बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

‘राजनीती’चे महाभारत

मंडळी काल आम्ही ‘राजनीती’ नामे चित्रपट पाहिला– सहज टीवीवर दिसला म्हणून पाहिला. अगदी शेवटपर्यंत पहावे असे त्यात काय होते, ते काही समजले नाही. एरवी १०-१५ मिनिटात पुढील चित्रपटाची इस्टुरी ९५% अचूकतेसह (संख्याशास्त्री ना आम्ही, ५% सोडावे लागतात) सांगून टीवी बंद करणारे आम्ही, या चित्रपटात काय होते की शेवटपर्यंत चिकाटीने पाहिले.

कदाचित एरवी ‘पहावी’ लागणारी भिकार गाणी नव्हती म्हणून, कि दर दहा मिनिटांनी होणारा पंधरा मिनिटांचा ‘छोटासा’ ब्रेक न घेता अर्धा तास सलग चित्रपट पाहता आला म्हणून, की त्यात ती कत्रिना का कोण होती – जी सुंदर आहे, म्हणे – म्हणून, की त्या रणवीर– चुकलो ‘रणबीर’ म्हणायला हवं नाही का– चा एकही चित्रपट पूर्वी पाहिला नसल्याने ‘He deserves a chance' असाही एक सुप्त हेतू असावा. तर कारण काहीही असो, आम्ही तो चित्रपट टिच्चून बसून पाहिला एवढं खरं...

...आसं व्हय, पायला. बरं मंग...? आता हितं काय त्येचं...? का आता परत बैलाच्या कासर्‍यावानी बयाजवार इस्टुरी सांगून बोर करायचा इचार हाय?

TheBeginning

सांगतो ना. तर विषय असा आहे साधारण (नाय हो सम्दी इस्टुरी नाय सांगत, थोडक्यात सांगतो ज्येंनी पायला नसंल त्येंच्यासाटी). आटपाट नगरात राष्ट्रवादी पार्टी नावाचा एक – प्रादेशिक – राजकीय पक्ष आहे. त्याचे अध्यक्ष असलेले भानुप्रताप नुकतेच अर्धांगवायूने अंथरूणाला खिळले आहेत. यांचे एक चिरंजीव आहेत वीरेंद्रप्रताप (मनोज वाजपेयी). ते वडिलांच्या अनुपस्थितीत – अर्थातच – स्वत:ला त्यांचे वारस समजत असल्याने पार्टीची धुरा आता आपल्याकडे यावी असे त्यांना वाटते. पण अध्यक्ष ही धुरा सोपवतात आपल्या धाकट्या भावाकडे, चंद्रप्रतापकडे.

या धाकल्या पातीचे दोन पुत्र आहेत, पृथ्वीप्रताप (अर्जुन रामपाल) आणि समरप्रताप (रणबीर कपूर). आता मूळ अध्यक्षांनी ‘कार्यकारी अध्यक्ष’ केलेल्या चंद्रप्रतापनाच पार्टीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न पृथ्वी करतो, यात वीरेंद्रप्रतापला पद्धतशीरपणे बाजूला सारले जाते. या सर्व आणि इथून पुढेही या सर्व कामात पृथ्वी-समर यांचा मामा (नाना पाटेकर) आपल्या भाच्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.

दुसरीकडे दलित वस्तीमधे राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, परंतु तिथे स्थानिकांना उमेदवारीची मागणी करत आता सूरज (अजय देवगण) च्या रूपाने एक बंडखोर उभा राहिला आहे. त्याच्या पाठीशी युवा पिढी असल्याचे पाहून मामा धूर्तपणे जे त्याच्या पूर्णपणे मुठीत आहेत अशा सूरजच्या वडिलांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ करतो. अर्थातच सूरजला त्या विरूध्द काही बोलता येत नाही. पण तो दुखावला जातो. हे पाहून ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने वीरेंद्रप्रताप आपल्या अधिकारात त्याला पार्टीच्या पॉलिटब्यूरोत सामावून घेतो; एवढेच नव्हे तर त्याला मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदही देतो. आता सुरू होते ते शह-काटशहाचे राजकारण.

यात प्रथम चंद्रप्रतापांची हत्त्या होते. यात सूरजवर संशय घेतला जातो. वीरेंद्रप्रतापचा उजवा हात झालेला सूरज त्याच्या बरोबर अध्यक्षांना भेटून पृथ्वीला पार्टीतून निलंबित करायला भाग पाडतो. वडिलांच्या मृत्यूने नि भावाच्या हकालपट्टीने चिडलेला समर आता सारी सूत्रे आपल्या हातात घेतो. इथून पुढे राजकारणाच्या नि हिंसेच्या सारीपाटावर समर विरूद्ध सूरज असा डाव रंगतो.

अर्थात हा हिंदी चित्रपट असल्याने प्रेमपात्र हवेच. पण इथे मात्र जरा परिस्थिती नेहमीपेक्षा वेगळी आहे बर्का. ‘आऽऽऽणि ते सुखाने नांदू लागले’ वगैरे प्रकार नाही. आपल्या कत्रिनाची समरवर ‘बचपन की प्रीत’ असते. पण तो फारिन रिटर्नड असल्याने आधीच एका गोर्‍या पोरीच्या प्रेमात असतो. पण तरीही, पृथ्वीप्रताप नि वीरेंद्रप्रताप यांच्या लढ्यात पृथ्वीच्या नव्या पार्टीला पैसा उभा करून देण्यासाठी, तो बक्कळ पैका असलेल्या तिच्या बापाकडे कत्रिनाला मागणी घालतो.

आता तिचा बाप पण लै बेरकी. आम्रिकेत राहणार्‍या समरचा सासरा होऊन त्याला काय फायदा? त्या ऐवजी नव्या उगवत्या पक्षाचा नेता असलेल्या पृथ्वीलाच तो जावई म्हणून पसंती देतो. सुटका झाल्याच्या भावनेने म्हणा किंवा पैसा हवाच या अपरिहार्यतेने म्हणा, समर नि त्याचे कुटुंबिय देखील याला मान्यता देतात. यानंतरच्या राजकीय लढाईत पृथ्वी आणि समरची गोरी प्रेयसी (जिने ‘मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ’ हे जगप्रसिद्ध वाक्य – अर्थात इंग्रजीत – त्याला आधीच ऐकवलेले असते) बळी पडते.

आता सहनशक्ती संपलेला मामा पिस्तुल घेऊन सूरजला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरतो. तो बाहेर पडतो तो एका गुपिताचा उलगडा होऊन. सूरज हा समरच्या आईचाच कुंवारपणीचा पुत्र असतो. त्याने स्वत:च त्या पुत्राला आईपासून दूर केलेले असते. परत येऊन आपल्या बहिणीला तो ही गोष्ट सांगतो. पुढचा संघर्ष थांबवावा म्हणून ती सूरजकडे जाते (तिचा भाऊच तिला तिकडे घेऊन जातो) त्याला वस्तुस्थिती सांगते नि आपल्या घरी येण्याचे आवाहन करते. पण तो सांगतो, ‘माझ्या निष्ठा फक्त वीरेंद्रप्रतापशी आहेत त्या तशाच राहतील.’

आता आमच्या टक्कुर्‍यात प्रकाश पडला. अहो हे आपले ओळखीचे आहे की. कर्ण नि कुंतीचा संवाद आठवतो का? तिथे तू माझा पुत्र आहेस, आपल्या घरी ये असे आवाहन करणार्‍या कुंतीला माझ्या निष्ठा दुर्योधनाशीच राहतील असे बजावणारा कर्ण आठवला. मग सगळे बयाजवार समजले. पण ही कुंती त्या ‘पृथा’ कुंतीच्या अगदी विपरीत, अगदी आपल्या मुलांचीच मुलगी शोभावी इतकी लहानखुरी आहे.

KrishnaOrKauns

आता कर्ण/कुंतीची भेट घडवणारा मामारूपी कृष्ण आहे इथे. तो शकुनिमामा नाही, इथे कारण तो गांधारीऐवजी कुंतीचा भाऊ आहे. बघा ना पृथ्वी-समरच्या सगळ्या राजकीय लढाईत पडद्याआडचा सूत्रधार तोच तर आहे, कृष्णच तो!

कत्रिनाचा बाप हा जणू आपल्या जावयाला युद्धाची रसद/सैन्य पुरवणार्‍या द्रुपदासारखा, इथे तो पार्टीला आवश्यक तो पैसा पुरवतो आहे इतकेच. अरेच्या मजा आहे की.

चला आता एकदम उगमाकडे जाऊ या. सुरवात कुठे आहे पहा. मूळची गादी – म्हणजे अध्यक्षपद – एकाची, पण तो – आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे – पांगळा झाल्याने नि त्याच्या धाकट्या भावाकडे – चंद्रप्रताप = पंडु – येते. त्याच्या आधारे त्याची मुले त्या गादीवर हक्क सांगू लागतात. अर्थात मूळ अध्यक्षाचा मुलगा त्यांना आपल्या राज्यातून – पक्षातून – हाकलून लावतो. ते पुढे द्रुपदाच्या (कत्रिनाचा बा) मदतीने स्वत:चे इंद्रप्रस्थ – जनशक्ती मोर्चा नावाचा पक्ष – स्थापन करतात. दुर्योधन ऊर्फ वीरेंद्रप्रताप सूतपुत्र – आपलं हे दलितनेता – कर्ण ऊर्फ सूरज याला अंगदेशचा राजा – मागासवर्गीय सेलचा अध्यक्ष – करतो. सत्तेच्या सारीपाटावर या हस्तिनापूर (राष्ट्रवादी) नि इंद्रप्रस्थ (जनशक्ती) च्या नेत्यांचा संघर्ष सुरू होतो.

आता कलियुगात धनुक्श-बाणाचे युद्ध वगैरे काही नाही, मग बंदुका घेऊन मार्‍यामार्‍या होतात. (इलेक्शन वगैरे आहेच, पण त्याला कथेत काही फारसे महत्त्वही नाही. सारी राजनीती बंदुकीच्या नि कटकारस्थानांच्या आधारे चालू आहे.) इथे समर युक्तिने वीरेंद्रला एका बंद पडलेल्या फॅक्टरीत यायला भाग पाडतो. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने चिडलेला वीरेंद्र एकटाच तिकडे जायला निघतो. हे समजताच सूरज त्याला फोन करून त्याने सांगतो की तो ही तिकडे येतोय नि तो तिथे पोचेपर्यंत वीरेंद्रने गाडीतून – जी बुलेटप्रूफ आहे– बाहेर पडू नये असा इशारा देतो. गांधारीने आपल्या नजरेने अजेय बनवलेला पण लज्जारक्षणापुरते घेतलेल्या पर्णवस्त्राने मांडी कमकुवत राहिलेला दुर्योधन आठवला का? आता पुढचा प्रसंग त्या संदर्भात पहा बघू, जमतंय का?

सूरज तिथे पोचतो, हुशारीने समरच्या पाठीमागे पोचतो. समरचे लक्षच नाही. पण तरीही सूरज समरवर गोळी झाडू शकत नाही. बिचारा कर्ण! आपल्या भावावर कसा गोळी झाडणार, नाही का? यानंतरच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्रला उचलून नेऊ पाहणार्‍या सूरजला समर नि मामा गाठतात. ‘मला वीरेनला हॉस्पिटलमधे नेऊ दे, मग तू म्हणशील तिथे येईन (तुझी गोळी झेलायला)’ सूरज त्याला सांगतो. इथे ‘रथचक्र उद्धरू दे’ म्हणणार कर्ण डोळ्यासमोर येतो का? आता मामा समरला प्रवचन देतात. आपल्या सुदैवाने पूर्ण गीता –आणि तो तुझा भाऊ आहे हे सत्य – न सांगता फक्त पूर्ण सत्ता मिळवणे हे ध्येय वगैरे थोडक्यात कृष्णनीती सांगतात. इकडे वीरेंद्रची मान कलंडते नि तिकडे समर सूरजला गोळी घालून संपवतो.

थांबा थांबा, इथे संपत नाही. पुढे समर पांगळ्या भानुप्रतापना व्हील-चेअरवरून आणताना दिसतो (आणि ‘मी हे मुद्दाम केलं नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ना?’ असे बिनडोक समर्थनही देतो.). शेवटी कृष्णाने घडवून आणलेली पांडवांची नि अंध धृतराष्ट्राची भेट आठवली का? पण इथला धृतराष्ट्र आंधळा नसून पांगळा असल्याने त्यांने खंजीर लपवून ठेवून भीमाला ठार मारण्याचा प्रयत्न करणे वगैरे सीन टाकता आलेला नाही इथे. चित्रपटाच्या बाकी घटनांशी आमचे देणे-घेणे नाही. आम्ही फक्त ‘राजनीती’तील महाभारत सांगू म्हटले होते ते सांगितले.

तर असे हे ‘कलयुग का महाभारत’. आता याला वाङ्मयचौर्य वगैरे म्हणू शकत नाही आपण. याचे पहिले कारण म्हणजे हिंदी चित्रपटाबाबत हे वेगळे सांगायची गरज नसते हे आणि ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ हे आपल्याला आधीच ठाऊक आहे हे दुसरे!

- oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. Seen 'Raavan', yes of Abhishek Bachhan.. I had watched these two movies one after another on my b'day! Amazing..Ramayan and Mahabharat...

    उत्तर द्याहटवा
  2. Hi Mandy....Chaan ahe as usual !
    Arrey I tried calling you from US 2-3 times..once you didn't pick up...and 2 times few days later you cut it...it was your night I think...
    My number is through a calling server and will come as '00585...' etc or something weird.. please pick the call.
    Also I don't remember your gmail id, I sent an email to your vichakshan@yahoo.co.in too, haven't you checked it? Do write to me asap at omkar.damle@gmail.com ....
    OD

    उत्तर द्याहटवा