गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (उत्तरार्ध) : स्वरूप, दर्शन व आकलन

प्रचलित निकष << मागील भाग.
---

अमुक एक विधान, एखादी गोष्ट सत्य की असत्य याचा निवाडा करण्यासाठी ’ते पूर्णतः अनावृत, निर्लेप, अविकृत स्वरूपात आपल्यासमोर आले आहे याची आपल्याला खात्री देता येते का?’ या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थीच द्यावे लागते

ते आपल्या समोर येते ते एखाद्या माध्यमातून; मग ते एखाद्या व्यक्तीचे भाष्य अथवा निवेदन असेल, छायाचित्र असेल, घटनेचे केलेले व्हिडीयो शूटिंग असेल, त्याबाबत वृत्तपत्रात किंवा चॅनेल्सवर आलेली बातमी असेल, एखाद्या अभ्यासपूर्ण पुस्तकातून आलेले वर्णन असेल की आणखी काही. त्या त्या माध्यमाच्या मर्यादा, त्यात सहेतुक वा अहेतुक झालेले बदल यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाहून वेगळे असे एक अवगुंठित, विलेपित असे नवे ’तथ्य’ आपल्यासमोर येत असते. अशा अवगुंठित, विलेपित रूपालाच आपण सत्य मानून अन्वेषणाच्या कसोटीवर पारखत बसू तर मग ते सत्य अनुत्तीर्ण होण्याची शक्यता वाढते.

RashomonPoster

प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या ’राशोमोन’ चित्रपटात या मुद्द्याची सुरेख मांडणी केली आहे. एका रानातून चाललेल्या सामुराई नि त्याची पत्नी यांच्याबाबत अघटित घडले आहे. त्यात सामुराईच्या पत्नीचा त्या रानातील कुप्रसिद्ध डाकू ताजोमारु याने भोग घेतला आहे. आणि सामुराईचा मृत्यू झाला आहे. या दोन घटनांबाबत ताजोमारू, सामुराईची पत्नी, सामुराईचा आत्मा, इतकेच काय त्या घटना घडून गेल्यानंतर तिथे आलेला एक लाकूडतोड्या या चारही संबंधितांच्या साक्षी वेगवेगळ्या आहेत(१).

ताजोमारू-सामुराईची पत्नी यांचा आलेला शरीरसंबंध (सहमतीने की बलात्काराने?), त्यानंतर सामाजिकदृष्ट्या त्या स्त्रीचे स्थान काय असावे (स्त्रीने पतीसोबत जावे की ताजोमारूसोबत याचा निर्णय कुणी वा कसा करावा?) आणि सामुराईचा मृत्यू (आत्महत्या, हत्या, हाराकिरी की द्वंद्वात आलेले मरण?) याबाबत प्रत्येकाची साक्ष वेगवेगळा कार्यकारणभाव वा वास्तवाची संगती मांडतो आहे. कुरोसावाने या सार्‍या साक्षी कॅमेर्‍याकडे- म्हणजेच प्रेक्षकांकडे तोंड करुन द्यायला लावल्या आहेत. एक प्रकारे प्रेक्षकालाच न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवून ’कर निवाडा याचा’ असे आव्हान दिले आहे.

एकाच घटनेमध्ये सहभागी वा साक्षी असलेल्या व्यक्तींचे कथन वेगवेगळे असते. परंतु त्यात सामायिक असा काही भाग असतो, जिथे प्रत्येकाच्या कथनाचा वास्तवाशी वा सत्याशी सांधा जुळलेला असतो. त्यामुळे ते सर्वस्वी खरे नसते तसेच सर्वस्वी खोटेही. त्यातून सत्याचा अंश वेगळा करुन एकत्र पाहावा लागतो, त्यानंतरच निवाडा शक्य होतो. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेला साक्ष असलेली व्यक्ती त्याबद्दल सांगते तेव्हा तिचे निवेदन यथातथ्य असू शकते किंवा जाणीवपूर्वक सांगितलेले असत्यही. पण या दोन्ही शक्यतांच्याही अधेमध्ये भासमय सत्य (Perceived), खंडश: सत्य (Fragmented) तसेच अंशात्मक सत्य (Fractional) अशा अन्य शक्यताही असतात.

प्रत्यक्ष निवेदन हे आपण प्रत्यक्षात जे पाहिलं त्या पेक्षा आपण जे पाहिलं ’असं आपल्याला वाटतं’ त्याबद्दल सांगू शकतं. हे ’भासमय’ सत्य! यात दृष्टी ते आकलन या प्रवासामध्ये झालेल्या बदलांचा, चकव्याचा प्रभाव पडतो. त्याखेरीज मेंदूने केलेले आकलन आणि भाषेमार्फत केलेले त्याचे सादरीकरण या माध्यमांतराचा परिणामही त्यावर होतो.यात कदाचित न पाहिलेल्या, पण आपल्या बुद्धीने भर घातलेल्या काही तपशीलांचा समावेश असू शकतो.

मानसशास्त्रात एका गंमतीशीर प्रयोग करतात. ज्यात तुम्हाला पलंग, रात्र, दिवा, अंधार, चंद्र असे अनेक शब्द लिहिलेला एक कागद दिला जातो. नंतर तो काढून घेतात नि लगेचच केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर ते शब्द पुन्हा लिहून काढायला असे सांगतात. यात काही शब्द विसरले जातात (हे स्वाभाविकच आहे) पण त्या मूळ यादीत नसलेला 'झोप' हा शब्दही बरेचजण लिहून जातात. हे भासमय सत्याचे उदाहरण आहे. इतर शब्दांच्या संगतीचा आधार घेऊन आपला मेंदू काही रिकाम्या जागा भरून काढतो नि ही दुरूस्ती आपल्या दृष्टीने सत्याचा भाग होऊन जाते. ही व्यक्तीच्या आकलनशक्तीची मर्यादा आहे.

ज्याचा-त्याचा रंग वेगळा

TrueAndTruth

लेखात सुरुवातीलाच दिलेले उदाहरण पाहिले, तर भुत्या अंध असल्याने त्याला रंग दिसण्याची मर्यादा आहे. त्याचप्रमाणे तर रंगांधळेपण अथवा मर्यादित रंगांचीच ओळख असणार्‍या एखाद्याला त्याच्या क्षमतेबाहेरचे रंग न ओळखता येण्याची मर्यादा असतेच. उदाहरणार्थ, कुत्र्याला रंग वेगळे दिसत नाहीत. केवळ काळ्या-पांढ्र्‍या रंगांच्या छटाच तेवढ्या दिसतात असे प्राणिशास्त्र सांगते.

आपल्या आकलनाला आपल्या माहितीच्या, बुद्धीच्या, विचारव्यूहाच्या मर्यादा असतात. एकच छायाचित्र (photograph, image) वेगवेगळ्या संगणकांवर, मोबाईल फोन्सवर, टेलिव्हिजनवर पाहा. त्या प्रत्येक उपकरणाच्या रंग दाखवण्याच्या कुवतीमध्ये आणि पद्धतीमध्ये फरक असतो. त्यामुळे त्या चित्रातील विविध रंगांच्या छटांमध्ये फरक दिसेल. त्यातील एखाद्या रंगाला काय नाव द्यावे याबद्दल मतांतरे निर्माण होतील. वास्तव, जड जगात आपणही आपल्या डोळ्यातील भिंगाच्या आधारे पाहात असतो. त्याच्या कुवतीनुसार आपल्या रंगांचे आकलनही वेगवेगळे असते. इतकेच नव्हे तर रंगांबरोबर पोत (texture) मुळे देखील त्याच्या दृश्य आकलनामध्ये फरक पडतो.

आपण एखाद्या वस्तूकडे पाहताना तिच्यावर पडलेल्या प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाच्या त्या रेषेने पाहणार्‍याच्या दृष्टीबरोबर साधलेला कोन, त्या वस्तूच्या आसपास असणार्‍या अन्य वस्तूंचे अस्तित्व आणि तिच्याकडे पाहणार्‍याच्या दृष्टीने त्या वस्तूशी केलेला कोन, त्याच्या/तिच्या मनात त्याक्षणी ठळक असणारी अन्य प्रभावशाली वस्तू वा तिचे आकलन या सार्‍या घटकांच्या आधारेच त्या वस्तूचे आकलन होते हे विसरता कामा नये.

माध्यमांच्या मर्यादा

अशाच मर्यादा (प्रसार-)माध्यमांनाही असू शकतात. आपली माध्यमे वेगवेगळ्या प्रकारची शीर्षके देऊन एकाच बातमीबाबत वा घटनेबाबत वाचकांच्या मनात वेगवेगळी भावना वा आकलन निर्माण करु शकतात. बातमीच्या आतील निवेदनामध्ये विशेषणांच्या यथायोग्य वापराने एकच बातमी विविध माध्यमांतून आपापल्या सोयीच्या रंगांत रंगवलेली पाहायला मिळते. हे माध्यमकर्त्यांचे प्रदूषण(contamination) म्हणता येईल.

अलीकडे व्यावसायिक ठिकाणी तर सोडाच, अगदी रहिवासी इमारतींमध्येही 'सीसीटीव्ही' ही अत्यावश्यक व अपरिहार्य झालेली गोष्ट आहे. महानगरांमध्ये अशा ’रहिवासी इमारतींमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची नोंद तिथे सीसीटीव्ही नसेल तर केली जाणार नाही ’ असे पोलिस यंत्रणेकडून सांगितले जाऊ लागले आहे. असा सीसीटीव्ही कॅमेरा हा एका जागी स्थिर असतो. त्यामुळे तो गुन्हेगाराच्या उजवीकडून किंवा डावीकडून आणि त्याच्या डोक्याच्याही वरून, जो मिळेल त्या कोनातून ते छायाचित्र वा व्हिडिओ काढतो. पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधे ज्याप्रमाणे गुन्हेगाराचे समोरून स्थिर स्थितीतील छायाचित्र असते, अगदी तसेच त्याच कोनातून गुन्ह्याच्या ठिकाणी मिळेल हे अशक्यच असते. ही या माध्यमाची मर्यादा आहे.

आता ते छायाचित्र नि रेकॉर्डमधील चित्र असलेली व्यक्ती एकच हे सिद्ध करण्याचे तंत्र विकसित करावे लागते. तंत्रज्ञानाच्या ’इमेज प्रोसेसिंग’ नामक शाखेमध्ये यासाठी वेगवेगळ्या तर्कपद्धती(algorithm) व साधने तयार केली जात आहेत.

आंधळे आणि हत्ती

काही वेळा विलेपित, अवगुंठित नसलेला पण मूळ सत्याचा एखादा अंशच (अविकृत स्वरूपात) आपल्यासमोर येऊ शकतो. असं असेल तर मग सत्याच्या केवळ एका खंडाला, एका अंशालाच सत्य मानून पुढे जाण्याचा धोका राहतो. भारतीय अभिजात संगीतातील रागांच्या स्वरूपाबाबत कुमार गंधर्व असं म्हणायचे की रागाला एकाहुन अधिक ’प्रोफाईल’ असतात. त्यातल्या एका रूपालाच अनेक गायक पूर्ण राग समजून गातात नि आवृत्त गाणे गात राहतात. थोडक्यात दृश्यमान भागाच्या पलिकडे असलेल्या सत्याच्या अदृश्य भागाचा अथवा खंडाचा शोध घेऊनच त्याचे पुरे आकलन होऊ शकते.

जीएंचा विदूषक(२) म्हणतो "सत्य हे अंशाअंशानं प्रकट होत असतं, याची विस्मृती होता कामा नये. संपूर्ण सत्य पाहण्याचं भाग्य मानवाच्या दोन नेत्रांना कधीही लाभणार नाही, परंतु त्याला विविध अंश एकत्र करता येतील, विविध खंड बुद्धीच्या सहाय्यानं सांधता येतील; आणि एका खंडापेक्षा दोन साधित खंड अधिक सत्य असतात."

QuestionsAroundTruth

खंडश: सत्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असलेली ’आंधळे आणि हत्ती’(३) ही गोष्ट. प्रत्येक आंधळ्याच्या जाणिवेच्या कक्षेत असलेला आकार दोरी, पंखा, खांब इ. आकार सत्यच आहे, परंतु तो मूळ हत्तीचा एक भाग आहे, पूर्ण हत्ती नव्हे. इथे पाचही आंधळ्यांच्या जाणिवेच्या समष्टीतूनच संपूर्ण सत्याचे - त्या हत्तीचे - चित्र साकार होऊ शकते.

कळीचा मुद्दा हा असतो की 'आपण सत्याचा एक भागच पाहतो आहे' याची जाणीव त्या आंधळ्यांना व्हायला हवी, अन्यथा प्रत्येकजण अट्टाहासाने आपल्या जाणिवेच्या मर्यादेतील चित्राला पूर्ण सत्याचे रूप मानून चालतो. हत्तीचे एकवेळ सोडा - ते केवळ जिज्ञासापूर्तीपुरते आहे - पण ते पाच भागधारक आहेत अशा एखाद्या सामूहिक हिताच्या निर्णयाबाबत काय घडेल हे तर्क करण्याजोगे आहे.

असत्याचे प्रदूषण

TrueFalseAndBetween

'अंशात्मक सत्य' हे मूळ सत्याचा काही भागच सांगते. यात उरलेला भाग अजाणता वा जाणीवपूर्वक दडपला जातो किंवा त्याचा अपलाप केला जातो. तरीही एकुणात ते सत्य वा असत्य मानता येणार नाही. इथे सत्य नि असत्याची सरमिसळ झालेली असते. त्या अर्थी खंडश: सत्यापेक्षा अंशात्मक सत्य वेगळे आहे. खंडश: सत्य हे तुकड्या-तुकड्यातून येते, पण त्यांची समष्टी केवळ सत्यच पूर्ण करते. अंशात्मक सत्यात प्रत्येक तुकड्यातून सत्याचा अंश वेगळा करून जमा करत न्यावा लागतो. ’राशोमोन’मधील साक्षींच्या आधारे प्रेक्षकाने निवाडा करताना या पद्धतीने जावे लागते.

लेखाच्या सुरुवातीलाच दिलेले भुत्याचे रंगाचे उदाहरण थोडे वेगळ्या प्रकारे मांडून पाहू. हिरवा रंग हा पिवळा नि निळ्या रंगाचे संयुग मानले जाते. पिवळा हे सत्य नि निळा हे असत्य मानले, तर हिरव्याच्या सर्व छटा या निळ्या रंगाच्याही छटा असतात नि पिवळ्याच्याही. एखाद्याला हिरव्या रंगाची छटा दाखवली नि ही छटा पिवळ्या रंगाची की निळ्या रंगाची असा प्रश्न केला बघणार्‍याच्या दृष्टिकोनातील फरकानुसार तो त्यांना पिवळ्या वा निळ्या रंगाची छटा मानून चालेल. पण हाच प्रश्न एकाहुन अधिक लोकांना केला तर त्यांचे एकमत होण्याची शक्यता नाही. थोडक्यात सत्य शोधू पाहणार्‍याला प्रत्येक हिरव्या छटेतील निळ्या रंगाचे अस्तित्व वेगळे काढून पाहता यायला हवे. त्या छटेतील तेवढा भागच सत्यान्वेषणासाठी घेऊन पुढे जाता आले पाहिजे.

सत्य-चित्र रेखाटताना

QuestionsAroundTruth
science.howstuffworks.com येथून साभार;

पूर्वी ज्याला मेकॅनो म्हटले जाई नि आता लेगो म्हटले जाते, त्या खेळाचे उदाहरण घेऊ. यात विविध आकाराचे तुकडे दिलेले असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने जोडून त्यातून तुम्ही बस तयार करु शकता, इमारत बनवू शकता वा एखादी गाडीही. तुम्ही कुठले तुकडे निवडता, कुठले सोडून देता आणि जुळणी कुठल्या क्रमाने करता यावरुन कोणती वस्तू तयार होणार हे ठरत असते.

त्याचप्रमाणे अंशात्मक व खंडश: सत्यांचे तुकडे घेऊन सत्याचे अथवा वास्तवाचे तुकडे घेऊन त्यातून पुर्‍या सत्याचे चित्र निर्माण करताना त्या जुळणीची पद्धतही त्या चित्रावर परिणाम घडवत असते. सत्याचे सारेच खंड उपलब्ध नसतील, तर जुळणी करताना गाळलेल्या जागा कशा भरल्या जातात यातून चित्राचे स्वरूप वेगवेगळे दिसू शकते. याचे एक उत्तम उदाहरण अलिकडे 'ब्रॉडचर्च' या मालिकेमध्ये पाहायला मिळाले.

एका छोट्या गावात एका लहान मुलाची हत्या झाली आहे. शहरी जीवनाच्या तुलनेत अशा लहान वस्तीमध्ये असतात बहुतेक नागरिकांचे परस्परांशी निदान औपचारिक पातळीवरचे का होईना संबंध येतात. अशा गर्हणीय कृत्याने समाजाचा तो तुकडा ढवळून निघतो. तपास जसजसा वेगवेगळी वळणे घेत जातो, तसतसे त्यात परस्पर-अविश्वास, संशय यांचे भोवरे तयार होतात. अखेरीस तपास-अधिकारी असणारी एली मिलर तिच्या पतीला- 'जो मिलर'लाच या हत्येबद्दल आरोपी म्हणून अटक करते.

SheronBishop_Broadchurch
ब्रॉडचर्च: शेरॉन बिशप न्यायालयात पर्यायी शक्यतेची मांडणी करताना

आता प्रेक्षकांनी घटनाक्रम संपूर्णपणे पाहिला आहे. शिवाय खुद्द एलीनेच तपास केलेला असल्याने तो खरा आहे याची तिला आणि तिचा तपासातील सहकारी अलेक हार्डी यांना माहित आहे. पण... न्यायालयासमोर मात्र तो पुराव्यांच्या आधारे मांडलेली घटनाक्रमाची एक ’शक्यता’च असते. न्यायालयामध्ये जो मिलरची बाजू लढवणारी शेरॉन बिशप ही त्याच पुराव्यांच्या आधारे एक पर्यायी घटनाक्रमाची शक्यता मांडून दाखवते.

त्यामुळे आता न्यायाधीश आणि ज्युरी यांच्यासमोर त्याच पुराव्यांच्या आधारे उभ्या केलेल्या दोन प्रतिस्पर्धी शक्यता आहेत. आणि त्यांना त्यातील एकीची ’अधिक संभाव्य’ म्हणून निवड करायची आहे. वास्तव काय हे त्या घटनाक्रमातील सहभागी व्यक्तींखेरीज कुणालाच नेमके समजलेले, खरेतर दिसलेले नसते. आकलनाची, स्वार्थाची, पूर्वग्रहाची छाया घेऊनच ते त्यांच्याही मनात रुजते. वास्तवाचे दूषित होणे तिथूनच सुरू होते. त्यामुळे न्यायाधीश, ज्युरी, तिथे उपस्थित अन्य व्यक्तीच नव्हे, तर आपण प्रेक्षकही पाहतो ते कुणीतरी त्यांचे, त्यांना आकलन झालेल्या वास्तवाचे आपल्यासमोर मांडलेले कवडसेच फक्त असतात.

शेरॉन आपल्या वकीली कौशल्याचा वापर करुन आपला घटनाक्रम, आपले मूल्यमापन अधिक विश्वासार्ह असल्याचे ज्युरींना पटवून देते. आणि ज्याच्या पत्नीनेच त्याला अटक केली, जो गुन्हेगार आहे हे तिला नक्की ठाऊक आहे, अशा जो मिलरला आरोपमुक्त केले जाते.

थोडक्यात काही वेळा सत्याचे आकलन पुरेसे नसते, त्याची सिद्धताही तितकीच महत्त्वाची असते. सत्याचे ते आकलन आवश्यक तिथे इतरांना पटवून देता यावे लागते. त्याचे कौशल्य आणखी वेगळे असते. त्या कौशल्याच्या सहाय्याने जगाच्या कल्याणाचा मार्ग सापडलेला एखादा प्रेषित आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकतो...

...आणि त्याच कौशल्याचा आधाराने एखादा द्वेषसंपृक्त राजकारणी जनमानसात प्रक्षोभक संदेश रुजवून लोककल्याणाऐवजी सामाजिक विध्वंसाची आखणी करु शकतो!

या सार्‍या अवगुंठनाच्या, विलेपित सत्याच्या, भासमय, खंडश: वा अंशात्मक सत्याच्या, माध्यमांच्या मर्यांदांच्याही पलिकडे शिल्लक राहतो तो स्वार्थप्रेरित अथवा हेतुत: केलेला संपूर्ण अपलाप. मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये याबद्दल इतके लिहिले आहे की आता यावर कुणी फार नवा प्रकाश टाकू शकेल ही शक्यता नगण्यच आहे. आणि असे असूनही त्याच्या आकलनाबाबत मानवी समाज बव्हंशी उदासीन राहून दोषारोप नि हेत्वारोप यांच्या आधारे स्वत:ची जबाबदारी झटकून टाकण्यातच धन्यता मानताना दिसतो.

सत्यशोधाच्या या जंगलवाटा, शहरी रस्त्यांप्रमाणे थेटपर्यंत नजर जाईल अशा नसतात. वाटेत येणारी झाडे-झुडपे दूर करीत, प्रसंगी कठोरपणे छाटून काढीत पुढे जावे लागते. हे करीत असताना गगनाला भिडणार्‍या वृक्षांच्या फांद्यातून येणारे कवडशांचे भान ठेवावे लागते. कारण त्यांच्या अनुषंगानेच मूळ सहस्ररश्मीचा वेध आपल्याला घेता येतो. त्याचे पुरे दर्शन कधीच घडत नाही पण कवडशांच्या अस्तित्वाने त्याचे अस्तित्व - सिद्ध नाही तरी - अनुमानित करता येते.

(समाप्त)

- oOo -

टीपा:

१. ’जंगलवाटांवरचे कवडसे’ ही ’राशोमोन’वरील मालिका याच ब्लॉगवर वाचता येईल.
२. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
३. खरे तर ही कथा ’डोळे बांधलेल्या व्यक्ती आणि हत्ती’ अशी असायला हवी. मुळातून आंधळे असलेल्या व्यक्तींना सर्प, झाड, पंखा आदी वस्तूही दिसत नसल्याने त्यांची नि हत्तीची तुलना करणे शक्य नाही. अर्थात या व्यक्ती जन्मांध नसून आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर अंध झालेल्या असल्या तर गोष्ट वेगळी. त्या परिस्थितीत असे आयुष्यातील डोळस असतानाचा कालखंडात त्यांनी हत्ती पाहिलेला नाही, परंतु इतर गोष्टी पाहिल्या असणे शक्य आहे.


हे वाचले का?

सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष

प्रास्ताविक:

एका वास्तवात अनेक सत्ये दडलेली असतात. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे, आकलनात येणारे सत्य निराळे. जीएंच्या कथा असोत वा कुरोसावाचा राशोमान हा सिनेमा, सत्याचे पापुद्रे संपता संपत नाहीत. म्हणूनच ओशोंसारखा एखादा योगी सत्याच्या पडताळणीचा जोरकस आग्रह लावून धरतो, तर जे. कृष्णमूर्ती ‘Truth is a pathless land’ असे म्हणून आपल्याला हतबुद्ध करतात. अशात सत्य नेमके कशाला म्हणायचे, कसे ते जाणायचे हा सनातन पेच काळागणिक अधिक गुंतागुंतीचा होत जातो. त्यावरचे हे विवेचन...
---

"हा घे भंडारा नि जा आपल्या वाटेने" असं म्हणत भुत्याने एका मळक्या तेलकट पिशवीतून काळसर रंगाची पूड काढली आणि रामण्णापुढे धरली. त्याच्या लबाडीचा रामण्णाला राग आला. "माझे डोळे काही अजून परट्यांची भोकं झालेली नाहीत! भंडारा कधी काळा, राखेसारखा असतो होय? तो असतो हळदीचा पिवळा जर्द."
"मग काय!, हा पिवळाच आहे की!" भुत्याने खवचटपणे हसून म्हटले.
"अरे, हा तर अगदी राखेसारखा काळाढुस्स आहे." रामण्णाने अगदी नेटाने स्पष्ट सांगितले.
"हे बघ पंडित, तू म्हणतोस हा काळा आहे, मी म्हणतो हा पिवळा आहे. म्हणजे हा भंडारा काळाही असेल, पिवळाही असेल, होय की नाही? पण तू अगदी छातीवर हात ठेवून तो काळाच आहे असं कसं सांगतोस? पाव्हण्या, जरा आजूबाजूला बघ, आहे आणखी कोणी तिसरं माणूस? तर नाही... अख्ख्या जगात तू आणि मीच आहो. तू एका बाजूला, मी एका बाजूला. तुझ्या बोलण्याला माझ्या बोलण्याची टक्कर! तेव्हा हा भंडारा काळाच आहे हे तू कोणाच्या साक्षीने ठरवणार? समज, इथं माझ्यासारखाच आणखी एक आंधळा माणूस आहे. त्याच्या साक्षीत मी ठरवलं की भंडारा पिवळाच आहे, म्हणून तेवढ्याने लगेच भंडारा पिवळा होऊन बसणार होय?
"मला डोळे आहेत बघायला, तुला तसलं काही नाही. एक तिरळा माणूसदेखील शंभर आंधळ्यांपेक्षा बराच म्हणायचा की!" रामण्णा आत्मविश्वासाने म्हणाला.
"असतील, असतील! तुला डोळे आहेत हे आताच दिसलं की!" हसू दाबत भुत्या म्हणाला. "परंतु तू रंगांधळा नाहीस कशावरून? आणखी तुझ्यामाझ्यापेक्षा निराळा असा एक चांगला शहाणा देवमाणूस आहे. त्याचे डोळे निराळेच आहेत. त्याला शंभर रंग दिसतात. तो तुला काय म्हणेल ठाऊक आहे? अरे वेडपटच आहे हे मेंढरू! या असल्या रंगाला हे काळा रंग म्हणत बसलंय! हुच्च! हा खरा रंग आहे अमुक, म्हणून तो एक नवीनच रंग सांगेल. आता सांग भंडार्‍याचा नक्की रंग कोणता?"
(१)
QuestionsAroundTruth

रोजच्या जगण्यात आपण 'सत्य' हा शब्द किती बेफिकीरीने वापरतो, नि अमुक एक गोष्ट 'सत्य आहे', ’खरं आहे’ असे किती सहजपणे नि ठामपणे म्हणतो. रामण्णाचे पहा ना. आपल्या डोळ्यांबरोबरच माहिती नि जाण यावर त्याचा अगदी ठाम विश्वास आहे. समोरच्या आंधळ्यापेक्षा डोळस असलेल्या आपल्याला रंग अधिक चांगले समजतात हे त्याचे गृहितक. दोन-चार वाक्यातच स्वत: आंधळ्या असलेल्या भुत्याने त्याचे भ्रम दूर केले आहेत.

मुळात काळा रंग नि पिवळा रंग म्हणजे काय, हा काळा नि तो पिवळा असे सर्वांना ते सारखेच दिसतात काय, त्याबाबत निश्चित विधान करू पाहणार्‍याच्या आकलनक्षमतेलाच मर्यादा असेल तर त्याचे मत गृहित धरावे का, एखादे विधान केवळ बहुसंख्येच्या निकषावर ’सत्य’ या संज्ञेला पात्र ठरते का, एखाद्याला अधिक सूक्ष्म जाण असेल तर त्याचे मत अधिक ग्राह्य की त्याच्या विरोधात जाणारे पण बहुसंख्येचे, असे प्रश्न निर्माण करत रामण्णाला खात्री असलेले साधेसोपे ’सत्य’ त्याने संशयाच्या आवर्तात नेऊन सोडले आहे.

एखादी गोष्ट ’सत्य आहे’, ’खरी आहे’ हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? त्यामागे विचार-अनुभव असतो की प्रेरणा-गृहितकाचाच अधिक प्रभाव असतो? आपण खरंच सत्यान्वेषी असतो की 'सत्य नावाचे काहीतरी आपल्याकडे असायला हवे किंवा आहे' या विचाराने भावनिकदृष्ट्या आश्वस्त होतो म्हणून आपण त्याबाबत आग्रह धरतो? जर सत्यान्वेषी असू तर आपले सत्य पडताळणीचे करण्याचे निकष कोणते असतात? त्यात अनुभव-विचार-विश्लेषण-पडताळणीचा मार्ग असतो की अन्य असंलग्न अशा घटकांचा आपल्या निर्णयावर परिणाम होतो? हे आणि असे अनेक प्रश्न सत्यशोधाच्या वाटेवर विचारले जायला हवेत, त्यांची उत्तरे शोधायला हवीत.

परंतु त्यापूर्वी सर्वसाधारणपणे सत्यनिश्चितीचे प्रचलित निकष काय हे पाहणे उपयुक्त ठरेल.

सत्य-निश्चितीचे प्रचलित निकष:

१. बरीचशी सत्ये स्वयंसिद्ध नि पडताळणीच्या/मूल्यमापनाच्या पलिकडची असतात असा समज असतो. कधीकाळी कोणीतरी अधिकारी समजल्या गेलेल्या व्यक्तींनी ती मांडलेली असतात आणि ती तशीच गृहित-सत्ये म्हणून स्वीकारायची असतात.

ओशोंनी अशा गृहित-सत्याचे एक उदाहरण दिले आहे. एकदा एक फादर प्रवचन देत होते. स्त्रियांबद्दल आपली भूमिका मांडताना ते म्हणाले "स्त्रियांना देवाने पुरूषांपेक्षा दुय्यम भूमिका दिली आहे. बघा ना, त्यांच्या तोंडात बत्तीसहून कमी दात असतात." यावर ओशोंनी ताबडतोब तिथल्या तिथेच त्या तथाकथित सत्याची पडताळणी करावी अशी मागणी केली. अर्थातच ’पाखंडी’ अशी संभावना करून ती फेटाळली गेली.(२) म्हणजे पडताळणी शक्य असेलच तरी पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य असेलच असे नाही.

२. आपला 'समज' हे आपण सत्य मानून चालतो. बरेचदा अमुक एक गोष्ट सत्य असावी असे आपल्याला वाटते तिला आपण सत्य मानून चालतो.

हे तर सत्यनिश्चितीचे सर्वाधिक प्रचलित रूप आहे. या प्रकारच्या सत्यांच्या(?) साठवणीस सारी पृथ्वी अपुरी पडावी इतके रांजण भरून ठेवलेले असतात. अमुक भागात राहणारे सगळे अमुक एका प्रकारच्या प्रवृत्तीचे असतात, अमुक शाळेतून, विद्यापीठातून वा संस्थेतून शिकलेले व्याख्येनुसारच इतरांपेक्षा हुशार असतात, अमक्या जातीचेच लोक डोक्याने हुशार असतात. धार्मिक, पारंपारिक बाबतीत असले समज अधिक आढळून येतात. आपला धर्म अमुक बाबतीत असे सांगतो वा असा आहे ’असा आपला समज असतो'. पण आपण तसेच 'आहे' असे ठासून सांगतो. अनेकदा धार्मिक म्हणवणारी मंडळी सांगतात त्याहून अगदी विपरीत असे सत्य वा विधान मूळ ग्रंथांमधून आढळून येते.

असाच काहीसा प्रकार आपल्या रोजगाराबाबत असतो वा अभ्यासक्रमाबाबत. आपल्या रोजगारातच किती कष्ट वा ताण असतात ’तुम्हाला काय कळणार ते’ असे अन्य कोणत्याही रोजगार करणार्‍याला सांगून आपण आपले स्थान उगाचच उंचावण्याचा प्रयत्न करतो, किंवा समोरच्याला लायकीहून अधिक वा त्याच्या श्रमाच्या वाजवी मूल्याहुन अधिक परतावा मिळतो असे ठसवू पाहतो. एंजिनियरिंगवाला तर आपलाच अभ्यासक्रम सर्वात अवघड आहे हे सांगतोच पण अन्य पदवी/शिक्षण घेणारा कोणीही - अगदी समाजशास्त्र, तत्त्वज्ञानापासून गणितापर्यंत कोणत्याही विषयात - आपलाच विषय शिकायला अवघड नि बाजारात ’मागणी’ असलेला आहे हे ठासून सांगत असतो. मुख्य म्हणजे या प्रकारात पडताळणी शक्य असून ते करण्याची इच्छा नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते गृहित-सत्य आपल्या स्वार्थाला अनुकूल असते.

अर्थात हे समज वा गृहित-सत्य नेहमीच स्वार्थप्रेरित असतील असेही नाही. अनेकदा निव्वळ पडताळणीच्या आळसामुळे म्हणा, अथवा प्रत्येक बाबतीत आपल्याला सत्य माहित असलेच पाहिजे, त्यावर आपल्याकडे मत असलेच पाहिजे या अट्टाहासातून म्हणा, किंवा निव्वळ ज्याला आपण प्राकृतात ’मतांच्या पिंका टाकणे’ म्हणतो तशा स्वभावामुळे अशी विधाने केली जातात.

आमच्या माजी बॉसने एकदा जेवणाच्या टेबलावर गप्पा चालू असताना बेदरकारपणे म्हटले,’...पण हल्ली हुंडा घेतो कोण?’ (थोडक्यात त्याच्या मते कोणीही घेत नाही वा क्वचित घेतला जातो.) मला धक्काच बसला होता. मी त्याला म्हटले "एक काम कर. या क्षणी इथे टेबलवर बसलेल्या विवाहित पुरूषांना - जे स्वत:ला समाजातील यशस्वी नि म्हणून श्रेष्ठ व्यक्ती समजतात - आपण विचारू या की त्यांनी हुंडा घेतला की नाही. आणि जे भविष्यात लग्नगाठ बांधणार आहेत त्यांना विचार की हुंडा घेणार नाही हे ते आज ठामपणे सांगू शकतात का?"

काही क्षण तिथे भयाण शांतता होती नि ती बोलकी होती. अर्थात नंतर ’सासर्‍याने गाडी देणे हा काही हुंडा नाही, आपल्याच मुलीच्या सुखासाठी त्यांनी दिले तर काय बिघडले’ वगैरे नेहमीचे तर्क सुरू झाले. पण त्यात कारणमीमांसेपेक्षा आत्मसमर्थनाचा भागच अधिक दिसून येत होता. पण हे असे ताबडतोब खोडून काढता येईल इतके गृहित-सत्य बहुधा सोपे वा पडताळणी-सहज नसते. असलेच तरी तशी संधी क्वचितच मिळते. किंबहुना अनेकदा निर्णायक पडताळणी - वा खंडन - शक्य होत नाही तिथेच अशा गृहित-सत्यांचे प्राबल्य अधिक असते.

३. ते तथाकथित सत्य सांगणार्‍याच्या विश्वासार्हतेबद्दल आपले मत जसे असेल त्यानुसार ते आपण सत्य अथवा असत्य 'मानतो'.

BillGatesHonoredInIndia
time.com येथून साभार.

ऑस्कर वाईल्डचा लॉर्ड हेन्री(३) म्हणतो "इंग्लिश माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तो ती गोष्ट विश्वासार्ह आहे का या पेक्षा ती सांगणारा विश्वासार्ह आहे का हे अधिक महत्त्वाचे मानतो." ही प्रवृत्ती खरेतर बहुतेक संस्कृतींमधील माणसांमधे आढळून येईल. आपल्याला विश्वासार्ह न वाटणार्‍या एखाद्या व्यक्तीने सांगितलेली एखादी गोष्ट आपण किती गांभीर्याने घेतो? ती सत्य आहे की नाही हे अजमावून पाहण्याइतपत महत्व तिला देतो, याबाबत ज्याने त्याने आपल्यापुरता विचार करून पहावा.

काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कर्ताधर्ता बिल गेट्स भारतात आला होता. इथे असताना त्याने एक विधान केले होते की "भारतीय शिक्षण-पद्धती ही जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षण-पद्धती आहे." लोकांनी लगेच ’बघा बिल गेट्स पण म्हणतोय...’ म्हणत आपली पाठ थोपटून घ्यायला सुरूवात केली होती. आता बिल गेट्स म्हणतो म्हणून आपण लगेच मान्य करावे काय? थोडक्यात सांगणारा विश्वासार्ह आहे असे आपण समजतोय का? असल्यास उद्या बिल गेट्सनेच "भारतीय विद्यार्थी सर्वात आळशी असतात." असे विधान - पाठोपाठ वा स्वतंत्रपणे - केले असते तर ते ही आपण मान्य केले असते का? इथे साधा सोपा मुद्दा आहे, की हे सत्य ’असावे असे वाटते’ म्हणून आपण ते तसे आहे असे मानतो. बिल गेट्स हा निमित्तमात्र. त्याने असे म्हटले नसते तरी ते गृहित-सत्य आपण कवटाळून ठेवले असतेच.

याच्या नेमके उलट उदाहरण जीएंच्या ’कळसूत्र’(४) या कथेमधे दिसून येते. यातील गरुड जमातीचा नेता अखेर सत्य सांगून आपण आपल्या अनुचरांची केलेली प्रतारणा उघड करतो. "मी तुमच्या आधीच्या नेत्याच मुलगा नाही. पर्वतापलिकडे कोणताही सम्राट नाही, मला कोणतेही आदेश येत नव्हते, मी स्वत: कातडीबचाऊ वृत्तीने युद्ध करण्याचे टाळले, हा नि यासारखे इतर निर्णय सम्राटाच्या आदेशाने घेतले आहेत असे तुम्हाला खोटेच सांगितले होते."

वास्तविक इथे त्याने संपूर्ण सत्याचा उच्चार केला आहे. परंतु इतकी वर्षे त्याचा शब्द प्रमाण मानून जगणारे(!) त्याचे अनुचर आता त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत. उलट प्राचीन सत्याचा अधिक्षेप केला याबद्दल त्यालाच दूषणे देतात, दंडित करतात. इथे जे ’असावे वाटते’ ते सत्य मानले जाते.

पर्वतापलिकडे एखादा सम्राट (हे देव संकल्पनेचे रूपकच आहे) असावा. ज्याने आमच्यावर पाखर घालावी आमच्या हित-अहिताची जपणूक करण्यासाठी वेळोवेळी नेत्याला आदेश देऊन आमची काळजी वाहावी ही इच्छाच गृहित-सत्याचे रूप घेऊन समोर येते. थोडक्यात सत्य मानताना देखील सोयीच्या सत्याला आपण अधिक प्राधान्य देतो. शिवाय जगातील सार्‍याच संस्कृतींमधे समान असलेला प्राचीनत्वाला, रुढीला सत्य समजण्याचा प्रघात इतर सार्‍या निकषांना बाजूला सारतो हाही एक महत्त्वाचा मुद्दा. यात ’सत्य हे कालातीत’ असते हे गृहितक, ते ही भ्रष्ट स्वरूपात - म्हणजे ’कालातीत ते सत्य’ या व्यत्यासाच्या स्वरुपात - वापरले जाते.

४. बहुसंख्य लोकांना अमुक एक गोष्ट सत्य आहे असे वाटते, म्हणून आपण ते सत्य मानतो.

KaajaLmaayaa

सत्य सिद्ध करताना बहुसंख्येचा निकष लावला जातो. तो कितपत ग्राह्य असावा? याच लेखाच्या सुरूवातीला दिलेल्या प्रसंगातील भुत्याने हा प्रश्न विचारलाच आहे. माझ्यासारखाच आणखी एक आंधळा इथे आहे नि आम्ही दोघे हा भंडारा पिवळाच आहे असे म्हटले, तर दोन विरुद्ध एक या न्यायाने तो पिवळा ठरतोच नि तुला ते मानावेच लागेल.

जीएंच्याच 'विदूषक'(५) या कथेमधे हंस आणि कावळ्यांचे एक उपकथानक आहे. बहुसंख्येच्या जोरावर केल्या जाणार्‍या सत्यापलापाचे इतके सुंदर उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. केवळ बहुसंख्येच्या जोरावर मानस सरोवर हे कावळ्यांचे आहे हे सिद्ध करणे, त्याहुन पुढे जाऊन बहुसंख्येने असलेले काळ्या रंगाचे पक्षी हेच हंस आहेत हे सिद्ध करणे, पर्यायाने ’मानस सरोवर हंसांचे’ या नियमाचा आधार घेऊन त्यावर हक्क प्रस्थापित करणे... हे सारे वरकरणी असत्य वाटणारे सारे सत्य म्हणून सिद्ध होते.

बहुसंख्येचा सत्यसिद्धतेसाठी होणारा वापर हा जीएंच्या अन्वेषणाचा लाडका विषय आहे. त्यांच्या ’यात्रिक’(६) मध्येही डॉन त्याला भेटलेल्या संन्याशाला विचारतो ’तुमचा धर्म सत्य होता म्हणून त्याला अनुयायी मिळाले की आधी तलवारीच्या जोरावर तो पसरला नि त्याच्या अनुयायांच्या बहुसंख्येवर तो सत्य ठरला?’

हा तर्क थोडा पुढे नेऊन एक प्रश्न विचारता येईल. समजा दोन परस्परविरोधी उमेदवार-सत्ये (candidate-truths) आपल्यासमोर आहेत नि बहुसंख्येच्या तत्त्वाचा वापर करून त्यातील एकाला दुसर्‍यापेक्षा ’एक मत’ अधिक मिळून ते सत्य सिद्ध झाले तर पुरेसे आहे का? उद्या या सत्याच्या एखाद्या पाठीराख्याने आपले मत बदलले नि दुसर्‍या उमेदवार-सत्याचा स्वीकार केला तर आता ते सत्य सिद्ध झाले ना? म्हणजे सत्य परिवर्तनीय असते का? बहुसंख्येने सत्य ठरवण्याच्या पद्धतीमधे हा अंतर्विरोध दिसून येतो.

शिवाय मुळात जे विधान अथवा सिद्धांत सत्य आहे की नाही याचे मूल्यमापन केले जाते, त्याला अनेकदा त्या विधानाच्या संदर्भातील विशिष्ट कौशल्याची, माहितीची व ज्ञानाची आवश्यकता असते. अशा कौशल्याचा अभाव अथवा आवश्यक माहिती व ज्ञानाबाबत पूर्णत: अनभिज्ञ असलेल्यांचे बहुमत सत्यान्वेषणास कुचकामी ठरते. आणि म्हणूनच अशा बहुमताचा निर्णय अग्राह्य ठरतो. विविध मिडीया चॅनेल्स नि संकेतस्थळावर बरेचदा अशाच प्रकारचे तथाकथित सर्वे घेतलेले दिसून येतात.

५. बहुसंख्येला अमुक एक सत्य आहे असे वाटते असा आपला समज असतो म्हणून आपण ते सत्य मानतो.

इथे पुन्हा एकदा वर दिले्ल्या हुंड्याबद्दलच्या भाष्याचेच उदाहरण घेऊ.'आजच्या समाजात बहुसंख्येला हुंडा घेणे अयोग्य वाटते नि म्हणून आता ती पद्धत काहीशी कालबाह्य झालेली आहे' असा आमच्या बॉसचा समज आहे नि तो त्याच्या दृष्टीने सत्याचे रूप घेऊन बसला आहे. ज्यांच्याबाबत तो समज खरा असण्याची शक्यता बहुसंख्येच्या तुलनेत अधिक होती, अशा त्याच्या समोरच असलेल्या एक-दोन व्यक्तींच्या प्रतिसादातून तो केवळ समजच असल्याचे दिसून आले.

कदाचित एखाद्या समाजघटकात, वा भूभागावर (शहरीभागात?) हे अंशत: का होईना पण सत्य असेलही. पण म्हणून हे विधान सार्‍या समाजाला लागू होत नाही. अशा वेळी सत्याची व्याप्ती निश्चित करावी लागते. कालसापेक्षता, स्थलसापेक्षता, व्यवस्था-सापेक्षता आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे व्यक्तिसापेक्षता हा निश्चित विधानाचा, सत्याचा महत्त्वाचा पैलू असतो.

सत्यग्राह्यतेचे विविध निकष अथवा पद्धती आपण पाहिल्या. पण मुळात अन्वेषणाला आवश्यक असलेले ज्ञान, माहिती, पुरावे आपल्याला जमा करावे लागतात, ते तपासून पहावे लागतात. त्यासाठी त्यासंबंधी पुराव्यांचे संकलन, आकलन नि विश्लेषण आवश्यक ठरते.

(क्रमश:)

- oOo -

    पुढील भाग >> स्वरूप, दर्शन व आकलन

संदर्भ:

१. कथा: ठिपका - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
२. 'बंडखोर' या प्रवचनसंग्रहातून
३. 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' या 'ऑस्कर वाईल्ड'लिखित बहुचर्चित कादंबरीतील एक प्रमुख पात्र. (हा खुद्द ऑस्करचा alter-ego मानला जातो.)
४. कथा: कळसूत्र - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
५. कथा: विदूषक - ले. जी. ए. कुलकर्णी (संग्रहः काजळमाया)
६. कथा: यात्रिक - ले. जी.ए. कुलकर्णी (संग्रहः पिंगळावेळ)

या कथेमध्ये जीएंनी सर्वांतिसच्या डॉन क्विक्झोटला ख्रिस्त, बुद्ध यांसारख्या प्रेषितांच्या, इतिहासातील सर्वात मोठा दगाबाज मानल्या गेलेल्या ज्युडाससारख्या ऐतिहासिक पात्रांसमोर आणून उभे केले आहे. त्या निमित्ताने ’अंतिम सत्य’, धर्म वगैरे संकल्पनांची चिकित्सा केली आहे. विशेषत: यातील ’अंतिम सत्य’ या संकल्पनेबाबत डॉनने विचारलेले प्रश्न मार्मिक आहेत.

७. प्रसिद्ध जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याने दिग्दर्शित केलेला ’राशोमोन’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. रुनोसुको अकुतागावा या लेखकाच्या दोन छोटेखानी कथांची वीण त्याने अशी घातली, की त्यातून एक अजोड चित्रशिल्प साकार झाले. त्या चित्रपटावर आस्वादक मालिका लिहिताना वाचकाची मनोभूमिका तयार करण्यासाठी एक उपोद्घात-स्वरूप एक प्रकरण लिहिले होते. त्याचा विस्तार करुन सविस्तर मांडणी केलेला हा लेख ’मुक्त-संवाद’ या नियतकालिकाच्या २०२२ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

जंगलवाटांवरचे कवडसे’ ही ’राशोमोन’वरील मालिका याच ब्लॉगवर वाचता येईल.

---

संबंधित लेखन:

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च
बिम्मच्या पतंगावरून - ३ : प्रतिबिंबांचा प्रश्न


हे वाचले का?