सध्या क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्या निमित्ताने त्यासंबंधी विविध चर्चा, कार्यक्रम झडताहेत. सगळेच हात धुवून घेताहेत, मग आपणच का मागे रहा. म्हणून आम्हीही काहीतरी लिहू म्हटले. बरेच दिवस आमच्या डोक्यात हा विषय ठिय्या देऊन बसला आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की 'क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे का?' थांबा थांबा, थोडंसं इस्कटून सांगतो.
क्रिकेटमधे तीन प्रकारचे खेळाडू असतात, किंवा खरंतर यातले खेळाडू तीन प्रकारच्या जबाबदार्या पार पाडतात, ते फलंदाजी करतात, क्षेत्ररक्षण करतात किंवा गोलंदाजी करतात. यातले क्षेत्ररक्षक हे मैदानावर बहुसंख्येने असले तरी ते तुलनेने दुय्यम असतात, मूळ लढाई ही गोलंदाज नि फलंदाजात असते. पण मुद्दा असा आहे की हा खेळ या दोघांना समान संधी देतो की नाही. आम्ही जरा पटापट आठवतील तशा नोंदी केल्या. त्या इथे लिहितो आहे.
एखादा फलंदाज बाद आहे असे अपील झाले असता जर निश्चित निर्णय करता येत नसेल तर ’संशयाचा फायदा’ फलंदाजाला दिला जातो. (चला ठीक आहे, तो एकदा बाहेर गेला की त्याला दुसरी संधी मिळत नाही म्हणून हे योग्य म्हणूया.)
हल्ली एकदिवसीय नि वीस-वीसच्या जमान्यात गोलंदाजाला लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याची सोय नाही, लगेच वाईड दिला जातो, ज्याचा अर्थ प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
षटकात एकच बाउन्सर (डोक्यावरून जाणारा) टाकण्याची परवानगी आहे. दुसरा टाकल्यास तो नोबॉल ठरवून पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
फलंदाजाच्या कंबरेच्या वर फुल्टॉस टाकल्यास नोबॉल दिला जातो नि यावर फलंदाज बाद दिला जात नाही. पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही. असे चेंडू एका सामन्यात दोनदा टाकल्यास पंच त्या गोलंदाजावर त्या सामन्यापुरती बंदी घालू शकतात. अशीच बंदी फलंदाजाच्या एखाद्या फटक्याबद्द्ल घातली जात नाही.
याशिवाय पारंपारिक कसोटी क्रिकेटमधून आलेले नोबॉल नि वाईड आहेतच. जिथे पुन्हा प्रतिपक्षाला एक धाव फुकट मिळते नि वर खेळायला एक जादा चेंडूही.
आणखी एक जिझिया कर म्हणजे एकदिवसीय नि वीस-वीस क्रिकेटमधे क्रीजपुढे पाऊल आल्याने नोबॉल ठरलेल्या पुढच्या चेंडूवर फ्री-हिट बहाल केली जाते. म्हणजे नोबॉलवरच नव्हे तर पुढच्या चेंडूवरही फलंदाज बाद होऊ शकत नाही. हा अन्याय नव्हे काय?
लेग-बिफोर अर्थात पायचीतचे अपील केलेला चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीबाहेर (पक्षी: लेगस्टंप) असेल तर भले चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळणार असेल तरी फलंदाजाला पायचीत दिले जात नाही.
फलंदाजाला ’रनर’ अर्थात धाव-मदतनीस असतो. त्याच्या मदतनीसाने धावलेल्या धावा त्याच्या नावावर नोंदल्या जातात. क्षेत्ररक्षक देखील काही काळ मैदानाबाहेर जाऊन आराम करतो, ज्या काळात त्याच्याऐवजी बारावा खेळाडू क्षेत्ररक्षण करतो. म्हणजे या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या कामात दुसर्या व्यक्तिची मदत घेता येते, मग गोलंदाजाला अशी सुविधा का नसते?

फलंदाज फलंदाजी करताना मधेच उलट्या दिशेने फिरून ’रिवर्स स्वीप’ किंवा तत्सम पलटी शॉट मारू शकतो, पण गोलंदाज मधेच हात बदलून उजव्याऐवजी डाव्या हाताने गोलंदाजी करू शकत नाही. किंवा गेला बाजार न सांगता ओवर द विकेटच्या ऐवजी अचानक राउंड द विकेट चेंडू टाकू शकत नाही.
एवढेच नव्हे तर त्याने चेंडू टाकताना हाताची हालचाल कशी असावी यावरही काही निर्बंध आहेतच नि त्यानुसार अधेमधे काही गोलंदाजांचे चेंडू अवैध ठरवले जाऊ शकतात व त्या गोलंदाजावर बंदीही येऊ शकते. फलंदाजावर एखाद्या नियमानुसार अशी बंदी घातली जाऊ शकते का? माझ्या ऐकिवात तरी असा काही नियम नाही.
फलंदाज खेळी चालू असताना कितीही वेळा आपली बॅट वा अन्य साधने बदलू शकतो पण गोलंदाजाला मात्र ही सोय नाही. केवळ चेंडू फार खराब झाला असे पंचांचे मत झाले तरच त्याला नवा चेंडू मिळू शकतो.
आपली बॅटला चिकटपट्ट्या लावून भक्कम करण्याची फलंदाजाला परवानगी आहे, पण एखाद्या गोलंदाजाने जरासे वॅसलीन लावले तर गदारोळ होतो नि त्याची कारकीर्द संपुष्टात येते.
बॅटचे वरचे रबर खेळताना त्रास देत असेल वा बॅटचे गटिंग नको असेल तर फलंदाज ते कापून टाकू शकतो. पण गोलंदाजाला चेंडूची शिवण जरा उसवून सैल करावीशी वाटली की लगेच त्याच्या कारवाई होते.
हे सगळं सोडा हो. पण क्रिकेटच्या इतिहासात ताकीद देण्यासाठी येलो आणि रेड कार्ड प्रत्येकी एकदाच दाखवले गेले आहे१. आणि दोनही वेळा ज्याला ताकीद देण्यात आली तो गोलंदाज होता.
वरील ढीगभर निर्बंध पाहिले नि फलंदाजांना जाचक असे काय नियम आहेत हे पहायला गेलो तर एक फुटकळ नियम सापडला तो म्हणजे फलंदाज एकदा आउट झाला की त्या इनिंगमधे तो पुन्हा खेळू शकत नाही, फुस्स.
याशिवाय एखादा असा नियम आम्हाला काही नोंदवता आला नाही ज्यात एखाद्या चुकीबद्दल फलंदाजाला शिक्षा केली जाते नि गोलंदाजाला अप्रत्यक्ष फायदा होतो. तुम्हाला आठवतोय का एखादा नियम, पहा बरं जरा.
- oOo -
१. हे दोनही प्रसंग अनधिकृत होते हा मुद्दा अलाहिदा. २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या-वहिल्या टी-२० सामन्यांत अखेरच्या चेंडूवर न्यूझिलंडला तब्बल पंचेचाळीस धावा हव्या होत्या. सामन्याचा निकाल निश्चित झाल्याने खेळाडू केवळ औपचारिकता पुरी करत होते. त्यावेळी गंमत म्हणून ग्लेन मॅक्ग्रा याने अखेरचा चेंडू हा सरपटी (अंडर-आर्म) टाकला.
या ’प्रमादा’बद्दल पंच बिली बावडन यांनी त्याला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये रेड कार्ड दाखवले होते. (https://www.youtube.com/watch?v=2PC31C_HJ3E) वर समाविष्ट केलेला फोटो त्याच घटनेचा आहे.
या प्रसंगाने १९८१ मध्ये याच दोन संघात झालेल्या सामन्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा अखेरचा चेंडू शिल्लक असताना न्यूझीलंडला बरोबर सहा धावांची आवश्यकता होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ट्रेव्हर चॅपेल (प्रसिद्ध तीन चॅपेल बंधूंपैकी एक) याने असाच अंडर-आर्म सरपटी चेंडू टाकून न्यूझीलंडला रोखले होते. या अखिलाडूवृत्तीबद्दल (जी पुढे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची ओळखच बनली.) चॅपेल आणि ऑस्ट्रेलियाची बरीच निर्भर्त्सना झाली. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि चॅनेल-९ चा समालोचक रिची बेनॉ याने ’One of the worst things I have ever seen on a cricket ground.’ असे म्हणत आपल्या समालोचनाचा समारोप केला.
पण विजयासाठी काहीही क्षम्य असते हा मंत्र स्वीकारलेल्या त्या संघाने ती टीका अर्थातच मनावर घेतली नाही. तिथून पुढे हा संघ स्लेजिंग म्हणजे मैदानावरील टोमणेबाजीसाठी कुप्रसिद्ध होत गेला. ग्लेन मॅक्ग्राने मात्र प्रत्यक्ष असा चेंडू टाकला नाही, फक्त आविर्भाव केला. एक प्रकारे ट्रेव्हर चॅपेलला दिलेली ही चपराकच होती.
या खेरीज २००५ मध्येच त्सुनामीग्रस्तांच्या मदतीसाठी जागतिक संघ वि. आशियाई संघात झालेल्या सामन्यात जागतिक संघाच्या शेन वॉर्न याने ४९ षटके आणि पाच चेंडू झाल्यावर षटके पुरी झाली असे समजून तंबूचा रस्ता धरला. तेव्हा पंच असलेल्या (पुन्हा) बिली बावडन यांनी त्याला परत बोलावून, येलो कार्ड दाखवून एक चेंडू खेळण्याची आज्ञा दिली. इथे शेन जरी फलंदाजी करत असला तरी मूळचा गोलंदाजच तो. त्यामुळे बिलीने पुन्हा एका गोलंदाजावरच अन्याय केला म्हटले पाहिजे. असो.
वास्तविक क्रिकेटमध्ये ताकीद म्हणून वा शिक्षा म्हणून कार्ड दाखवण्याची पद्धत २०१७ पर्यंत नव्हती. वरील दोनही प्रसंग हे बिली बावडन यांच्या विनोदबुद्धीचे फलित आहेत.
---