शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

जुने जाऊ द्या मरणालागुनि

(कॅनडाच्या पंतप्रधानांनी भूतकाळातील चुकीबद्दल माफी मागण्याची केलेली घोषणा आणि इथेही तसेच व्हावे का? या प्रश्नाला दिलेले उत्तर)

---

जात या मुद्द्याबद्दल तर मी अजिबात बोलत नाही. चर्चेने जुने द्वेष, जुन्या खपल्या उघडून पुन्हा नव्याने गोंधळ घालण्यापलीकडे काही घडते असे मला वाटत नाही. जातिअंताचा सर्वोत्तम मार्ग त्यांची दखल न घेता विचार नि निर्णय घेणे हाच आहे असे मी मानतो. जो बहुसंख्येला अमान्य आहे हे मला ठाऊक आहेच. पण मी माझ्याच विचाराने, मताने चालणारा माणूस आहे नि तसाच अखेरपर्यंत राहीन. बहुसंख्या माझ्या मताच्या विरोधात असली तरीही!

माफी मागणे हे थोतांड आहे, पूर्णविराम. कॅनडाच्या मंत्रिमंडळात चार शीख असतील तर तो कॅनेडियन्सच्या गुड इंटेन्शन्सचा, भूतकाळातील चूक सुधारल्याचा पुरेसा पुरावा आहे असे मी मानतो. शाब्दिक माफीला काडीची किंमत नाही.

मागच्या पिढीच्या पापांसाठी पुढील पिढीने अपराधगंड बाळगावा हे मला नामंजूर आहे. मी व्यक्तिवादी माणूस आहे. कोणत्याची जमावाचा भाग म्हणून माझी ओळख मला मुळीच मान्य नाही. जन्मजात मिळालेल्या सामाजिक लेबलांना मी मानत नाही. त्याचा वायफळ अभिमान बाळगत भूतकालातील जातीच्या नेत्याचे प्रोफाईल फोटो लावून काव आणत बसत नाही, तसंच त्यांच्या अपकृत्यांची जबाबदारी माझ्यावर येते असे मानत नाही. माझ्या चुकांना मीच १००% जबाबदार असतो, तसेच मागची पिढी त्यांच्या चुकांना. फारतर त्याचे विश्लेषण करुन काय चूक, काय बरोबर हे मी तपासेन नि जाहीर करेन. जे पूर्वग्रह नि आपापले जातीचे जोखड उतरवून बोलू इच्छितात त्यांच्याशी बोलेनही. पण ते मूर्खांची प्रचंड मांदियाळी असलेल्या अशा माध्यमात मुळीच नाही.

मी भूतकाळाबाबतच्या चर्चेत रमत नाही, भूतकाळ जितका लवकर त्यागला जाईल तितके उत्तम. इतिहासाच्या कर्दमात रुतलेला देश जितक्या लवकर बाहेर येऊन ’भविष्य कसे हवे?’ याबाबत चर्चा करत नाही तोवर या देशाला भवितव्य नाही. भूतकाळातील तथाकथित सुवर्णकाळाची जपमाळ ओढणारे आणि सारा भूतकाळ काळाकुट्टच होता म्हणणारे असे दोन्ही लोक मला त्याज्य आहेत. (ते बरोबर आहेत की चूक हा माझा मुद्दाच नाही) मी मध्यममार्गी नि भविष्यवेधी माणूस आहे नि तसाच राहू इच्छितो.

यावर अधिक काही लिहिण्याची इच्छा नाही. कारण आपली जात विसरुन तटस्थपणे यावर कुणी लिहील याची सुतराम शक्यता नाही आणि त्यामुळे बहुतेक वेळा समोरचा काय म्हणतो आहे या पेक्षा:

"तो काय म्हणतो आहे असे ’मला वाटते"

किंवा

"त्याने काय म्हणावे असे मला वाटते"

किंवा

"तो समोर असे बोलतो आहे पण मनातून त्याचे असेच मत असणार, कारण तो अमुक जातीचा आहे/तिकडचा आहे "

अशा गृहितकांवर आरोप-प्रत्यारोप होतात... चर्चा होत नाहीत.


#भविष्यकसेहवेतेबोला

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

नेहरु आणि पटेल: बाता आणि वास्तव

PatelAndNehru

१. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सरदार पटेल ७२ वर्षांचे होते.

२. त्यावेळी ते तीव्र मधुमेहाने आजारी होते.

३. डिसेंबर १९५० मध्ये त्यांच्या त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा...
३अ. भारत स्वतंत्र होऊन तेव्हा जेमतेम तीन वर्षे झाली होती. म्हणजे तेव्हा पुन्हा ’भारताचा शाप’(!) असलेले नेहरु पंतप्रधान झालेच असते.
३ब. अजून भारतातील पहिल्या निवडणुकाही पार पडल्या नव्हत्या.

४. ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारतीय सेनेचे पहिले ’कमांडर-इन-चीफ’ होते. आणि ज्या अर्थी संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय ते ’एकट्याने’ घेऊ शकत होते, आणि तो ’एकट्याने’ अंमलातही आणू शकत होते त्या अर्थी त्यांना शासनात भरपूर निर्णयस्वातंत्र्य नि अधिकार होते असे म्हणावे लागेल. ज्या अर्थी नेहरुंनी त्यांना यात स्वातंत्र्य दिले...

(मध्यांतर:
पटेलढापूसेना: एक मिनिट. नेहरु कोण स्वातंत्र्य देणारे? पटेल स्वयंभू होते.
आम्ही: बरं बुवा, तुम्ही म्हणाल तसं.)

... जेणेकरुन ते अन्य संस्थांनाच्या बाबत निर्णय घेऊ शकले. पण त्याच वेळी आपल्या स्वत:च्या मातृ-राज्य असलेल्या काश्मीरमध्ये मात्र त्यांनी पटेलांना रोखले (आणि तुमच्या मते ऑलमायटी पटेल त्यांच्यासमोर दुबळे पडले? ), आणि तेदेखील महाराज हरिसिंग- म्हणे - काश्मीरचे राज्य ताटात घेऊन उभे होते, जेणेकरुन तुम्ही नुसती सही करा की राज्य तुमचे झाले’ इतकी सोपी परिस्थिती असून?

कुणास ठाऊक, कदाचित नेहरुंना आपल्य मातृ-राज्यावरच रोष असावा, म्हणून त्यांनी जिवाच्या कराराने, आपली सारी शक्ती वापरून पटेलांना विरोध करुन ते राज्य भारतात येण्यापासून रोखले. (पुढे त्यांचा नाईलाज झाला तो वेगळा मुद्दा. बिचारे नेहरु!)

थोडक्यात अन्य संस्थानांच्या बाबत पटेलांना रोखण्याची ताकद नेहरुंमध्ये नव्हती, पण काश्मीरबाबत ती होती?

तीन वगळता बहुसंख्य संस्थानांचे विलीनीकरण अतिशय शांततामय मार्गाने झाले. म्हणजे इथे पटेलांनी आपली लष्करी ताकद नव्हे तर मुत्सद्देगिरी वापरली होती! आणि हीच मुत्सद्देगिरी आधीच काश्मीरबाबत वापरली जाऊन पराभूत झाली नव्हती का?

भारताच्या सैनिकी विभागांचे नियंत्रण ब्रिटिश ऑफिसर्सकडून भारतीय ऑफिसर्स-कडे कधी आले हे तुम्हाला ठाऊक आहे का?

हरिसिंग जर तुम्ही म्हणता तसे ’भारतात सामील होण्यास उत्सुक असून’ त्यांना सामील करुन घेतले नाही तर भारत, पाकिस्तान, की स्वतंत्र या पर्यायांतून त्यांनी स्वतंत्र अस्तित्व हा पर्याय निवडला हा इतिहास खोटा का? खरा इतिहास सांगणारी पुस्तके नागपूर-प्रेस मधून कधी उपलब्ध होतील?

तुमची इतिहासाची जाण अति-सामान्य आहे हे तुम्ही गेल्या चार वर्षात सिद्ध केले आहेच. पण या तुमच्या मागे बसलेल्या २८२ पुंडांमध्ये एक नमुनाही बरा नसावा की ज्याने इतिहास नीट अभ्यासला आहे? की ते सारेही 'येल'चे ’खरा इतिहास’ विषयातले पदवीधर आहेत?

इतिहास नागपूरमध्ये रचला जात नाही (पण तिथे तो अहमहमिकेने ’दुरुस्त’(?) जरूर केला जातो.) आणि त्यांनी सांगितलेल्या इतिहासावर शहाणे विश्वासही ठेवत नाहीत. तुमच्या बोलबच्चनगिरीने मूर्खांची संख्या वाढवली असली, तरी देखील आपल्या धडावर आपलेच डोके राखून असलेले बहुसंख्य लोक या देशात आहेत. याची जाण ठेवून वागला नाहीत तर लवकरच तुम्हीच भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक पान म्हणून शिल्लक राहाल हे विसरु नका.

- oOo -