रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र

आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका भेटले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती.

माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले खूळ आहे’ हे वाक्य न बोलता माझ्या तोंडावर फेकत आहेत. “... दूध आणायला आलो होतो.” हातातील बरणी उंचावत ते म्हणाले.

“काय काका, पिशव्यांमध्ये घरपोच दूध येत असताना हा आटापिटा कशाला?” मी कळ काढली नि काका ‘हर हर महादेव...’ म्हणत माझ्यावर तुटून पडले. संतापाच्या भरात ‘जऽऽऽऽऽऽय श्रीऽराऽऽऽम.’ ही नवी रणघोषणा असल्याचा फतवा ते विसरले.

AngryKaKa
https://onlineresize.club/ येथून साभार.

पाश्चरायजेशनने दुधातील सकस तत्त्वे कशी जातात, पाश्चात्त्यांचे हे खूळ आपण स्वीकारल्याने भारतीय तरूण कसे शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत चालले आहेत वगैरे नेहमीचे दळलेले मुद्दे तर होतेच. पण एक मुद्दा मात्र विशेष लक्षवेधी होता. काका म्हणाले, ‘पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध मिळते.’

मी जन्मजात अडाणी असल्याने म्हणालो, “काका, पिशव्यांमधील दुधातही भेसळ होऊ शकते हे मला मान्य आहे. पण खुल्या चरवीमध्ये दुधात भेसळ करणे अधिक सोपे नाही का? 

“शिवाय तुमचा स्थानिक डेअरीवाला असल्याने भेसळ सापडली म्हणून त्याचा फार गवगवा होऊन बदनामी झाल्याने धंद्याचे नुकसान होण्याची शक्यता नगण्य. फारतर तो जागा नि नाव बदलून थोड्या अंतरावर किंवा दुसर्‍या उपनगरात वा पेठेत नवी डेअरी सुरू करेल. जम बसायला थोडा काळ जाईल इतकेच. दूध जीवनावश्यक असल्याने– आणि तुमच्यासारख्यांच्या हाती व्हॉट्स-अ‍ॅप असल्याने– गाडी पुन्हा रुळावर येईलच. 

“पिशव्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध वितरण करणार्‍या मोठ्या दूधसंघ वा डेअरीज्‌चे तसे नसते.  त्यांना आपल्या ब्रँडची काळजी घ्यावी लागते.”

“तुमच्यासारखे देशद्रोही लोक प्रत्येक पाश्चात्त्य कल्पनेचे असे समर्थन करतात म्हणून देश मागे पडला होता.” काका संतापाने फुलले होते. “द. जपानमधील बुर्किना फासो(१) शहरात पिशवीतील दुधावर बंदी आहे तर तिथे सर्व तरूण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. साठीच्या स्त्रियाही जिम्नॅस्टिक करतात (आणि सत्तरीचे म्हातारे त्यांना न्याहाळत बसतात - मी... अर्थात मनात) घरटी एक माणूस सैन्यात आहे...” स्थानिक डेअरीचे दूध पिणारा काकांचा मुलगा सैन्यात जायचे सोडून अमेरिकेत का गेला हा प्रश्न मी विचारू का नको या संभ्रमात पडलो. “... आणि म्हणून जपान हा जग्गात भारी देश आहे.” काकांचे बोलणे एकदाचे संपले.

शेवटी ‘ ... म्हणून तो मला फारफार आवडतो’ एवढे म्हणाले असते तर काकांचा हा निबंध इयत्ता चौथीच्या मराठीच्या पेपरसाठी क्वालिफाय झाला असता. ‘दुधाच्या पिशव्यांत भेसळ होऊ शकते म्हणून खुल्या चरवीतले दूध घ्या’ म्हणणारे काका आणि ‘ईव्हीएम हॅक होऊ शकते म्हणून मतपत्रिकेवर निवडणुका घ्या’ म्हणणारे काका यांच्यातील फरक मला दिसेनासा झाला.

मग मला या दोन्ही काकांच्या नावे बोटेमोड करणारा नि टेट्रापॅकमधील दूध आणि बेकन अशी न्याहरी... नव्हे ब्रेकफास्ट करणारा मित्र आठवला. ‘निवडणुकाच घेऊच नका. आम्हीच सार्‍यांचे तारणहार आहोत, सबब थेट आम्हालाच सत्ता द्या’ म्हणत नेहमीप्रमाणे तिसरी भूमिका मांडेल नि वर मलाच ‘कुंपणावरचा कावळा’ म्हणेल याची मला खात्री आहे. 😀

- oOo -

(१) काकांनी इथे कुठलेसे अगम्य नाव घेतले होते. ते शहर/गाव/खेडे खरेच जपानमध्ये आहे का, मला माहित नव्हते. काकांनाही असण्याची शक्यता शून्य. हा सारा माल-मसाला काकांनी व्हॉट्‌सअ‍ॅपवरून मिळवला असणार. मला बुर्किना फासो हे एका देशाचे नाव काय लक्षात राहते. मी तेच इथे दडपून दिले आहे.


हे वाचले का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा