मंगळवार, ३ मे, २०११

'रोश विरुद्ध अॅडम्स'च्या निमित्ताने - ३: रोशची कार्यपद्धती

<< मागील भाग: रोश आणि अ‍ॅडम्स

  • रोश त्यावेळी सर्व आवश्यक जीवनसत्त्वांचे उत्पादन करत असे. अशी उत्पादने बनवणार्‍या अन्य कंपन्यांना रोशने आपली उत्पादने घाऊक भावात कमी किंमतीने देऊ करून आपले कारखाने बंद करावेत यासाठी राजी करत असे. अर्थात यात एका बाजूने त्या उत्पादकाचा प्रत्यक्ष फायदा ही लालूच, नपेक्षा त्याच्या ग्राहकांना त्याच्या घाऊक खरेदी किंमती इतकीच किरकोळ विक्रीची किंमत देऊ करण्याची अप्रत्यक्ष धमकी असे दुहेरी शस्त्र वापरले जाई. अॅडम्सच्या कारकीर्दीतच किमान पाच प्रमुख उद्योगांनी आपले कारखाने बंद करून आवश्यक ती जीवनसत्त्वे रोशकडून घ्यायला सुरवात केली.

    याच दुहेरी अस्त्राचा वापर करूनच अमेरिकेत बड्या मॉल कंपन्यांनी स्थानिक ‘अंकल-आंटी शॉप्स’चा बळी कसा घेतला याचे विवेचन अनिल अवचट यांच्या ‘अमेरिका’ या पुस्तकात आले आहे. याच भवितव्याच्या भयाने उत्तर भारतात रिटेल चेन आउटलेट्सना विरोध करून ती बंद पडण्यात आली.

    शीतपेयांच्या पेप्सी नि कोकाकोला या दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारताबाहेर घालवणार्‍या जॉर्ज फर्नांडिस यांना प्रगतीविरोधी म्हणून लाखोली वाहण्यात आली. नंतर आलेल्या सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा झेंडा खांद्यावर घेऊन या दोन कंपन्यांना दारे खुली केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ सर्वच भारतीय शीतपेयांच्या कंपन्यांचा घास घेतला हा अगदी ताजा इतिहास आहे. (अर्थात ही नाण्याची केवळ एक बाजू आहे हे ही खरेच आहे.)

  • ज्यांना वरील पहिल्या प्रकारे वठणीवर आणता येत नसे, त्यांच्यासाठी रोशचा दुसरा फास तयार होताच. जीवनसत्त्वे नि रसायने बनविणार्‍या सर्व प्रमुख उत्पादकांना एकत्र आणून एक सर्वमान्य किंमत निश्चित करून घेता यावी (collusion and price fixing) यासाठी रोशच्या मुख्यालयाच्या ठिकाणी रोशतर्फे अशा उत्पादकांच्या कॉन्फरन्सेस आयोजित केल्या जात. वरवर पाहता यात ‘किंमतीत तफावत राहू नये, जेणेकरून रोशसारख्या मोठ्या कंपन्यांनी किंमत कमी ठेवून अन्य उत्पादकांना अनाठायी स्पर्धेत लोटू नये व त्यांचे खच्चीकरण करू नये’ असा उदात्त हेतू असावा असे वाटते. पण ग्यानबाची मेख अशी होती, की जर एखाद्या अन्य - स्थानिक वा छोट्या - उत्पादकाचे नि रोशचे उत्पादन एकाच किंमतीला मिळत असेल, तर साहजिकच ब्रँड-नेम असलेल्या रोशच्या उत्पादनालाच ग्राहक अधिक पसंती देत. अर्थात हे तर्कशास्त्र ग्राहकांपर्यंत पोचवण्याची रोश व्यवस्थित काळजी घेई हे वेगळे सांगायची गरज नाही.

    अशा तर्‍हेने एकाधिकारशाही (Monopoly) नि एकाधिकारशाही मोडून काढण्याचे उपाय या दोन्ही मार्गाने रोश स्वत:च्या फायद्याचे तेच घडवून आणत असे.

  • देशोदेशी शाखा असलेल्या रोशला विविध देशातून येऊ शकणार्‍या मागणीचा वेध घेण्याचे, अंदाज बांधण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले होते. एकदा हा अंदाज उपलब्ध झाला कि उत्पादन त्या दृष्टीने वाढवण्याऐवजी उत्पादन त्या मागणीहून कमी ठेवले जाई. यासाठी काही कारखाने बंद ठेवावे लागले तरी पर्वा केली जात नसे.

    एखाद्या आणिबाणीच्या क्षणी उत्पादन वाढवण्याऐवजी कमी करून किंमती भरमसाठ वाढवल्या जात. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे भारतात इन्फ्लुएंझाची साथ आली असताना आवश्यक औषधांचे उत्पादन कमी करून रोशने त्याच्या वाढलेल्या किंमतीचा फायदा घेऊन प्रचंड नफा कमावला होता.

    स्वतः बराच काळ लॅटिन अमेरिकेतील गरीब देशात काढलेल्या अॅडम्सला तेथील जीवनसत्त्वांच्या अभावी नि:सत्त्व झालेले जीव दिसत होते. तर दुसरीकडे त्यांच्या मूळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न न करता, त्यांना जीवनसत्त्वे देणारी औषधे विकून आपले उखळ पांढरे करून घेणारी व्यवस्था दिसत होती. अॅडम्स म्हणतो ‘या उद्योगधंद्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान अशा कुणी तरी या सार्‍या (अनैतिकता बोकाळलेल्या) स्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे होते.’

    अशी कोणतीही यंत्रणा स्वित्झर्लंडमधे अस्तित्वात नव्हती, आजही नाही. परंतु यानंतर बाजारपेठ व्यापक करण्याच्या दृष्टीने १९७२ च्या डिसेंबर महिन्यात रोशने 'युरपिअन इकनॉमिक कमिटी (ई.सी.सी.) बरोबर खुल्या व्यापाराचा करार केला नि अशी व्यवस्था अॅडम्सला उपलब्ध झाली.

  • रोशचा आणखी एक मास्टरस्ट्रोक म्हणजे तथाकथित ‘एकनिष्ठेचा करार’. अनेक बड्या ग्राहकांना पटवून हा करार त्यांच्या गळी उतरवण्यात आला होता.

    १. यानुसार त्या ग्राहकाला आपल्या गरजेच्या किमान नव्वद ते पंचाण्णव टक्के माल हा रोशकडून घ्यावा लागे. या बदल्यात ख्रिसमसच्या काळात रोशकडून त्यांना रोख स्वरूपात पाच ते दहा टक्के सूट देण्यात येई. अर्थात बिल पूर्ण रकमेचे देण्यात येत असल्याने एक प्रकारे काळा पैसा निर्माण करण्यास मदत होई.

    २. याशिवाय त्या ग्राहकाला अन्य उत्पादकाकडून रोशपेक्षा कमी दराचे कोटेशन मिळाल्यास तर त्याने ते रोशला कळवणे बंधनकारक होते. यानंतर ‘या दरात रोश मालाचा पुरवठा करणार का?’ हे रोशला विचारणे बंधनकारक होते. रोशने याबाबत निर्णय घेतल्याशिवाय त्या उत्पादकास ऑर्डर देण्यास मनाई होती. हे कलम अन्य उत्पादकांवर उघड अन्याय करणारे होते. एवढेच नव्हे तर एका अर्थाने आपल्या स्पर्धकांवर नजर ठेवणार्‍या या प्रोफेशनल हेरांचे जाळेच रोशला उपलब्ध झाले होते. त्यायोगे प्रतिस्पर्धी उत्पादनाची इत्थंभूत माहिती रोशला मिळे नि त्यावर उपाययोजना करण्यास पुरेसा वेळ नि आयती व्यवस्था मिळत असे.

    ३. रोश उत्पादन करीत असलेल्या एकाही उत्पादनाबाबत वरील अटींचा भंग झाल्यास ग्राहकाला वरील सूट मिळत नसे.

    ४. लेखी करार करण्यास अनुत्सुक ग्राहकांसाठी केवळ ‘परस्पर-सामंजस्य’ या पातळीवरही सदर करार वैध मानला जाई.

    ५. असा करार करणार्‍या ग्राहकांना रोशच्या उत्पादनाचा पुरवठा करण्यात नेहमीच अग्रक्रम दिला जाई. याचा एक अर्थ असा होता, की ज्यांनी करार केलेला नाही त्यांना तुटवड्याच्या काळात ज्या ग्राहकांनी करार केलेला नाही त्यांनी आधी मागणी नोंदवूनही मागाहून आलेल्या करारबद्ध ग्राहकाच्या मागणीमुळे आवश्यक माल मिळेलच याची शाश्वती नव्हती. ज्या लहान ग्राहकांना असा करार करणे शक्य नव्हते, त्यांना मूग गिळून बसण्यापलिकडे काहीच करता येत नसे. १९७१ साली जीवनसत्त्वाच्या आगामी तुटवड्याचा अंदाज घेऊन रोशने त्या कारणास्तव अनेक ग्राहकांना अशा करारात बांधून घातले होते.

  • जीवनसत्त्वांच्या उत्पादनात सुमारे ७५% वाटा हा मांसासाठी होणार्‍या पशुपालन व्यवसायात लागणार्‍या प्राण्यांच्या पोषकद्रव्यांचा होता. त्यामुळे मांसाची विक्री किंमत ही थेट या जीवनसत्त्वांच्या किंमतीवर अवलंबून होती. अमेरिका वगळून अन्य देशातील अशा जीवनसत्त्वांची विक्री वार्षिक सत्तर कोटी डॉलर्सहून अधिक होती. हा आकडा ७०च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे लक्षात घेतले तर ही बाजारपेठ किती प्रचंड मोठी होती हे लक्षात येईल. यात मोठा वाटा युरपचा होता. या प्रचंड बाजारपेठेत वरील उपायांचा परिणामकारण वापर केल्याने रोशला स्पर्धक जवळजवळ नव्हतेच.

अशा तर्‍हेने रोश हजार हातांनी आपला फायदा लाटत असताना याविरुद्ध कोणीच कसा आवाज उठवत नव्हतं असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. शासकीय यंत्रणा यात काहीच करू शकत नव्हत्या का असे प्रश्न पडतात.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला पाहिजे. तो म्हणजे रोश ही स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी होती. मुळात या देशाचे कायदे अतिशय लवचिक; शिवाय रोशचे अनेक राष्ट्रात अस्तित्व असल्याने न्यायपालिकेच्या ‘अधिकारक्षेत्राचा’ (Jurisdiction) महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित होत होता. याशिवाय असा आवाज उठवायचा कोणी (व्यक्ती की व्यवस्था) हा प्रश्न होताच.

स्विस कायदे कंपनीला अनुकूल असल्याने (याचा दाहक अनुभव स्वत: अॅडम्सला पुढे आलाच) स्विस सरकार या फंदात पडेल हे शक्यच नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा देशात आणणार्‍या कंपनीचा गळा सरकार धरू पाहील हे अशक्यच होते. (स्विस बॅंकात ठेवलेला आपल्या देशातील काळा पैसा परत आणण्याच्या मोहिमेला स्विस सरकार/बँका वाटाण्याच्या अक्षता लावतात ते याच कारणाने. उद्या हा सगळा पैसा भारताने परत आपल्या देशी नेला तर ते त्यांचे मोठे नुकसानच आहे. अशा स्थितीत ते अशा प्रयत्नांना सहकार्य करणार नाहीत हे उघड आहे.)

एखाद्या व्यक्तीने हे शिवधनुष्य उचलायचे तर त्याला कंपनी व्यवहाराची बारकाईने माहिती हवी. अशी व्यक्ती साहजिकच कंपनीच्या उच्च वर्तुळातील हवी नि बराच काळ स्वित्झर्लंडमधील मुख्यालयाशी संबंधित हवी. इथेच अॅडम्सला आपण काही करू शकू असा विश्वास वाटला. परंतु नुसते ठरवणे नि करणे यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. कारण अशा अवाढव्य कंपनीच्या गळ्याला नख लावताना त्यावर आधारित अन्य समस्यांचा विचारही करावा लागतो.

रोशचे मुख्यालय असलेली बाझल् नगरी ही संपूर्ण रोशमय झालेली होती. येथील नागरिक हे रोशचे पूर्ण पक्षपाती झालेले होते. याची एकाहुन अधिक कारणे होती. पहिले मह्त्त्वाचे कारण म्हणजे येथील नागरिकांची ही कंपनी मुख्य आश्रयदाती होती. यामुळे अन्नदात्याविरुद्ध त्यांचा पाठिंबा इतर कोणाला - मग भले तो भ्रष्टाचाराविरोधात का असेना - मिळेत हे बिलकुल संभवत नव्हते. 

आपल्याकडेही आपण ‘कर्मचार्‍यांची संभाव्य बेकारी’ ही ढाल पुढे करून अनेक बेकायदेशीर उद्योग कायदेशीर होतात. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून अमाप पैसा करणारे ‘पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना करायला पैसा नसल्याचे’ सांगून हात वर करतात; कारवाईची शक्यता दिसताच उद्योग बंद करून कर्मचार्‍यांना बेरोजगार करण्याची धमकी देतात. साहजिकच कर्मचार्‍यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे जनमत कंपनीच्या बाजूने झुकते नि या दबावाचा वापर करून असे उद्योग कारवाईतून सूट मिळवतात नि उजळ माथ्याने पुन्हा तसेच धंदे चालू ठेवतात.

या मुख्य कारणाने नि अन्य काही दुय्यम कारणाने बाझल् नगरीचे सारे अर्थकारण नि जीवनमानच रोशने ताब्यात ठेवल्याने तेथे असणारा कोणीही तिच्याविरुद्ध ब्र देखील उच्चारू शकत नसे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील बंधने - जसे कुटुंबिय, सुखवस्तू आयुष्याची लागलेली चटक इ. - लक्षात घेता कोणी या फंदात कधी पडेल हे जवळजवळ अशक्य होते. अॅडम्स म्हणतो ‘मागे वळून पाहताना एका गोष्टीवरून मला मानवी स्वभावाची मोठी गंमत वाटते. या काळात मी स्वतःला असा प्रश्न कधीही विचारला नाही की एवढ्या लठ्ठ वेतनाला मी स्वतः लायक होतो का? ही एवढी वेतनाची पातळी योग्य होती का?’

रोशची ऐंशी टक्के उलाढाल ही फक्त दहा उत्पादनांवर अवलंबून होती. यातच त्या काळात परिसच समजली जाणारी अशी लिब्रियम आणि वॅलियम ही दोन ट्रँक्विलायजर्स (Tranquilizers) होती. नागरी नि धावपळीच्या जगण्यात ही औषधे अत्यावश्यक भाग होऊन बसली होती. त्यामुळे या दोन उत्पादनांवरच रोश अमाप पैसा कमवत होती. नेमक्या याच दोन औषधांवर सत्तरीच्या उत्तरार्धात गंडांतर आले...

-oOo-

या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.

१. रोश विरुद्ध अ‍ॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अ‍ॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.
२. Ethics (Book Review: Roche versus Adams) - Eike-Henner W. Kludge. In: Canadian Medical Association Journal, 1984, Vol. 130.
३. SWP 17/87 - Hoffman-La Roche v Stanley Adams - Corporate and Individual Ethics - Eric Newbigging

(पुढील भागातः )

   << पुढील भाग: मन:शांतीची औषधे नि खवळलेली रोश


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा