शनिवार, २८ जुलै, २०१८

नागरी टोळ्या आणि माणूस

वैयक्तिक पातळीवर काहीही दिवे लावता न येणारे लोक गल्ली, आळी, गाव, शहर, शाळा, कॉलेज, खरेदीसाठी निवडलेले एकमेव दुकान, गावात मिळणारे पदार्थ, ... आणि अर्थातच जात, धर्म आणि देश इत्यादि जन्मदत्त अथवा आपल्या कर्तृत्वाचा काडीचा वाटा नसलेल्या गोष्टींच्या अस्मितांचे तंबू उभारून, पार्ट्या पाडून खेळत बसतात.

मनुष्य जनावराच्या पातळीवरून टोळीच्या मानसिकतेत रूतलेला राहतो. त्यामुळे तो नागर झाला तरी सुसंस्कृत झाला आहे यावर माझा विश्वास नाही. टोळ्यांची व्याख्या बदललेली आहे इतकेच!

समोरच्याला एखाद्या गटाचा भाग म्हणूनच ओळखत, त्या गटाबद्दलचे आपले पूर्वग्रह त्याच्यावर लादतच आपण त्यांच्याशी आपली वर्तणूक कशी असावी हे ठरवतो. आपल्या पूर्वग्रहाला प्रतिकूल असे हजारो पुरावे त्याच्यासंदर्भात दिसून आले तरी ते सारे अपवाद म्हणून नाकारतो आणि आपल्या पूर्वग्रहाला अनुकूल असे हातभर वा बोटभर पुरावे दाखवून आपणच बरोबर असल्याचे स्वत:ला नि इतरांना पटवत राहतो. 

जमावाने ठार मारलेली व्यक्ती, एखादी बलात्कार झालेली अभागी स्त्री, अन्याय होऊनही न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळालेली दुर्दैवी व्यक्ती आपल्या गटाची नसेल तर बहुतेक वेळा आनंद, समाधान याच भावना दिसून येतात. तुमच्या गटातील उरलेले ती गोष्ट बिनमहत्वाची म्हणून दुर्लक्ष करतील फारतर. पण गटाबाहेरच्या व्यक्तीबाबत सहानुभूती असणारे दुर्मिळ. आणी असे दोन्ही गटांना नकोसे असतात, किंवा सोयीपुरते हवे असतात म्हणू. जरा आपल्या विरुद्ध मत दिले की 'छुपा तिकडचा की हो' म्हणून त्याच्या नावे घटश्राद्ध घालून मोकळे.

एखाद्याने असल्या मूर्ख जमावांचा भाग न होणे हे ही एकसाचीकरणाच्या काडेपेट्यांत राहू पाहणार्‍यांना रुचत नाही. मग सतत ते तुम्हाला या ना त्या डबीत बसवू पाहात असतात. स्वत: खुजे असतात. तुम्हीही खुजे राहावे अशी अपेक्षा ठेवतात... नव्हे स्वत:च न्यायाधीश होत तसे जाहीरही करतात.

आपला झाडू घेऊन ही अवाढव्य गटारगंगा स्वच्छ करणे अशक्य होते तेव्हा अशा जमावांतील व्यक्तींशी संवाद थांबवणे हा एकच शहाणपणाचा आणि मन:शांतीचा उपाय असू शकतो.

जमावाच्या पाठिंब्याविना यातून तुम्ही इतरांसाठी शिरोधार्य असे तत्वज्ञान वा विचार रुजवू शकणार नाही कदाचित, पण एक उदाहरण नक्की समोर ठेवता येईल.

गुरुवार, २६ जुलै, २०१८

गुगलची घुसखोरी...

मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक, Google contacts मध्ये भरून आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत. त्यांच्यासाठी हा अनुभव.

---

Warning

काही महिन्यांपूर्वी अमेजन फायर टीव्ही स्टिक आणली. अलीकडेच 'यंग शेल्डन' ही मालिका संपल्यामुळे 'अमेजन प्राईम व्हिडिओ'वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून 'सिटीजन खान' (इंटरनॅशनल चित्रपट पाहणार्‍यांना 'सिटीजन केन' हा प्रसिद्ध चित्रपट आठवत असेल.) या 'ब्रिटीश पाकिस्तान'च्या पार्श्वभूमीवरील मालिकेचा शोध लागला. एक एपिसोड मागील आठवड्यात पाहिला नि विसरून गेलो.

आज You-tubeची साईट ओपन केली तर 'शिफारस’मध्ये 'सिटीजन खान' मधील विनोदी प्रसंग!

तुम्ही म्हणाल यात काय विशेष. पण लक्षात घ्या, फायर स्टिक वापरताना तुम्हाला 'अमेजन'चे लॉगिन वापरायचे असते. त्याच्याशी गुगलचा काही संबंध नाही. शिवाय ही स्टिक थेट टीव्हीला जोडली जाते. कुठेही कम्प्युटरचा संबंध येत नाही.

अतिशहाणपणा करून त्यावर क्रोम ब्राऊजर ओपन करून एखाद्याने काही ब्राऊज केले तरी मी समजू शकतो. पण माझा क्रोमवर मुळीच विश्वास नसल्याने मी तो प्रकार अर्थातच टाळला होता. मग गुगल बाबाजींना माझे प्राईम'वरचे सिलेक्शन मिळाले कुठून?

मी You-tube वर कधीही कुठले विनोदी विडिओ पाहिलेले नाहीत किंवा तसे वीडिओ असणारे काही You-tube चॅनलही सब्स्क्राईब केलेले नाहीत. तिथे फक्त बुद्धिबळ, सायन्स फिक्शन, शास्त्रीय संगीत यांचीच चॅनल आहेत. आणि त्या बाहेर मी प्रामुख्याने nature videos पाहतो. म्हणजे ती You-tube वाटचालीच्या आधारे केलेली शिफारस असण्याचाही संभव नाही.

थोडा विचार करता असा पत्ता लागला, की ही स्टिक आणल्या आणल्या एकदा VLC अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी एकदा गुगल प्ले-स्टोअर ओपन केले होते! पण तेवढेच. म्हणजे गुगलचे कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल केलेले नाही, जेणेकरून ते इंस्टॉल करताना डेटा वाचण्याचे राईट्स घेतले असावेत असे म्हणता येईल. किंवा कुठे गुगल अकाऊंटचे लॉगिन देखील केलेले नाही. म्हणजे त्या एका Play Store कनेक्शनचा हा प्रताप. चक्क बेकायदेशीरपणे माझा अमेजन प्राईम डेटा अ‍ॅक्सेस करणे चालू आहे. वर निर्लज्जपणे त्या डेटावर आधारित You-tube वर शिफारस देणे चालू आहे.

हजारो वर्षांपूर्वी गुगलने ब्राऊजरसाठी प्रथम 'गुगल टूलबार' आणला होता. त्याच वेळी मी त्याला फायर-वॉल बायपास करून, थेट socket कनेक्शन लावून परस्पर इंटरनेट कनेक्ट करताना पकडला होता. तेव्हापासून गुगलवर माझा फारसा विश्वास नाही. क्रोमच्या सुरुवातीच्या versions नी तो अविश्वास अधिकच दृढ केला. आपले दुर्दैव हे की आता अ‍ॅपल वगळता सारेच मोबाईल गुगलच्या 'अ‍ॅंड्रॉईड'वर आहेत. आणि ती सात तळ्याची तांब्या पितळेची माडी आपल्याला परवडणारी नसल्याने (असभ्य भाषा वार्निंग) गुगल समोर पॅंट खोलून बसणे ही आपली अपरिहार्यता आहे.

Welcome to फुकट software regime.

- oOo -

गुरुवार, ५ जुलै, २०१८

...तेव्हा तुम्ही काय करता?एका देहाच्या कुडीत वास्तव्यास असणारी
विविधरंगी व्यक्तिमत्वे, तिच्यावर संपूर्ण
ताबा मिळवण्यासाठी झटू लागतात...
...तेव्हा तुम्ही काय करता?

त्या कुडीत वास्तव्यास असलेला तत्त्वज्ञ
व्यक्ती-समष्टीचे कोडे उलगडून सांगताना
मध्येच थकून झोपी जातो...
...तेव्हा तुम्ही काय करता?

त्या निद्रिस्त तत्त्वज्ञाची प्रतारणा करत
एखाद्या वारयोषितेसारखी तुमची प्रवृत्ती
तुमच्यातल्याच विदूषकाचा हात धरते...
...तेव्हा तुम्ही काय करता?

अजरामर अशा हॅम्लेटच्या भूमिकेऐवजी
तुमच्यातला नट, रंगमंचावरील निश्चल
ठोकळ्याची भूमिका स्वीकारू इच्छितो...
...तेव्हा तुम्ही काय करता?

तुमच्यातील सुरेल-सूर-मग्न संगीत-प्रेमी
षड्ज-पंचमांच्या आधार स्वरांना त्यागून
धर्मस्थळांतील गोंगाटाला शरण जातो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

सत्तेच्या खेळात निष्णात असलेला
तुमच्यातील राजकारणी, जेव्हा
’इदं न मम’ म्हणत संन्यस्त होतो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

मनात सदैव बागडत असलेला रोमिओ
आपल्या सद्गुण-सालंकृत सखीऐवजी
एखाद्या स्वार्थ-साधिकेवर लुब्ध होतो...
... तेव्हा तुम्ही काय करता?

देहा-मनाला आत्यंतिक क्षुब्ध करणार्‍या
प्रश्नावर, एखादा लेख लिहित असताना
कागदावर एखादी कविताच उमटते...
...तेव्हा तुम्ही काय करता?

- डॉ. मंदार काळे


- oOo -