू शकतो. हा अल्गोरिदम, हा कोड, तुमच्या फीडद्वारे मजकूर घेत असतो. तुमची फीड पुरा मजकूर देत नसेल, तर त्यातून पुन्हा एक तुकडा काढताना कदाचित त्यांना काहीच हाती न लागण्याचा संभव असतो. पण तरीही सूचीमध्ये तुमच्या लेखाचे शीर्षक, ब्लॉगचे नाव दिसत असल्याने या साईड-इफेक्टकडे मी दुर्लक्ष करतो.
बॅक-अप
आपल्या लेखनाची एखादी प्रत सुरक्षित ठेवायची असेल, तर वृत्तपत्रांसह अन्य ऑनलाईन पोर्टल्स, फेसबुकसारखी समाजमाध्यमे यांवर केलेले लेखन तुम्हाला स्वतंत्रपणे आणि हेतुत: उतरवून ठेवावे लागते. संगणकावर वेगवेगळे सांभाळावे लागते. ब्लॉगचा फायदा असा की एकाच बॅक-अप सूचनेत तुमचा संपूर्ण ब्लॉग एका फाईलमध्ये उतरवून घेता येतो. याचा आणखी एक फायदा म्हणजे, ही फाईल अन्य एखाद्या ब्लॉगमध्ये इम्पोर्ट केली, की सर्व पोस्टस मूळ कमेंट वगैरेंसह समाविष्ट होतात. मी जेव्हा ब्लॉगरऐवजी वर्डप्रेसवर शिफ्ट होण्याचा विचार करत होतो, तेव्हा याच पर्यायाचा वापर करुन ब्लॉगरवरील माझे ब्लॉग तिकडे स्थलांतरित केले होते. एका मोठ्या ब्लॉगचे विषयाच्या आधारे एकाहुन अधिक वेगळे ब्लॉग करायचे असतील तर ते ही या पर्यायाचा वापर करुन साध्य करता येते.
मूळ मांडणीमध्ये(Theme) तुमच्या सोयीने - मी केले तसे- काही बदल केले असतील, तर मूळ मांडणीसह प्रत्येक बदलाच्या टप्प्यावरील मांडणीची एक-एक प्रत तुम्हाला तुमच्या संगणकावर वा मोबाईलवर साठवून ठेवता येते. जेणेकरुन बदल करताना काही अनपेक्षित घडले नि ब्लॉगची मांडणी बिघडली, तर सरळ मागची मांडणी पुन्हा आणून ब्लॉगची गाडी मूळपदावर नेता येते. माझ्या काही फसलेल्या प्रयोगातून सावरण्यासाठी मला याचा उपयोग झाला.
(क्रमश:)
पुढील भाग >>माझी ब्लॉगयात्रा - ६ : अनुक्रमणिका आणि सूची
अत्यंत माहितीपूर्ण लेखमालिका. या भागात पूर्ण लेखन हव्या त्या माध्यमात आले तर आम्ही वाचू असा काही लोकांचा आग्रह असतो असा उल्लेख आहे.माझ्या निरीक्षणाप्रमाणे अनेक भारतीयांसाठी आता व्हॉट्सअॅप म्हणजेच आंतरजाल असते. त्यांना एखाद्या लेखाचा दुवा पाठवला किंवा फोटो अल्बमचा दुवा पाठवला तर तुम्ही थेट मजकूर अन फोटोज पाठवले नाहीत म्हणून आम्ही पाहिलं नाही असे उत्तर मिळते. मी भारताबाहेर राहतो म्हणून व्हॉट्सअॅप न वापरता जगू शकतो. भारतात तसे करणे फारच आव्हानात्मक असू शकते.
उत्तर द्याहटवाहोय. एकुणातच ’लेखकाला गरज आहे. त्याने आमच्याकडे यावे’ हा माज वाचकांमध्ये मला दिसतो आणि बोचतो. वृत्तपत्रांशिवाय इतर छापील मजकुराशी ज्यांचा संबंध येत नाही अशा सामान्यांचे व्हॉट्स अॅपवर अवलंबून राहणे मी समजू शकतो. त्यांच्या दृष्टीने माहिती मिळवण्याचा सोपा स्रोत निर्माण झाला आहे. एरवी विकत घेणे तर सोडाच, ते ग्रंथालयात जाऊन पुस्तके आणण्याच्या फंदात पडणार नसतात.
हटवापण त्याच बाबती पुस्तकांसह इंटरनेट नियमित वापरणार्या सुखवस्तू मंडळींचा आग्रह मला मान्य नाही.