’वेचित चाललो...’ वर नवीन:   

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - २

#मालिकाआणिमी

आजवर आपण पाहिलेल्या बव्हंशी गुन्हेगारी कथांमध्ये आणि ’ओझार्क’मध्ये एक फरक आहे. यातील कथानक हे एका कुटुंबाच्या प्रवासाची कहाणी म्हणून, त्याला केंद्र मानून मांडलेले असल्याने प्रेक्षक त्या कुटुंबाच्या नजरेनेच ते पाहतो आहे. त्यांच्या सुखदु:खाच्या संदर्भातच इतर सर्व गोष्टींचे, घटनांचे मूल्यमापन करतो आहे. मार्टीने पैसे जिरवण्यासाठी निवडलेल्या ओझार्कचा इतिहासही रोचक आहे. १९२८च्या जागतिक मंदीच्या काळात युनिअन इलेक्ट्रिक कंपनीने बांधलेल्या धरणामुळे तयार झाले आहे. मालिकेत असा उल्लेख आहे की रोजगार निर्मितीसाठी (आपल्याकडील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर) बांधले गेले. थोडक्यात पैसा निर्माण करण्यासाठीच त्याची निर्मिती झाली. मार्टी आपल्या धन्याचा पैसा मुरवायला याच तळ्याभोवतीच्या अर्थव्यवस्थेचा वापर करतो आहे, ही संगती उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळी अंमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे (racket) असणे ओघाने आलेच. त्यामुळे ज्या ड्रग माफियांचा पैसा तिथे जिरतो आहे, त्यांचे स्थानिक स्पर्धकही तिथे आहेत. एका बाजूचा पैसा जिरवण्याचे उपाय शोधता शोधात मार्टिन एक एक करुन इतर बेकायदेशीर, धोकादायक, अति-महत्त्वाकांक्षी आणि बेमुर्वत अशा व्यावसायिकांच्या जाळ्यातही गुरफटत जातो आहे. एक प्रश्न सोडवण्यासाठी शोधलेला उपाय त्याच्यासाठी नवी समस्या घेऊन येतो आहे. सुरुवातीच्या काळात, त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयापाठी एक मृत्यू घडतो आहे. त्याला मार्टी थेट जबाबदार नसला तरी त्यांच्या तपासाचा माग पुन्हा पुन्हा त्याच्यापाशी येऊन भिडतो आहे. गुन्हेगारीचे जाळे त्याच्याभोवती एक एक फास टाकत त्याला जखडू लागते आहे.

अंमली पदार्थाचा व्यापार म्हणजे अर्थातच गुन्हेगारी, हिंसा, हत्या हे ओघाने आलेच. पण वर म्हटले तसे हिंसा अथवा हत्या एकरंगी असते असे मात्र नाही. केवळ वर्चस्वाची लढाई म्हणून वा शत्रूचा काटा काढण्यासाठीच हत्या होतात असे मुळीच नाही. हत्यांमध्ये क्षणिक क्षोभातून होणारी हत्या (डार्लिन’ने केलेली ’डेल’ची हत्या), आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अपरिचिताची केलेली हत्या (’बडी’ने केलेली हत्या), कुणाचा परिचिताचा जीव वाचवण्यासाठी किंवा आपल्या स्वार्थाआड येऊ नये म्हणून जवळच्या व्यक्तीची केलेली हत्या (रूथने रस आणि बॉयडची केलेली हत्या) फसवणुकीचे प्रायश्चित्त म्हणून केलेली हत्या (ब्रूसची डेलने केलेली हत्या), एखाद्या निरपराध्याची केवळ तिसर्‍याच व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी केलेली हत्या (ब्रूसच्या गर्लफ्रेंडची डेल ने केलेली हत्या), त्याच प्रकारे हत्येचा मागमूस न ठेवता केलेली निरपराध व्यक्तीची हत्या (मेसनच्या पत्नीची स्नेल पती-पत्नींकरवी केली गेलेली अधाहृत हत्या), आपल्याला हवी ती माहिती अनधिकाराने मागणी केल्याने न देणार्‍या सामान्य व्यक्तीची सहज केलेली हत्या (अ‍ॅटर्नीने डेलच्या खुनाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजसाठी केलेली हत्या), आपल्या स्वार्थाला धक्का देणारे कृत्य - दुसर्‍या दबावाने, नाईलाजाने - केल्याबद्दल साथीदाराला दिलेले शासन (स्नेल कुटुंबाने स्ट्रिप-क्लब मालकाची केलेली हत्या) आणि परिस्थितीवश, अपघाताने घडलेली हत्या (मेसनचा मृत्यू) असे विविध हेतू दिसून येतात. हत्या हा सर्वात सोपा निवाडा आहे अशीच त्या जगाची शाळा शिकवते आहे. आपण फक्त पैशाचे व्यवहार करणारा मार्टी त्या यंत्रणेच्या जाळ्यात रुतत जातो, त्यातले काही धागे स्वत:ही विणत जातो तेव्हा एका टप्प्यावर त्याच्याही हातून हत्या होते, तेव्हाच त्याच्या चेहर्‍यावर पस्ताव्याची पहिली खूण दिसते.

हत्यांच्या विविध जातकुळींप्रमाणॆ विविध जातकुळींचे गुन्हेगार आपल्याला भेटत राहतात. अध्याहृत, समोर न येणारा ड्रग लॉर्ड, त्याच्या व्यवहाराचा चेहरा असलेला डेल, गुन्हेगारीची ओल अंगाला लावून बाहेर आलेला बडी, व्यवसायवृद्धीऐवजी केवळ दहशतीवर खंडणीखोराच्या पातळीवर जगणारा कॉसग्रोव्ह हा त्याचा जुना मित्र, स्थानिक पातळीवर हेरॉईनचे उत्पादन आणि वितरण करणारे स्नेल दांपत्य, ड्रग लॉर्ड्च्या सार्‍या साम्राज्याला कायद्याच्या कचाट्यापासून दूर ठेवणारी त्याची अ‍ॅटर्नी (ही स्त्री आहे हा एक विशेष नोंदवून ठेवण्याजोगा मुद्दा), आणि त्याच्या पैशाला कायदेशीर चलनाच्या स्वरुपात मुरवणारा मार्टी. हे शेवटचे दोघे अस्सल अट्टल पांढरपेशे गुन्हेगार. यांच्याबरोबरच स्थानिक पातळीवर फुटकळ गुन्ह्यांबद्दल कुप्रसिद्ध असलेले लॅंगमोर कुटुंबिय. त्यात तुरुंगात असलेला केड आणि बापाच्या अनुपस्थितीत दोन काका आणि दोन पुतणे यांच्या कुटुंबाची विशीच्या आतच पोशिंदी होऊन बसलेली रूथ हे ही आहेत.

मार्टी हा पांढरपेशा जगातला, वैयक्तिक फायद्यासाठी त्याने गुन्हेगारी जगाची साथ धरली आहे. रूथचे नेमके उलट आहे. बौद्धिक बाजूचा पूर्ण अभाव असलेल्या कुटुंबात, गुन्हेगारी जगातच लहानाची मोठी झालेली ती मार्टीचे बोट धरून त्यातून बाहेर पडण्याची, पांढरपेशा जगात पाऊल टाकण्याची उमेद बाळगून आहे. या मुलीचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे आहे. एका बाजूने ती केड लँगमोर या किरकोळ पण अस्सल दक्षिणी माज असलेल्या आपल्या बापाची मुलगी असल्याने अनेक लहान-मोठे गुन्हे तिच्यावर नोंदवले गेले आहेत. त्या परिसरात तिची ओळख गुन्हेगार म्हणूनच आहे. मार्टी प्रथम नाईलाजाने आणि नंतर तिच्या कामाच्या झपाट्याने तिच्यावर विसंबू लागतो, तेव्हा रूथही थोडी त्याच्यात गुंतत जाते. त्याच्यात आपल्या बापाला पाहू लागते. तिचे बापाबद्दलचे नातेही काहीसे व्यामिश्र आहे. कदाचित लहानपणी ’माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट’ म्हणणार्‍या बालकाची ती वय वाढलेली आवृत्ती आहे. ती बेगुमान जगणार्‍या बापाकडे एक रोल मॉडेल म्हणून नकळत पाहते आहे. त्याला तुरुंगात भेटायला जाताना आवर्जून मेकप करुन जाणार्‍या रूथच्या त्या आकर्षणात हलकासा जांभळा रंगही मिसळला आहे. फुटकळ गुन्हेगारी करणार्‍या बापाहून अधिक बुद्धिमान, अधिक मोठी कामे पार पाडणारा, अनेक बड्या प्लेअर्सना सांभाळत व्यावसायिक वाटचाल करणारा मार्टी तिला अधिक ’बापमाणूस’ वाटू लागला आहे. त्याचबरोबर तिला गुन्हेगारी शिक्का पुसून एक समाजमान्य रोजगार करण्याची संधी त्याच्यामुळेच मिळाली आहे. आपल्या सद्य जीवनातल्या खातेर्‍यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तिला त्याच्या रूपाने दिसतो आहे.

प्रथम मार्टीची हत्या करुन त्याचे पैसे लुटण्याचा प्लान करणारी रूथ नंतर त्यामुळेच त्याच्या हत्त्येचा कट करणार्‍या तिच्या दोन्ही काकांचा काटा निष्ठुरपणे दूर करताना दिसते. तर दुसरीकडे आपल्या चुलत भावंडानाही आपल्या सोबतच या भणंग आयुष्यातून बाहेर काढण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी तिला मार्टीच्या मदतीची गरज आहे. आणि असे असले तरी ’मूळ स्वभाव जाईना’ या उक्तीनुसार ती कुवतीपेक्षा खूप मोठी उडी घेण्याचा प्रयत्न करते आहे, अवास्तव मागणी करते आहे. मार्टीकडून ती मान्य केली न गेल्याने नाराज होते आहे. एकाच वेळी अत्यंत खुनशी, बेडर, निर्ढावलेली ही मुलगी आई-बापांच्या छत्राविना वाढल्याने आणि दोन नालायक काकांमुळे अकाली जबाबदारी अंगावर पडल्याने तशी झाली, की तिच्या गुणसूत्रांतून आलेल्या वारशामुळे हे सांगणे अवघड आहे. कारण मार्टीला ठार मारण्यास गेलेल्या दोनही काकांचा निष्ठुरपणे मृत्यू घडवून आणल्यानंतर मार्टीच्या सहवासात ती कोसळते. त्याचे बरेवाईट झाले असते या कल्पनेने तिचा थरकाप होतो. एका परक्या व्यक्तीबाबत ही भावना आणि रक्ताच्या नात्यांतील सर्वात जवळच्या व्यक्तींचा सहज खून करणे अशा परस्परविरोधी गुणावगुणांचा तिच्यामध्ये संचय झालेला आहे. आपल्याकडे लालसेने, लैंगिक आसक्तीने पाहणार्‍या आजोबाच्या वयाच्या म्हातार्‍याला थेट धडा शिकवण्याचे धाडस, तो बेगुमानपणा तिच्यात आहे, त्याचवेळी घरातील थोडीफार बुद्धी असलेल्या चुलत भावाकडून तिला कर्तृत्वाची अपेक्षा आहे. बापाच्या मृत्यूनंतर बेफिकिर, कडवट बनलेल्या त्याला पाहून तिच्या पोटात कालवाकालव होते. तिला त्याने शिकून मोठे व्हावे नि या खातेर्‍यातून बाहेर पडावे असे मनापासून वाटते आहे. त्यासाठीच ती मार्टीच्या सहाय्याने आपली आर्थिक स्थिती भक्कम बनवून त्याच्या शिक्षणाची सोय करण्याची धडपड करते आहे... जेमतेम एकोणीस वर्षाच्या या पोरीच्या आयुष्याचा हा सारा गुंता आपलाही जीव घुसमटून टाकणारा आहे.

पण हे दोघे जरी प्रामुख्याने समोर येत असले तरी आधी म्हटल्याप्रमाणॆ या सार्‍या कथानचा केंद्रबिंदू आहे ते मार्टीचे कुटुंब. त्याच्या पत्नीच्या मार्टीसोबतच होणार्‍या नैतिकतेच्या स्खलनाचा उल्लेख वर आला आहेच. ’रेगे’मध्ये पाहिले तसे केवळ पाण्यात एक बुडी मारून बाहेर यावे असे समजणारा अनिरुद्ध रेगे आपण पाण्यात नाही तर Quicksand Pit मध्ये पाऊल टाकले आहे याचा अनुभव घेतो तसेच मार्टीच्या पत्नीचेही होते. रेगेच्या मृत्यूने त्याची ’सुटका’ लवकर होते, पण वेंडी मात्र हळूहळू त्यात रुतत जाते, सक्रीय सहभाग घेऊ लागते... निर्ढावते!

अशा स्थितीत मुलांपासून हे सारे दडवणॆ अर्थातच अशक्य होत जाते. शिकागो सारख्या महानगरातून ओझार्कसारख्या मोसमी व्यावसायिक आणि म्हणून अतिशय कमी वस्तीच्या दक्षिणी(!) गावात बंदुकांची मालकी अपरिहार्य. आणि मुलांना तिचे आकर्षणही सार्वत्रिकच. मुलींना बार्बी नि मुलांना खेळण्यातील बंदूक भेट देणे हा अगदी भारतासारख्या देशातही अलिखित नियम. या आकर्षणातून मार्टीच्या मुलाचा, जोनाचा, खर्‍या बंदुकीपर्यंतचा प्रवास ओघाने आलाच. पण शिकारीमध्ये पहिले हरीण ठार मारल्यावर काहीशा संवेदनशील वयातला तो आयुष्यातल्या पहिल्या संभ्रमाचा सामना करतो आहे. एका क्षणी घरात घुसलेल्या पुंडावर बंदूक रोखलेल्या त्याला त्याच्या आईने त्याला हल्ला करणार्‍याला शूट करण्याची नजरेनेच केलेली खूण त्याला आठवते. अशा दोन प्रकारे हत्येचे समर्थन होऊ शकते, नव्हे ’खोटे कधी बोलू नये’ सांगणारी आईच एका प्रसंगात त्याला तसे सुचवते, याची अगदी लहान वयात झालेली जाणीव त्याला हादरवून सोडते आहे. पण असे असतानाही आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या बापाच्या पावलावर पाऊल टाकून शेल कंपन्यांच्या आडून चोरलेले पाच हजार डॉलर मात्र तो अगदी सराईतपणे जिरवतो आहे. इतकेच नव्हे तर बाराव्या वर्षी त्याने आत्मसात केलेले हे कौशल्य ’एकदाच वापरु हं’ (!) म्हणत त्याची आईही सहजपणे वापरुन घेते आहे. अचानक नव्या जगात येऊन पडल्याने सैरभैर झालेली मुलगी शार्लट सहजपणे मारुऽवानाच्या सेवनाच्या मार्गे जाते आणि हे समजूनही मार्टी जणू ’मुलगी मोठी झाली की डेटिंग करणार तसेच ड्रग्ज* घेणार’ हे गृहित धरुन त्याबाबत फारसे काही करताना दिसत नाही.

शिकागोमधील एक पांढरपेशे कुटुंब दक्षिणेतील गुन्हेगारी जगात मुरत मुरत जाते...

(समाप्त)


-oOo-

उपसंहार:
काही आठवणी अथवा संगती या मजेशीर असतात. किचनमध्ये एखादे काम तन्मयतेने करत असताना लिव्हिंग रुममध्ये चालू असलेल्या टीव्हीवर चालू असलेल्या एखाद्या कार्यक्रमातील संवाद कानी पडत असतात. पुढे तेच काम करत असताना टीव्ही बंद असेल किंवा दुसराच कार्यक्रम चालू असेल तरी त्याची दखल न घेता मनात पूर्वी ऐकलेले ते संवाद मनात उमटू लागतात. एखाद्या खेळाडूच्या विक्रमाबद्दल बोलताना त्या नेमक्या क्षणी टीव्हीवर पाहिलेली जाहिरात आठवते. असेच काहीसे मिसौरी म्हटले की माझे होते.

वीणा गवाणकर यांच्या (तब्बल चव्वेचाळीस आवृत्त्या निघालेल्या) ’कार्व्हर’ या पुस्तकात मिसौरीतल्या डायमंड ग्रोव्हचा उल्लेख आहे. तेथील काही शिखरांची चित्रे छोट्या कार्व्हरने अतिशय यथातथ्य चितारल्याची दाद त्याला अपरिचित स्त्रीकडून मिळते असा तो हृद्य प्रसंग आहे. त्यामुळे मिसौरी, ओझार्क यांची माझ्या मनात त्या न पाहिलेल्या सौंदर्याशी सांगड घातली गेली होती. आता ओझार्क पाहिल्यावर ती तुटून गेली आहे. आता ओझार्क म्हटले की मला आपल्या बौद्धिक कौशल्यावर फाजील विश्वास ठेवून, धनलोभाने गुन्हेगारीच्या जाळ्यात गुरफटत जाणारा मार्टीच आठवत राहील. एका आवडलेल्या मालिकेने दिलेला हा नकारात्मक वारसा!

अलीकडचा वास्तववाद हा सौंदर्याची, विश्वासाची, स्निग्ध भावाची, माणुसकीची हत्या केल्यानेच का सिद्ध होतो ; जगण्यातले वास्तव हे सारे असे कुरूपच असते असे या साहित्यिकांना अथवा माध्यम-लेखकांना का वाटते?; वाचकाच्या अथवा प्रेक्षकाच्या तोंडावर हे असे जगण्यातले सडलेपण, ही विरूपता फेकूनच आपल्या लेखनाला दर्जेदार असल्याचे सर्टिफिकेट मिळते असा विश्वास त्यांना का वाटतो?; सद्गुण, निर्मिती, आपुलकी, बांधिलकी हे वास्तव नसते का?... हे मला सतत छळणारे प्रश्न पुन्हा एकवार माझ्यासमोर फेर धरुन नाचू लागतात.

------

*एक तपशीलाचा मुद्दा आहे. मारुऽवाना, वीड, ग्रास किंवा आपल्याकडे ज्याला गांजा म्हटले जाते त्याला कायदेशीर वापराची परवानगी असावी अशी चळवळ त्याच्या काही आरोग्यदायी गुणधर्मांना समोर ठेवून उभी केली जात आहे. (मध्यंतरी ’सिक्रेट इन्ग्रेडिएंट’ नावाचा एक गंमतीशीर चित्रपटही त्यावर आला होता.) त्यामुळे त्याला ड्र्ग्जच्या यादीत ठेवावे की नाही यावर मतमतांतरे आहेत. माझ्या मते तो पदार्थ कोणत्या हेतूने सेवन केला जातो ते महत्वाचे. अनेक कफ सिरप, आयोडेक्ससारखे वेदनाशामक बाम, फर्निचर पॉलिशसारखे पदार्थ नशा करण्याच्या हेतूने सेवन केले तर ते त्या व्यापक अर्थाने नाही तरी त्या-त्या संदर्भात अंमली पदार्थ म्हणून उल्लेखले जाणे सयुक्तिक आहे.

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

आम्ही सारे समीक्षक


अंतू बरव्याच्या रत्नांग्रीतल्या मधल्या आळीतून किंवा सदाशिव... नव्हे नव्हे सदा-विद्रोही चाळीतून...

> खॅ: फादर कसले साहित्यिक, ते तर धर्मप्रसारक
> ह्यॅ: पुलं कसले साहित्यिक. त्यांनी फक्त मध्यमवर्गीय जाणीवांबद्दल लिहिले.
> हॅट: अरुणाताई कसल्या साहित्यिक, बुळबुळीत बोटचेपे लिहितात.
> हड्, ग्रेस कसला साहित्यिक, त्याच्या लेखनाला देशी मातीचा वास नाही.
> हुं: अक्षयकुमार काळॆ? कधी नावही ऐकले नाही. हल्ली कुणीही अध्यक्ष होते.
> आता केवळ प्रवासवर्णन लिहून मीना प्रभू साहित्यिक ठरतात तर आमचा पोस्ट्या जोशा रोजची ’विश्रब्ध शारदा’ लिहितो तो ही साहित्यिकच की. ह्या: ह्या: ह्या:
> या देशाच्या उज्ज्वल परंपरांबद्दल लिहितो तो खरा साहित्यिक.
> टोणग्याच्या लेखनात वैश्विक भान नाही.
> बुणगा आर्म-चेअर विचारवंत आहे.
> बाळ्या म्हणजे काय नेमाड्याची दुय्यम कॉपी आहे झालं.
> या असल्या भंपक साहित्यिकांनी वाचकांची अभिरुची बिघडवली म्हणून आज मराठी साहित्य थिटे आहे. आणि म्हणे हे अध्यक्ष.
> मराठी वाचक पुलं नि जीए यांसारख्या चिखलात रुतला आहे. (स्वगत: म्हणून आमचे जागतिक दर्जाचे लेखन प्रकाशकाच्या गोडाउनमध्ये पडून राहते.)
> चित्रेंवर स्पॅनिश कवी अल्फान्सो टिंगटुंग पेकिंग याचा स्पष्ट प्रभाव दिसतो. पण त्याचे ऋण मानण्याची दानत नाही.
> ऐतिहासिक कादंबर्‍यांचे पीक काढायला काय अक्कल लागते?
...
...
...


In many ways, the work of a critic is easy. We risk very little, yet enjoy a position over those who offer up their work and their selves to our judgment. We thrive on negative criticism, which is fun to write and to read. But the bitter truth we critics must face is that in the grand scheme of things, the average piece of junk is probably more meaningful than our criticism designating it so.

- Anton Ego (from Ratatouille)The work of a facebookie in much easier Mr. Ego. They don't even have to read anything before criticizing. All they need to know is the caste, religion, political view, state, mother tongue, city/village name of the person. They find it different from their own... well, that's a trigger.

- Mandar Kale (from Facebook.)


-oOo-

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

ओझार्क: पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट - १

#मालिकाआणिमी

काही वर्षांपूर्वी प्रशांत दळवी यांचे चाहूल नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो.

काही वर्षांपूर्वी रेगे नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर तो एकच शत्रू, शासक आणि भक्षक असतो, पण या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीला तो बाहुबली, त्याचे स्पर्धक आणि त्या दोघांचे सामायिक, मुख्य शत्रू - आणि त्या चित्रपटापुरते बोलायचे तर त्यांच्याच पातळीवरची - पोलिस यंत्रणा असे अनेक शत्रू निर्माण होतात. इच्छा असो अगर नसो, त्यांना सामोरे जावे लागते.

तीन चार वर्षांपूर्वी आपल्याकडे मोठ्या मूल्यांच्या नोटा रद्दबातल करण्याचा व्यापक आर्थिक, व्यावसायिक आणि (अन्यही) परिणाम घडवणारा निर्णय शासनाने घेतला होता. त्यातून काळा पैसा बाहेर येईल अशी ग्वाही सरकार आणि सरकार समर्थक देत होते. यात काळा पैसा हा रोकड स्वरूपात साठवून ठेवला जातो असा ठाम समज दिसत होता.

हे तीन परिच्छेद वाचल्यावर ’अरे बाबा, पण या तीनही गोष्टींचा परस्परांशी संबंध काय?’ असा प्रश्न बहुतेकांच्या मनात नक्की उमटला असणार. पण थांबा, या तिघांसोबत आणखी एक चौथा लिहितो आणि मग मूळ मुद्द्यावर येतो.

अलीकडेच ’ब्रेकिंग बॅड’ नावाच्या एका मालिकेबाबत बराच बोलबाला झाला आहे. एक तथाकथित पांढरपेशी व्यक्ती, एका दुर्धर आजाराने ग्रासलेली; ’केवळ कुटुंबियांच्या भावी आयुष्याची तरतूद करण्यासाठी’ आपल्या वैज्ञानिक ज्ञानाचा गैरवापर करुन अंमली पदार्थांचे उत्पादन, व्यवसाय करते. त्यासाठी त्याच्या सामाजिक स्तरात कल्पनाही केली जाणार नाही अशा पातळीवरचे गुन्हे करत जाते. ’केवळ कुटुंबासाठी’ म्हटल्यावर मला हटकून माझ्या आसपासचे अनेक बाप आठवतात. त्यांना पैसे मिळवण्याचा कैफ असतो, यशाची धुंदी असते, विविध प्रकारच्या - समाजात मिरवता येतील अशा - जड वस्तूंचा संग्रह करण्याची लालसा असते. त्यासाठी ते कुटुंबियांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. पण हे सारे करताना, ’हे सगळं कुणासाठी करतो आहे, तुमच्यासाठीच ना?’ असे विचारण्याचा शहाजोगपणाही त्यांच्याकडे असतो. ’ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर मला असाच स्वार्थाला परमार्थाचे रूप देणारा वाटला. गुन्हेगारी मानसिकता, निर्ढावलेपण ही त्याच्यात मुळातच आहे. जगण्याच्या शर्यतीत मागे पडल्याने या ना त्या मार्गाने स्वत:ला सिद्ध करण्याची, यशाने नाही निदान पैशाने तरी सध्या पुढे गेलेल्यांना मागे टाकता येईल या ईर्षेनेच तो सारी नैतिकता गुंडाळून त्यात उतरलेला आहे.

पांढरपेशा समाजात असलेले muscle power (बाहुबल), money power (द्रव्यबळ) आणि अर्थातच political power (राजकीय बळ) या तीन सत्तांबाबत असलेले सुप्त आकर्षण हा एक रोचक मुद्दा आहे. एकाच वेळी ते आकर्षण आणि त्याच वेळी उघडपणॆ त्यांचा केलेला धिक्कार किंवा त्यांतील ढासळत्या मूल्यांबद्दल केलेला गजर, पण स्वहिताचा मुद्दा येताच अघोषितपणॆ, वैयक्तिक पातळीवर तडजोड करत त्यांना शरण जाणॆ - किंवा त्या व्यवस्थेचा भाग होत जाणॆ हे एकुण मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यांना एकाच वेळी नैतिकतेचा झेंडा मिरवायचा असतो आणि त्याचवेळी त्या नैतिकतेला धाब्यावर बसून मिळणारे फायदेही पदरी पाडून घ्यायचे असतात. त्यातून एक दांभिक रसायन तयार होते आणि ते त्या समाजाचा चेहरा होऊन राहते.

अलीकडे नेटफ्लिक्स’वर ओझार्क नावाची एक मालिका पाहण्यात आली आणि हे सारे आठवत गेले. तसे पाहिले तर ही एक गुन्हेगार कथा आहे. गुन्हेगारी जगाची कथा म्हणजे सूडाचा प्रवास अथवा ’थेट कृती’चा वापर करुन लढवलेली स्पर्धा, प्रतिस्पर्ध्याला हिंसेचा वापर करुन नामोहरम करण्याचे, आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या गोष्टी असतात असा- हिंदी चित्रपट पाहून झालेला, समज असतो. जोडीला रोमान्स, फितुरी असली की मामला अधिक सेलेबल होतो. समीक्षकांकडूनही थोड्या दखलीची अपेक्षा असेल तर कुठलेतरी शेक्स्पिअरचे नाटक पकडून त्याचे कथानक अंडरवर्ल्डमध्ये बसवून दिले की सगळेच समाधानी होतात. सदैव अतिसामान्य, विचारशून्य प्रेक्षक समोर ठेवून भांडवली मानसिकतेने चित्रपट आणि मालिकांचे रतीब आपल्याकडे घातलेले दिसतात. लिखित साहित्याचेही फार वेगळे नाही, केवळ चलनी नाणी थोडी वेगळी आहेत इतकेच.

पण गुन्हेगारी जगाची कथा ही बौद्धिक डावपेचाची, अर्थकारणाची, व्यापार-उदिमाचे जग कवेत घेणारी असू शकते हे फारसे अपेक्षित नाही. त्यात राजकारण आले तरी केवळ भ्रष्ट राजकारण्यांच्या रूपात येते. धोरणात्मक डावपेच, त्यांचे कथानकात स्थान वगैरे तर विसराच. ’ओझार्क’ने एखाद्या पारंपरिक गुन्हेगार कथेच्या धाटणीपेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. पहिले म्हणजे ते गुन्हेगारीचे जग एका कुटुंबाला - ब्रेकिंग बॅड’ प्रमाणे केवळ कुटुंबप्रमुखाला नव्हे! - केंद्रस्थानी ठेवून पाहिले आहे. दुसरे, दैववादी दृष्टीकोन नाकारुन जगातील प्रत्येक घटिते, बदल हे आपल्या निर्णयांचे, पर्याय-निवडीचे फलित असते या मुद्द्यावर त्यात भर आहे. महत्त्वाचे म्हणजे निर्णय एकेकट्याचे असतात, तसेच काही जणांनी मिळून घेतलेले असतात. या सार्‍या निर्णयांचा परस्परांना छेद जातो, त्यांचे संमीलन होते, तेव्हा त्यातून घटिताची दिशा निश्चित होते. कथानकाच्या सुरुवातीला निवेदनरूपात आलेला ’पूर्वरंग’ पुढे पदोपदी प्रत्यय यावा इतका बिनचूक बसवला आहे. यात चलन, पैसा म्हणजे पर्याय-निवडीचे मोजमाप असते अशी व्याख्या केलेली आहे.

मार्टिन ऊर्फ ’मार्टी’ बऽर्ड हा आपल्या मित्रासोबत एक गुंतवणूक सल्लागार कंपनी चालवतो आहे. गुंतवणुकीचे विविध मार्ग, त्यातले चढ उतार, डावपेच, तो जाणून आहे. एका टप्प्यावर त्याच्या पार्टनरकडून नव्या गुंतवणुकीचा प्रस्ताव येतो. संभाव्य गुंतवणुकीचा आकडा पाहून मित्र हुरळून जातो. पण मार्टी मात्र त्यांच्या सार्‍या बॅलन्सशीट आणि गुंतवणुकीची पुरी माहिती घेतल्याखेरीज त्यांचे अकाउंट स्वीकारण्यास तयार नाही. त्याचा अभ्यास केल्यावर या गुंतवणूकदाराचा दाखवायचा व्यवसाय आणि प्रत्यक्श व्यवसायात फरक आहे आणि त्यांचे आर्थिक नियोजन ढिसाळ तसंच अनेक ठिकाणी संशयास्पद आहे असे त्याला दिसते. त्यावरुन हा प्रचंड गुंतवणुकीचा प्रस्ताव तो नाकारतो. मित्र अवाक् होतो.

पण मार्टीचा निर्णय अचूक असतो. हा प्रस्ताव घेऊन येणारा एका प्रसिद्ध ड्रग कार्टेलचा प्रतिनिधी आहे. मार्टीच्या ज्ञानाने आणि चिकाटीने तो प्रभावित झाला आहे. तो त्याचा पिच्छा सोडत नाही. यातून मिळणार्‍या प्रचंड पैशाचे आमिष समोर ठेवून तो विविध प्रकारे त्याला पटवू पाहतो. अखेर मार्टीही हुरळतो. तो प्रस्ताव त्याच्या पत्नीसमोर ठेवतानाही तो ’आपण तो अर्थातच नाकारला’ इथपासून सुरुवात करत, ’पण काय हरकत आहे.’ पर्यंत पोचतो. पत्नीही प्रथम दचकली तरी हळूहळू तिचेही मत अनुकूल होत जाते. ’शेवटी आपण काय फक्त त्यांचे पैसेच तर हाताळणार आहोत. त्यांच्या गुन्हेगारी विश्वाशी आपले काय देणेघेणे असणार नाही.’, ’एकदम इतके पैसे येतील की आयुष्याची ददात मिटेल.’, ’थोडे वर्षे केले तरी आपल्या गरजा भागवून उरतील इतके पैसे मिळतील.’ अशी ’चार वर्षे अमेरिकेत पैसे मिळवून भारतात परतू’, ’पुढील सात पिढ्या बसून खातील.’ वगैरे प्रचलित तर्कांच्या धर्तीचे तर्क देत दोघेही अखेर त्या चिखलात पहिले पाऊल टाकण्यास तयार होतात. व्यापक, जड, वास्तविक फायद्यासाठी नैतिकतेची पहिली पायरी उतरण्याचा पर्याय ते निवडतात... ’चाहूल’ मधल्या जोडप्याप्रमाणॆ.

मार्टीचे काम आहे ते ड्रम कार्टेलचा पैसा अधिकृत करण्याचे, ज्याला ’क्लीन करणे’ असे म्हटले जाते. हा रोकड स्वरूपात येणारा काळा पैसा विविध कायदेशीर व्यवसायांमधील गुंतवणुकींच्या माध्यमातून कायदेशीर करणे ही मार्टीची जबाबदारी आहे. ते जाळॆ त्याने विणले की अंमली पदार्थांच्या विक्रीतून कार्टेलने मिळवलेला पैसा निश्चिंतपणॆ, उघडपणे वापरु शकते. काळा पैसा हा रोकड रूपात कुठेतरी साठवून ठेवलेला असतो अशा भाबड्या समजात जगणार्‍यांनी या कारणासाठी ओझार्क अवश्य पाहावी. बेकायदेशीर, गुन्हेगारी व्यवसायाचा आधारवड हा असा त्यांच्या पैशाचे ’शुद्धिकरण’ करणारा पांढरपेशा वर्गच असतो, हे केवळ दांडगी शारीर-प्रकृती असलेला, दाढी वाढवलेला किंवा हातात कडे घातलेला कुणीही गुंड असतो, समाजविघातक असतो असे समजणार्‍या भेकड सुखवस्तूंना समजू शकेल. त्याअर्थी मार्टी आणि मार्टीसारखे लोक हे समाजाच्या दृष्टीने प्रत्यक्ष गुन्हेगारांपेक्षा मोठे गुन्हेगार मानायला हवेत. कारण ते त्या गुन्हेगारी यंत्रणेला एका व्यवस्थेत रूपांतरित करतात, स्थैर्य देतात. गुन्हेगारांना समाजात उजळ माथ्याने मिरवता येईल याची सोय करून देतात. आणि ही व्यवस्था उभी करताना ते पर्यटन स्थळांची सारी अर्थव्यवस्था - ज्यात कसिनो, बार, स्ट्रिप क्लब, कसिनो, स्ट्रिप क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ वितरण यांच्यासह तथाकथित सभ्य माणसांच्या जगातील धर्मस्थळे, त्याच्याशी निगडित पुरवठा, निवास आदि व्यवस्था (ज्यातून धर्मस्थळ हे खरे तर पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित केले जाते), तसंच खेळ, चित्रपटादी करमणुकीचे क्षेत्र यांनाही जाळ्यात आणून सोडतात. ही संघटित गुन्हेगारी अखेर सर्वसामान्यांच्या जगण्याची अप्रत्यक्ष नियंत्रक व्यवस्था होऊन बसते...

...आणि हे घडवून आणणार्‍या मार्टीकडे मात्र आपण कुटुंबवत्सल माणूस म्हणून पाहतो. कळत-नकळत त्याच्यासमोर आलेल्या अडचणींनी, त्याच्यावर येणार्‍या संकटांनी अस्वस्थ होतो, त्यांचे निवारण झाले की सुटकेचा निश्वास सोडतो. त्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे पॅस्टर मेसन सारख्या सहृदयी व्यक्तीच्या आयुष्याची होणारी धूळदाण नजरेआड करतो, केवळ कोलॅटरल डॅमेज किंवा अपरिहार्य घटित म्हणून सोडून देतो... आपल्यातही एक मार्टी दडून असल्याचेच ते लक्षण असते.

(क्रमश:)

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

नॉर्मा आणि कम्मो

#कथाआणिमी

---
’हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?"
"हो!"
"हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!"
---

जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ’कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियॉं चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले.

काही वर्षांपूर्वी ’सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. सायलेंट मूवीजच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक.

अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा, वास्तव जगापासून पार अलिप्त आहे. या जगात आता तिला कणभर स्थान नाही याचे तिला भान नाही. जर ते आले तर तिच्या भूतकाळाचा तिनेच रंगवलेला पडदा फाटून तिला एग्जिट घ्यावी लागेल अशी शक्यता आहे. हे ठाऊक असलेला तिचा माजी दिग्दर्शक, माजी नवरा, अक्षरश: तिचा नोकर बनून तिला जगवतो आहे, तिच्या श्रेष्ठत्वाचा भ्रम हर तर्‍हेने जिवंत ठेवतो आहे.

प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते आणि राजकारणी यांच्यात एक साम्य असते. निवृत्ती हा त्यांना शाप असतो. एका झगमगाटात ते जगतात. अनेक वर्तुळांचे केंद्रबिंदू म्हणून त्यांचे जगणे असते ते सारे एक बटण दाबून बंद होणार्‍या दिव्यासारखे विझून जाणे किंवा अगदी नाटकातल्या एखाद्या स्पॉटसारखे फेड-आउट होणेही त्यांना जमत नाही. मग या ना त्या प्रकारे ते ’अजून यौवनात मी’ सिद्ध करण्याचा आटापिटा करत राहतात. गेलाबाजार आपल्या जमान्यातील दर्जा, प्रामाणिकपणा, बांधिलकी वगैरे आता न उरल्याचे अरण्यरुदन ऐकवत राहतात.

तिला नव्या चित्रसृष्टीत पुनरागमन करायचे आहे. त्यासाठी तिला एक उत्कृष्ट पटकथा हवी आहे. त्यासाठी ती एका तरुण लेखकाला अक्षरश: बंदिवान बनवून ती हे साध्य सिद्ध करु पाहते. अपेक्षेप्रमाणे तिची शोकांतिका होते... पण तशी ती झाली, इतके भानही तिला उरलेले नसते.

भूतकाळात जगणे, तो पुनर्जात करण्याचा आटापिटा करणे हे काही श्रेष्ठ, प्रसिद्ध लोकांची मक्तेदारी नाही. पुढे रडतखडत शिक्षण पुरे करुन कारकुनी करणार्‍याने उगाळलेले आपले ’ दोन मार्कांनी हुकलेले (दहावी) बोर्डात येणे’, एखाद्या स्थानिक क्लबच्या संघातही एका मोसमाहून अधिक टिकू न शकलेल्या फलंदाजाचे कुठल्याशा प्रदर्शनीय सामन्यात एखाद्या प्रसिद्ध गोलंदाजाच्या गोलंदाजीवर मारलेला चौकाराची गोष्ट चहा अथवा सिगरेटच्या सोबतीने मित्रांना पुन्हा पुन्हा सांगणे असेल... अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतात.

जवळजवळ प्रत्येक व्यक्तिच्या बाबत भूतकाळाला असा तलम तुकडा चिकटलेला असतो. आणि भिंतीवर टांगलेल्या पूर्वजांच्या नाहीतर कोण्या आदर्श व्यक्तीच्या तसबिरीकडे पाहात तो आपले खुरटे आयुष्य ढकलत राहतो तसेच याचेही करत असतो. ज्यांच्याकडे ते ही नसते ते इतरांच्या भूतकाळात आपले स्थान घुसडण्याचा प्रयत्न करतात. आपल्यातला सर्वोच्च ’मी’ जिवंत ठेवण्याचा आटापिटा ते करतात. इतकेच नव्हे ते तो काळ, तो क्षण पुनरुज्जीवीत, पुनर्जात करण्याची उमेद अथवा आशा बाळगून असतात. सासणेंच्या ’रेस्ट इज सायलन्स’च्या सुरुवातीला अशीच एक नॉर्मा आपल्या भेटीस आली आहे असे वाटू लागले होते. पण त्यांनी मला चकवले नि एक सुखद धक्का दिला.

सासणेंच्या या कथेमध्ये चंदेरी दुनियेत आपली काही पावले उमटवून आज विझल्या दिव्यांच्या विंगेत फेकली गेलेली कुणी कम्मो आहे. तिच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट अपुरा राहिलेला आहे. एका आगीमध्ये या चित्रपटाची आहुती पडलेली आहे. एक वृक्ष कोसळला की अनेक पाखरे रानभरी होतात, तसे तिच्यासोबतच अन्य लहान मोठे कलाकार, तंत्रज्ञ रसिकांच्या विस्मृतीच्या अंधारात फेकले गेले आहेत. नॉर्माच्या बाबतही असे घडले असणारच, पण सर्वस्वी आत्ममग्न असलेल्या तिला त्याचे सोयर-सुतक नव्हते. पण कम्मो म्हणजे नॉर्मा नव्हे. तिने आपल्या घराच्या तळमजल्यावर ’सूरज-महल’ नावानेच यांना अंधाराच्या वारकर्‍यांसाठी एक कॅफे उघडला आहे. तिथे कम्मो असते, नसते. पण नॉर्मासारखे तिच्या भूतकाळाच्या पडद्यावर केवळ तिचेच चित्र नसते. तिचे सोबती असलेले सारे भूतकाळाचे प्रवासी तिथे ’जगताहेत’. ती त्यांचा आधारस्वर आहे. त्या कॅफेचे स्थान वर्तमानात असले तरी तिथली हवा भूतकाळातली. त्या भूतकाळाच्या आधारे नवे फासे फेकले जातात... खेळ संपला की पट गुंडाळून पुन्हा पेटीत जातात.

श्वायट्झर आणि बाबा आमटे यांच्याबाबत बोलताना एक प्रसिद्ध विचारवंत म्हणाले होते श्वायट्झर’ने माणसाला कुबड्या दिल्या तर बाबांनी पाय. हे विश्लेषण तंतोतंत लागू पडत नसले तरी इतके नक्कीच म्हणता येईल की नॉर्मा सहकार्‍यांच्या खांद्यावर उभी होती तर कम्मो त्यांच्यासोबत!

एका नाटकाची प्रकृती घेऊन कम्मोची कथा उभी आहे. एखादा चांगला नाट्यलेखक तिचे सोने करील असे वाटून गेले...

कथा संपली. तो कॅफे अजून माझ्या अवतीभवती तसाच होता. तो विरुन जाईल अशी भीती वाटली. मग मीही भूतकालभोगी होण्यासाठी जालसाबच्या समोर बसलो. संपलेल्या डावानंतर त्याने पट पुन्हा सज्ज केला होता. मी राणीपुढचे प्यादे दोन घरे पुढे सरकवले, नि खेळ सुरु केला.
---
(कथा: रेस्ट इज सायलन्स’ - भारत सासणे.)

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

इतिहासाचे श्राद्ध घाला

मागच्याच आठवड्यात राखीगढी’च्या संशोधनातून आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा असल्याचे सिद्ध झाल्याची द्वाही फिरली आणि आज हा लेख वाचतो आहे. दोन लेख, दोन परस्परविरोधी दावे! आपण कोणता खरा मानणार? कसा तपासणार?

तपासणार मुळीच नाही. आपले पूर्वग्रह, आपली बांधिलकी असलेल्या गटाच्या सोयीची बाजू स्वीकारणार आणि दुसरी नाकारणार.... इतके सोपे आहे. तुम्ही आधीच आर्य आक्रमणाचा सिद्धांत मान्य केला असेल तर राखीगढीच्या उत्खननाआधारे केलेला दावा तुम्ही ’छद्मराष्ट्रवाद्यांना धार्जिणा खोटा निष्कर्ष’ म्हणून मोडीत काढणार. उलट 'आर्य इथलेच’ वाले असाल तर हा लेख ’कम्युनिस्टांचा कावा’ म्हणून फेकून देणार. विश्लेषण वगैरे गेले तेल लावत. सोपे आहे नाही आयुष्य? सुखी राहा बाप हो.

आमच्या मते इतिहास हे पर्सेप्शन असते. त्यातील घटनांबाबतही परस्परविरोधी दावे असतात, कोणती जड वस्तू पुरावा म्हणून मानायचे याबाबत मतमतांतरे असतात, कालनिश्चितीमध्ये तंत्रानुसार फरक पडतो, त्यातून कालानुक्रमामध्ये फरक पडू शकतो... असे असताना त्या आधारे केवळ ऐतिहासिक दावेच नाही तर उत्क्रांतीसारखे, आर्य आक्रमणासारखे सिद्धांत खरे अथवा खोटे म्हणून माणसे वाद घालत बसतात. यांना सिद्धांत म्हणतानाच त्यात खरे अथवा खोटे करता येणार नाही हे अनुस्यूत असते. कारण हे परिस्थितीजन्य पुरावे आणि विश्लेषणाच्या आधारे उभे केलेले असते. त्यात विश्लेषण वस्तुनिष्ठ असले तरी पुरावे नेहमीच वस्तुनिष्ठ असतील, तुम्ही लावलेली संगती एक आणि एकच असेल याची खात्री देता येत नाही.

त्यामुळे उत्क्रांती सिद्धांत किंवा आर्य आक्रमण सिद्धांत हा ’वास्तव अथवा खरा’ किंवा ’साफ खोटा’ हे दोनही दावे अल्पबुद्धीनेच केले जाऊ शकतात. सिद्धांताला पुष्टी देणार्‍या पुराव्यांनी बळकटी येते किंवा विरोधी पुराव्यांनी त्याची बाजू कमकुवत होते इतकेच. तो ’सिद्ध’ होत नसतो. अनेक शतके जुन्या पुराव्यांचे मूल्यमापन आपण बिनचूकच करतो असा दावा अहंकारीच असतो.

इतिहासातून प्रेरणा मिळते वगैरे दावे पळपुटे असतात. आपल्या सोयीची व्यवस्था वर्तमानात अथवा भविष्यात निर्माण करण्यास अपार कष्ट, नियोजन आणि एकसंघता लागते. इतिहासात ती लेखणीच्या फटकार्‍यासरशी निर्माण करता येते. आपली जमात सोबत घेतली की वास्तव म्हणून माथी मारता येते. म्हणून खरा इतिहास सांगतो म्हणणारा वेगळ्या बाजूचा सोयीचा, स्व-लिखित खोटा इतिहास सांगत असेल हीच शक्यता अधिक. याच कारणासाठी इतिहासाच्या कर्दमात रुतलेला समाज एका बाजूने आत्मसंतुष्ट आणि म्हणून निष्क्रिय आणि दुसर्‍या बाजूने अशा सिद्धांताचे आपले पूर्वग्रहच खरे खोटे करण्याच्या नादात वैचारिक यादवीने ग्रस्त होऊन बसतो.

-: नव-चित्रकार कसे व्हावे. :-

प्रथम दाढी वाढवावी. (दाढीऐवजी शेंडी चालेल का असा जातीयवादी प्रश्न विचारु नये.)

आकाशात शून्यात बघून किंवा थेट जमिनीकडे पाहात तिरपे चालत जाण्याचा सराव करावा.

फाटकी, विटकी जीन्स (किंवा अनेक खिशांची बर्म्युडा चालेल) वर चे गवेरा/ग्वेवेरा/ग्वेव्हाराचा अनेक वेळा धुवून विटका झालेला टी-शर्ट वापरायला सुरुवात करावी. ( त्याऐवजी वेडेवाकडे, अगम्य असे रंगांचे फटकारे असलेले चित्र ’गोंदवून’ घेतलेलाही चालेल.)

कोणतेही एखादे स्वस्त अथवा फुकट असे पेंटिंगचे कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन घेऊन त्यात रोज वाट्टॆल तसे फराटे मारुन बरबटलेले चित्र बनवून फेसबुकादि समाजमाध्यमांवर ’रोज एक तरी चित्र पोस्टावे’ या न्यायाने टाकून द्यावे.

सोबत एक अगम्य क्याप्शन द्यावा. एक फासा टाकून रॅंड्मली एक माध्यम निवडून हे त्या माध्यमातले आहे असे ठोकून द्यावे. एखादा खरा - किंवा बरा - चित्रकार हे चूक आहे म्हणू लागला तर त्याची कमेंट डिलीट करुन त्या पोस्टपुरते त्याला कमेंट करण्यास बंदी करावी. (कस्टम पर्याय वापरा)

त्या सोबत एखाद्या कवीच्या ओळी लिहिण्याचा गाढवपणा अजिबात करु नये! तुम्ही नव नव्हे तर जून-चित्रकार किंवा हौशी-फोटोग्राफर असल्याचा शिक्का बसेल नि तुम्ही नवचित्रकारांच्या टोळीतून कायमचे बाद व्हाल. (देहांत प्रायश्चित्ताइतका भयानक गुन्हा आहे असे समजून चाला.)

असे काही महिने गेले की आपल्या चित्रांचे प्रदर्शन असल्याची जाहिरात सुरु करावी.

एक गल्लीबोळातली १० बाय १० ची ’आर्ट गॅलरी’ म्हणवणारी खोली चार दिवस भाड्याने घ्यावी.

त्यात भिंतींवर, जमिनीवर तसंच छतावर विविध आकाराचे स्वच्छ धुतलेले कॅन्व्हास टांगून ठेवावेत. (त्याऐवजी घरच्या बाद कपड्यांना फ्रेमवर ताणून बसवले तरी चालेल.) शक्यतो त्रिकोणी, गोल, चौरस, आयत असे भौमितिक आकार टाळावेत. ’असे का?’ असा प्रश्न विचारलाच तर ’आमची कला वास्तवातील सार्‍या मिती भेदून जाते’ असा दावा करावा.

प्रत्येक कॅनवासवर वेगवेगळ्या तीव्रतेचा प्रकाश टाकणारे दिवे बसवून द्यावेत (अर्थातच ते चालू करावेत) रंगीबेरंगी दिवे वापरुन आपली अब्रू आपणच चवाठ्यावर मांडू नये. फक्त मंद पिवळ्या रंगाचे दिवेच वापरावेत. त्यांच्या प्रखरतेची रेंज शक्य तितकी कमी ठेवावी, कॅनव्हास जेमतेम दिसतील इतकी.

उद्घाटनाला कोणत्याही प्रसिद्ध कलाकाराला बोलावू नये. आपण किती ’डाउन टु अर्थ’ आहोत हे दाखवण्याची मखलाशी करत एखाद्या लहान मुलाच्या हस्ते उद्घाटन करावे. फोटो छापून आणण्याच्या बोलीवर त्या पोराच्या आईबापाकडून किमान गॅलरीचा भाडेखर्च पदरात पाडून घ्यावा.

समाजमाध्यमावरील मित्रांनाच आमंत्रित करावे. आपण कित्ती कलेचे प्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी लाजेकाजेस्तव प्रत्येक कॅनवासवर त्याला/तिला काहीतरी ’सापडेल’. त्यावर त्याची/तिची 'प्रतिक्रिया आवर्जून कळव’ अशी विनंती करावी. यातले एक दोघे हौसेने समाजमाध्यवर काहीतरी खरडतील.

एकाच वेळी उपस्थित असलेले दोन जीव परस्परांशी बोलत असतील आणि आपण दोघे वेगळेच काही समजतो आहोत असे त्यांना समजून येऊ लागले की त्यात हस्तक्षेप करुन ’प्रत्येकाला ज्यातून स्वत:चे असे काहीतरी सापडते ती खरी श्रेष्ठ कला’ अशा मखलाशी कम बढाई मारत, त्याकरवी आपणच आपल्या कलेला श्रेष्ठतेचे सर्टिफिकेट देऊन टाकावे.

विशेष सूचना: प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त चहा नि बिस्किटांची व्यवस्था करावी. उगा शिनेमात दाखवतात तशी वाईन वगैरे ठेवू नये. एकतर खर्चिक होते आणि दुसरे म्हणजे मद्याने चित्तवृत्ती सैलावलेला एखादा आपल्या कलेचा प्रामाणिक पंचनामा जाहीरपणे करु लागला, तर इतर दबलेल्या प्रेक्षकांनाही बळ मिळून रसिकोत्सुक समाजाचा जमाव होऊन अनावस्था प्रसंग उद्भवू शकतो.

हजेरी लावलेल्या प्रत्येकासोबत आपला फोटो काढण्यास विसरु नये. यातून तो/ती अंमळ खूश झाली की एखाद्या कॅनव्हासशेजारी त्याला/तिला उभे करुन फोटो काढून घ्यावा. हे दोन्ही फोटो - स्वतंत्र पोस्टमध्ये - समाजमाध्यमांवर टाकून त्याला/तिला टॅग करावे. (आवश्यकता वाटल्यास फोटॉशॉपने रिकाम्या कॅनव्हासवर एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराचे अप्रसिद्ध चित्र चिकटवून द्यावे.)

फ्रेंडलिस्टात आधीच जोडून घेतलेल्या वृत्तपत्र-प्रतिनिधीला ट्यागून ’तुझ्या काही सूचना यात अंतर्भूत केल्या आहेत.’ अशी कमेंट टाकावी. एखादा मूर्ख प्रामाणिकपणे 'मी कुठे काय सूचना केल्या?’ असे विचारेल. पण तो प्रश्न विचारणारी कमेंट डिलिट करुन वरच्याप्रमाणेच त्याला त्या पोस्टपुरता ’निलंबित करावा’.

हळूहळू आपण नवचित्रकार म्हणून प्रसिद्ध होऊ लागतो.
---

हा फक्त पहिला टप्पा. अ‍ॅड्वान्स्ड कोर्ससाठी आमच्याशी संपर्क साधा.

-oOo-