(प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास)
हा बिम्म आहे << मागील भाग
---
एकदा एका कापडाच्या दुकानात बिम्मला दोन आरसे दिसले. एकात डोकावून पाहिले तर त्यात उंचच उंच काठीसारखा बिम्म दिसला, तर दुसर्यात तो हवा भरलेल्या फुग्यासारखा जाडजूड दिसला. आता हे दोघे कोण बुवा? असा प्रश्न निर्माण होणे अपरिहार्य होतेच.
मग घरी परत येईतो त्याच्या कल्पनेचा वारू उधळतो. त्यापैकी उंच माणसाचे नाव बेम्म आणि फुग्यासारख्याचे नाव बूम्म आहे असे निश्चित केले जाते.
घरी आल्यावर तो आईला हे सारे सांगून त्याच्या मते अवघड प्रश्न विचारतो, 'यातला खरा बिम्म कोण ते तुला ठाऊक आहे का?'
’मी कोण?’ या प्रश्नाचा हा पुढचा टप्पा दिसतो, ’यापैकी मी कोण?’!
बिम्म हा बब्बीचा भाऊ आहे, आईचा/बाबांचा मुलगा आहे, मागच्या आवारातील आजोबांचा मित्र आहे... आणखी बराच काही आहे. त्यापैकी खरा बिम्म कोण हा प्रश्न आहे. तो जीएंनी आरशांतील प्रतिबिंबांच्या रूपकातून विचारला आहे... आणि त्याचे उत्तरही शेवटी बिम्मच्याच तोंडून देऊन टाकले आहे.
गोष्टीमध्ये आरशांचा उल्लेख असला तरी त्याला एकुणात माणसाच्या वास्तविक ओळखीच्या व्याख्येचा संदर्भ आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. जन्मलेल्या प्रत्येक माणसाला जन्मत: नावाबरोबरच इतर काही ओळखी चिकटलेल्या असतात. तो कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो अथवा बहीण असते, कुणाचा नातू वा नात असते...
या क्रमाने सामाजिक उतरंडीमध्ये त्याचे एक स्थान निर्माण झालेले असते. त्यामुळे ’अमुक व्यक्ती कशी आहे?’ या प्रश्नाचे चांगली, वाईट, मनमिळाऊ वगैरे उत्तरे देता येत असली, तरी ती त्या प्रश्नाप्रमाणेच ढोबळ राहतात. ती व्यक्ती ’भाऊ म्हणून कशी आहे?’, ’कुणाचे वडील म्हणून कशी आहे?’, ’कुणाची मुलगी म्हणून कशी आहे?’,’कुणाची मैत्रिण म्हणून कशी आहे?’ हे आनुषंगिक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे स्वतंत्रपणे शोधून त्यांची समष्टी अथवा सार हे मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून घेता येते. बिम्मच्या या प्रश्नाला जीएंनी आरशांचे रूपक वापरले आहे.
आरशात दिसणारे, हालचाल करणारे ’ते कुणी’ लहान मुलाच्या, घरातील पाळीव प्राण्या-पक्ष्यांच्या कुतूहलाचा भाग असते. समोर दिसते ते आपले प्रतिबिंब, आपण असे दिसतो याचा शोध लहानपणी जेव्हा लागतो, तेव्हा या नव्याने सापडलेल्या माध्यमातूनच माणसाचं पिलू स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करत असतं. पण ’काय खरं नि काय खोटं?’ या ढोबळ, काळ्या-पांढर्या विभागणीपाशी न थांबता, साक्षेपी चिकित्सक आणखी एक पाऊल पुढे टाकून ’किती खरं नि किती खोटं?’ हा पुढचा प्रश्न हाती घेत असतो.
बिंब आणि प्रतिबिंबातील खर्या-खोट्याचे भास नि सत्य-वास्तवाचे कोडे जीएंना नेहमीच मोहवत असावे असे दिसते. 'इस्किलार'(१) मधल्या गारुड्याच्या तोंडी ते येते. त्यांच्या 'प्रवासी'(२) मधला आंधळा शिकारी प्रतिबिंबांचे जाळे निर्माण करतो. त्याद्वारे मानवी दृष्टिला दिसणारे निश्चित वास्तव विस्तार पावल्यास संशयाच्या भोवर्यात सापडते, हे स्वत:ला अंधाहुन अधिक लायक समजणार्या डोळसांना दाखवून देतो.
हे अंध-डोळसाचे तत्त्व त्यांच्या ‘ठिपका’(३) मधे पुन्हा एकदा डोकावते. ‘प्रवासी’मध्येच प्रवाशाला भेटलेला पांगळा जटाधारीही त्यासंबंधीचे एक आकलन त्याच्या ओटीत टाकून देतो. ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मध्ये ते अॅलिस इन वन्डरलॅन्डमधील अॅलिसचा आरशाशी आलेला संबंध अधोरेखित केला जातो. अॅलिसची मूळ कथाच स्वप्न-सत्याच्या संभ्रमाभोवती विणली गेलेली आहे. तिचे आरशामध्ये प्रवेश करणे म्हणजे पर्यायी नियमांनी बद्ध अशा प्रतिबिंबांच्या जगाला सामोरे जाणेच आहे.
त्यांच्या ’प्रवासी’मध्येच अकाल या दैत्याला मोह असलेले हिरवे रत्न त्याला प्राप्त होऊ शकत नाही, समोर आले तरी त्याला ते ओळखता येत नाही. कारण त्याच्या दृष्टिची मर्यादा, त्याचे रंगांधळेपण. परंतु त्यात पुन्हा एक पळवाट होती. तो रंगांधळा असला तरी आरशातील प्रतिबिंबांमध्ये त्याला सारे रंग दिसू शकतात. तो हिरवा रंगही त्याला आरशामध्ये- म्हणजे पुन्हा प्रतिबिंबामध्ये मात्र दिसू शकला असता. हा उपाय त्याच्या भावाला- महाकालाला ठाऊक असूनही स्वार्थापोटी तो अकालास ते सांगत नाही. म्हणजे अकालाला त्याच्या भावाच्या नजरेतून दिसणारे स्वत:चे प्रतिबिंब यथातथ्य नाही, महाकालाच्या स्वार्थाने ते दूषित झालेले आहे.
त्यांच्याच ‘अस्तिस्तोत्र’(४)मध्ये ते म्हणतात, ‘समुद्राचा करडा पडदा स्थिर आहे. त्यांच्यात आपली प्रतिबिंबे आहेत म्हणून आपण अस्तित्वात आहो असे नि:शंकपणे खडकांना वाटते.’ म्हणजे एखाद्याच्या अस्तित्वाचे प्रमाण अथवा सिद्धता देण्याचे माध्यम म्हणून प्रतिबिंबाचा वापर केला जातो आहे. माणसाला स्वत:बद्दलचे पुरे आकलन वस्तुनिष्ठपणे करता येत नाही. यासाठी इतरांच्या नजरेने स्वत:कडे पाहण्यास सूचित करणारे हे रूपक जीएंच्या कथनातून वारंवार येत राहाते. ’बिम्म'च्या जीवनप्रवासाच्या सुरुवातीलाच हे प्रतिबिंबाचे कोडे त्याच्या पुढ्यात ठाकते, त्याच्या परीने तो ते सोडवतोही.
बिम्मचीच आई या प्रश्नाचे सरधोपट उत्तर देऊन टाकते. ती म्हणते, 'तूच खरा बिम्म. कारण तू तुझ्याइतकाच उंच आहेस नि तुझ्यासारखाच रुंद.' वरकरणी आईचे उत्तर बिनचूक आणि निरुत्तर करणारे आहे. पण बिम्म म्हणतो 'मुळीच नाही. आम्ही सगळेच खरे. फळीवरचे खाऊचे डबे काढतो तो उंच असलेला बेम्म. पण त्याला पोटच नाही. मग तो खाऊ खाण्यासाठी येतो तो बूम्म. ऐसपैस पोटाचा हा बूम्म सार्या खाऊचा चट्टामट्टा करतो. आता या दोघांची गरज संपली की बिम्म परत येतो.’ बिम्मच्या या खुलाशावर आई शरणचिट्ठी लिहून देण्यापलिकडे काही करूच शकत नाही.
ही तशी छोटीशी गोष्ट, बिम्मच्या वयाच्या मुलांची कल्पनेची भरारी लक्षात घेता अशा अचाट वाटणार्या कल्पना आपण त्यांच्याकडून ऐकत असतोच. पण बिम्मच्या बाबतीत हा कल्पनाविस्तार त्याच्या बाजूने निर्हेतुक असला, तरी त्या पलिकडे जाऊन जीएंनी त्यात बिम्मच्या आई-बापांसाठी काही ठेवून दिले आहे. इथे लहानांच्या नि मोठ्यांच्या विचारातला फरक पाहता येईल.
'या तीन बिम्म पैकी खरा कोण?' या प्रश्नाचे उत्तर शोधताना आईने तिच्या वाढल्या वयात घट्ट झालेल्या जाणीवांनुसार 'एकच बिम्म असू शकतो' हे गृहित धरून तो कोणता हे ठरवण्याचा प्रयत्न केला. हे तीनही खरे ही कल्पना तिच्या मनात उमटू शकली नाही. समोर दिसणारी तीन रूपे ही तीन वेगळी व्यक्तिमत्त्वे आहेत आणि त्यातून आपल्याला निवड करायची आहे, हे आई सहज मान्य करते आहे. खर्या खोट्याला एक निश्चित चेहरा असतो, सार्यांना तो सारखाच दिसतो हे कुसंस्काराच्या ओझ्याखाली वाढल्या वयाच्या माणसांचे गृहितक सोबत घेऊनच ती पाहते आहे.
बिम्मच्या माध्यमातून या आईला जी.ए. काही वेगळे सांगू पाहताहेत. ते दोन आरसे दाखवतात ती प्रतिबिंबे निव्वळ मूळ बिंबाचे 'जसे आहे तसे' प्रतिरूप नाहीतच. त्या पलिकडे जाऊन ते आपल्या - म्हणजे आरशांच्या - अंगभूत गुणांनुसार त्या बिंबाचे एक वेगळे प्रतिबिंब तुम्हाला दाखवतात. थोडक्यात एखादी व्यक्ती कशी आहे हे त्याच्या असण्या बरोबरच अनुभवणार्याच्या, ते तुमच्यापर्यंत पोचवणार्या दुसर्या - साक्षी असलेल्या - व्यक्तीच्या दृष्टिकोनावर, त्याच्या कुवतीवर आणि प्रामाणिकपणावरही अवलंबून असते.
दोन वेगळ्या व्यक्ती एकाच तिसर्या व्यक्तीबद्दल सर्वस्वी भिन्न चित्रे उभे करू शकतात ते त्यांच्या दृष्टिकोनामुळे, कुवतीमुळे आणि त्यात त्यांच्या मिसळलेल्या स्वार्थामुळे. ही चित्रे काहीशी बेम्म किंवा बूम्म सारखीच तर असतात, ते पूर्णांशाने बिम्म नसतात. पण त्यात थोडा थोडा बिम्म देखील असतो.
मग एकुणात 'बिम्म असा आहे' म्हणजे तरी नक्की काय. त्याचे असणे, ते पुरे चित्र, आसपासच्या इतरांच्या त्याच्याबाबत असणार्या अनुभवांच्या, मतमतांतराच्या निरपेक्ष असे उभे असते का? की यातला एक खरा नि इतर खोटे वा आभासी असे काही नसतेच? कदाचित असं म्हणू शकतो की हे सारेच बिम्म खरे असतात, त्यांच्या खरेपणाची व्याप्ती वेगवेगळी असते इतकेच !
बिम्मही त्या तिघांना एकाच व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती म्हणून पाहतो आहे, जे वास्तवही आहेच. बिम्म त्या आरशांसमोर उभा आहे तेव्हाच ते आरसे ती प्रतिबिंबे दाखवतात, आणि तेवढ्यापुरतेच त्या दोघांचे अस्तित्व असते. शिक्षण आणि संस्काराच्या चरकातून जाण्यापूर्वी, ’दोन भिन्न बिंदूंतून एक आणि एकच रेषा जाते’ यांसारख्या निश्चित विधानांच्या आधारे जगणे सुरू करण्यापूर्वी, माणसाच्या पिलाची दृष्टी अधिक नितळ असते, विभागणीऐवजी पैलूंचा, अनुषंगांचाही विचार करते, असे असावे का?
दुसर्या दृष्टीने पाहिले तर बूम्म आणि बेम्म ही बिम्म ची प्रतिबिंबे म्हणून न पाहता त्याचे एक एक अनुषंग (profile) म्हणून पाहिले तर आणखी एक वेगळाच दृष्टिकोन समोर येतो.
एकट्या बिम्मला जे साधणार नाही - फळीवरचे डबे खाली उतरवून खाऊ खाणे - ते बेम्म, बूम्म नि बिम्म मिळून पार पाडतात. नकळत का होईना सहकाराचे लहानसे तत्त्व कुठेतरी बिम्म शिकला आहे नि ते त्याच्या या कल्पनाविस्तारात डोकावते आहे. एकाच रूपातील बिम्म हा परिपूर्ण बिम्म नसतो, तर बूम्म, बेम्म आणि बिम्म मिळूनच एक पुरा बिम्म होत असतो.
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आपण बोलतो, तेव्हाही विशिष्ट संदर्भात बोलताना त्याच्यामधल्या एखाद्या बेम्मबद्दल वा बूम्मबद्दलच आपण बोलत असतो, त्याला जाणून घेत असतो. अन्य एखाद्या संदर्भात तो सर्वस्वी वेगळ्या रूपात समोर येऊ शकते. तोही बिम्म असू शकतो!
(क्रमश:) पुढील भाग >> आपल्या पक्ष्याचा शोध
- oOo -
(१). कथा: इस्किलार ; कथा-संग्रहः रमलखुणा.
(२). कथा: प्रवासी ; कथा-संग्रहः रमलखुणा.
(३). कथा: ठिपका ; कथा-संग्रहः काजळमाया.
(४). कथा: अस्तिस्तोत्र; कथा-संग्रहः सांजशकुन.
---
संबंधित लेखन:
द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च
सत्य-असत्याची कोण देई ग्वाही (पूर्वार्ध) : प्रचलित निकष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा