शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे

भारत हा कर्मकांड-प्रधान देश आहे असे  मी म्हणतो. ते तंतोतंत खरे करण्याचा माझ्या देशबांधवांचा प्रयत्न पाहून माझे ऊर भरून येते

आपल्या सीएम आणि पीएम ने सांगितले की एसी वापरु नका... आता ते ही अंमळ कर्मकांडवालेच, घरच्या पर्सनल एसीला धोका नाही हे सांगितलेच नाही. मग त्यांचे थाळीबंद शागीर्द त्यांची आज्ञा पाळण्यास सरसावले.

मुळात जिथे हवा रि-सर्क्युलेट होते, जिथे एअर-व्हेंट असतात तिथे हवा आत खेचली जाऊन सेंट्रल कूलिंग युनिटकडे नेऊन थंड करुन पुन्हा परत सोडली जाते. या प्रक्रियेत कामाच्या ठिकाणी जर कोरोनाचे ड्रॉप्लेट्स असतील तर ते हवेबरोबर खेचले जाऊन व्हेंटमध्ये दीर्घकाळ टिकून राहू शकतात. धोका इथे आहे! घरच्या - स्प्लिट वा विंडो - एसीमध्ये बाहेरच्या बाजूला जे पॅनेल असते त्यात अतिशय पातळ पत्रे असतात. त्यांचा एकुण सरफेस एरिआ भरपूर पण जाडी नगण्य असल्याने, त्यांच्याभोवती फिरणारा पंखा त्यांना लवकर थंड करतो. आणि हे खोलीतील हवेला थंड करतात.

स्प्लिट एसी असेल तर तो त्याला जोडलेल्या कॉपर ट्यूबचे तपमान कमी करतो, त्यातून आतील कूलन्टचे तपमान कमी होते. ही ट्यूब आतील युनिटपर्यंत गेलेली असते. तिथे एक कार्बन सिलिंडर घरातील हवा त्या ट्यूबभोवती फिरवून पुन्हा खोलीत सोडतो. त्यामुळे त्या हवेचे तपमान कमी होते. या प्रक्रियेत ना आतली हवा बाहेर टाकली जाते ना बाहेरची आत खेचली जाते. त्यामुळे मुळातच आत कोरोना ड्रॉप्लेट्स असतील तरच ते टिकून राहण्याचा प्रश्न येतो. आणि आधीच ते असतील तर मग एसी लावा की न लावा, फरक काय पडतो?

विंडो एसीबाबत परिस्थिती अगदी किंचित अधिक रिस्की म्हणता येईल. कारण तिथे आत हवा फेकणारा पंखा त्या पॅनेल्सच्या तुलनेने जवळ असतो. त्यामुळे बाहेरुन त्या पॅनेलवर ड्रॉप्लिंग पडले तर तो आत खेचण्याची नगण्य पण शून्य नसलेली शक्यता असते. पण आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार हा विषाणू फ्लूच्या इतर विषाणूसारखा हवेत राहात नाही. त्यामुळे अगदी वरच्या मजल्यावरील कोरोनाबाधित माणसाने नेम धरुन तुमच्या एसीवर शिंकले तर मात्र विंडो एसी तुम्हाला धोक्यात टाकू शकतो. पण आता एकुणात ही शक्यता किती उरते याचे गणित करा तुम्हीच.

पण मी सांगतोय तो किस्सा याहून महान आहे. एसी नाही म्हणून आमच्या समोरच्या बिल्डिंगमधील खिडकी-शेजार्‍याने भेंडांचे/वाळ्याचे पडदे असणारा भलामोठा कूलर आणला. मी ताबडतोब रिमोटली त्याला एक दंडवत घातला. अरे मर्दा त्यापेक्षा एसी बरा की रे. तीन बाजूने लावलेल्या त्या भेंडांची शीट्स तर जंतूंसाठी इनक्युबेटर सारखेच काम करतात.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाच्या साथीच्या वेळेस पाणी बराच काळ साचू देऊ नये म्हणून सांगितले जाते. घरात पाण्याची टाकी, पिंप यांतील पाणी वरचेवर उपसून शेवाळ वा गाळ साचू नये याची खात्री करुन घेण्याचे आवाहन केले जाते. त्याचे कारण म्हणजे साचलेल्या पाण्यात, गाळ-शेवाळात जंतू वेगाने वाढतात.

इथे तर त्याहून अधिक चांगले म्हणजे आर्द्र आणि थंड वातावरण तयार होते नि वर भेंडांमध्ये जिवाणू, विषाणूंना दडून राहायला भरपूर सांदीकोपरे तयार असतात. त्यांची स्वच्छता जिकीरीची असते. आख्खे शीट डेटॉल सारख्या डिस-इन्फेक्टंट मध्ये बुडवून काढल्याशिवाय किंवा कडक ऊन्हात बराच काळ वाळवल्याखेरीज ते स्वच्छ होणे अवघड.

थोडक्यात, ’काय सांगितले’ हे ऐकताना ’का सांगितले’ हे ऐकले नाही, समजून घेतले नाही तर केवळ तेवढे कर्मकांड पाळण्याचे गृहित धरुन, वर त्याला त्याहून घातक पर्याय काढला जातो तो असा.

कर्मकांडप्रधान देश प्रगती करत नाही तो यामुळे. कारणमीमांसा, कार्यकारणभावाची उकल याचं आपल्याला तंतोतंत वावडं आहे. बाबा बोला वैसा करने का, एवढंच आपल्याला कळतं.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा