मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

काका सांगा कुणाचे...?

(महारठ्ठदेशी दुसरे बंड होई. राष्ट्रवादी नामे महाराष्ट्रवादी पक्षाचे दहा लोक शिंदे सरकारांच्या दरबारी रुजू होती. इतर अनेकांनी सरकारपक्षाकडे प्रयाण केल्याचे ऐकू येई. परंतु अध्यक्ष कानावर हात ठेवी. म्हणे आम्हांसी काई ठाऊक नाही. परंतु ठोस कारवाई ना करी. चेले सारे अधिवेशनाला दांडी मारिती. कुणाचा कोण काही कळेना होई. कार्यकर्ता संभ्रमित होई. दादांना पुसे, ’काका कोणाचे?’ दादा गालातल्या गालात हसे नि गुणगुणू लागे...)

(शान्ताबाईंची  क्षमा मागून.)

ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला

काका सांगा कुणाचे? काका माझ्या मोदींचे !
मोदी सांगा कुणाचे? मोदी माझ्या काकांचे !

चवल्यापावल्या(१) चळतात, सत्तेच्या रिंगणी धावतात
नाना संगे दादा अन्‌ भवती, सेनेचे शिंदेही धडपडती !

आभाळ हेपले वरचेवरी, काकांना एनडीए प्रिय भारी
साट्याने लोट्याला सावरावे, पिल्लांना सत्तेचे वाटे द्यावे!

हाताशी हात हे जुळताना, पाठीवर हातही फिरताना
हासती नाचती हेले(२) सारे, हासती(३) जाणती सुज्ञ सारे!

- संता पोकळे

---
(१). इतर खुर्दा नेते. 
(२). नेत्यांसोबत हेलपाटे मारणारे कार्यकर्ते.
(३). ही दोन हास्ये वेगळी बरं का. एक हसू नेणत्यांचे नि एक जाणत्यांचे.
- oOo -

संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा