मोबाईलवर आपल्या पासवर्डसची फाईल तयार करून ठेवणार एक महान सीए मला ठाऊक आहे. आपल्या नातेवाईकांचे, मित्रांचे वाढदिवस, कौटुंबिक नाती इत्यादि सारी माहिती हौसेने फेसबुक तसंच Google contacts मध्ये भरून आपल्या सोबत इतरांचाही बाजार उठवणारे महाभाग अनेक आहेत.
एवढं पुरेसं नाही म्हणून आपली शाळा, बँक, आता या क्षणी कुठे आहोत वगैरे कौतुकाने शेअर करुन आपल्या पायावर धोंडा मारून घेणारे तर वारूळातील मुंग्यांप्रमाणे अगणित आहेत. त्यांच्यासाठी हे दोन अनुभव.
---
गुगलची घुसखोरी :
काही महिन्यांपूर्वी ‘अमेजन फायर टीव्ही’ स्टिक आणली. अलीकडेच ‘यंग शेल्डन’ या मालिकेचा सीझन संपल्यामुळे तिच्या ऐवजी पाहण्यासाठी म्हणून ‘अमेजन प्राईम’वर एखाद्या विनोदी मालिकेचा शोध घेत होतो. त्यातून ‘सिटीजन खान’ (इंटरनॅशनल चित्रपट पाहणार्यांना ‘सिटीजन केन’ हा प्रसिद्ध चित्रपट आठवत असेल. त्या शीर्षकाचे हे विडंबन.) या इंग्लंडमधील ‘ब्रिटीश पाकिस्तान’ म्हटल्या जाणार्या वस्तीच्या पार्श्वभूमीवरील एका मालिकेचा शोध लागला. तिचा एक भाग मागील आठवड्यात पाहिला नि विसरून गेलो. आज You-tubeवर पोहोचलो तर ‘शिफारस’मध्ये ‘सिटीजन खान’ मधील विनोदी प्रसंग!
तुम्ही म्हणाल यात काय विशेष. पण लक्षात घ्या, फायर स्टिक वापरताना तुम्हाला ‘अमेजन’चे लॉगिन वापरायचे असते. त्याच्याशी गुगलचा– आणि पर्यायाने You-tubeचा काहीही संबंध नाही. शिवाय ही स्टिक थेट टीव्हीला जोडली जाते. कुठेही कम्प्युटरचा संबंध येत नाही. त्यामुळे त्यामार्फत फायर-स्टिकवरील डेटा वाचण्याची संधी गुगलला मिळण्याचा प्रश्न येत नाही.
गुगलच्या उत्पादनांची ख्याती पाहता एखाद्याने ‘फायर स्टिक’वर गुगलचा ‘क्रोम’ ब्राऊजर ओपन करून काही इंटरनेट मुशाफिरी केली असेल हे घडू शकेल हे मला ठाऊक आहे. क्रोमबाबा बेशरमपणे संपूर्ण डिव्हाईसवरील ‘वापराचा इतिहास’ (history) खेचून घेईल नि त्यातून मी ‘सिटिझन खान’चा एक भाग ‘अमेजन प्राईम’ अॅपमार्फत पाहिल्याची माहिती त्याला मिळू शकेल. पण माझा क्रोमवर मुळीच विश्वास नसल्याने मी तो वापरतच नाही. मग गुगल बाबाजींना माझे ‘प्राईम'वरचे सिलेक्शन मिळाले कुठून?
मी You-tube वर कधीही कुठले विनोदी विडिओ पाहिलेले नाहीत किंवा तसे वीडिओ असणारे काही You-tube चॅनलही सबस्क्राईब केलेले नाहीत. तिथे फक्त बुद्धिबळ, सायन्स फिक्शन, शास्त्रीय संगीत आणि कुकिंग यांचीच चॅनल आहेत. आणि त्या बाहेर मी प्रामुख्याने nature videos पाहतो. म्हणजे ती You-tube वाटचालीच्या आधारे केलेली शिफारस असण्याचाही संभव नाही.
थोडा विचार करता असा शोध लागला, की ही स्टिक आणल्या-आणल्या एकदा गाणी, व्हिडिओ वगैरे ऐकण्या/पाहण्यासाठी VLC हे मीडिया प्लेअर अॅप install करण्यासाठी एकदा गुगल प्ले-स्टोअर ओपन केले होते! पण तेवढेच. म्हणजे गुगलचे कोणतेही अॅप इंस्टॉल केलेले नाही वा वापरले नाही, जेणेकरून ते install करताना data वाचण्याचे अधिकार गुगलने घेतले असावेत असे म्हणता येईल. किंवा कुठे गुगल अकाऊंटचे लॉगिन देखील केलेले नाही. म्हणजे त्या एका Play Store कनेक्शनचा हा प्रताप. चक्क बेकायदेशीरपणे माझा अमेजन प्राईम data access करणे चालू आहे. वर निर्लज्जपणे त्या डेटावर आधारित You-tube वर शिफारस देणे चालू आहे.
हजारो वर्षांपूर्वी गुगलने ब्राऊजरसाठी प्रथम ‘गुगल टूलबार’ आणला होता. तेव्हा Internet Explorer नि Firefox हे दोनच प्रमुख ब्राउजर होते. बहुतेक संगणकावरील या दोन ब्राउजरमध्ये हा गुगल टूलबार समाविष्ट केलेला असे. या टूलबारमध्ये थेट एखादा शब्द वा शब्दसमूह टाईप करून गुगल-सर्च करता येणे हे ‘लै भारी आहे, नाही?’ समजण्याचे ते दिवस होते. आधी गुगल.कॉम टाईप करून मग त्या पेजवर सर्च टाईप करावा लागत नाही याचे अप्रूप असणार्यांनी कौतुकाने तो install केला होता. त्याचाच कोड/प्रोग्राम पुढे बेसिक ब्राउजर एंजिनमध्ये घालू क्रोम तयार झाला. या गुगल टूलबारला मी प्रथम बेकायदेशीर काम करताना पकडला नि माझा गुगलवरील विश्वास उडाला.
मी कायमच फायरवॉल वापरत असतो. काही वेळा एखादे सॉफ्टवेअर install करताना (विशेषत: विकत न घेतलेले ;) ) इंटरनेट बंद करणे सुरक्षित असते. अशा वेळी मी फायरवॉल मार्फत ते बंद करत असे. असेच एकदा मी ते बंद केले नि installation पुरे झाल्यावर चालू करण्याचे विसरून गेलो. ऑफिसचे आपले काम पुढे सुरु केले. अचानक गुगल टूलबारने ‘अपडेट अव्हेलेबल’ असल्याचा मेसेज झळकवला. आता इंटरनेट बंद असताना याने अपडेट चेक कसा केला असा प्रश्न मला पडला.
मी शोधाशोध सुरु केली तेव्हा असे लक्षात आले की या महाराजांनी स्वत:च फायरवॉलमध्ये आपल्यासाठी ‘अपवाद’ (exception) रेजिस्टर केले आहे. तो वापरत असलेले सॉकेट (संगणकाला जसे यूएसबीवरून आपण डिस्क जोडतो त्याचप्रमाणॆ विविध व्हर्च्युअल सॉकेटस असतात ज्यांच्या मार्फत विविध प्रकारची कनेक्शन्स जोडली जातात) कायमच इन्टरनेटसाठी खुले ठेवले होते. मी संगणकाला जोडलेली LAN केबल काढली असती तर माझ्या हे लक्षातही आले नसते. मी फायरवॉलचा वापर केलेला असल्याने याचा हा छुपा उद्योग माझ्या ध्यानात आला. याचा एक अर्थ असा होता की जोवर LAN केबल संगणकाला जोडलेली होती तोवर हे बाबाजी सुखेनैव इंटरनेट वापरू शकत होते. एखाद्या हॅकरला याने खुले ठेवलेले सॉकेट सापडले असते, तर त्याने माझ्या संगणकाची सहज वाट लावली असती. माझ्या या तर्काचे प्रत्यंतर मला लगेचच अनुभवायला मिळाले
हा शोध मला लागल्यावर मी कंपनीतील इतर मित्रांना - धोका समजावा म्हणून - सांगितला. त्यातला एक वीर थोर होता. त्याने याचा वापर करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. होते असे, की तेव्हा त्या मागास कंपनीमध्ये आम्हा सामान्य जनांना इंटरनेटचा वापर करण्यास मुभा नव्हती. फक्त मूठभर श्रेष्ठींनाच तो अधिकार होता. केवळ कोड /प्रोग्रामअपलोड करणे, एखाद्या क्लाएंटला ईमेल पाठवणे वगैरेसाठीच उपयोग करता येईल अशी तरतूद केलेली होती. या वीराने ते सॉकेट वापरून कोड/प्रोग्राम लिहिला नि इंटरनेट वापरायला सुरुवात केली. अर्थात आमच्या CTO कम System Administrator ला याच्या मशीनवरचे इंटरनेट ट्रॅफिक अचानक वाढलेले दिसले नि हा पकडला गेला. त्यानंतर कंपनीतील सर्व संगणकांवरून गुगल टूलबार काढून टाकण्यात आला.
तेव्हापासून गुगलवर माझा फारसा विश्वास नाही. क्रोमच्या सुरुवातीच्या versions नी तो अविश्वास अधिकच दृढ केला. आपले दुर्दैव हे की आता अॅपल वगळता सारेच मोबाईल गुगलच्या ‘अँड्रॉईड’वर आहेत. अॅपलची ती ‘सात तळ्याची तांब्या पितळेची माडी’ आपल्याला परवडणारी नसल्याने (असभ्य भाषा वार्निंग!) गुगल समोर पँट खोलून बसणे ही आपली अपरिहार्यता आहे. आकाशातील बापावर जशी श्रद्धा ठेवायची, तसेच या भूतलीच्या गुगलबाप्पावर ठेवायची असते आणि त्या देवबाप्पाबाबत जसे ‘नुकसान हे माझ्या या अथवा पूर्वजन्मीच्या पापाचे फळ ; तर लाभ हे मात्र त्याच्या कृपेने’ हे मान्य करतो तसेच यांच्या बाबतही असते.
Welcome to फुकट software regime.
फेसबुकचे गिर्यारोहण :
गुगलबाप्पापाठोपाठ दुसरा इलेक्ट्रॉनिक बाप्पा आहे तो फेसबुक. मी गेली सात ते आठ वर्षे फेसबुक वापरतो आहे. त्यावर अकाउंट तयार करताना अर्थातच गुगल/जीमेलप्रमाणेच ‘अग्रीमेंट’मधील अटी नि मुद्दे न वाचता ‘मान्य’चे (Accept) बटन दाबलेले. त्यातून फेसबुकने माझ्या अकाउंटशी नि त्यावरील वावराशी संबंधित काय काय माहितीवर अधिकार प्रस्थापित केला आहे याची मला काडीची माहिती नाही. त्याचबरोबर माझ्या या वापरा दरम्यान कोणत्या प्रकारचे धोके संभवतात नि त्यापासून होणार्या संभाव्य नुकसानीपासून फेसबुकने स्वत:ची शेपूट सोडवून घेतली आहे (indemnity) याचे भानही मला नाही.
तुम्ही फेसबुकवर आलात की तुम्ही जास्तीत जास्त काळ इथे व्यतीत करावा असा त्याचा प्रयत्न चालू होतो. प्रथम तो तुम्हाला आधीच फेसबुकवर असणारे नि कदाचित ‘तुमचं यांचं जमेल’ असं त्याला वाटते त्यांना मित्र करून घेण्याचे सल्ले देऊ लागतो. मग तो ग्रुप्स नि पेजेसबाबत हेच करु लागतो. इतकेच काय फेसबुकवर नसलेल्यांनाही ‘यांना बोलवा की’ म्हणून खुणावू लागतो. त्यासाठी उजवीकडच्या समासामध्ये ‘यांना आपले म्हणा’ (invite to Facebook) असा एक ऑप्शन असतो. यात पर्यायामध्ये दिसणार्या व्यक्ती वा प्रोफाईल पाहता झुक्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किती खोल घुसलाय याची प्रचीती येते.
आज त्याने मला एक याहू ईमेल आयडी दाखवून ‘याला बोलव’ असे सुचवले आहे. तो मेल आयडी वाचून मला दणकाच बसला. हा ईमेल आयडी माझ्या एका जुन्या स्विस मित्राचा. गेली दहा-पंधरा वर्षे माझा याचा वैय्यक्तिक वा संगणकामार्फत कुठलाही संपर्क नाही. याच्याबरोबर आमचा संबंध आला तो १९९९ ते २००२ या तीन वर्षांत, एका सॉफ्टवेअरसाठी विषय-तज्ज्ञ म्हणून त्याला जोडून घेण्यात आले होते. नंतर आमच्या भारतीय गलथान कामाला कंटाळून त्याने ते काम सोडले. पुढे वर्षभर तो संपर्कात होता. नंतर आम्ही सारे आपापल्या वाटेने गेलो. मी ती कंपनी सोडूनही आता पाचेक वर्षे झाली.
हा गडी एकदम राजा माणूस, आल्प्समधे पर्वतात राहणारा, स्वतःचे घर स्वहस्ते बांधून काढणारा, वर्षातून एक महिना भारतात येऊन केरळमधे वेदनाहारी उपचार केंद्र (palliative care center) मदत करणारा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किमान गरजा असणारा, माझ्या घरी येऊन चक्क बटाट्याची भाजी नि अळूची भाजी ओरपून खाणारा. माझ्याकडून भारतातील रागसंगीत समजावून घेऊ पाहणारा, मला काही निवडक पाश्चात्त्य संगीताच्या सीडीज देऊन या तुला आवडतील, नक्की ऐक म्हणून आग्रह धरणारा.
ज्या ईमेल आयडींमार्फत (कंपनीचा वा वैय्यक्तिक) त्याच्याशी माझा संपर्क होता ते माझा ईमेल आयडी आता अस्तित्वात नाहीत. आज मी वापरतो त्या ईमेल आयडीवरून मी त्याला तर सोडाच पण माझ्या त्यावेळी सहकारी असलेल्या मित्रांनाही फारच क्वचित इमेल केला असेल. आज माझ्या फेसबुक मित्रयादीतही त्या कंपनीतला केवळ एक मित्र आहे. थोडक्यात सांगायचे तर माझे फेसबुक प्रोफाईल किंवा ईमेल आयडीवरून झुक्याच्या अल्गोरिदमला या माणसाच्या मेल आयडी पर्यंत पोचणे अगदी माझ्यासारख्या गणित/संख्याशास्त्र-अल्गोरिदमवाल्या माणसालाही शक्यतेच्या पातळीवर वाटत नाही. एकच धागा त्याच्या पर्यंत नेऊन पोचवू शकेल, तो म्हणजे माझ्या त्या कंपनीचा उल्लेख इथे प्रोफाइलमधे आहे. पण त्या सुतावरून झुक्याने थेट आल्प्सवर चढाई केली आहे हे पाहून स्तिमित होण्यापलिकडे माझ्या हाती काही नाही.
कालपासून सतत मला या मेल आयडीच्या प्राण्याला ‘फेसबुकावर बोलाव’ अशी गळ झुकोबा मला घालतो आहे. झुक्या माझ्या आयुष्यात किती खोल डोकावून पाहतो आहे याचे हे निदर्शक आहे. हे एका बाजूने दाद देण्याजोगे आहे, तर दुसरीकडून आपणच आमंत्रित केलेल्या धोक्याची जाणीव करून देणारे आहे. अशा परिस्थितीत आपल्या जन्मदिवसापासून सार्या कुटुंबांची जंत्री जोडून देणारे; शिक्षण, बँक वगैरे तपशीलापासून पर्यटनापर्यंत सार्या तपशीलांची पोतडी स्वत:हून इथे खुली करणारे महाभाग किती मोठ्या धोक्याला आमंत्रण देत आहेत हे त्यांचे त्यांनी पाहावे.
- oOo -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा