गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (पूर्वार्ध) : माध्यमांतील प्रतिबिंब

---
प्रास्ताविक:
अलीकडील काही वर्षांत राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे शब्द चलनी नाण्यासारखे नि हत्यारासारखेही वापरले जाऊ लागले आहेत. या दोहोंच्या पूर्वसुरी म्हणता येतील अशा राष्ट्रभावना नि राष्ट्रीय एकात्मता या दोन संज्ञा आता बव्हंशी लुप्त झालेल्या आहेत. या बदलाला देशातील सामाजिक, धार्मिक, साहित्यिक, तांत्रिक आणि अर्थातच आर्थिक संक्रमणाला जोडून पाहता येते. त्यातून एक संगती हाती लागते. प्रामुख्याने करमणूकप्रधान माध्यमांतून दिसलेली ही संगती आणि त्यांतील आकलन वास्तवाला जोडून पाहण्याचा हा प्रयत्न.
---

१. अनेकता में एकता

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...

अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. १९६२ मध्ये प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम्‌ मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले.

यातील ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्या वाक्यामध्येच समतेचे तत्त्व अधोरेखित केले होते. पुढेही 'विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे’ म्हणताना एकाच परंपरेचे श्रेष्ठत्व लादण्याचा प्रयत्न करणार नाही हे मान्य केले होते. देशाबरोबरच देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे वचन दिले जात होते. वैय्यक्तिक कल्याण आणि समृद्धी ही देश नि देशबांधवांच्या समृद्धीशी जोडण्यात आली होती. एकुणात भ्रातृभाव, बांधिलकी हा देशबांधवांना जोडणारा धागा असेल असे यातून मान्य करण्यात आले होते. ’राष्ट्रीय एकात्मता’ ही संज्ञा तेव्हापासून परवलीची होऊन गेली होती. चित्रपटांतून, माहितीपटांतून इतकेच नव्हे तर जाहिरातींमधूनही या राष्ट्रीय एकात्मतेचा धागा ठळक करण्यात येत असे.

चलच्चित्र माध्यमात एकात्मता

तो काळ तसा तंत्रज्ञानाच्या बाल्यावस्थेचा होता. १९५९ मध्ये सुरू झालेले ’दूरदर्शन’ हे सरकारी मालकीचे एकमेव चॅनेल बातम्या, मनोरंजन, माहिती याबरोबरच संस्काराचे, प्रबोधनाचेही कार्य करत असे. ज्याला बहुसंख्य लोक आजही केवळ मनोरंजनाचे साधन समजतात त्या चलच्चित्रांच्या (Animation) माध्यमाचा वापरही यासाठी करुन घेतला जात होता. दूरदर्शनवर भीमसैन यांनी तयार केलेल्या ’अनेकता में एकता’ (१९७४) (सुधारित) किंवा ’एकता का वृक्ष’ (१९७२) यासारखे चलच्चित्र लघुपट राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना सोप्या स्वरूपात रुजवू पाहात होते.

याशिवाय देशोदेशी तयार झालेले अशाच स्वरूपाचे प्रबोधनात्मक चलच्चित्रपटही स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन दाखवले जात. इतालियन-अमेरिकन लेखक नि चित्रकार लिओ लिओनी याच्या कथेवर आधारित स्विम्मी (१९७१) हा एकतेचा संदेश देणारा लघुपट सर्वाधिक गाजला.

एकता का वृक्ष (१९७२) हा आणखी एक चलच्चित्रपट बराच लोकप्रिय झाला होता. या सार्‍यांमध्ये सामायिक मुद्दा होता तो बांधिलकीचा. विविधतेतून एकता, परस्पर-बांधिलकी हे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे मूलाधार होते.

अनुबोधपटांची परंपरा

'फिल्म्स डिविजन इंडिया’ ही संस्था ’राष्ट्रीय एकात्मता’ या एकाच विषयावर नव्हे तर काही सामाजिक व आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे अनेक चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट तयार करत असे. दूरदर्शनच्या एकाधिकारकाळात ते दूरदर्शनवरुन दाखवले जात. तसंच चित्रपटगृहांमधून चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक-दोन माहितीपट दाखवले जात असत. यात अनुबोधपटांचाही समावेश असे. 

यात कुटुंबनियोजनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शासनाने चालवलेल्या ’लाल त्रिकोण अभियाना’अंतर्गत ’अ‍ॅंगल ऑफ द ट्रॅंगल’, अफवाविरोधी प्रबोधनासाठी ’गुब्बारा’, दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीबाबत ’इंडियन ट्रॅफिक , स्वच्छतेचा संदेश देणारा ’हायजीन: द वे ऑफ लाईफ’, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा 'मीना', लाल त्रिकोण अभियानाप्रमाणे ’हम दो हमारे दो’ कॅपेनच्या प्रचारासाठी ’द क्रेडल’, असे विविध अशा अनुबोधपट दूरदर्शनने तयार केले होते. 

असे अनुबोधपट आज किती खासगी वाहिन्या तयार करतात, प्रसारित करतात? आपल्यापैकी किती जण असे माहितीपट पाहतात? 

पुढे चलच्चित्रांचा हात सोडून प्रबोधन चित्रपटांकडे सरकले आणि मिले सुर मेरा तुम्हारा (१९८८) बजे सरगम हर तरफ से (१९८९) सौ रागिनियोंसे सजा (२०१३) असे अनुबोधपट निर्माण झाले. पण...

आता बांधिलकीचा हात सुटून देवत्वस्वरूप देशाप्रती बांधिलकीच नव्हे, तर समर्पणभाव रुजवणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेची जागा देशभक्तीने घेतली. आणि त्यातून प्रथम ’कोण अधिक देशभक्त’ची अहमहमिका सुरू झाली आणि ती ’कोण अधिक देशद्रोही’ पर्यंत येऊन पोहोचली. लहान मुलांच्या म्हटलेल्या चलच्चित्रांमध्ये असलेला सुज्ञभाव मोठ्यांकडे सूत्रे येताच नाहीसा झाला.


२. सारे भारतीय माझे बांधव आहेत

’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्‍या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्‍या सर्वांसाठी तो संदेश होता. ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ एक प्रकारे त्यातून ध्वनित होत होता.

साहित्य-कलांमधील संक्रमण

पण काळ पुढे सरकला, तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या.

मराठी साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट क्षेत्राने सामाजिक विषयांवरील चित्रपटांचे बोट सोडून ’अ‍ॅंग्री यंग मॅन’भोवती कथानके विणायला सुरुवात केली.

सामाजिक चित्रपटांमध्ये पारंपरिक संदर्भात का होईना पण नेमक्या भूमिका असणार्‍या अभिनेत्रींना आता या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ची जोडीदार इतकेच स्थान मिळू लागले. पुस्तकांची जागा नियतकालिकांनी घेतली आणि तिथेही हिंदी चित्रपटसृष्टीतील खमंग गॉसिप्स कोणताही विधिनिषेध न बाळगता विकली जाऊ लागली. हळूहळू हे कृतकवीर तरुणाईचे आदर्श होऊ लागले. आता प्रबोधनाचे माध्यमही त्यांना शरण जाणे अपरिहार्य होऊन बसले.

राजकीय संक्रमण

समाजातील मनोरंजनाचे केंद्र दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटांकडे सरकत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवरही उलथापालथ होत होती. मुस्लिम धर्मियांमधील ’तोंडी तलाक’ संदर्भातील मैलाचा दगड मानला गेलेल्या प्रसिद्ध ’शाहबानो खटल्याचा निकाल १९८५ मध्ये आला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा आरोप करत मुस्लिम धर्मियांमधील एका गटाने आंदोलन सुरू केले. त्या दबावासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ साली संसदेत कायदा करुन या निकालास रद्दबातल केले.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसवरचा ’मुस्लिमधार्जिणेपणाचा’ आरोप अधिक जोरकसपणे करता येऊ लागला. यातून जनमतामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी आजवर धार्मिक, पौराणिक कार्यक्रमांना कटाक्षाने दूर ठेवलेल्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतावर आधारित मालिका दाखवण्याची सूचना राजीव गांधींनी केली. १९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण दूरदर्शनच्या पडद्यावर राज्य करु लागले. या दोन निर्णयांमुळे राजकीय सत्तेला धार्मिक दबावाने झुकवता येऊ शकते हा विश्वास निर्माण झाला. यातून दोन्ही धर्मियांमध्ये कट्टरपंथी मंडळींचा वरचष्मा होऊ लागला आणि आजवर राजकीय भूमीपासून दूर असलेल्या धर्मवेडेपणाने राजकीय जमीन व्यापण्यास सुरुवात केली.

मिले सुर मेरा तुम्हारा

पुन्हा राजीवजींच्याच प्रेरणेने जयदीप समर्थ (प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे बंधू) यांनी हा प्रस्ताव दूरदर्शनकडे नेला. १९८८ साली ’मिले सुर मेरा तुम्हारा’ हा संगीत-पट ’लोकसेवा संचार परिषद’ या सस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. यात प्रथमच मानवी एकतेचा, बांधिलकीचा गजर मर्यादित करुन केवळ ’देशबांधवांच्या एकतेचा’ पुकारा करण्यात आला.

या संगीतपटाची संगीत-कल्पना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची होती. भारतीय रागसंगीतामध्ये हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीं संगीतांच्या रागविस्ताराच्या दृष्टिकोनात फरक असला तरी मूळ रागकल्पना कर्नाटक संगीतामधूनच आलेली असल्याने काही रागांमध्ये साम्यही दिसते. या दोन्ही प्रवाहांचे प्रातिनिधित्व करणार्‍या ’भैरवी’ला मुख्य आधार म्हणून घेत रागसंगीतामधील इतर काही रांगांच्या छटा अधेमध्ये वापरण्यात आल्या.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यात हिंदी, असमी, तमिल, तेलगु, कश्मीरी, पंजाबी, हरयाणवी, सिन्धी, उर्दू, कन्नड़, मलयालम, बंगाली, उडीया, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांमधली कडवी समाविष्ट करण्यात आली.

प्रत्यक्ष पडद्यावर पं. भीमसेन जोशी आणि विदुषी लता मंगेशकर या दोन ’भारतरत्नां’सह बालमुरली कृष्ण, कविता कृष्णमूर्ती यांच्यासारखे गायकांसोबतच जावेद अख्तर, नरेन्द्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय यांच्यासारखे कवीही हजेरी लावून गेले.

(तत्कालीन) नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासारख्या तारे-तारकांसह हरीष पटेल, वीरेन्द्र सक्सेना यांच्यासारख्या सहकलाकारांचाही समावेश करण्यात आला होता.

नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकामुळे सुवर्णकाळ चालू असलेल्या क्रिकेटसह इतर खेळांतूनही काही खेळाडूंची वर्णी लागली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि तत्कालिन कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांचाही समावेश करण्यात आला होता.

गूँजे देस राग

पुढच्याच वर्षी (१९८९) मध्ये ’बजे सरगम हर तरफ से’ हा आणखी एक संगीत-पट निर्माण करण्यात आला. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ मध्ये भारताचे भौगोलिक वैविध्याचे दर्शन प्राधान्याने घडवले होते. ’बजे सरगम’ मध्ये भारतातील विविध संगीत, नृत्य परंपरांचा अंतर्भाव करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला होता.

’मिले सुर...’ ने भैरवी रागाला आधार-स्वर मानून संगीताची मांडणी केली होती तर ’बजे सरगम...’ साठी देस रागाची निवड करण्यात आली होती.

’मिले सुर...’ मध्ये केवळ गायक, गायन आणि अभिनेते यांचाच समावेश होता. ’बजे सरगम’ने पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. रामनारायण यांच्यासारखे तंतुवाद्यवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखे बासरीवादक, उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखे तबलावादक, अशा वाद्यवादकांचाही समावेश केला होता.

यासोबतच ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी, कथ्थक नर्तकी शोभना नारायण यांच्यासह कथकली, कुचिपुडी, मोहिनिअट्टम्‌, भरतनाट्यम्‌ आणि मणिपुरी नृत्यांचाही समावेश केला होता.

दुसरे संक्रमण

१९९२ मध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाला, नि त्यापाठोपाठ दंगली उसळल्या. देशात पुन्हा एकवार हिंदू-मुस्लिम द्वेषाचे तांडव सुरू झाले. अशा वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा पुन्हा एकवार बुलंद करण्याची गरज वाटू लागली.

’सारा भारत ये कहे’(१) हे गीत हे १९९३ मध्ये चित्रित करण्यात आले. ’मिले सुर मेरा तुम्हारा’प्रमाणे यातही त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवुडी अभिनेत्यांचा समावेश होता. यात आणखी एक महत्वाचा बदल असा होता की आता या बंधुभावाची शिकवण बालपणापासूनच बिंबवायला हवी हे ध्यानात घेऊन हे गीत त्या पिढीलाच उद्देशून लिहिले गेले होते.

राजकीय, धार्मिक, आर्थिक वावटळ

’सारा भारत ये कहे’ नंतरचा काळ हा भारताचा संक्रमणकाळ ठरला. मनमोहन सिंग प्रथम अर्थमंत्री नि नंतर प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यांचा बोलबाला सुरू झाला.

हिंदी चित्रपटांनी गुन्हेगारी, बटबटीत शृंगार, चोख मनोरंजन करणारे विनोद आदींची कास धरून ’अर्थस्य हि पुरुषो दास:’ ही म्हण तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली. खासगी चॅनेल्सच्या वावटळीमध्ये ’दूरदर्शन’ एका कोपर्‍यात फेकले गेले. तांत्रिक, आर्थिक प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू झाली. देशाचा आर्थिक विकास ज्याने होतो ते ते सारेच समर्थनीय ठरू लागले. त्यासाठी ज्याचा उपयोग नाही ते सारे निरुपयोगी ठरून बाहेर फेकले गेले.

यादरम्यान रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला आणि सामाजिक समता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर धार्मिक अस्मितांसोबतच जातीय अस्मिताही धारदार होऊ लागल्या. देशभर मोकाट सुटलेल्या अस्मिता-सांडांच्या धुमाळीमध्ये ’राष्ट्रीय एकात्मता’ नावाची गाय परागंदा झाली.

भारत अनोखा राग है

त्यानंतर बराच काळ अशा स्वरुपाचे कार्यक्रम नव्याने तयार झालेले दिसत नाहीत. जवळजवळ वीस वर्षांनी प्रसिद्ध गायक पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पुन्हा एकवार या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 'भारत को एक सलाम’ शीर्षकाखाली नवा संगीत-पट निर्माण केला. ’सौ रागिनियों से सजा भारत अनोखा राग है’ या गीताभोवती हा संगीत-पट उभा आहे.

परंतु त्याच्या गीताचे बोल पाहिले तर यात भारतीय भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक वैशिष्ट्यांबद्दल काहीच उल्लेख नाही. एखाद्या देवाची स्तुती करणारी आरती असावी असे ते गीत लिहिले आहे.

'देश हा आपणा सर्वांना जोडणारा समान धागा' या व्याख्येपासून सुरुवात करुन ’तुम्हा-आम्हा नागरिकांपासून वेगळा असा काहीतरी एक 'देश नावाचा देव नि आपण त्याचे भक्त’ इथपर्यंतचा प्रवास इथे पुरा झाला आहे.

हे गीत अनेक गायक-गायिकांनी गायले आहे. यात संगीतमार्तंड पं. जसराज, आपल्याला प्रामुख्याने चित्रपटगीत-गायक म्हणून ठाऊक असलेले कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गायक पं. येसूदास, शंकर महादेवन यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, जगजित सिंग आणि अनूप जलोटा यांचा समावेश होता. जावेद अख्तर यांच्यासारखे कवी, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्रीही हजेरी लावून गेल्या आहेत.

R.I.P राष्ट्रीय एकात्मता

'भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणत १९६३ मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेचा संगीत-प्रवास २०१३ साली ’भारत अनोखा राग है’पाशी थांबला. एकात्मतेला श्रद्धांजली वाहून देशभक्तीचा गजर सुरू झाला आणि कोण अधिक देशभक्त याची चढाओढ सुरू झाली.

१९९२ मध्ये आलेल्या स्पर्धाव्यवस्थेने देशभक्तीमध्ये स्पर्धा रुजवली. त्या व्यवस्थेत अपरिहार्यपणे गुणवत्तेपेक्षा उपलब्धतेला महत्त्व येऊन, स्वत:च्या गुणवत्तेपेक्षा इतरांमधील तिच्या अभावाची चर्चा होते. तेच देशभक्तीच्या क्षेत्रातही होऊ लागले. ’सारा भारत ये कहे’ मधील संस्कार आणि आता व्हॉट्स-अ‍ॅप सारख्या अनियंत्रित माध्यमांतून होणार प्रचार यातील फरक स्पष्ट दिसू लागला आहे. त्या गीतामध्ये बालकांवर केलेले बांधिलकीचे संस्कार कुठे आणि आज देशभक्तीच्या नावाखाली त्यांच्या मनात रुजवला जात असलेला द्वेष कुठे.

हातात हात घालून चालणारे नागरिक आता हात सोडून शेजार्‍याच्या पुढे राहण्यासाठी जिवाच्या आकांताने धावू लागले. प्रसंगी दुसर्‍याची धाव खंडित करण्यासाठी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडूही लागले. ’सारे भारतीय माझे बांधव आहेत’ पासून ’आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत’ पर्यंत मजल आपण मारली आहे.

(पूर्वार्ध समाप्त)

    पुढील भाग >> सामाजिक संक्रमण

- oOo -

---
टीप:
(१) बर्‍याच काळाने त्याच्याबद्दल एक रंजक माहिती मला मिळाली. त्यानुसार ’सारा भारत ये कहे’ (१९९३) हे गीत संजय दत्त अभिनीत ’खलनायक या शीर्षकाच्या चित्रपटातील आहे. ’नायक नहीं खलनायक हूँ मैं’ हे त्यातील गाणे आणि एकुणच कथानक गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप झाल्याने तो वादग्रस्त ठरला होता.

एकुणच बॉलिवुडी मसालापट परंपरेतील असलेल्या या चित्रपटात हे गाणे अगदीच अस्थानी दिसले असावे. प्रत्यक्षात सिनेमागृहांतून दाखवलेल्या प्रतीमध्ये हे होते की नाही मला ठाऊक नाही. परंतु दूरदर्शनवर मात्र त्याचे प्रसारण अनेकदा पाहण्यात आले.

कदाचित असेही असेल की, मूळ कथेमुळे चित्रपट वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी हे गाणे नंतर समाविष्ट करण्यात आले असावे. तसे असेल तर देशभक्ती हे आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी हत्यार म्हणून वापरले गेल्याचे हे अर्वाचीन काळातले पहिले ठळक उदाहरण म्हणता येईल. गेल्या आठ-दहा वर्षांत आता देशभक्तीचा गजर हे सर्व समस्यांचा, अडचणींचा निपटारा करून जमावाच्या आधारे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे हुकमी चलनच ठरलेले दिसते.

---


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: