सोमवार, २४ जानेवारी, २०११

देव नाही देवालयी

पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच एकमेव रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून.

गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्‍या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो. देवालाही भूतलावरच्या त्याच्या वास्तव्यात मातीच्या माणसाचे काही भोग भोगावेच लागतात. रामकृष्णांचीही यातून सुटका झाली नाही तिथे या कलियुगातील देवच याला कसा अपवाद ठरेल?

MangeshTendulkarSketch

आज सकाळीही आम्ही देवळात गेलो, अखेरचे! मैफल संपवून निवांत पहुडलेल्या देवाच्या चेहर्‍यावर मैफलीची एक सफल सांगता झाल्याची चित्कळा पसरली होती. आमच्यासारखे अनेक भक्त येऊन नव्या देशी 'बदली' झालेल्या या भास्कराचे अखेरचे दर्शन घेत होते.

अर्थातच त्यांचे ध्यान त्या पुढच्या मैफलीकडे लागले होते. कदाचित त्या मैफलीत कोणत्या रागांची बरसात करायची याची जुळणीही चालू झाली असेल. तंबोरे गवसणीत गेले असले तरी अंगभूत लय आपल्याबरोबरच नेणार होते त्यामुळे साथ कोणाची हा तसा प्रश्न नव्ह्ताच.

प्रयाणाची तयारीही चालू झाली होती. अनेकानेक सहकारी, साथीदार त्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला येऊन जात होते. प्रभा अत्रे यांच्यासारख्या किराणा मार्गाच्या सहप्रवासी आल्या, उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्यासारखे सहप्रवासी विद्यार्थी आले होते, अमजद अली खां आले, इतरही कलाकार मंडळी येत होतीच. प्रवासाला जाताना सामान्यपणे काही शिदोरी घेऊन जायची पद्धत असते. निरोप देणार्‍याने ती द्यायची असते. पण खुद्द देवालाच तुम्ही काय शिदोरी देणार? उलट त्यानेच जाण्यापूर्वी तुमच्या-आमच्यासाठी प्रचंड वारसा ठेवून दिला आहे. याच्या आधारे जगण्याचे आनंदनिधान व्हावे इतका.

त्यांचा पूरिया धनाश्री आहे, एकमेवाद्वीतीय असा आसावरी तोडी आहे, 'करीम नाम' सारखी अजरामर बंदिश आहे, कलाश्री आणि ललत-भटियार सारखा याच भूतली निर्माण केलेला वारसा आहे, मालकंस रुंजी घालतोय, मारव्याचे हळवे सूरही आसमंती भरून राहिले आहेत,विस्मयचकित करणार्‍या विलक्षण ताकदीच्या काही ताना सणाणून सुटल्या आहेत, देसच्या धीरगंभीर स्वरात राष्ट्रभक्तीचे एक गीतही तरंगत येते आहे आणि या सार्‍यांबरोबर आता एका करूण भैरवीचे सूरही ऐकू येत आहेत.

ही भैरवी खरंच कुणी गातंय की आपला भास आहे हा? असा संकेत आहे की भैरवी ही मैफलीच्या अंताची सूचक असते. म्हणून येताहेत का हे भैरवीचे सूर? पण मग भैरवी हा सकाळचा राग, भास्कराच्या अस्ताच्या वेळी कोण गातंय?

बंद करा ते गाणं. म्हणे 'स्वरभास्कराचा अस्त'. मूर्ख कुठले. ठाऊक नाही का, भास्कराचा अस्त झाला तरी तो पुन्हा येतोच, मधली एक रात्र सुखरूप पार पडावी लागते इतकंच.

तसा हाही येईलच. 'कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा' असे विचारत असतानाच कदाचित 'पहा उदेला दिव्य गोल हा' असे म्हणत ते सूर पुन्हा सणाणत येतील नि आसमंत पुन्हा उजळून जाईल. हे घडेलच कधीतरी, नक्कीच घडेल. पण तोपर्यंत आता त्या रस्त्याने जाणे नाही. त्या देवालयात देव नाही, निव्वळ रिकामा गाभारा आहे तिथे दर्शन तरी कशाचे घ्यावे, नाही का?

(पं. भीमसेन जोशी आज अनंतात विलीन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर मनात उमटलेल्या भावनांना शब्दरूप देण्याचा प्रयत्न.)

- oOo -


संबंधित लेखन

1 टिप्पणी: