शनिवार, २५ एप्रिल, २०२०

जग जागल्यांचे ०७ - ’रुझवेल्ट’चा राखणदार: कॅ. ब्रेट क्रोझर

कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग <<  मागील भाग

नव्वदीच्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षात अमेरिकन युद्धनौकांनी पाऊल ठेवल्यामुळे मोठा संघर्ष टाळण्यासाठी चीनला माघार घ्यावी लागली होती. अमेरिकेच्या या युद्धनौका त्या भागातील सहकारी वा मित्र देशांच्या भेटींतून आपले तिथले स्थान अधोरेखित करत असतात. USS Theodore Roosevelt या युद्धनौकेची व्हिएतनाम भेट याच हेतूचा भाग होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात, उत्तरेला चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर चालू असताना, व्हिएतनाममधील डा नांग या बंदरात ती दाखल झाली.

पाच दिवसांची व्हिएतनाम-भेट उरकून परतीच्या वाटेवर असताना, तीन-चार दिवसांनी तिच्या तीन खलाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दोनच दिवसांत बाधितांची पंचवीस झाली. तोवर अमेरिकेच्या संरक्षण दलातील सुमारे सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील सुमारे सव्वाशे नौदलातील होते. २५ मार्च रोजी पेंटगॉनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ’रुझवेल्ट’वरील बाधित खलाशांना लवकरच उपचारासाठी आणले जाईल असे जाहीर केले

USSRoosevelt

३० मार्चपर्यंत नौकेवरील बाधितांची संख्या दीडशेहून अधिक झाली. उपचाराचे तर सोडाच, त्यातील एकाचेही विलगीकरणही केले गेलेले नव्हते. आता मात्र नौकेचा कॅप्टन ब्रेट क्रोझर याने धोक्याचा बिगुल वाजवण्याचा निर्णय घेतला. त्याने एक चार पानी इमेल नौदलातील आपल्या वरिष्ठांना पाठवली.

वरिष्ठांनी सर्व खलाशांची चाचणी घेण्याचे आश्वासन त्याला दिले होते. पण क्रोझर म्हणतो, "निव्वळ चाचणी केल्याने विशिष्ट व्यक्तीला लागण झाली आहे की नाही इतकेच समजू शकेल. त्याच्या प्रसाराला आळा घालणे शक्य नाही. त्यासाठी १४ दिवसांच्या सक्तीच्या विलगीकरणाची आवश्यकता आहे आणि ते साध्य करणे नौकेच्या मर्यादित जागेमध्ये शक्य नाही." अरुंद आणि सामायिक केबिन्स, खाणावळ आणि सुमारे पाच हजार कर्मचारी अशा विषम परिस्थितीत विलगीकरण यशस्वीपणे राबवणे अशक्यच होते.

’शिवाय...’, क्रोझर लिहितो, "सध्या परिस्थिती युद्धजन्य नाही. तसे असते, तर कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण लढत राहिलोच असतो. पण सद्यस्थितीत नौका सज्ज ठेवण्यासाठी खलाशांना मृत्यूच्या दारात उभे करण्यात काहीच हशील नाही."

अणुभट्टीसह अनेक शस्त्रे, विमाने आणि यंत्रसामुग्री असलेली नौका एरवी संपूर्णपणे रिकामी करणे शक्य नसते. अत्यावश्यक कामांसाठी काही कर्मचारी त्यावर ठेवावे लागतात. क्रोझर म्हणाला, "असे असले, तरी पाच हजार खलाशांच्या जीवितासाठी हा धोका पत्करायला हवा. नौदलाला अत्याधुनिक यंत्रणांइतकीच त्यांच्या जीविताचीही काळजी आहे, हे त्यांना दाखवून द्यायला हवे."

BretCoetzer

ब्रेटने लिहिलेले हे पत्र दुसर्‍या दिवशी ’सॅनफ्रॅन्सिस्को क्रॉनिकल’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आणि नौदलासह अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ माजली. पण नौदलाचे प्रभारी सचिव थॉमस मॉड्ली यांनी या सार्‍या गोष्टींना फार महत्व देण्याची गरज नसल्याचे भासवले. ’हे खलाशी बाधित असले तरी त्यांची प्रकृती उत्तम आहे, कुणालाही गंभीर त्रास नाही’ असा दावा त्यांनी केला.

ज्या ’गुआम’मध्ये या नौकेवरील खलाशांना उतरवून घेण्याचे आदेश दिले होते, ते जेमतेम दोनशे चौरस मैल क्षेत्रफळाचे अमेरिकन अधिपत्याखालील एक लहानसे बेट आहे. पावणेदोन लाख लोकसंख्येच्या या बेटावर पाच हजार लोक - ते ही संभाव्य बाधित रुग्ण - सामावून घेण्याइतकी सक्षम आरोग्ययंत्रणाच नाही. तेव्हा चाचणी होऊन लागण झाली नसल्याचे सिद्ध झालेल्या खलाशांनाच सामावून घेण्याची, त्यांच्या केवळ विलगीकरणाची सोय करण्याची तयारी तेथील गव्हर्नरने दाखवली.

गुआममधील एका व्यायामशाळेला विलगीकरण कक्ष म्हणून रूपांतरित करुन त्यात दीडशे खलाशांची सोय केली होती. नौकेप्रमाणेच इथेही विलगीकरणाला आवश्यक असणारे किमान अंतर राखणे अशक्य होते. त्यातील अनेक खलाशी लवकरच बाधित म्हणून घोषित झाले. ’उरलेले कर्मचारी ’बाधित होतील का?’ हा प्रश्नच गैरलागू ठरुन ’ते कधी बाधित होतील?’ एवढाच प्रश्नच आता शिल्लक राहिला आहे.

दरम्यान क्रोझरचे पत्र माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याने धक्का बसलेल्या मॉड्ली यांनी क्रोझरच्या ’सुमार निर्णयक्षमते’ला जबाबदार धरुन त्याला नौकेच्या कमांडर पदावरुन मुक्त केल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी सुमारे पाच ते सहा वेळा ’त्याने ते मुद्दाम लीक केले नसले...’ असे म्हणत असतानाच क्रोझर आणि लीक हे दोन शब्द एकाच वाक्यात पुन्हा पुन्हा उच्चारले. शब्दार्थाने त्याच्यावर संशय नसल्याचे सांगत असताना ध्वन्यर्थाने तोच दोषी असल्याचा खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न केला.

पुढे नौकेवरील खलाशांशी संवाद साधताना, त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’क्रोझरने प्रसिद्धी माध्यमांकडे जाणॆ ही मोठी चूक होती.’ म्हणत पुन्हा एकवार त्यानेच ते पत्र माध्यमांकडे लीक केले असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. या भाषणादरम्यान क्रोझरवर दोषारोप करत असताना क्रोझर हा ’भाबडा आणि अतिशय मूर्ख’ असल्याचा आरोप केला. तेथील नाराज खलाशांनी अनेकदा त्यांच्या बोलण्यात अडथळा आणला. ’आमच्या जीविताच्या हितासाठीच क्रोझरने ते केले असल्याचे’ मॉड्ली यांना बजावले.

त्यांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप माध्यमांतून पसरली आणि मॉड्ली यांच्या शेरेबाजीवर सर्वच क्षेत्रातून टीकेची झोड उठली. विशेषत: क्रोझरला उद्देशून त्यांनी वापरलेले ’दगाबाज’ हे विशेषण टीकेचे सर्वाधिक धनी ठरले. कारण नौदलाच्या आणि एकुणच संरक्षण दलांच्या नियमावलीनुसार ’दगाबाजी’ हा कोर्ट मार्शल होण्याइतका गंभीर गुन्हा मानला जातो. त्यातच मॉड्ली यांनी कोणत्याही चौकशीशिवाय एकतर्फी निर्णय घेत क्रोझर यांच्यावर कारवाई केली होती. सेनाधिकार्‍यांत आणि लोकप्रतिनिधींमध्येही या विरोधात प्रचंड नाराजीचे सूर उमटले. अखेर प्रचंड गदारोळानंतर मॉड्ली यांनी क्रोझरकडे दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यापूर्वी नौकेवर झालेला ब्रेटचा निरोपसमारंभ ही चोख आणि रोख जगण्याच्या काळातील अपवादात्मक असा हृद्य प्रसंग होता. आपल्या नौकेला आणि सहकार्‍यांना अखेरचा सॅल्यूट देऊन नौका सोडणार्‍या आपल्या कॅप्टनच्या नावाचा जयघोष करत त्याच्या सहकार्‍यांनी त्याला निरोप दिला. अनेक खलाशांनी याचा व्हिडिओ सोशल माध्यमांतून प्रसिद्ध केला. मायकेल वॉशिंग्टन याने ’एका श्रेष्ठ नि जबाबदार कॅप्टनला असाच निरोप द्यायला हवा.’ म्हणत हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना क्रोझर याला GOAT अर्थात Greatest Of All Times या विशेषणाने गौरवले.

१३ एप्रिलपर्यंत रुझवेल्ट नौकेवरील कर्मचार्‍यांमधील बाधितांची संख्या तब्बल ५८५ इतकी झाली, आणि कोरोनाने नौकेवरचा आपला पहिला बळी घेतला.

अमेरिका ही जगातील सर्वश्रेष्ठ महासत्ता मानली जाते. महासत्तेचे मोजमाप अर्थबळ आणि शस्त्रबळ या एककांत केले जाते. ’सर्वांसाठी आरोग्यसेवा’ या व्याख्येचा भाग नसते. पण सर्व अत्याधुनिक साधने आणि शस्त्रे धारण करणारी, चीनसारख्या बलाढ्य शत्रूच्या मनातही धडकी भरवणारी रुझवेल्ट जेव्हा एका विषाणूसमोर नांगी टाकते, तेव्हा माथेफिरु शस्त्रास्त्रस्पर्धांमध्ये रमलेल्या राष्ट्रप्रमुखांनी महासत्तेच्या आपल्या व्याख्येकडे नव्याने पाहण्याची गरज निर्माण होत असते.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी दिनांक २५ एप्रिल २०२०)

पुढील भाग >> वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा