रविवार, २४ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ८ : केल्याने प्रसिद्धी

माझी ब्लॉगयात्रा - ७ : मोबाईल-विशेष << मागील भाग
---

इतरांकडून शिकावे

आपल्या लेखनाची, ब्लॉगची, वेबसाईटची जाहिरात कशा तर्‍हेने करावी, वाचकांना कसे खेचून आणावे, त्यांना पकडून कसे ठेवावे, याची उदाहरणे विविध वेबसाईट्सवर दिसत असतात. बारकाईने लक्ष दिले तर, आपणही ती वापरु शकतो का, आपल्या ब्लॉगसाठी ती उपयुक्त ठरु शकतात का, याची चाचपणी करुन पाहता येते.

MaTaa

एक 'केस-स्टडी' म्हणून maharashtratimes.com वेबसाईट पाहता येईल. वेबसाईट ओपन केल्यावर सर्वात वरच्या बाजूला महाराष्ट्र टाईम्सच्या लोगोच्या बरोबर खाली ’ट्रेडिंग’ची पट्टी दिसते. पॉप्युलर- म्हणजे सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखांकडे जाण्यासाठी वाचकाला दिलेला शॉर्टकट आहे. त्याच्या विरुद्ध दिशेला उजवीकडे वर ’रीड अ‍ॅंड अर्न’ची (Read and Earn) लिंक दिसते. इथे वाचकांना लॉगिन करुन मग इथले लेख, बातम्या वाचण्यास उद्युक्त केले जाते. यातून संस्थळाला त्यांचा वाचनाचा कल नि त्यावरील डेटा जमा करता येतो.

याशिवाय वेबसाईट लोड होताक्षणीच उजव्या बाजूला खाली एक व्हिडिओ दाखवणारी तरंगती (Floating) विंडो (मूळ पानाचा भाग नव्हे)दिसू लागते. एखादा लेख/बातमी बराच वेळ ओपन राहिली, तर खाली पण डावीकडे स्टार रेटिंगची (star rating) अशीच तरंगती विंडो ओपन होते. हिच्याद्वारे वाचकाने त्या लेख वा बातमीला आपल्या मतानुसार रेटिंग द्यावे अशी अपेक्षा असते. हे चारही कोपरे वापरुन झाले, आता मध्यभागाची पाळी येते. थोड्या वेळाने एक मोठी तरंगती विंडो मध्यभागी ओपन होते. यावर सहा लेखांची शिफारस केलेली असते.

इतके पुरे नसते म्हणून वरच्या बाजूला विविध मेन्यूही दिसतात; ज्यात गावांनुसार, विषयानुसार वर्गवारी निवडून केवळ त्यांच्याशी संबंधित लेख वाचण्याची सोय करुन दिलेली आहे.

आता एखादा लेख बातमी निवडून तुम्ही उघडता. लेख/बातमी यांच्या मजकुराच्या अधेमध्ये त्या लेखातील काही महत्वाचे शब्द वा विषय यांच्याशी संबंधित अन्य लेखांच्या लिंक्स ’क्लिक करा आणि वाचा’ या जाहिरातस्वरूपात दिलेल्या असतात. या खेरीज यू-ट्यूबप्रमाणे उजवीकडे एक समास ठेवून, त्यात ताज्या लेखांची सूचीही दिलेली असते. त्याशिवाय एक व्हिडिओंची सूची, आणि त्याखाली ’ट्रेडिंग टॉपिक्स’ची आणखी सूची असते. लेख/बातमीचा शेवट आला की खाली पुन्हा ’संबंधित स्टोरीज’चा स्लाईड-शो दिसतो, ज्यावरुन पुन्हा अन्य लेखांकडे जाता येते.

त्याच्या खाली ’महत्त्वाचा लेख’ म्हणून आणखी एका लेखाची शिफारस दिसते. वरचा स्लाईड शो इमेजेसचा आहे, तर हा फक्त शीर्षकांचा असतो. एवढे पुरेसे नसते; एक लेख संपला, की लगेच खाली पुढचा सुरू होतो. तुम्हाला क्लिकही न करता ’पुढचे पान’ वाचण्यास सुरुवात करता येते

महाराष्ट्र टाईम्सची ही वेबसाईट एखाद्या बँकेच्या, आयटी कंपनीतल्या अकाऊंट मॅनेजरच्या गळेपडूपणालाही लाज आणेल इतके फासे, इतकी जाळी वाचकाभोवती टाकून त्याला जखडून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. या अनेक पर्यायांपैकी आपल्या लेखनाला पूरक ठरणारे, आणि आपल्या मते वाचकाला त्रासदायक वाटणार नाहीत, असे पर्याय निवडून आपल्या ब्लॉगवर समाविष्ट करत वाचकाला त्यावर अधिकाधिक काळ रेंगाळण्यास, वाचण्यास उद्युक्त करता येईल.

केल्याने प्रसिद्धी

तुमचे लेखन वृत्तपत्रांत वा नियतकालिकांमध्ये प्रकाशित केलेत तर प्रसिद्धीसाठी तुम्हाला वेगळे काही करावे लागत नाही. कारण ही माध्यमे जनमाध्यमे आहेत. त्यांचे ग्राहक आधीच निश्चित आहेत, ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच आहेत. ब्लॉगचे तसे नाही. ते तुमचे खासगी माध्यम आहे. त्यामुळॆ त्याच्यावरील लेखनाच्या प्रसिद्धीसाठी तुम्हाला स्वत:ला खास प्रयत्न करावे लागतात.

Aggregator

शिफारस ही तुमच्या ब्लॉगच्या अखत्यारितला मामला होता. पण त्या बाहेरही तुमच्या लेखनाची जाहिरात करायची, तर पहिला पर्याय आहे तो ब्लॉग संग्राहक(aggregators). यांचा उल्लेख पहिल्या भागात आला आहे. हे ब्लॉगसाठी एखाद्या वृत्तपत्रांसारखे काम करतात. अनेक जण आपले ब्लॉगवर लेखन करतात/पोस्ट लिहितात, नि हे संग्राहक त्यांना एका जागी उपलब्ध करुन देतात. ज्याप्रमाणे सकाळी वृत्तपत्र वाचतो, त्याप्रमाणॆ हा संग्राहक उघडून एक एक लेखन वाचत जाता येते.

 ब्लॉग सुरु केल्यावर एकदाच तो इथे रेजिस्टर केला की काम झाले. पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन पोस्ट लिहाल, तेव्हा त्या पोस्टचे शीर्षक आणि थोडासा मजकूर हे संग्राहक आपल्या सूचीमध्ये समाविष्ट करतात. तिथे भेट देणारे वाचक आपल्या रुचीनुसार वेगवेगळ्या ब्लॉगलेखकांच्या पोस्ट्स वाचू शकतात. मला स्वत:ला मराठी ब्लॉग लिस्ट (https://marathibloglist.blogspot.com/) मराठी ब्लॉग्स (https://marathiblogs.in/) आणि मराठी ब्लॉगर्स (https://www.marathibloggers.net/) हे तीन संग्राहक उपयुक्त ठरले आहेत.

SocialMedia

पुढचा लोकप्रिय पर्याय आहे तो अर्थातच समाजमाध्यमांचा. व्हॉट्स-अ‍ॅप (WhatsApp), टेलेग्राम(Telegram) आणि फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांमध्ये ब्लॉगवरील लेखनाची लिंक शेअर करणे प्रसिद्धीसाठी उपयुक्त ठरते. इथेही बरेच संभाव्य वाचक एका संख्येने उपस्थित असल्याने लेखनाची त्यांच्यासमोर आयती जाहिरात करुन घेता येते. व्हॉट्स-अ‍ॅपवर फेसबुकच्या 'स्टोरी'प्रमाणेच ’स्टेटस्‌’ नावाचा प्रकार आहे. दोन्हींकडे हे प्रकार चोवीस तास दिसत राहतात, नि नंतर नाहीसे होतात. फेसबुक-पोस्ट आणि व्हॉट्स-अ‍ॅप वा टेलेग्रामवरील वैय्यक्तिक मेसेज हा मात्र स्थिर पर्याय आहे.

नुसती लिंक शेअर करण्याऐवजी, चित्रपटाचा ट्रेलर असतो त्या धर्तीवर थोडा मजकूर आणि लिंक शेअर केल्यास लिंकवर क्लिक करुन लेखन वाचले जाण्याची संभाव्यता बरीच वाढते. पण असे करण्यात एक धोका म्हणजे तेवढाच मजकूर ही पोस्ट समजून, संदर्भ ध्यानात न घेता तिचे आकलन केले जाऊ शकते नि प्रतिसाद दिला जाऊ शकतो. याखेरीज काही मंडळी फेसबुकवर शेअर करताना अनेक संभाव्य वाचकांना टॅग करण्याचा मार्ग वापरतात. मला स्वत:ला इतका गळेपडूपणा आवडत नाही. अगदी व्हॉट्स-अ‍ॅप वा टेलेग्रामवरही मोजक्या दहा लोकांना मी नव्या लेखनाची लिंक पाठवत असतो. यातही प्रामुख्याने फेसबुकवर नसलेल्यांचा समावेश असतो.

त्या पलिकडे काही जण म्हणतात की, ’पुरे लेखनच इथे - म्हणजे फेसबुक वा व्हॉट्स-अ‍ॅप वा टेलेग्राम चॅट विंडोमध्ये - पेस्ट करा, आम्हाला क्लिक करायचा कंटाळा येतो.’ आपल्या धोरणाचे समर्थन म्हणून ’फेसबुकवर लिंकपेक्षा कॉपी-पेस्ट केलेले लेखन अधिक पोचते’ असा दावा करतील. लेखक हा उत्पादक आहे आणि त्याने आपले उत्पादन आमच्या दारी येऊन विकतच नव्हे तर फुकट द्यावे हा माज मला अमान्य आहे.

माझे लेखन मी जर तुम्हाला फुकट वाचायला देतो आहे, तर निदान एक क्लिक करुन माझ्या ब्लॉगवर ते वाचावे, माझ्या ब्लॉगवरची वावरसंख्या एकने वाढवावी, हा माझा आग्रह अस्थानी आहे असे मला वाटत नाही. ’समोर आले तर वाचेन नाही तर आवर्जून येऊन वाचणार नाही’ असा त्यांचा बाणा असेल तर ’आझे लेखन वाचनीय असेल तर त्याचा वाचक माझ्या ब्लॉगवर येईलच’ हा माझाही बाणा आहे. त्यामुळे अशा ’द्या खाटल्यावरी’ वृत्तीच्या वाचकांकडे सरळ दुर्लक्ष करावे. हे लोक दोन शेपटांच्या उंदराचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तुमचे लेखन, एकाच चवीने पाहात वा वाचत असतात. ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये काकाजींनी ’जो वर्तमानपत्राचा कागद आणि केळ्याची साल एकाच चवीने खातो तो स्थितप्रज्ञ’ ही केवळ वैतागातून वा थट्टेने केलेली व्याख्या यांना तंतोतंत लागू पडत असते. 'हे आपले वाचक नाहीत' असे समजून सोडून द्यावे, निदान मी देतो.

ब्लॉगवरचे लेखन लिंक म्हणूनच फेसबुक वा व्हॉट्स-अ‍ॅपवर शेअर करण्याचा आणखी एक फायदा असा, की नक्की किती जणांनी हे लेखन उघडून पाहिले हे समजते. अलिकडचेच उदाहरण घ्यायचे तर ’कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने’ हा लेख मी इथेच ’रमतारामाच्या विश्रांतीस्थळावर’ लिहिला नि फेसबुकवर शेअर केला. तिथे पंचाहत्तरहून अधिक लाईक्स होते आणि इकडे ब्लॉग जेमतेम पस्तीस वाचने दाखवत होता. फेसबुक लाईक्स किती फसव्या असतात याचे हे उत्तम उदाहरण.

कुणी म्हणेल, 'तुम्ही पुरा लेख तिथे टाकलात तर लाईकबरोबर वाचलाही जाईल.' पण हा दावा फुसका आहे. पोस्ट मोठी असली की फेसबुक पहिल्या काही ओळी दाखवून खाली 'See More'ची लिंक देतो. तुम्हाला आवश्यक वाटल्यास त्यावर क्लिक करुन पुरी पोस्ट उघडून वाचू शकता. ही जी मंडळी लाईक करतात, पण लिंकवर क्लिक करत नाहीत, ती ’See More’ या लिंकवरही क्लिक करत नाहीत असा माझा होरा आहे. (आणि 'त्यावर क्लिक करत असतील तर ब्लॉगलिंकवर का नाही?' हा माझा प्रश्न आहे.) त्यामुळे पुरा लेख तिथे पेस्ट केला, तरीही ते वाचणार नाहीत, फक्त लाईकचे देणे देऊन पुढे जाणार आहेत हे उघड आहे. त्यामुळे 'पुरा लेख तिथे टाकला तर अधिक वाचला जातो' यावर माझा विश्वास नाही. याउलट ब्लॉगवरील लेखन उघडणारा खरोखरच वाचण्याच्या उद्देशाने आलेला आहे हे गृहित धरता येते. उघडणार्‍यांपैकी बहुसंख्य वाचतही असतील असा माझा समज आहे.

तूर्त ब्लॉगबाबत इतके करून मी थांबलो आहे. या पलिकडे थीम्समध्ये काही प्रयोग करतो आहे. ते जमले तर याचा पुढचा भाग टाकेन. तोवर हॅपी ब्लॉगिंग.

- oOo -

पुरवणी : केल्याने प्रोग्रामिंग

या संपूर्ण लेखमालेमध्ये कोड आणि प्रोग्राम यांचा वारंवार उल्लेख आलेला आहे. Javascript, HTML, CSS या भाषांचाही. परंतु सार्‍या प्रवासाचे दस्त ऐवजीकरण हा मुख्य हेतू आहे. त्यापलिकडे एखाद्या ब्लॉगलेखकाला आपला ब्लॉग अधिक उपयुक्त, अधिक वावर असलेला कसा बनवता येईल याच्याबद्दल यातून काही मिळावे असा हेतू आहे. प्रोग्रामिंग शिकवणे हा अर्थातच नाही. पण तरीही काही जणांकडे ते कौशल्य असेल, तर त्यांच्या मदतीसाठी काही संस्थळे/वेबसाईट्सचे पत्ते देऊन ठेवतो.

https://www.w3schools.in/ : सर्वात महत्त्वाची साईट. इथे Javascript, HTML आणि CSS या तीनही भाषांसाठी मदत( Help) उपलब्ध आहे. शिवाय एक सोपा एडिटर (Editor) उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमचे कोड/प्रोग्राम तुम्ही तपासून पाहू शकतात. क्वचित इथे व्यवस्थित चालणारा कोड ब्लॉगमध्ये चालत नाही असे होऊ शकते. प्रोग्रामिंगबाबत थोडी प्राथमिक माहिती असणारे ही समस्या दूर करु शकतात.

आणखी काही उपयुक्त संस्थळे/वेबसाईट्स:

ब्लॉगर कम्युनिटी: https://support.google.com/blogger/community?hl=en

कम्युनिटीवरील आधीच्या चर्चा: https://support.google.com/blogger/threads?hl=en

ब्लॉगरसेन्ट्रल: https://www.bloggersentral.com/

https://www.mybloggertricks.com

https://helplogger.blogspot.com/

https://probloggerplugins.blogspot.com/


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा