शुक्रवार, ८ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - ४ : ब्लॉग लिहिल्यानंतर

मागील भाग << माझी ब्लॉगयात्रा - ३ : ब्लॉग लिहिताना
---

ब्लॉग तयार केल्यानंतर, ब्लॉगपोस्ट लिहिल्यानंतर बहुतेक ब्लॉगर मंडळी ’प्रसिद्ध करा’ (Publish) पर्याय वापरतात नि थांबतात. याच्यापुढे काही असते याची बहुतेकांना माहिती नसते. काही मंडळी तर इतकी बेफिकीर दिसतात, की त्यांच्या एकाच पोस्टमध्ये वेगवेगळ्या आकाराचा वा प्रकाराचा फॉन्ट असणारा मजकूर दिसतो. अन्य एडिटरमधून किंवा अन्य वेबसाईटवरून पेस्ट करताना त्याच्या फॉरमॅटिंगचे काय होते, याबाबत बहुतेक सारे अनभिज्ञ असतात. बरं निदान समोर वेगवेगळे फॉन्ट दिसत असताना ते सुधारून कसे घ्यावे याचा विचार तरी करावा. यातील काही मंडळी तर पोस्ट प्रसिद्ध केल्यावर ती पोस्ट, आपला ब्लॉग, निदान आपल्या ब्राउजरवर व्यवस्थित दिसते का, याची शहानिशाही करत नसावेत असा मला दाट संशय आहे. (जसे फेसबुकवर शेअर बटन दाबल्यावर आपली वॉल पाहून आपल्याला अपेक्षित तेच शेअर झाले का याची शहानिशा करत नाहीत तसे.)

आणखी एक मुद्दा असतो वाचणार्‍याला दिसणार्‍या मांडणीचा. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जसे लेखकाला दिसते नेमके तसेच वाचकाला दिसेल याची शाश्वती देता येत नाही! विविध संस्थळे, ब्लॉग, पोर्टल्स ज्याच्यामार्फत आपण उघडतो त्या ब्राउजरची गंमत अशी असते की, आपल्या संगणकावर -समजा- गुगल क्रोममध्ये आपण एखादी संस्थळ/वेबसाईट जशी दिसते तशीच ती फायरफॉक्स, त्याची भावंडे आईसड्रॅगन वा वॉटरफॉक्स, क्रोमची भावंडे कोमोडो ड्रॅगन आणि ब्रेव्ह ब्राउजर, किंवा या दोनही कुटुंबांपलिकडे असलेल्या मायक्रोसॉफ्टचा एज किंवा ऑपेरा ब्राउजरवर दिसत नाही. तुम्ही तुमच्या लेख/बातमीमध्ये समाविष्ट केलेल्या मजकुरासह इतर स्वरुपातील माहितीचा परस्परसंबंधच काय तो ब्राउजरला सांगितलेला असतो. (चित्राच्या उजवीकडे अमुक अंतरावर मजकूर सुरु करणे. एकुण स्क्रीनच्या डाव्या वा उजव्या बाजूस इतके टक्के भाग हा अमुक चित्राने राखून ठेवणे वगैरे) त्यापलिकडे प्रत्येक ब्राउजर आपापल्या पद्धतीने मजकुराची मांडणी करत असतो. यात थोडे डावे उजवे होत जाते.

क्रोमवर एखाद्या ग्राफच्या बरोबर शेजारी दिसणारा मजकूर ऑपेरामध्ये थोडा खाली अथवा वर सरकलेला दिसून येतो. त्यामुळे वाचकाला दिसणार्‍या मजकुराचा पोत बदलतो. याशिवाय तुमच्या डेस्कटॉप/ लॅपटॉप/ टॅब/ मोबाईलच्या प्रणालीमध्ये (विंडोज/ अ‍ॅंड्रॉईड/ लिनक्स/ क्रोमिअम वगैरे) फॉन्टचा ठरवून दिलेला आकार (small, median, large वा custom), तुमच्या ब्राउजरमधला फॉन्ट, एन्कोडिंगची तुम्ही वा तुमच्या ब्राउजरने तुमच्यासाठी निवडलेली पद्धत, आदी गोष्टींवर समोर दिसणार्‍या पानाची मांडणी बदलत जाते. ब्राउजरमध्ये साधे झूम-इन/झूम-आउट केले तरी इमेज आणि मजकुराचे गुणोत्तर बदलत जाते.

मोबाईल, टॅब, डेस्कटॉप यांच्यासाठी ब्लॉगची मांडणी वेगळी असते हा आणखी एक अडचणीचा मुद्दा. याशिवाय ओळ संपताना तिथे आलेल्या शब्दाच्या रुंदीनुसार तो त्याच ओळीत प्रकाशित होईल की नव्या ओळीत जाईल हे ठरते. झूम, फॉन्ट्चा आकार वगैरे मुळे याचे स्थान खाली अथवा वर होत जाते.

पोर्ट्रेट मोड
पोर्ट्रेट मांडणी.
लॅंडस्केप मोड
लॅंडस्केप मांडणी.

उदाहरण घ्यायचे तर हा एक ताजा ब्लॉग पाहा. एकाच मोबाईलवर पोर्ट्रेट आणि लॅंडस्केप मोडमध्ये याची मांडणी कशी दिसते पाहा. ही मांडणी मजकुरापेक्षा फोटोला अधिक महत्व देणारी आहे. काहींना ती सोयीची वाटेल. याउलट माझी मांडणी दोन्हीकडे सारखीच दिसेल, परंतु पोर्ट्रेट मोडमध्ये इमेज कदाचित पुरेशी मोठी दिसणार नाही. दोन्हींचे फायदे-तोटे आहेत, पण मी दुसरी मांडणी स्वीकारली आहे कारण 'वेचित चाललो...’ वर पुस्तकांबद्दल लिहिताना मला ती अधिक सोयीची वाटली आहे.

या समस्यांमुळे ब्लॉग तयार झाल्यानंतर किमान एकदा, आणि जर पोस्टमध्ये स्वत:चे असे फॉरमॅटिंग वापरत असलात तर प्रत्येक पोस्टनंतर, आपला ब्लॉग वेगवेगळ्या ब्राउजरवर कसा दिसतो, हे - निदान आपल्या संगणक/टॅब/मोबाईलवर तपासून पाहणे आवश्यक ठरते. मी वर उल्लेख केलेले पाच-सहा ब्राउजर तपासून पाहात असतो.

आयफोन वा एकुणात अ‍ॅपलधारी म्हणजे सात खंदक, सात तट आणि सतराशे सैनिक यांच्या गराड्यात बसून ’तुम्ही हल्ली भेटत नाही हो.’ अशी दांभिक तक्रार करणार्‍या शेजार्‍यासारखे असतात. हे स्वत:ला संगणक आणि मोबाईल विश्वातले उच्चभ्रू समजत असतात. मध्यंतरी अशाच एका ’अ‍ॅपलस्टिल्टस्किन’ मित्राने माझ्या ब्लॉगमधील व्हिडिओ आपल्याकडे नीट दिसत नाही अशी तक्रार केली. मी पाचही ब्राउजरवर चेक केले असल्याने बुचकळ्यात पडलो. अगायायायायफोन ही माझी पोस्ट आठवली, आणि अचानक ट्यूब पेटली. त्याला विचारले, ’बाबा ब्राउजर कुठला वापरतोस?’ यावर अपेक्षित उत्तर आले सफारी, आणि अर्थातच आयफोनवर.

आता सफारीवर ब्लॉग टेस्ट करू म्हणून तो डाऊनलोड करण्यास शोधाशोध केली तर असे दिसले, की २०१२ नंतर अ‍ॅपल महाशयांनी विंडोजवर हा ब्राउजर देणे बंदच केले आहे. इतकेच नव्हे तर हा ब्राउजर ज्या WebKit ब्राउजर-एंजिनवर तयार केला आहे ते एंजिन अ‍ॅपलची iOS प्रणाली वगळता इतर कोणत्याही प्रणालीवर चालत नाही (not supported). म्हणजे समजा (हे येरागबाळ्याचे आणि गरीबाचे काम नोहे. पण तरीही...) ते घेऊन विडोज वा अ‍ॅंड्रॉईडवर स्वत:च ब्राऊजर तयार करुन त्यावर टेस्ट करेन म्हटले तरी तो पर्यायही उपलब्ध नाही. थोडक्यात आमचा ब्लॉग आयफोनधारी उच्चभ्रूंना कसा दिसतो हे पाहण्यासाठी आम्हालाही सक्तीने आयफोन किंवा आयपॅड किंवा अ‍ॅपल लॅपटॉप घ्यावा लागणार.

म्हटलं ही त्यांची सात तळ्याची तांब्या-पितळेची माडी त्यांची त्यांना लखलाभ असो. ’अ‍ॅपलवर, अ‍ॅपलवाल्यांसाठी, अ‍ॅपलवाल्यांनी बनवलेली/चालवलेली वेबसाईट’च त्यांनी पाहावी असा फुकटचा सल्ला देऊ इच्छितो. मित्राला म्हटले, "तू आमच्या गावकुसाभाईर बंगला बांधून बसलाईस. गावात ये. मग तुपली-मपली वळखपाळख नीट व्हईल. तंवर माझं ग्रेट लिखान* तुला नीट दिसत न्हाई, वाचता येत न्हाई, ह्ये तुजं दुर्दैव रं माज्या बाबा." (*माज काय फक्त अ‍ॅपलवाल्यांनीच करावा की काय.) अर्थात पुढे व्हिडिओ समाविष्ट करण्यासाठी (video embedding) मी जे तंत्र वापरले त्याने सफारीवरही समस्या दूर झाली असे समजले.

हे वाचून अनेक ब्लॉगरही बुचकळ्यात पडले असतील. म्हणतील, ’आमचे व्हिडिओ/फोटो तर नीट दिसतात बुवा. यालाच का अडचण येते?’ त्याचे उत्तर असे आहे की तुम्ही व्हिडिओ हे बव्हंशाने मजकुराहून वेगळे, स्वतंत्र परिच्छेद म्हणून समाविष्ट करत असता. मला व्हिडिओ/फोटो आणि त्याच्याशी सुसंगत मजकूर एकमेकांशेजारी हवा असतो. यामुळे कोणतीही प्रणाली वा ब्राउजर असेल तर माझ्या मजकुराची मांडणी शक्यतो एकसारखी राखता येते.

तसा तो ठेवताना दोन अडचणीचे मुद्दे येतात. पहिला, मजकूर म्हणजे शब्द आणि फोटो/व्हिडिओ यांच्या आकारबदलाच्या गणितामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे झूम केले किंवा मोबाईलवर पोर्ट्रेट मोडमधून लॅंडस्केप मोडमध्ये गेले, की त्यांचा परस्परसंबंध बिघडतो. वेगवेगळ्या ब्राउजरवर पडणारा फरक तर आहेच. विशेषत: मोबाईलवर याबाबत अनेक समस्या येतात. स्वतंत्र परिच्छेदात फोटो/व्हिडिओ असतील तर ही समस्या येत नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे डेस्कटॉप/लॅपटॉप, टॅब, मोबाईल यांच्यासाठी वेगवेगळ्या थीम्स (मांडणी) असतात. मोबाईलच्या लहानशा स्क्रीनचा विचार करुन ज्याला lightweight म्हणतात तशा स्वरूपाची मांडणी त्याच्यासाठी असते. तुमचा ब्लॉग जसा मोबाईलवर दिसतो तसा टॅबवर दिसत नाही, आणि जसा टॅबवर दिसतो तसाच लॅपटॉपवर दिसेल याची खात्री देता येत नाही. अनेकदा फोटो वा व्हिडिओ मोबाईल स्क्रीनच्या रुंदीची मर्यादा झुगारून जाताना दिसतो. (निदान ब्लॉगरमध्ये) ब्लॉग तयार झाल्यावर या तीनही उपकरणांवर कसा दिसेल याचे पूर्वावलोकन (preview) वेगवेगळे पाहता येतात. त्यानुसार आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्या लागतात. आणि रिकामी जागा (white space) वा मोकळी ओळ (line) सोडून हे नेहमीच साधत नाही.

मोबाईलच्या मर्यादा

मोबाईलचा स्क्रीन संगणकाच्या पडद्याहून बराच लहान असतो. लॅपटॉप वि. मोबाईल स्क्रीनचे जे गुणोत्तर असेल तेच जर त्यावरील फॉन्टमध्येही नेले, तर लॅपटॉपवरील मांडणी मोबाईलवर तंतोतंत तशीच दिसू शकेल... भिंग लावून पाहिली तर! कारण त्याचा फॉन्ट माणसाच्या डोळ्याला वाचताच येणार नाही. म्हणून ब्लॉगर (आणि इतर बहुतेक संस्थळे/वेबसाईट्सही) मोबाईल थीम ही डेस्कटॉप थीमहून वेगळी ठेवतात. मोबाईल थीम ही अधिक सुटसुटीत असते, आणि म्हणून त्यावर मर्यादितच पर्याय उपलब्ध असतात.

मी ’वेचित चाललो...’ हा ब्लॉग चालू केल्यानंतर एका फेसबुक-मैत्रिणीने एका लेखावर कमेंट करुन ’या ब्लॉगवर नवीन लेखन येईल तेव्हा त्याची सूचना मला मिळावी म्हणून काय करता येईल?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर ब्लॉगवर गुगलचे ’सबस्क्राईब’ आणि ’फॉलो-बाय-ईमेल’ विजेट असे दोन पर्याय दिले आहेत, असे मी कळवले होते. पण तिने सबस्क्राईब केल्याचे दिसले नाही. काही दिवसांनंतर अन्य एका मित्राने माझ्या लेखातील काही भाग कॉपी करुन एका व्हॉट्स-अ‍ॅप चॅटमध्ये उद्धृत केला होता. मी कॉपी प्रोटेक्शन लावलेले असल्याने त्याला हे कसे जमले असावे, असा प्रश्न मला पडला. त्याने मोबाईलवरुन कॉपी केल्याचे सांगितल्यावर मी शोध घेतला. मी केलेले कॉपी-प्रोटेक्शन मोबाईल थीमवर चालत नाही असे लक्षात आले. तेव्हाच ही ट्यूबही पेटली, की सबस्क्राईबबाबत प्रश्न विचारणारी व्यक्ती मोबाईलवरुन ब्लॉग पाहात असेल, तर तिला सबस्क्राईब पर्याय - आणि इतर कोणतेही विजेट - दिसतच नसणार. त्यामुळे तो पर्यायच तिला उपलब्ध नसेल. मी स्वत: मोबाईलवर ब्राउजिंग, व्हॉट्स-अ‍ॅप वगैरे क्वचितच वापरतो. माझी सारीच कामे ही लॅपटॉपवर होत असल्याने मी मोबाईलकडे फार लक्षच दिले नव्हते.

मोबाई्लच्या थीम्स (मांडणी) या समासांचा म्हणजे कॉलम्सचा वापरच करत नाहीत. एखाद्या अनुक्रमणिकेसारखी लेखांची सूची देऊन मोकळ्या होतात. त्यामुळे सर्वस्वी मोबाईलवर अवलंबून असणार्‍या मंडळींना सर्वात अलीकडचे लेखन वगळता जुने लेखन वाचण्याची कुठलीही सोय राहात नाही. (लॅपटॉपवर ब्लॉग-सूची दिसत असल्याने ते सुलभ होते). आता मोबाईल वापरणार्‍यांना सूची द्यायला जागाच नाही. मग पुरी सूची नाही, निदान प्रत्येक लेखासोबत आणखी एखाद्या लेखाची शिफारस करता आली, तर लेखांची साखळी तयार होईल. ती वाचकांनसाठी आणि पर्यायाने ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठीही उपयुक्त ठरेल असे माझ्या ध्यानात आले. ते पुढे मी समाविष्ट केलेही (कसे ते पुढे येते आहे.) त्याचबरोबर मोबाईलवर सबस्क्राईब पर्याय उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. त्यासाठी मोबाईल थीममध्ये बदल करणे आवश्यक ठरले. म्हणजे आता ब्लॉगरच्या प्रोग्राममध्ये/कोडमध्ये ढवळाढवळ अनिवार्य ठरली.

मी स्वत: सुमारे दहा वर्षे सॉफ्टवेअरमध्ये अगदी संकल्पनेपासून ते चाचणी (आणि आज अस्तंगत झालेली संकल्पना म्हणजे User Manual) पर्यंत सर्व कामे केलेली असल्याने प्रोग्रामिंगवर चांगली पकड आहे. पण तेव्हा आम्ही प्रामुख्याने C आणि त्याच्या C++ सारख्या भावंड-भाषांमध्ये, म्हणजे संगणकाच्या पायाच्या स्तरात काम करत होतो. आता ब्राउजर नि मांडणी यांच्यासाठी HTML, CSS तसंच Javascript अशा पृष्ठ-स्तरातील भाषांमध्ये काम करावे लागले. त्यामुळे सुरुवातीला थोडे अडचणीचे गेले हे कबूल करतो. सुदैवाने ब्लॉगरची (blogspot.com चा आश्रयदाता blogger.com) कम्युनिटी अतिशय जागरुक(vibrant) असल्याने बरेच माहिती, विजेट्स तयार मिळतात. कम्युनिटीवर प्रश्न देऊन आपल्या समस्येचे उत्तर विचारता येते. माझ्या तंत्र वापरात, प्रोग्रामिंगमध्ये निम्मा वाटा या ब्लॉगर कम्युनिटीचा आहे हे नमूद करायला हवे.

(क्रमश:)

- oOo -

पुढील भाग >> माझी ब्लॉगयात्रा - ५ : मजकूर सुरक्षितता


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा