गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ६ : रंगांचे कोडे

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

खेळ सावल्यांचा << मागील भाग

---

एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. ही वस्तू बिम्मने प्रथमच पाहिली. ते काय आहे नि त्याचा उपयोग काय असा प्रश्न चौकस बिम्मला पडला नसल्यासच नवल. तो एक पिंजरा आहे नि ते एका ’पिवळ्या’ पक्ष्याचे घर आहे.’ असे आईने त्याला सांगितले. मागच्या आवारात वा बागेत खेळताना त्याने अनेक पक्षी पाहिले होते, त्यामुळे त्याला पक्षी ठाऊक होते. पण आईने वापरलेला ’पिवळा’ हा शब्द, ही गोष्ट काय असावी असा प्रश्न त्याला पडला असेल. त्यातून वस्तू वा जीवमात्रांमध्ये दिसणारे रंग हे त्याच्या कुतूहलाच्या कक्षेत येऊ लागले असतील.

बिम्मच्या वयाचं मूल घरात रांगू लागतं, भिरभिर फिरु लागतं, घराबाहेर पाऊल टाकतं तेव्हा त्याला ते रंग दिसत असतात. तेव्हा रंग म्हणजे काय हे त्याला समजत नसले, तरी विविध गोष्टींचे वेगळेपण त्याच्या मनात नोंदले जात असेल. नीनमच्या- त्या पिवळ्या पक्ष्याच्या शोधात भटकताना बिम्मला वेगवेगळ्या रंगांचे पक्षी भेटले. त्यातून विविध रंगांची ओळख त्याला झाली. पण रंग हे काही फक्त पक्ष्यांनाच असतात असे नाही. आजूबाजूच्या सजीव-निर्जीव सर्वच गोष्टींना रंग असतात असे हळूहळू लक्षात येऊ लागते. ज्याप्रमाणे आईच्या बोलण्यात ’पिवळा’ हा शब्द पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणून आला, तसेच शर्ट, पिशवी, पडदे, उशीचे अभ्रे वगैरे गोष्टींच्या संदर्भात हिरवा, लाल, पांढरा, काळा वगैरे उल्लेख आले असतील.

CrowAndCuckoo
काक: कृष्ण: पिक: कृष्ण:

मग रंगाचे नाव नि वस्तू अथवा पक्ष्यांसारखे सजीव यांची सांगड बसू लागते. आतापावेतो तो रंग हीच पक्ष्याची ओळख असते. नीनम पिवळा होता, कोकीळ काळा होता, राघू हिरवा. ओळख सोपी होती. पण पुढच्या टप्प्यामध्ये ’कोकीळही काळा नि कावळाही काळा’ असे लक्षात येते. हा जरा गडबडीचा मामला होतो. पंचाईत अशी होते की दोघांनाही एकच रंग असेल तर या नावे वेगळी कशी? असा प्रश्न उभा राहतो. त्यातून त्याला वस्तू वा जीवापासून रंग हे वेगळे असे काही असते नि विविध वस्तूंमध्ये ते एकाच वेळी दिसू शकते याचे आकलन होऊ लागते. नीनमच्या शोधात भटकणारा बिम्मला ’भारद्वाज हा बदामी कोट घातलेला कावळा आहे’ असे म्हणतो किंवा ’साळुंकीची चोचच फक्त पिवळी का असते?’ असे प्रश्न पडतात, तेव्हा एकच रंग अनेकांत जसा दिसतो तसेच एका सजीव वा वस्तूंमध्ये एकाहुन अधिक रंगांची सरमिसळही असू शकते याचे आकलन त्याला झालेले असते.

त्यानंतर पडलेला प्रश्न असतो तो ’अमक्या वस्तूला, पक्ष्याला, प्राण्याला अमुकच रंग का असतो?’ म्हणजे ’कावळा काळाच का असतो, पिवळा का नाही?’ ’कोंबड्याचा तुरा लाल का असतो, हिरवा का नाही?’ ’ढगांत मात्र वेगवेगळ्या वेळी पांढरे नि काळे असे दोन रंग दिसतात, काहीवेळा आणखी मधला-अधला तिसराच रंग दिसतो. असे का?’ ’गायींना, कुत्र्यांना वेगवेगळे रंग एकाच वेळी मिळतात; पण म्हैस मात्र नेहमीच काळी का?’ असे प्रश्न निर्माण होत असतील. जीएंच्या बिम्मला हे प्रश्न पडले असणारच. यातील काही प्रश्नांची उत्तरे वय वाढून बसलेली मोठी माणसेही देऊ शकणार नाहीत. ती जिज्ञासा हरवलेले लोक कुण्या ’आकाशातील कर्त्याची मर्जी’ असे शरणागत वृत्तीचे उत्तर देऊन मोकळे होतात. पण जीए आपल्याला थेट यापुढील प्रश्नांकडे घेऊन जातात.

GreenCow
हिरवे गवत खाल्ल्यानंतरची गाय.

बिम्म वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतो. त्यासाठी त्याच्याकडे विविध रंगांचे, नक्षीचे एकाहुन अधिक बुशकोट, शर्ट वा चड्ड्या असतात. बिम्मला आई वा वडील शर्ट, चड्डी वा इतर गोष्टी आणून देतात. त्यातील हिरवा शर्ट चढवला की बिम्म हिरवा दिसू लागतो. त्याने पिवळा शर्ट घातला की तो त्या रंगाचा दिसू लागतो. पण त्याने पाहिलेले पक्षी वा प्राणी कायम एकाच रंगाचे कसे दिसतात. त्यांनाही ’कपडे’ बदलावेसे वाटत नसावेत का? हे कुतूहल डोके वर काढते. एखादी गाय वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रंग परिधान करते का? आणि ’गायीला रंग बदलावासा वाटला तर ती कसा बदलत असेल?’ असा एक प्रश्न डोक्यात येऊन त्याचे उत्तर बहुधा त्याच्या मनात तयार होत असावे. गायीच्या अंगावर नवा रंग चढायचा असेल वा तयार व्हायचा असेल, तर बिम्मच्या शर्टप्रमाणे बाहेरून चढवायला हवा. मग आता गायीला तो कशाकरवी मिळावा? थोडक्यात या गायीला ’शर्ट’ कसा चढवायचा?

हे प्रश्न गायीसंदर्भात पडले आहेत. मग त्यांची उत्तरेही तिलाच ठाऊक असायला हवीत. आणि उत्तरे गायीने द्यायची म्हणजे ती प्रथम बिम्मच्याच डोक्यात तयार व्हायला हवी हे ओघाने आलेच. त्यामुळे तिची कल्पनाशक्तीही बिम्मसारखीच स्वैर फिरत असते. ती त्याला सांगते की गवत खाऊन ती हिरवी होते. मग तो घालवण्यासाठी कुरकुरीत ऊन खाल्ले की तिला पिवळा रंग मिळतो.

बिम्म बाहेरुन शर्ट चढवतो नि आपला रंग बदलतो. आता बाहेरून गायीकडे (पोटात) काय जाते तर अन्न. मग अन्नाच्या रंगानुसार तिचा रंग बदलायला हवा. म्हणजे बघा, गाय कडबा खाते, गवत खाते. कडबा पिवळा असतो, गवत हिरवे असते. हे दोन्ही गायीच्या पोटात जाते तेव्हा हे रंग कुठे जाणार ? बिम्मने हिरवा शर्ट परिधान केल्यावर तो हिरवा दिसू लागतो. तसे हिरवे गवत खाल्लेली गायही हिरवी व्हायला हवी असा निष्कर्ष बिम्मच्या मेंदूने काढलेला दिसतो. कृती आणि परिणामांची सांगड घालण्याचा हा प्रयत्न त्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा टप्पा ठरत असतो.

पण हे हिरव्या नि पिवळ्या रंगाचे झाले. तिच्या अंगावर आधीच असलेला तपकिरी, पांढरा हे रंग कुठून मिळाले? तसंच ती कधी काळी होते का? असे आनुषंगिक प्रश्नही जिज्ञासू बिम्मला पडलेले आहेत. त्यावर गायीच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना भरपूर अंधार पिऊन घेतला की ती काळी होते नि झोपते. पण तोवर अंधार पडल्याने आणि रात्री आई बाहेर जाऊ देत नसल्याने साहजिकच बिम्मला ती दिसत नाही.

गाय अंधारात बसते तशीच ती उन्हात हिंडते. ती ज्या परिसरात असेल त्याचा पिवळा वा काळा रंग ती लेवून राहात असते. माणसाच्या पिलाचेही असेच नसते का? ज्या आई-वडिलांच्या छत्राखाली ते राहते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, संस्काराचे रंग घेऊन ते वाढत असते. पुढे खेळगडी, शाळेतील शिक्षक, ज्या समाजात वा गावात राहते तो समाज वा गाव यांच्या धारणा, अस्मिता-अभिमान व वारशाचे रंग घेऊनच ते वाढत असते. उन्हासाठी पिवळी नि अंधारासाठी काळी असणार्‍या गायीसारखे ते आई-वडिलांचे मूल असते, बहिणीचा भाऊ असते, शाळेत विद्यार्थी असते, झुंडीत त्या त्या जातीचे अथवा धर्माचे असते, बायकोचा नवरा होते, मुलाचे वडील होते... आयुष्यभरात असे वेगवेगळे रंग त्याला परिधान करावे लागत असतात. जिथे जो रंग आवश्यक वा सोयीचा असतो तो परिधान केला जात असतो.

रंगांची ओळख होत असताना आगेमागेच बिम्मला आकार (shape), व्याप्ती (size), परिमाणे (dimensions) आणि इतर पैलू (aspects) यांच्याबाबत समज वाढू लागते. फक्त रंगाचा विचार केला तर काळा पक्षी दिसला की तो कावळा असतो, कोकीळ असतो वा भारद्वाज. पण त्यांच्यामधील सर्वात लहान आकाराचा किंवा लहान चोचीचा पक्षी हा कोकीळ, त्याहून थोडा मोठा नि जाड चोचीचा हा कावळा आणि आकाराने सर्वात मोठा- लांब शेपटी असलेला नि भगवा कोट घातलेला तो भारद्वाज अशी ओळख पटवली जात असते. कोकीळ नि कावळा यांचे आकार सारखे असते, तर त्यांच्या तोंडून येणारा ध्वनी हा आणखी एक निकष वापरून त्यांची ओळख पटवता आली असती. या कोकीळाच्या बायकोचा धूर्तपणा ध्यानात येण्यासाठी बिम्मला पुढे शाळेत पाऊल ठेवावे लागते. तिथे कदाचित तो-

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद: पिककाकयो:।
वसन्तकाले सम्प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।।

-हे सुभाषित शिकणार असतो. पण त्यापूर्वीच त्या दोहोंतला भेद केवळ निरीक्षणाने त्याला समजलेला असतो.

कावळा नि कोकीळाप्रमाणेच रेडाही काळाच असतो, पण दोहोंचा आकार नि परिमाणे वेळी असतात. उडण्याच्या कौशल्याच्या आधारे फरक करायचा, तर राजकारणातील त्या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे ’उडाला तो कावळा, खाली राहिला तो रेडा’ असे म्हणता येईल. गोळाबेरीज ही की ’रंग हे सजीव-निर्जीवांच्या अंगभूत वैशिष्ट्यांपैकी केवळ एकच वैशिष्ट्य आहे’ हे बिम्मच्या आकलनात रुजत जाते.

या सार्‍या चक्षुर्वैसत्यम्‌ गुणवैशिष्ट्यांपलिकडच्या- म्हणजे सजीवांच्या नि विशेषत: मनुष्यप्राण्यांच्या अन्य ज्ञानेंद्रियांच्या कक्षेतील गुणवैशिष्ट्येही हळूहळू जाणीवेत मुरत जात असतात. डोळे, नाक, कान, स्पर्श आणि जिंव्हा या पाच ज्ञानेंद्रियांच्या खिडक्यांतून माणसाला त्याच्या जगातील माहिती वा ज्ञानाची ओळख होत असते. मुख्य वाटा अर्थातच डोळ्यांचा नि कानांचा. रंग, आकार, व्याप्ती हे या डोळ्यांनीच अनुभवण्याचे पैलू. यांचे दर्शन माणसाच्या पिलाला अगदी जन्मापासून होत असले तरी आकलन थोडे उशीरा होत असते. त्या पूर्वी जाणीवेच्या कक्षेत येते ती चव. कारण आहार हा जन्मापासूनच सुरू होतो.

RawMangoAndGuava
कैरी हिरवी, पेरूही हिरवा

पक्ष्यांच्या रंग-रूपाबाबत बिम्मला जे प्रश्न पडले आहेत काहीसे तसेच प्रश्न फळांच्या संदर्भात पडले असल्यास आश्चर्य नाही. कावळा नि कोकीळ जसे एकाच रंगाचे, तसेच फळांमध्येही पेरूही हिरवा नि कैरीही हिरवी असल्याने दोघांत फरक कसा करायचा? पक्ष्यांप्रमाणे हे दोघे काही ध्वनी निर्माण करत नाहीत. त्यामुळे तो निकष बाद आहे. आकार हा निकष वापरला जाऊ शकतो, परंतु एकाच जातीचे प्रत्येक फळ चोख एका आकाराचे वा व्याप्ती असेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे हे दोन निकष पुरेसे नाहीत. पण हे दोन्ही ’खाद्य’ असल्याने त्यांची चव हा आणखी एक नवा निकष बिम्मला उपलब्ध होतो आहे. मग हिरवा पेरू नि हिरव्या कैरीच्या या भेदावर संस्कृत जाणणारा एखादा बिम्म वर दिलेल्या सुभाषिताच्या धर्तीवर एखादे सुभाषित लिहूनही काढेल कदाचित.

पण बिम्मच तो. मग त्याला पुढचे प्रश्न पडू लागतात. (सर्वच मुले इतकी जिज्ञासू असतील तर काय बहार येईल.) फळे झाडावर जन्माला येतात नि वाढतात हे त्याने पाहिले आहे. पण नारळाचे झाड वेगळे, पेरूचे वेगळे नि आंब्याचे आणखी वेगळे. आता बिम्मला ही सारी फळे खायची असतील तर दारी फळे तितकी झाडे लावावी नि वाढवावी लागतील. हे फारच कष्टाचे काम झाले ना. पण प्रश्न असा की एकाच झाडावर कैरी, संत्रे, सफरचंदे अशी सारीच फळे आली तर काय बहार होईल. तेवढे एकच झाड सांभाळले की झाले.

आता गायीच्या रंगाचे कोडे गायीकडूनच सोडवून घ्यावे लागते तसेच फळझाडाबद्दलचा प्रश्न एखाद्या फळझाडानेच सोडवायला हवा. मग बिम्मने आपला हा प्रश्न परसातल्या आंब्याच्या झाडाकडेच नेला. हे झाडही गायीसारखेच मिश्किल असल्याने ते बिम्मला सांगते, ’मला सगळीच फळे येतात. फक्त ती सारी कैरीसारखीच दिसतात. तुला संत्रे खायचे असेल तर एक कैरी तोड, ती खाताना डोळे मिटून घे नि आपण संत्रे खात आहोत असे समज. मग तुला ती संत्र्यासारखी लागेल.’

आता हा किस्सा, हा प्रसंग एवढाच आहे. पण ते उत्तर मार्मिक आहे. फळ हे खाद्य आहे. तेव्हा त्याची चव हेच त्याचे व्यवच्छेदक तसंच दखलपात्र वैशिष्ट्य आहे. आकार वा रंग कोणताही असला तरी जोवर चव तीच आहे तोवर त्या फळाची ओळख अबाधित राहाते. तीच बाब बहुतेक खाद्य म्हणून वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक उत्पादनांची. म्हणूनच आज तथाकथित सेंद्रिय उत्पादनांच्या काळात हिरव्या रंगाला सोडचिठी देऊन पिवळी, लाल, जांभळी वस्त्रे परिधान केलेली ढोबळी/सिमला मिरची आपली मूळ ओळख राखून असते.

दुसरा अर्थ असा की वास्तव जगामध्ये अनेकदा प्राप्य ते साध्य नसते. अशा वेळी जे साध्य असते त्याच्यावरच प्राप्य असण्याचा शिक्का मारून समाधान करुन घ्यावे लागते. आकांक्षांना मुरड घालण्याची सुरुवात त्या वयातच व्हावी लागते.

MultiFruitTree
अनेक फळांचे पोशिंदे झाड

एखादा वय वाढूनही बिम्मची जिज्ञासा न सोडलेला कुणी यातून असा प्रश्न विचारेल, की ’जर सर्व फळांना पोसणारे जीवनद्रव्य एकच असते तर त्यांना पोसणारे झाड एकच का असू शकत नाही?’ पण वय वाढते तसे वैशिष्ट्यांपेक्षा विभागणीकडे माणसांचा कल वाढत जातो आणि जिज्ञासेचा मैलाचा दगड मागे सोडून तो पुढे धावू लागतो. मग तो ’आंब्याचे झाड लावू की संत्र्याचे?’ असा परिस्थितीशरण प्रश्न सोडवण्याच्या मागे लागतो.

माणसाच्या जीवनप्रवासात बिम्मच्या वयात असतानाच अधिक प्रश्न पडतात. त्यांची मोठ्यांनी दिलेले उत्तरे बहुधा पटत नसतात. मग तो आपल्या तत्कालीन मर्यादित बुद्धिनुसार, आकलनानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ’काळा म्हणजे अशुभ आणि पांढरा म्हणजे शुभ’ किंवा ’अमुक रंग हा विशिष्ट व्यक्तिला अधिक लाभ देणारा (लकी) असतो’ वगैरे माणसाने रंगांचे केलेले अशास्त्रीय मूल्यमापन त्याच्या जाणीवेमध्ये अद्याप पोहोचलेले नसते. तिच्या निरभ्रतेला तो तडा जाण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागणार असतो.

पुढे संस्कार नि शाळा यांसारख्या बाबींचे जू खांद्यावर बसले, की प्रश्न पडणे कमी होत जाते आणि पिवळा सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर नाहीशा होणार्‍या गायीच्या हिरव्या रंगासारखी जिज्ञासाही विरून जाते आणि एका दारी येणार्‍या आंब्याच्या पेटीतले आंबे झाडावर तयार होतात की कुठल्या कारखान्यात याबाबतही बिम्म उदासीन होत जातो.

FruitSalad
शहरी बिम्मची फळांशी नि रंगांशी होणारी ओळख: फ्रूट सॅलड

जीएंच्या बिम्मला पक्ष्यांच्या निमित्ताने रंगांचे कोडे पडले आहे. आकाराचे कोडे अप्रत्यक्षपणे ’प्रतिबिंबांचे प्रश्न’ मध्ये पडलेले आहे. चवीचे कोडे आंब्याच्या झाडाने सोडवले आहे. पण गंधाचे कोडे मात्र जीएंच्या बिम्मला पडलेले दिसत नाही. बिम्मच्या बखरीमध्ये तो एका टप्पा राहून गेला आहे.

(क्रमश:) पुढील भाग >> अभिव्यक्ती, माध्यम आणि साधन     

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ६ ऑगस्ट, २०२३

बिम्मच्या पतंगावरून - ५ : खेळ सावल्यांचा

(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ’बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)

आपल्या पक्ष्याचा शोध << मागील भाग

---

माणसाचे मूल जन्मत: परावलंबी असते. सुरुवातीचे काही महिने ते पूर्णपणे आई-वडिलांच्या निर्णयांच्या नि कृतीच्या अधीन असते. काय खावे, केव्हा खावे, काय परिधान करावे वगैरे किमान निर्णयही पालकांच्या अधीन असतात. पुढे मूल बसते, चालते झाले की त्याला स्वत:च्या निर्णयाने जागा बदलता येते- पण तरीही त्या निवडीला घराचे भौतिक बंधन असतेच. त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय त्याहून अधिक काळ पालकांच्या अधीन असतो. या टप्प्यातच त्याचा घराबाहेरील सजीव निर्जीव गोष्टींशी परिचय होत जातो. परिचय दृढ झाला की त्यातून त्यांच्याशी बंध वा नाते प्रस्थापित होत जातात. आणि असे बंध स्मरणांच्या स्वरूपात त्याच्यासोबत मनात नि घरात प्रवेश करत असतात.

यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये बिम्म ’मी कोण?’, ’यापैकी मी कोण?’, ’माझे कोण?’ या प्रश्नांना सामोरे गेला होता. सावल्यांचा वेध घेताना तो जन्मत:च मिळालेल्या नात्यागोत्यांच्या पलिकडे जाऊन स्वनिर्णयाने ती जोडण्याच्या- म्हणजे निवडीच्या टप्प्याकडे सरकतो आहे.

मांजराला किंवा एखाद्या लहान मुलाला प्रतिबिंबाइतकेच सावल्यांचेही कुतूहल असते. भिंतीला वा एखाद्या मोठ्या वस्तूला धरून मूल जेव्हा उभं राहतं तेव्हा त्याचा सावलीशी प्रथम परिचय होतो. त्यासाठी ते आकलनाच्या विविध टप्प्यांतून जात असते. यू-ट्यूब, इन्स्टाग्राम वा तत्सम ठिकाणी नुकत्याच बसू, चालू वा बोलू लागलेल्या बालकांचे आपल्या सावलीचा वेध घेणारे व्हिडिओ सापडतील. यात ती मुले आपल्याच सावलीबाबत भीती, वैताग, कुतूहल, आपुलकी अशा विविध भावना व्यक्त करताना दिसतात. सुरुवातीचा भीतीचा टप्पा ओसरल्यावर कुतूहलाचा टप्पा नि त्यातून झालेल्या आकलनाच्या टप्प्यावर ते पोहोचते.

मूळ वस्तू नि सावली यांचा परस्परसंबंध त्याला समजला नाही, तरी हळूहळू सावल्या वेगवेगळ्या आकाराच्या दिसतात हे त्याला समजू लागते. त्या काळ्या डागाला सावली म्हणतात हे त्याला समजत नसेल एकवेळ, पण स्वत:प्रमाणेच हलत्या वस्तूंपाशी कधीकधी जमिनीवर एक हलणारा डाग दिसतो याचे त्याला आकलन होते. मग हलणार्‍याच नव्हे तर स्थिर असलेल्या प्रत्येक वस्तूला अशी सावली असते हे त्याला समजते. त्यातून त्याच्या मनात वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली यांच्यातील परस्परसंबंधाची नि अतूट अशा अद्वैताची जाणीव निर्माण होते.

बिम्म या टप्प्याच्याही थोडा पुढे आलेला आहे. वस्तू/व्यक्ती/जीव नि त्यांची सावली हे जर वेगवेगळे असतील, तर त्याच्या कल्पनेच्या जगात त्याने त्यांना भिन्न अस्तित्वही बहाल केले आहे. सावलीला मूळ वस्तूशिवाय असलेले अस्तित्व आणखी पुढे नेऊन तिला मूळ वस्तूशिवाय हालचालीचे, स्थानांतर करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे.

थोडा विचार केला तर हे अगदीच हास्यास्पद नाही असे लक्षात येईल. ते मूल कपडे घालतं, बुटु घालतं, टोपी घालतं तसंच स्वेटर, रेनकोटही. काम झाले की हे सारे त्याच्या शरीरापासून दूर होऊन कपाटासारख्या जागी जाऊन बसतात हा अनुभव त्याच्या जमेस असतो. मग ’केवळ उजेडातच जिचे काम आहे, ती सावलीही काम संपले की दुसरीकडे जाऊन बसते’ असा विचार केला, तर तो वास्तव नसला तरी तर्कसंगत म्हणावा लागेल. बिम्मच्या वयाच्या मुलाच्या संदर्भात तर्कसंगत हा शब्द तसा जड होईल, पण माहिती-विश्लेषणाच्या(Data Mining) तंत्रात ज्याला ’साधर्म्यसंगती’(association rule) म्हणतात तसे नक्कीच म्हणता येईल.

सावलीला स्वतंत्र अस्तित्व बहाल करणे ही अगदीच दुर्मिळ कल्पना नाही. अद्भुत-कथांमधून ती अनेकदा वापरली गेली आहे. डिस्ने स्टुडिओज्‌च्या ’डकटेल्स’ चलच्चित्रमालिकेमध्ये ’अंकल स्क्रूज’ नावाचा एक कंजूष धनाढ्य आहे. त्याची शत्रू असलेली कुणी ’मॅजिका’ नावाची जादूगार आपल्या सावलीला स्वत:पासून वेगळे करुन स्क्रूजचे लकी नाणे चोरण्यास पाठवते. ही सावली असल्याने स्क्रूजची सारी अद्ययावत सुरक्षा यंत्रणा तिच्यासमोर कुचकामी ठरते अशी कल्पना एका भागामध्ये रंगवलेली आहे.

माझ्या आठवणीत राहिलेली आणखी एक सावली आहे ती डिस्नेच्याच ’स्नोव्हाईट अँड द सेव्हन ड्वार्फस्‌’ या प्रसिद्ध चलच्चित्रपटातील. प्रसंग असा आहे की, सात बुटके आपल्या कामावरून परतले आहेत. दार उघडताच वरच्या मजल्यावर काहीतरी/कोणीतरी आहे याची चाहूल त्यांना लागते. आता वर जाऊन पाहणे आले. तू जा, तू जा करता-करता अखेर एक बुटका मेणबत्ती घेऊन वरच्या खोलीचे दार हळूहळू उघडतो. दार उघडत असता, आतील बाजूस उजेड जसजसा प्रवेश करतो, तसतसे आतल्या बाजूस पडलेली दाराची सावली माघार घेताना दिसते. बुटका प्रथम हातातील मेणबत्ती हळूहळू आत सरकवतो. त्याबरोबर जमिनीवर त्याच्या हाताची, मेणबत्तीची सावलीही आत सरकते.

अज्ञाताच्या भीतीने थरथरणार्‍या त्या बुटक्याच्या हातातील मेणबत्ती थरथरत असते. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याला अनुसरून भिंतीवरची दाराची आणि जमिनीवरची दिव्याची नि त्या बुटक्याची सावलीही थरथरत असते. (संगणकपूर्व जमान्यातील त्या चलच्चित्रपटात इतके कलाकुसरीचे काम पाहून मी ताबडतोब मनातल्या मनात त्यांना सॅल्यूट करुन टाकला होता.) तुमच्या मनातील भावनांचे प्रतिबिंबही तुम्हाला दिसणार्‍या त्या सावल्यांमध्ये पडत असते... आठवणींचेही असेच असते!

AnimalShadows
https://emmaowl.com/animal-shadow-drawing/ येथून साभार.

आता सजीव, निर्जीव व्यक्तींच्या सावल्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे हे मान्य केले. मग बिम्म काय करतो, तर अशा बर्‍याच वस्तूंच्या, व्यक्तींच्या, प्राण्यांच्या सावल्याच गोळा करून आणतो. एका भिंतीजवळ उभा असलेल्या पांढर्‍या वासराची, एक वाकडे पाय करून उभ्या असलेल्या टांग्याच्या घोड्याची आणि तारेवर बसलेल्या चार चिमण्यांची जमिनीवर पडलेली सावली उचलून आणतो. पूर्वी एकदा तो रस्त्यावरून कुत्र्याच्या एका छोट्या पिलाला - 'पिट्टू'ला - घेऊन आला होता, तेव्हा त्याची तिथेच राहून गेलेली सावलीही घेऊन येतो. बिम्मचे कुतूहल आता स्वत:चा परीघ सोडून इतरांचा वेध घेऊ लागले आहे.

आपण भानावर असू, तर ही वाचता वाचता यातील गर्भित मुद्दा आपल्या ध्यानात येईल. सावली हे एकप्रकारे आठवणीचे रूपक आहे. या सार्‍यांना बिम्म कुठे न कुठे भेटला आहे, त्यांच्या संदर्भातील आठवणींच्या सावल्या त्याच्या मनात पडलेल्या आहेत. प्रकाशाचा कोन बदलल्यावर अथवा तो नाहीसा झाल्यावर वास्तविक सावल्या लुप्त होतात तशा त्यांच्या पुन्हा संपर्कात आला नाही, तर कालानुक्रमे त्या विरत जाणार आहेत. आपल्या बिम्मला वाचून ही गोष्ट दाखवत असता त्याच्या आई अथवा बाबांसाठी हा अन्वयार्थ ठेवून दिला आहे.

आणखी एका दृष्टीने पाहिले तर सावल्या हे अप्राप्य गोष्टींचे रूपक म्हणूनही पाहता येईल. वासरू असो, घोडा असोत की चिमण्या, हे सारे कायम आपल्यासोबत असावेत असे बिम्मला वाटत असावे. पण वास्तवात ते शक्य नाही. मग निदान त्यांच्या सावल्या आपल्याजवळ असाव्यात म्हणजे अप्रत्यक्षपणे ते आपल्या आयुष्यात राहतील असा त्याचा कयास असेल. आपणही जे आवडले पण प्राप्य नाही, त्यांचे फोटो, चित्रे, भित्तीचित्रे (poster) या स्वरूपात आपण त्यांना जवळ करत असतो. तरुण वयात आवडलेला हीरो अथवा हीरोईन, एखाद्या आदरणीय व्यक्तीचा फोटो, सही वा त्यांच्याशी संबंधित जड वस्तूंना त्यांचे प्रतीक म्हणून आपण सोबत ठेवत असतो.

खरंतर हे रूपक बिम्मपेक्षा त्याच्या आईवडिलांना अधिक नेमके समजेल. दिवंगत आई, वडील वा आजी, आजोबा आदिंचे फोटो भिंतीवर लावून माणसे अप्रत्यक्षणे त्यांना आपल्या आयुष्यात जागा देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या रोजगाराच्या ठिकाणी टेबलवर अथवा संगणकाच्या पडद्यावर आपल्या पत्नी/पती अथवा मुलांचे फोटो ठेवणारे तो निव्वळ तात्कालिक विरहदेखील त्यांच्या फोटोंनी भरून काढू पाहात असतात. वार्धक्यामध्ये दूर गेलेल्या मुला-नातवंडांचे फोटो सोबत बाळगणे हा ही याचाच प्रकार. काही जण आपल्या बालपणातील अनेक वस्तू जतन करून ठेवतात. इतकेच नव्हे तर तारुण्यातील काही हळव्या आठवणीही वस्तुरूपात साठवल्या जातात.

आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांचा पहिला शब्द, पहिले पाऊल यांपासून सुरूवात होत वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस या क्रमाने आठवणी फोटोबद्ध वा व्हिडिओबद्ध केल्या जातात. त्या भूतकाळाच्या सावल्याच तर असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आधार घेत असलेल्या सावल्या वेगवेगळ्या असतात. तेव्हा बिम्मने सावल्या जमा केल्या म्हणून त्याला हसण्याचे कारण नाही.

आता या सावल्या जमा केल्या खर्‍या, पण आता त्यांचे करायचे काय असा प्रश्न थोड्याच वेळात बिम्मला पडला असणार. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये अशा एकाच खेळात रमण्याचा काळ फारसा दीर्घ असत नाही. मग या ना त्या मार्गाने त्या सावल्यांपासून सुटका व्हायला हवी.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा बिम्मचा शर्ट, हा बिम्मचा रेनकोट अशा उल्लेखांतून बिम्मला अन्योन्य संबंधांचे प्राथमिक ज्ञान झाले आहे. बिम्मचा शर्ट वा रेनकोट बब्बी घालणार नाही की आई वा वडीलही. त्यांचे स्वत:चे कपडे असतात. ते बिम्म वापरत नाही. त्याचप्रमाणे वासराची, घोड्याची वा चिमण्यांची सावली ही फक्त त्यांची आहे. ती बिम्मच्या उपयोगाची नाही’ अशी संगतीही त्याला लागत असेल. मग कपड्यांचे, रेनकोटचे वा पायीच्या बुटांचे जसे निश्चित काम असते; ते नसतील तर बिम्मची अडचण होते हे ही त्याला समजले असेल. त्यातून मग त्याने त्याच्या लहानशा मेंदूने या सावल्या नसतील तर या आपल्या प्राणिमित्रांना काय अडचण येईल याचा तर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

मग बिन-सावलीच्या वासराला त्याचे मित्र खेळायला घेत नाहीत, बिन-सावलीच्या घोड्याला टांग्याला कसे जोडणार म्हणून त्याचा मालक त्याला हाकलून देतो आहे, रात्री झोपताना पांघरायला चिमण्यांना त्यांच्या सावल्या हव्या आहेत अशी विविध कारणे निर्माण करून तो त्या सावल्या ज्याच्या त्याला देऊन टाकतो. ज्याचे उपद्व्याप पाहून आईने त्याला लाकूड अड्ड्यावरच्या नारायणला देऊन टाकले होते, त्या पिट्टूची सावली गिरणीत जाईन तेव्हा त्याला देऊन टाकण्याचे आई कबूल करते.

पण आई गिरणीतून परत येते ती उतरलेला चेहरा घेऊन. आल्याबरोबर ओलावल्या डोळ्यांनी बिम्मला जवळ घेऊन ती बजावते की 'आता यापुढे कध्धी कध्धी कुणाची सावली काढून आणायची नाही.' बिम्मच्या खेळात, गंमतीजमतीत सहभागी होत असताना तिने असे अचानक भावुक का व्हावे असा प्रश्न पडू शकतो. इथे जीएंनी थोडेसे मोठ्यांच्या समजुतीवर सोडलेले आहे.

जर पिट्टूला लाकडाच्या वखारीतल्या नारायणला दिले होते. त्या वखारीत लाकडांच्या ढिगार्‍याजवळ खेळताना पिट्टूबाबत काही अघटित घडले असावे. ते बिम्मला समजू नये, हे जसे त्याच्या आईला ठाऊक होते. सर्वच सावल्या- आठवणी या सुखद नसतात, काहींसोबत वेदनाही वास्तव्याला येत असते. बिम्मची गोष्ट वाचणार्‍या छोट्यांना ते समजू नये, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट वाचणार्‍या त्यांच्या मोठ्यांना मात्र ते उमगावे इतके सूचक ते जीएंनी ठेवले आहे.

लहानांना नि मोठ्यांना दिसणारे, जाणवणारे जग कसे वेगवेगळ्या पातळ्यांवर असते. बिम्मचे कल्पना-वास्तवाच्या सीमेवरचे, तर आईचे वास्तवात घट्ट पाय रोवलेले. हे सारे पुस्तक अशा जाणिवेच्या दोन स्तरांवर लिहिले गेले आहे, ते तसेच अनुभवावे लागते. कल्पनेच्या पातळीवर जगताना उचलून आणलेल्या सावल्या बिम्म सहजपणे परत देऊ शकतो, पण पिट्टूसारख्या काही जणांची सावली मात्र त्याची आई परत देऊ शकत नाही. ती कायमची काळवंडून जात असते. त्या दोन जगातील हा फरक मोठे होताना बिम्मला समजून घ्यावा लागणार असतो.

(क्रमश:) पुढील भाग >> रंगांचे कोडे     

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

काका सांगा कुणाचे...?

(महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे...)

(शान्ताबाईंची  क्षमा मागून.)

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे !
मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे !

चवल्यापावल्या(१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात
नाना संगे दादा अन्‌ भवती, सेनेचे शिंदेही धडपडती !

आभाळ हेपले वरचेवरी, काकांना एनडीए प्रिय भारी
साट्याने लोट्याला सावरावे, पिल्लांना सत्तेचे वाटे द्यावे!

हाताशी हात हे जुळताना, पाठीवर हातही फिरताना
हासती नाचती हेले(२) सारे, हासती(३) जाणती सुज्ञ सारे!

- संता पोकळे

---
(१). इतर खुर्दा नेते. 
(२). नेत्यांसोबत हेलपाटे मारणारे कार्यकर्ते.
(३). ही दोन हास्ये वेगळी बरं का. एक हसू नेणत्यांचे नि एक जाणत्यांचे.
- oOo -

हे वाचले का?