(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)
प्रतिबिंबांचा प्रश्न << मागील भाग
---
एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. पिंजर्याचे दार मोडलेले होते, पक्ष्याचे अस्तित्त्व संपून गेले, पण रंग नि आतील दांडी नव्या पक्ष्याचे स्वागत करायला अजूनही उत्सुक होती. पूर्वी त्यात एक पिवळा पक्षी(१) होता हे आईकडून बिम्मला समजते. ‘आता तो कुठे गेला?’ हा प्रश्न ओघाने आलाच.
त्या पक्ष्याचे काय झाले असेल हे तर्क करण्याजोगे आहे. पण खरे ते सांगणे म्हणजे बिम्मच्या पुढच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाणे आहे. साहजिकच ‘त्याच्याशी खेळायला कोणी नव्हते म्हणून कंटाळा येऊन तो उडून गेला असेल.’ असे सांगत आईने ते टाळले आहे. ‘मग मी त्याला बोलावून आणतो.’ असे म्हणून बिम्म त्या कामगिरीवर निघतो. मग मागील आवारातील आजोबांच्या मदतीने त्याने त्या पक्ष्याचा शोध सुरू करतो.
या आधीच्या भागांमध्ये सामोरे गेलेल्या ‘मी कोण?’, ‘यापैकी मी कोण?’ याचा पुढचा प्रश्न म्हणजे ‘माझे कोण?’ या प्रश्नापाशी बिम्म आता पोहोचला आहे. नीनमला शोधायला बाहेर पडलेल्या बिम्मला आजोबा विचारतात, ‘काय शोधतो आहेस? काय पाहिजे तुला?’ तेव्हा त्याचे उत्तर असते, ‘मला आमचा पिवळा पक्षी पाहिजे.’ यात ‘मला’ आणि ‘आमचा’ असे दोनही शब्द येतात. आमचा म्हणताना आमच्या आई-वडिलांचा, बब्बीचा या सार्यांचा मिळून ‘आमचा’ असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एका दृष्टीने पाहिले तर तो पक्षी हा त्याचा वारसा आहे. जन्मलेल्या प्रत्येकाला आईवडिलांकडून जात, धर्म, संस्कार या खेरीज जड संपत्तीही मिळत असते. पण ते सारे फार पुढे. बिम्मच्या वयात पिवळ्या पक्ष्यासारख्या अलवार वारशाचे अप्रूपच अधिक असते.
मग आजोबांनी दाखवलेल्या पक्ष्यांमध्ये कुरापती काढून त्यांना नाकारत जातो. कुणी पिवळा नाही, कुणी पुरेसा पिवळा नाही, कुणाची फक्त चोचच पिवळी आहे, तर भारद्वाज हा तर ‘बदामी कोट घातलेला कावळ्या’सारखा दिसतो आणि पिंजर्यात मावणार नाही म्हणून निकालात काढला जातो. बिम्मला त्यांचा संपूर्ण पिवळा पक्षीच हवा असतो.
‘लैलाको मजनूं की नज़रसे देखना चाहिए’ असं म्हटलं जातं. त्यामागे हीच आस असते. इतरांना जे दुय्यम वाटतं, कुरूप वाटतं, सामान्य वाटतं त्यामध्ये एखाद्याला जगातील अद्वितीय सौंदर्य दिसू शकते. कारण त्या दृष्टीमध्ये त्याच्या भावनांचे, भावबंधांचे अस्तर असते. म्हणून ‘लैलाहून देखणी नि बुद्धिमान पत्नी तुला सहज मिळेल’ हे सांत्वन मजनूंला पुरेसे ठरत नसते.
परिपूर्णतेचा ध्यास घेण्याचा, पूर्वनिश्चित साध्याशिवाय कोणत्याही अपुर्या, दुय्यम, कमअस्सल अथवा वेगळ्या पर्यायी साध्याबाबत असमाधानी असण्याचा बिम्मचा हा स्वभाव वय वाढते तसा कमीकमी होत जातो. अखेर ‘मिळते तेच साध्य’ असे पटवून घेण्याचा/ देण्याचा खेळ सुरू होतो. एक पक्षी ‘निघून’ गेल्यावर बिम्मची आई नवा पक्षी आणण्याची तसदी न घेता पिंजराच अडगळीत टाकून देते. बिम्म मात्र त्या हरवल्या साथीदाराला पुन्हा शोधून आणण्याची उमेद बाळगतो, कुठल्याही पर्यायाला हट्टाने नाकारतो. सान आणि थोरांच्या दृष्टिकोनातील हा फरक ध्यानात ठेवण्याजोगा.
आईपेक्षाही चार-दहा पावसाळे पाहिलेले आजोबा सुज्ञ असतात. जे वास्तवात अप्राप्य असते ते स्वप्न-साध्य असते हे त्यांना ठाऊक होते. म्हणून ते बिम्मला घरी जाऊन एक झोप घेण्याचा सल्ला देतात. ‘तोवर नीनम आलाच तर मी त्याला तुझ्याकडे पाठवतो’ असे आश्वासनही देतात. खट्टू होऊन घरी आलेल्या बिम्मला आई बिम्मला झोपायला नेमकी पिवळी फुले असलेलीच एक उशी देते.
झोपलेल्या बिम्मच्या स्वप्नात निळे पक्षी आले, गुलाबी पक्षी आले, पांढरे-काळे ठिपके मिरवणारे पक्षी आले, हिरवे पोपट आले, पांढर्या ढगातून पांढरे बगळेही आले. सारे रंग दिसले. पण पण पिवळा कोणी दिसेना आणि नीनम काही भेटेना. नंतर आलेल्या कोंबडा, मोर, कबुतर यांच्यापाठोपाठ अखेर तो आला. त्याच्या आगमनाचे जी.एं.नी केलेले वर्णन बिम्मच्या कल्पनाविलासाचे दर्शन घडवणारे आहे. ते वाचल्यावर ‘किती खाऊ हवा?’, ‘तुझ्याकडे खेळणी किती आहेत?’ वगैरे प्रश्नांना ‘इन्फिनिटीऽऽऽऽ’ असे उत्तर देणारा, त्या शब्दाचा अर्थही नेमका ठाऊक नसलेला, एका मित्राचा छोटा मुलगा आठवून गेला.
त्याच क्षणी स्वरांच्या जरकाड्या झाल्याप्रमाणॆ तीन अत्यंत सुरेल व रेखीव असे शिट्टीचे आवाज ऐकू आले आणि सगळीकडे सोनेरी प्रकाश पसरला. मग खिडकीत एक विशाल पिवळा पक्षी आला, आणि क्षणभर त्याने पंख उघडताच सारी खिडकी भरून जाऊन क्षणभर एक चौकोनी सूर्योदय झाल्यासारखे दिसले. त्याचा प्रकाश फार झळझळीत होता. त्याच वेळी पाच कोकीळ नि दोन कावळे तिथे आले नसते, त्यांनी आपल्या काळ्या रंगाने तो प्रकाश सौम्य केला नसता, तर सर्वांना डोळे उघडे ठेवणे अशक्य झाले असते.
भग्न वर्तमान मिरवणार्या जमातींना आपला भूतकाळ असा देदिप्यमान, सूर्योदयासारखा प्रखर आणि सारे आकाश व्यापणारा होता असे स्वप्न पाहायला आवडते. तसंच वास्तवातील आपले साध्य अप्राप्य राहिल्याने, ते मुळातच त्यांच्या कुवतीहून बरेच मोठे, असाध्य होते अशी कल्पना करणेही त्यांना सोयीचे वाटते. त्यातून एकीकडे त्याचा अभिमानही मिरवता येतो तर दुसरीकडे अपयशाचे न्यूनही झाकता येते. आपल्या भूतकाळाचे रूप इतके तेजस्वी आहे की ’त्याच्या असूयेने कुणी सैतान, कुणी मार, कुणी राक्षस त्याला ग्रासू पाहतो म्हणून त्याचे काळवंडलेले तेजच आपल्या नजरेस सहन करता येते’ अशा बढाया मारण्याची तजवीज करण्यासाठी ते आपले कोकीळ, आपले कावळेही निवडून ठेवत असतात.
त्या पिवळ्या पक्ष्याला पाहताच हाच नीनम आहे याची बिम्मला खात्रीच पटली. पण त्याने तो पिंजरा उचलला त्याला लक्षात आले की हा नीनम तर पिंजर्यापेक्षा बराच मोठा दिसतो. मग त्याने विचारले, “नीनम, अरे तू एवढा मोठा आणि तुझे घर तर अगदी लहान आहे. आता कसे रे?” आता पिंजरा राखायचा तर पक्ष्याला सोडायला हवे आणि पक्षी राखायचा तर पिंजरा सोडावा लागणार असा पेच निर्माण झाला आहे.
तुम्ही-आम्ही या पेचातून सुटण्यासाठी काय करु? साहजिक मोठ्या पक्ष्यासाठी मोठा पिंजरा आणण्याचा विचार करु. (सजीवाला प्राधान्य हा नेणिवेतील नियम यामागे असावा.) पण त्यासाठी नवा पिंजरा आणण्यासाठी पैसे नि प्राधान्य दोन्ही हवे. विचार आणि कृती यांच्यामध्ये कुवत उभी असते. कुवतीपेक्षा मोठी स्वप्ने पाहण्यातून हा पेच निर्माण होतो. साध्य तर विशाल आहे, पण ते कवेत घेण्यास कुवत बहुधा कमी पडत असते.
आणखी एका दृष्टीने पाहता येते. पूर्वी कधीतरी हाती निसटून गेलेले जिवंत सख्य हे मधल्या काळात चक्रनेमिक्रमाने वाढून बसलेले असते. आपल्या मनातील त्याचा पिंजरा तेवढाच राहिलेला असतो, कदाचित आपण हेतुत: तसा जपलेला असतो. यासंदर्भात रणजित देसाईंच्या ’राधेय’मधील एक हृद्य प्रसंग आठवतो. गुरुगृही शिक्षणासाठी गेलेल्या कर्णाच्या आठवणीने व्याकुळ झालेले अधिरथबाबा त्याच्यासाठी रथ बनवू लागतात. तो रथही बिम्मच्या पिंजर्याप्रमाणे त्यांच्या मनातील कर्णाचे प्रतीकरूप आहे.
पण गंमत अशी होते बाल्यावस्थेमध्ये गुरुगृही गेलेला कर्ण परतून येतो तो ताडमाड वाढलेला, एक तरुण योद्धा म्हणून. त्याच्यासमोर तो रथ अगदी पिटुकला असतो... कारण तो वास्तव कर्णासाठी नव्हे तर अधिरथबाबांनी मनात जपलेल्या बाल्यरुपातील कर्णासाठी असतो! बिम्मचा नीनमही परतला आहे तो वयाने नि शरीराने वाढूनच. ते पिंजर्याचे घर आता त्याला पुरणार नसते.
आता बिम्मला मोठा पक्षी नि लहान पिंजरा यात निवड करायची आहे. पण तो पिवळा पक्षी जसा बिम्मचा वारसा आहे नि तो पिंजराही. त्यामुळे त्याला ते दोघेही हवे आहेत. इथे एक गंमत होते आहे. मोठ्यांना उपलब्ध नसलेला पर्याय बिम्मला मात्र उपलब्ध आहे, आणि तो म्हणजे त्याची कल्पनाशक्ती! बिम्म चतुर आहे, त्याने पक्ष्यालाच पिंजर्याच्या आकारामध्ये लहान केले आहे.
तुम्ही म्हणाल, ‘त्यात काय, मनात आणले असते ते पिंजराही मोठा करता आला असता. सगळे स्वप्नातच असेल तर सोयीचे घडायला काय हरकत आहे, नाही का?’ पण थांबा. बिम्म फारसा विचार न करताही नेमका निर्णय घेतो आहे. पिंजर्याला वास्तवाचे बंधन आहे. त्यामुळे पक्ष्यालाच लहान होणे भाग आहे.
नीनम ऊर्फ पिवळा पक्षीच बिम्मला सांगतो, “तू काळजी करू नको. घर बघून मी लहान-मोठा होतो.” मग तो अगदी बिम्मच्या करंगळीहून लहान होतो नि पिंजर्यात जाऊन दांडीवर बसतो. बिम्मने त्याला दिलेला पेरूही पिंजर्याजवळ नेताच तोही एखाद्या फुटाण्याएवढा लहान होतो. नीनम त्याला सहजपणे एका पायाच्या बोटात धरून खाऊ लागला. नीनम पुढे म्हणतो, “तू झोपलास की मी येत जाईन तुझ्या सोबतीला. इतर वेळी मी आभाळात उडत राहीन.” वास्तवात येऊ न शकलेल्या पक्ष्याला आता स्वप्नाच्या वाटेनेच यावे लागणार हे ओघाने आलेच.
बिम्मपणीची स्वप्ने नीनमसारखी विशाल असतात, तेजस्वी असतात. आपल्या आकाराने सारे आकाश व्यापून राहतात नि तेजाने सारा दिक्काल उजळू पाहतात. परंतु जसजसे मोठे व्हावे तसे व्यक्तीच्या, पिंजर्याच्या म्हणजे कुवतीच्या मर्यादा ध्यानात येऊ लागतात. सर्वांच्याच नशीबी आभाळाचे घर नसते. मग त्या स्वप्नांना लहान व्हावे लागते आणि मिळेल त्या पिंजर्यात निमूटपणे सावरून रहावे लागते. त्यांची भूकही पेरूइतकी असली, तरी एखाद्या फुटाण्यावर भागवून घ्यावे लागते. पण असे असले तरी ती स्वप्ने सहजी नष्ट होत नाहीत. जागेपणी तुमच्यापासून दूर असली, तरी निद्रेच्या साथीत तुम्हा-आम्हाला भेटायला येत असतातच. त्यांचा आपला ऋणानुबंध असा सहजासहजी तुटत नाही. आपला पक्षी पिंजर्यात नसला तरी स्वप्नात घर करून राहातो.
स्वप्न ही – बहुधा केवळ – माणसाला असलेली एक मोलाची देणगी आहे. माणसे झोपेमध्ये स्वप्ने पाहतात तशीच जागेपणीही. मागेपणीच्या स्वप्नांमध्ये काहीवेळा कुवतीपलिकडील, वास्तवात येण्याची सुतराम शक्यता नसलेली म्हणता येतील अशी दिवास्वप्ने असतात, तशीच जगण्यातील असोशीला मूर्त रूप देऊ पाहणारीही. जिच्याशी वास्तवात संवाद साधण्याचे धैर्य गोळा करू न शकलेला एखादा मजनूं स्वप्नराज्यात तिच्याशी मनमोकळा संवाद साधत असतो. आणि त्यात भाऊसाहेब पाटणकरांच्या रुबाईत म्हणतो तसा, ‘स्वप्नातही येशील ऐसे स्वप्नात नव्हते वाटले.’ असे म्हणून लटका राग दाखवू शकतो.
सासणेंच्या राहीच्या स्वप्नांचा उलगडा करताना एका कादंबरीचा प्रवास होऊन जातो. “ ‘स्वप्नं सत्यात उतरतात; पण ती उतरवावीही लागतात.’ राहीनं हे कुठं तरी वाचलं. कुठल्याशा प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य. ती विचारात पडली. त्यातून बुद्धिमत्ता असली की माणसाला प्रश्न पडतात; नसली की मग बरं असतं. ताप नाही– नि:स्वप्न निद्रा येते. इथं तसं नाही. आपण विचार करतो. प्रश्न विचारतो, स्वत:ला. आपल्याला स्वप्नं पडतात.”(२) असं म्हणताना सासणे स्वप्नांना विचाराचे दालनही उघडून देत असतात.
एकुणात स्वप्ने ही माणसाच्या आयुष्यातील वास्तवाइतकीच महत्त्वाची असतात. त्यांच्याविना माणसाला वास्तवाची प्रखरता सहन करता येणे अवघड होत जाते. ’पाश’ची प्रसिद्ध कविता आहे ‘सपनों का मर जाना’. त्यात तो म्हणतो,
घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
पपाशचे म्हणणे बिम्मला समजावे हे त्याचे वय नव्हे. पण बिम्मच्या बखरीतील कथांमध्ये जी.एं.नी ती वाचणार्या आई-वडिलांनाही सामील करुन घेतले आहे याची आठवण करुन देतो. या आईवडिलांना या कवितेचा अर्थ लगेच ध्यानात येईल. स्वप्ने नसतील तर अनेकांसाठी आयुष्याची चाकोरी अवजड भार होऊन राहील. म्हणून स्वप्ने पाहणे; राहीने म्हटले तसे ती सत्यात उतरवण्याचा यथाशक्ती, यथामती प्रयत्न करत राहणेही आवश्यक होऊन बसते.
पण मागच्या शतकामध्ये सिग्मंड फ्रॉईड नामे एक इसम होऊन गेला. ज्याने आपल्या सर्व स्वप्नांचा उगम नेहमीच आपल्या अतृप्त लैंगिक प्रेरणेत असतो असा दिव्य शोध लावला. (किंवा त्याच्या अभ्यासकांनी तसा अर्थ लावला.) पुढे कित्येक दशके वॉशिंग्टनच्या कुर्हाडीसारखा(३) त्याचा वापर करत, लोक स्वप्नांवर चित्रविचित्र लैंगिक धारणांचे आरोपण– मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या नावाखाली करत राहिले. त्याद्वारे ती पाहणार्यांचे एकांगी मूल्यमापन करत राहिले. या काळात स्वप्नांमधली आस हरली नि आसक्तीच काय ती वास्तव मानली जाऊ लागली. बिम्मची, पाशची, राहीची स्वप्ने अवास्तव ठरली.
या प्रत्येकाचा नीनम वेगळा असतो. त्याचा रंग नेहमीच पिवळा, गुलाबी, जांभळा वा केशरी नसतो. त्यात त्या स्वप्नांचा पिंजरा असलेल्या व्यक्तिचे रंगही मिसळलेले असतात. आणि म्हणून आई-वडिल वा कोणतेही आजोबा तो तुम्हाला देऊ शकत नाहीत. स्वप्नांच्या वाटेने का होईना, पण तो आपला आपणच शोधावा लागतो.
(क्रमश:) पुढील भाग >> खेळ सावल्यांचा
- oOo -
(१). आयुष्यातून निसटून गेलेल्या, हव्याशा वाटणार्या गोष्टींचे प्रतीक म्हणून पिवळ्या पक्ष्याचे रूपक वापरणार्या अनेक कविता नि गाणी सापडतात. बहुतेकांमध्ये हा पिवळा पक्षी म्हणजे गोल्डन ओरिओल किंवा ज्याला आपल्याकडे कांचन, हळद्या किंवा पीलक म्हटले जाते. गाणार्या पक्ष्यांमध्ये ’कॅनरी’चा उल्लेख प्राधान्याने होतो. शकुनांवर विश्वास असणार्यांच्या मते स्वप्नात पिवळा पक्षी दिसणे हे शुभ असते. तर दुसरीकडे स्वप्नात ’पिवळा पक्षी खाणे’ हे येऊ घातलेल्या संपन्नतेचे चिन्ह असते. हरिधृव नावाच्या कुण्या आयुर्वेदिय ग्रंथामध्ये पिवळा पक्षी काविळीच्या निर्दालनाचे प्रतीक मानला जातो. एकुणात पिवळा पक्षी हा प्रतीकांच्या दुनियेतील लोकप्रिय प्रतीक दिसते आहे.
(२). ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ (ले. भारत सासणे) या कादंबरीतून
(३). वॉशिंग्टनची कुर्हाड: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन लहान असताना त्याला एक लहानशी कुर्हाड भेट मिळाली. हाती हत्यार मिळाल्यावर ते चालवायलाच हवे याची सुरसुरी आलेला जॉर्ज दिसेल त्याला झाडावर ती चालवत जातो. अखेर त्याच्या वडिलांनी लावलेल्या परसातील चेरीच्या झाडावरही सपासप वार करून आपली हौस भागवतो. (ही एका चरित्रकाराने रचलेली दंतकथा आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा