मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

माझी ब्लॉगयात्रा - १ : माध्यमे

दोन वर्षांनंतर फेसबुकवर पुन्हा पाऊल ठेवल्यानंतर मी माझ्या ब्लॉग्सवरील काही लेखांच्या लिंक्स फेसबुकवर शेअर केल्या. दोन चार पोस्ट झाल्यावर, माझ्याइतक्याच उद्धट असलेल्या एका मित्राने विचारलं, ’शिळ्या कढीला का ऊत आणतो आहेस?’ तो असे विचारतो आहे, म्हणजे ’त्याने हे आधीच वाचले असावे का?’ असा प्रश्न माझ्या मनात उमटला. पण हा मित्र ’फक्त समोर येईल तेच वाचतो’ गटातला असल्याने हे शक्य नव्हते. मग हे ’कुठल्या अर्थाने शिळे?’ तर म्हणे, ’ब्लॉगवर आधीच छापले आहेस ना?’

गंमत आहे पाहा. लेखकाने एखादी कथा कादंबरी लिहिल्यानंतर किती काळाने ती आपण वाचतो? गेलाबाजार त्याचे पुस्तक छापून बाजारात आल्यावर, किती काळाने ते आणतो, वाचतो. आपल्या आधी इतर अनेकांनी त्याच्या प्रती नेऊन वाचलेले असते. पण ते लेखन शिळे आहे असे आपण म्हणत नाही. पण डिजिटल माध्यमात मात्र यांना रोज ताजे लेखन हवे. याचे कारण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसदृश समाज(?)माध्यमे! रोज गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज आले तरी ते शिळे नसतात, कारण ते वेगवेगळ्या फोटोंच्या पार्श्वभूमीवर असतात. पण सर्वस्वी अप्रासंगिक लेखनही यांच्या दृष्टीने शिळे होते, अशी गंमत आहे.

अदखलपात्र माध्यम

ब्लॉग हे बहुतेकांच्या दृष्टीने अदखलपात्र माध्यम आहे. माझ्या मित्रवर्तुळात तरी कुणी एखाद्या ब्लॉगपोस्टची चर्चा केलेली माझ्या स्मरणात नाही. यातील बरीच मंडळी रविवारच्या वृत्तपत्रांतील अगदी प्रासंगिक लेखांवरही चर्चा करतील, कधी टर उडवतील. अगदी कुठलीशी फेसबुक पोस्टही यांना चावायला चालेल. पण मग मेहनतीने केलेले लेखन, एखादा सुरेखसा अनुभव, गेलाबाजार अगदी छापील माध्यमांमध्ये येणारे ’मोले घातले लिहाया’ प्रकारचे चित्रपटांचे तथाकथित परीक्षणसुद्धा- ब्लॉगवर असले तर आम्ही वाचणार नाही. याचे कारण सुसूत्रपणे एका ठिकाणी काही वाचण्याइतकी एकाग्रता आता बहुतेकांकडे नाही.

अन्य पारंपरिक माध्यमे नि त्यातील व्यक्तिदेखील ब्लॉगकडे ’माध्यमांतील मागासवस्ती’ या नजरेने पाहतात. फेसबुकवरचे ’पोस्टमास्तर्स’वर हे नजर ठेवून असतात. अधेमध्ये त्यांच्याकडून लिहूनही घेतात. पण ब्लॉग... अहं, नाही जमत. उलट मध्यंतरी एका प्रथितयश वृत्तपत्रात ब्लॉगविश्वाची दखल घेण्याची मखलाशी करीत प्रत्यक्षात वेगवेगळ्या ब्लॉग्सची मनसोक्त टर उडवणारे एक सदर सुरू झाले होते.

एखाद्या पुस्तकाचे प्रकरण, प्रस्तावना सहजपणे पुनर्मुद्रित करणारे (ही दोन्हीही मुद्रण-माध्यमे!) ब्लॉगवरील लेख मात्र ’आधीच प्रकाशित झालेला असल्याने’ स्वीकारत नाहीत असा अनुभव आहे. म्हणजे एकाच वेळी त्याला गंभीर माध्यम मानायचे नाही आणि दुसरीकडे तिथे आला म्हणजे तो आधीच प्रकाशित झाला असेही मानायचे, हा दुटप्पीपणा मजेशीर आहे.

याला एक अपवाद मात्र नोंदवून ठेवला पाहिजे. ’एबीपी माझा’ ही वाहिनी मात्र ’ब्लॉग माझा’ या स्पर्धेचे आयोजन करुन दरवर्षी काही ब्लॉगर्सना नावाजत असते. पण हा अपवाद.

वाचक म्हणे आम्हां कागदची हवा

वाचकांच्या बाजूने पाहिले तर पाडगांवकरांच्या ’ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं’च्या चालीवर, "पांढर्‍या पांढर्‍या कागदावर असतं जर छापलं, तर तुमचं लेखन असतं आम्ही वाचलं" असं बरीच मंडळी म्हणत असतात.

Reading Newspaper
www.toppr.org येथून साभार

त्यातही पुन्हा जातिव्यवस्था आहे. लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स हे वृत्तपत्र-वाचकांमध्ये स्वत:ला उच्चभ्रू समजणार्‍यांचे पेपर आहेत. ही दोन वृत्तपत्रे मुंबईची म्हणून विभाग-सेक्युलर आणि व्यापक वितरण असलेली. इतर पेपर सामान्य (’धूमधडाका’मधील अशोक सराफप्रमाणे ’अतिऽ-सामान्य’ असे हे उच्चभ्रू लेखक-वाचक म्हणत असावेत असा मला दाट संशय आहे.) मानले जातात. ’ईऽऽऽ, सकाळमधला लेख कसला रेकमेंड करतोस तू’ अशी प्रतिक्रिया मला एका स्वयंघोषित उच्चभ्रू वाचकाने दिली होती. थोडक्यात लेख कसाही असो, वृत्तपत्र मोठे हवे. पुस्तकातला मजकूर कसाही असो, मुखपृष्ठ नि बांधणी आकर्षक हवी, म्हणजे ते दिवाणखान्यातील मांडणीवर साजरे दिसते असा आमचा बाणा आहे.

वरची दोन वृत्तपत्रे वगळून बाकीची अन्य वृत्तपत्रे अन्य एकेका शहरांतून उभी राहिलेली असल्याने त्यात गाव-बांधिलकीचा जातीयवाद असतो. कोल्हापूरचा मित्र पुण्यात अनेक दशके राहात असला, तरी पुढारीच घेणार आणि पुणेकर रोजगाराच्या निमित्ताने नाशिकला गेला, तरी त्याची सकाळ 'सकाळ'नेच उजाडणार असते.

’चला एकदाचं छापूच या’ असा निर्धार करुन तुमच्या लेखनासह तुम्ही एखाद्या वृत्तपत्रापर्यंत पोहोचलातच तर दोन अडचणींना तोंड द्यावे लागते. वृत्तपत्रांबाबत एक मर्यादा असते ती संपादकाच्या कात्रीची! ही कात्री व्यवस्थित फिरली तर लेखाचे सोने होते, नाही तर त्याचे पार भरीतही होऊ शकते.

अलिकडेच एका प्रथितयश वृत्तपत्राला मी शब्दमर्यादेतील संपादित लेखाऐवजी सर्व आनुषंगिक मुद्द्यांसह लिहिलेला मूळ मोठा लेखच चुकून पाठवला होता. पुरवणी संपादकाने त्यावर सुरेख संस्करण करुन शब्दमर्यादेत बसवल्याचा सुखद अनुभव आला होता. मी स्वत:देखील इतका शिस्तशीर लिहिला नसता, हे मी ताबडतोब कबूल करून टाकले. अन्य एका लेखामध्ये पुरवणी संपादकाने घातलेली भर मला एकदम पसंत पडली होती.

पण दुसरीकडे डिजिटल माध्यमांच्या रेट्यामुळे वृत्तपत्रांवर आर्थिक दबाव येऊ लागल्यापासून उपसंपादकांपासून पाने लावणार्‍यापर्यंत सर्वांचीच कामे अनेक पट वाढवून पटसंख्या कमी केली गेली. (नफ्याचे आकडे घटू लागले आधी ’वेज बिल’ कमी करा हा भांडवलशाहीचा मूलमंत्र आहे. त्यात गुणवत्तेची वाट लागली तरी चालते.) यातून एकदा उपसंपादकाने महत्वाच्या मजकुराची केलेली चौकट, पान लावणार्‍याने जाहिरातीसाठी उडवून टाकल्याचा अनुभव माझ्या मित्राला आला. त्यातून ’इतका महत्वाचा मुद्दा कसा नाही?’ अशी पृच्छा करणारे मेसेजेस त्याला आले होते. अन्य एका मित्राचा लेख तर इतका संपादित केला गेला, की त्यातून त्याला अभिप्रेत होता त्याहून नेमका उलट सूर निघत होता.

या संपादकांच्याही डोक्यावर बसलेले असतात ते वृत्तपत्र मालक. यांचा राजकारणी व उद्योगपतींशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असतो. त्यामुळे या मालकांच्या मालकांच्या हिताआड येईल असे लेखनही त्या वृत्तपत्रांत येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मुखपत्रात त्या पक्षावर टीका करणारा मजकूर लिहिता येणार नाही अशी स्पष्ट कल्पना लेखकाकडून लेखन मागवतानाच दिली जाते असे ऐकून आहे.

थोडक्यात संपादनाचा लेखकाला फायदाही होतो नि तोटाही. पण ब्लॉगसारख्या माध्यमात ’तूच आहेस तुझ्या लेखनाचा संपादक’ हा मूलमंत्र असल्याने लेखन, मांडणी आणि संपादन सर्वच आपल्या हातात असते. याशिवाय वृत्तपत्रीय लेखनाला असलेली शब्दसंख्येची मर्यादाही नसते ! सामान्यपणे मी विषय समोर ठेवून सर्व आनुषंगिक मुद्दे व्यवस्थित लिहून काढतो. अर्थातच हा लेख मोठा होतो. त्यानंतर त्याला आवश्यक त्या मर्यादेत बसवण्यासाठी काटछाट करतो. त्यातून अनेकदा सुरुवातीला छान गोळीबंद झालेला लेख एखाद्या लक्तरासारखा लाचार दिसू लागतो.

पण अनेक सराईत लेखक थेट त्या शब्दमर्यादेतच लिहू शकतात, म्हणे. पण मग त्यात पुराव्याखेरीज थेट विधाने करणे अपरिहार्य ठरते. मला स्वत:ला उदाहरणे, संदर्भ, अनुभवाची जोड निदान स्पष्टीकरण याशिवाय ठोस विधाने करणारे लेखन आवडत नाही. वृत्तपत्रांत तर नाहीच नाही. कारण ते चालवून घेतले की प्रॉपगंडाचा प्रवाह मोकाट सुटतो. मग कुणी ’कुणालाच ठाऊक नसलेल्या’ भेटीचा वा अनुपलब्ध पुस्तकांचा हवाला देत स्वत:च्या सोयीच्या नवनव्या इतिहासाची रुजवणूक करतात. प्रतिवादाची फारशी भीती नसल्याने, बरीच मंडळी बेफाम विधाने करत सुटतात.

बहुतेक डिजिटल माध्यमांत प्रतिसादांची सोय असल्याने निदान प्रत्यारोपाला सामोर जावे लागते. पण तिथे प्रतिसादक दुसरे टोक गाठून निरर्गल ट्रोलिंगचा अथवा शाब्दिक छळाचा सामना करावा लागतो. ब्लॉगमध्ये यांचेही नियंत्रण करता येत असल्याने लेखकाला ट्रोलिंगपासून वाचता येते. पण कोणत्याही सोयीचा गैरफायदा घेता येतोच. प्रतिसादांचे नियंत्रण हाती असल्याचा गैरफायदा घेऊन लेखकच विरोधी बाजूंचे प्रतिवाद दाबून टाकू शकतो.

वृत्तपत्रांत क्वचित वाचकांची पत्रे येतात. पण मूळ लेख आणि ती एकाच अंकात नसल्याने त्यांकडे सहज दुर्लक्ष करता येते. शिवाय कालचा लेख आज शिळा होऊन गेलेला असतो. लोक आता आजच्या लेखांकडे वळलेले असतात, त्यांच्या व्हॉट्स-अ‍ॅपवर नवे फॉरवर्ड्स आलेले असतात, फेसबुकवर कालची भांडणे संपून नवे संघर्ष सुरू झालेले असतात. यात कालच्या लेखावरचा प्रतिवाद वाचण्यात फार कुणाला रस उरलेला नसतो.

त्यापलिकडे मनोरंजनासाठी व्हॉट्स-अ‍ॅपवर आलेला एखादा ’आपका खून खौल उठेगा’ पातळीवरचा ’लेख’(?) किंवा व्हायरल झालेला दोन शेपटांच्या उंदराचा व्हिडिओपर्यंत काहीही असतेच. मला पुलंच्या ’वार्‍यावरची वरात’मधला तो तपकिरीचा फिरता विक्रेता राहून राहून आठवतो, ’आम्हाला काऽय, सस्त्यात मजाऽ पाहिजे बुवा’ म्हणणारा. उगा डोक्याला ताप कोण करून घेईल ना. इथे आधीच मोदींपासून पुतीनपर्यंत किती लोकांच्या भवितव्याचा विचार करायचा असतो, फेसबुकवर इतरांच्या चुका काढायच्या असतात, कोणाला तरी ’घ्यायचा’ असतो. त्यात आणि ही भर कशाला, नाही का?

मराठी ब्लॉगविश्वाची वाटचाल

सुरुवातीच्या काळात ब्लॉगला ’डायरी’साठी योजला जाणारा प्रतिशब्द ’दैनंदिनी’च्या धर्तीवर कुणी महाभागाने ’अनुदिनी’ असा शब्द वापरला आणि तो रूढ झाला. पण त्यातून ब्लॉग हे काहीतरी ’आपले, आपल्यापुरते, आपणच केलेले लेखन’ असा चुकीचा समज रूढ होऊ लागला. वास्तविक इंग्रजीमध्ये व्यावसायिक मंडळींचे ब्लॉग असतात, तसेच व्यावसायिक ब्लॉगरही! अनेक प्रथितयश वृत्तपत्रांच्या डिजिटल अवतारामध्ये त्यांचे लेखक कर्मचारी आप-आपले ब्लॉग लिहित असतात. अनेक इंग्रजी ब्लॉगर्सचे लेखन हे वृत्तपत्रीय लेखनांहून अव्वल दर्जाचे असते. वर नमूद केलेली बंधने त्यावर नसतात हे त्याचे कारण आहे.

हे माध्यम सापडलेल्या काही मंडळींनी प्रथम एकमेकांच्या ब्लॉगला वाचून प्रतिसाद देणे सुरु केले. साहित्यक्षेत्रात एकमेकाची पुस्तके-विशेषत: कवितासंग्रह- विकत घेऊन त्याची भलामण करत ’अवघे धरू लेखनपंथ’ प्रकार चालतो, त्याचा हा डिजिटल अवतार म्हणता येईल. पण ब्लॉग हे स्वतंत्र संस्थळ (वेबसाईट) असल्याने रोज किती ब्लॉग्समध्ये डोकावून पाहावे याला मर्यादा आहेत. त्यातून मग गुगल (पूर्वी geocities.com) ब्लॉगर(blogger, आता गुगलच्या कुटुंबात) यांनी सबस्क्राईब हा पर्याय देऊ केला. एखादा ब्लॉग मला वाचायचा असेल, तर त्यावर दिलेल्या एका खिडकीमध्ये/विजेटमध्ये माझा ईमेल पत्ता देऊन मी सबस्क्राईब करायचे. पुढे केव्हाही त्यावर नवे लेखन आले, की त्याची सूचना मला ईमेलद्वारे मिळते. आता तिथे पुन्हा पुन्हा डोकावत बसण्याची कटकट वाचली.

MarathiBloggers

एक पाऊल आणखी पुढे जात काही जणांनी एकच का, अनेक ब्लॉग्सबद्दल सूचना एकाच जागी मिळावी म्हणून संग्राहक (aggregators) तयार केले. त्यातले एक-दोन पुन्हा ब्लॉगच आहेत. (हे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे शेअर्स पुन्हा त्यावरच खरेदी-विक्रीला आल्यासारखे झाले. :) ) आता वाचकाने नव्हे, तर लेखकाने आपले ब्लॉग्स तिथे नोंदवायचे. म्हणजे जेव्हा अशा एखाद्या ब्लॉगवर नवे लेखन येईल, तेव्हा हा संकलक त्या नव्या लेखनाच्या शीर्षकाचा- थोड्या मजकुरासह- आपल्या सूचीमध्ये समावेश करतो. आता वाचकाला प्रत्येक ब्लॉगवर न डोकावता, वेगवेगळे ब्लॉग सबस्क्राईब करत न बसता, फक्त या संग्राहकावर नजर ठेवली की पुरते. पुढे आणखी काही साधनांसह हे लेखन थेट फेसबुक, पिंटरेस्ट (Pinterest), अ‍ॅकेडेमिआ(Academia) वगैरे ठिकाणी आपोआप संकलित केले जातील अशी सोय झाली.

इतके सगळे नेपथ्य मिळाल्यावर खरेतर ब्लॉग हे माध्यम म्हणून स्थिरावण्यास हरकत नव्हती. पण तसे झालेले दिसत नाही. थोडे दीर्घ लिहू शकणार्‍या नि इच्छिणार्‍यांचा प्राधान्यक्रम वृत्तपत्र, छापील नियतकालिके/ दिवाळी अंक, डिजिटल वृत्तपत्रे/ वेबसाईट्स/ पोर्टल्स, मग फेसबुक आणि सर्वात शेवटी ब्लॉग असा उतरत्या क्रमाने जातो आहे. अनेकांच्या दृष्टीने ब्लॉग हा केवळ एक बॅक-अप आहे. इतरत्र आलेले लेखन केवळ साठवून ठेवणारा.

निळू दामले यांच्यासारख्या काही अभ्यासक/पत्रकारांनी ब्लॉगला आपलेसे केले आहे. नुसते वाचतानाच आम्हाला धाप लागते, इतके लिहून, छापून अजिबात न दमलेल्या संजय सोनवणींचा ब्लॉगही सतत अपडेट होत असतो. पण असे काही मोजकेच. याचे कारण त्याची पुरी ताकद आजही बहुतेकांच्या ध्यानात येत नाही, ती पुरी वापरलीही जात नाही.

फेसबुक नोट्स

फेसबुकवर पोस्ट्स, फोटो यांच्या सोबतीला पूर्वी नोट्स नावाचा प्रकार होता. त्यात दीर्घ लेखन करण्याची सोय होती. शिवाय त्याचे स्वत:चे वेगळे वर्गीकरण असल्याने, एखाद्याच्या नोट्स विभागात थेट प्रवेश करुन त्याचे केवळ दीर्घ लेखन वाचण्याची सोयही होती. फेसबुकच्या पल्ल्याचा विचार करता यातून फेसबुकला ब्लॉगर प्लॅटफॉर्म म्हणून लोकप्रिय होण्याची संधी होती.

पण त्याच सुमारास इन्स्टाग्रामचा उदय झाला आणि त्याची लोकप्रियता पाहून फेसबुकने बहुधा शब्द हे आता बाद माध्यम आहे, दीर्घ लेखन हे आता कालबाह्य झाले आहे असा निर्णय घेतला असावा. जेव्हापासून मी फेसबुकवर आहे तेव्हापासून, अगदी प्रथमपासूनच, फेसबुकच्या दृष्टीने नोट्स हे नावडते मूल होते. डावीकडच्या स्तंभात तुम्हाला फोटो, व्हिडिओ, चित्रपट यांची यादी देता येत असे, पण नोट्सना या ओसरीवर येण्याची परवानगी नव्हती. वर्षाखेरीस फेसबुक तुमचा ’Your year on Facebook’ नावाचा व्हिडिओ तयार करते. त्यात नोट्स तर सोडाच पण पोस्ट्सनाही स्थान नसते. केवळ फोटोंचा स्लाईड-शो बनवला जातो. जणू गेल्या वर्षांतील तुमचे विचार, ते व्यक्त करणारे शब्द हे सरत्या वर्षातील तुमच्या वाटचालीचा भागच नाहीत.

व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक यांनी स्वत:च्या व्यावसायिक हितासाठी ’शब्दांतून नीट व्यक्त होता येत नाही, चित्र/व्हिडिओतून अधिक नेमके समजते’ असा प्रचार करुन सामान्यांच्या समजुतीचा बळी घेतला. त्यातच ’जे दिसते ते खरे असते’ असा गैरसमज अधिक घट्ट झाला. ’शब्दांचा, मुद्द्यांचा प्रतिवाद करता येतो, चित्र वा व्हिडिओच्या दृश्य बाजूवर तसे करता येत नाही, किंवा केला तरी शब्दांच्या तुलनेत त्याची मूळ दाव्याशी नीट सांगड बसत नाही.’ हे लक्षात आल्यावर व्हिडिओ नि फोटोंच्या माध्यमातून प्रॉपगंडा मशीनरी बोकाळली.

अखेर ज्याचा उत्तम व्यावसायिक वापर करणे शक्य होते, त्या 'नोट्स'चा गळा फेसबुकने स्वत:च्या हाताने आवळला. २०१२ पासून तिला माघार घ्यायला लावली आणि २०२० मध्ये तिचा अंत्यसंस्कार केला.

(क्रमश:)

पुढील भाग >> माझी ब्लॉगयात्रा - २ : माझी वाटचाल


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा