Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?

  • वृद्धत्वाची जेथ प्रचिती... « मागील भाग
    ---

    मागील भागाच्या अखेरीस नेहरुंचा उल्लेख आला आहे, तोच धागा पकडून पुढे जाऊ.

    जिज्ञासा

    https://www.istockphoto.com/ येथून साभार.

    फेसबुकवर एके ठिकाणी कुरुंदकरांनी नेहरुंबाबत लिहिलेला एक उतारा पोस्ट केलेला होता. त्याखाली एका तरुणाने “लेखकाला टॅग करता येईल का? त्याच्या प्रोफाईलवर जाता येईल.” अशी कमेंट केलेली होती. समाजमाध्यमांवर बस्तान बसवून असलेल्या ट्रोलिंग मानसिकतेच्या कुणी एकाने त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट म्हणून टाकला असता, त्यावर सुमारे शंभरेक जणांनी 'हा: हा:’ अशी प्रतिक्रिया दिलेली पाहिली. (‘नेहरु’ असा शब्द वाचूनच हा: हा: करणारे काही त्यात असतील. त्यांना वगळून) इतक्या सार्‍यांना कुरुंदकर ठाऊक आहेत ही आनंदाचीच बाब आहे.

    कुरुंदकरांचे, त्यांच्या दृष्टिकोनाचे स्थान माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच आहे. परंतु तरीही कुणाला तरी कुरुंदकर ठाऊक नाहीत याने माझी अस्मिता दुखावत नाही. विचारांना अस्मितेचे देव्हारे नसावेत अशा मताचा मी आहे. 

    या प्रतिसादात हास्यास्पद काही आहे असे मला वाटत नाही. पोस्ट वाचून त्या प्रतिसादकाला कुरुंदकर या लेखकाचे आणखी काही वाचावेसे वाटले, याबद्दल मला कौतुकच वाटले. कुरुंदकर हे लेखक त्याला ठाऊक नसतील, त्याला हे लेखन कुणा फेसबुकवर सक्रीय असलेल्या व्यक्तिचे आहे असे वाटले असेल, तर तो त्याचा दोष म्हणता येणार नाही. ढीगभर वाचूनही मला अनेक लेखक ठाऊक नसतात. यात काही लाज वाटावी असे नाही. असंख्य लेखक नि पुस्तके अस्तित्वात असतात. आपली सार्‍यांशीच ओळख होते असे नाही.

    यावरून एक वैय्यक्तिक अनुभव आठवला. एका प्रथितयश वृत्तपत्रामध्ये एका सामाजिक मुद्द्याचा उहापोह करणारा, (माझ्या मते) प्रतिगामी दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारा एक लेख प्रसिद्ध झाला. ‘याचा विस्तृत प्रतिवाद व्हायला हवा’ अशी मी प्रतिक्रिया दिल्यावर एका ज्येष्ठ पुरोगामी मित्राने ’ह्यॅ: अमुकतमुक मासिकात तो केव्हाच आला आहे. तुम्ही वाचत नाही नि आलात तोंड वर करुन बोलायला.’ अशी प्रतिक्रिया दिली होती. 

    आता हे मासिक मी लंगोटात असतानाच बंद झालेले. तरीही ते न वाचल्याबद्दल मला फटका मिळाला होता. वास्तविक त्या प्रतिवादित मुद्द्याचा पुन्हा एकवार प्रचार-प्रसार सुरू झाला असेल, तर त्याच्या प्रतिवादालाही पुन्हा उजाळा द्यायला हवा हा सामान्य समजाचा भाग आहे. आजचा वृत्तपत्रीय लेख वाचलेली तरूण पिढी किमान चाळीस वर्षांपूर्वीचा तो अंक कुठून मिळवणार होती? परंतु त्यात सूचनेपेक्षा ‘मला अधिक माहित आहे’चा दर्पच मला अधिक जाणवला. ज्येष्ठांना ज्येष्ठत्व दाखवण्याचा कंड सामान्य समजुतीपेक्षा अधिक महत्त्वाचा वाटला असावा. ‘प्रश्न विचारु नका, मी देतो ते पाठ करा’ म्हणणार्‍या शिक्षकाप्रमाणेच असे अहंकारी माहितगार वा ज्ञानी व्यक्ती जिज्ञासेला मारक ठरत असतात.

    हीच बाब त्या कुरुंदकरांबाबतच्या प्रतिसादकाची असू शकेल. तो तरुण असेल, तर त्याला वयामुळॆ अद्याप अनेक लेखकांची ओळख नसेल. यथावकाश तो करुन घेईलही. आपण वयाने अधिक असू म्हणून त्याच्यापेक्षा अधिक माहिती आपल्याला असेल. परंतु त्याबद्दल आपली पाठ थोपटून घेण्याचे नि त्याची थट्टा करण्याचे कारण नाही.

    फेसबुकवर अनेकदा लोक एकमेकांचे लेखन cut-paste करतात. त्यामुळे ‘लेखक फेसबुकवर असेल’ असे समजून त्याच्या प्रोफाईलवर जावेसे वाटले, तर ते स्वागतार्हच आहे. मुलाची जिज्ञासा जिवंत असल्याचे लक्षण आहे. अशावेळी हा: हा: प्रतिक्रिया देणे हा जिज्ञासेचा उपहास आहे असे मला वाटते. प्रामाण्यप्रधान बहुसंख्येच्या समाजात जिज्ञासा ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट असल्याने ती अमूल्य आहे असे माझे मत आहे. आणि म्हणून मला तो उपहास जिव्हारी लागतो.

    नेहरु म्हटले की एडविना आणून थैमान घालणारे बुद्धिबैल मोकाट सुटले असताना, नेहरुंबद्दल कुणी काही लिहिले आहे, ते वाचून ज्याची जिज्ञासा जागृत होते, ज्याने त्यांच्याबद्दल लिहिले त्या लेखकाचे आणखी काही वाचावे अशी इच्छा ज्याला होते, त्याचा उपहास करण्याऐवजी प्रोत्साहनच द्यायला हवे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

    इथे एखाद्याने नेहरुंऐवजी वैचारिकदृष्ट्या दुसर्‍या बाजूचे असणार्‍या सावरकरांबद्दल लिहिले असते, आणि लिहिणारे पु. ग. सहस्रबुद्धे, स.ह. देशपांडे तर सोडाच अगदी गोपाळ गोडसे असते, तरी जिज्ञासेबाबत माझे हेच मत राहिले असते. त्याबद्दल अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या एखाद्या स्वयंघोषित पुरोगाम्याकडून मिळालेले ’छुपा मनुवादी’ असल्याचे सर्टिफिकेट मी पोटभर हसून कचर्‍यात टाकून दिले असते.


    पण याचा उपयोग काय?

    फेसबुकवरील त्या तरुणाप्रमाणेच इतर मंडळीही प्रश्न विचारत असतात. मग प्रत्येक प्रश्न हा जिज्ञासामूलकच असतो का? असा प्रश्नही पडतो.

    विजेच्या शोधाचे प्रात्यक्षिक पुरे झाल्यावर ‘पण याचा काय उपयोग?’ असा प्रश्न एका उपस्थिताने फॅरेडेला(१) विचारला होता- असे म्हणतात. त्यावर ‘नवजात अर्भकाचा तरी समाजाला काय उपयोग असतो?’ असा प्रतिप्रश्न त्याने केला होता– म्हणे. काही दशकांनी विजेचा सार्वत्रिक वापर सुरू झाल्यावर हा प्रसंग म्हणजे त्या प्रश्नकर्त्याची र्‍हस्वबुद्धी नि फॅरेडेचा हजरजबाबीपणा नि दूरदृष्टी यांचा मिलाफ मानला जाऊ लागला... इतपत अर्थ लागला की– किंवा न लागताही, हसून माणसे पुढचा चटपटीत किस्सा वाचायला पाने उलटतात!

    पण तत्कालीन वास्तवाच्या परिप्र्येक्ष्यात विचार केला असता, तो प्रश्न अगदीच गैर म्हणता येईल का? माणसाच्या विचाराला, चिकित्सेला, भविष्यवेधी वृत्तीला, आकलनक्षमतेला वास्तवाचे, संस्कार-परिघांचे, स्वीकृत वा जन्मदत्त जीवनदृष्टीचे कुंपण पडलेले नसते का? मग वर उल्लेख केलेल्या प्रश्नाला आज शतकांहून अधिक काळानंतर, अधिक प्रगत वास्तवाच्या सान्निध्यात उपहासात्मक हसणे कितपत योग्य आहे? असेच एखादे बाणेदार उत्तर दिलेला, पण पुढे ज्याच्या शोधाचा व्यावहारिक वापर शून्य झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत पडलेला एखाद्या शास्त्रज्ञही शोधता येईल.

    विज्ञानातले नाही, पण राजकीय पटलावरचे एक उदाहरण म्हणजे जपानचा हुकूमशहा जनरल टोजो. याने दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस युद्धगुन्हेगार म्हणून फासावर जाण्यापूर्वी ‘भविष्यकाळातील जनताच माझा निवाडा करील’ अशी दर्पोक्ती केली होती. आजच्या जपानमध्ये तो इतिहासाच्या काळ्या पानांवरचे एक पात्र आहे. समजा त्या देशातही साम्राज्यवाद्यांनी उचल खाऊन पुन्हा एकवार ‘जपानचे गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी’ त्याच्या इतिहासाला उजाळा दिला असता, तर आज होतो तसा हा त्याचा दावा हास्यास्पद समजला गेला नसता. (आपल्या इतिहासात तर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. पण ती द्यायची म्हणजे मूळ मुद्दे सोडून अस्मितावहिनी नि भावनाकाकूंच्या लढायाच सुरु होतात.)

    थोडक्यात भविष्य कसे वळण घेते त्यावर तुमचे दावे दूरदृष्टीचे वा हास्यास्पद ठरत असतात. दावे करणारा दूरदृष्टीचा वा फाजील आत्मविश्वास असलेला वा अहंकारी असल्याचे निवाडे हे त्याने केलेले दावे निर्णायकरित्या सिद्ध वा असिद्ध झाल्यानंतरच करता येतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वर म्हटले तसे माणसाच्या आकलनाला, मूल्यमापनाला चौकटींचे बंधन असते. एखादी कृती राजेशाही असलेल्या राज्यात, धर्मनिष्ठ राज्यात/देशात नि लोकशाही राष्ट्रात कदाचित वेगवेगळ्या प्रकारे पाहिली जाऊ शकते. पण हे झाले मानव-निर्मित व्यवस्थांचे. माणसाच्या जगण्याचे प्राकृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक टप्प्यांचे प्रतिबिंबही विशिष्ट घटना, कृती, शोध, माहिती यांबाबतच्या तुमच्या आकलनावर पडत असते.

    EarthsFirstScienceFair

    मध्यंतरी हे मीम पाहण्यात आले नि याबाबत थोडा विचार सुरु झाला. वर्तमानातील स्पर्धांची प्रतिबिंबस्वरूप स्पर्धा माणसाच्या आदिकालात घेतली असल्यास काय निकाल लागेल असा याचा विषय आहे. (‘फ्लिंटस्टोन्स’ या कार्टून-मालिकेच्या चाहत्यांना हा reverse extrapolation चा प्रकार चटकन समजेल.) 

    गंमत पाहिलीत तर स्पर्धेचा हा निकाल उघडपणे वर्तमानातील दृष्टिकोनाच्या आधारे दिला गेलेला आहे असे लक्षात येईल. भाष्यचित्रकार आपल्या वर्तमानाला सोडून विचार करू शकलेला नाही. वरच्या फॅरेडेच्या संदर्भातील प्रसंगातील प्रश्नकर्त्याप्रमाणेच हा त्याच्या र्‍हस्वदृष्टीचा परिणाम आहे. तो प्रश्नकर्ता भविष्याचा वेध घेण्यास कमी पडला होता, इथे भाष्यचित्रकार भूतकाळाचा!

    Wheel म्हणजे चाक हा अमूल्य शोध आहे हे मनुष्य नागर झाल्यानंतरच निश्चित झाले. जंगलजीवी, टोळीजीवी माणूस अद्याप hunter-gatherer अर्थात संग्राहक-शिकारी आयुष्य जगत होता. प्राण्यांप्रमाणे भक्ष्याला प्रत्यक्ष भिडून शिकार करण्याइतका तो सबल कधीच नव्हता. त्यामुळे त्याची शिकारीची पद्धत ही चकवा, घात करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुरून वेध घेणारी होती. त्यासाठी आवश्यक असणारे भाले- अथवा बाण ही ‘टोकदार काठी’ (pointy stick) वर्गातील आयुधे- त्याच्या दृष्टीने महत्त्वाची. गंमत म्हणजे या ‘विज्ञान स्पर्धेत’ या टोकदार काठीला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

    अग्नी उपलब्ध असेल, तर त्याचा वापर त्याला थोडाफार माहित असेल, परंतु ती गरज अत्यावश्यक ठरण्यास थोडा वेळ गेला असेल. शिवाय अग्निचा ‘शोध’ म्हणता येईल का हाच आधी प्रश्न आहे. कारण तो निसर्गात आधीपासून अस्तित्वात होताच. लांडग्यांना अथवा अन्य प्राण्यांना ‘माणसाळवणे’ या प्रक्रियेप्रमाणेच माणसाने त्याला आपल्या कह्यात आणून त्याचा वापर सुरू केला इतकेच.

    चाक हे आयुध तुलनेने आधुनिक मानवाचे, माझ्या मते नागर झाल्यानंतर उपयोगी ठरणारे. खाचखळग्यांच्या, चढ-उतारांच्या, झाडा-शिळांच्या अडथळ्याच्या जगण्यात सर्वस्वी निरुपयोगी. त्याचा नियंत्रित उपयोग करण्यास सपाट जमीन हवी, जी प्रामुख्याने कुरणांच्या वा मैदानी प्रदेशातच उपलब्ध असते. इतकेच नव्हे तर चाकाचा स्वतंत्रपणे असा उपयोग नगण्यच. एकट्या चाकाऐवजी चाकांची जोडी जेव्हा उपलब्ध होते किंवा त्याला अक्ष म्हणून एखाद्या भक्कम लाकडी काठीची जोड मिळते तेव्हाच त्याचा व्यावहारिक वापर शक्य होतो आणि मगच ‘चाकाचा उपयोग काय?’ या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य होते. वर विजेबाबत जो प्रश्न विचारला गेला तो याच कारणाने. विजेचा वापर करून एखादे उपयुक्त उपकरण तयार होते, तेव्हा वीज ही उपयुक्त गोष्ट ठरत असते.

    आदिमानवाच्या काळात एखाद्या जिज्ञासू पोराने एखादा वाटोळा दगड उतारावरून गडगडत जाताना पाहून चाकाची कल्पना मांडली असेल. तेव्हा त्याच्या टोळीतील माणसांनीही ‘त्याचा काय उपयोग?’ असे म्हणत उडवून लावले असेल. ते त्याचे बापदादे चूक नव्हते वा ते मूलही. कारण भविष्य कसे वळण घेईल याची कल्पना दोहोंनाही नसणार. त्यातून ‘उपयोग आहे’ वा ‘उपयोग नाही’ हे दोनही दावे त्या काळाच्या दृष्टीने केवळ दावे म्हणूनच पाहायला हवेत, त्यांचे निवाडे हे भविष्यकालावर सोपवून द्यायला हवेत.

    वर ‘जपानमध्ये लोकशाहीवाद्यांऐवजी साम्राज्यवादी शिरजोर झाले असते तर टोजोची भविष्यवाणी खरी ठरली असती का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच धर्तीवर ‘एखाद्या ‘अपघाताने’ वाटोळ्या चाकाऐवजी चौकोनी चाकाची संकल्पना रुजली असती तर...?’ या प्रश्नाचा एक गंमतीशीर कल्पनाविस्तार करणारा व्हिडिओ पाहाण्यात आला.

    वर म्हटले तसे निव्वळ विजेचा शोध कामाचा नाही, तसाच चाकाचाही. त्यांचा उपयोग करुन घेणारी उपकरणे अस्तित्वात यायला हवीत. या व्हिडिओमध्ये पाहिले तर चाकाच्या आधारे वाहनाची निर्मितीही झाली. त्यातून घडलेल्या अपघाताने त्या वाहनाची उपयुक्तता सिद्ध होऊ शकली नाही. आणि ही घटना वाटोळ्या चाकाच्या उपयुक्ततेलाही बाधक ठरली. थोडक्यात उपकरणाच्या यशावर मूळ शोधाचे यशही अवलंबून असते. त्यामुळे फॅरेडेचे आत्मविश्वासपूर्ण भाकित वास्तवात रूपांतर होण्यास विजेची विविध उपकरणे यशस्वीपणे निर्माण करणार्‍या अनेक संशोधकांचाही वाटा आहे. अशा चमत्कृतीपूर्ण, मनोरंजक कल्पनाविस्तारातूनही ज्ञानाची शिदोरी जिज्ञासूच्या पदरी पडते ती अशी.

    - (क्रमश:) -

    टीपा :

    (१). कुणी हा प्रश्न खुद्द ब्रिटनच्या राणीने विचारला होता असे सांगतात. दुसरीकडे फॅरेडेचा म्हणून सांगितलेला हा किस्सा मुळात बेन्जामिन फ्रँकलिनचा आहे असाही एक दावा आहे.[↑]


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा