मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

प्रश्नोपनिषद - १: पुनर्जन्म

मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही. पण हां आपल्याला लै प्रश्न पडतात राव. पुनर्जन्म नि पारलौकिक हे दोन विषय तर आपल्या डोस्क्याला लै म्हंजे लैच त्रास देतात. त्यातील तत्त्व, स्वार्थ, परमार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष ( हे असं आठवतील ते जड शब्द ठोकून देणे हल्लीच एका माजी वृत्तपत्र संपादकाकडून शिकलो) वगैरे बाजू जाऊ द्या हो, ते सगळं आपल्याला बाप जन्मी समजणार नाहीच. मी म्हणतोय ते या सगळ्याच्या ऑपरेशनल बाजूबद्दल.

आता हेच बघा ना, आमच्या दोस्त लोकांची मारे जोरदार चर्चा घडत होती पुनर्जन्म असतो की नाही. नि आमच्या टकुर्‍यात भलतेच प्रश्न. त्या नादात तिकडे महत्त्वाचे काही मुद्दे येऊन गेले तिकडे लक्षच नाही. बहुमोल असे ज्ञानसंपादनाचे क्षण आम्ही दवडले, पहिल्यापासून आम्ही करंटेच.

पण ते असो. निदान आता प्रश्न टकुर्‍यात आलेच आहेत तर निदान त्यांची उत्तरे मिळाली तर ते नुस्कान थोडे तरी भरून काढू म्हटलं नि हे प्रश्न त्या दोघांना विचारले. पहिला प्रश्न पुरा होण्याच्या आतच आमच्यासारख्या मूर्ख माणसाला पुनर्जन्म नसावा - निदान माणसाचा नसावा - याबाबत त्या दोघांचे ताबडतोब एकमत झाले. पुनर्जन्म असतो असा दावा करणार्‍याने माझ्याकडे कीव आलेल्या नजरेने पाहिले नि म्हटले ’तू फक्त आमचे ऐकत जा, जरा तरी अक्कल येईल उगाच तोंड उघडून आपले शहाणपण पाजळू नकोस.’

तर मंडळी मित्र हे असे, आमची ज्ञाननतृष्णा तर ज़ब्ब़र, प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर चैन पडणार नाही (भूत होऊन त्या दोघांच्या मानगुटीस बसतो झालं). मग काय आयतेच सापडलात तर राम जेठमलांनीना.... आय मीन त्यांच्या दहा प्रश्न रोज विचारण्याच्या परंपरेला स्मरून यातले दहा प्रश्न - उपप्रश्नांसह - तुम्हालाच विचारून टाकतो झालं.

ManyQuestions
  • मागल्या जन्मातले आठवते असेच बरेचदा कुणी कुणी दावा करत असल्याचे अधून मधून ऐकायला मिळते. ही आठवण नेहमी मनुष्यजन्माचीच कशी असते? त्यांना आपला मागचा जनावराचा जन्म का आठवत नाही. की ज्या 'गिफ्टेड' लोकांना हे आठवते, त्यांना 'लक्ष-चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून न जाण्याची किंवा किमान दोन मनुष्यजन्म पाठोपाठ मिळण्याची लॉटरी लागलेली असते? तसे नसेल तर मग मागल्या जन्मी मी लांडगा होतो नि ... जाऊ दे जनावराचे आयुष्य वर्णायचे म्हणजे शरीराबरोबर मनालाही लकवा भरलेले लोक अश्लील-अश्लील म्हणून ओरडू लागतील*. तसाही तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि कल्पनाशक्तीवर आमचा विश्वास आहेच.
  • मागल्या जन्मी आपण गुन्हेगार होतो किंवा आपण काही घोर चुका केल्या होत्या असे कोणालाच कसे आठवत नाही?
  • मागल्या जन्मी केलेल्या पापांचे भोग या जन्मी भोगावे लागतात असे म्हणतात. मग मागच्या जन्मी मला जन्मठेप झाली होती नि चौदा ऐवजी दहा वर्षातच मी खपलो होतो, तर सरकार मला या जन्मी उरलेले चार वर्ष तुरुंगवास भोगायला भाग पाडू शकेल काय? याचे उत्तर ’नाही’ असे असेल तर मग मागल्या जन्मीची पापांची फळे या जन्मी भोगावी लागतात हा ’कर्मसिद्धांत’ही खोटा म्हणावा का?
  • समजा वरील प्रश्नाचे उत्तर 'होय' असे असेल तर मग माझ्या नव्या जन्मात मी कोणत्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरवला जाणार. भारताऐवजी मी बुर्किना फासो नावाच्या देशात जन्मलो, तर हा चार वर्षांचा हिशोब तिथे पुरा होणार, की मी भारतीय कायद्याच्या 'ज्युरिस्डिक्शन' मधे पुनर्जन्म घेईपर्यंत कॅरी-फॉरवर्ड होत राहणार?
  • आपल्याकडे दिवंगत झालेले आजोबा/पणजोबा वा आजी/पणजीच नातवाचा/नातीचा जन्म घेऊन आली असे अनेकदा म्हटले जाते. माझ्या बाबत असे असेल, तर मीच माझा नातू/पणतू ही स्थिती पाप-पुण्याच्या हिशोबाच्या दृष्टीने जरा गुंतागुंतीची होणार नाही का? दोघांचे पाप-पुण्याचे अकाऊंट सेपरेट ठेवायचे की एकाच आत्म्याला दोनदा मनुष्यजन्म मिळाला असे गृहित धरून नव्या पासबुकमध्ये कॅरी-फॉरवर्डची एन्ट्री टाकायची?
  • नवरा नि बायकोचे सात-जन्मांचे कॉन्ट्रॅक्ट असते ते सलग सात जन्मांचे की सलग सात (लक्ष-चौर्‍यांशीपैकी) 'मनुष्यजन्मांचे'? तसे असेल तर ते दोघेही एकाच वेळी मनुष्य म्हणून, विरुद्ध लिंगी, समवयस्क, एकाच भूभागावर, एकाच धर्मात, एकाच जातीत, पत्रिका जुळावी अशा मुहूर्तावर, आपल्या देशी दोघांच्या आईबापांचेही 'कन्सेंट' मिळावेत अशा आईबापांपोटी... वगैरे निकष पुरे करत योग्य वयात लग्न करण्याची प्रोबॅबिलिटी किती, ती किमान ७ भागिले लक्ष-चौर्‍यांशी इतकी आहे काय? मुळात लक्ष चौर्‍यांशीच्या हिशोबात एकाहुन अधिक मनुष्यजन्म मिळतात का? मनुष्यजन्म दुर्लभ असतो, लक्ष चौर्‍यांशीत एकदाच मिळतो असे ऐकून आहे, तर दुसरीकडे हे सात मनुष्यजन्माचे कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यवस्थेमधे कसे काय बसते ब्वा?
  • मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले दोघे या जन्मी विरूद्ध जेंडर घेऊन (मागल्या जन्मीची स्त्री पुरूष म्हणून नि पुरूष स्त्री म्हणून) जन्मले नि या जन्मी पती-पत्नी झाले तर हा जन्म सात जन्माच्या काँट्रॅक्टमधे धरला जातो की नाही?
  • मागल्या जन्मी नवरा-बायको असलेले हे दोघे या जन्मी अन्य धर्मीय म्हणून जन्मले (मागील जन्मीच्या पापाची फळे, दुसरे काय.) आणि या जन्मी पुन्हा पती-पत्नी, शोहर-बीवी अथवा हज्बंड-वैफ बनले तर तो जन्म या सात जन्मांच्या काँट्रॅक्ट मधे काऊंट होतो का?
  • दोन जन्मांच्या मधे भूतयोनी नावाचा आणखी एक प्रकार असतो म्हणतो. त्यातही पुन्हा हडळ, वेताळ, डाकीण, खवीस, समंध, मुंजा, ब्रह्मराक्षस वगैरे जातीव्यवस्था आहेच. मेल्यानंतर अतृप्त इच्छा वगैरे राहिल्या असतील वा काही भयंकर गुन्हा वगैरे केला असेल तर हा मधला टप्पा पार करावा लागतो म्हणे. म्हणजे थोडक्यात मनुष्ययोनीतले पापपुण्याचे हिशोब इकडे कॅरी- फॉरवर्ड होतात. मग भूत असताना केलेल्या गुन्ह्यांचे/पुण्याचे क्रेडिट मनुष्ययोनीतील पुढील जन्मात कॅरी- फॉरवर्ड होते का? थोडक्यात पाप-पुण्याच्या बाबतीत 'टीडीआर' असतो का?
  • लक्ष-चौर्‍यांशीच्या हिशोबात हा मधला काळ एक योनी म्हणून धरतात की फक्त वास्तव जन्मच काऊंट होतात?
  • (आईन्स्टाईनच्या रिलेटिविटीला स्मरून...) एखाद्या भुतासाठी त्याचा जन्मच वास्तव नसतो का, नि त्याच्या जगातील समजानुसार पुढला मनुष्य जन्म हा भूत होणे म्हणून काऊंट होतो का? मग 'भुताच्या इच्छा अपुर्‍या राहिल्या, तर त्याला मनुष्य जन्म मिळतो.' असे भुतांचे धर्मग्रंथ त्यांना सांगत असतील का?
  • प्रत्येक धर्मात या ना त्या प्रकारे भूतयोनीचा उल्लेख असतोच. मृत झाल्यानंतर प्रत्येक धर्माची वेगळी अशी भूतयोनी असते की सर्वधर्मातील भुते एकाच ठिकाणी गुण्यागोविंदाने किंवा असेच भांडत-तंडत रहात असतात?
  • पाप-पुण्याचा हिशोब एकमेकाला छेदून बाकी शून्य उरते तेव्हा मोक्ष मिळतो असे म्हणतात. आता हा समतोल(equilibrium) अनायासे साधण्याची वाट न पाहता चित्रगुप्त महाराज एखाद्या जन्मी ज्या क्षणी बाकी शून्य होते तेव्हा, उरलेले आयुष्य जगून हा बॅलन्स पुन्हा बिघडवण्याचा चान्स न देता त्याच क्षणी मि. यम यांना त्या व्यक्तीचे प्राण हरण करण्याचा आदेश देऊन (किंवा ज्या देवाला असा आदेश देण्याची पावर आहे त्याला रेकमेंड करून) 'अकाउंट क्लोज्ड' चा शिक्का का मारत नाहीत?
  • पाप-पुण्याच्या ज्या अकाउंट मधे क्रेडिट-डेबिट होत असते ते अकाउंट माझे असून मला त्या अकाउंटचा नंबर कसा ठाऊक नाही? ही गोपनीयता माझ्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे, तुम्हाला काय वाटते?
  • काही नाही तर निदान मला नेटबँकिग अ‍ॅक्सेस देऊन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे बॅलन्स-चेक सुविधा का दिली जात नाही? ती मिळावी यासाठी काय प्रोसिजर असते?
  • वरील अकाउंट कोणत्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ट्रॅक केले जाते? त्या सॉफ्टवेअरचे क्यू.ए. देवांनीच/पारलौकिक अस्तित्व असलेल्या जीवांनीच केले आहे की माणसांनी? माणसांनी केले असेल तर आपल्या अकाउंटला फक्त क्रेडिटच पडत राहील याची सोय प्रोग्रॅमर्स नि क्यू.ए. वाल्या डॅम्बिस लोकांनी संगनमताने करून ठेवली नसेल याची खात्री कशी करून घेतली होती?
  • माझ्या भुताचे नि माझे अकाउंट एकच असते का? थोडक्यात मला मोक्ष मि़ळतो तेव्हाच माझ्या भुतालाही मोक्ष मि़ळतो का?
  • मी जिवंतपणी केलेले एखादे चांगले काम मेल्यानंतरही चालू राहिले नि त्यातून आणखी काही चांगुलपणाचे क्रेडिट निर्माण झाले तर चक्रवाढव्याजाच्या नियमानुसार ते माझ्या अकाउंटला क्रेडिट मिळते का? याचे उत्तर 'हो' असे असेल तर मला मोक्ष मिळाल्यानंतर - थोडक्यात माझे अकाउंट क्लोज झाल्यानंतर - हे क्रेडिट कुणाला ट्रान्स्फर व्हावे यासंबंधी मी काही 'मोक्षपत्र' करू शकतो का? असल्यास ते कुठे रेजिस्टर करावे लागते? चित्रगुप्ताने त्यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास त्याच्या लाभधारकाला कुठल्या व्यवस्थेकडे दाद मागावी लागेल?
  • फार जास्त पाप झाले तर दिवाळे जाहीर करून अकाउंट क्लोज करण्याची सोय आहे का? त्याचे अर्ज कुठे मिळतात?
  • पाप-पुण्याच्या हिशोबात खुद्द चित्रगुप्त महाराज नि त्यांचे सहकारी घपला करीत नसतील याची काय खात्री. की त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी 'सिविल सोसायटी'च्या पारलौकिक खात्याचा एखादा प्रतिनिधी उपोषण करीत असतो का? उरलेले सारे त्या भ्रष्टाचाराचे - खरेतर त्या भ्रष्टाचाराचा आपल्याला फायदा होत नाही म्हणून खंतावलेले - विरोधक पांढरी टोपी घालून स्वर्ग-नरकात दुचाकीवर ट्रिपल सीट बसून घोषणाबाजी करत हिंडत असतील का? ते उपोषण 'शांभवी'च्या सेवनाने सोडले जाते की अमृतसेवनाने?

आणखी अनेक प्रश्न आहेत पण सगळे सांगत बसलो तर 'सास भी कभी बहू थी' सारखी मालिकाच होईल. (तसेही त्यात पुनर्जन्म होतेच म्हणे ) तूर्तास थांबतो. किमान एवढ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकलो तरी खूप झाले. तुम्हालाही काही प्रश्न, उपप्रश्न असतील तर...........अजिबात विचारू नका, आधीच डोस्क्याची मंडई झालीये, त्याची लोकसभा व्हायला नको, क्काय?

- oOo -

* पु.लं.च्या ’रावसाहेब” मधून साभार.


हे वाचले का?

रविवार, ४ सप्टेंबर, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ६: काही टिपणे

मागील दोन भागात रोशच्या व्यावसायिक नीतीचे विवरण आपण पाहिले. अॅडम्सच्या यापुढील लढ्याचे मूळ यात होते. परंतु हे सारे तपशील देताना यामधे नेमके गैर काय, आक्षेपार्ह काय किंवा बेकायदेशीर काय याबाबत अ‍ॅडम्स काहीच बोलत नाही. कदाचित हे सारे स्वयंसिद्ध आहे असा त्याचा समज असावा. पण पुढील घटनाक्रमामधे जेव्हा रोशला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले ते नेमके कोणत्या मुद्यावरून हे आपल्याला समजून घ्यायला हवे तरच तो घटनाक्रम नीट समजावून घेता येईल. अॅडम्सने याबाबत पुरेशी कारणमीमांसा दिलेली नाही तसेच युरपियन आयोगाच्या संबंधित कागदपत्रात याबाबत काय आहे हे ही मला ठाऊक नाही. मग आता रोशला नक्की कोणत्या मुद्यावर दोषी ठरवले नि कसे याचे विश्लेषण करून आपणच ही कारणमीमांसा मांडण्याचा प्रयत्न करून पाहू. एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकवार अधोरेखित करतो, तो म्हणजे मी स्वतः अर्थशास्त्राचा, न्यायव्यवस्थेचा अभ्यासक नाही. माझा या घटनाक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ एका सामान्य माणसाचा आहे. त्या पातळीवर जे दिसू शकते तेवढेच मी पाहतो आहे. एखादी अधिक माहितगार व्यक्ती अर्थशास्त्रीय बाजू अथवा वाणिज्य व्यवस्थेच्या संदर्भात अधिक नेमकेपणे भाष्य करू शकेल, काही आणखी महत्त्वाचे मुद्दे मांडू शकेल हे मला मान्यच आहे.जालावरील लिखाणाची व्याप्ती लक्षात घेता यावर अधिक तपशीलाने लिहिणे अवघड आहे, पण शक्य तितके सोदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन.

रोशविरुद्ध अॅडम्सच्या लढ्याचा पाया काय हे प्रथम समजावून घ्यायला हवे. नाहीतर पुढील संघर्षाचे मूळ कारणच लक्षात आले नाही तर पुढील सारे विवेचन गैरलागू वाटण्याचा धोका आहे. तिसर्‍या भागामध्ये रोशची कार्यपद्धती विशद केली आहे. आता या कार्यपद्धतीमध्ये आक्षेपार्ह असे काय होते हे तपासून पहायला हवे. निव्वळ भरपूर नफा मिळवला हे आक्षेपार्ह असण्याचे कारण नाही, कारण कोणताही व्यवसाय हा नफा कमावण्यासाठीच केला जातो. परंतु किती नफा मिळवणे न्याय्य आहे, 'न्याय्य आहे' अथवा 'न्याय्य नाही' असे म्हणताना त्या न्यायाची व्याख्या कशी करावी आणि त्याची व्याप्ती कशाच्या - कायद्या/कराराच्या - आधारे निश्चित केली जावी; तसेच न्याय-अन्यायाचा विचार करताना त्या व्यवसायातील कोणत्या भागधारकांच्या हिताचा - नि किती प्रमाणात - यात विचार केला जावा इ. गोष्टींबाबत खुलासा होणे आवश्यक असते. खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व उत्पादकांना समान संधी, ग्राहकांना अनेक पर्यायांमधून उत्तम ते निवडण्याची संधी त्याचबरोबर स्पर्धेमुळे वाजवी किंमतीमधे ते उत्पादन मिळण्याची संधी हे महत्त्वाचे सूत्र असते. यासाठी खुली आणि न्याय्य स्पर्धा असणे हे महत्त्वाचे आहे. रोशच्या पद्धतीने ही स्पर्धा न्याय्य होती का हे तपासणे आवश्यक ठरते.

हे सारे नेमकेपणे अभ्यासता यावे यासाठी अर्थशास्त्राचा, कायद्याचा तपशीलवार अभ्यास असण्याची गरज आहे. तसा नसल्याने मला हे जमणे शक्य नाही. पण सध्या आपण साध्या सोप्या दृष्टिकोनातून या सार्‍या कार्यपद्धतीकडे पाहू या. तुम्हा आम्हाला सहज समजतील अशा ’नैतिकता’, ’न्याय’ आणि ’कायदा’ या तीन पातळीवर आपण मूल्यमापनाचा प्रयत्न करू. या तीन गोष्टी मी स्वतंत्र मानतो आहे हे कृपया ध्यानात घ्यावे. (का ते पुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.)

कायदा:

पहिला प्रश्न असा की रोशने अंगीकारलेल्या कार्यपद्धतीमधे बेकायदेशीर असे काही होते का? याला एक उपप्रश्न असा असेल की आपण कायदेशीर अथवा बेकायदेशीर म्हणणार ते कोणत्या कायद्याच्या संदर्भात. कारण आपण एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करतो आहोत. मग कायदा ग्राह्य समजायचा तो कोणत्या देशाचा? की असे म्हणावे की प्रत्यक्ष तो घटनाक्रम, तो व्यवहार, ती प्रक्रिया ज्या देशात घडली त्या त्या देशाचा कायदा ग्राह्य मानून त्या घटनाक्रमाचे मूल्यमापन करावे. एका मर्यादेपर्यंत हे ठीक आहे. पण जिथे मुद्दा परस्पर-व्यापाराचा आहे तिथे तो व्यवहार अमूक एका देशात घडला असे म्हणणे शक्य नाही. तसेच त्या दोन देशात त्या संदर्भात असलेल्या कायद्यातील फरक अथवा तफावत निर्णयप्रक्रियेला अधिकच जटिल बनवतो.

याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे खुद्द अॅडम्सच्याच बाबत दाखल केलेल्या गुन्ह्यामागची कायदेशीर प्रक्रिया. आंतरराष्ट्रीय नियमानुसार अन्य देशाचा नागरिक असलेल्या देशाच्या नागरिकावर कायदेशीर कारवाई करताना त्या मूळ देशाच्या कायद्यानुसार, अथवा त्या देशाच्या कायदाव्यवस्थेच्या संमतीसह, अथवा दोन्ही देशांनी मान्य केलेल्या नियमावलीनुसारच केली जाणे अपेक्षित असते. अॅडम्स हा ब्रिटिश नागरिक असल्याने त्याच्यावर ब्रिटिश कायद्यानुसार कारवाई होणे त्याने अपेक्षित धरले होते. परंतु स्वित्झर्लंड हा युनोचा सदस्य देश नसल्याने त्या संघटनेचे कायदे अथवा आचारसंहिता (directives, guidelines) पाळणे स्विस सरकारवर बंधनकारक नव्हते. आणि त्या देशाच्या जाचक नि उद्योगांना झुकते माप देणार्‍या, एकांगी कायद्यांसमोर एकट्या अॅडम्सचा पाड लागणारच नव्हता.

बहुराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात असे घडू शकते ही जाणीव बहुतेक राष्ट्रांच्या अर्थविषयक तज्ञांना असतेच. परंतु महत्त्वाचा मुद्दा हा की अजूनही सर्वव्यापक असा आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक कायदा वा कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात नाही. एवढेच नव्हे तर तशी असावी याबाबत कोणताही देश अथवा देशांचा समूह आग्रही दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे जागतिकीकरण नि खुली व्यवस्था या नव्या जगाच्या मूलमंत्रामधे कायदेशीर व्यवस्थेचे - राष्ट्राचे सरकार नि त्यांचे व्यापारविषयक कायदे - अस्तित्व हे नेहमीच 'प्रगतीला खोडा घालणारे' मानले जाते. आणि प्रत्येक देशाला भौगोलिक, राजकीय तसेच औद्योगिक परिस्थितीनुसार विविध देशांशी वेगळ्या पातळीवर करार करणे सोयीचे ठरते. यातून ’सम आर मोअर इक्वल’ ही सोयीची स्थिती निर्माण करता येते. (गंमत म्हणजे हा वाक्प्रचार ऑर्वेलच्या ज्या 'एनिमल फार्म' मधे प्रथम वापरला ते ’फक्त’ कम्युनिजम वरची टीका मानले जाते. परंतु ते कोणत्याही सर्वंकष होऊ पाहणार्‍या सत्तेवरचे भाष्य आहे हे मूळ लेखकाचे मत इथे पटावे.) त्यामुळे सर्वव्यापक अशा व्यापार कायद्याचा आग्रह धरणे हे कदाचित व्याघाताचे उदाहरण ठरेल. परंतु परस्परसंबंध जिथे येतात तिथे दोनही बाजूंचे हक्क नि कर्तव्ये निश्चित करावी लागतातच, हे व्यापारच नव्हे तर अन्य - राजकीय, भौगोलिक हक्क इ. - बाबतीतही खरे आहे. त्यामुळे दोन अथवा अधिक देशातील व्यापार हा बहुधा द्विपक्षीय अथवा बहुपक्षीय कराराच्या आधारे केला जातो. युरपियन इकनॉमिक कम्युनिटी (European Economic Community) च्या माध्यमातून अशी निश्चित व्यवस्था युरप मधील देशांमधील परस्पर व्यापारासाठी निर्माण करण्यात आली. परंतु 'तटस्थते'चा झेंडा घेऊन मिरवणार्‍या नि युनो(UNO) पासून देशील फटकून राहणार्‍या स्वित्झर्लंडने ई.ई.सी.पासून दूर राहणेच पसंत केले होते. त्यामुळे स्विस कंपन्यांना युरपिय देशांशी व्यापार करणे सुलभ व्हावे यासाठी स्वित्झर्लंडला ई.ई.सी.शी स्वतंत्र व्यापारविषयक करार करणे भाग पडले. त्यामुळे रोशच्या युरपिय देशातील सारा व्यापार या कराराअंतर्गत होत होता आणि म्हणूनच त्या करारातील नियमांचे पालन करणे रोशला बंधनकारक होते. त्यामु़ळे रोशच्या युरपमधील ई.ई.सी. सदस्य देशातील कार्यपद्धतीचे मूल्यमापन करणे, कराराअंतर्गत जबाबदारीचे रोश पालन करते आहे की नाही हे तपासणे, नसल्यास ते करण्यास भाग पाडणे किंवा त्यावर दंडात्मक कारवाई करणे हे ई.ई.सी.च्या व्यापार-कायदेविषयक बाबी सांभाळणार्‍या 'युरपियन आयोगा'च्या (European Economic Commission) कर्तव्याचा नि अधिकाराचा भाग होता. त्यामुळे जेव्हा मागे उल्लेख केलेली रोशच्या कार्यपद्धतीमधे काही बेकायदेशीर होते का नव्हते हे ई.ई.सी.च्या कायद्याअंतर्गत तपासावे लागते, नि हेच युरपियन आयोगाने करावे असा अ‍ॅडम्सचा प्रयत्न होता.

आंतराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात तीन गोष्टी मारक अथवा हानिकारक समजल्या जातात, त्या म्हणजे एकाधिकार(Monopoly), गटबाजी(Collusion) आणि 'किंमत निश्चिती' (Price Fixing).

ढोबळ मानाने पाहिले तर ग्राहक, उत्पादक नि व्यवस्था या उतरत्या क्रमाने हित जोपासले जावे असा संकेत असतो. उत्पादन हे शेवटी ग्राहकाच्या उपयोगासाठी (हिंदी मधील 'उपभोक्ता' हा शब्द अधिक समर्पक आहे.) निर्माण केले जाते. वापरणारा ग्राहक नसेल तर उत्पादन करायचे कोणासाठी, (अर्थात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधे 'गरज नसेल तिथे ती निर्माण करणे' हा एक व्यापारविषयक धोरणाचा भागच आहे. पण हे धोरण नैतिक की अनैतिक हा एक नि आधी मागणीच्या प्रमाणात उत्पादन की उत्पादनच्या प्रमाणात मागणी हा दुसरा, हे दोन प्रश्न सध्या बाजूला ठेवतो.) त्यामुळे ग्राहकहित हे सर्वप्रथम जोपासले गेले पाहिजे हे उघड आहे. त्यानंतर उत्पादकाचे हित सांभाळावे लागते, कारण ग्राहकाची गरज भागवण्यासाठी उत्पादकाची आवश्यकता असतेच, त्यामुळे त्याचे नुकसान झाले तर अप्रत्यक्षपणे ते ग्राहकाचेही नुकसान असतेच उदारणार्थ तोट्यात गेल्याने वा अव्यवहार्य व्यापारामुळे उत्पादकांची संख्या घटली तर पुरवठा घटल्याने मागणी-पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने एकतर ग्राहकाला त्या उत्पादनाबद्दल अधिक किंमत मोजावी लागेल किंवा त्याहुन अधिक म्हणजे पुरेशा पुरवठ्याअभावी ते उत्पादन आवश्यक तेव्हा उपलब्ध नसण्याचीही शक्यता निर्माण होईल.

एकाधिकार: एखाद्या क्षेत्रात असलेल्या एकाधिकारामुळे उत्पादकाला व्यापारविषयक आस्थापनाला मनमानी करणे शक्य होते. अन्य पर्यायच नसल्याने ’गरजवंताला अक्कल’ नसते असे म्हणत ग्राहकाला उत्पादकाने दिलेली वस्तू तो सांगेल त्या किंमतीला विकत घेणे भाग पडते. हे ग्राहकहिताला बाधक ठरते. त्यामुळे स्पर्धात्मक व्यापारपद्धतीमधे स्पर्धा निकोप नि समान संधी या तत्त्वावर व्हावी याची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु ज्यांचे स्वार्थच यात गुंतलेले आहेत ते उत्पादक ही काळजी घेतील ही अपेक्षाच भाबडी आहे. त्यामुळे ज्यांचे हितसंबंध यात यात गुंतलेले नाहीत अशी त्रयस्थ व्यवस्था निर्माण करून तिने या स्पर्धेचे या दोन तत्त्वाआधारे नियमन करावे लागते. अर्थात् ज्यांचा स्वार्थ या नियमनामुळे बाधित होतो ते अशा नियमनाच्या विरोधात असतात हे उघड आहे. नव्या खुल्या धोरणाचे खंदे समर्थक बहुधा शासकीय धोरणांमुळे व्यावसायिक हिताचे नुकसान होते ही हाकाटी नेहमीच करताना आढळतात.

एक मुद्दा असू शकतो की जर ते उत्पादन फक्त त्या एकाच उत्पादकाकडे उपलब्ध असेल तर ”मागणीनुसार किंमत’ किंवा 'कॉस्ट टू द कस्टमर' या न्यायाने त्या उत्पादकाने ठरवली तर त्यात गैर काय. हा मुद्दा मांडणारे फक्त उत्पादकाच्याच दृष्टिकोनातून विचार करत असतात. वर म्हटले तसे इतर भागधारकांचे काय? यात त्यांच्या हिताचा विचार कुठे आला? बरं मग जर असे म्हणायचे असेल की ’ज्याला परवडेल त्याने वापरावे इतरांनी वापरू नये’ तर मग औषधांसारख्या जीवनावश्यक गोष्टींचे काय? की तिथेही स्पर्धात्मक व्यापाराची तत्त्वे लावायची का? आता प्रश्न असा आहे की ही तत्त्वे इतकी पवित्र (Sacrosanct) आहेत का की माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाची मानावीत. एकिकडे नव्या जगात जिथे जगण्याचा मूलाधार समजली जाणारी धर्मतत्त्वेही सॅक्रोसँक्ट न मानता स्थल-काल-व्यक्तीनुसार एकुण हिताचा विचार करता बदलणे गैर मानले जात नाही तिथे हा अट्टाहास काय म्हणून?

दुसरा दावा असा की उत्पादन फार महाग विकले तर विक्री घटेल नि फायदा कमी होईलच त्यामुळे आपोआपच उत्पादकाला किंमत कमी करून विक्री वाढवावी लागेल. हे ही उदाहरण तितकेसे बरोबर आहे असे म्हणता येणार नाही. कारण आजच्या जगात विक्रीसाठी निव्वळ ’नैसर्गिकरित्या निर्माण होणारी गरज’ या एकाच घटकावर अवलंबून न राहता ती कृत्रिमरित्या निर्माण करण्याचे तंत्रही चांगलेच विकसित झाले आहे. (नुकतेच 'स्वाईन फ्लू'चे थैमान आपण पाहिले, त्यावर उपलब्ध असलेल्या टॅमिफ्लू' या एकमेव औषधाची एकमेव उत्पादक होती रोश! अन्यत्र बंदी आलेले हे औषध स्वाईन-फ्लू वरील एकमेव औषध असल्याने बंदी उठवून म्हणा विकावे लागले होते. हे कसे घडले असेल याबाबत काही कुतर्क केले गेले होते.) त्यातच जागतिकीकरणाने विविध स्वरूपाच्या बाजारपेठा उपलब्ध करून दिल्याने ’पिकते तिथे विकले’ नाही तरी कुठेतरी विकता येतेच. तिसर्‍या भागात उल्लेख केलेले व्हेनेझुएलाचे उदाहरण प्रातिनिधिक ठरावे.


गटबाजी:

निवडक उत्पादकांनी एकत्र येऊन अन्य उत्पादकांशी स्पर्धा करणे. किंवा सर्व प्रमुख उत्पादकांनी एकत्र येऊन उत्पादनाविषयी/ विक्रीविषयी/ किंमतीविषयी धोरण निश्चित करणे. पहिले छोट्या उत्पादकांच्या हिताच्या विरोधी जाते तर दुसरे ग्राहकहिताच्या. एका प्रकारे हे ही एकाधिकाराचे उदाहरण आहे. व्यक्तिसमूहातून उत्पादक/कंपनी निर्माण होते नि तिची एकत्रित ताकद व्यक्तिसमूहाच्या ताकदीच्या निव्वळ बेरजेच्या अधिक असते तसेच उत्पादकसमूह एकत्रितपणे लहान उद्योगांशी स्पर्धा करून त्यांचे दुकान बंद पाडू शकतात. पहिल्या भागात उल्लेखलेली शीतपेयांच्या कंपन्यांची नि अमेरिकेतील अंकल-आंटी शॉप्सच्या र्‍हासाची उदाहरणे या स्वरूपाची. एकत्रित उद्योगांची ताकद प्रचंड असते. सुरवातीला आपली अधिकारक्षेत्रे वाटून घेऊन, वितरण व्यवस्था, जाहिरात व्यवस्थेमधे सहकार्य करून ते आपल्या उत्पादनांच्या किंमती इतक्या खाली नेऊ शकतात की अन्य लहान उत्पादकांना त्या किंमतीला विकणे अशक्य होऊन जावे. अखेर अपरिहार्यपणे त्यांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागतो. मग हे दादा लोक पूर्ण मैदानात एकमेकांशी सर्धा करायला मोकळे होतात. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यावर आपल्याकडे पेप्सी नि कोकला जॉर्ज फर्नांडिस यांनी बंद केलेली दारे उघडली गेली. त्यानंतर देशाच्या काही भागात पेप्सी तर काही भागात कोकचा बोलबाला होता. तसे दोन्ही पेये सर्वत्र मिळत असल्याचे भासवले असले तरी दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली ताकद एकवटल्याचे बोलले जात होते. यातून प्रथम पार्ले सारख्या देशी कंपन्यांचा घास घेतला गेला नि आता या दोन कंपन्याच देशभर हातपाय पसरून बसल्या आहेत. निदान या क्षेत्रात तरी निकोप स्पर्धेच्या माध्यमातून नवा उत्पादक जम बसवू शकेल हे अशक्यच आहे. आज या दोघांनी ठरवलेल्या किंमतीला शीतपेये घेणॆ आपल्याला भाग पडते भले त्याचा उत्पादन खर्च त्या किंमतीच्या विसाव्या तिसाव्या भागाइतकीच असतो हे उघड गुपित असूनही. शीतपेये ही - भारतात तरी - चैनीची गोष्ट आहे, पण हे एखाद्या औषधाबाबत झाले तर ते न्याय्य असेल का हे ज्याने त्याने ठरवावे.


किंमत निश्चिती:

ही खरेतर बहुतेक वेळा वरील दोन कारणांचे परिणामस्वरूप असते. एकाधिकार असल्याने उत्पादक उत्पादन खर्चाच्या अनेक पट विक्री-किंमत आकारू शकत असतो. त्या उत्पादनाची गरज असलेले ग्राह असल्याने नि त्या ग्राहकांना अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने उत्पादकाला प्रचंड फायदा मिळवून देणारी ही किंमत बाजारात त्या उत्पादकाला मिळतेही. दुसरीकडे प्रमुख उत्पादकांनी मिळून निश्चित केलेली किंमत ही उत्पादन खर्चाशी निगडित असलेल्या ’वाजवी विक्री किंमत’पेक्षा (आता पुन्हा ’वाजवी’ किंमत कशी निश्चित करावी हा आणखी एक वादाचा मुद्दा आहे, पण एकीचे बळ वापरून उत्पादक त्या किंमतीपेक्षा जास्तच ठेवणार हे मान्य होण्यास काही हरकत नसावी.) जास्त असल्याने ग्राहकहितास बाध येतो.

तिसरी शक्यता म्हणजे आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेऊन किंमत चढी ठेवणे. पूर्वी भारतात आलेल्या इंफ्लुएंझाच्या साथीच्या वेळी रोशने मुद्दाम उत्पादन कमी करून त्यावरील औषधांच्या किंमती चढ्या ठेवल्याचे उदाहरण आधी आलेच आहे.

’हे तर सगळॆच करतात, रोशने केले तर काय अयोग्य केले?’ असे प्रश्न विचारताना आपण बहुमताने एखादी गोष्ट केली तर ती कायद्याच्या, न्यायसंकल्पनेच्या पलिकडे आहे असे मानतो. नैतिकता तशीही स्थल-कालसापेक्ष असते नि बहुधा बहुमताच्या जोरावर ठरते त्यामुळे त्यामुळे ते वर्तन नैतिक असतेच. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो की बहुमत हे सर्व भागधारकांचे असले पाहिजे. मग व्यापाराबाबत बोलताना बहुमत मोजताना त्यात ग्राहकसमूह हा एक मोठा भागधारक आहे हे आपण विसरतो. त्याचे हित न साधणार्‍या पण बहुतेक उत्पादकांना मान्य असणारे मार्ग आपण कायदेशीर व नैतिक मानत असू तर आपण व्यापाराच्या, उत्पादनाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासतो आहोत. अर्थात यात आपल्याला गैर काही वाटत नाही याचे एक महत्त्वाचे कारण या व्यवस्थेने त्यांना सोयीची असलेली ही विचारसरणी आपल्या विचारात इतकी बेमालूम मिसळून टाकली आहे की आज आपण त्यांच्याच दृष्टिकोनातून सार्‍या गोष्टींकडे पाहतो. याचे एक सुप्त कारण म्हणजे आपली वैयक्तिक समृद्धी या व्यवस्थेने आपल्याला दिलेली आहे असा आपला समज असतो, त्यामुळे या व्यवस्थेचे सारे काही बरोबरच असले पाहिजे (जसा धर्म, परंपरा याबाबत असतो तसा) आपला दुराग्रह असतो. त्याच्या मूल्यमापनाच्या कल्पनेनेही आपल्या अंगावर काटा येतो, न जाणो यात काही आक्षेपार्ह दिसलेच तर ती व्यवस्था मोडेल का नि आपला स्वार्थ - त्या व्यवस्थेचे अनुषंग असलेली आपली समृद्धी- तिला आपल्याला मुकावे लागेल का ही धास्ती अप्रत्यक्षपणे आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते.

मुळात आज तोंडदेखले जरी आपण ग्राहकहित मान्य करत असलो तरी आपल्या वैयक्तिक निर्णयप्रक्रियेमधे ’गरजे’पेक्षा, ’आवडी’पेक्षा ’निवड’च अधिक डोकावत असते. आज आपण नवा मोबाईल खरेदी करतो तो गरज निर्माण झाली म्हणून की बाजारात नवनवी मॉडेल्स आली आहेत नि त्यातील नव्या सुविधा - ज्याची आपल्या वैयक्तिक आयुष्यात गरज असो वा नसो - आपल्याला ठाऊक नाहीत हे समजल्यावर आपल्या कोंडाळ्यात आपला ’मोरु’ होईल म्हणून? मॉल संस्कृतीने आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मॉल्स हे स्पर्धात्मक व्यापाराचे प्रतीक मानता येईल, तिथे एकाच उत्पादनासाठी अनेक उत्पादकांचे पर्याय उपलब्ध असतात, त्यामुळे निर्माण होणार्‍या स्पर्धेतून त्या उत्पादकांना ग्राहकाने आपले उत्पादन खरेदी करावे यासाठी सतत जागरूक रहावे लागते, उत्पादनाचा दर्जा चांगला राखावा लागतो, किंमत वाजवी - ग्राहकाला परवडेल अशी - ठेवावी लागते, ’Better amongst equals' निवडण्याची वेळ येईल तेव्हादेखील काही खास स्कीम्स, डिस्काउंटस देऊन ग्राहकाला आपल्याकडे खेचून घ्यावे लागते. पण याची दुसरी बाजू अशी की या उत्पादनांचा मारा सतत तुमच्यावर होत राहिला तर अनेकदा गरजेपेक्षा अधिक अथवा गरजेबाहेर देखील खरेदी होऊ शकते. यातून ग्राहकाचे अप्रत्यक्ष नुकसानच आहे, कारण अशा गरजेबाहेरील खर्चामुळे अनेकदा गरजेच्या गोष्टींवरील खर्चात काटकसर करावी लागते किंवा त्याहून वाईट - जे खरेतर आता नव्या व्यवस्थेत वाईट समजले जात नाही - म्हणजे कर्ज काढून ऋणको व्हावे लागते. (अनेकदा आयटी मधील तथाकथित लठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर स्वत:चे घर नसलेला आयटी हमाल - सोप्या इन्स्टॉलमेंट्स, त्वरित कर्ज, कमी व्याज वगैरेला भुलून - प्रथम चार-पाच लाख खर्चून कार घेतो नि नंतर घर विकत घेताना उसनवारी करत फिरतो तेव्हा या व्यवस्थेला दोष द्यावा की ही मानसिकता असलेल्या त्या ग्राहकाला हे मला समजलेले नाही.)

दुसर्‍या बाजूने पाहिले तर एखादे पसंतीस उतरलेले उत्पादन तुम्हाला मॉलमधे नेहमीच मिळेल असे नाही. मागल्या महिन्यात खरेदी केलेली एखादी वस्तू आपल्या गरजेस अगदी नेमकी आहे असे लक्षात आले म्हणून या महिन्यात ती आणायच्या हेतूने गेलो तर बरेचदा उपलब्धच नसते. कदाचित मॉल कंपन्यांना अपेक्षित हिस्सा त्या उत्पादकाने दिलेला नसतो, कदाचित त्याला शक्य झालेला नसतो. मॉल हा ही एक व्यवसायच असल्याने कमी फायद्याचे उत्पादन विक्रीस ठेवण्यापेक्षा ते एखादे - बहुधा अप्रसिद्ध - उत्पादन तिथे विक्रीस ठेवतात. इथे दोन व्यापारी संस्थांच्या हितसंघर्षात ग्राहकाचे हित बाजूला पडते. ही गोष्ट केवळ दोन व्यापारी-उत्पादक संबंधांची, एकाहुन अधिक व्यवस्थांची उतरंड असेल तर ग्राहकहिताचा किती संकोच होत असेल हे तर्क करण्याजोगे आहे. थोडक्यात ही तथाकथित स्पर्धा ग्राहकहिताची असेलच अशी खात्री देता येत नाही आणि त्यातून गरजबाह्य खरेदी आणि गरजपूर्ती न होणे अशा दोन टोकाच्या शक्यता यातून उद्भवतात.

न्याय:

लिब्रियम उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरवताना उत्पादक म्हणून त्याची किंमत निश्चित करणे हा रोशचा अधिकार होता, तो अमान्य करणे चूक ठरेल. जोवर किंमतीवर नियंत्रण ठेवणारे सरकारी धोरण अस्तित्वात नसते (जे भारतात अजूनही बर्‍याच अंशी शिल्लक आहे) अशा व्यवस्थेमधे अशी किंमत खुद्द उत्पादक निश्चित करतो. हे एका अर्थी न्याय्य आहे कारण कच्च्या मालाची किंमत, उत्पादन यंत्रणेवरील खर्च नि बाजारातील मागणी या तीन मुख्य घटकांमधे ती उत्पादक कंपनीच मुख्य भागधारक असल्याने अशी किंमत उत्पादकानेच निश्चित करणे योग्य ठरते. परंतु एकच उत्पादन दोन ग्राहकांना वेगवेगळ्या - त्यातही कित्येक पटींचा फरक असलेल्या - किंमतींना विकणे हे बेकायदेशीर असेलच असे नाही (स्विस कायद्यानुसार नव्हते पण कदाचित भारतात हे बेकायदेशीर ठरू शकेल) पण न्याय्य होते का? ब्रिटन मधील कंपनीला ३७० पौंड तर इटलीतील कंपनीला फक्त ९ पौंड दराने लिब्रियमचा कच्चा माल विकणे हा ब्रिटन मधील कंपनीवर अन्याय नव्हे का? आता ती कंपनी रोशचीच उपकंपनी असल्याने या विरूद्ध ब्रही उच्चारत नसे हा मुद्दा वेगळा. पण जर हीच स्वतंत्र कंपनी असती आणि रोशने हेच धोरण राबवले असते तर त्या कंपनीकडे काय पर्याय राहतो. इथे एक मुद्दा स्पष्ट केला पाहिजे की पुरवठा कच्च्या मालाचा आहे, ज्याच्या आधारे पक्का माल निर्माण करणार्या दोन स्वतंत्र कंपन्या आहेत, पैकी एकाला रोशने अतिशय झुकते माप दिले आहे, त्यांचा उत्पादन खर्च अतिशय कमी राहणार आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे दुसर्‍या कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी होत जाऊन नष्ट होणार आहे. एका प्रकारे त्या पक्क्या उत्पादनाच्या स्पर्धेत नसलेल्या रोशने त्यातील एका स्पर्धकाला नेस्तनाबूद केले आहे. आता स्पर्धेत स्वत: रोश नसल्याने यात स्पर्धानियमाचे उल्लंघन होत नसेल कदाचित पण हे अन्याय्य नव्हे का? या धोक्याचा बागुलबुवा दाखवून या दुसर्‍या कंपनीशी आपल्या सोयीचा करार करवून घेणे रोशसारख्या कंपनीला सहज शक्य आहे. हे ही बेकायदेशीर नसेल पण न्याय्य आहे का?


नैतिकता:

नैतिकता हा तसा अतिशय नाजूक प्रश्न आहे. याचे मुख्य कारण हे अतिशय सापेक्ष मूल्य आहे नि अनेकदा ते कायद्याला छेद देऊन जाताना दिसते. एक सहज लक्षात येण्याजोगे उदाहरण म्हणजे विकसित नि अविकसित देशातील फरक. हा जसा स्थानिक घटकांचा परिणाम असतो तसेच अविकसित देशातील कुशल मनुष्यबळाला कमी पैशात राबवून घेण्याची वर्चस्ववादी वृत्तीचाही असतोच. पण बरेचदा हा अनैतिक वाटणारा घटक रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करून देतो. (अर्थात हा फायदा -जाणवला नाही तरी - तात्कालिक असतो नि वाहत्या पाण्याच्या न्यायाने अन्यत्रही वाहत जाऊ शकतो हे ध्यानात ठेवायला हवे. आउटसोर्सड् नावाच्या एका सुरेख चित्रपटात हे छान अधोरेखित केले गेले आहे.) परंतु एकाच देशात -व्हेनेझुएलामधे - काम करणार्‍या अ‍ॅडम्ससारख्या गोर्‍या अधिकार्‍याच्या नि त्याच्या समकक्ष स्थानिक अधिकार्‍याच्या वेतनातील तफावत नैतिकतेला धरून आहे का? यात अर्थातच बेकायदेशीर काही नाही, अन्याय्य काही आहे असेही ठामपणे म्हणता येणार नाही. एकाच आस्थापनात, एकाच ठिकाणी काम करणार्‍या दोन समकक्ष व्यक्तींचे वेतन वेगवेगळे असू शकते. त्यात त्या दोघांच्या Bargaining Power नि Bargaining करण्याची कुवत या दोन्हीचा कस लागतो. पण इथे मुद्दा ’आमचा नि परका’ हा भेद करून वेतनमानात तफावत ठेवण्याचा आहे. सर्वांना समान संधी हे जर आजचे मूळ सूत्र असेल तर हीच बाब व्यक्तींच्या वेतनमानाबाबतही खरी असायला हवी. तशी नसेल तर मूळ तत्त्वाला हरताळ फासणारे हे कृत्य अनैतिक म्हणता येईल. हीच गोष्ट रोशने तेथे ’निर्माण’ केलेल्या जीवनसत्त्वांच्या बाजारपेठेची. ’आम्ही काय जबरदस्ती केली होती का? विकत न घेणे तर ग्राहकाच्या हातात असते ना.’ असा युक्तिवाद केला जाऊ शकतो नि तो पूर्ण कायदेशीर आहे नि न्याय्यही. परंतु न्याय्य आहे म्हणतात तो ज्या परिस्थितीत न्याय्य ठरतो ती परिस्थितीच रोशने बदललेली असल्याने न्यायाचा विचार वेगळ्या संदर्भात करावा लागेल हे ध्यानात घ्यायला हवे. जिथे अन्नपदार्थांचा तुटवडा आहे, बेरोजगारीचा, तुटवड्याचा राक्षस थैमान घालतो आहे तिथे गुंतवणूक करण्याऐवजी फायद्याच्या रूपाने तिथून पैसा बाहेर नेणारी व्यवस्था निर्माण करणे हे कृत्य अनैतिकच म्हणावे लागेल. (क्रिकेटप्रेमींना एक उदाहरण ठाऊक आहे. सर डॉन ब्रॅडमन याच्या फलंदाजीच्या धसका घेतलेल्या इंग्रज गोलंदाजांनी ’बॉडीलाईन’ गोलंदाजी जन्माला घातली. आता क्रिकेटच्या नियमानुसार-कायद्यानुसार अशी गोलंदाजी बेकायदेशीर मुळीच नव्हती. चेंडू फलंदाजाकडे टाकण्याच्या तत्कालीन सार्‍या नियमातही ते बसत होते. जर फलंदाजाला गोलंदाजाकडे उलट चेंडू मारण्यास बंदी नाही तर गोलंदाजानेही तसे करणे अन्याय्य मानता येणार नाही. पण म्हणून या कृतीला नैतिक म्हणता येईल का? खिलाडूपणाच्या भावनेशी सुसंगत म्हणता येईल का?)

या मूळ मुद्यांच्या आधारे विवेचन अधिक नेमके करत नेणे शक्य आहे पण विस्तारभयास्तव आवरते घेतो. यातून रोशवरील कायदेशीर कारवाई अगदीच अन्य्याय्य नव्हती एवढा निष्कर्ष काढता आला तरी सध्या पुरेसे आहे.

(क्रमशः)

_________________________________________________________________________________

(पुढील भागातः तुरुंगातून सुटका नि काथ्याकुटांची सुरुवात)

हे वाचले का?

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ५: फासे पडले नि फासही

रोशच्या कारभाराने अस्वस्थ झालेल्या स्टॅन्ले अ‍ॅडम्सने २५ फेब्रुवारी १९७३ रोजी ई.ई.सी.च्या स्पर्धानियम विभागाचे आयुक्त 'अल्बर्ट बॉर्श' (Albert Borschette) यांना रोशच्या गैरकारभाराबद्दल माहिती देणारं पहिल पत्रं पोस्ट केलं नि या दीर्घ लढ्याला प्रारंभ झाला (सदर पत्र खाली दिलेल्या दुवा क्र. २ वरील दस्तऐवजात वाचता येईल. त्याचबरोबर तेथे त्याने रोश नि अन्य कंपन्यांच्या गैरकारभारासंबंधी अधिक माहिती देणारे दुसरे एक पत्र लिहिले आहे ते ही वाचता येईल.) या पत्रात त्याने आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आपले नाव बाहेर फुटू नये याची काळजी घेण्याची विनंतीही केली होती नि सदर गैरप्रकारांच्या तपासासाठी आपले पूर्ण सहकार्य देऊ केले होते. पुढे त्याने अधिक माहिती मिळवून देऊन आपले आश्वासन पुरे ही केले. आपल्या अधिकाराचा वापर करून ई.ई.सी.चे अधिकारी मागतील ती माहिती गोळा करून त्याने वेळोवेळी ती त्यांना पुरवली. ई.ई.सी.ला आवश्यक ती माहिती पुरवून अ‍ॅडम्सने १९७३ मध्ये रोश सोडली. अर्थात पडद्यामागील हालचाली ठाऊक नसलेल्या रोशने आपल्या महत्त्वाच्या कर्मचार्‍याला अतिशय स्नेहपूर्वक निरोप दिला. यानंतर १९७३ नि १९७४ ही दोन वर्षे ई.ई.सी.चा स्पर्धाविभाग रोशविरूद्ध कारवाईचा आराखडा नि आरोपपत्र तयार करत होते यावरून अ‍ॅडम्सने दिलेल्या अफाट माहितीची नि या एकुण खटल्याची व्याप्ती लक्षात यावी. अ‍ॅडम्सने रोशचा बुरखा फाडण्यासाठी आवश्यक ती सारी मदत ई.ई.सी.ला केली होती. बदल्यात त्याने ई.ई.सी.कडून अपेक्षित ठेवलेली गोपनीयता मात्र ई.ई.सी.ला पाळता आली नाही.

उल्लेखनीय बाब म्हणजे ई.ई.सी.चे तपास अधिकारी स्वत: स्विस सीमेच्या आत कधीही प्रवेश करत नसत. स्वित्झर्लंडचे कायदे अतिशय जाचक होते. स्वित्झर्लंड हा ई.ई.सी. चा सदस्य देश नसल्याने आवश्यक त्या अधिकृत कागदपत्राशिवाय त्यांना अशी चौकशी करणे, माहिती मागवणे शक्य नव्हते. आणि अशी परवानगी स्विस सरकारकडे मागणे म्हणजे रोशला सावध करण्यासारखेच होते. त्यामुळे जी माहितीची देवाणघेवाण होत होती ती स्विस कायद्यानुसार एका प्रकारे बेकायदेशीर ठरत होती. त्यामुळे स्वतः स्वित्झर्लंडमधे येऊन अ‍ॅडम्सला भेटणं म्हणजे अटकेला आमंत्रण दिल्यासारखेच होते. अर्थात हा सारा धोका या अधिकार्‍यांनी अ‍ॅडम्सच्या नजरेसमोर आणलाच नाही, त्याला सावध केलेच नाही. स्वतः अ‍ॅडम्स हा ब्रिटिश नागरिक असल्याने एक प्रकारे त्याला अ‍ॅम्नेस्टी असल्याचा, आपल्यावरील कारवाई आपल्या देशातील कायद्यानुसारच होऊ शकेल असा काहीसा भाबडा गैरसमज त्याच्या मनात होता. परंतु स्विस कायद्यानुसार त्यांच्या भूमीवर असलेल्या कोणत्याही देशाच्या नागरिकावर स्विस कायद्यानुसारच कारवाई होते हे त्याला माहित नव्हते, ई.ई.सी.च्या अधिकार्‍यांनीही त्याला सांगितले नव्हते. जेव्हा त्याला हे माहित झाले तेव्हा त्याला फार उशीर झाला होता.

१९७३ च्या एप्रिल महिन्या अ‍ॅडम्सने रोश सोडली. यानंतर तो इटलीतील लॅटिना या गावी रहायला गेला. तिथे त्याने स्वतःचे पशुपालन केंद्र चालू करण्याची खटपट सुरू केली. दरम्यान १९७३ नि १९७४ या दोन वर्षात ई.ई.सी. चा स्पर्धानियमन विभाग रोशविरूद्ध आरोपपत्र तयार करत होता. अखेर ऑक्टोबर १९७४ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली. या काळात पॅरिस, ब्रसेल्स येथील रोशच्या ऑफिसेसवर ई.सी.सी. च्या अधिकार्‍यांनी धाड घातली. ई.ई.सी.च्या सदस्य असलेल्या देशातील कोणत्याही कंपनीवर धाड घालण्याचा, माहिती मागवण्याचा हक्क ई.ई.सी.च्या तपास विभागाला ई.ई.सी. नि त्या त्या देशातील करारान्वये मिळालेला असे. अ‍ॅडम्सने दिलेल्या माहितीच्या आधारे नेमकी कागदपत्रे हस्तगत करून त्याद्वारे त्याने पुरवलेल्या माहितीची सत्यासत्यता त्यांना पडताळून पाहता आली. यामुळे या धाडी परिणामकारक ठरून त्यांना भक्कम पुरावे गोळा करणे शक्य झाले. परंतु याचवेळी या अधिकार्‍यांना इतकी नेमकी माहिती आहे हे पाहून रोश सावध झाली नि त्यांना अंतर्गत धोका असल्याची जाणीव झाली. अर्थात हा अंतर्गत धोका कोण ते शोधून काढून त्यावर उपाययोजना करणे हे ओघाने होणारच होते. इटलीमधे असलेला अ‍ॅडम्स आता या सार्‍या घटनाक्रमापासून दूर होता नि रोश आणि ई.ई.सी. यांच्यापासून तो हळूहळू दूर होत चालला होता. पण फासे आता ई.ई.सी आणि रोशच्या हातात होते, ते दान टाकणार होते, डाव रंगणार होता नि अ‍ॅडम्सला नाईलाजाने या खेळात सहभागी व्हावे तर लागणारच होतेच, पण या खेळात सर्वात भीषण किंमतही त्यालाच मोजावी लागणार होती.

१९७४ चा 'न्यू ईयर डे' अ‍ॅडम्सच्या पत्नीच्या बहिणीच्या कुटुंबियांबरोबर साजरा करण्याचे ठरले होते. अ‍ॅडम्स आपली पत्नी नि तीन मुली यांच्यासह ख्रिसमस तिच्या आईवडिलांकडे साजरा करून आपल्या मेहुणीच्या लुईनो या गावी जायला आपल्या गाडीने निघाला. हे गाव स्वित्झर्लंडच्या हद्दीत होते. सीमापार करीत असतानाच अ‍ॅडम्सला अडवण्यात आले. तेथून त्याला जवळच्य असलेल्या ल्युगानो येथील पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. प्रथम हा प्रकार रूटीन स्टेटस् चेकचा असावा असे समजणार्‍या अ‍ॅडम्सला हे काम वेळखाऊ ठरणार आहे हे थोड्याच वेळात ध्यानात आले. त्याने आपली पत्नी नि मुली यांची आवश्यकता नसल्यास त्यांना लुईनोकडे प्रयाण करू देण्याची परवानगी मागितली नि ती मान्य करण्यात आली. ल्युगानो येथे स्विस राजकीय पोलिस विभागाचे अधिकारी - मि. होफर- अ‍ॅडम्सला भेटले. किरकोळ चौकशीनंतर त्यांनी अ‍ॅडम्सला विचारले 'मि. अ‍ॅडम्स तुम्ही हॉफमान-ला-रोश कंपनीसंबंधी काही माहिती ई.ई.सी. ला दिली होती का?' 'हो, दिली होती' या अ‍ॅडम्सच्या उत्तरानंतर ते उडालेच. कारण अ‍ॅडम्स हा ब्रिटिश नागरिक होता त्यामुळे त्याला या कबुलीचे गांभीर्य लक्षात आले नसले तरी याचा अर्थ स्विस कायद्यानुसार अ‍ॅडम्स गुन्हेगार ठरतो हे होफरना चांगलेच ठाऊक होते. या कबुलीने रोशने टाकलेला फास न समजता अ‍ॅडम्स त्यात शिरला होता, एवढेच नव्हे तर त्याने स्वतःच तो आपल्या गळ्याभोवती अडकवून घेतला होता.

पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे - वर म्हटल्याप्रमाणे - अ‍ॅडम्स जरी ब्रिटिश नागरिक असला तरी स्विस भूमीवर उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्विस कायद्याप्रमाणेच वागवले जाते. अन्य देशातील नागरिकांना मिळणारी अ‍ॅम्नेस्टी स्विस कायद्यात अस्तित्त्वात नाही. दुसरा मोठा - अधिक गंभीर - मुद्दा म्हणजे स्वित्झर्लंडमधे मोठ्या उद्योगावर केलेला वार हा शासनावर केलेला हल्लाच मानला जातो. यामुळे अ‍ॅडम्स हा स्विस कायद्यानुसार राष्ट्रद्रोही हेर आणि सरकारविरोधी बंडखोर ठरला होता. (याशिवाय दुय्यम कायदेशीर प्रक्रिया देखील ब्रिटन वा अन्य देशांहून वेगळी होती. स्विस कायद्यानुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यासाठी त्याच्या वकिलाची उपस्थिती अनिवार्य नव्हती. एवढेच नव्हे एखाद्या संशयितालादेखील पंधरा दिवसांपर्यंत चौकशीसाठी ताब्यात ठेवण्याची तरतूद कायद्यात होती. शिवाय इथे हेबिअस कॉर्पस् चा कायदाही अस्तित्वात नसल्याने कोणा परिचितालाही संशयिताच्या शोधासाठी प्रयत्न करता येणार नव्हते. सुदैवाने ल्युगानो ते ला स्टँपाच्या तुरूंगाच्या वाटेवर असताना स्वच्छतागृहात जाण्याचे निमित्त करून अ‍ॅडम्सने फोन करून ही सारी हकीकत आपल्या मेव्हणीला कळवली त्यामुळे निदान त्याच्या कुटुंबियांना तरी झाल्या घटनेचा सुगावा लागला. फास पडला होता. आता रोश त्याला आपल्या अधिकारक्षेत्रात - स्वित्झर्लंडमधे - हवा तसा नाचवणार होती. अखेर अ‍ॅडम्सवर स्विस कायद्याच्या १६२ (व्यापारविषयक गुप्तता अटींचे उल्लंघन) नि २७२ (राष्ट्रद्रोह) या दोन कलमांखाली आरोप ठेवण्यात आला.

या सगळ्यात घटनाक्रमाचा परिणाम म्हणजे अ‍ॅडम्सचे कधीही भरून न येणारे एक नुकसान झाले. ते म्हणजे त्याच्या पत्नीचा - मेरिलीनचा - मृत्यू. अ‍ॅडम्सने तिच्या बहिणीला आपल्या अटकेबद्दल कळवल्यानंतर पंधरा दिवस अ‍ॅडम्सच्या सुटकेसाठी जीव तोडून प्रयत्न केला. स्विस सरकारने आज सुटका होईल, उद्या होईल असे झुलवत ठेवून अखेर त्याला बाझल् येथे - रोशच्या बालेकिल्ल्यात - हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यातच तिच्या चौकशी दरम्यान एका पोलिस अधिकार्‍याने अ‍ॅडम्सला किमान वीस वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते हे सूचित केले. या दोन बातम्या ऐकून ती खचलीच. दुसर्‍या दिवशी पहाटेच बाथरूममधे जाऊन तिने गळफास लावून घेतला नि आपली इहलोकीची यात्रा संपवली. इथून अ‍ॅडम्सची कौटुंबिक परवड चालू झाली. (परंतु या लेखमालेच्या विषयाची मर्यादा असल्याने त्याबाबतचे कोणतेही उल्लेख या नंतर येणार नाहीत.)

(क्रमशः)

_________________________________________________________________________________

या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.

१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.

२. SWP 17/87 - Hoffman-La Roche v Stanley Adams - Corporate and Individual Ethics - Eric Newbigging







(पुढील भागातः तुरुंगातून सुटका नि काथ्याकुटांची सुरुवात)

हे वाचले का?

गुरुवार, ५ मे, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ४: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश

सामान्यपणे औषध निर्मिती कंपन्यांना त्यांचा संशोधन-खर्च - जो अवाढव्य असतो - भरून येण्यासाठी ते औषध बाजारात आल्यावर काही काळ एकाधिकार दिलेला असतो. या काळात अन्य कोणत्याही उत्पादकाला या उत्पादनाशी मिळतेजुळते असे उत्पादन बाजारात आणण्यास मनाई केलेली असते. हा कालावधी उलटल्यानंतर मात्र अन्य उत्पादक या किंवा तत्सम द्रव्याचे उत्पादन करू शकतात. यात उत्पादन-एकाधिकार नि संशोधन-एकाधिकार असे दोन भाग असू शकतात. हा एकाधिकार काळ वाढवून मिळावा यासाठी बहुतेक औषध कंपन्या प्रयत्नशील असतात. यात त्यांना मोठा धोका वाटतो तो 'जेनेरिक ड्रग' निर्मात्या औषध कंपन्यांचा. या कंपन्या सामान्यपणे स्वतंत्र संशोधन करीत नाहीत. बाजारात आलेले औषधच ते द्रव्याच्या फॉर्म्युलात वेगळेपण दाखवण्यापुरता बदल करून तांत्रिकदृष्ट्या नवे औषध बाजारात आणणात. यात त्यांचा संशोधन-खर्च नगण्य असल्याने या नव्या औषधाची किंमत ते मूळ औषधापेक्षा कितीतरी कमी ठेवू शकतात. यामुळे मूळ उत्पादक कंपनीच्या विक्रीत वेगाने घट होते. हे टाळण्यासाठी मूळ संशोधक कंपनीला काही कालावधीत त्या उत्पादनासाठी एकाधिकार बहाल करण्यात येतो. या कालावधीमधे अन्य कोणत्याही उत्पादकाला अथवा वितरकाला त्या उत्पादनाशी संबंधित नवे उत्पादन बाजारात आणण्यास मनाई असते. परंतु एखादे नवे उत्पादन हे अशा एकाधिकाराखाली असलेल्या उत्पादनाशी संबंधित आहे का किंवा त्याच्या विक्रीक्षेत्रात प्रत्यक्ष घट करणारे आहे का हे ठरवणे नेहमीच गुंतागुंतीचे असते. आजही संशोधक-उत्पादक अशा मोठ्या औषध कंपन्यांच्या पैशाचा मोठा हिस्सा अशा 'कॉपी कॅट' कंपन्यांशी कायदेशीर लढाई खेळण्यात गुंतलेला असतो.

रोशकडे उत्पादन-एकाधिकार असलेल्या लिब्रियम नि वॅलियम या दोन औषधांचे एकाधिकार १९६८ नि १९७१ मध्ये संपले होते नि स्पर्धा-व्यापाराला चालना देण्याच्या धोरणानुसार ब्रिटन सरकारने 'डी.डी.एस.ए.' नि 'बर्क' अशा दोन कंपन्यांना या दोन औषधांचे 'सक्तीचे' उत्पादन परवाने दिले होते. या परवान्यांबद्दल प्रथम रोशने आक्षेप नोंदवला. रोशचा आक्षेप असा होता की सदर उत्पादनांचा संशोधन-खर्चदेखील अद्याप वसूल झालेला नाही आणि अशा तर्‍हेने इतर उत्पादकांना उत्पादनाचे हक्क देणे हे रोशवर अन्याय करणारे आहे. रोशने नोंदवलेल्या आक्षेपाचा तपास करणार्‍या यंत्रणांना मात्र आवश्यक ती संशोधन-संबंधी माहिती देण्यास रोशने नकार दिला. कदाचित यातून त्यांची खरी उलाढाल किती हे जर नियंत्रक संस्थांना समजले असते तर त्यांचा मागे आणखी काही शुक्लकाष्ठे लागण्याचा धोका होता.नंतर प्रशासकीय पातळीवर काही करता येत नाही हे पाहून या दोन कंपन्यांच्या उत्पादनाबद्दल रोशने खरी खोटी ओरड सुरू केली नि त्यांच्या उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळाचे आदळआपटीचे कारण असलेला दोन्ही उत्पादनांचा या दोनही कंपन्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा जेमतेम एक टक्का इतकाच होता.

लिब्रियम नि वॅलियम उत्पादनाचे हक्क ब्रिटनमधे डी.डी.एस.ए आणि बर्कला मिळाल्यानंतर त्यांना ग्राहक मिळू नयेत यासाठी रोशने पद्धतशीर प्रयत्न चालू केले. मोठ्या रुग्णालयांना त्यांनी ही औषधे फुकट पुरवायला सुरवात केली. संशोधन-संरक्षण कालावधीत या उत्पादनांवर अफाट पैसा आधीच मिळवल्याने नि अनेक देशात असलेल्या उत्पादन व्यवस्थांमधून स्वस्त उत्पादन करणे शक्य असल्याने रोश हे सहज करू शकत होती. (आणि गंमत म्हणजे दुसरीकडे या औषधांचा संशोधन-खर्च देखील वसूल न झाल्याचा दावाही करीत होती.) यामुळे या दोन स्पर्धकांना रुग्णालयांसारखे मोठे ग्राहक मिळेनासे झाले. त्यातच रुग्णालयामधे एकदा उपचार घेतला की ते रुग्ण नि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स तीच औषधे चालू ठेवणे - साहजिकच - इष्ट समजत. दुसर्‍या बाजूने या 'धर्मादाय' कामामुळे रुग्णांमधेही रोशला सहानुभूती मिळू लागली.

हेच तंत्र वापरून कॅनडामधे फ्रँक हॉर्नर नावाच्या कंपनीला साफ आडवं केलं. या सुमारास रोशच्या एका पत्रकात लिहिले होते 'अशा चालींमुळे हॉर्नर कंपनीचा आपल्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न थंडावेलच पण तसा हेतू बाळगणार्‍या इतर कंपन्यांनाही परस्पर शह बसेल. रोशच्या अंतर्गत प्रसारासाठी असलेल्या एका पत्रकात असे म्हटले होते की 'बाजारपेठेत जाणार्‍या सर्व मार्गांवर वॅलियम - लिब्रियमचे लोंढे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहू देत की सध्याच्या नि भविष्यातील बांडगुळांना त्यातून वाटच मिळू नये.' तथाकथित स्पर्धात्मक व्यापाराचे थडगे बांधण्याचाच हा प्रकार होता. रोशच्या या कृत्यांबद्दल पुढे कॅनडातील न्यायालयाने अतिशय कठोर शब्दात आपला निर्णय दिला होता. 'स्वसंरक्षणासाठी माणूस एका मर्यादेपर्यंतच आपली ताकद वापरू शकतो, त्याप्रमाणे आपल्या बाजारपेठेच्या रक्षणासाठीही विशिष्ट मर्यादेतील मार्गच अवलंबले पाहिजेत. एखाद्याने तुमच्या मुस्कटात मारली तर तुम्ही त्याला ठार मारू शकत नाही. रोशचे मार्ग पाहता त्यांना हॉर्नर कंपनीशी स्पर्धा करायची नव्हती, हॉर्नरला आपल्याशी स्पर्धा करूच द्यायची नव्हती.'


ब्रिटिश मक्तेदारी आयोग नि रोश:

वर मागे उल्लेख केलेल्या दोन कंपन्या डीडीएसए नि बर्क यांना लिब्रियम नि वॅलियमच्या एकुण बाजारमूल्याच्या एक टक्कासुद्धा हिस्सा मिळत नव्हता नि जो मिळत होता तेवढाही मिळू नये यासाठी रोश सर्वतोपरी प्रयत्न करीत होती हे ही आपण पाहिले. अखेर आरोग्य नि सामाजिक सुरक्षा विभागाच्या शिफारसीवरून ब्रिटनच्या मक्तेदारी आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले. या अहवालानंतर ब्रिटनच्या व्यापारमंत्र्यांनी या दोन उत्पादनांची विक्री किंमत सुमारे ६० नि ७५ टक्क्याने कमी करण्याचा आदेश दिला. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी हातची जाते म्हटल्यावर रोश खवळणे साहजिक होते. या संपूर्ण तपासादरम्यान रोशने आयोगाला सहकार्य केले नाही. आयोगाने याबाबत आपल्या अहवालात कडक ताशेरे झोडले. रोशचा मुख्य मुद्दा असलेल्या तथाकथित प्रचंड संशोधन-खर्चाबाबत शहानिशा करून घेण्यासाठी मागवलेली आकडेवारी रोशने आयोगाला दिलीच नाही. प्रसिद्धी माध्यमातून भागधारकांसाठी प्रसिद्ध केलेली माहिती इतकी मर्यादित होती की त्यावरून रोशच्या जागतिक उलाढालीची पुरी कल्पना येणे शक्यच नव्हते. या असहकारानंतरही आयोगाने आपला तपास पूर्णत्वाला नेला नि रोशला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

हा तपास चालू असतानाच ब्रिटन मधील बेरोजगारीबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या डलरी येथे जीवनसत्त्वनिर्मितीचा एक कारखाना काढण्याची योजना सादर केली होती. पुन्हा एकदा रोजगाराचे आमिष दाखवून जनमत आपल्या बाजूला वळवून आयोगाच्या अहवालाबाबत आपल्यावर अन्याय होत असल्याच्या कोल्हेकुईला स्थानिक पाठिंबा मिळवण्याचा हा प्रयत्न होता. दुसरीकडे रोशचे उपाध्यक्ष "ब्रिटनचा आरोग्य-विभाग आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्हाला हा कारखाना उभारण्यासाठी दुसर्‍या देशाचा विचार करावा लागेल" अशी अप्रत्यक्ष धमकीही देत होते. याचवेळी प्रसिद्धी माध्यमातून रोश आपल्याला मिळणार्‍या वागणुकीची तुलना १९३० मधील रशियातील 'शुद्धीकरण' मोहिमेशी करत होती. यात एखाद्या अधिकार्‍याच्या टेबलवर रिकामी फाईल येई नि त्याबरोबर संदेश असे की 'अमुक अमुक कॉम्रेड राष्ट्रद्रोही आहे हे सिद्ध करा'. तो अधिकारी निमूटपणे तसा आरोप सिद्ध करणारा पुरावा तयार करून पाठवून देई, ज्याच्या आधारे 'शुद्धीकरणा'चे कार्य पूर्ततेस नेले जाई. आपल्यालादेखील ब्रिटिश आरोग्यविभाग अशीच वागणूक देत असल्याचा रोशचा दावा होता.

अर्थात या सार्‍या कांगाव्याचा फारसा परिणाम झाला नाही. एवढेच नव्हे तर ब्रिटनमधील धोरणाचे पडसाद लगेच इतर राष्ट्रांमधे उमटले नि रोशला तिथेही या दोन उत्पादनांच्या किंमती कमी करायला सांगण्यात आले. अखेर रोशने सामोपचाराने हा प्रश्न सोडवण्यास राजी झाली. तडजोडीनुसार दोन्ही उत्पादनांच्या विक्री किंमतीमध्ये 'पन्नास टक्के' कपात करण्याचे रोशने मान्य केले. एवढेच नव्हे तर डलरीतल्या नव्या कारखान्यात भरपूर गुंतवणुकीची तयारी दाखवली नि आधी नाकारलेले सुरक्षा विभागाच्या स्वयंनियमन योजनेचे सदस्यत्व हि स्वीकारले. त्याचबरोबर आरोग्य विभागाला भरपाई म्हणून सुमारे छत्तीस लाख पौंड देण्याचंही मान्य केलं. वर हे सारं झाल्यावर रोशचे उपाध्यक्ष उद्गारले 'आता आम्ही समाधानी आहोत. या समझोत्यानं सार्‍यांचाच लाभ होईल.' म्हणजे किंमती निम्म्यावर आणून, एवढी भरपाई देऊनही रोशचे फारसे नुकसान झाले नव्हतेच!


जागतिकीकरण आणि रोश:

रोशच्या युरप नि जगातील अन्य देशात शाखा होत्या याचा उल्लेख वर आलेला आहेच. आता याचा फायदा रोश कसा उठवत असे हे पाहू. रोशच्या अन्य देशातील उत्पादक कंपन्या या त्या त्या देशात स्वतंत्र कंपन्या म्हणून नोंदवलेल्या असत. याचा अर्थ त्यांच्यातील मालाची देवाणघेवाण ही व्यापार म्हणूनच गणली जाई. आता या स्वतंत्र कंपन्या उत्पादनासाठी लागणार्या कच्च्या मालाची मागणी मूळ रोशकडे नोंदवत. पण रोश सर्व कंपन्यांना सारख्या दराने कच्चा माल देत नसे. ती कंपनी ज्या देशातील असे तेथील करपद्धती, त्या देशातील आयात-निर्यात नियम, राजकीय परिस्थिती, बाजारमूल्य इ. चा विचार करून त्या कंपनी त्या देशात किती नफा दाखवणे सोयीचे आहे त्यानुसार आवश्यक तेवढा खर्च व्हावा हे ध्यानात ठेवून रोश मालाची कच्च्या मालाची किंमत निश्चित करत असे. ती कंपनीदेखील अप्रत्यक्षपणे रोशचीच उपकंपनी असल्याने अशा असमान दरांबद्दल तिची कोणतीही तक्रार नसे.

मक्तेदारी आयोगाने अंदाज काढला की १९६६ ते १९७२ या सहा वर्षांच्या काळात रोशने अशा मार्गाने फक्त ब्रिटनमधून सुमारे अडीच कोटी पौंड नफा मिळवला नि वर विवरण केलेल्या 'ट्रान्स्फर प्राईसिंग' (Transfer Pricing) च्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधे बिनबोभाट नेला.

या ट्रान्स्फर प्राईसिंगचे एक उदाहरण बघू. रोशच्या इटली नि ब्रिटन येथे उत्पादक कंपन्या होत्या. इटली या देशात संशोधन-एकाधिकार कालावधीचा नियम अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तेथे अधिक तीव्र स्पर्धा असल्याने औषधांचे दर कायम खालीच रहात असत. येथील आपल्या उत्पादक कंपनीला रोश लिब्रियमचा कच्चा माल असलेली पावडर ९ पौंड दराने देत असे. याउलट ब्रिटनमधे पंधरा वर्षांचा संशोधन-एकाधिकार रोशकडे असल्याने स्पर्धा नसलेल्या या सुरवातीच्या काळात रोश औषधाचे दर चढे ठेवून अधिकाधिक फायदा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती. यामुळे इटलीच्या तुलनेत ब्रिटनच्या कंपनीचा फायदा प्रचंड होता. परंतु या प्रचंड फायद्यावर ब्रिटनमधे त्यांना कर भरावा लागू नये यासाठी हा फायदा कागदोपत्री कमी करण्यासाठी इटलीच्या कंपनीला ९ पौंड दराने विकला जाणारा कच्चा माल तब्बल ३७० पौंड या दराने विकत असे. यामुळे ब्रिटिश कंपनीचा उत्पादन खर्च प्रचंड असे नि त्यामुळे प्रत्यक्ष करपात्र नफा नगण्य राही. आणि निव्वळ विक्रीच्या माध्यमातून रोशने जवळजवळ सर्व नफा स्वित्झर्लंडमधील कंपनीत शोषून घेतलेला असे. यामुळे १९७१ या वर्षी फक्त लिब्रियम नि वॅलियम या दोन औषधांवर रोशने ४८ लाख पौंड नफा मिळवला होता, परंतु विक्रीमधे सिंहाचा वाटा असलेल्या ब्रिटनमधील कंपनीला या वर्षी चक्क तोटा झाल्याचे कागदोपत्री दिसत होते. याचवेळी तिसर्‍या जगातील देशात (Third World countries) मधे लिब्रियम हे औषध त्याच्या मूळ वाजवी किंमतीपेक्षा सुमारे ६५ पट किंमतीला विकले जात होते आणि हे त्या राष्ट्रांनी दिलेल्या आयात सवलतींचा लाभ घेऊनही, हे विशेष लक्षात घेण्याजोगे आहे. (पुढे भारतासारख्या राष्ट्रांमधून ’जेनेरिक ड्रग उत्पादकां’नी रोश आणि तिच्यासारख्या कंपन्यांना त्यांच्याच मार्गांचा वापर करून त्यांना धडा शिकविला.)

उरुग्वे या देशात माँटव्हिडिओ नावाच्या ठिकाणी 'रोश इंटरनॅशनल लिमिटेड' नावाच्या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. शक्य तितक्या ग्राहकांना मूळ रोश ऐवजी रोश इंटरनॅशनलशी व्यवहार करण्यास उद्युक्त केले जाई. पण इथे कोणतेही उत्पादन होत नसे. माँट्व्हिडिओ येथे नफ्यावर कोणताही कर आकारला जात नसे. त्यामुळे हे ठिकाण करचुकव्यांचे नंदनवनच बनले होते. पुन्हा ट्रान्स्फर प्राईसिंगचा वापर केला जाई. मूळ रोश रोश इंटरनॅशनलला अत्यंत नगण्य दरात उत्पादन विकत असे. मग हेच उत्पादन रोश इंटरनॅशनल ग्राहकाला बाजारभावाने - जो त्यांच्या खरेदी किंमतीच्या कित्येक पट असे - विकून प्रचंड करमुक्त नफा कमवत असे.

रोशचे अध्यक्ष डॉ. जान यांना एकदा या कंपनीबद्दल नि त्या अनुषंगाने होणार्‍या करचुकवेगिरीबद्दल छेडले असता ते म्हणाले होते "जिथे तुम्हाला पन्नास, साठ, सत्तर वा अगदी नव्वद टक्के फायदा हा फक्त करापोटी घालवावा लागणार नाही त्या ठिकाणी अगदी कायदेशीररित्या काही पैशाचा साठा करण्याचा प्रयत्न करणे हे 'मनुष्यस्वभावाला धरून आहे'. शिवाय हा पैसा आम्ही आमच्या संशोधनकार्यासाठी, उद्योगाच्या वाढीसाठी गुंतवणूक म्हणून वापरतो. कायदेशीर करव्यवस्थेतील कमतरता नि त्रुटी यांचा वापर करून जर कुणी कर चुकवत असेल तर तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणणार का? छट्, मी तर मुळीच म्हणणार नाही.' रोशची एकुण व्यावसायिक भूमिकाच यातून स्पष्ट होत होती.

हे वाचले का?

मंगळवार, ३ मे, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती


  • रोश त्यावेळी सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्पादन करत असे. अशी उत्पादने बनवणार्‍या अन्य कंपन्यांना रोशने आपली उत्पादने घाऊक भावात कमी किंमतीने देऊ करून आपले कारखाने बंद करावेत यासाठी राजी करत असे. अर्थात यात एका बाजूने त्या उत्पादकाचा प्रत्यक्ष फायदा ही लालूच, नपेक्षा त्याच्या ग्राहकांना त्याच्या घाऊक खरेदी किंमती इतकीच किरकोळ विक्रीची किंमत देऊ करण्याची अप्रत्यक्ष धमकी असे दुहेरी शस्त्र वापरले जाई. अॅडम्सच्या कारकीर्दीतच किमान पाच प्रमुख उद्योगांनी आपले कारखाने बंद करून आवश्यक ती जीवनसत्त्वे रोशकडून घ्यायला सुरवात केली.

    याच दुहेरी अस्त्राचा वापर करूनच अमेरिकेत बड्या मॉल कंपन्यांनी स्थानिक 'अंकल-आंटी शॉप्स'चा बळी कसा घेतला याचे सुरेख विवेचन अनिल अवचट यांच्या 'अमेरिका' या पुस्तकात आले आहे. याच भयाने उत्तर भारतात रिटेल चेन-शॉप्सना विरोध करून ती बंद पडण्यात आली. (अर्थात ही नाण्याची केवळ एक बाजू आहे हे ही खरेच आहे.) पेप्सी नि कोकाकोला या दोन कंपन्यांना भारताबाहेर घालवणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांना प्रगतीविरोधी म्हणून लाखोली वाहण्यात आली. नंतर आलेल्या सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा झेंडा खांद्यावर घेताना या दोन कंपन्यांना दारे खुली करताच अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ सर्वच भारतीय शीतपेयांच्या कंपन्यांचा घास घेतला हा अगदी ताजा इतिहास आहे.
 
  • ज्यांना वरील पहिल्या प्रकारे वठणीवर आणता येत नसे त्यांच्यासाठी रोशचा दुसरा फास तयार होताच. जीवनसत्त्वे नि रसायने बनविणार्‍या सर्व प्रमुख उत्पादकांना एकत्र आणून एक सर्वमान्य किंमत निश्चित करून घेणे (collusion and price fixing) यासाठी रोशच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रोशतर्फे अशा उत्पादकांच्या कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जात. वरवर पाहत यात किंमतीत तफावत राहू नये जेणेकरून रोशसारख्या मोठ्या कंपन्यांनी किंमत कमी ठेवून अन्य उत्पादकांना अनाठायी स्पर्धेत लोटू नये व त्यांचे खच्चीकरण करू नये असा उदात्त हेतू असावा असे वाटते. पण ग्यानबाची मेख अशी होती, की जर एखाद्या अन्य - स्थानिक वा छोट्या - उत्पादकाचे नि रोशचे उत्पादन एकाच किंमतीला मिळत असेल तर साहजिकच ब्रँड-नेम असलेल्या रोशच्या उत्पादनालाच ग्राहक अधिक पसंती देत. अर्थात हे तर्कशास्त्र ग्राहकांपर्यंत पोचवण्याची रोश व्यवस्थित काळजी घेई हे वेगळे सांगायची गरत नाही.

    अशा तर्‍हेने एकाधिकारशाही (Monopoly) नि एकाधिकारशाही मोडून काढण्याचे उपाय या दोन्ही मार्गाने रोश स्वत:च्या फायद्याचे तेच घडवून आणत असे.

  • देशोदेशी शाखा असलेल्या रोशला विविध देशातून येऊ शकणार्‍या मागणीचा वेध घेण्याचे, अंदाज बांधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले होते. एकदा हा अंदाज उपलब्ध झाला कि उत्पादन त्या दृष्टीने वाढवण्याऐवजी उत्पादन त्या मागणीहून कमी ठेवले जाई. यासाठी काही कारखाने बंद ठेवावे लागले तरी पर्वा केली जात नसे. एखाद्या आणिबाणीच्या क्षणी उत्पादन वाढवण्याऐवजी कमी करून किंमती भरमसाठ वाढवल्या जात. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे भारतात इन्फ्लुएंझाची साथ आली असताना आवश्यक औषधांचे उत्पादन कमी करून रोशने त्याच्या वाढलेल्या किंमतीचा फायदा घेऊन प्रचंड नफा कमावला होता. स्वतः बराच काळ लॅटिन अमेरिकेतील गरीब देशात काढलेल्या अॅडम्सला तेथील जीवनसत्त्वांच्या अभावी नि:सत्त्व झालेले जीव दिसत होते तर दुसरीकडे त्यांच्या मूळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न न करता त्यांना जीवनसत्त्वे देणारी औषधे विकून आपले उखळ पांढरे करून घेणारी व्यवस्था दिसत होती. अॅडम्स म्हणतो 'या उद्योगधंद्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान अशा कुणी तरी या सार्‍या (अनैतिकता बोकाळलेल्या) स्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे होते.' अशी कोणतीही यंत्रणा स्वित्झर्लंडमधे अस्तित्वात नव्हती, आजही नाही. परंतु यानंतर बाजारपेठ व्यापक करण्याच्या दृष्टीने १९७२ च्या डिसेंबार महिन्यात रोशने 'युरपिअन इकनॉमिक कमिटी (ई.सी.सी.) बरोबर खुल्या व्यापाराचा करार केला नि अशी व्यवस्था अॅडम्सला उपलब्ध झाली.

  • रोशचा आणखी एक मास्टरस्ट्रोक म्हणजे तथाकथित 'एकनिष्ठेचा करार'. अनेक बड्या ग्राहकांना पटवून हा करार त्यांच्या गळी उतरवण्यात आला होता.

    १. यानुसार त्या ग्राहकाला आपल्या गरजेच्या किमान नव्वद ते पंचाण्णव टक्के माल हा रोशकडून घ्यावा लागे. या बदल्यात ख्रिसमसच्या काळात रोशकडून त्यांना रोखस्वरूपात पाच ते दहा टक्के सूट देण्यात येई. अर्थात बिल पूर्ण रकमेचे देण्यात येत असल्याने एक प्रकारे काळा पैसा निर्माण करण्यास मदत होई.

    २. याशिवाय त्या ग्राहकाला अन्य उत्पादकाकडून रोशपेक्षा कमी दराचे कोटेशन मिळाल्यास तर त्याने ते रोशला कळवणे बंधनकारक होते. यानंतर या दरात रोश मालाचा पुरवठा करणार का हे रोशला विचारणे बंधनकारक होते. रोशने याबाबत निर्णय घेतल्याशिवाय त्या उत्पादकास ऑर्डर देण्यास मनाई होती. हे कलम अन्य उत्पादकांवर उघड अन्याय करणारे होते. एवढेच नव्हे तर एका अर्थाने आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणार्‍या या प्रोफेशनल हेरांचे जाळेच रोशला उपलब्ध झाले होते. त्यायोगे प्रतिस्पर्धी उत्पादनाची इत्थंभूत माहिती रोशला मिळे नि त्यावर उपाययोजना करण्यास पुरेसा वेळ नि आयती व्यवस्था मिळत असे.

    ३. रोश उत्पादन करीत असलेल्या एकाही उत्पादनाबाबत वरील अटींचा भंग झाल्यास ग्राहकाला वरील सूट मिळत नसे.

    ४. लेखी करार करण्यास अनुत्सुक ग्राहकांसाठी केवळ 'परस्पर-सामंजस्य' या पातळीवरही सदर करार वैध मानला जाई.

    ५. असा करार करणार्‍या ग्राहकांना रोशच्या उत्पादनाचा पुरवठा करण्यात नेहमीच अग्रक्रम दिला जाई. याचा एक अर्थ असा होता कि ज्यांनी करार केलेला नाही त्यांना तुटवड्याच्या काळात ज्या ग्राहकांनी करार केलेला नाही त्यांनी आधी मागणी नोंदवूनही मागाहून आलेल्या करारबद्ध ग्राहकाच्या मागणीमुळे आवश्यक माल मिळेलच याची शाश्वती नव्हती. ज्या लहान ग्राहकांना असा करार करणे शक्य नव्हते त्यांना मूग गिळून बसण्यापलिकडे काहीच करता येत नसे. १९७१ साली जीवनसत्त्वाच्या आगामी तुटवड्याचा अंदाज घेऊन रोशने त्या कारणास्तव अनेक ग्राहकांना अशा करारात बांधून घातले होते.

  • जीवनसत्त्वांच्या उत्पादनात सुमारे ७५% वाटा हा मांसासाठी होणार्‍या पशुपालन व्यवसायात लागणार्‍या प्राण्यांच्या पोषकद्रव्यांचा होता. त्यामुळे मांसाची विक्री किंमत ही थेट या जीवनसत्त्वांच्या किंमतीवर अवलंबून होती. अमेरिका वगळून अन्य देशातील अशा जीवनसत्त्वांची विक्री वार्षिक सत्तर कोटी डॉलर्सहून अधिक होती. हा आकडा ७०च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे लक्षात घेतले तर ही बाजारपेठ किती प्रचंड मोठी होती हे लक्षात येईल. यात मोठा वाटा युरपचा होता. या प्रचंड बाजारपेठेत वरील उपायांचा परिणामकारण वापर केल्याने रोशला स्पर्धक जवळजवळ नव्हतेच.

अशा तर्‍हेने रोश हजार हातांनी आपला फायदा लाटत असताना याविरुद्ध कोणीच कसा आवाज उठवत नव्हतं असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. शासकीय यंत्रणा यात काहीच करू शकत नव्हत्या का असे प्रश्न पडतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. तो म्हणजे रोश ही 'स्वित्झर्लंड'मधे मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती. मुळात स्वित्झर्लंड या देशाचे कायदे अतिशय लवचिक नि रोशचे अनेक राष्ट्रात अस्तित्व असल्याने 'अधिकारक्षेत्राचा' (Jurisdiction) महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होत होता. याशिवाय असा आवाज उठवायचा कोणी (व्यक्ती की व्यवस्था) हा प्रश्न होताच. त्यात स्विस कायदे कंपनीला अनुकूल असल्याने (याचा दाहक अनुभव अॅडम्सला पुढे आलाच) निदान स्विस सरकार तरी या फंदात पडेल हे शक्यच नव्हते. त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा देशात आणणार्‍या कंपनीचा गळा सरकार धरू पाहील हे अशक्यच होते. (स्विस बॅंकात ठेवलेला आपल्या देशातील काळा पैसा परत आणण्याच्या मोहिमेला स्विस सरकार/बँका वाटाण्याच्या अक्षता लावतात ते याच कारणाने. उद्या हा सगळा पैसा भारताने परत आपल्या देशी नेला तर ते त्यांचे मोठे नुकसानच आहे. अशा स्थितीत ते अशा प्रयत्नांना सहकार्य करणार नाहीत हे उघड आहे.) एखाद्या व्यक्तीने हे शिवधनुष्य उचलायचे तर त्याला कंपनी व्यवहाराची बारकाईने माहिती हवी. अशी व्यक्ती साहजिकच कंपनीच्या उच्च वर्तुळातील हवी नि बराच काळ स्वित्झर्लंडमधील मुख्यालयाशी संबंधित हवी. इथेच अॅडम्सला आपण काही करू शकू असा विश्वास वाटला.

परंतु नुसते ठरवणे नि करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. कारण अशा अवाढव्य कंपनीच्या गळ्याला नख लावताना त्यावर आधारित अन्य समस्यांचा विचारही करावा लागतो. रोशचे मुख्यालय असलेली बाझल् नगरी ही संपूर्ण रोशमय झालेली होती. येथील नागरिक हे रोशचे पूर्ण पक्षपाती झालेले होते. याची एकाहुन अधिक कारणे होती. पहिले मह्त्त्वाचे कारण म्हणजे येथील नागरिकांची ही कंपनी मुख्य आश्रयदाती होती. यामुळे अन्नदात्याविरुद्ध त्यांचा पाठिंबा इतर कोणाला - मग भले तो भ्रष्टाचाराविरोधात का असेना - मिळेत हे बिलकुल संभवत नव्हते. (आपल्याकडेही आपण 'कर्मचार्‍यांची संभाव्य बेकारी' ही ढाल पुढे करून अनेक बेकायदेशीर उद्योग कायदेशीर होतात. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमाप पैसा करणारे पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना करायला पैसा नसल्याचे सांगून हात वर करतात, कारवाईची शक्यता दिसताच उद्योग बंद करून कर्मचार्‍यांना बेरोजगार करण्याची धमकी देतात. साहजिकच कर्मचार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे जनमत कंपनीच्या बाजूने झुकते नि या दबावाचा वापर करून असे उद्योग कारवाईतून सूट मिळवतात नि उजळ माथ्याने पुन्हा तसेच धंदे चालू ठेवतात.) तर या मुख्य कारणाने नि अन्य काही दुय्यम कारणाने बाझल् नगरीचे सारे अर्थकारण नि जीवनमानच रोशने ताब्यात ठेवल्याने तेथे असणारा कोणीही तिच्याविरुद्ध ब्र देखील उच्चारू शकत नसे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील बंधने - जसे कुटुंबिय, सुखवस्तू आयुष्याची लागलेली चटक इ. - लक्षात घेता कोणी या फंदात कधी पडेल हे जवळजवळ अशक्य होते. अॅडम्स म्हणतो 'मागे वळून पाहताना एका गोष्टीवरून मला मानवी स्वभावाची मोठी गंमत वाटते. या काळात मी स्वतःला असा प्रश्न कधीही विचारला नाही की एवढ्या लठ्ठ वेतनाला मी स्वतः लायक होतो का? ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का?'
रोशची ऐंशी टक्के उलाढाल ही फक्त दहा उत्पादनांवर अवलंबून होती. यातच त्या काळात परिसच समजली जाणारी अशी लिब्रियम आणि वॅलियम ही दोन ट्रँक्विलायजर्स (Tranquilizers) होती. नागरी नि धावपळीच्या जगण्यात ही औषधे अत्यावश्यक भाग होऊन बसली होती. त्यामुळे या दोन उत्पादनांवरच रोश अमाप पैसा कमवत होती. नेमक्या याच दोन औषधांवर सत्तरीच्या उत्तरार्धात गंडांतर आले.

_______________________________________________________________________________________________
या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.

१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.
२. Ethics (Book Review: Roche versus Adams) - Eike-Henner W. Kludge. In: Canadian Medical Association Journal, 1984, Vol. 130.
३. SWP 17/87 - Hoffman-La Roche v Stanley Adams - Corporate and Individual Ethics - Eric Newbigging


(पुढील भागातः मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश)




हे वाचले का?

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - २: रोश आणि अ‍ॅडम्स

स्टॅन्ले अ‍ॅडम्स:

स्टॅन्ले अ‍ॅडम्स हा तसा सुखवस्तू घरातील, माल्टा (जो आज स्वतंत्र देश आहे) सारख्या छोट्या ब्रिटिश कॉलनीमधे जन्मलेला. तरुण वयातच विविध भाषांमध्ये प्रवीण झालेला हा तरुण मुळातच सुखवस्तू घरचा नि त्यात सुरवातीच्या काळात जहाज-विमा कंपनीचा एजंट, ब्रिटिश वकिलातीचा प्रतिनिधी, हौशी शेतकरी वगैरे बराच काही होता. पण सुखवस्तूपणाला साजेलशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी म्हणून मग तो औषध व्यवसायाकडे वळला. वेगवेगळ्या देशात नि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम तीन वर्षे काम केल्यावर एका बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीत दाखल झाला. इथून दोन वर्षातच त्याला प्रसिद्ध स्विस कंपनी 'हॉफमन-ला रोश' या कंपनीने उचलला. (एकमेकांचे एम्प्लॉई पळवण्यालाही परंपरा आहे पहा, आपल्या आय टी कंपन्यांनी लाज वाटून घ्यायचं कारण नाही.) मुळात स्विस कंपन्या या वरिष्ठ जागांवर फक्त स्विस नागरिकांचीच नेमणूक करत असत. असे असूनही एका माल्ट्न-ब्रिटिश व्यक्तीसाठी रोशने स्वतः गळ टाकावा यावरूनच या पाच वर्षात अ‍ॅडम्सने केलेल्या कामाची पावती मिळते.आधीच्या नोकरीतील अनुभवाचा वापर करून अ‍ॅडम्सने सुचवलेल्या अनेक सुधारणा रोशने मान्य केल्या नि त्याच्या ज्ञानाचा आणि पुढाकार घेण्याच्या वृत्तीचा उपयोग करून घेण्यासाठी त्याला आपल्या विविध ठिकाणी असलेल्या शाखांमधे प्रशिक्षणाला पाठवायला सुरवात केली. त्याचा पगारही अतिशय वेगाने वाढत गेला.आता अ‍ॅडम्सला त्याला हवी तशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती, तीही स्वर्गसमान स्वित्झर्लंडमधे. अशातच महाराज आपल्या सर्वार्थाने गुणी सेक्रेटरीच्या प्रेमात पडले नी चतुर्भुज झाले. अ‍ॅडम्सला स्वर्ग दोन बोटे उरला होता.


हाफमन-ला रोश:

एका धनाढ्य टेक्स्टाईल व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या नि व्यवसायाने बँकर असलेल्या फ्रिट्ज हॉफमान-ला रोश (Fritz Hoffmann-La Roche) याने १८९४ मध्ये मॅक्स कार्ल ट्रॉब (Max Carl Traub) याच्याबरोबर भागीदारी करून स्वित्झर्लंडमधील बाझल्-स्थित एक लहानशी औषधनिर्माण कंपनी ताब्यात घेतली. व्यावसायिक दृष्ट्या खडतर अशा दोन वर्षांनंतर रोशने आपल्या भागीदाराचा हिस्सा विकत घेतला नि कंपनी पूर्णपणे आपल्या कब्जात घेतली आणि हॉफमन-ला रोश कंपनीचा जन्म झाला. कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखाद्या हुकमी उत्पादनाच्या शोधात असतानाच ब्रँडेड उत्पादनाच्या स्वरूपात विविध औषधांचे प्रमाणित डोसेस बाजारात आणण्याची कल्पना सुचली. याचबरोबर हे ब्रँड्स आंतराष्ट्रीय बाजारातही विकता येतील असा त्याचा होरा होता. शक्यतो स्थानिक नैसर्गिक उत्पादनांपासून औषधांना आवश्यक ती रसायने वेगळी करून ती औषधनिर्मितीसाठी वापरावीत असे त्याचे धोरण होते. त्यामुळे विविध देशातील बाजारांसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन केंद्रे स्थापन करणे आवश्यक ठरले. त्यामुळे रोशचे पहिले ब्रँडेड उत्पादन (Sirolin हे कफ सिरप जे कंपनीच्या Thiocol नावाच्या क्षयरोगविरोधी (antitubercular) रसायनापासून बनवले होते) बाजारात येण्यापूर्वीच (१८९८) इटली आणि जर्मनी या दोन देशात रोशच्या स्थानिक शाखा काम करू लागल्या होत्या. १९१२ पर्यंत रोशच्या तीन खंडातील नऊ देशात स्थानिक शाखा निर्माण करण्यात आल्या. रशिया हे फ्रिटझच्या दृष्टीने मोठे मार्केट होते नि त्याने तिथे बर्‍यापैकी बस्तान बसवले होते. परंतु १९१७ मधे डाव्या क्रांतीचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. १९१९ पर्यंत रोश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली होती. अखेर बाझल्-स्थित हेन्डेल्स बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आणि खाजगी मालकीची रोश ही लिमिटेड - भागीदारीतील - कंपनी झाली

त्या काळापासून आजपर्यंत रोशचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. यात अंतर्गत वाढ (Organic growth) तर आहेच पण त्याहूनही मोठा वाटा हा ताब्यात घेतलेल्या अन्य कंपन्यांचा (Inorganic growth) आहे. अ‍ॅडम्सने रोशची नोकरी स्वीकारली त्यावेळी स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि जपान या देशांमधे रोशची उत्पादन यंत्रणा कार्यान्वित होती. याशिवाय जगभर तिच्या विक्री-शाखा पसरलेल्या होत्या. अ‍ॅडम्स रोशचा नोकर झाला नि लगेचच त्याची नेमणूक व्हेनेझुएलामधील रोशच्या नव्या कंपनीचा प्रमुख म्हणून झाली. तेथील अनुभवाबाबत अ‍ॅडम्सने थोडक्यात पण मार्मिक विवेचन केले आहे. तो म्हणतो 'प्रचंड आकार नि केवळ एक कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सुमारे ९० टक्के लोक एवढे दरिद्री होते की त्यांना रोजचे जेवण मिळण्याची मारामार होती. असे असून देखील रोशची येथील वार्षिक सहा लाख स्विस फ्रँक (सुमारे सहा कोटी भारतीय रुपये) इतकी होती.'

हे आकडे १९६९-७० मधील आहे हे ध्यानात घेतले तर एका दरिद्री देशात अन्नाची ददात असताना जीवनसत्त्वांचा व्यापार मात्र तेजीत होता असे म्हणावे लागेल. यातूनच नव्या व्यावसायिक नीतीमधील एक मुख्य तत्त्व अधोरेखित होते, ते म्हणजे 'जिथे गरज नाही तिथे ती व्यवसायाच्या वाढीच्या उद्देशाने ती निर्माण केली जावी.' आणि ही गरजेची निर्मिती कशी केली जाते हे उघड गुपित आहे. यासाठी वापरलेले काही उपाय तर या लेखमालेत पुढे येतीलच.

व्हेनेझुएलातील शाखा अतिशय उत्तम तर्‍हेने प्रस्थापित केल्यानंतर त्याला त्यानेच निवडलेले मेक्सिकोमधे पोस्टिंग देऊ करण्यात आले. अर्थात यापूर्वी त्याला त्याची मनपसंत लक्झरी कार नि तीन महिन्याची भरपगारी सुटी देण्यात आली होती. पण सुटीवरून परतलेल्या अ‍ॅडम्सला सांगण्यात आले की त्याचे मेक्सिकोतील पोस्टिंग रद्द करण्यात आले आहे. काही काळातच त्याच्या लक्षात आले की ज्या व्यक्तीला हटवून त्याची नेमणूक झाली ती अतिशय पोचलेली असामी होती. कंपनी नि स्विस सरकार यांच्या बड्या बड्या धेंडांपर्यंत त्याचे हात पोहोचलेले होते. यावर अ‍ॅडम्स मार्मिक टिपण्णी करतो. तो म्हणतो 'तुम्हाला (कामाविषयी) काय माहिती आहे यापेक्षा कोणकोण माहिती आहेत हे स्वित्झर्लंडमधे अधिक महत्त्वाचे ठरत असे, रोशदेखील याला अपवाद नव्हती.' यानंतर अ‍ॅडम्सला कॅनडा नि लॅटिन अमेरिकेच्या डिविजनल मॅनेजरची जागा बहाल करण्यात आली. यानंतरच रोशचे अवाढव्य साम्राज्य नि त्यांची ’व्यवसायाभिमुख’ कार्यपद्धती, नैतिकतेची केलेली ऐशीतैशी इ. गोष्टी अ‍ॅडम्सला जवळून पाहता आल्या, नि इथून त्याच्या मनात स्वार्थ नि नैतिकता यातील द्वंद्व सुरू झाले.

रोशच्या व्यावसायिक नीतीमत्तेची पहिली चुणूक अ‍ॅडम्सला त्यांच्या वेतनपद्धतीत दिसली होती.रोशची वेतन देण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. यात प्रत्येक पोस्ट साठी निश्चित मासिक वेतन असे जो सर्वांना माहित असे. परंतु या मासिक वेतनाचे वर्षाला बाराच हप्ते मिळत असे नाही. उत्तम काम करणार्‍या वा मर्जीतल्या व्यक्तीला तेरा किंवा त्याहून अधिक हप्ते दिले जात. यामुळे इतर सेवकांना सदर व्यक्तीचे नेमके वेतन किती हे समजणे अवघड जाई. याच वेतनपद्धतीची एक काळी बाजू ही होती (जी आजही आपले अस्तित्व राखून आहे. एवढेच नव्हे तर चांगले हातपाय पसरून ऐसपैस बसली आहे नि आपल्या देशासारख्या अनेक देशांची निर्याताभिमुख अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून आहे.) ती म्हणजे तिच्या दुसर्‍या नि तिसर्‍या जगात असलेल्या कर्मचार्‍यांच्या नि युरपमधील कर्मचार्‍यांच्या वेतनात असलेली प्रचंड तफावत. (आउट्सोर्सिंगची सुरवात आपण समजतो तशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यानी सुरू केलेली नसून रोशसारख्या औषध कंपन्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच याचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.) अशा वेळी अ‍ॅडम्ससारखा एखादा युरपियन अधिकारी जेव्हा व्हेनेझुएलासारख्या लॅटिन अमेरिकन देशात शाखा उभारणीसाठी अथवा व्यवसायवृद्धीसाठी जाई तेव्हा त्याचे मूळ वेतन तर त्याला मिळावे पण ते किती याची माहिती स्थानिक समकक्ष अथवा एक दर्जा खाली असलेल्या कर्मचार्‍यांना मिळू नये यासाठी हे वेतन दोन भागात दिले जाई. पहिला भाग हा स्थानिक वेतनाच्या प्रमाणात त्या त्या देशी अदा केला जाई तर उरलेला भाग हा स्विस बँकेतील त्याच्या खात्यात जमा केला जाई. यामुळे त्या कर्मचार्‍याला या दुसर्‍या भागावर त्या देशातील स्थानिक करही द्यावा लागत नसे. आजही अशा विभाजित वेतनाची पद्धत रूढ आहे. हा दुसरा भाग आता पर्क्स, स्टॉक ऑप्शन्स, पेड हॉलिडे अशा स्वरूपात दिला जातो इतकेच.

खुद्द रोश आणि अ‍ॅडम्स यांच्याशिवाय आणखी काही व्यवस्था पुढील घटनाक्रमात सहभागी होत्या. यात ई.ई.सी. या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी युरपियन इकनॉमिक कम्युनिटी (European Economic Community), युरपियन आयोग (European Commission), युरपियन संसद (European Parliament), स्विस सरकार नि स्विस न्यायव्यवस्था यांचा प्रामुख्याने सहभाग होता. (विस्तारभयास्तव या व्यवस्थांबाबत अधिक माहिती लिहिणे टाळले आहे, दिलेल्या दुव्यांवरून अधिक माहिती मिळवता येईल.)


_________________________________________________________________________________

या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.


१. Traditionally Ahead of Our Times (Roche official release, 2008)

२. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.







(पुढील भागातः रोशची कार्यपद्धती)

हे वाचले का?

बुधवार, २७ एप्रिल, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका

प्रस्तावना:

मानवी इतिहासात अनेक टप्पे आले. प्रथम रक्ताच्या नात्याच्या व्यक्ती एका गणात रहात असत. यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जाई. मूळचे एक कार्य - मुख्यत: शिकार, अन्नवाटप नि संरक्षण - एकाहुन अधिक कार्यात विभागून ते विविध व्यक्तींना वाटून देऊन ते साध्य करण्यात येई. हे कार्य त्या गणाच्या, समाजाच्या संदर्भात असे. आहार आणि निद्रा ही दोनच कार्ये खर्‍या अर्थाने वैयक्तिक पातळीवर असत. यानंतर गणांच्या संमीलनातून व्यापक असा समाज बनला, नि त्याचवेळी गणसंस्थेचा आधार असलेल्या बृहत्कुटुंबाचा संकोच होऊन एककेंद्री (न्यूक्लियर) कुटुंबव्यवस्थाही रूढ होऊ लागली. आता समाजाअंतर्गत गणाचे/कुटुंबाचे हक्क हा नवा प्रश्न समोर आला. त्याचप्रमाणे याच्याविरुद्ध असा कुटुंबाअंतर्गत/गणाअंतर्गत/समाजाअंतर्गत असा 'वैयक्तिक स्वार्थ' नि हक्क उपस्थित झाला. समाजव्यवस्था निर्माण होताना याबाबत काही नियम निर्माण करण्यात आले. यामुळे वैयक्तिक पातळीवरही वैयक्तिक संपत्तीचा विकास, स्वत:च्या हक्कांचे संरक्षण असे निश्चित हेतू पुढे आले. समाज जसा व्यापक होत गेला तसतसा वैयक्तिक विकास नि कार्य यांचाही विकास झाला. पुढे विभागणीऐवजी केंद्रीकरणाने मोठी कार्ये सिद्ध होऊ शकतात हे जसजसे लक्षात येऊ लागले तसे सहकाराचा जन्म झाला. जे अपत्य-संगोपन, शिकार याबाबत होत होते ते याच्या उलट होते. तिथे श्रमविभागणी होती तर आता श्रमांच्या एकजुटीतून वैयक्तिक कुवतीपलिकडे असलेली आणि यापूर्वी न कल्पना केलेली मोठी कार्ये साध्य होऊ लागली. अशा कार्यसिद्धीसाठी एका नियंत्रक यंत्रणेची निर्मिती आवश्यक ठरली. मग हा मूळ हेतू पुढे अनेक प्रकारच्या व्यवस्थांची निर्मिती करण्यास कारणीभूत ठरला. समाजव्यवस्था, सैन्यव्यवस्था, उत्पादनव्यवस्था, उदीमव्यवस्था, धर्मव्यवस्था अशा विविध व्यवस्था निर्माण झाल्या.

हे सारे मुळात माणसाला एकत्रित बळाच्या आधारे एखादे वैयक्तिक कुवतीपलिकडचे कार्य सिद्धीस नेण्याच्या मूळ हेतूने झाले. परंतु यापूर्वी मनुष्याने न कल्पिलेली अशी एक महत्त्वाची गोष्ट यातून घडली ती म्हणजे, अशा व्यवस्थेचे स्वतःचे असे काही हक्क आणि - अपरिहार्यपणे काही - स्वार्थ निर्माण झाले. इतिहासात डोकावून पाहिले तर असे दिसून येते की हे हक्क पुढे भस्मासुरासारखे त्याच्या जन्मदात्यावरच - माणसावरच - उलटले. मनुष्याचे हित हा मूळ हेतू मागे पडून व्यवस्थेचे हित जपण्याच्या दृष्टीने माणसाची पावले पडू लागली. एखाद्या बुद्धिभेद केलेल्या गुलामाप्रमाणे या व्यवस्थेचे हित जपण्यासाठी माणसाने स्वत:च्या हितावर पाणी सोडले, प्रसंगी त्यासाठी शस्त्र हाती घेतले. यातून हिंसाचार, परस्परांचे हक्क हिरावून घेण्यासाठी व्यवस्थेचा वापर, व्यवस्थेचे हित व्यक्तिहितापेक्षा अधिक श्रेयस मानून व्यक्तिहिताचा झालेला संकोच या इतिहासाच्या पाऊलखुणा ठरल्या. धर्मसंस्थेने माजवलेला हिंसाचार नि घेतलेले हजारो बळी, त्या धर्मव्यवस्थेचा संपूर्ण धि:कार करीत उभ्या राहिलेल्या पर्यायी व्यवस्थेनेही आपली व्यवस्था रुजवण्यासाठी धर्मसंस्थांच्या पावलावर पाउल टाकत घडवून आणलेला अपरिमित नरसंहार हा तर उघड इतिहास आहेच पण त्याहून भयानक असा इतिहास - जो खरे तर अजूनही वर्तमानाचा भाग आहे - आहे तो माणसाच्या अप्रत्यक्ष शोषणाचा. अशीच एक व्यवस्था उद्योगधंद्यांच्या स्वरूपात निर्माण झाली. मूळ हेतू पुन्हा एकदा मानवाच्या व्यापक हिताकरीता एकत्रित कार्य करणे हा उदात्त हेतू ठेवून; पण हीच व्यवस्था माणसाच्या हिताचा बळी देत, त्याला चिरडत आज त्या व्यवस्थेचे हित रक्षण करण्यास प्राधान्य देते तेव्हा त्याविरोधात एका माणसालाच आवाज उठवावा लागतो.

जगात बरीच माणसं अशी असतात जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे नाटक करीत स्वतः त्या अन्यायाच्या बाजूने उभे राहून स्वार्थ साधत असतात. बहुसंख्य माणसे अशी असतात की ते अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने बोलतात, पण त्याबाबत काही करावे अशी जाणीव त्यांच्यामधे नसतेच, आणि ज्यांच्यात असते त्यांच्यात स्वार्थ बाजूला सारून इतर कोणासाठी झगडावे अशी उर्मीच निर्माण होऊ शकत नाही. याशिवाय अनेक निव्वळ वाचिवीर असतात ज्यांची कृती नि बांधिलकी तोंडावाटे बाहेर पडलेल्या शब्दाबरोबरच विरून जाते. पण जगात काही माणसे अशीही असतात जी केवळ स्वार्थ बाजूला ठेवून अन्यायाविरूद्ध ताठ उभे राहतातच असे नाही तर त्यासाठी बलिष्ठ अशा व्यवस्थेबरोबर एकांडा लढाही देतात, त्या लढ्याची जबर किंमतही मोजतात. अशा लढ्यांचा शेवट बहुधा सांकेतिक विजयात होऊन ही माणसे समाजातून बाजूला फेकली जातात नि अन्यायी व्यवस्था चेहरा बदलून पुन्हा आपले कार्य चालू करते. स्टॅन्ले अ‍ॅडम्स याने मात्र एका अन्यायी, भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध उठवलेला आवाज मात्र निर्भेळ विजयी झाला नसला तरी तो निव्वळ सांकेतिक विजयाहून खूप काही अधिक साध्य करून गेला.

अ‍ॅडम्सचा संघर्ष होता तो एका व्यवस्थेविरूद्ध. तो स्वतः त्या व्यवस्थेचा भाग होता. एका अर्थाने त्याचा स्वार्थ - लठ्ठ पगाराची नोकरी - त्यात गुंतलेला होता. तरीही ज्या क्षणी त्या व्यवस्थेचे भ्रष्ट नि कराल रूप त्याच्यासमोर आले त्या क्षणी त्याने स्वार्थ बाजूला ठेवला, स्वत:चे सुरक्षित नि सुखवस्तू आयुष्य पणाला लावले नि जे उघडकीला आले असता त्याचा - वा इतर कोणाचाही - 'प्रत्यक्ष' फायदा झाला नसता अशा एका भ्रष्ट नि अनैतिक व्यवस्थेचे खरे रूप त्याने जगासमोर मांडले. ज्या संस्थांनी त्याला मदत करणे अपेक्षित होते त्यांनीच केलेल्या दगाफटक्याने काही खटल्यांना, मनस्तापाला नि प्रत्यक्ष नुकसानीलाही त्याला सामोरे जावे लागले. पण अखेरीस त्या व्यवस्थेला माघार घ्यावीच लागली. हा संघर्ष आणखी एका अर्थाने लक्षणीय आहे. औद्योगीकरण नि खाजगीकरण हे हमखास यश देणारे नि जगाचे कल्याण करणारे जादूचे मंत्र आहेत ही समजूत असणार्‍यांच्या स्वप्नाळूपणाला जोरदार धक्का देण्याचे काम स्टॅन्ले अ‍ॅडम्सच्या गौप्यस्फोटाने केले. त्या अर्थाने तो त्या व्यवस्थेचा एक प्रमुख ’जागल्या’ (Whistleblower) ठरला.


भूमिका:

काही काळापूर्वी माझ्या मित्राने मला ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ (लेखक: स्टॅन्ले अ‍ॅडम्स, मराठी अनुवाद - डॉ. सदानंद बोरसे) वाचायला दिले होते. त्यावेळी चार पुस्तकांसारखे पुस्तक म्हणून वाचून ठेवून दिले होते. चार-पाच महिन्यापूर्वी नेहमीच्या कथा-कादंबर्‍या किंवा चिकित्सक पुस्तकांचा कंटाळा आला नि काही वेगळे माहितीपूर्ण असे वाचावे या उद्देशाने पुन्हा एकदा हे पुस्तक हाती घेतले. लहानसेच असे ते पुस्तक खरेतर तासा-दोन तासातच वाचून व्हायचे, पण त्या दिवशी त्यात एवढा हरवलो की सारा दिवस त्यात कसा गेला ते समजलेच नाही. असे लक्षात आले की निव्वळ एका माणसाचा लढा एवढ्यापुरतेच या पुस्तकाचे महत्त्व नाही. एक व्यक्ती एखाद्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकटा उभा राहतो नि ती एक व्यवस्था सोडाच, पण अन्य संबंधित व्यवस्थादेखील त्याच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष विरोधात काम करतात, पुन्हा पुन्हा करत राहतात; तेव्हा एकुणच व्यवस्था नि व्यवस्थांची साखळी यांच्या संदर्भात व्यक्तीचे स्थान नि हक्क यांना तपासून पाहणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर व्यवस्थेचे हित नि व्यक्तीचे हित यांचा संघर्ष उद्भवतो तेव्हा कोणाला प्राधान्य मिळावे या अनुत्तरित प्रश्नाचे उत्तर शोधण्याचीही गरज भासू लागते. सदर लेखमालेचा उद्देश औद्योगिकरण, त्यात नव्याने रुढ झालेला जागतिकीकरणाचा नि खुल्या स्पर्धेचा मंत्र इ. चा रोश विरुद्ध अ‍ॅडम्सच्या लढ्याच्या निमित्ताने उहापोह करणे हा आहे. एका अर्थी अ‍ॅडम्सचा हा लढा एक ’केस स्टडी’ मानून त्याआधारे औद्योगिक व्यवस्था, जागतिकीकरण, बहुराष्ट्रीय उद्योग नि त्यांची व्यावसायिक नीती इ. बद्दल काही भाष्य करता येईल का हे तपासण्याचा आहे. हा अभ्यास या एका केसच्या संदर्भात असल्याने त्यातून निघणारे निष्कर्ष हे व्यापक असतीलच असे नाही याची मला जाणीव आहे. कदाचित ही नाण्याची एकच बाजू असेल. अ‍ॅडम्सने आपली कैफियत या पुस्तकाद्वारे मांडली आहे. रोशकडून याबाबत काही प्रतिवाद अथवा भूमिका मांडणे झाले आहे का याचा शोध घेतला असता तसे काही हाती लागले नाही.

हे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले (मूळ इंग्रजी पुस्तक १९८५ मध्ये) त्याला आता पंचवीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे आज यावर काही लिहिणे हे औचित्यपूर्णही आहे. पुस्तकातील कालखंड हा साधारणपणे १९७३ त १९८३ असा दहा वर्षांचा आहे. १९८३ साली बहुतांश खटल्यांचे निकाल आले असले तरी अ‍ॅडम्सचा लढा चालूच होता. त्या लढ्याचे फलित काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. याचे उत्तर देण्यासाठी १९८३ नंतर म्हणजे गेल्या सुमारे अठ्ठावीस वर्षात काय घडले याचा मागोवा घ्यावा लागेल. या दृष्टीने काही माहिती मिळवण्याच्या मी प्रयत्न केला. या लेखमालेचा मुख्य आधार ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ हे पुस्तक (डॉ. सदानंद बोरसे यांनी केलेला मराठी अनुवाद) हेच आहे. परंतु १९८३ नंतरच्या कालावधीतील घटनांसाठी, माहितीसाठी मी अन्य काही लिखाणाचा आधार घेतला आहे. सविस्तर संदर्भसूची अखेरच्या भागात देईनच. (आताच न देण्याचे कारण म्हणजे जसजसे लिखाण पुढे सरकेल तसा त्यात बदल होऊ शकेल.)

मूळ इंग्रजी पुस्तक आजही उपलब्ध आहे, परंतु मराठी अनुवाद आता उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याच्याआधारे लिहायचे त्या मूळ पुस्तकातील माहिती थोड्या विस्ताराने देणे आवश्यक ठरले. अ‍ॅडम्सच्या पुस्तकात रोशच्या लढ्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील तपशीलवार लिहिले आहे. एवढा मोठा लढा लढत असता झालेली कौटुंबिक ससेहोलपट विस्ताराने येते नि आपण सुन्न होऊन जातो. परंतु लिखाणाची व्याप्ती नि उद्देश लक्षात घेता त्यासंबंधीचे उल्लेख मी थोडक्यात केले आहेत. तसेच इटलीमधे त्याने केलेल्या वास्तव्यात त्याला आलेले अनुभव, अर्थिक विवंचना, व्यवसाय उभारणीच्या प्रयत्नात खाल्लेले फटके, तेथील व्यवस्थांशी दिलेले लढे हे ही फार विस्ताराने दिलेले नाहीत. मूळ लिखाण हे साधारणपणे कालानुक्रमे केलेले आत्मचरित्रात्मक लिखाण आहे. माझ्या लेखनाचा हेतू वेगळा असल्याने इथे त्याची विषयवार वर्गवारी करून फेरमांडणी केली आहे. त्या ओघात काळात पुढे मागे घडलेल्या घटना वाचताना होऊ शकणारा गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक तिथे वर्ष/महिना यांचा उल्लेख - पुनरावृत्त होत असूनही - केलेला आहे, तर काही वेळा अनावश्यक ठरवून गाळून टाकला आहे. हे सर्व करताना त्या त्या संदर्भातील तपशील वाचताना आधी आलेल्या एखाद्या मुद्यातील तपशीलाने छेद देउ नये याचाही यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. मूळ अनुवादातील काही उच्चारांमधे बदल करून अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे (उदा. बेस्ले ऐवजी बाझल्). यातूनही काही विसंगती/चुका निदर्शनास आणल्यास तत्परतेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन.

मी अर्थशास्त्राच्या, अर्थव्यवस्थेचा अभ्यासक नाही (उलट काही जवळच्या मित्रांनी मी अर्थशास्त्राची काही पुस्तके वाचावीत म्हणून केलेला प्रयत्न मी विफल ठरवला आहे.) त्यामुळे सैद्धांतिक पातळीवर काहीही भाष्य करणे मला शक्य नाही. त्यामुळे एका सामान्य माणसाच्या भूमिकेतूनच मी अ‍ॅडम्सच्या लढ्याचा विचार करू शकतो नि तसाच मी करणार आहे. यात कदाचित काही उघड सैद्धांतिक त्रुटी दिसू शकतील. वाचकांना विनंती की अशा त्रुटी माझ्या निदर्शनास आणून द्याव्या म्हणजे त्या ताबडतोब सुधारून घेता येतील. माझे विचार मांडण्यासाठी मी शेवटी उपसंहाराचे प्रकरण प्रामुख्याने वापरणार आहे. परंतु अनेकदा माहितीच्या ओघातही काही लिखाण येईल, पण ते स्वतंत्र परिच्छेदात लिहून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.



कायदेशीर बाजू:

इथे दोन बाजूंतील संघर्षाच्या विषयासंबंधी लिहिले आहे. हा संघर्ष विविध कायदेशीर पातळीवर लढवला गेला. भरीस भर म्हणजे कायद्याच्या अधिकारक्षेत्राचा, व्याप्तीचा प्रश्न त्या कायदेशीर लढाईच्या वेळीची गुंतागुंतीचा झाला होता. अशा वेळी सदर लिखाणाच्या कायदेशी वैधतेबद्दल निवेदन देणे आवश्यक ठरते. यासाठी आगाऊच हे नोंदवून ठेवतो की रोश अथवा अ‍ॅडम्सच्या भूमिकेबद्दल, प्रवृत्तीबद्दल, न्याय/अन्यायाबद्दल, दोषी/निर्दोषी असण्याबाबत मी नव्याने कोणतेही मूल्यमापन वा निष्कर्ष काढणार नाही, माझा तो उद्देश नाही. या लढ्याच्या निमित्ताने व्यक्ती-व्यवस्था संघर्ष, औद्योगिकरण, व्यवसायनीती, भारतातील सद्यस्थिती या गोष्टींसंबंधी काही सर्वसाधारण मूल्यमापन वा चिकित्सा करणे हा माझा हेतू आहे. रोश, अ‍ॅडम्स नि त्यांच्या लढ्यासंबंधीची सारी माहिती मी प्रामुख्याने ’रोश विरुद्ध अ‍ॅडम्स’ या पुस्तकातून, अन्यत्र आलेल्या अ‍ॅडम्सच्या मुलाखतीतून वा अन्य कायदेशीर मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घेतली आहे नि त्यांचे संदर्भही दिले आहेत. माझे भाष्य नि मूळ माहिती मी स्वतंत्र परिच्छेदात लिहून वेगळे ठेवण्याच्या शक्य तितका प्रयत्न केला आहे.

(पुढील भागात: रोश आणि अ‍ॅडम्स)

हे वाचले का?

रविवार, २० फेब्रुवारी, २०११

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?

सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्या निमित्ताने त्यासंबंधी विविध चर्चा, कार्यक्रम झडताहेत. सगळेच हात धुवून घेताहेत, मग आपणच का मागे रहा. म्हणून आम्हीही काहीतरी लिहू म्हटले. बरेच दिवस आमच्या डोक्यात हा विषय ठिय्या देऊन बसला आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की 'क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?' थांबा थांबा, थोडंसं इस्कटून सांगतो.

क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात, किंवा खरंतर यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडतात, ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षक हे मैदानावर बहुसंख्येने असले तरी ते तुलनेने दुय्यम असतात, मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण मुद्दा असा आहे की हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही. आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे लिहितो आहे.

एखादा फलंदाज बाद आहे असे अपील झाले असता जर निश्चित निर्णय करता येत नसेल तर ’संशयाचा फायदा’ फलंदाजाला दिला जातो. (चला ठीक आहे, तो एकदा बाहेर गेला की त्याला दुसरी संधी मिळत नाही म्हणून हे योग्य म्हणूया.)

हल्ली एकदिवसीय नि वीस-वीसच्या जमान्यात गोलंदाजाला लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याची सोय नाही, लगेच वाईड दिला जातो, ज्याचा अर्थ प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.

षटकात एकच बाउन्सर (डोक्यावरून जाणारा) टाकण्याची परवानगी आहे. दुसरा टाकल्यास तो नोबॉल ठरवून पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.

फलंदाजाच्या कंबरेच्या वर फुल्टॉस टाकल्यास नोबॉल दिला जातो नि यावर फलंदाज बाद दिला जात नाही. पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही. असे चेंडू एका सामन्यात दोनदा टाकल्यास पंच त्या गोलंदाजावर त्या सामन्यापुरती बंदी घालू शकतात. अशीच बंदी फलंदाजाच्या एखाद्या फटक्याबद्द्ल घातली जात नाही.

याशिवाय पारंपारिक कसोटी क्रिकेटमधून आलेले नोबॉल नि वाईड आहेतच. जिथे पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.

आणखी एक जिझिया कर म्हणजे एकदिवसीय नि वीस-वीस क्रिकेटमधे क्रीजपुढे पाऊल आल्याने नोबॉल ठरलेल्या पुढच्या चेंडूवर फ्री-हिट बहाल केली जाते. म्हणजे नोबॉलवरच नव्हे तर पुढच्या चेंडूवरही फलंदाज बाद होऊ शकत नाही. हा अन्याय नव्हे काय?

लेग-बिफोर अर्थात पायचीतचे अपील केलेला चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीबाहेर (पक्षी: लेगस्टंप) असेल तर भले चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळणार असेल तरी फलंदाजाला पायचीत दिले जात नाही.

फलंदाजाला ’रनर’ अर्थात धाव-मदतनीस असतो. त्याच्या मदतनीसाने धावलेल्या धावा त्याच्या नावावर नोंदल्या जातात. क्षेत्ररक्षक देखील काही काळ मैदानाबाहेर जाऊन आराम करतो, ज्या काळात त्याच्याऐवजी बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कामात दुस‌र्‍या व्यक्तिची मदत घेता येते, मग गोलंदाजाला अशी सुविधा का नसते?

BillyShowingRedCard
म्हणजे आता आम्ही अपीलही करायचं नाही की काय? - ग्लेन मॅक्ग्रा.

फलंदाज फलंदाजी करताना मधेच उलट्या दिशेने फिरून ’रिवर्स स्वीप’ किंवा तत्सम पलटी शॉट मारू शकतो, पण गोलंदाज मधेच हात बदलून उजव्याऐवजी डाव्या हाताने गोलंदाजी करू शकत नाही. किंवा गेला बाजार न सांगता ओवर द विकेटच्या ऐवजी अचानक राउंड द विकेट चेंडू टाकू शकत नाही.

एवढेच नव्हे तर त्याने चेंडू टाकताना हाताची हालचाल कशी असावी यावरही काही निर्बंध आहेतच नि त्यानुसार अधेमधे काही गोलंदाजांचे चेंडू अवैध ठरवले जाऊ शकतात व त्या गोलंदाजावर बंदीही येऊ शकते. फलंदाजावर एखाद्या नियमानुसार अशी बंदी घातली जाऊ शकते का? माझ्या ऐकिवात तरी असा काही नियम नाही.

फलंदाज खेळी चालू असताना कितीही वेळा आपली बॅट वा अन्य साधने बदलू शकतो पण गोलंदाजाला मात्र ही सोय नाही. केवळ चेंडू फार खराब झाला असे पंचांचे मत झाले तरच त्याला नवा चेंडू मिळू शकतो.

आपली बॅटला चिकटपट्ट्या लावून भक्कम करण्याची फलंदाजाला परवानगी आहे, पण एखाद्या गोलंदाजाने जरासे वॅसलीन लावले तर गदारोळ होतो नि त्याची कारकीर्द संपुष्टात येते.

बॅटचे वरचे रबर खेळताना त्रास देत असेल वा बॅटचे गटिंग नको असेल तर फलंदाज ते कापून टाकू शकतो. पण गोलंदाजाला चेंडूची शिवण जरा उसवून सैल करावीशी वाटली की लगेच त्याच्या कारवाई होते.

हे सगळं सोडा हो. पण क्रिकेटच्या इतिहासात ताकीद देण्यासाठी येलो आणि रेड कार्ड प्रत्येकी एकदाच दाखवले गेले आहे. आणि दोनही वेळा ज्याला ताकीद देण्यात आली तो गोलंदाज होता.

वरील ढीगभर निर्बंध पाहिले नि फलंदाजांना जाचक असे काय नियम आहेत हे पहायला गेलो तर एक फुटकळ नियम सापडला तो म्हणजे फलंदाज एकदा आउट झाला की त्या इनिंगमधे तो पुन्हा खेळू शकत नाही, फुस्स.

याशिवाय एखादा असा नियम आम्हाला काही नोंदवता आला नाही ज्यात एखाद्या चुकीबद्दल फलंदाजाला शिक्षा केली जाते नि गोलंदाजाला अप्रत्यक्ष फायदा होतो. तुम्हाला आठवतोय का एखादा नियम, पहा बरं जरा.

- oOo -

१. हे दोनही प्रसंग अनधिकृत होते हा मुद्दा अलाहिदा. २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या-वहिल्या टी-२० सामन्यांत अखेरच्या चेंडूवर न्यूझिलंडला तब्बल पंचेचाळीस धावा हव्या होत्या. सामन्याचा निकाल निश्चित झाल्याने खेळाडू केवळ औपचारिकता पुरी करत होते. त्यावेळी गंमत म्हणून ग्लेन मॅक्ग्रा याने अखेरचा चेंडू हा सरपटी (अंडर-आर्म) टाकला.

या ’प्रमादा’बद्दल पंच बिली बावडन यांनी त्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये रेड कार्ड दाखवले होते. (https://www.youtube.com/watch?v=2PC31C_HJ3E) वर समाविष्ट केलेला फोटो त्याच घटनेचा आहे.

या प्रसंगाने १९८१ मध्ये याच दोन संघात झालेल्या सामन्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा अखेरचा चेंडू शिल्लक असताना न्यूझीलंडला बरोबर सहा धावांची आवश्यकता होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ट्रेव्हर चॅपेल (प्रसिद्ध तीन चॅपेल बंधूंपैकी एक) याने असाच अंडर-आर्म सरपटी चेंडू टाकून न्यूझीलंडला रोखले होते. या अखिलाडूवृत्तीबद्दल (जी पुढे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची ओळखच बनली.) चॅपेल आणि ऑस्ट्रेलियाची बरीच निर्भर्त्सना झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि चॅनेल-९ चा समालोचक रिची बेनॉ याने ’One of the worst things I have ever seen on a cricket ground.’ असे म्हणत आपल्या समालोचनाचा समारोप केला.

पण विजयासाठी काहीही क्षम्य असते हा मंत्र स्वीकारलेल्या त्या संघाने ती टीका अर्थातच मनावर घेतली नाही. तिथून पुढे हा संघ स्लेजिंग म्हणजे मैदानावरील टोमणेबाजीसाठी कुप्रसिद्ध होत गेला. ग्लेन मॅक्ग्राने मात्र प्रत्यक्ष असा चेंडू टाकला नाही, फक्त आविर्भाव केला. एक प्रकारे ट्रेव्हर चॅपेलला दिलेली ही चपराकच होती.

या खेरीज २००५ मध्येच त्सुनामीग्रस्तांच्या मदतीसाठी जागतिक संघ वि. आशियाई संघात झालेल्या सामन्यात जागतिक संघाच्या शेन वॉर्न याने ४९ षटके आणि पाच चेंडू झाल्यावर षटके पुरी झाली असे समजून तंबूचा रस्ता धरला. तेव्हा पंच असलेल्या (पुन्हा) बिली बावडन यांनी त्याला परत बोलावून, येलो कार्ड दाखवून एक चेंडू खेळण्याची आज्ञा दिली. इथे शेन जरी फलंदाजी करत असला तरी मूळचा गोलंदाजच तो. त्यामुळे बिलीने पुन्हा एका गोलंदाजावरच अन्याय केला म्हटले पाहिजे. असो.

वास्तविक क्रिकेटमध्ये ताकीद म्हणून वा शिक्षा म्हणून कार्ड दाखवण्याची पद्धत २०१७ पर्यंत नव्हती. वरील दोनही प्रसंग हे बिली बावडन यांच्या विनोदबुद्धीचे फलित आहेत.

---

संबंधित लेखन:

सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा
क्रिकेट आणि टीकाकार


हे वाचले का?

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

Road not to be taken now

There is a single road that originates at the fort of Sinhagad situated south of Pune, which takes us to the main city area. We always take that road while going to the city, but we don't drive straight to the Dandekar bridge. Instead we turn left near Duttawadi and take a small road near the Colony Nursing Home. The reason for this detour is very special. There is a temple named 'Kalashree' here. We want to take a sneak-peak there hoping to get a glimpse of the God (Pt. Bheemsen Joshi) who adorns the citadel of this temple.

MangeshTendulkarSketch

Today morning we went to the temple the final time. The God was lying speechless with a sense of a successful mehfil adorning his face. Perhaps he has already been thinking of the new mehfil he is supposed to sing to. The taanpuraas were rested but the 'laya' which has now become part of personality was to go with him. So there was no reason to look for an accompanist. The journey was about to begin. Several friends and followers came to say good-bye. Kirana gharana co-travellers like Prabha Atre was there, friends and shishya like Upendra Bhat and Anand Bhate had reached early. Ustad Amjad Ali Khan could also be spotted and several more were still queueing in.

The people come to to wish the person bon voyage make sure the traveller gets some necessary goodies. But what would you offer to the God himself? On the contrary, he has left us a rich heritage which would enlighten the path of his followers for ages.

His Pooriyaa-Dhanashree, his unique 'Asawari Todi' still lingers in the air; rich 'Karim Naam' stands like a rock. The likes of Kalashree and Lalat-Bhatiyaar which were created in this very world enrich the treasure he inherited from his gurus. The aura of Malkauns still pervaded the air, sensitive Marwa still makes us nostalgic; some exqusite strong 'taans' move around like a lighteing. There is a Des supporting his eternal love for his country and now there is this Bhairavi which has started roaming and suggesting an end of something.

But wait, shouldn't Bhairavi be sung at morning? Then who is singing it now when the sun sets. Did someone say 'Swarabhaskar' finally sets? Didn't we no it has to rise again after the night!

Then why feel sad about the traveller who is leaving only for a night. Be sure he will come back, come back in style and with grandeur he created in his current stay. We still follow the path he has brightened for us. But then while we wait for him, we still won't venture in to the temple he once adorned and the road that takes us to that temple remains the 'road not be taken'.

(Many thanks to Vinita Deshmukh (Editor: 'Intelligent Pune') for help in drafting.)

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, २४ जानेवारी, २०११

देव नाही देवालयी

पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच एकमेव रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून.

गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो. देवालाही भूतलावरच्या त्याच्या वास्तव्यात मातीच्या माणसाचे काही भोग भोगावेच लागतात. रामकृष्णांचीही यातून सुटका झाली नाही तिथे या कलियुगातील देवच याला कसा अपवाद ठरेल?

MangeshTendulkarSketch

आज सकाळीही आम्ही देवळात गेलो, अखेरचे! मैफल संपवून निवांत पहुडलेल्या देवाच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची चित्कळा पसरली होती. आमच्यासारखे अनेक भक्त येऊन नव्या देशी 'बदली' झालेल्या या भास्कराचे अखेरचे दर्शन घेत होते.

अर्थातच त्यांचे ध्यान त्या पुढच्या मैफलीकडे लागले होते. कदाचित त्या मैफलीत कोणत्या रागांची बरसात करायची याची जुळणीही चालू झाली असेल. तंबोरे गवसणीत गेले असले तरी अंगभूत लय आपल्याबरोबरच नेणार होते त्यामुळे साथ कोणाची हा तसा प्रश्न नव्ह्ताच.

प्रयाणाची तयारीही चालू झाली होती. अनेकानेक सहकारी, साथीदार त्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला येऊन जात होते. प्रभा अत्रे यांच्यासारख्या किराणा मार्गाच्या सहप्रवासी आल्या, उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्यासारखे सहप्रवासी विद्यार्थी आले होते, अमजद अली खां आले, इतरही कलाकार मंडळी येत होतीच. प्रवासाला जाताना सामान्यपणे काही शिदोरी घेऊन जायची पद्धत असते. निरोप देणार्‍याने ती द्यायची असते. पण खुद्द देवालाच तुम्ही काय शिदोरी देणार? उलट त्यानेच जाण्यापूर्वी तुमच्या-आमच्यासाठी प्रचंड वारसा ठेवून दिला आहे. याच्या आधारे जगण्याचे आनंदनिधान व्हावे इतका.

त्यांचा पूरिया धनाश्री आहे, एकमेवाद्वीतीय असा आसावरी तोडी आहे, 'करीम नाम' सारखी अजरामर बंदिश आहे, कलाश्री आणि ललत-भटियार सारखा याच भूतली निर्माण केलेला वारसा आहे, मालकंस रुंजी घालतोय, मारव्याचे हळवे सूरही आसमंती भरून राहिले आहेत,विस्मयचकित करणार्‍या विलक्षण ताकदीच्या काही ताना सणाणून सुटल्या आहेत, देसच्या धीरगंभीर स्वरात राष्ट्रभक्तीचे एक गीतही तरंगत येते आहे आणि या सार्‍यांबरोबर आता एका करूण भैरवीचे सूरही ऐकू येत आहेत.

ही भैरवी खरंच कुणी गातंय की आपला भास आहे हा? असा संकेत आहे की भैरवी ही मैफलीच्या अंताची सूचक असते. म्हणून येताहेत का हे भैरवीचे सूर? पण मग भैरवी हा सकाळचा राग, भास्कराच्या अस्ताच्या वेळी कोण गातंय?

बंद करा ते गाणं. म्हणे 'स्वरभास्कराचा अस्त'. मूर्ख कुठले. ठाऊक नाही का, भास्कराचा अस्त झाला तरी तो पुन्हा येतोच, मधली एक रात्र सुखरूप पार पडावी लागते इतकंच.

तसा हाही येईलच. 'कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा' असे विचारत असतानाच कदाचित 'पहा उदेला दिव्य गोल हा' असे म्हणत ते सूर पुन्हा सणाणत येतील नि आसमंत पुन्हा उजळून जाईल. हे घडेलच कधीतरी, नक्कीच घडेल. पण तोपर्यंत आता त्या रस्त्याने जाणे नाही. त्या देवालयात देव नाही, निव्वळ रिकामा गाभारा आहे तिथे दर्शन तरी कशाचे घ्यावे, नाही का?

(पं. भीमसेन जोशी आज अनंतात विलीन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर मनात उमटलेल्या भावनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न.)

- oOo -


हे वाचले का?