Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

अर्ध्यावरती डाव मोडला...

  • TheDilemma
    (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या चरणी हे विडंबन सादर...)
    
    भातुकलीच्या खेळामधलीं तात्या आणिक कोणी
    अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥
    
    तात्या वदला, “मला न कळली, शब्दांविण तव-भाषा
    घरी पोचतां, पुसिन तेथील, धुरकटलेल्या कोषा(१)”
    का कमळीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥
    
    कमळी वदली बघत एकटक लाल-लाल तो तारा
    “उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, तिज्या गावचा वारा”
    पण तात्याला उशिरा कळली, गूढ अटळ ही वाणी ॥२॥
    
    तिला विचारी तात्या, “का हे हात असे सोडावे ?
    त्या दैत्याने माझ्याआधी, तूंस असे कवळावे ?”
    या प्रश्नाला उत्तर नव्हते, कमळी लाजिरवाणी ॥३॥
    
    का कमळीचे तुटले दावे(२), आज दूर जाताना ?
    का तात्याचा डाव गंडला, ‘कर’पाशी(२) चुरताना?
    भ्रमरासम ती उडून गेली, भुलुनी लाल-फुलांनी ॥४॥
    
    - रमताराम
    ---
    (१). शब्दकोष 
    (२). या दोनही ठिकाणी श्लेषावर ध्यान असू द्या.
    

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा