दरवर्षी 'पद्म' पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, किंवा दुसरेच कुणी लायक कसे होते याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते.
पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात, ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे.
यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात 'ब्रेकिंग न्यूज' नसते, सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आपले रोल मॉडेल्स बहुधा चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या, राजकारणासारख्या सत्तेशी निगडित किंवा खेळासारख्या अनुत्पादक क्षेत्रातून येत असतात.
एखाद्या 'दशरथ माँझी'ला पद्मश्री न मिळताही चित्रपटामुळे थोडीफार प्रसिद्धी मिळते. तर 'जादव पायेंग' सारख्याला पद्मश्री मिळण्यापूर्वीच त्याच्यावर तयार झालेल्या 'फॉरेस्ट मॅन' या डॉक्युमेंटरीमुळे आणि परदेशी माध्यमांनी त्यापूर्वीच दखल घेतल्यामुळे थोडेफार लोक ओळखत असतात.
पण या दोघांपेक्षाही अधिक मूलभूत गरजेशी निगडित असलेल्या शेती आणि जलसंधारण या दोन क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री मिळालेल्या दोन भगीरथांचे नाव बहुसंख्येने ऐकलेले नसेल आणि 'पद्म' च्या यादीत वाचूनही 'हे कोण' हे जाणून घेण्याइतकी उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली नसेल याची जवळजवळ खात्रीच आहे. या वर्षीच्या यादीमधे स्थान मिळालेली ही दोन नावे आहेत जलसंधारणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले झारखंडचे 'सिमोन उरांव' आणि 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग'चे प्रणेते डॉ. सुभाष पाळेकर.
झारखंडची राजधानी 'रांची'लगत असलेले बेड़ो हे पन्नास वर्षांपूर्वी उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेले गाव होते. दुष्काळाने अनेक लोकांचा बळी घेतला, अनेकांनी स्थलांतर केले होते. अशा वेळी त्या गावचा रहिवासी असलेल्या तरुण सिमोनलाही स्थलांतराचा पर्याय उपलब्ध होता. पण त्याने भारतीयांच्या रक्तात असलेल्या दीर्घकालीन आणि व्यापक फायद्याच्या उपाययोजनांऐवजी तात्कालिक, संकुचित आणि सोप्या उपायांचा अंगीकार करण्याच्या प्रवृत्तीला मुरड घातली आणि सार्या दु:खाचे मूळ असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्यच दूर करण्याचा चंग बांधला.
भर पावसांत पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत जात त्याने गावाजवळच्या डोंगरावरून वहात येणार्या पाण्याची दिशा, ओघाचा वेग यांचे मोजमाप केले. ज्याच्या आधारे बांध घालण्याची जागा निश्चित केली. काही समविचारी लोकांना बरोबर घेऊन तिथे कच्चे धरणही बांधले. पण कच्ची धरणे फार काळ टिकाव धरत नाहीत हे ध्यानात आल्यावर सरकार-दरबारी आणि अन्य मदत करू इच्छिणार्यांकडे चिकाटीने पाठपुरावा करत भक्कम असे काँक्रीटचे धरण बांधण्यास भाग पाडले. बेड़ोजवळ 'गायघाट' इथे हे धरण अजूनही उभे आहे.
या पहिल्या धरणाच्या वेळी आलेल्या अनुभवाचा फायदा घेत कोणत्याही बाह्य मदतीखेरीज जवळच देशबाली आणि झारिया या ठिकाणी आणखी दोन धरणे बांधली. या धरणांमुळे भूजलाची पातळी तर वाढली. पण एवढे पुरेसे नाही, पावसाचे पाणीही जमिनीत जिरवावे लागेल हे ध्यानात घेऊन त्यांनी ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे काम सुरु केले. हे वृक्षारोपण करत असतानाही शासकीय पद्धतीची वांझ झाडे न लावता कवठ, आंबा, जांभूळ, फणस यासारखी फळझाडे लावण्यावर त्यांनी भर दिला, ज्यातून अन्न आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकत होते. त्याच्या जोडीने जागोजागी छोटी तळी निर्माण केली. या पाण्याचा यथायोग्य वापर करता यावा म्हणून कालवे नि विहीरी खोदल्या.
चारचौघांपेक्षा वेगळे काही करू पाहणार्यांच्या वाट्याला येते ती हेटाळणी, उपेक्षा त्यांच्याही वाट्याला आली. पण जेव्हा त्यांच्या प्रयत्नातून बेड़ोमधे पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर झाले आणि त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर त्यांच्या मेहनतीची फळे दिसू लागली तेव्हा अनेक लोक त्यांच्या मदतीला धावले. हळूहळू हे काम एका चळवळीत रुपांतरित झाले.
हरिहरपूर, जामटोली, खाकसीटोली, बैटोली आणि भासनंद या पाच ठिकाणी सिमोन यांच्या प्रयत्नातून तळी खोदण्यात आली. पावसाचे वाहून जाणारे पाणी आता लोकांनी आपल्याच श्रमाने अडवले आणि वापरले. बेड़ोची पडीक जमीन खर्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् झाली. तिथे अनेकदा वर्षातून दोन पिके घेता येतील इतके पाणी उपलब्ध झाले.
पुढे आजूबाजूच्या सुमारे पन्नास गावांची सिमोन यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल केली. रब्बी हंगाम बहुधा कोरडा जाणार्या झारखंडसारख्या छोट्या राज्याला बेड़ोच्या या हरित पट्ट्याचा मोठाच आधार आहे. हा भाग वर्षाला सुमारे 'वीस हजार मेट्रिक टन' इतका भाजीपाला नि अन्नधान्य झारखंडसह बिहार, उडिशा, बंगाल या शेजारी राज्यांना पुरवतो आहे.
आता हा सिमोन 'झारखंडचा पाणीवाला', 'सिमोनबाबा' या नावाने स्थानिकांमधे ओळखला जातो. आज त्र्याऐंशी वर्षाचा असलेला सिमोन बाबा वर्षाला किमान हजार नवी झाडे लावतो नि ती काळजीपूर्वक वाढवतोही. त्याच्या अनुमतीशिवाय कोणतेही झाड काय त्याची फांदीही तोडण्याचे धाडस कुणी करत नाही. आणि हा आदर, हा धाक त्याने शस्त्राने वा बळाने कमवलेला नाही. त्याने घालून दिलेल्या मार्गाने मिळवून दिलेल्या समृद्धीने, स्थिर आयुष्यामुळे स्थानिकांनी त्याला आपणहून दिला आहे.
शासनाने सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करूनही जे साधले नसते ते एका माणसाच्या प्रेरणेने साध्य झाले आहे. सदैव प्रेषितांच्या प्रतीक्षेत असलेल्या साध्यासुध्या माणसांना तो प्रेषित तुमच्यातच असतो, तुमच्या दोन हातांतून तो व्यक्त होतो हे सिमोन बाबाने दाखवून दिले आहे.
सिमोन यांच्यासोबतच पद्मश्रीसाठी निवड झालेले डॉ. सुभाष पाळेकर हे मराठी नाव वाचूनही मराठी वृत्तपत्रांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. एकाच वृत्तपत्रात आलेला लेख हा अधेमधे चवीपुरते पाळेकरांचे नाव वापरत लेखकाने आपल्याभोवतीच आरती ओवाळण्यासाठी लिहिलेला दिसला. याउलट हिंदी माध्यमांनी मात्र त्यांची आवर्जून दखल घेतलेली दिसते.
कोणत्याही मॅनेजमेंटचा मोताद नसलेल्या इंटरनेटवरील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र पाळेकरांबद्दल आणि त्यांच्या शेती तंत्राबद्दल विपुल माहिती देऊ करतो आहे. 'यूट्यूब' (You Tube) वर जाऊन फक्त त्यांच्या नावाने सर्च केले तर इंग्रजी, मराठी, तेलुगू अशा विविध भाषांतून त्यांच्या मुलाखती, त्यांच्या तंत्राची ओळख असलेली प्रेजेंटेशन्स विपुल प्रमाणात सापडतील. लेखाच्या शेवटी काही दुवे दिले आहेत.
त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा डॉ. पाळेकर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या आमंत्रणावरून तेथील ६००० शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्रमधील काकीनाड येथे होते. पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा पहिला सत्कार चंद्राबाबूंच्याच हस्ते झाला होता. देशातील इतर विविध राज्ये पाळेकर यांच्याकडून कृषिविषयक सल्ला घेत असतात. परंतु ते ज्या शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध अशा विदर्भातील आहेत त्या राज्याच्या शासनाला मात्र त्यांची आठवण होत नाही, अशी खंत त्यांनी पद्मश्री स्वीकारताना व्यक्त केली होती. त्यांना 'पद्मश्री' मिळाल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेऊ असे म्हटले आहे. 'बोले तैसा चाले...' ही उक्ती त्यांना ठाऊक असावी अशी आशा आहे.
पाळेकरांना, उरांव यांना पद्मश्री मिळाल्याने त्यांच्या कामावर थोडा का होईना प्रकाशझोत पडतो आहे. ध्रुवज्योती घोष नावाच्या बंगालमधील खाजणांवर काम करणार्या पर्यावरणतज्ज्ञाला अजून तिची प्रतीक्षा आहे.
(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना, एप्रिल २०१६)
- oOo -
अधिक माहितीसाठी:
मराठी:झिरो बजेट नैसर्गिक शेती - चिंतन शिबीर
इंग्रजी/हिंदी: Subhas Palekar ZBNF
---
ता.क.:
पाळेकर यांची झीरो बजेट नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक असली, तरी व्यावसायिकदृष्ट्या पुरेसे उत्पन्न देणारी नाही हे शेतकरी संघटनांनी निदर्शनास आणून दिलेले आहे.
वर्षा-दोन वर्षाला मोबाईल बदलून मूल्यवान धातूंचा चुराडा करून अविघटनशील आणि घातक कचरा निर्माण करण्यास हातभार लावणार्या, नागरी आयुष्य जगणार्या तुम्ही-आम्ही शेतकर्यांना, ’फायद्याकडे पाहू नका, पर्यावरणाचा विचार करा.’ असे सांगणे ही दांभिकता आहे असे मला वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा