फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...
एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते...
गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरकोळ गरजा भागवण्यास गावात महिन्यातून दोनदा एक व्यापारी येई. त्याचं नाव पुरुषोत्तमभाई. गावात न मिळणार्या वस्तू घेऊन येई, त्याच्या बदल्यात चोख दाम मोजून घेई. कुणाला पैशाचीच नड असेल, तर पुरुषोत्तमभाई त्यांच्याकडचे किडुकमिडुक विकत घेई नि त्या बदल्यात त्या गावकर्याला पैसे देई. पुरुषोत्तमभाईची फेरी झाली, की गावात लहान-लहान सुखाची पावले उमटत नि पुरुषोत्तमभाईच्या खिशात पैशाची. एकुण गावाचं सारं काही छान चाललं होतं. गावाच्या या संथ, सुस्थिर जगण्यात खडा टाकला तो अलबत्त्या नि गलबत्त्याच्या भांडणाने. भांडण तरी कसलं... सारं एक रुपयाचं!
तर झालं असं की अलबत्त्या नि गलबत्त्या हे दोघे मित्र. दोघांच्याही घरी थोडी जमीन होती, ती कसणारे बापदादे होते, मदत करायला कुळवाडी होते. या दोघांनी कधीमधी त्यांना मदत केली, तरी बहुतेक वेळा दिवसातून दोनदा भाकरी मुरगाळण्यापुरते घरी येणारे हे दोघे तरूण एरवी पारावर, देवळात वा रानात बसून प्राचीन भारतातील सुवर्णकाळाची उजळणी करत बसत. ‘ऑस्ट्रेलिया म्हणजे अस्त्रालय’, ‘मॉरिशस म्हणजे मारिचस्’ वगैरे शोध ते एकमेकाला सांगून प्रबोधन करत. सोन्याचा धूर येणारा देश कसा कचर्यात चालला आहे यावर हळहळ व्यक्त करत.
एखाद्या भेटीत ‘फ्रान्स हा अपरान्त म्हणजे कोकणस्थ मंडळींनी तिकडे जाऊन वसवलेला देश आहे’ हे अलबत्त्या अपरान्त → अप्रान्त → प्रान्त → फ्रान्स या व्युत्पत्तीच्या आधारे सांगे. तर त्याचे म्हणणे खोडून काढताना गलबत्त्या प्रान्तचा अपरान्तशी काहीही संबंध नसून ‘हिंदुस्थानचा मुख्य भूभागापासून दूर असलेला प्रान्त’ एवढ्याच अर्थाने प्रान्त हा शब्द वापरला जात होता असे प्रतिपादन करी. असा तपशीलात मतभेद असला तरी ‘प्रान्त’चे फ्रान्स झाले’ यावर मात्र दोघांचे चटकन एकमत होई.
भूतकाळाचे दळण दळण्याचा कधी कंटाळा आलाच तर ते भविष्याकडे वळून ‘देश महासत्ता झाल्याची’ किंवा ‘आपण(!) पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्याची’ स्वप्ने रंगवत बसत. क्वचित एखादा तिसरा गडी त्यांना सामील झाला, तर त्यांच्या चर्चेची गाडी वळण घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवासस्थानामध्ये असलेल्या सुखसोयींपासून ‘प्राचीन काळी द. अमेरिकेने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीमध्ये भारतीयांचा सिंहाचा वाटा’ वगैरेपर्यंत भरधाव सुटे. तिसर्याने त्यात स्वत:ची अशी काही भर घालण्याचा प्रयत्न केला की दोघे एक होऊन त्याचे म्हणणे खोडून काढत.
गप्पांचा भर ओसरला की तिथेच एखाद्या झाडाखाली ताणून देत. या कार्यक्रमात त्यांचा दिवस सुखाने सरत असे. सूर्य क्षितिजापार गेला, की ते रमतगमत घरी परतत आणि दोन भाकरी मुरगाळून उद्याची चिंता न करता गाढ झोपी जात.
असेच एक दिवशी एकदा सूर्य कलला आणि दोघे घरी निघाले. रानाकडून गावाकडे येणार्या वाटेला शिवेवरच एक चिंचोळा फाटा फुटला होता. तो सरळ गावकुसाबाहेरच्या वस्तीकडे जात होता. येता येता तिकडे काही कामासाठी निरोप देऊन ये असे बापाने सांगितल्याची अलबत्त्याला आठवण झाली. त्यामुळे फाट्यावर पोहोचताच त्याने गलबत्त्याला ‘तू पुढे हो’ म्हणून सांगितले.
गलबत्त्या गावच्या वाटेवर चालू लागला. इतक्यात गलबत्त्याच्या पुढे रस्त्यावर काहीतरी चमकलेले अलबत्त्याने पाहिले. ते एक रुपयाचे नाणे असल्याचे त्याच्या ध्यानात आले. ते उचलण्यास तो पुढे होणार इतक्यात तो रुपया नेमका गलबत्त्याच्या पायाखाली आला. काय टोचले म्हणून गलबत्त्याने उचलला. अलबत्त्या म्हणाला ‘मी आधी पाहिला, तेव्हा तो माझा आहे–’ गलबत्या म्हणे, ‘छे: मी आधी उचलला, तो माझा आहे.’
कधी नव्हे ते दोघांचे भांडण पेटले. गलबला ऐकून गावाच्या वाटेवर थोडा पुढे चाललेला पुरुषोत्तमभाई परत मागे आला. दोघांनी आपापले म्हणणे त्याच्या कानी घातले. पुरुषोत्तमभाई हसला नि म्हटला, ‘अरे भाई, झगडा कशाला करता. हा माझा एक रुपया घ्या नि दोघांनी एक-एक रुपया घेऊन भांडण मिटवा’.
असे म्हणताना खिशात हात घालताच त्याला पडलेल्या भोकातून त्याचे एक बोट भस्सदिशी आरपार गेले. तो रुपया आपल्याच खिशातून पडला असल्याचे त्याच्या लक्षात आले. आता ‘तो रुपया माझा आहे’ म्हणावे, तर दोघांत तिसरा सामील होणार नि भांडण वाढणार. निवाडा काहीच होणार नाही. म्हणजे शेवटी रुपयावर पाणी सोडावेच लागणार, हे त्याला ध्यानात आले.
त्याने थोडा विचार केला नि अखेर त्याच्या चेहर्यावर हसू फुटले. ‘जाऊ द्या, तुम्ही दोन इतके चांगले मित्र, एका रुपयासाठी का भांडता? तो रुपया मला भांडवल म्हणून द्या. मी महिन्याभरात दुप्पट करून देतो. मग दोघेही एक एक रुपया घ्या.’ पण दोघेही हट्टाला पेटले होते. महिनाभर थांबायची त्यांची तयारी नव्हती.
तणतणत दोघे गावात पोहोचले, ते थेट चावडीवर गेले. गावची चार संभावित नि ज्येष्ठ मंडळी जमली. आधी दोघांची समजूत घालणे सुरू झाले. पण दोघे हट्टाला पेटलेले. मग त्यांच्या घरी निरोप गेला. दोघांच्या घरचे हजर झाले. या दोघांच्या भांडणाचे कारण ऐकून त्यांनीही कपाळाला हात लावला. पण हे दोघे त्यांचेही ऐकेनात. मग नाईलाजाने पंचांसमोर निवाडा करावा असा निर्णय झाला. पंचांनी दोन्ही पक्षांना ‘निवाड्याचा खर्च’ म्हणून प्रत्येकी पाच रुपये जमा करण्यास सांगितले. शिवाय प्रथेनुसार प्रत्येकी एक टॉवेल, टोपी आणि निवाड्याच्या दिवशी कोंबड्याचे जेवण द्यायचे होते. आणि निवाडा होईतो तो रुपया पंचांकडे जमा करून घ्यावा असे ठरले.
अखेर पंचायत बसली. दोघांनी मोठा जोरदार आरडाओरडा केला.
अलबत्त्या म्हणे, “मी आधी पाहिला. तेव्हा तो माझा.”
गलबत्त्या म्हणे, “पण मी तो प्रथम उचलला. ज्याच्या हाती रुपया तो त्याचा.”
गलबत्त्या म्हणे, “आज माझे भविष्य होते,‘अचानक धनलाभ’; तेव्हा रुपया माझ्याचसाठी आला आहे.”
अलबत्त्या म्हणे, “माझे भविष्य होते ‘अनपेक्षित धनलाभ’; तेव्हा तो रुपया देवाने माझ्यासाठीच धाडला आहे.”
तुंबळ वाद-प्रतिवाद झाले. तरी तिढा सुटेना. दोघे थकले. मग इतर लोक उभे राहिले.
अलबत्त्याच्या बाजूने गणपा उभा राहिला. तो म्हणे, “डोळे हे शरीरावर हाताहून वरच्या स्थानावर असतात. तेव्हा पाहण्याला अधिक महत्त्व आहे. ज्याने प्रथम पाहिले, रुपया त्याचा.” चावडीवर उपस्थित असलेल्या काही गावकर्यांनी माना डोलावल्या.
राजाभाऊ गलबत्त्याच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणे, “हॅ: डोळ्यांनी काय आपण हिमालयही पाहू हो, म्हणून तो अलबत्त्याचा होईल काय? अन्न हाताने उचलून तोंडात न घालता नुसते नजरेने पाहिले तर पोट भरेल काय?” काही गावकर्यांना त्याचेही म्हणणे पटले.
आता समोर बसलेले सारेच आपापल्या परीने युक्तिवाद करू लागले. चावडीचा आखाडा झाला.
त्या गोंधळातच गावच्या इतर कुणाहीपेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला धोंडिबा म्हणाला, “आरं पोरानो, जानी दोस्त तुम्ही. यका रुपयापायी कशाला तंडतायसा. दोघंबी अधेली-अधेली वाटून घ्या की.” पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही.
अखेर पंचांनी आपण उद्या निर्णय देऊ असे जाहीर करून सभा संपवली. पण निर्णय द्यायचा म्हटले तरी पंचामध्येही मत-मतांतरे होतीच. जे चावडीसमोर झाले तेच त्यांच्या खासगी बैठकीत पुन्हा घडणार असा रंग दिसू लागला. त्यामुळे त्यांनी ‘पुढल्या आईतवारी निर्णय देऊ’ असे सांगून डोक्याचा आजचा ताप एक आठवडा पुढे ढकलून दिला.
त्या दरम्यान पुरुषोत्तमभाई अलबत्त्याच्या कानी लागला. ‘गावोगावीचा अनुभव आहे माझा. पंचांना काहीतरी देऊन आले पाहिजे’, तो म्हणाला. ‘पाच रुपये आणि टॉवेल-टोपी दिली की,’ अलबत्त्या भाबडेपणाने म्हणाला. पुरुषोत्तमभाई लबाड हसला. ‘अरे येड्या तो पंचायत बसल्याचा मेहनताना झाला. निवाडा आपल्या बाजूने व्हायचा तर जास्तीचा पैसा द्यायला हवा.’ अलबत्त्या विचारात पडला. त्या रुपयापायी आधीच दहा-एक रुपयाला चुना बसला होता. त्याच्या म्हातार्याने त्याबद्दल फैलावर घेतला होता. आता ‘आणखी पैसे कुठून आणणार?’ असा प्रश्न त्याला पडला.
पण त्यासाठी पुरुषोत्तमभाई होता ना. अलबत्त्याला आवश्यक तो पैसा द्यायला तो एका पायावर तयार होता. जमतील तसे, सावकाशीने, रुपया-दोन रुपये परत करण्याची सवलत द्यायचीही त्याची तयारी होती. फक्त अलबत्त्याला त्यावर माफक व्याज द्यावे लागणार होते. ‘माझ्या धंद्यातला पैसा तुला देणार. मग त्यावरचा माझा नफा बुडणार. तो तू मला द्यायला नको का?’ त्याने आर्जवी स्वरात विचारले. अलबत्त्या तयार झाला. पंचांपैकी कुणाला नि किती पैसे द्यायचे याचा अदमास घेण्याची नि ते पोहोचवण्याची जबाबदारीही पुरुषोत्तमभाईने स्वत:कडे घेतली. अलबत्त्या निश्चिंत झाला.
पुरुषोत्तमभाईने पंचांना एक-एकटे गाठून पटवायला सुरुवात केली. त्यांना पैसे देऊन त्याने निवाडा पुढे ढकलण्याची गळही घातली. त्यानुसार पंचानी निवाड्यासाठी आणखी एक आठवडा वाढवून घेतला. आणि त्याचबरोबर सुरुवातीला अलबत्त्या नि गलबत्त्याला दिलेला प्रस्ताव त्याने त्यांनाही दिला. तो रुपया आपल्या धंद्यात गुंतवावा नि महिन्याभराने दोन रुपये मिळतील. त्यातला एक रुपया अनायासे पंचांना मिळेल अशी लालूच त्याने दाखवली. पंचाना हा ‘हपापाचा माल गपापा’ सल्ला भलताच पसंत पडला नि त्यांनी तो रुपया पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केला.
सारे काही उरकून पुरुषोत्तमभाई अलबत्त्याकडे आला आणि त्याने पैशांचा हिशोब त्याच्या कानी घातला. त्याचवेळी गलबत्त्याने थोडे पैसे देऊन निवाड्याची तारीख पुढे ढकलून घेतल्याचेही कानावर घातले. ‘तो आणखी पैसे जमवण्याच्या खटपटीत असून ते जमले की पंचांना ते देऊन तो निकाल आपल्याकडे फिरवून घेईल’ अशी धोक्याची घंटाही वाजवली. निवाड्याची तारीख येईतो अलबत्त्याच्या अपरोक्ष पुरुषोत्तमभाईने गलबत्त्यालाही गाठले आणि हाच सोपस्कार पार पडला. पण त्याचा म्हातारा ‘पैसे देत नाही’ म्हटल्यावर गलबत्त्याने त्याच्या नकळत घरातले पैसे चोरून पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केले.
असे दोन-तीन वेळा झाल्यावर दोघेही घायकुतीला आले. ‘आता काय तो पाड लाव’ अशी गळ अलबत्त्याने पुरुषोत्तमभाईला घातली. गलबत्त्याने ‘घरचे पैसे चोरणे आता दिवसेंदिवस अवघड झाले आहे. म्हातारा बारीक ध्यान ठेवून असतो.’ अशी तक्रार करायला सुरुवात केली. मग पुरुषोत्तमभाईनेही कौल दिला आणि दहा दिवसांनी पंचांनी निर्णय जाहीर केला.
या निकालानुसार ‘दोघांनाही प्रत्येकी एक अधेली’ देण्यात येणार होती. पुरुषोत्तमभाईने त्या सापडलेल्या रुपयाच्या बदली दोन अधेल्यांची मोड देऊन त्याबद्दल कमिशन म्हणून दोघांकडून प्रत्येकी पाच पैसे घ्यावेत असे पंचांनी सुचवले होते. ‘मग मी तरी दुसरं काय सांगिटलो होतो. उगा पंचाचं धन केलो आन् चावडीवर सोंगं नाचिवली.’ वैतागाने धोंडिबा पुटपुटला नि काठी उचलून निघून गेला.
‘घे मुडद्या अधेली. रुपया मला दिला असतास, तर स्वत:हून तुला चहा पाजला असता. फुंक आता अर्धी विडी त्या अधेलीची.’ अलबत्त्या संतापाने म्हणाला नि तरातरा निघून गेला. गलबत्त्याही संतापाने पेटला नि पुटपुटत घरच्या वाटेने गेला.
पंचांनी दोनही बाजूंना काही देऊ करणारा सोपा निकाल दिला असला, तरी त्याने उलट दोघेही अधिकच असंतुष्ट झाले. आपला रुपया आपल्याच दोस्ताने घशात घालण्याचा प्रयत्न करावा याने आधीच दुखावलेले ते दोघे आता पंचानीही अन्याय केल्याच्या भावनेने धुमसत होते. यथावकाश पुरुषोत्तमभाई पुन्हा दोघांच्या कानी लागला. नेहमीचा रतीब सोडून आता तो वारंवार गावात येऊ लागला. अशाच एका फेरीदरम्यान इतर सामानासोबत त्याने चपट्या बाटल्याही आणल्या. प्रथम गप्पा मारताना सोबत म्हणून त्याने प्रत्येकासोबत एक-एक बाटली फोडली. तिच्या संगतीने निर्घोर मनाने नि आवेशपूर्ण वृत्तीने मारलेल्या गप्पांमुळे दोघांमधील वीरश्री चैतन्याने सळसळू लागली. दोघांनाही ती हवीहवीशी वाटू लागली. बाटलीतील प्रत्येक घोटासोबत दोघांमधील दरी वाढत चालली, आणि आधीच्या कर्जासोबत बाटल्यांचे कर्जही आता वाढू लागले.
या आवेशपूर्ण चर्चांदरम्यान बव्हंशी ऐकण्यापुरते– आणि चणे खाण्यापुरते – सामील असणार्या पुरुषोत्तमभाईने कोर्टात जाऊन न्याय मिळवण्याचे पिल्लू हळूच सोडून दिले. दोघांपैकी एकाच्या गळी जरी हे उतरवता आले तरी त्याचे काम होणार होते. त्याच्या सुदैवाने दोघांनाही ही कल्पना पसंत पडली. वकील गाठून देणे, कोर्टाच्या कार्यवाहीची माहिती देणे, जाण्यायेण्याची सोय करणे वगैरे सारे काही पुरुषोत्तमभाईने अंगावर घेतले. त्याने ही जबाबदारी तालुक्याच्या गावातील दोन परिचित वकीलांवर सोपवून गावाला यांत आपला थेट संबंध दिसू नये याची खातरजमा करुन घेतली. त्याचबरोबर वकीलांना या दोघांकडून मिळणार्या पैशांमध्ये रुपयात चार आणे भागीदारीही नक्की करून टाकली. ते वकीलही मुरलेले असल्याने त्यांनी हे दोन बकरे ‘झटका’ पद्धतीने न कापता ‘हलाल’ करावेत असे ठरवून टाकले.
आता कोर्टाच्या कामासाठी लागणारा पैसा उभा करावा लागणार होता. दोघेही अपरिहार्यपणे पुरुषोत्तमभाईला शरण गेले. पण मागच्या कर्जाचा बोजा हलका केल्याखेरीज नव्या कर्जांची खाती उघडण्यास पुरुषोत्तमभाईने असमर्थता व्यक्त केली. ‘मी आपला लहानसा व्यापारी. गावोगाव हिंडून किडुकमिडुक विकतो तेव्हा चार पैसे मिळतात. आधीच माझ्या धंद्याचे अर्ध्याहून अधिक पैसे व्याजाच्या आमिषाने तुम्हाला देऊन बसलोय. त्याने धंद्याची तंगी झाली आहे.’ तो अजिजीने म्हणाला.
परतफेडीसाठी दोघांकडे अर्थातच पैसे नव्हते. त्यांनी हात नि काखा वर केल्यावर भाईने त्यांच्या जमिनींचा विषय हलकेच पुढे सरकवला. अलबत्त्याच्या बापाची जमीन ही वंशपरंपरागत असल्याने त्याने आपली वाटणी मागावी असे त्याने सुचवले. मग त्याला आपल्या वाट्याची जमीन विकून वा तारण ठेवून त्याला हवे तितके कर्ज उभारता येईल, आपले पैसे देऊन उरलेल्या पैशांत बसल्या जागी करण्याजोगा काही व्यवसाय करता येईल असे त्याने सुचवले. शेतातील कष्ट आपल्याच्याने व्हायचे नाहीत हे ठाऊक असलेल्या अलबत्त्याला हा उपाय एकदम पसंत पडला.
अलबत्त्याने घरी पोहोचताच म्हातार्याकडे आपली मागणी नोंदवली. म्हातारा हबकलाच. जमिनीचे तुकडे करणे याचा अर्थ दोघांकडेही तुटवडा निर्माण होणे आणि अखेरीस जमिनी पुरुषोत्तमभाई वा अन्य कुणाच्या घशात जाणे आहे हे अनुभवाने ठाऊक होते. त्याने आणि कोंडिबाने अलबत्त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अलबत्त्या ऐकेना. ‘माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. गलबत्त्याचे नाक खाली केल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही.’ अशी गर्जना करत निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने वाटणीसाठी कोर्टात जाण्याची धमकी दिली.
आता म्हातारा खचला. एकतर कोर्टाचे काम म्हणजे पैसे नि वेळ यांचा सत्यानाश हे त्याला ठाऊक. त्यातच हट्टाला पेटलेलं आपलं हे पोरगं घरच्या नि गलबत्त्यावरच्या अशा दोन खटल्यांमध्ये भिकेला लागणार हे त्याला स्वच्छ दिसत होते. अखेर सुज्ञपणे म्हातार्याने वाटणी करण्यास रुकार दिला. अलबत्त्याच्या त्याच्या वाटणीची जमीन त्याला देऊन टाकली नि आपल्या वाट्याची वाचवली.
पण इकडे गलबत्त्याच्या म्हातार्याने पैसे वा जमीन देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्याच्या त्राग्याला न जुमानता त्याला सरळ घराबाहेर काढले. एव्हाना पुरुषोत्तमभाईने गावातच एक घर घेतले होते. खाली दुकान नि वर राहण्याची जागा अशी तजवीज त्याने केली होती. गावच्या मंडळींना किडुकमिडुक विकणे वा विकत घेणे सोडून त्याने गावच्या मंडळींच्या धान्याचा अडता म्हणून जम बसवला होता. त्याने गलबत्त्याला सरळ दुकानातील अंगमेहनतीच्या कामाला जुंपला, नि बदल्यात दोनही वेळचे जेवण नि दुकानाच्या बाहेरील फळीवर झोपण्याची परवानगी दिली. कुणब्याचा गलबत्त्या आता पुरुषोत्तमभाईचा गडी आणि राखणदार म्हणून राहू लागला.
दरम्यान कोर्टात पहिली तारीख पडली...
.
.
.
... आणि तारखांमागून तारखा पडू लागल्या.
अलबत्त्याच्या वाटची जमीन आता पुरुषोत्तमभाईकडे आली होती. त्यावर त्याची कुळे कसत होती, त्यांच्या कष्टाचे फळ गोण्यांमध्ये भरून दुकानामागे असलेल्या कोठीच्या खोलीमध्ये जमा होऊ लागले. गलबत्त्या डोळ्यांत तेल घालून त्यांवर लक्ष ठेवू लागला आणि दारी ट्रक उभा राहिला की त्या गोण्या त्यांतून चढवू लागला. अलबत्त्या-गलबत्त्यांप्रमाणेच गावचे इतर लोकही अडी-अडचणीला पुरुषोत्तमभाईकडे हात पसरू लागले. पहिला रुपया त्याने गमावला असला तरी गावातील सार्यांचेच रुपये आता बिनबोभाटपणे त्याच्याकडे येऊ लागले. पुरुषोत्तमभाई आता पुरुषोत्तमसेठ म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुरुषोत्तमभाईच्या खिशातून जिथे तो रुपया पडला, त्या जागी त्याने मारुतीचे एक देऊळ बांधले होते. लोक त्याला गंमतीने ‘रुपया-मारुती’ म्हणू लागले. यासोबतच ‘बाटलीपे चर्चा’ करत असताना पुरुषोत्तमसेठने रुपया-मारुती नवसाला पावत असल्याचे विविध किस्से बाटली-भक्त झालेल्या गावकर्यांच्या मनात सोडून दिले. ‘त्या शिवेवरून जात असताना आपल्याला मारुतरायाचा दृष्टांत कसा झाला, त्यातून मारुतरायाने सांगितल्याप्रमाणे आपण वागत गेल्याने आपला उत्कर्ष कसा होत गेला’ याचा किस्सा त्याने प्रथम रंगवून रंगवून सांगितला. पुरुषोत्तमसेठची भरभराट लोक पाहात आलेच होते. कधी काळी किडुकमिडुक विकणारा आज दुमजली घराचा नि बर्याच मोठ्या जमिनीचा मालक झालेला त्यांनी पाहिला होता. ‘हे कुण्या देवाच्या कृपाप्रसादाखेरीज शक्य नाही’ असे त्यांनाही वाटत होतेच. त्यामुळे ‘ही रुपया-मारुतीची कृपा’ या दाव्यावर त्यांचा चटकन विश्वास बसला.
मग मारुतरायाची कृपादृष्टी आपल्याकडेही वळावी नि त्याने आपल्याही आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ते त्याला साकडे घालू लागले. त्याला साकडे घातले की – बहुतेक वेळा – रुपयाला दहा पैसे व्याजाने पुरुषोत्तमसेठ कर्ज देऊन त्या गावकर्याची अडचण दूर करी. त्याबदल्यात त्या गावकर्याचे भविष्यातील रुपये पुरुषोत्तमसेठच्या तिजोरीची वाट चालू लागत. त्यामुळे रुपया-मारुतीनेच आपल्या अडचणीचे निवारण केल्याची भावना गावकर्यांच्या मनात रुजून जाई. त्यातून ‘नवसाला पावणारा’ अशी त्या मारुतीची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली.
अलबत्त्या, गलबत्त्या आणि गावच्या लोकांच्या रुपयाची वाट आपल्या खिशापर्यंत आणून पोहोचवल्यानंतर गावाबाहेरील इतर लोकांच्या खिशातील पैसा पुरुषोत्तमसेठला खुणावू लागला होता. त्याच हेतूने त्याने देवस्थानभोवती नवसाला पावत असल्याच्या किश्शांची तटबंदी बांधली होती. त्यातून ‘रुपया-मारूती’ची ख्याती पंचक्रोशीतील गावांत पसरू लागली होती. तेथील लोकही त्याच्या कृपाप्रसादाच्या आशेने गावाची वाट तुडवू लागले होते. त्यांची सेवा करता यावी म्हणून देवस्थानच्या आसपासची बरीचशी जमीन पुरुषोत्तमसेठने ताब्यात घेतली होती. तिथे गाळे बांधून त्याने पूजेचे साहित्य, रेवडी-बत्तासे, शेव-चिवडा, चहा-भजी आदी विक्रीसाठी भाड्याने देऊन टाकले. रुपया-मारुतीच्या कृपेने हे उत्पन्न विनासायास त्याच्या तिजोरीमध्ये जमा होऊ लागले. पाहता पाहता देवळाचा विस्तार होऊन देवस्थान उभे राहिले.
रुपया-मारुतीच्या कृपेने भरभराट झालेला पुरुषोत्तमसेठ हा पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेत्यांमध्ये त्याची उठबस सुरू झाले. त्यांतील काही अधूनमधून त्याच्या बंगल्यावर पायधूळ झाडू लागले. आलेला प्रत्येक पाहुणा आवर्जून देवस्थानला भेट देई. तिथे मारुतरायासमोर नतमस्तक झालेल्या नेत्याचे अनेक फोटो त्यांचे चेले काढून घेत. त्यांचा उपयोग पुढे नेत्याला आपली इमेज उजळण्यासाठी, तर पुरुषोत्तमसेठला देवस्थानची इमेज उजळण्यासाठी होत असे. या सार्या राजकीय लागेबांध्यांच्या आधारे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुरुषोत्तमसेठ सरपंचपद हस्तगत करण्याच्या खटपटीत असल्याची वदंता होती. तसे झाले तर तो गावाचे कसे भले करू शकेल याच्या अनेक शक्यतांची उजळणी अलबत्त्या, गलबत्त्या आणि बाटली-भक्त करू लागले होते. गावाचे मुघलकालीन नाव बदलून ‘रुपयाची वाडी’ ठेवावे अशी मागणी पुढे येऊ लागली होती.
असेच आणखी काही महिने गेले...
एके दिवशी सरकारने ‘आता किमान चलन पाच रुपयाचे असेल’ असे जाहीर करून त्याहून कमी दर्शनी किंमतीची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. ‘आता आपल्या रुपयाचे काय?’ या प्रश्नाचे भूत अलबत्त्या नि गलबत्त्याच्या मेंदूत एकाच वेळी थैमान घालू लागले.
- oOo -
टीप: कथेची नाळ ‘दोघांचे भांडण, तिसर्याचा लाभ’ सांगणार्या पंचतंत्रातील तात्पर्यकथेशी जुळते हे बहुतेक वाचकांच्या ध्यानात आले असेलच. (कथेचे शीर्षकही त्या कथेवरुन लिहिल्या गेलेल्या ‘दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरून लोण्याचा गोळा’ या बडबडगीतावरुनच घेतले आहे.) या खेरीज निकोलाय गोगोल या रशियन लेखकाच्या ‘The Tale of How Ivan Ivanovich Quarreled with Ivan Nikiforovich’ या कथेशीही ती नाते सांगते. (जिच्यावरून ‘एनएफडीसी’ने ‘कथा दोन गणपतरावांची’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता.) परंतु तिचा प्रवास ‘एक लहानशी, नगण्य घटना एका व्यापक बदलास गती देऊ शकते’ हे सांगणार्या ‘बटरफ्लाय इफेक्ट’च्या वाटेवरून होतो. कथानकाला अर्वाचीन सामाजिक नि राजकीय घटनांचे संदर्भ आहेत हे सहज दिसून यावे.
---
(ही कथा ‘पुरुष उवाच - २०२४’ दिवाळी अंकामध्ये प्रथम प्रसिद्ध झालेली आहे.)